
जगभरात स्त्रीमुक्ती चळवळ उभी राहून अनेक दशकं उलटून गेली असली तरी इराणसारख्या देशात आजही महिलांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. आजही तिथे महिलेच्या प्रत्येक निर्णयावर कुठल्या तरी पुरुषाचं, म्हणजेच लग्नाआधी वडील किंवा भाऊ आणि लग्नानंतर नवरा किंवा मुलगा यांचं अनावश्यक पालकत्व लादलं जातं. आजही तिथे स्त्री पुरुष शिक्षकासोबत एकटीने गाडी शिकू शकत नाही. तिथल्या कायद्यानुसार तिच्यासोबत तिसरी कुणी तरी व्यक्ती, म्हणजे त्या स्त्रीचा पती, वडील किंवा भाऊ असावा लागतो. तसंच त्यांच्या ‘एआरआय'च्या कायद्यानुसार लग्न झालेल्या स्त्रीला तिच्या नवऱ्याच्या परवानगीशिवाय देशाबाहेर जाता येत नाही. देशाबाहेर जायचं असल्यास त्याची ना हरकत प्रमाणपत्रावर सही असावी लागते.
‘ड्रायव्हिंग लेसन्स' या 13 मिनिटांच्या लघुपटातून दिग्दर्शिका मर्झिये रियाही यांनी खूपच मार्मिक पद्धतीने याचं भयावह चित्र जगासमोर आणलं आहे. जगभर चर्चिल्या गेलेल्या या लघुपटाला बरेच पुरस्कार मिळाले आहेत. निकिता व्हेंचर्स यांच्या ‘कीप इट शॉर्ट' या यूट्युब चॅनेलवर आपण हा लघुपट बघू शकतो. जगभरातील उत्कृष्ट व पुरस्कारप्राप्त चित्रपटांसोबतच उत्तम लघुपटांसाठीही हा चॅनेल प्रसिद्ध आहे.

लघुपटाची सुरुवात होते ड्रायव्हिंग स्कूलच्या एका कारमधून. एक इराणी स्त्री तिच्या नवऱ्यासोबत कार शिकण्यासाठी आलेली असते. तिला गाडी शिकवण्यासाठी पुरुष इन्स्ट्रक्टर असल्यामुळे तेथील कायद्यानुसार तिचा नवरा सोबत आलेला असतो. सुरुवातीला इन्स्ट्रक्टर तिला काही सूचना देत असताना नवरा सतत त्यांना डिस्टर्ब करून ‘हे सर्व तिला पूर्वी सांगितलेलं आहे. तुम्ही फक्त गाडी कशी चालवायची हे शिकवा', हे सांगत राहतो. त्याच्या या बोलण्यातून स्त्रिया कशा मूर्ख असतात, हा भाव सतत दिसत राहतो. पुढेही हे तिघं कारमध्ये असताना त्यांच्या अनेक संवादांतील प्रत्येक वाक्यागणिक तो स्त्रियांचं दुय्यमत्व अधोरेखित करत राहतो. त्याच्या फोनवरील संवादातही आपल्याला ही गोष्ट ध्यानात येते.
हे चालू असतानाच एका ठिकाणी दुसरी एक स्त्री यांची गाडी अडवते. ती त्या इन्स्ट्रक्टरची बायको असते. तिला परदेशात जायचं असतं, पण त्याची सही मिळाल्याशिवाय ती बाहेर जाऊ शकणार नसते. आणि तो सही द्यायला तयार नसतो. यावरून त्या दोघांचा वादही होतो. असं दोनदा घडतं. दुसरीकडे ड्रायव्हिंग शिकत असलेल्या स्त्रीच्या नवऱ्याला त्याचं बँकेत चेक जमा करण्याचं अगदी छोटंसं कामही तिच्या गाडी शिकण्याच्या कामापेक्षा महत्त्वाचं वाटतं.
या गाडी शिकणाऱ्या स्त्रीच्या तोंडी संपूर्ण लघुपटात एकही वाक्य दिलेलं नाही, परंतु तरीही तिच्या दमदार अभिनयामुळे संपूर्ण लघुपट तिच्याभोवती फिरत राहतो. लघुपटाचा शेवट आपल्याला अनपेक्षित धक्का देऊन जातो. त्यात जरा गंमतही आहे. यातील दोन्ही स्त्रिया इराणमधील स्त्रीवर्गाचं प्रतिनिधित्व करताना दिसतात. त्यांच्यात सहनशीलता आहेच, परंतु मनाच्या एका कोपऱ्यात धुमसणारा विद्रोहदेखील आहे. अगदी मोजक्या पात्रांसहित साकारला गेलेला हा लघुपट आपल्याला विचार करायला भाग पाडतो.
लघुपट मूळ पर्शियन भाषेतून असला तरीही इंग्रजी सबटायटल्समुळे समजून घ्यायला सोपा जातो.
लिंक : ड्रायव्हिंग लेसन्स
मयूर पटारे | 9970355105 | mayur355105@gmail.com
युनिक फीचर्स मध्ये पत्रकार. कष्टकरी समूहात फिरून त्यातील माणसांचं जगणं समजून घ्यायला आवडतं.