यंदाच्या वर्षात आपल्या आरोग्यक्षेत्राच्या दृष्टीने एक महत्त्वाची घडामोड अपेक्षित आहे. डेंग्यूची नवीन, प्रभावशाली लस भारतात उपलब्ध होऊ घातली आहे. Takeda या जपानी कंपनीने विकसित केलेली ही QDenga लस जगभरातल्या चाळीस-एक देशांमध्ये आधीपासूनच वापरली जात आहे. DGCI ने (Drugs Controller General of India) नुकतीच या लशीला मान्यता दिली आहे.
डेंग्यू आणि मलेरिया हे डासांवाटे पसरणारे आपल्याकडचे दोन मुख्य आजार आहेत. ॲनोफेलिस डासाच्या मादीमार्फत मलेरिया पसरतो. तर एडिस इजिप्ती डासाच्या मादीमुळे डेंग्यू पसरतो. ‘नॅशनल सेंटर फॉर व्हेक्टरबोर्न डिसीजेस कंट्रोल’च्या आकडेवारीनुसार गेल्या दहा वर्षांत मलेरियाच्या संसर्गाचं प्रमाण कमी झालेलं दिसतं. डेंग्यूच्या साथी मात्र दर काही महिन्यांनी डोकं वर काढतात.
२०१७, २०२२ आणि २०२३ साली आलेल्या डेंग्यूच्या साथी आजवरच्या सर्वात मोठ्या ठरल्या. (२०१७: दोन लाख रुग्ण, ३०० हून अधिक मृत्यू. २०२२: दोन लाख ३३ हजार रुग्ण, ३०० मृत्यू. २०२३: दोन लाख ८९ हजार रुग्ण, ४८५ मृत्यू.) तुलनेने मलेरियामुळे होणार्या मृत्यूंची संख्या गेल्या दहाएक वर्षांत झपाट्याने खाली आली आहे. सरकारी नोंदींनुसार २०१६ साली मलेरियाच्या १० लाखांहून अधिक रुग्णांच्या नोंदी झाल्या. त्यांपैकी ३०० रुग्णांचे मृत्यू झाले. तर गेल्या वर्षी एक लाख रुग्ण नोंदले गेले. त्यापैकी एकाचाही मृत्यू झाला नाही.
मलेरियाचं प्रमाण आता त्यातल्या त्यात दुर्गम आदिवासी प्रदेशांमध्ये अधिक दिसून येतं. उलट डेंग्यू शहरी भागांमध्ये अधिकाधिक पसरताना दिसून येत आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, राजस्थान, दिल्ली या राज्यांमध्ये डेंग्यूच्या संसर्गाचं प्रमाण जास्त असल्याचं दिसून येतं. डेंग्यूमुळे होणारे मृत्यू दक्षिण भारतात अधिक दिसून येतात. शहरी भाग, दाटीवाटीची लोकवस्ती, अस्वच्छता, डासांची अधिक पैदास ही डेंग्यूचा प्रसार होण्यामागची मुख्य कारणं आहेत. गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागांतही डेंग्यूच्या संसर्गाचं प्रमाण वाढत चाललं आहे.
हेही वाचा - विकसनशील देशांतील लहान मुलांसाठी कॅन्सर ठरतोय जीवघेणा
हा आजार पावसाळ्याच्या दिवसांत आणि डासांवाटे पसरतो. डेंग्यूचा संसर्ग झालेली व्यक्ती तापाने फणफणते. रुग्णाला सांधेदुखीचा, डोकेदुखीचा त्रास होतो. उलट्या होतात. खास डेंग्यूसाठी असं वेगळं अँटिव्हायरस औषध उपलब्ध नसल्याने रुग्णाच्या लक्षणांनुसार उपचार केले जातात. ताप कमी करण्यासाठी, उलट्या थांबण्यासाठी औषधं दिली जातात. सांधेदुखीवर पेनकिलर्सचे उपाय केले जातात. अशा उपचारांनी बहुतांश लक्षणं ओसरतात. संसर्ग सौम्य असेल तर डेंग्यूचा रुग्ण एक-दोन आठवड्यांत बरा होतो. तीव्र संसर्ग असेल तर रुग्णाची तब्येत सुधारण्यास अधिक काळ लागू शकतो. पण तीव्र संसर्गाच्या रुग्णाला पुढेही काही ना काही त्रास होत राहतात, असं दिसून येतं. ‘डेंग्यू बरेच दिवस पुरतो’ असं म्हणून या चिवट आजाराला या ना त्या प्रकारे तोंड देण्यावाचून रुग्णाला पर्याय राहत नाही.
वरती ‘व्हेक्टरबोर्न डिसीजेस’ ही संज्ञा आली आहे. असे आजार माणसा-माणसांमध्ये थेट संक्रमित होत नाहीत. एखाद्या माध्यमाद्वारे (vector) त्यांचा फैलाव होतो. डेंग्यू, मलेरियाच्या बाबतीत डास हा असा ‘व्हेक्टर’ असतो.
साहजिकच, अशा आजारांचा फैलाव रोखण्यासाठी या माध्यमाचा, म्हणजे डासांचा फैलाव रोखण्यावर (vector control) आधी भर दिला जातो. डेंग्यू आणि मलेरिया इथे वेगळे ठरतात. मलेरियाचे डास रात्रीच्या वेळेत चावतात. डेंग्यूचे डास मात्र ‘डे-टाइम बाइटर्स’ मानले जातात. ते दिवसाच दंश करतात. म्हणजे डेंग्यूचा प्रसार प्रामुख्याने दिवसाउजेडीच होतो.
या सर्व पार्श्वभूमीवर डेंग्यूच्या नव्या लशीची वेगळी दखल घेणं आवश्यक ठरतं.
यापूर्वी जगभरातल्या विविध देशांमध्ये Dengvaxia नावाची लस वापरली गेली आहे. मात्र डेंग्यूचा आधी संसर्ग होऊन गेलेल्या रुग्णांसाठीच या लशीचा उपयोग होतो. नव्या QDenga लशीच्या बाबतीत अशी कोणतीही अट नाही.
हेही वाचा - ‘सिरम इन्स्टिट्युट': सिर्फ नाम ही काफी है!
डेंग्यूच्या संसर्गामागे त्या व्हायरसची चार वेगवेगळी रूपं (serotypes) कारणीभूत असतात- DENV1, DENV2, DENV3, DENV4. पैकी DENV2, DENV3 यांचा संसर्ग अधिक गंभीर असतो. भारतात सध्या DENV2 च्या संसर्गाचं प्रमाण सर्वाधिक आढळून येतं. त्याखालोखाल DENV3 आणि DENV1 धुमाकूळ घालतात. अलीकडे DENV4 चं प्रमाणही वाढताना दिसतं. एका सिरोटाइपचा संसर्ग झाला तर आपल्या शरीरात त्याविरोधात प्रतिकारशक्ती निर्माण होते. पण इतर सिरोटाइप्सच्या संसर्गाशी लढायला त्याचा उपयोग होत नाही. उलट अशा संसर्गाने गंभीर आजाराचा धोका वाढतो.
QDenga लस डेंग्यूच्या चारही सिरोटाइप्सवर परिणामकारक ठरणारी आहे. ४-६० वर्षं वयोगटातल्या सर्व व्यक्ती ही लस घेऊ शकतात. ही लस दोन इंजेक्शन्सच्या स्वरूपात असेल. दोन इंजेक्शन्सच्या मध्ये तीन महिन्यांचं अंतर राखणं आवश्यक असेल.
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, ही लस म्हणजे डेंग्यूच्या विरोधातली जादूची कांडी नाही. डेंग्यूचे गंभीर संसर्ग कमी करण्याला या लशीचं प्राधान्य असेल. लसीकरणाच्या जोडीला ‘व्हेक्टर कंट्रोल’ आणि सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीतले अन्य खबरदारीचे उपाय सुरू ठेवावेच लागतील.
(दरम्यान, संपूर्ण भारतीय बनावटीच्या DengiAll या लशीवरही काम सुरू आहे. पॅनासिया बायोटेक ही फार्मा कंपनी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या मदतीने ही लस विकसित करत आहे. सध्या या लशीच्या तिसर्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत. ही लस २०२७ साली सर्वांसाठी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे.)
प्रीति छत्रे | preeti.chhatre22@gmail.com
प्रीति छत्रे 'युनिक फीचर्स पोर्टल'च्या सहसंपादक आहेत. अनुभवपर ललितलेखन आणि अनुवाद यात त्यांना विशेष रस आहे.
