आम्ही कोण?
लेखमालिका : कानोसा एआय विश्वाचा

बुद्धिमान यंत्रं : जब दिल्ली दूर थी

  • श्रीनिवास पंढरपुरे
  • 22.04.26
  • वाचनवेळ 13 मि.
ai series

भोवतालच्या परिस्थितीचं आकलन करून तिला स्वत:साठी अनुकूल करून घेण्याचं काम मनुष्यजात लाखो वर्षांपासून करत आलेली आहे. या सामूहिक आकलनातून गोळा होणाऱ्या माहितीचं विलेषण करू शकणाऱ्या, त्याद्वारे ज्ञानात भर घालणाऱ्या बुद्धीचं नैसर्गिक वरदान आपल्याला आहे याची जाणीव मनुष्याला होत गेली. याच बुद्धीच्या जोरावर त्याने आजवर अनेक तंत्रज्ञानं विकसित केली. माणसाच्या राजकीय, सामाजिक किंवा सांस्कृतिक इतिहासाइतकाच तंत्रज्ञान निर्मितीचा इतिहासही रोचक आहे.

सुरुवात अग्नी निर्माण करण्याच्या तंत्रज्ञानाने झाली. पुढे चाक, शेती, शेतीचा नांगर आणि लिहिण्याचं तंत्रज्ञान असा एक टप्पा येतो. भाषा आणि लिपीचा विकास व त्याबरोबर लिहिण्याचं तंत्रज्ञान ही खूप मोठी झेप होती. या तंत्रज्ञानाने मनातील कल्पना, विचार, निसर्गात घडणाऱ्या घटना यांची एक कायमस्वरूपी नोंद होऊ लागली. हे ज्ञान आत्मसात करून त्यात भर घालणं पुढील पिढ्यांना शक्य झालं. ज्ञान अधिक प्रवाही होऊन त्याचा प्रसार होणं अधिक सोपं झालं. माहितीचं संकलन आणि व्यवस्थापन होऊ लागलं. हे माहिती तंत्रज्ञानाचं आद्यरूप म्हटलं पाहिजे. माणसाच्या उपजत बुद्धीला यातून आणखी चालना मिळाली. ही बुद्धी कुणा एकट्याची नव्हती, तर सामूहिक होती हे आवर्जून सांगावंसं वाटतं.

बुद्धीचं एकदा असं भान आल्यावर आपली बुद्धी आपण आपल्याला हवी तशी एक तंत्रज्ञान म्हणून निर्माण करू शकू का, असा प्रश्न निदान काहीजणांच्या मनामध्ये नक्कीच आलेला असणार. परंतु ही बुद्धी कुठल्याही मूर्त स्वरूपात नसल्यामुळे ती कृत्रिम प्रकारे निर्माण करण्यातल्या आव्हानांची त्यांना जाणीवही झालेली असणार. तरीही या बुद्धीच्याच जोरावर कृत्रिम प्रकारे ती निर्माण करण्याच्या कल्पना मात्र माणसाने अनेक केल्या. ग्रीक संस्कृती आणि ग्रीक मिथककथा यात अशा प्रकारच्या कल्पना प्रकर्षाने आढळतात.

ग्रीक कथांमध्ये हेफेस्टस या देवाने निर्माण केलेली अटोमेटोन किंवा स्वयंचलित यंत्रं आहेत. हेफेस्टस हा ग्रीकांचा अग्निदेव. फक्त अग्नीच नाही, तर लोहारकाम, सुतारकाम, शिल्पकला अशा अनेक कारागिरी अवगत असणारा हा देव आहे. क्रीट बेटाच्या संरक्षणासाठी त्याने कांस्य धातूपासून टालोस हा अटोमेटोन निर्माण केला होता. याच देवाने स्वत:च्या राजवाड्यात सेवेसाठी सोन्यापासून सुंदर स्त्रियांची निर्मिती केली. या अटोमेटोन स्त्रिया बोलू शकत आणि नवीन कौशल्यंही आत्मसात करू शकत. माणसाने अग्नी निर्माण केला, म्हणून त्यांना शिक्षा करण्यासाठी याच हेफेस्टसने पन्डोरा या क्रूर अटोमेटोन स्त्रीची निर्मित्ती केली आणि तिला पृथ्वीवर पाठवलं, अशीही एक मिथककथा आहे. हे अटोमेटोन सहजी आढळणारे धातू किंवा माती यांपासून तयार केलेले असत.

अशा संकल्पना निर्माण करणं ही कल्पनाशक्तीची खूप मोठी भरारी होती. इतर जुन्या संस्कृतींमध्येही अशा कल्पना मांडल्या गेल्या आहेत, पण त्याला स्वयंचलित यंत्रांचं स्वरूप ग्रीकांनीच दिलं. मात्र, या कल्पनांना मूर्त स्वरूप देऊ शकेल असं तंत्रज्ञान निर्माण व्हायला विसावं शतक उजाडावं लागलं. तिथपर्यंत आपण कसे पोहोचलो याची थोडक्यात पार्श्वभूमी बघू या.

हेही वाचा - एआय टूल्स : कितपत विश्वासार्ह?

सुमारे सात शतकांपूर्वी युरोपात प्रबोधनाची लाट आली. त्यात जी अनेक स्थित्यंतरं घडली त्यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैज्ञानिक क्रांती. वैज्ञानिक क्रांतीमुळे भौतिक जगाविषयीचे हजारो वर्षांपासून प्रचलित असलेले ठोकताळे मोडीत काढले गेले. गणिताच्या क्षेत्रातही कॅल्क्युलससारख्या नवीन पद्धती शोधल्या गेल्या. नवीन विज्ञान आणि गणित यांच्याबरोबर तंत्रज्ञान विकसित होण्याचा वेगही वाढला. जेम्स वॉटचं वाफेचं इंजिन ते रेल्वेची निर्मिती या टप्प्यांमधून युरोपात औद्योगिक क्रांती झाली. उद्योगांचे नवीन प्रकार शोधताना असलेल्या उद्योगांची उत्पादकता वाढवणं यालाही प्राधान्य दिलं जाऊ लागलं. नवनवीन यंत्रांच्या निर्मितीमुळे माणसाच्या शारीरिक क्षमतेची मर्यादा कधीच ओलांडली गेली होती. याच औद्योगिक क्रांतीतून माणसाच्या बुद्धीच्या क्षमतेच्या पलीकडे जाणारं यंत्र शोधण्याची आवश्यकता भासू लागली.

विज्ञानाच्या अभ्यासात, तंत्रज्ञान निर्मितीत किंवा उद्योगांमध्ये गुंतागुंतीची गणिती आकडेमोड केली जायची. ती अधिक अचूकपणे व कार्यक्षमतेने करणं गरजेचं होऊ लागलं. यासाठीचं यंत्र तयार करण्याचं आव्हान चार्ल्स बॅबेज या इंग्लिश गणिती आणि अभियंत्याने स्वीकारलं. १८१२मध्ये त्याने पहिल्यांदा अशा प्रकारच्या यंत्राचं रेखाटन करून ते बांधण्याचा प्रयत्न सुरू केला. अशा गणकयंत्रासाठी कोणते घटक वापरता येतील, ते कसे तयार करता येतील याचं एक विवरण त्याने केलं. तत्कालीन उपलब्ध तंत्रज्ञानाच्या मर्यादेमुळे त्याला असं यंत्र बांधण्यात यश मिळालं नाही, तरी त्याने केलेली शास्त्रीय आणि पद्धतशीर मांडणी त्या काळातल्या तंत्रज्ञांवर सखोल परिणाम करून गेली. माणसाच्या बुद्धीच्या क्षमतेच्या पलीकडे जाऊन काही करू शकणारं यंत्र बांधण्याचा हा पहिला प्रयत्न म्हटला पाहिजे.

चार्ल्स बॅबेज आणि त्याच्या बरोबर काम करणाऱ्या अडा लोवलेस यांचं अशा प्रकारच्या यंत्रनिर्मितीच्या अनुषंगाने आणखी एक पायाभूत योगदान आहे. एखाद्या अवघड गणिती प्रश्नासाठी विशिष्ट प्रकारे लिहिल्या गेलेल्या पायऱ्यांनी उत्तरापर्यंत पोहोचणं (अल्गोरिदम) ही संकल्पना त्या दोघांनी पहिल्यांदा मांडली. यंत्रामध्ये असा अल्गोरिदम अंतर्भूत करून यंत्राकडून उत्तर मिळवणं याचं प्रात्यक्षिक ते दाखवू शकले. गणकयंत्रात या पायऱ्या लिहिण्यासाठी या यंत्राला स्वत:ची भाषा असण्याची गरज आहे, हे त्यांनी नमूद केलं.

चार्ल्स बॅबेजचे हे प्रयत्न अगदी कागदावर राहिले नाहीत. अनेक उद्योगधंद्यांमुळे कामगारांच्या कामाच्या वेळेची मोजणी आणि उद्योगासंबंधित माहितीचं व्यवस्थापन अधिक गुंतागुंतीचं होऊ लागलं होतं. यासाठी अनेक यंत्रं आणि तंत्र यांची निर्मित्ती करणारे समांतर उद्योग निर्माण होऊ लागले होते. अशा प्रकारच्या चार वेगवेगळ्या उद्योगांच्या एकत्रीकरणातून १९११ साली ‘आयबीएम’ (इंटरनॅशनल बिझनेस मशिन्स) ही कंपनी निर्माण झाली. पुढे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरलेल्या संगणक क्रांतीची ही नांदी होती.

विसाव्या शतकात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अनेक मोठ्या उलथापालथी झाल्या. पदार्थांमधील अणू, त्यांची रचना यांचा अचूक वेध घेणारी पुंजभौतिकी (क्वांटम मेकॅनिक्स) ही नवीन शाखा भौतिकशास्त्रात निर्माण झाली. याच नवीन ज्ञानामुळे ‘ट्रांझिस्टर’ नावाचा विद्युतशक्तीद्वारे चालू-बंद करता येईल असा एक अत्यंत छोटा इलेक्ट्रॉनिक स्विच निर्माण करता आला. फक्त ‘ऑन’ आणि ‘ऑफ’ या दोनच पातळ्यांवर काम करणारा हा स्विच संगणक तंत्रज्ञानाच्या प्रगतीमध्ये खूपच क्रांतिकारी ठरला. कारण संगणकात दशमान पद्धतीऐवजी द्विमान (बायनरी) पद्धत वापरली जाते. नावानुसार द्विमान पद्धत ० आणि १

हेही वाचा - एआय मानवी कलाकारांना पूरक आहे की स्पर्धक?

या दोनच पातळ्यांवर काम करते. संख्याशास्त्राच्या दृष्टीने द्विमान पद्धतीचा अभ्यास बराच जुना असला तरी संगणक निर्मितीमध्ये त्याची उपयोजिता लगेचच लक्षात आली. या द्विमान पद्धतीला तर्कशास्त्राशी जोडून ‘अल्गोरिदम’ची पद्धत संगणकात अंतर्भूत करणं शक्य झालं. या सूचना संगणकामध्ये साठवून ठेवणं आणि हवं तेव्हा त्या चालवून आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळवणं, हे एक नवीन तंत्र निर्माण होऊ शकलं. (इथे एक नमूद करणं आवश्यक आहे, की द्विमान पद्धतीला तर्काशी जोडण्याची कल्पना सुमारे ३०० वर्षांपूर्वी लेबनीज या युरोपियन गणितज्ञाने मांडलेली होती; मात्र ती प्रत्यक्षात उतरली विसाव्या शतकात.)

एकंदरीत, विसाव्या शतकाच्या मध्याला विद्यापीठांतील शास्त्रज्ञ आणि आयबीएमसारख्या कंपन्यांतील तंत्रज्ञ यांच्या घोळक्यात संगणकशास्त्र आणि तंत्रज्ञान याबद्दल बरंच सखोल चिंतन सुरू झालं होतं. माणसाच्या बौद्धिक क्षमतेच्या पलीकडे जाऊन काम करणारं, साठवून ठेवलेल्या सूचनांनी अनेक कूट प्रश्नांना अधिक अचूक आणि वेगाने उत्तर देणारं यंत्र प्रत्यक्षात येऊ लागलं होतं.

साठवून ठेवलेल्या सूचनांबरहुकूम संगणक काम करत होता म्हणजे ते यंत्र ‘शिकत होतं’ असं म्हणणं तेव्हा चुकीचं ठरलं असतं. मात्र ही गोष्ट काही कल्पनेपलीकडची नव्हती. संगणकात साठवून ठेवलेल्या सूचनांना ‘संगणकाने शिकलेल्या’ सूचना म्हणणं हा फक्त शाब्दिक फरक नव्हता, तर ती एक सैद्धांतिक मांडणी होती. संगणक हे यंत्र ‘शिकतं’ आणि त्याद्वारे माणसाच्या नैसर्गिक बुद्धिमत्तेचं प्रतिरूप होऊ शकतं, ही कल्पना प्रथम मांडली ॲलन ट्युरिंग या ब्रिटिश गणितज्ञाने.

ट्युरिंगचा जन्म लंडनमध्ये विसाव्या शतकाच्या सुरुवातीला झाला. तो लहानपणापासूनच गणित व विज्ञानात विलक्षण हुशार होता. पुढे त्याने लंडनमधील किंग्ज कॉलेजमध्ये गणितात पदवी मिळवली व नंतर अमेरिकेतील प्रसिद्ध प्रिन्स्टन विद्यापीठात गणित विषयात डॉक्टरेट केली. हे करत असतानाच वयाच्या अवघ्या चोविसाव्या वर्षी त्याने ‘सर्वसमावेशक (युनिव्हर्सल) संगणक यंत्र’ अशी एक सैद्धांतिक मांडणी केली. दिलेल्या सूचनांच्या आधारे जगातल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर या यंत्रातून मिळवता येऊ शकतं, असं त्याने मांडलं. विशिष्ट क्षेत्रासाठी विशिष्ट यंत्र आणि विशिष्ट सूचना असण्याची गरज नाही, तर सामाईक सूचनांच्या आधाराने एकाच यंत्रातून अनेक गोष्टी साध्य होऊ शकतात, हा या सिद्धांताचा मुख्य गाभा होता. आज आपण वापरत असलेल्या कुठल्याही संगणकाचा आराखडा ट्युरिंगने मांडलेल्या या मूळ सिद्धांतावरच आधारलेला आहे.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनीने पाठवलेल्या गुप्त संदेशांची उकल करण्याच्या कामी ट्युरिंगची नेमणूक झाली. ट्युरिंगने बांधलेल्या यंत्रामुळे ते जर्मन गुप्त संदेश अधिक वेगाने ब्रिटिशांना समजू शकले. त्यामुळे युद्धाची दिशा दोस्त राष्ट्रांच्या बाजूने वळली, असं आज ठोसपणे म्हटलं जातं. माणसाच्या बुद्धिक्षमतेच्या पलीकडे जाणारं यंत्र कोणता परिणाम घडवू शकतं याचं ते पहिलं मोठं प्रात्यक्षिक होतं.

हेही वाचा - ‘एआय’ जगाचं किती पाणी खातंय?

युद्धोत्तर काळात ट्युरिंगने संगणकाविषयीचं संशोधन चालूच ठेवलं. १९४६मध्ये इंग्लंडच्या ‘नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी’मध्ये काम करत असताना त्याने स्वयंचलित संगणक, म्हणजे क्रमिक सूचना साठवून ठेवता येतील अशा यंत्राचा आराखडा मांडला. पुढे या यंत्राची छोट्या रूपात निर्मितीदेखील केली गेली. याच दरम्यान ट्युरिंगने १९5०मध्ये एक संशोधनपर लेख लिहिला- ‘कम्प्युटिंग मशिनरी ॲन्ड इन्टेलिजन्स’. मानसशास्त्र आणि तत्त्वज्ञानाला वाहिलेल्या ‘माइंड’ या शास्त्रीय नियतकालिकात हा शोधनिबंध प्रकाशित झाला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासात हा शोधनिबंध अत्यंत पायाभूत आणि दूरदर्शी मानला जातो. ट्युरिंगने या लेखात एक मार्मिक प्रश्न विचारला आहे - ‘यंत्रं विचार करू शकतात का?’ सुमारे २७ पानांच्या या लेखात त्याने या प्रश्नाच्या अनुषंगाने येणाऱ्या सर्व बाजूंची अत्यंत तपशीलात मांडणी केलेली आहे.

यंत्रांची विचार करण्याची क्षमता तपासण्यासाठी वस्तुनिष्ठ चाचणी कोणती वापरावी आणि तिचे निकष कोणते असावेत याविषयीचे आपले विचार ट्युरिंग मांडतो. ही चाचणी ‘अनुकरण खेळ’ (इमिटेशन गेम) किंवा ‘ट्युरिंगची चाचणी’ (ट्युरिंग टेस्ट) म्हणून प्रसिद्ध आहे. आजही ही ‘ट्युरिंग टेस्ट’ एक मापदंड म्हणून वापरली जाते.

ट्युरिंग टेस्ट
ट्युरिंग टेस्टचे निकष तत्कालीन युरोपियन पार्टीगेममधून सुचलेले आहेत असं म्हणतात.
त्या खेळाचं स्वरूप ट्युरिंग स्वत: लिहितो. या खेळात तीनजण असतात. एक स्त्री, एक पुरुष आणि तिसरी प्रश्नकर्ती व्यक्ती. स्त्री आणि पुरुष दोन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये किंवा पडद्यांमागे असतात, जेणेकरून प्रश्नकर्त्याला ते दिसू शकणार नाहीत. प्रश्नकर्त्याने त्यांना अनेक लिखित प्रश्न विचारायचे (उदाहरणार्थ ‘तुमच्या केसाची लांबी किती’), त्यांची लिखित उत्तरं मिळवायची, त्यातून त्याने कोण पुरूष, कोण स्त्री हे ओळखायचं, असा तो खेळ. यात एक खोच अशी असते, की पडद्यामागे लपलेल्या दोन खेळाडूंपैकी एक, समजा पुरुष, दरवेळी खरीखुरी उत्तरं देईल, तर दुसरा खेळाडू, जी खरोखरची स्त्री आहे, ती मात्र आपल्या उत्तरांतून आपण पुरुष असल्याचं भासवेल. मात्र यातूनच प्रश्नकर्त्याने केवळ लिखित प्रश्न-उत्तरांच्या देवघेवीतून त्यांना ओळखणं, असा तो खेळ आहे. यात सहभागी व्यक्तींच्या बौद्धिक क्षमतांचा कस लागतो.
ॲलन ट्युरिंगच्या ‘इमिटेशन गेम’मध्ये पडद्यामागे लपलेल्या स्त्री खेळाडूच्या जागी यंत्राची कल्पना केलेली आहे. दुसरा खेळाडू (पुरूष) आणि प्रश्नकर्ता हे दोन्ही मात्र मानवच आहेत. ट्युरिंगच्या मते, या खेळात यंत्र प्रश्नकर्त्याला सातत्याने फसवू शकलं, तर त्या यंत्राची बुद्धिमत्ता माणसाच्या तुल्यबळ म्हणता येईल.

असं कृत्रिम बुद्धिमत्ता असलेलं कुठलं संभाव्य यंत्र असू शकतं याचाही ऊहापोह ट्युरिंगने केलेला आहे. द्विमान तर्कपद्धतीवर आधारित डिजिटल संगणक अशा यंत्रासाठी सोईस्कर असेल; विविध प्रकारच्या सूचना, त्यांचे क्रम आणि माहिती यांची साठवणूक करून हे यंत्र माणसासारखी उत्तरं देऊ शकेल, असं तो लिहितो.

कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या या यंत्राच्या स्वरूपाचा विचार ट्युरिंग इथेच थांबवत नाही. तो पुढे म्हणतो, ‘लहान मूल जसं आजूबाजूची परिस्थिती अनुभवून त्यातून शिकत जातं, तशा प्रकारे शिकणारे सूचनाक्रम डिजिटल संगणकासाठी लिहिणं अशक्य नाही.’ सूचनाक्रमांद्वारे ‘शिकणारी’ यंत्रं अधिक चांगल्या प्रकारे बुद्धिमत्तेचं प्रदर्शन करतील, असं त्याने आवर्जून लिहिलं आहे.

हेही वाचा - एआयचा जमाना: देखिले डोळा, खरे खोटे समजेना

अशा बुद्धिमान यंत्रांच्या बाबतीत अनेक शास्त्रीय, तात्त्विक आणि धार्मिक आक्षेप येऊ शकतात याची ट्युरिंगला पूर्ण कल्पना होती. त्याने या शोधनिबंधाचा बराच भाग अशा संभाव्य आक्षेपांना उत्तर देण्यात खर्च केला आहे. अशा यंत्रांना भावना असू शकते का, ही यंत्रं प्रेमात पडतील का, या प्रश्नांना उत्तर देताना तो म्हणतो, की ‘भविष्यात जटिल गुंतागुंतीची यंत्रं अशा भावना दर्शवू शकतील.’ आणखी एक आक्षेप तार्किक बाजूने आला तो असा, की कृत्रिम बुद्धिमत्ता असलेली ही यंत्रं अपूर्णच राहतील; त्यांना अगदी तंतोतंत माणसासारखं होणं शक्य नाही. गोडेल या ऑस्ट्रियन तर्कशास्त्रज्ञाच्या ‘अपूर्णत्व’ सिद्धान्ताला अनुसरून हा आक्षेप होता. ट्युरिंगने शोधनिबंधात याला अतिशय मार्मिक उत्तर दिलं आहे. तो लिहितो- कृत्रिम बुद्धिमत्ता असलेली ही यंत्रं अपूर्ण नक्कीच असतील, पण माणसाच्या नैसर्गिक बुद्धिमत्तेलाही हे अपूर्णत्व लागू होत नाही हे सिद्ध झालेलं नाही.

ही बुद्धिमान यंत्रं माणसासारखी स्व-भान असलेली असू शकतील का, या प्रश्नाचाही विचार ट्युरिंगने केलेला आहे. त्याच्या मते माणसाचं स्व-भान आणि बौद्धिक क्षमता या दोन गोष्टी त्याचं एकूण बाह्यवर्तन ठरवत असतात. अनुकरण खेळात यंत्राचं बाह्यवर्तन माणसाच्या किती जवळपास पोहोचणारं आहे याची चाचणी होईल. म्हणजे यंत्राचं बाह्यवर्तन महत्वाचं असल्यामुळे यंत्राला स्व-भान आहे की नाही, हा प्रश्न गैरलागू ठरतो.

ट्युरिंगने कृत्रिम बुद्धिमत्तेवरचं हे भाष्य विसाव्या शतकाच्या मध्यावर केलेलं होतं. यातून त्याचा द्रष्टेपणा तर दिसलाच. पण आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट घडली, ती म्हणजे पुढे या तंत्रज्ञानाच्या निर्मितीसाठी त्याद्वारे एक साचा मिळाला. या शोधनिबंधामुळे भविष्यातील तंत्रज्ञांना या तंत्रज्ञानाच्या चाचणीचे निकष मिळाले, जे आजतागायत लागू केले जात आहेत.

कृत्रिम बुद्धिमत्ता हजारो वर्षं कल्पनेत होतीच, परंतु तिला असं ‘सगुण’ रूप ट्युरिंगच्या या शोधनिबंधाने मिळालं आणि म्हणूनच ट्युरिंगला ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचा जनक’ असं संबोधलं जातं.

ट्युरिंगने त्याच्या शोधनिबंधात ‘विचार करणारी यंंत्रं’ असा उल्लेख केलेला असला तरी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ हा शब्दप्रयोग जॉन मॅकार्थी या संगणक शास्त्रज्ञाचा आहे. अमेरिकेतील हॅनोवर, न्यू हॅम्पशायर येथील डार्टमाऊथ महाविद्यालयात १९5६ साली वेगवेगळ्या क्षेत्रांतील तज्ज्ञ कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर चर्चा करण्यासाठी एकत्र आले. या परिषदेतच ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या शब्दाचा जन्म झाला. एकूण दहाजणांचा सहभाग असलेल्या या परिषदेनंतर हे क्षेत्र संशोधनाचा वेगळा विषय म्हणून मानलं जाऊ लागलं.

हेही वाचा - चाहूल नव्या वसाहतवादाची

या परिषदेत मानसशास्त्र, गणित, तत्त्वज्ञान व अभियांत्रिकी या क्षेत्रांतील मर्विन मिन्स्की, क्लाऊड शॅनन, हर्बर्ट सायमन, नॅथनियल रोचेस्टर हे संशोधक सहभागी झाले होते. आपापल्या कार्यक्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेवर काम करायचं असं त्यांनी तिथे ठरवलं. माणसाची भाषा यंत्राला शिकवता येईल का, संगणक हेच यंत्र यासाठी वापरायचं ठरल्यामुळे मुळात संगणक क्षेत्रातील प्रगती कुठल्या दिशेने जाण्याची गरज आहे, अशा विविध विषयांवर या परिषदेत विचारमंथन झालं.

या परिषदेत भाग घेणाऱ्या प्रत्येकाने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवलेला आहे. १९5६ हर्बर्ट सायमन यांनी गणितातील प्रमेयं सोडवणारी संगणक प्रणाली लिहिली. ‘लॉजिक थिअरिस्ट’ असं नाव असलेली ही प्रणाली कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दृष्टीने लिहिलेली आद्य प्रणाली मानली जाते. वर उल्लेखलेले गणिती आणि संगणक शास्त्रज्ञ जॉन मॅकार्थी यांनी मर्विन मिन्स्की यांच्याबरोबर अमेरिकेत बोस्टन-एम.आय.टी. इथे कृत्रिम बुद्धिमत्तेवर संशोधनासाठी म्हणून एक वेगळी प्रयोगशाळा सुरू केली. याच प्रयोगशाळेत १९६६ व १९७० साली लिहिल्या गेलेल्या ELIZA आणि SHRDLU या प्रणाली माणसाची भाषा यंत्रं कशी आत्मसात करू शकतात याची चुणूक दाखवून गेल्या. 

या सर्व प्रगतीचा परिणाम तत्कालीन मुख्य सांस्कृतिक प्रवाहावरही झाला. १९६९ साली प्रसिद्ध झालेल्या ‘२००१: स्पेस ओडिसी’ या चित्रपटातील रोबोटचं पात्र या सर्व प्रगतीचा प्रभाव दर्शवतं.

१९5० ते १९७० या दशकात कृत्रिम बुद्धिमत्ता हे क्षेत्र म्हणून प्रगती नक्कीच करत होतं, परंतु एक तंत्रज्ञान म्हणून त्याचा मोठ्या प्रमाणात व्यावहारिक वापर मात्र होऊ शकत नव्हता. तसं काही होण्याचं आशादायी चित्रही नव्हतं. याचा परिणाम म्हणून या संशोधनाला अमेरिकन सरकारकडून दिला जाणारा निधी रोडावत गेला. त्यातून या क्षेत्रातील नवीन प्रयत्नांना ओहोटी लागली. आज मागे वळून बघताना १९७०चं दशक कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील मंदीचं दशक मानलं जातं.

हे संशोधन रोजच्या व्यवहारात न येण्याची दोन मुख्य कारणं होती. एक तर संगणक क्षेत्राची कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दृष्टीने हवी तशी प्रगती झालेली नव्हती. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे यातील संशोधनासाठी जो मार्ग आणि दृष्टिकोन अंगिकारला गेला त्यामध्येही मूलभूत बदल करण्याची गरज होती. मात्र यासाठी खूप वाट पहावी लागली नाही. १९८०चं दशक या तंत्रज्ञानाला एक नवीन दिशा देणारं ठरलं.

सत्तरच्या दशकातली मंदी आणि १९८०नंतरच्या घडामोडी या दोन्हींबद्दल पुढच्या लेखात अधिक विस्ताराने चर्चा करू.

(अनुभव, जानेवारी २०२५च्या अंकातून साभार.)

श्रीनिवास पंढरपुरे | pshrini@gmail.com

श्रीनिवास पंढरपुरे कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात कार्यरत आहेत. विज्ञान, खगोलशास्त्र आणि विज्ञानप्रसारात त्यांना विशेष रुची आहे.







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results