
अच्युतराव पटवर्धन हे १९४२ च्या चळवळीतील अग्रगण्य नेते होते. स्वातंत्र्य सैनिकाची भूमिका बजावत असतानाच त्यांनी आचार्य नरेंद्र देव आणि जयप्रकाश नारायण वगैरे नेत्यांच्या सोबत १९३४ मध्ये काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत राहून काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना केली होती. काँग्रेसला समाजवादाच्या मार्गावरून ढळू देऊ नये आणि त्यासाठी काँग्रेसमध्ये राहूनच काय करावं असं त्यांचं मत होतं. मात्र स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेसची एकूण वाटचाल पाहता या पक्षात राहण्यात काही अर्थ नाही, असं त्यांना वाटू लागलं. धनसत्तेचा प्रभाव, भ्रष्टाचार आणि भांडवलशाहीचा वाढता प्रभाव याबद्दल त्यांनी काँग्रेसकडे काही मागण्या केल्या होत्या. पण काँग्रेसकडून अनुकूल प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी वेगळी वाट धरली.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राजकारणात तयार झालेलं वातावरण सहन न होऊन दोनच वर्षांनी त्यांनी राजकारणातून संन्यास घेतला आणि बनारसला जाऊन ते प्राध्यापकी करू लागले. तिथे ते जे. कृष्णमूर्तीच्या सहवासात दहा वर्ष राहिले. त्यानंतर सुमारे वीस वर्ष ते मद्रास (म्हणजे चेन्नई)मध्ये अनामिकाचे जीवन जगले. मृत्यूपूर्वी ते पुन्हा बनारसमध्ये आले व एका सकाळी अचानक त्यांचा मृत्यू झाला. आपला अंत्यविधी शासकीय इतमामाने करू नका व जिथे निधन होईल तिथेच दहन करा, असं अच्युतरावांनी सांगून ठेवलं होतं. त्यानुसार त्यांच्याजवळ राहणारी मंडळी आणि ऐनवेळी येऊन पोहचलेले तानाजी देशमुख व शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांचं दहन पार पडलं.
देशाच्या स्वातंत्र्यसेनानीचा असा एकाकी शेवट विराळाच म्हणावा असा आहे.
सुहास कुलकर्णी | uniquefeatures.portal@gmail.com
सुहास कुलकर्णी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. गेली तीन दशकं ते राजकीय प्रक्रियांचं विश्लेषण करत आले आहेत.