भारतीय स्वातंत्र्यलढ्यामधली अनेक नावं इतिहासाच्या पानांमध्ये हरवून गेली आहेत. अशीच एक विस्मृतीत गेलेली वीरांगना म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील यांची कन्या हौसाबाई पाटील. त्यांचं आत्मचरित्र - ‘मी क्रांती, मी संघर्ष’ हे पुस्तक केवळ हौसाबाईंच्या वैयक्तिक आठवणींचा संग्रह नाही तर ते साताऱ्याच्या प्रतिसरकार चळवळीचा, भूमिगत क्रांतिकारकांच्या शौर्याचा आणि एका स्त्रीने स्वातंत्र्यासाठी केलेल्या धडपडीचा दस्तऐवज आहे. हे पुस्तक आपल्याला त्या धगधगत्या काळात घेऊन जातं.
१९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनानं संपूर्ण देशात स्वातंत्र्याचं वारं वाहत होतं. याच काळात साताऱ्याच्या भूमीत क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘प्रतिसरकार’ किंवा ‘पत्रीसरकार’ या समांतर शासनाची स्थापना झाली. या सरकारने ब्रिटिश शासनाला झुगारून देऊन सुमारे १५०० गावांमध्ये स्वतःचा अंमल प्रस्थापित केला. हौसाबाई या केवळ या ऐतिहासिक घडामोडीच्या साक्षीदार नव्हत्या तर त्या या चळवळीचा एक अविभाज्य भाग होत्या.
‘मी क्रांती, मी संघर्ष’ हे १२५ पानांचं छोटं पुस्तक आहे. हौसाबाईंनी त्यांची नात दमयंती पाटील यांच्या मदतीने आपला जीवनप्रवास या पुस्तकात शब्दबद्ध केला आहे. २०२१ मध्ये हौसाबाई गेल्या. त्याआधी त्यांनी स्वत: या पुस्तकाची प्रुफं तपासली होती. 'राखेखाली दडलेल्या विस्तवावर तू फुंकर मारली आहेस', असं हे पुस्तक वाचून त्या दमयंती पाटील यांना म्हणाल्या होत्या.

क्रांतिसिंहांची लेक: संघर्षाचे बाळकडू
हौसाबाईंचा जन्मच मुळी स्वातंत्र्य संग्रामाच्या वादळात झाला. त्यांचे वडील, क्रांतिसिंह नाना पाटील, हे ब्रिटिश सत्तेला हादरवून सोडणाऱ्या प्रतिसरकार चळवळीचे नेते. वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी हौसाबाईंची आई गेली. वडील स्वातंत्र्य लढ्याला वाहून घेतलेले, त्यामुळे त्यांना त्यांचा सहवासही फारसा मिळाला नाही. दिवसेंदिवस त्यांचे वडील भूमिगत असायचे, घरावर सतत पोलिसांची पाळत. अशा खडतर आणि असुरक्षित वातावरणात त्यांचं बालपण गेलं.
मात्र, या परिस्थितीने त्या खचल्या नाहीत, उलट कणखर बनल्या. वडिलांच्या कामातून देशप्रेमाचं आणि संघर्षाचं बाळकडू त्यांना मिळालं. घरात सतत येणारे भूमिगत कार्यकर्ते, गुप्त बैठका, स्वातंत्र्याच्या योजना हेच त्यांचं जग बनलं. क्रांतिसिंह केवळ त्यांचे वडील नव्हते, तर एक आदर्श होते, प्रेरणास्रोत होते. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून हौसाबाईंनी लहान वयातच स्वातंत्र्यलढ्यात स्वतःला झोकून दिलं.
प्रतिसरकारासाठी हौसाबाईंच्या भूमिगत कारवाया
एखाद्या सामान्य तरुणीप्रमाणे आयुष्य जगण्याऐवजी हौसाबाईंनी क्रांतीचा मार्ग निवडला. भूमिगत कार्यकर्त्यांना निरोप पोहोचवणं, त्यांच्या जेवणाची सोय करणं, ब्रिटिशांच्या हालचालींवर लक्ष ठेवून माहिती काढणं आणि सर्वात धाडसाचं काम म्हणजे क्रांतिकारकांसाठी शस्त्रं आणणं-पोहोचवणं, अशा अनेक जबाबदाऱ्या त्या पार पाडत. वेशांतर करून, रात्री-अपरात्री बैलगाडीतून प्रवास करत जिवाची पर्वा न करता त्यांनी ही कामं केली.
हौसाबाईंचं लग्नही त्यांच्या कार्याला साजेसंच होतं. क्रांतिसिहांनी कोणताही बडेजाव, हुंडा किंवा धार्मिक विधी, न करता त्यांचा विवाह स्वातंत्र्य चळवळीतीलच कार्यकर्ते भगवानराव मोरे-पाटील यांच्याशी लावून दिला. लग्नानंतरही त्यांचा स्वातंत्र्यासाठीचा लढा थांबला नाही.
पुस्तकातल्या अनेक प्रसंगातून त्यांची धाडसी आणि त्यागी वृत्ती दिसून येते. नुकतंच बाळंतपण झालेलं असताना हौसाबाईंनी आपल्या तान्ह्या आजारी बाळाला ठेवून गोव्याच्या तुरुंगातल्या एका कार्यकर्त्याला निरोप पोचवण्याची जबाबदारी पार पाडली होती. “मी तिला जाही म्हणणार नाही आणि थांबही म्हणणार नाही. मात्र माझी मुलगी म्हणून तिने बाप करत असलेल्या कार्याला शोभेल असं वागावं,” हे क्रांतिसिंहांचे शब्द ऐकले आणि क्षणाचाही विचार न करता हौसाबाई मोहिमेवर निघाल्या. भवानीनगर रेल्वे स्थानकावर इंग्रजांचा शस्त्रसाठा लुटण्याच्या मोहिमेतही त्यांचा सक्रिय सहभाग होता.
स्वातंत्र्योत्तर काळातील योगदान
देशाला स्वातंत्र्य मिळालं पण हौसाबाईंचा संघर्ष थांबला नाही. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी स्वतःला सामाजिक कार्यासाठी वाहून घेतलं. कष्टकरी, शेतकरी आणि वंचितांच्या हक्कांसाठी त्या आयुष्यभर लढत राहिल्या. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम आणि हैदराबाद मुक्ती संग्रामातही त्यांनी हिरिरीने भाग घेतला. महागाई, दुष्काळ, पाणीप्रश्न अशा अनेक सामाजिक प्रश्नांवर त्यांनी आंदोलनं केली. त्यांनी समाजातील अनिष्ट प्रथांविरुद्ध आवाज उठवला. शेवटच्या श्वासापर्यंत त्या एक लढवय्या म्हणूनच जगल्या.
‘मी क्रांती, मी संघर्ष’ : एक ऐतिहासिक ठेवा
हौसाबाई पाटील यांचं आत्मचरित्र ही केवळ एका व्यक्तीची कहाणी नाही. साताऱ्याच्या प्रतिसरकार चळवळीत सहभागी असलेल्या व्यक्तीच्या नजरेतून उलगडणारा हा इतिहास आहे. स्त्रियांनी स्वातंत्र्यलढ्यात दिलेल्या योगदानाचा हा एक पुरावा आहे. स्त्रिया केवळ चूल आणि मूल सांभाळण्यासाठी नसून त्या रणरागिणी बनून देशासाठी लढू शकतात, हे हौसाबाईंनी आपल्या कृतीतून सिद्ध केलं. हे पुस्तक त्यामुळेच प्रेरणादायी ठरतं.
‘मी क्रांती, मी संघर्ष’ या पुस्तकाची भाषा ओघवती आहे. पुस्तकाच्या शेवटी चार पानांत हौसाबाईंचे त्या काळातले फोटो आहेत. फोटो बघून पुस्तक वाचायला हवं आणि पुस्तक वाचून पुन्हा फोटो बघायला हवेत. म्हणजे पुस्तकातले प्रसंग वाचताना ते डोळ्यासमोर उभे राहायला मदत होईल. मिलिंद कडणे यांनी मुखपृष्ठावर हौसाबाईंचा चेहरा रेखाटला आहे. हौसाबाईंच्या कार्याविषयी आत्ताच्या माध्यमांमध्ये येऊ लागलं त्याला निमित्त ठरले ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ. या पुस्तकाला त्यांचीच प्रस्तावना आहे. हौसाबाईंचं आयुष्य घटनांनी, संघर्षांनी भरलेलं होतं. त्यामुळे हे आत्मचरित्रही तसंच श्वास रोखून आणि सलग वाचावं लागतं. एका बैठकीत वाचून पूर्ण होईल असं हे पुस्तक आहे.
‘मी क्रांती, मी संघर्ष’
प्रकाशक: लोकवाड्मय गृह
पृष्ठसंख्या: १२५
किंमत: १५०रुपये
मृदगंधा दीक्षित | mrudgandha.uniqueportal@gmail.com
मृदगंधा दीक्षित युनिक फीचर्समध्ये संपादकीय विभागात कार्यरत असून त्यांना कथा-कादंबरी-कविता लिहिण्यातही रस आहे.
