आम्ही कोण?
शोधाशोध 

मढी : ताणलेल्या सलोख्याचं पुढे काय होणार?

  • योगेश जगताप
  • 18.03.26
  • वाचनवेळ 14 मि.
madhi yatra

मढी हे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील गाव. अहिल्यानगरपासून साधारण ४० किलोमीटर अंतरावर. नगर-पाथर्डी रस्त्याला येणाऱ्या तिसगाव फाट्यावरून उजवीकडे वळलं की पाचेक किलोमीटरवर मढी लागतं. हे ठिकाण नाथ संप्रदायातील कानिफनाथांच्या संजीवन समाधीचं ठिकाण म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांची समाधी असलेली ठिकाणंही नगर जिल्ह्यातच असल्यामुळे हा जिल्हा हा नाथ संप्रदायाचा पाया मानला जातो. या नवनाथांपैकी कानिफनाथ हे भटक्या आणि निम-भटक्या जाती-जमातींचे आराध्य दैवत. त्यामुळेच मढीला भटक्या-विमुक्तांची पंढरी म्हणूनही ओळखलं जातं. शाहू महाराज औरंगजेबाच्या तावडीत असताना महाराणी येसूबाईंनी त्यांच्या सुटकेसाठी नवस बोलला होता. त्यामुळे त्यांच्या सुटकेनंतर येसूबाईंनी हे मंदिर बांधून घेतलं असं म्हटलं जातं. मंदिराचं बांधकाम करताना गोपाळ समाजाने मोठमोठे दगड वाहून आणले, घिसाडी समाजाने लोखंडकाम केलं, बेलदार समाजाने नक्षीकाम केलं, कैकाडी समाजाने बांबूच्या टोपल्या तयार केल्या. याशिवाय वैदू, गारुडी, लमाण, भिल्ल, जोशी, वडार अशा अठरापगड जमातीतील लोकांनी आपला सहभाग देऊन मंदिराचं काम पूर्ण केलं असं म्हणतात. त्यामुळे एकूणातच वंचित समाजासाठी मढी हे श्रद्धास्थान बनलं.

दरवर्षी होळी ते गुढीपाडवा या पंधरवड्यात इथे मोठी यात्रा भरते. रंगपंचमीच्या दिवशी भरणाऱ्या मुख्य यात्रेत महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा राज्यातून लाखो भाविक यात्रेला येतात. शिवाय गुढीपाडव्याला नगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांतून मानाच्या कावडी घेऊन लोक यात्रेत सहभागी होतात. चार-पाच वर्षांपूर्वीपर्यंत या ठिकाणी पशुबळी आणि जातपंचायतीची परंपरा होती. मात्र स्थानिकांच्या विरोधानंतर ती बंद झाली आहे. अलीकडच्या काळात महाराष्ट्राला हिंदुत्वाची प्रयोगशाळा बनवण्याचे प्रयत्न केले जाताहेत. इतर धर्मीयांविषयी द्वेषपूर्ण आणि चिथावणीखोर वक्तव्य करणं, त्यांना मारहाणीची धमकी देणं, रोजच्या व्यवहारांत त्यांना त्रास देण्याचा-वाळीत टाकण्याचा प्रयत्न करणं असे प्रकार अनेक ठिकाणी सुरू आहेत. मढी गावातही गेल्या दोन वर्षांपासून हे प्रकार सुरू असल्याचं गावकरी सांगतात.

madhi yatra

नेमकं प्रकरण काय?

मढी गावचे माजी सरपंच आणि मढी देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष संजय मरकड यांनी गावाबाहेरील मुस्लिम व्यापाऱ्यांना यात्रेत दुकान लावण्यापासून बंदी करण्याचा विचार पहिल्यांदा बोलून दाखवला. मुस्लिम लोक देवस्थानच्या रूढी-परंपरांचं पालन करत नाहीत, अस्वच्छ राहतात, पशुहत्या करतात, सामान्य नागरिकांना दमदाटी-धमकावणी करतात, अवैध कामं करतात असे आरोप करत मरकड यांनी मुस्लिमांविरोधात शड्डू ठोकला. फेब्रुवारी २०२१ ला सरपंचपदाची जबाबदारी घेतलेल्या मरकड यांनी फेब्रुवारी २०२५ मध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा ठराव ग्रामसभेत मांडला. या ठरावाला ९७ ग्रामस्थांनी हिरवा कंदील दाखवला. मुळातच या ठरावात मुस्लिम विरोधाबाबत काहीच नव्हतं असं गावकरी सांगतात. मरकड यांच्या कुटुंबात घडलेल्या एका घटनेचा संदर्भ मुस्लिमांना विरोध करण्यामागे असल्याची चर्चा आजही गावात चालते. मरकड यांनी आक्रमकपणे मुस्लिम विरोधाचा झेंडा हाती घेऊन स्थानिक माध्यमांच्या मदतीने आसपासच्या गावात हा संदेश जाईल अशी व्यवस्था केली. दुकानं लावण्याचा प्रयत्न केला तर दुकान उधळून टाकू अशा धमक्याही मुस्लिम दुकानदारांना देण्यात आल्याचं काही लोक सांगतात. संघर्ष टाळण्यासाठी मुस्लिम व्यापाऱ्यांनी तत्कालीन गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांच्याकडे धाव घेतली. कांबळे यांनी सामाजिक भेदभाव आणि ग्रामसभेच्या अल्प उपस्थितीचं तांत्रिक कारण देत ग्रामसभेचा ठराव रद्द केला. मात्र तरीही २०२५ च्या यात्रेत गावाबाहेरचे मुस्लिम व्यापारी सहभागी झाले नाहीत.

हेही वाचा - सलोख्याची वीण उसवतेय..

त्यानंतर मरकड यांनी दुसरी ग्रामसभा घेतली. त्या ग्रामसभेत सादर केलेल्या ठरावाच्या बाजूने ३२७ तर विरोधात १२३ लोकांनी मतदान केल्याचं मरकड यांनी सांगितलं. मात्र या ठरावाला गावकऱ्यांनी आणि तालुक्यातील काही मुस्लिम बांधवांनी न्यायालयीन आव्हान दिलं. उच्च न्यायालयाने या ठरावाला स्थगिती दिली. पण त्यानंतरही मरकड यांचा विरोध सुरूच राहिला. यंदाही त्यांनी मुस्लिम व्यापाऱ्यांना दुकान लावण्यास बंदी असल्याच्या बातम्या पेरल्या. सोशल मीडियावर मेसेज पसरवले. त्यामुळे अधिकृत निर्णय झाला नसला तरीही भीतीमुळे यंदाच्या यात्रेतही गावाबाहेरचे मुस्लिम व्यापारी सहभागी झाले नाहीत.

संजय मरकड यांना त्यांच्या भूमिकेविषयी विचारलं असता ते म्हणाले, "हे लोक आपले नाहीतच. देवस्थानच्या कुठल्या परंपरा ते पाळत नाहीत. आठ-आठ दिवस अंघोळ करत नाहीत. यात्रेच्या काळातही यांना मांसाहार लागतो. कशाला पाहिजेत यांचे लाड? मुस्लिम बायका कुंकू लावत नाहीत ना, मग कुंकू विकतात तरी कशाला? ही आमच्या धर्मात लुडबुड नाही का? त्यांनी कुंकू लावायला सुरुवात करावी, मग त्यांना देतो परवानगी दुकान लावायला. बघा लावतात का ते? आता तो इराणचा माणूस मेला तर इथल्या मुस्लिमांना त्याचा पुळका कशाला यायला पाहिजे? आमच्या पोरी पळवून नेऊन लव जिहाद करणारी जमात आहे ही. यांना धडा शिकवायलाच पाहिजे. आणि गावातील ज्या मुस्लिमांना बाहेरच्यांचा पुळका येतोय ना, त्यांनाही आता दुकान लावू देणार नाही..!"

madhi yatra

मरकड मूळ मढीचे असले तरी बऱ्याच वर्षांपासून ते पिंपरी चिंचवडमधील थेरगाव भागात राहतात. कामाचं ठिकाणही पुण्यातच. मात्र गावच्या राजकारणात त्यांना विशेष रस आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या कामाचा प्रभाव आपल्यावर असल्याचं ते सांगतात. मरकड यांचा सरपंचपदाचा आणि देवस्थान मंडळावरील अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला असला तरी हिंदू जनजागरणाचे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून ते स्वतःला मढी-तिसगाव भागातील हिंदुत्ववादी राजकारणी म्हणून प्रोजेक्ट करू पाहतायत. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवण्याची त्यांची तयारी सुरू असल्याच्या चर्चा आसपासच्या गावात आहेत.

लोकांच्या मनात काय चाललंय?

संजय मरकड यांच्याशी बोलल्यावर मढीतल्या सर्वसामान्य गावकऱ्यांना या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे समजून घेण्यासाठी थेट मढीला जायचं ठरवलं. पुण्यातून साडेतीन तासांचा प्रवास करून तिसगावच्या वृद्धेश्वर हायस्कूल चौकात पोहोचलो. इथून मढी सहा किलोमीटर अंतरावर होतं. गाडीतून उतरल्या उतरल्या रिक्षाचालक अब्बासभाई भेटले. त्यांना विचारलं, "काय म्हणतोय यात्रेचा माहोल?" ते म्हणाले, "काय सांगायचं तुम्हाला. आमच्या मढीला नजर लागली कुणाचीतरी. हजार वर्षं झाली ही यात्रा सुरूय, पण असा प्रकार कधी घडला नव्हता. सगळं गुण्यागोविंदाने सुरू होतं. आता काही लोकांनी मनात विष पेरायला सुरुवात केलीय. मुस्लिम लोक कुणाला घाबरतात असा भाग नाही, पण कारण नसताना गोष्टी हाताबाहेर गेल्या, कुणाचा जीव गेला तर काय करायचं या विचाराने सगळे शांत आहेत. पण आज ना उद्या ही परिस्थिती बदलेल, अशा आशेवर आम्ही आहोत."

हेही वाचा - जेव्हा दीपक कुमार मुहम्मद दीपक बनतो..

अब्बासभाईंच्या चेहऱ्यावर निराशा दिसत होती. कुठलंही कारण काढून मुस्लिम बांधवांना जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय याबद्दल चिंता वाटत असल्याचंही त्यांनी सांगितलं. जवळपासच्या एका किराणा दुकानदाराशी बोललो. तेही मुस्लिम होते. त्यांचाही बोलण्याचा सूर काहीसा असाच होता. ते म्हणाले, "मढीची यात्रा म्हणजे अठरापगड समाजाची यात्रा. या यात्रेसाठी कुणालाही बंधन करायला नाही पाहिजे. मात्र ठराविक लोकांकडून हिंदुत्व हिंदुत्व करत वातावरण बिघडवायचा प्रयत्न केला जातोय.. यात्रेला येणाऱ्या लोकांवर यावर्षी याचा नक्कीच परिणाम झालाय. माझ्या ओळखीतले चाचा मुंबईत राहतात. त्यांची यात्रेला यायची इच्छा होती. मात्र यात्रेत मुस्लिम दिसले की दंगल होणार अशी अफवा कुणीतरी पसरवली आणि त्यांच्या मुलांनी त्यांना यायला बंदी केली. अशी अनेक उदाहरणं आहेत. आपल्याच देवाच्या ठिकाणी जाऊन आपलीच अडचण होणार असेल तर कशाला भांडणाचं कारण बना असा प्रश्न लोकांना पडलाय."

madhi yatra

मढी गावात वर्षभर प्रसाद आणि पूजा साहित्याचं छोटेखानी दुकान लावणाऱ्या चंद्रकला काळदाते यांनासुद्धा मुस्लिम दुकानदारांच्या बंदीचा निर्णय पटलेला नाही. दुपारच्या वेळेत रेवडीच्या पुड्या बांधत असताना त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, "दादा, कुठल्याही माणसाचं रक्त लालच हाय का नाय..? त्यो कानिफनाथ जर कुणामध्ये भेदभाव करत नसेल तर आपण माणसांनी का करावा? आता आम्ही इथं छोटं दुकान लावतो. आमच्या समोर गावातलेच मोमीन चाचा आहेत. मोठं दुकान आहे त्यांचं. आम्ही त्यांच्याकडूनच माल घेतो. गावातले बरेच छोटे व्यावसायिक पाथर्डी, तिसगांव, कारंजीमधील मुस्लिम व्यापाऱ्यांकडून रेवडी, गोडीशेव आणि फरसाण खरेदी करतात. आता यात्रेला काही छोटे मुस्लिम व्यापारी बाहेरगावावरून येतात. त्यांना दोन वर्षं बंदी केलीय. आपल्यासारखंच त्यांना पण पोट हाय की ओ. त्यांच्या पोटावर कशाला पाय आणायचा. तसं बघायला गेलं तर या दुकानातून फार काही मिळतं अशातला भाग नाही. पण जे काय मिळतं त्याचा आधार असतोच. गरीब मुस्लिमांचा हा आधार काढून का घ्यायचा?"

गावातल्याच दिलशाद भाभी सांगत होत्या, "पूर्वी गावात कधीच हिंदू-मुस्लिमांमध्ये तणाव नव्हता. खेळीमेळीत सगळं चालायचं. मी स्वतः कानिफनाथाला नवस बोलले होते आणि त्याचा मला चांगला अनुभव आलेला. पण आता हे गावातले मोठे लोक बाहेरच्या मुस्लिमांना विरोध करतात. गावातही कसकसले हिंदूगर्जना कार्यक्रम घेऊन मुस्लिमांना धमकावतात. या लोकांपुढे आपण काय बोलणार? "

तमन्ना भाभींनीही त्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला. माजी सरपंच मरकड यांच्याविषयी त्या म्हणाल्या, "लांड्या एवढा एकच शब्द ते आमच्याबद्दल वापरतात. गावात कुठे सभा असली की आम्हाला माईकवर बोललेलं ऐकू येतं. मुस्लिमांना हाकलून लावायचं, गावात राहू द्यायचं नाही असंच ते बोलत असतात. कुठलंही कारण काढून आमच्या मुलांना, कुटुंबातल्या लोकांना ते त्रास देतील अशी भीती वाटत राहते. खरं विचराल गावातले इतर मरकड, बाकीही हिंदू लोक आमच्या बाजूने आहेत. त्यामुळे आम्हाला थोडा तरी आधार आहे."

madhi yatra

तिसगावचे नासिर शेख हे मिठाईचे होलसेल व्यापारी. वृद्धेश्वर हायस्कूल चौकात त्यांचं दुकान आहे. हे दुकान वर्षभर सुरू असतं. कानिफनाथाच्या यात्रेसाठी ते दरवर्षी काही टनांमध्ये रेवडी-गोडी शेव तयार करतात. गावात प्रसादाचं दुकान लावणारे बरेच छोटे व्यावसायिक त्यांच्याकडून रेवडी खरेदी करतात. त्यांच्यासारखेच पाच-सहा मोठे व्यापारी तालुक्यात आहेत. मागील दोन वर्षांत व्यवसायावर नेमका काय परिणाम झाला हे विचारलं असता नासिरभाई म्हणाले, "आधी आम्ही यात्रेत दुकान लावायचो तेव्हा किरकोळ विक्रीतून किलोमागे ३०-४० रुपये मिळायचे. आता मात्र दुकान लावता येत नसल्याने सगळी विक्री होलसेलच करावी लागतेय. दुकान लावलं नसलं तरी आम्ही दरवर्षी जेवढा माल बनवायचो तेवढाच आताही बनवतोय. पण त्यातून मिळणारा फायदा मात्र कमी झालाय. मोठ्या व्यापाऱ्यांचं दीड ते दोन लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. छोट्या दुकानदारांना यात्रा काळात मिळणारे पैसे पुढे ३-४ महिने कामाला येतात, मात्र त्यांच्यासमोरच्या अडचणीही वाढल्या आहेत. ठराविक लोकांच्या हट्टापायी एकीने आणि खेळीमेळीने राहणाऱ्या हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये विनाकारण तणाव निर्माण झालाय. ही परिस्थिती लवकर निवळायला हवी."

हेही वाचा - धर्मापलीकडची, शेतीसंस्कृतीतली दिवाळी

कायदेशीर दाद

मुस्लिम दुकानदारांना बंदी करण्याचा निर्णय झाल्यानंतर मढीतील फिरोज शेख आणि पाथर्डीतील त्यांचे मित्र मुकद्दर पठाण यांनी त्याला उच्च न्यायालयात आव्हान दिलं. कुठल्याही जात-धर्माच्या लोकांना व्यवसायासाठी बंदी घालणं हे संविधानाच्या विरोधात आहे, असा मुद्दा त्यांनी याचिकेत मांडला. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणीला आल्यानंतर मुस्लिम दुकानदारांना बंदी करण्याच्या ग्रामपंचायत निर्णयाला स्थगिती देण्यात आली. यावर्षीची यात्रा झाल्यानंतर २० एप्रिल २०२६ रोजी त्यावर पुढील सुनावणी होणार आहे. या प्रकरणाबद्दल फिरोज शेख सांगतात, "मुळात ग्रामसभेवेळी मुस्लिम दुकानदारांना बंदी असा ठराव मांडलाच गेला नव्हता. काही लोक परंपरा पाळत नाहीत त्यांनी त्या पाळाव्यात असं ग्रामसेवक मोघम बोलले होते. मात्र तत्कालीन सरपंच संजय मरकड हे लोकांसमोर येऊन मुस्लिमांना बंदी घालणारा ठराव झाल्याचं सांगत राहिले. ग्रामसभेच्या ठरावाची प्रत मागितली की ते देत नाहीत. उडवाउडवीची उत्तरं देतात. स्वतःला धर्मरक्षक म्हणवून घेतात आणि इतर धर्मियांना शिवीगाळ करतात, आक्षेपार्ह बोलतात. या गावची परंपरा पहिल्यापासून सर्वसमावेशकच होती. मंदिर कमिटीमध्ये मरकड आणि मुस्लिम कुटुंबातले प्रत्येकी चार जण असायचे. २०११ पर्यंत मुस्लिम बांधवही (मुजावर) मंदिरात पुजारी म्हणून कार्यरत होते. पूजा करण्यासाठीचा अधिकृत पास त्यांच्याकडे होता. याशिवाय बिभन फत्तू शेख हे १५ वर्षं मढी ग्रामपंचायतीचे सरपंच होते. मंदिराच्या जुन्या भिंती पाहिल्या तर त्यावर अरबी आणि फारसी भाषेत लिहिलेला मजकूर तुम्हाला दिसेल. अहिल्यानगरच्या गॅझेटमध्येसुद्धा मढीतल्या हिंदू-मुस्लिम परंपरेचा उल्लेख आढळतो. असं असताना स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी मुस्लिमांना विरोध करणाऱ्या कुणालाही आम्ही जाब विचारणारच. संविधानाच्या विपरीत कुणी काही काम करत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही."

madhi yatra

फिरोज भाईंच्या बोलण्यातून गावात सुरू असलेल्या चुकीच्या पायंड्याविषयीचा संताप जाणवत होता. फिरोज भाईंच्या बोलण्याला दुजोरा देत मंदिराच्या पायथ्याला दुकान असलेले जान मोहम्मद पटेल म्हणाले, "बाहेरचे मुस्लिम दुकानदार अवैध धंदे करतात अशी तक्रार माजी सरपंचांकडून केली जाते, मग त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार का दिली जात नाही. मढीच्या यात्रेला हजार वर्षांचा इतिहास आहे, मग मागील दोन वर्षांतच हा विरोध का सुरू झाला? ज्याच्याकडून चुका होतील त्याला पाठीशी घालता कामा नये, असंच आमचंही म्हणणं आहे. मग तो कुठल्याही जात-धर्माचा असो. पण तसं काहीही घडलेलं नसताना मुस्लिमांवर आरोप करायचे आणि सोशल मीडियावरून त्याला प्रसिद्धी द्यायची, हे चूक आहे."

हेही वाचा - भारतात धार्मिक शत्रूभावना वाढतेय?

ग्रामसभेच्या ठरावाच्या बातम्या सोशल मीडिया आणि वर्तमानपत्रांत आल्यानंतर त्याची वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी नागरी प्रश्नांवर काम करणाऱ्या संविधान संवाद समितीच्या राजवैभव शोभा रामचंद्र या तरुणाने तत्कालीन सरपंच संजय मरकड, गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे आणि ग्रामसेवकांशी फोनवरून चर्चा केली होती. ग्रामसभेत झालेली चर्चा आणि ठराव यात तफावत असल्याचं लक्षात आल्यानंतर राजवैभवने त्याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यानंतर हा ठराव मागे घेत असल्याचं प्रसिद्धीपत्रक अधिकाऱ्यांकडून संविधान संवाद समितीला पाठवण्यात आलं.

राजकीय पार्श्वभूमी

माजी सरपंच संजय मरकड हे भाजपचे असून स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून प्रमोट करण्याची त्यांची इच्छा दिसते. त्यासाठी ते महेश लांडगे, संग्राम जगताप, सागर बेग यांचा पाठिंबा घेत असल्याचं गावकरी सांगतात. काशिनाथ पाटील हे मढी-तिसगाव भागातील अनुभवी राजकारणी. ३० वर्षं सरपंच, दोन वेळा पंचायत समिती सदस्य आणि एक वेळा जिल्हा परिषद सदस्य असा त्यांचा राजकीय प्रवास. राधाकृष्ण विखे पाटील यांचे समर्थक असल्यामुळे आयुष्यातील बराचसा काळ काँग्रेसमध्ये घालवल्यानंतर ते अलीकडे भाजपमध्ये सहभागी झालेत. मात्र त्यांची भूमिका हिंदू-मुस्लिम ऐक्याला पूरक. तालुक्यातील शेकडो मुस्लिम बांधव त्यांचे मित्र आहेत. मढीमध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांवर बंदीच्या हालचाली सुरू झाल्यानंतर काशिनाथ पाटलांनी तत्कालीन सरपंच संजय मरकड यांची भेट घेतली. सविस्तर चर्चा केली. मात्र त्या चर्चेचा फायदा झाला नाही. काशिनाथ पाटील सांगतात, "आम्ही तालुक्यातील मुस्लिम बांधवांसोबत महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर देवस्थानांच्या यात्रा केल्या आहेत. ते कुणी वेगळे आहेत असं आम्हाला कधी वाटलं नाही आणि वाटणारही नाही. प्रत्येकाला आपापल्या धर्माविषयी आस्था आणि अभिमान असणं गैर नाही. पण इतर धर्मियांना कमी लेखणं, त्यांना दुजाभावाची वागणूक देणं बरोबर नाही. सामाजिक सलोखा ठेवण्यासाठी, देवस्थानाचं आणि यात्रेचं पावित्र्य राखण्यासाठी चर्चेतून मार्ग काढायला हवा. लोकप्रतिनिधींनीही त्यांना निवडून दिलेल्या मतदारांचा विचार करायला हवा. खासदार निलेश लंके यांनी या प्रकरणात कोणतीही भूमिका घेतली नाही, त्याबद्दल आम्ही नाराज आहोत."

madhi yatra

मढी हे गाव विधानसभेसाठी पाथर्डी आणि लोकसभेसाठी अहिल्यानागर मतदारसंघात येतं. पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या मोनिका राजाळे, तर लोकसभेला निलेश लंके चांगल्या मताधिक्याने निवडून आले आहेत. या दोघांनाही त्यांच्या राजकारणात मतदारसंघातील मुस्लिमांनी पाठिंबा दिला आहे. मात्र मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी करण्याच्या निर्णयावर या दोघांनीही जाहीर प्रतिक्रिया दिलेली नाही. मोनिका राजाळे यांना संजय मरकड यांचा निर्णय मान्य नसल्याची चर्चा भाजपचे काही स्थानिक कार्यकर्ते खाजगीत करतात. या सर्व घटनांचा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीवर कितपत परिणाम होईल असं विचारलं असता ते उमेदवारावर अवलंबून असेल असं काशिनाथ पाटील म्हणाले. काँग्रेस आणि शिवसेना पक्षापैकीही कुणी या प्रश्नावर आवाज उठवल्याचं पहायला मिळालं नाही. राजकीय नेत्यांच्या भूमिकेवर याचिकाकर्ते फिरोज शेख म्हणतात, "आमचं सांत्वन करण्यासाठी सगळेच आहेत. पण आमच्या सोबत उभं राहण्यासाठी कुणी नाही. काही लोक आतून सपोर्ट करतात पण जाहीर सभेत आमच्या विरोधात बोलतात. एखादी घटना घडून गेल्यानंतर त्याविषयी बोलण्यात आणि कोरडी सांत्वना देण्यात काय अर्थ आहे?"

मढी देवस्थानच्या नवनिर्वाचित विश्वस्त मंडळानेही माजी अध्यक्ष संजय मरकड यांच्या भूमिकेला विरोध केला आहे. विश्वस्त मंडळातील नवनाथ मरकड, माधुरी मरकड, दादासाहेब मरकड, महादेव कोकाटे, उत्तमराव मरकड, दादासाहेब मरकड, अनिल साठे, उषा मरकड, अशोक पवार, तसंच व्यवस्थापक संजय मरकड (नाव तेच, व्यक्ती वेगळी) यांनी पत्रकार परिषद घेऊन मढी देवस्थानाच्या ठिकाणी कसल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही, ही भूमिका स्पष्ट केली आहे.

प्रशासन काय म्हणतंय?

मढीतल्या घडामोडींबद्दल प्रशासनाची भूमिका काय आहे आणि त्यांनी काही पावलं उचलली आहेत का हे समजून घेण्यासाठी पाथर्डीच्या गटविकास अधिकारी संगीता पालवे यांच्याशी बोललो. त्या म्हणाल्या, "आपल्या राज्यघटनेने सर्वांना समान संधी दिलेली असून प्रशासनही त्याच तत्वाचं पालन करतंय. गावातील आणि गावाबाहेरील मुस्लिम व्यापाऱ्यांना दुकान लावण्यासाठी कुठल्याही प्रकारची बंदी करता येणार नाही असे स्पष्ट निर्देश आम्ही दिले होते. स्थानिकांची दुकानं यावेळी चालू होती. यात्रेपूर्वी काही हिंदू आणि मुस्लिम व्यापाऱ्यांनी दुकानासाठी मुख्य रस्त्यावर जागा मिळावी यासाठी भेट घेतली होती, पण सर्वांनाच मोक्याच्या ठिकाणी जागा देता येणार नाही ही अडचण आम्ही त्यांना समजावून सांगितली. पण कुठल्याही प्रकारचा भेदभाव होत असेल तर नागरिकांना आमच्याशी थेट बोलावं. त्यांना संपूर्ण सहकार्याची आमची तयारी आहे."

हेही वाचा - एकतारीवरचा 'एकी'चा सूर

अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्याशी या विषयावर चर्चा केली असता ते म्हणाले, "शासन कुठल्याही प्रकारच्या भेदभावाचं कधीच समर्थन करणार नाही. मढीमध्ये जे सुरू आहे, त्याला ना स्थानिक ग्रामपंचायतीचा पाठिंबा आहे ना शासनाचा. तो फक्त संजय मरकड या एका व्यक्तीच्या स्टंटबाजीचा प्रकार आहे. मढी गावात मुस्लिम दुकानदारांना विरोध करण्याचा कुठलाही ठराव झालेला नसून याची माहिती माझ्यापासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना आहे. यात्रेत गैरप्रकार होऊ नये यासाठी गावाबाहेरील मुस्लिम बांधवांनी स्वतःहून सामंजस्याची भूमिका घेत दुकानं लावली नाहीत. पण त्यांना दुकान लावण्यासाठी कुणीही बंदी करू शकत नाही. प्रशासन म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत."

थोडक्यात मढीमध्ये धार्मिक वितुष्ट तयार करणाऱ्या माणसांबरोबरच सलोखा ठेवू इच्छिणारी माणसंही आहेत, असंच मढीत फिरल्यावर लक्षात येतं. उलट तीच संख्येने जास्त आहेत. पण वैमनस्याच्या प्रयत्नांना राजकीय पाठिंबा असल्यामुळे साध्यासुध्या माणसांची सांमजस्याची भूमिका झाकोळली जाते आहे. इतर राजकीय पक्षही यात जाहीर भूमिका घेण्यास तयार नसल्यामुळे सर्वसामान्य माणसांना कुणी वाली उरलेला नाही. कायदेशीर लढाईत काय घडेल, इतर राजकीय पक्ष धार्मिक सलोख्यासाठी सर्वसामान्य लोकांच्या पाठिशी उभे राहतील का, मुस्लिमांच्या मनातली भीती दूर करण्यात प्रशासन-नेते मंडळी पुढाकार घेतील का हे लवकरच कळेल.

योगेश जगताप | 9561190500 | yogeshjagtap8819@gmail.com

योगेश जगताप हे युनिक फीचर्समध्ये संपादकीय विभागात कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नांवर माहितीपर रिपोर्ताज करण्यासोबतच कष्टकरी आणि तरुणांसाठी काम करणाऱ्या धडपड्या व्यक्तींबद्दल लिहिण्यात त्यांना रस आहे.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 2

Surbhi14.04.26
Lovely story

Santosh Arsod18.03.26
देश कसा धार्मिक उकिरडा करुन ठेवला आहे याची ज्वलंत मांडणी.

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results