विठ्ठल रामजी शिंद्यांचा एकूण जीवन प्रवास पाहिला तर त्यांनी त्यांच्या आयुष्यात किमान तीन आघाड्यांवर काम केलेले दिसते. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे, ज्या काळात अस्पृश्यता निर्मूलन किंवा जातिभेद निर्मूलन यांसारख्या सामाजिक प्रश्नांबाबत अंगचोर भूमिका घेतली जात असे, त्या काळी या प्रश्नांवर त्यांनी स्पष्ट भूमिका घेत ठोस कृती केली. भारताच्या इतिहासात सामाजिक-राजकीय सुधारणांसाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावणारी जी माणसे घडली आहेत, त्यात विठ्ठल रामजी शिंदे यांची गणना अग्रक्रमाने होणे त्यामुळेच क्रमप्राप्त ठरते. दुसरीकडे, शिंद्यांनी अस्पृश्य, मराठादी बहुजन समाज, शेतकरी आणि स्त्रिया यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करत असतानाच या वर्गांना आत्मसन्मान मिळवून देणारे संशोधन व लेखनही केले. हे वर्ग मुळातच हीन होते म्हणून ते हीनपदाला आलेले आहेत, ही मांडणी त्यांनी सर्वस्वी खोडून काढली आणि उच्चवर्णीयांच्या राष्ट्रघातकी राजकारणामुळे त्यांच्यावर ही वेळ आली आहे, असे स्पष्ट प्रतिपादन त्यांनी केले. तिसरी गोष्ट म्हणजे भारताच्या सामाजिक इतिहासाची पुनर्मांडणी करणे, भारतीय इतिहासातील अवैदिक परंपरेला उजाळा देणे, उदार धर्म परंपरेचा शोध घेणे, बौद्धधर्माचे योगदान व महत्त्व विषद करणे इत्यादी बाबी त्यांनी संशोधकीय शिस्त पाळून पुढे आणल्या.
या तिहेरी कामगिरीतून शिंद्यांनी महाराष्ट्रासाठी स्त्री शूद्रातिशूद्र बहुजन मुक्तीचा सर्वंकष मार्ग पुढे आणला. मात्र त्याकडे महाराष्ट्राचे सर्वस्वी दुर्लक्ष झाले आहे. हे काम शिंद्यांनी कसे केले ते समजून घेतल्याशिवाय शिंद्यांचे खरे योगदान स्पष्ट होणार नाही.
शिंदे ज्या काळात कार्यरत होते त्या काळात प्रामुख्याने तीन विचारप्रवाह अस्तित्वात होते. एक, रानडे-गांधी यांचा; दोन, फुले-आंबेडकरांचा; आणि तीन, टिळकांचा. शिंद्यांची सामाजिक दृष्टी पाहता लोकमान्य टिळकांच्या विचारप्रवाहाशी त्यांचे जमणे शक्य नव्हते. टिळकांचे राजकीय स्वातंत्र्याचे धोरण शिंद्यांना सर्वस्वी मान्य असले, तरी त्यांचे सामाजिक बाबतीतील धोरण समतेच्या व स्वयंनिर्णयाच्या तत्त्वाला विघातक आहे, अशी शिंद्यांची भूमिका होती. ही भावना टिळकांनी ज्या अनेक भूमिका घेतल्या त्यातून तयार झाली होती. सुधारकांनी सामाजिक भेदाभेदांचा मुद्दा पुढे आणून राजकीय स्वातंत्र्यात खोडा घालू नये, असा टिळकांच्या म्हणण्याचा रोख असे. पेशव्यांनी आणि शिवाजी महाराजांनी जो पराक्रम गाजविला त्याचा आणि स्त्रियांच्या समान अधिकाराचा व शूद्र-ब्राह्मण संबंधाचा काहीएक संबंध नाही, असे टिळकांचे म्हणणे होते. संमतिवयाचे बिल, आंतरजातीय विवाहाचे बिल, मुलींना सक्तीचे शिक्षण देण्याबाबतचे बिल आणि अस्पृश्यतेविरुद्धच्या ठरावावर सही करण्याचा प्रसंग आदी प्रसंगी टिळकांनी घेतलेल्या भूमिका शिंद्यांना अजिबात समर्थनीय वाटल्या नव्हत्या. त्यामुळेच याबाबत शिंद्यांनी टिळकांना कडाडून विरोध केला होता.
रानडे-गांधी यांच्या विचारप्रवाहाशी मात्र शिंद्यांचे जैव नाते होते. या विचारप्रवाहाने हिंदू परंपरेतील स्वीकारार्ह तत्त्वांप्रमाणे बौद्ध-मुस्लिम-ख्रिश्चन धर्मातील उदार तत्त्वेही अंगीकारली होती. कोणत्याही एका धर्मपंथाच्या स्वीकाराकडे त्यांचा कल नव्हता, किंवा कोणत्याही एका पर्यायी धर्मपंथाची मांडणी त्यांनी केली वा स्वीकारली नव्हती. कोणत्याही एका धर्मपंथाशी स्वतःच स्वतःला जखडून घेणे खऱ्या धर्मनिष्ठेचे लक्षण नाही याची जाणीव रानड्यांना होती, तर सर्व धर्माच्या मुळाशी एकच शाश्वत असा विश्वधर्म आहे, असा गांधींचा विश्वास होता. इतर धर्मीयांना कमी लेखणारी कूपमंडुक वृत्ती व असहिष्णुता खऱ्या धर्मभावनेला विघातक आहे, असे गांधींचे म्हणणे होते. रानडे-गांधी यांच्या या धर्मविचाराशी शिंदे सहमत होते.
हेही वाचा - महाराष्ट्राने विठ्ठल रामजी शिंदेंचं काय केलं?
शिंद्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात ज्या प्रार्थना समाजातून केली होती, त्यातील रानडे-भांडारकर-चंदावरकर वगैरे मंडळींनी भागवत धर्माची कास धरून चोखाळलेली वाट त्यांना विशेष जवळची वाटत होती. रूढीप्रामाण्य, दैववाद, जन्मसिद्ध उच्चनीचभाव व धर्मभोळेपणा यांचे प्रस्थ कमी करून व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिनिष्ठा, प्रयत्नवाद, समानता या तत्त्वांच्या पायावर समाजाची पुनर्रचना व्हावी, अशी रानड्यांची भूमिका होती. शिंदे या भूमिकेशी सहमत होते.
सर्व मानवबंधूंशी प्रेमाने वागावे ही धर्माची खरी आज्ञा आहे असे रानड्यांचे म्हणणे होते, मात्र अस्पृश्यता निवारणाचा थेट कार्यक्रम हाती घेण्यास रानडे तयार नव्हते, ही बाब शिंद्यांना न पटणारी होती. समाजपरिवर्तनाच्या कामात अधीर होऊन चालत नाही; कारण अधीरपणामुळे कार्यनाश होण्याचा संभव असतो, अशी रानडे यांची धारणा होती. समाजातील प्रस्थापित हितसंबंधांना एकदम धक्का न लावता लोकांच्या मनावर सुधारणावादी संस्कार घडवून हळूहळू येथील जीवनाला नवे वळण देता येईल, या श्रद्धेवर त्यांचा सामाजिक सुधारणेचा कार्यक्रम आधारलेला होता.
गांधीजींबद्दलही शिंद्यांना हीच अडचण जाणवत होती. स्वातंत्र्याची चळवळ चालवत असताना खादी आणि हिंदू-मुस्लिम ऐक्य यांसारखे कार्यक्रम गांधीजी राबवत होते; मात्र अस्पृश्यता निवारणाचा कार्यक्रम अग्रक्रमाने हाती घ्यायला ते तयार नव्हते. सामाजिक हक्कांचा झगडा साम्राज्यशाहीविरोधी चौकटीतच चालवावा, गटागटांतील तंटे सामोपचाराने व सामंजस्याने सोडविले जावेत, असा महात्मा गांधींचा कटाक्ष होता. परिणामी, जातिप्रश्नाला प्राधान्य मिळणे शक्य होत नव्हते. अस्पृश्यता निवारणाचा प्रश्न आस्ते कदम अथवा सावकाशीने सोडवावा, हे मान्य नसल्याने शिंद्यांना रानडे अथवा गांधीजींपेक्षा आपली स्वतःची वेगळी वाट चोखाळावी लागली.
शिंद्यांच्या आधी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या रूपाने उदयास आलेल्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने फोफावलेल्या तिसऱ्या विचारप्रवाहाने जातीचा आणि अस्पृश्यतेचा प्रश्न ऐरणीवर आणला होता आणि तो सोडविण्यासाठी हिंदू धर्मावर व हिंदू परंपरांवर कठोर टीका करण्याचा मार्ग स्वीकारला होता. फुले- आंबेडकर यांची जातिप्रश्न ऐरणीवर घेण्याची भूमिका शिंद्यांना मान्य होती; मात्र त्यांची धर्मउच्छेदाची भूमिका शिंद्यांना मान्य नव्हती. शिंद्यांच्या सार्वजनिक जीवनास प्रारंभ होण्यापूर्वीच महात्मा फुल्यांची कारकीर्द संपलेली होती, त्यामुळे शिंद्यांनी फुल्यांच्या मांडणीचा प्रत्यक्ष प्रतिवाद करण्याचा प्रश्न नव्हता. आंबेडकर व शिंदे यांचा मात्र राजकीय आखाड्यात समोरासमोर सामना झाला व शिंदे आंबेडकरांच्या टीकेचे लक्ष्यही बनले. मात्र, शिंद्यांनी आंबेडकरांवर पलटवार केलेला दिसत नाही.
हेही वाचा - गांधीजींना स्वतंत्र भारत कसा हवा होता?
आधी फुले-शिंदे यांच्यातील वैचारिक साम्य-भेदांचे मुद्दे बघूयात.
विठ्ठल रामजी शिंदे यांना महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल आदर होता व तो त्यांच्या भाषणांमधून आणि लेखनामधून अनेकदा व्यक्तही होत असे. अस्पृश्यता निवारणासंदर्भात त्यांनी ज्ञानकोशात जी नोंद लिहिली होती, त्यात त्यांनी महात्मा फुल्यांचा अग्रभागी उल्लेख केला होता. फुलेपर्वाच्या समाप्तीनंतर महाराष्ट्रातून फुल्यांचे नाव आणि त्यांच्या विचारांना ओहोटी लागलेली असताना त्यांच्याबद्दल जाहीरपणे आदर व्यक्त करणाऱ्यांमध्ये शिंदे महत्त्वाचे व पहिले समाजसुधारक होते. 'सार्वजनिक सत्यधर्म हे सत्यशोधकांचे बायबल आहे' असे म्हणत त्यांनी ते आपल्या छातीशी धरले होते व ब्रह्मोपासनेतही सामील करून घेतले होते. शिंद्यांच्या दृष्टीने राजा राममोहन रॉय, केशवचंद्र सेन व महात्मा गांधी ही तीन व्यक्तिमत्त्वे परम आदणीय होती. शिंद्यांनी या तिघांच्या सोबतीने महात्मा फुल्यांचाही गौरवाने उल्लेख केलेला दिसतो. राममोहन रॉय यांनी ब्राह्म समाजाच्या रूपाने आद्य प्रगतीची ध्वजा उभारली असली, तरी अस्पृश्यता निवारणाचा अग्र आणि अंतिम मान महाराष्ट्रास आणि विशेषतः ज्योतिबा फूले या महात्म्यानेच मिळविल्याचे शिंद्यांनी नोंदविले आहे. फुले हे भ्रष्ट हिंदू धर्मावर व अन्यायी हिंदू वरिष्ठ वर्गावर रुसलेले जबरदस्त बंडखोर होते व धर्मांतर न करता केवळ सार्वत्रिक सत्यधर्माची ध्वजा उभारून त्यांनी तिच्याखाली येण्यास सर्वधर्मीयांस आवाहन केले, असे वर्णनही त्यांनी केले होते. राजा राममोहन रॉय यांनी जरी सतीची चाल बंद केली, तरी ब्रह्मोपासनेत पुरुषांबरोबर स्त्रियांना आणून बसविण्याचे धैर्य त्यांना किंवा देवेंद्रनाथ ठाकूरांनाही झाले नव्हते. केशवचंद्र सेन यांनी ते केले. परंतु, केशवचंद्रांच्या आठ-दहा वर्षे अगोदर फुल्यांनी अस्पृश्यांच्या मुलींसाठी हिमतीने शाळा काढली होती, याचा उल्लेख शिंद्यांनी आपल्या लेखनात केला होता. एवढेच काय, 'नवभारताचा जनक जसा राममोहन रॉय, तसा नवमहाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीचा आद्य प्रवर्तक ज्योतिबा फुले होय,' असे गौरवोद्गारही शिंद्यांनी काढले होते. ब्राह्म व प्रार्थना समाजासारखाच फुल्यांचा सत्यशोधक समाज हाही हिंदू समाजात उत्पन्न झालेल्या विषमतेची कीड काढून टाकणारा एक पंथ आहे, असे शिंद्यांचे विश्लेषण होते.
शिंद्यांच्या हृदयात फुल्यांविषयी जी आदराची भावना होती, त्यामुळे त्यांनी फुल्यांच्या गौरवार्थ १९३५ साली एक पोवाडाही लिहिला होता. त्यात फुले हे सत्याचे, पतितांचे पालनकर्ते असून दीनदुबळ्यांचे कैवारी आहेत व अनेक छळ सोसून ते महात्मा बनले आहेत, असे म्हटले होते. या पोवाड्याचे विशेष म्हणजे
महाराष्ट्र हा ज्ञानेशाचा
महाराष्ट्र हा तुकयाचा
ज्योतिबा हा लोकांचा
परि सरळा सेवक विरळा। महाराष्ट्र सुधारक आगळा
असा उल्लेख त्यांनी केला होता. महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात संतांनी जे कार्य केले त्याच तोडीचे कार्य फुल्यांनीही केले आहे, असा अर्थ यातून ध्वनित होतो. महात्मा फुल्यांच्या योगदानाविषयी शिंद्यांच्या मनात काय भावना होती, हे त्यातून लक्षात येऊ शकते.
पापपुण्य कल्पना, स्त्री-पुरुष समता, जातिभेद, धर्मविषयक मते, मानवसेवा हीच ईश्वरोपासना असल्याची भूमिका, वेदांच्या आधारे पुरोहितवर्गाने बहुजन समाजाचे केलेले शोषण याबद्दलचे मत, निर्मिकाला संतोष देण्यासाठी अन्य मानवाबरोबर होणारे चांगले आचरण म्हणजे नीती- ही नीतीची कल्पना व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे निर्मिकाची कल्पना, अशा अनेक बाबतींत फुले व शिंदे यांच्या विचारांत साधर्म्य दिसते. निर्मिकाचे कृतज्ञपूर्वक व मनःपूर्वक स्मरण करण्याची व हे स्मरण कोणत्याही धर्ममिषाने न करता सात्त्विक आचरण केल्याने होऊ शकते, ही फुल्यांची भूमिका शिंद्यांच्या उपासना मंडळाच्या विचारांशी जुळणारी होती. जगातील पंगू लोकांस अथवा पोरक्या मुलांस निर्मिकाच्या नावाने शक्य ती मदत करणे हा निर्मिकाचा नैवैद्य आहे, ही फुल्यांची भूमिकाही शिंद्यांच्या एकूण विचारांशी जुळणारी होती. मात्र, महात्मा फुल्यांचे हिंदू धर्मपरंपरेविषयीचे आकलन शिंद्यांना अमान्य होते.
फुल्यांचा मूळ आक्षेप भगवद्गीतेला व गीताविचाराला होता. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ धूर्त आर्यभटांच्या कटाचाच भाग होता, असे फुल्यांचे म्हणणे होते. गीता ही अज्ञानी जनांपासून आपला मतलब साधून हित साधण्यासाठी धूर्त आर्यभटांनी निर्मिली होती, असे फुले मानत होते. संतविचारांच्या या फुलेकृत आकलनाविषयी शिंद्यांचे मतभेद होते. त्यामुळे 'फटकळ ज्योतिबाला ज्ञानदेव, एकनाथ, तुकारामासारख्या संतांची कदर ओळखता आली नाही', असे शिंद्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - एक ते नगरसेवक होते, आणि एक आजचे नगरसेवक आहेत
शिंदे ज्या ब्राह्म व प्रार्थना समाजाला उदार धर्माच्या तत्कालीन आवृत्त्या मानत त्यांच्यावर महात्मा फुल्यांनी आपल्या 'सार्वजनिक सत्यधर्म' या पुस्तकात टीका केली होती. ब्राह्मणांच्या शिकलेल्या मुलांनी शूद्रातिशूद्रांवर अन्याय करणाऱ्या धर्माचे समर्थन करण्यासाठीच हे दोन समाज काढल्याचा फुल्यांचा दावा होता. त्यांनी ख्रिस्ती धर्माचे उष्टेमाष्टे गोळा केले असून, त्यामुळे शूद्रातिशूद्रांच्या मनात पुन्हा एक तऱ्हेचा ब्रह्मघोळ करण्याची त्यांची खटपट आहे, अशी टीका त्यांनी केली होती.
वरील समाजांप्रमाणेच सार्वजनिक सभा व नॅशनल काँग्रेस या दोन संस्थांवरही फुल्यांनी टीका केली होती. या सर्वच संस्थांमध्ये शूद्रादिशूद्रांना प्रवेश नसून ब्राह्मणांचा व धनिकांचा त्यात भरणा आहे, असे त्यांचे मत होते. त्यामुळे या संस्थांच्या कोणत्याही प्रयत्नांमुळे शूद्रातिशूद्रांना कोणताही उपयोग होणार नाही, असे त्यांनी म्हटले होते. स्वतः महात्मा फुले प्रार्थना समाजात उघडपणे जात-येत व रानडे-भांडारकर यांच्याशी त्यांची दाट ओळख होती. शिवाय गोवंडे, वाळवेकरांसारख्या प्रार्थना समाजिस्टांचे त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंधही होते. परंतु तरीही त्यांचे या समाजांबद्दल प्रतिकूल मत होते.
फुल्यांचे हे मत शिंद्यांना मान्य नव्हते, त्यामुळे त्यांनी त्याचा प्रतिवाद केला; मात्र फुल्यांनी केलेल्या टीकेच्या काही आशयाशी शिंदेही सहमत होते. त्यामुळेच फुलेकृत टीकेचे वर्णन त्यांनी 'कर्कश विधान' असे केले: परंतु फल्यांचे हृदय उपाशी जनतेच्या वेदनेने हैराण झालेले असल्यामुळे त्यांनी अशी टीका केली असावी, असे शिंद्यांनी मानले. या संदर्भात लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे शिंद्यांनीही ब्राह्म-प्रार्थना समाजाचे कान ओढले होते व त्यांनी केलेल्या टीकेचा आशय महात्मा फुल्यांच्या टीकेपेक्षा वेगळा नव्हता. ब्राह्म समाज उठल्यासुटल्या 'सुशिक्षित' म्हणविणाऱ्यांची काळजी वाहतो व तो आपली गोड गाणी शहरातच म्हणून स्वर्गास पोहोचू पाहतो ही गोष्ट अगदी खोटी नाही, अशी टिप्पणी शिंद्यांनी केली होती. अडाणी जनतेच्या कैवाऱ्याच्या प्रामाणिक आसुडांच्या फटक्यांनी ब्राह्य आणि प्रार्थना समाजाचे डोळे जेव्हा उघडतील, तेव्हाच या समाजांना जगण्याची आशा प्राप्त होईल, असेही शिंद्यांनी या दोन समाजांना सुनावले होते. शिंद्यांची ही विधाने पाहिली तर ब्राह्म व प्रार्थना समाजाच्या ज्या मर्यादा फुल्यांनी सांगितल्या होत्या, त्या शिंद्यांना मान्य होत्या असे दिसते. परंतु मूलतः या दोन समाजांच्या अनुषंगाने फुल्यांनी जी टीका केली होती, ती शिंद्यांना मान्य नव्हती. कारण सत्यशोधक आणि ब्राह्म समाज ही जोडगोळी असून एकाचा आवाज वरचा तर दुसऱ्याचा खालचा आहे, असे शिंद्यांचे मत होते. सत्यशोधक समाज व ब्राह्म समाज तत्त्वतः एकच असून फक्त त्यांचे इतिहास वेगवेगळे आहेत, असेही त्यांना वाटत होते.
इतिहासाच्या आकलनाविषयी या दोघांच्या दृष्टीत काही मतभेद असले, तरी अस्पृश्यता निवारणाच्या दृष्टीबद्दल त्यांच्यामध्ये कमालीचे साम्य होते. अस्पृश्यांसाठी महात्मा फुल्यांनी राबविलेले अनेक उपक्रम शिंद्यांनीही आपल्या जीवनात राबविले होते. ज्याप्रमाणे महात्मा फुल्यांनी शूद्रातिशूद्रांची उन्नती, स्त्रीशिक्षण व शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे मांडण्याचे काम केले होते, त्याचप्रमाणे शिंद्यांनीही अस्पृश्यता निवारण, स्त्रीशिक्षण व शेतकऱ्यांच्या चळवळी लढवल्या होत्या. दुसरीकडे, १९२० मध्ये शिंद्यांनी जो 'बहुजन पक्ष' स्थापन केला होता, त्यातही फुल्यांना अपेक्षित असणाऱ्या वर्गांचीच एकजूट करण्याचा प्रयत्न केला होता. सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांची एकजूट व अठरापगड जातींचे प्रतिनिधित्व त्यात अपेक्षित होते. म्हणूनच 'मागासलेल्यांची एकजूट' हा फुले व शिंदे यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणता येईल. त्याबद्दल या प्रकरणात पुढे चर्चा केली आहे.
महात्मा फुल्यांच्या विचारांच्या अनुषंगाने शिंद्यांनी जशी चर्चा केलेली दिसते, तशी चर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुषंगाने केलेली दिसत नाही. आंबेडकर हे परदेशातून उच्च शिक्षण घेऊन आलेले अस्पृश्यवर्गातील तरुण नेते असल्याने शिंद्यांना त्यांच्याबद्दल प्रेम व आस्था होती. या भावनेपोटीच परदेशातून शिक्षण घेऊन मायदेशी परतल्यानंतर त्यांचा एक सत्कार शिंद्यांनी आयोजित केला होता. परंतु नंतरच्या काळात राजकारणाच्या धामधुमीत या दोघांमध्ये मतभेदांचे जाळे विणले गेले व दोघे एकमेकांपासून दुरावले. पुढे अस्पृश्यांचे शिंद्यांकडील नेतृत्व आंबेडकरांकडे गेले. नेतृत्वाच्या या हस्तांतरामुळे शिंदे दुखावले असणार; पण आंबेडकरांवर टीका करणारा एक शब्दही त्यांनी उच्चारलेला दिसत नाही.
हेही वाचा - जगाचे प्रेरणास्रोत
महाराष्ट्राच्या सामाजिक पटलावर आंबेडकरांचा प्रवेश झाला तेव्हा शिंदे अस्पृश्यांचे एकमुखी पाठिंबा असलेले नेता होते. मात्र, शिंद्यांच्या भूमिका आणि कार्यशैली याबद्दल आंबेडकरांचे आक्षेप होते. शिंद्यांच्या मार्गाने अस्पृश्यतेचा प्रश्न सुटणार नाही, असे त्यांना स्पष्टपणे वाटत होते. सवर्ण समाजातील समाजसुधारकांमुळे सवर्णांच्या मनोभूमिकेत बदल होतील, ही बाब आंबेडकरांना मान्य नव्हती. 'हिंदू समाजातील समाजसुधारकांनी अस्पृश्यता निवारणासाठी केलेले प्रयत्न हे व्यासपीठावर व्याख्याने झोडण्याचाच प्रकार होता' अशी त्यांची भूमिका होती. शिंदे हे या प्रकारातलेच सुधारक आहेत, असे त्यांना वाटत असल्यामुळे त्यांनी शिंद्यांच्या प्रस्थापित नेतृत्वाखाली काम करण्याऐवजी स्वतःच्या भूमिकेनुसार नव्याने सुरुवात करण्याचा विचार केला असावा. 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन' या शिंद्यांनी सुरू केलेल्या संस्थेवर अस्पृश्यांचा ताबा असण्याचा प्रश्न असो, माँटेग्यू चेम्सफर्ड कमिशन अंतर्गत साऊथबरो समितीसमोर अस्पृश्यांसाठीच्या राखीव जागांसंदर्भातील वाद असो, किंवा सायमन कमिशन अंतर्गत स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीचा वाद असो, दोघांमध्ये मतभेद असल्याचे तेव्हा तेव्हा उघड झाले. त्यातूनच या दोघांचे मार्ग भिन्न दिशांनी गेले.
शिंदे व आंबेडकर यांचे मार्ग वेगवेगळे राहण्यामागे अशा तत्कालीन कारणांप्रमाणेच वैचारिक कारणेही होती. या वैचारिक मतभेदांमुळेच त्या दोघांची मनोघडण वेगवेगळी झाली असावी व त्यातून या दोघांचे मार्ग भिन्न बनले असावेत. खरे पाहता डॉ. आंबेडकर आणि शिंदे यांना जोडणारे काही वैचारिक दुवे होते. पहिली गोष्ट म्हणजे, ज्या बुद्ध, कबीर आणि फुले या तिघांना आंबेडकर आपले गुरू मानत, त्या तिघांच्या योगदानाबद्दल शिंद्यांच्या मनातही आदरभाव होता. दुसरी गोष्ट म्हणजे, भारतीय समाजाच्या इतिहासाचा आणि अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचा जो अभ्यास शिंदे व डॉ. आंबेडकरांनी केला होता, त्यातील निष्कर्षांची दिशाही एकच होती. आर्यांनी प्राचीन काळी भारतावर स्वारी केली व येथील मूळच्या रहिवाशांना युद्धात जिंकून त्यांच्यावर आपले स्वामित्व प्रस्थापित केले आणि जिंकलेल्या लोकांना ते शूद्र म्हणून लागले, असा पाश्चिमात्य विद्वानांचा सिद्धांत होता. शिंदे व आंबेडकर या दोघांनीही तो नाकारला होता. आर्य भाषक समाजात प्राचीन काळी ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे तीनच वर्ण अस्तित्वात होते व क्षत्रियांतील काही लोकांना वेगळे काढून त्यांना शूद्र बनवले गेले, असे या दोघांचेही मत होते. जे लोक गलिच्छ व्यवसाय करीत होते ते तिरस्कृत व अस्पृश्य मानले गेले, असा एक सिद्धांत पूर्वी मांडला जात असे. तोही या दोघांनी नाकारला होता. विशेष म्हणजे आजचे अस्पृश्य हे पूर्वीचे बौद्ध होते, असे या दोघांचे म्हणणे होते. शिवाय, बौद्धधर्माचा नाश करून ब्राह्मणी धर्माची सत्ता कशी प्रस्थापित केली गेली, या मुद्यावरही दोघांचे एकमत होते. बुद्धाने जात्याधिष्ठित उच्चनीचतेच्या कल्पनेला विरोध केला होता व मानवमुक्तीचा संदेश दिला होता, याबद्दलही या दोघांचे एकमत होते. बौद्धधर्माबद्दलच्या या आकर्षणातूनच शिंद्यांनी व्यक्तिगत पातळीवर, तर आंबेडकरांनी सार्वजनिक पातळीवर बौद्धधर्माचा स्वीकार केला होता. मनुस्मृतीच्या हेतूंबद्दल व त्याच्या परिणामांबद्दलही दोघांमध्ये एकमत आढळते. थोडक्यात, जातिसंस्थासंबंधाने जे सिद्धान्त या दोघांनी मांडले त्यातील संदर्भ निराळे असले, तपशील निराळे असले, तरी त्यातील निष्कर्षांची दिशा साधारणपणे एकच होती.
असे असले, तरी भगवद्गीतेच्या संदर्भात या दोघांचे विचार सर्वस्वी टोकाचे होते. मनुस्मृतीने ब्राह्मणी वर्चस्वाच्या समाजव्यवस्थेला नियम घालून देण्याचे काम केले, तर ब्राह्मणी धर्मातील काही तर्कदुष्ट सामाजिक संकल्पनाचे तात्त्विक पातळीवर समर्थन करणे हे गीतेचे प्रयोजन आहे, असे आंबेडकरांचे मत होते. आंबेडकरांच्या मते चातुर्वर्ष्याचे तात्त्विक समर्थन करून प्रत्यक्ष व्यवहारात त्यातील तत्त्वांचे पालन होईल हे निश्चित करण्यासाठी गीतेचा जन्म झाला होता. शिंद्यांनी भगवद्गीतेचा या अंगाने विचार केल्याचे दिसत नाही. गीता व श्रीकृष्ण हे भागवत धर्मपरंपरेचे संस्थापक होते, अशी त्यांची भूमिका होती. भक्तिमार्गाचा स्वीकार करणारी गीता हीच खरी गीता असून हल्लीच्या गीतेहून मूळची गीता बरीच संक्षिप्त असावी, असा त्यांचा कयास होता. मूळ गीतेचा वेदांशी काही संबंध नव्हता; परंतु मूळच्या एकेश्वरी गीतेत ब्राह्मणवर्गाने आपली पूर्व आणि उत्तर मीमांसेची मते घुसडली, असे शिंद्यांचे म्हणणे होते.
म्हणजेच आंबेडकर ज्याप्रमाणे गीतेला प्रतिक्रांतिकारक मानत होते, त्याप्रमाणे शिंदे मानत नव्हते. शिंदे व आंबेडकर यांच्या विचारांतील भेद नेमका इथे दिसतो. हिंदुधर्माच्या इतिहासात जे जे प्रागतिक व जातिवर्णव्यवस्थाविरोधी प्रयत्न आहेत, त्या सर्वांना शिंदे भागवत परंपरेच्या छत्राखाली आणू पाहत होते व हिंदुधर्माच्या इतिहासातील भ्रष्ट परंपरा नाकारत होते. आंबेडकर मात्र 'हिंदू परंपरा' ही 'ब्राह्मणी परंपरा' आहे असे मानून ती सरसकटपणे नाकारत होते. या आकलनामुळेच पुढे त्यांनी हिंदुधर्मत्यागाची भूमिका घेतली. मात्र, अस्पृश्यतेचा प्रश्न हिंदू धर्माच्या चौकटीत सुटेल असे ज्या काळात आंबेडकरांना वाटत होते, त्या काळात ते स्वतःला 'प्रोटेस्टंट हिंदू' म्हणवून घेत. पुढे जेव्हा हा प्रश्न हिंदुधर्माच्या चौकटीत सुटणार नाही असे त्यांना वाटू लागले, तेव्हा ते हिंदू परंपरेविरुद्ध उभे राहिले. या अर्थाने शिंदे मात्र अखेरपर्यंत प्रोटेस्टंट हिंदूच राहिले. त्यांनी हिंदू धर्मातील भ्रष्ट परंपरेवर टीका करण्याचा मार्ग स्वीकारला व हिंदू धर्मातील उदार धर्मपरंपरा हाच खरा हिंदू धर्म आहे, असे मानले. त्यामुळे अस्पृश्यतेचा प्रश्न हिंदुधर्माच्या चौकटीत सोडवायला शिंद्यांना आंबेडकरांप्रमाणे अडचण वाटली नाही. या दोन टोकांच्या मतांमुळेच आंबेडकर व शिंदे या दोघांचे विचारव्यूह परस्परविरोधी बनले असावेत व त्याचे प्रतिबिंब त्या काळच्या राजकारणातही पडले असावे.
(समकालीन प्रकाशनाच्या 'विठ्ठल रामजी शिंदे समजून घेताना' या सुहास कुलकर्णी लिखित पुस्तकातून साभार)
सुहास कुलकर्णी | uniquefeatures.portal@gmail.com
सुहास कुलकर्णी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. गेली तीन दशकं ते राजकीय प्रक्रियांचं विश्लेषण करत आले आहेत.
