आम्ही कोण?
ले 

माझी पुस्तकांशी दोस्ती झाली त्याची गोष्ट!

  • जान्हवी गव्हाणे
  • 23.04.26
  • वाचनवेळ 6 मि.
world book day

लहानपणी मी सुट्टयांची फार आतुरतेने वाट पाहत असे. रोज शाळा, ट्यूशन, होमवर्क एका मागोमाग सुरू असायचं आणि या सगळ्यात निवांत वेळ कधी मिळायचा नाही. पण सुट्टया लागल्या की, आपण वेळेनुसार चालत नसून वेळ आपल्यानुसार चालतेय असं वाटायचं. सुट्टीत आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळायचा. मुख्य म्हणजे पुस्तकं वाचायला निवांत वेळ मिळायचा, म्हणून मी खूश असायचे. सुट्टया लागल्या, की मी मनसोक्त पुस्तकं वाचायला सुरुवात करते.

बऱ्याच वेळा मी विचार करते, पहिलं पुस्तक मी कोणतं वाचलं? कधी वाचलं? पण त्याबद्दल नेमकं काही आठवत नाही. मी पहिली-दुसरीत असताना माझे बाबा मला लहान-लहान गोष्टींची पुस्तकं आणून देत असत. एक पुस्तक साधारणपणे पंधरा-वीस पानांचं असायचं; त्यातील अक्षरं मोठी-मोठी असायची. मी मन लावून ते पुस्तकं वाचत असे. त्यातली मला आवडलेली बरीच पुस्तकं मी पुनः पुन्हा वाचत असे. आजही ती सर्व पुस्तकं मी जपून ठेवली आहेत. पुस्तकं वाचताना मी आधी संपूर्ण पुस्तकातील चित्रं पाहून घ्यायचे, मगच वाचायला सुरुवात करायची.

हेही वाचा - गोष्ट खास पुस्तकाची आणि वाचकांचीही..

पुढे मी जशी जशी मोठी होत गेले, तशी थोडी-मोठी, जास्त पानांची पुस्तकं वाचू लागले. 'साधना', 'वयम' या मासिकांचे 'दिवाळी बालविशेषांक' मी आवर्जून वाचत असे. अनेक मोठ्या लेखकांनी मुलांसाठी लिहिलेल्या कथा त्यात असायच्या. मला अजूनही आठवतं, साधनाच्या एका बालविशेषांकामध्ये दासू वैद्य यांनी लिहिलेली एक गोष्ट होती. ती गोष्ट खूप सुंदर, मनोरंजक आणि एवढी उत्कंठा वाढवणारी होती, की ती वाचताना शेवटी काय झालं असेल, हे जाणून घेण्याची उत्सुकता मनात निर्माण झाली. त्यामुळे मी डायरेक्ट शेवटच्या पानावर जाऊन, अगोदर शेवटचा पॅरेग्राफ वाचला होता. मग कुठे माझ्या जिवात जीव आला आणि पुन्हा मी उरलेली सुरुवातीची गोष्ट वाचून काढली. आजही मला ते आठवून हसू येतं.

आमच्या घरात मासिकं, त्रैमासिकं, नवीन प्रकाशित झालेली पुस्तकं यायची. अनेक लेखकांचं येणं-जाणं सारखं चालू असायचं. त्यामुळे आपोआप छोटी-मोठी पुस्तकं नजरेला पडायची. मी पुस्तकं हातात घ्यायचे, मुखपृष्ठ पाहायचे, लेखकाचं नाव ओळखीचं दिसतं का ते पाहायचे. ते लेखक बाबांचे मित्र आहेत का ते पाहायचे. आणि पुस्तकांची पानं उलटत बसायचे. थोड्या वेळानंतर ते तसंच ठेवून द्यायचे. तेव्हा मी लहान असल्यामुळे त्यातलं मला काही समजत नसायचं. पण घरी आलेलं प्रत्येक पुस्तक हातात घेऊन पाहणं, हा माझा एक छंदच होऊन बसला होता.

हेही वाचा - आणि कचऱ्यातून उभं राहिलं भव्य ग्रंथालय!

माझी एक सवय आहे. मला माझी पुस्तकं कोणालाही द्यावीशी वाटत नाहीत. कारण वाचायला दिलेली पुस्तकं दिलेल्या अवस्थेत परत आलीयत, असं कधी घडलेलं नाही. बाइईंडिंगमधून निसटलेली, मुखपृष्ठावरील ट्रान्सपरंट कव्हर निघालेली, पानावर अन्नाचे डाग पडलेली पुस्तकं पाहिल्यावर मला फार वाईट वाटतं. पुस्तक खराब होऊ नये म्हणून अर्धवट वाचलेलं पान दुमडून ठेवण्याऐवजी मी पान नंबर लक्षात ठेवते किंवा बुकमार्क वापरते. मग माझ्या पुस्तकांची कोणी अशी अवस्था केलेली मला कशी आवडेल? पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनाची अवस्था थोड्या फार प्रमाणात अशीच असेल, असं मला वाटतं.

पुढे तिसरी-चौथीत असताना मी साने गुरुजींचं 'श्यामची आई', अनिल अवचट यांचं 'लाकूड कोरताना', वीणा गवाणकर यांचं 'एक होता कार्व्हर' अशी पुस्तकं वाचू लागले. हळूहळू माझा गोष्टींच्या पुस्तकातील रस कमी होत गेला. कल्पना करून लिहिलेल्या गोष्टींपेक्षा खऱ्या घटना, वास्तव गोष्टी आता मला वाचायला मिळू लागल्या. या पुस्तकांच्या मी प्रेमात पडले. हे वाचून मी विचार करायला शिकले.

हेही वाचा - जेव्हा तरुण मुलं उलगडतात पुस्तकाची पानं… ‘नाशिक रीड्स’

मला एक प्रसंग आठवतो, त्यावेळी मी सहावीत होते. बाबांचे मित्र घरी आले होते आणि त्यांनी मला विचारलं, की ''सध्या तू कोणत पुस्तक वाचलं आहेस?" काही दिवसांपूर्वीच 'प्रकाशवाटा' हे पुस्तक वाचून पूर्ण झाल होतं. मी त्यांना ते पुस्तक वाचलं म्हणून सांगितलं, तर ते माझ्या बाबांना म्हणाले, 'हिला आत्ताच एवढी मोठी पुस्तकं वाचायला देऊ नकोस. छोटी-छोटी, हलकी पुस्तकं देत जा.' पण गोष्टींच्या पुस्तकांपेक्षा मला अशी पुस्तकं वाचायला जास्त आवडत होती. प्रकाशवाटा वाचल्यानंतर माझ्या वाचन प्रवासाला एक नवी दिशा सापडली. मला आत्मचरित्रं, प्रवासवर्णनं, जंगलाविषयीची पुस्तकं प्रचंड आवडायला लागली. एखादं आत्मचरित्र वाचतेवेळी आपणसुद्धा ते जीवन जगतो आहोत, अशी भावना मनात येऊ लागली.

मारुती चित्तमपल्ली, अनिल अवचट, सुधा मूर्ती हे माझे आवडते लेखक आहेत. 'जंगलाच देणं', 'केशराचा पाऊस', 'रानवाटा', 'पक्षीविश्व', 'स्वतःविषयी', 'आयुष्याचे धडे गिरवताना', 'मलाला', इंदिरा गांधी यांच्यावरील 'इंदिरा' अशी बरीच पुस्तकं मी वाचली आहेत. या प्रत्येक पुस्तकाने मला खूप काही शिकवलं आहे. जगण्याचं तंत्र, कष्टाचा मार्ग, नातं, सामाजिक जीवन यांची ओळख मला या पुस्तकांनी करून दिली आहे. कोणत्याही पुस्तकातल्या विचाराचा संबंध आपल्या आयुष्यात लावता येत असतो. त्यातून नवं चैतन्य मिळतं, जगायला सकारात्मक ऊर्जा मिळते. ही गोष्ट मी अनुभवत असते.

हेही वाचा - वाचनयात्रेची सुरुवात

मागच्या आठवड्यात मी 'आशा नेगी' यांचं 'ब्युटी ऑफ लाईफ' हे पुस्तक ऑनलाइन मागवून घेतलं. ते पूर्ण वाचून काढलं. कॅन्सर असलेल्या लेखिकेचा हा प्रवास आहे. तो त्यांनी दैनंदिनी स्वरूपात मांडला आहे. वाचताना अक्षरशः अंगावर काटा आला. काय तो अफाट अनुभव! ती हकीकत खरी असली तरी माझ्या कल्पनेच्या,सहनशक्तीच्या बाहेरच्या गोष्टी मी त्यात अनुभवत होते. जगण्याची प्रचंड इच्छाशक्ती काय असते, सकारात्मक ऊर्जा काय असते, हे वाचताना सतत जाणवत होतं. पुस्तकं माणसाला वास्तववादी जीवनाचं दर्शन घडवत असतात, असं म्हणतात. ते मी हे पुस्तक वाचताना अनुभवलं. लेखकांनी लिहिलेले अनुभव आपल्या वाट्याला कधी आलेले नसतात, तरीही ते आपलेच वाटत राहतात. पुस्तकातील पात्रांशी आपलं नकळत एक नातं निर्माण होतं असतं. एका पुस्तकात कितीतरी वेगवेगळ्या गोष्टी भेटतात. ठिकाणं भेटतात. अनुभव मिळतात. ते आपल्याला अप्रत्यक्ष जगता येतात. पुस्तकं हे वेदना, सुख-दु:ख, संघर्ष यांचा अनुभव देणारी आणि आपले मनोबल वाढवणारी फार महत्त्वाची गोष्ट आहे, असं मला वाटतं.

'पुस्तक आपल्या आयुष्याचा खरा मित्र आहे', असं म्हणतात आणि हे मला खरंही वाटतं. प्रत्येकाच्या आयुष्यात पुस्तकांसाठी एक छोटासा कप्पा तरी नक्की असावा. त्या कप्प्यात अशी काही पुस्तकं असावीत...जी आपल्याला कधीही एकटं पडू देणार नाहीत. त्यांच्या पानांच्या सुगंधामध्ये मन दरवळून जावं. आठवणीत रमवून टाकणारी, आजूबाजूच्या सर्व गोष्टी विसरून मन गुंतवणारी, कुतूहल आणि नाना संवेदना नव्याने जागं करणारी, जेव्हा वाचू तेव्हा प्रत्येक वेळी नवं काहीतरी सांगणारी पुस्तकांसारखी मित्रमंडळी आपल्या आसपास असावीत. त्यांच्या सहवासात आपल्याला आयुष्याचे विविध रंग समजून-उमजून घेता यावेत. अशी असावी पुस्तकांशी मैत्री!

जान्हवी गव्हाणे | 8459227719







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results