• तमिळनाडू राज्यात १९६७ साली काँग्रेस पक्षाचा पराभव करून द्रविड मुन्नेत्रण कळघम (द्रमुक) हा पक्ष सत्तेवर आला. १९७२ साली सिने अभिनेते एम. जी. रामचंद्रन यांनी द्रमुकमधून बाहेर पडून ‘ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्रण कळघम’ (एआयडीएमके- अण्णा द्रमुक) या पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून द्रमुक आणि अण्णा द्रमुक या दोनच पक्षांत आलटून-पालटून सत्ता राहिलेली आहे. या दोन पक्षांनी राज्यातील विकासाचे प्रश्न आणि समाज घटकांचा पाठिंबा अशा दोन्ही पद्धतीने राजकीय अवकाश व्यापला आहे. परिणामी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना राज्यात कधीच स्वतंत्रपणे पाय रोवता आलेले नाहीत. काँग्रेसने द्रमुकशी, तर भाजपने अण्णाद्रमुकशी युती करून राज्यात आपलं अस्तित्व टिकवून ठेवलं आहे.
• तमिळनाडूमध्ये पश्चिम, दक्षिण, मध्य आणि चेन्नई असे चार प्रशासकीय विभाग आहेत, यातील मध्य आणि चेन्नई या विभागात शहरीकरण आणि औद्योगिक विकास झालेला आहे. तर दक्षिण आणि उत्तर विभाग मागासलेला आणि कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. २०११ च्या जनगणनेनुसार तमिळनाडू हे देशातील सर्वात जास्त शहरीकरण (४८ टक्के) झालेलं राज्य होतं. हा आकडा आता वाढलेलाच असणार. राज्याची अर्थव्यवस्था कृषी आणि उद्योग अशी दोन्हीवर आधारित आहे.
• तमिळनाडूची सामाजिक रचना वैशिष्यट्यपूर्ण आहे. सगळे समाज घटक एकेका भागात केंदिरत झालेले आहेत. संपूर्ण राज्यभर पसरलेला असा एकही समाज घटक नाही. राज्यात ओबीसींची लोकसंख्या ७० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. ओबीसींमध्येही आर्थिकदृष्ट्या पुढारलेले (शेतकरी) ओबीसी, मागास (बिगर शेतकरी) ओबीसी, कारागीर ओबीसी असं विभाजन आहे. याशिवाय थेवर, गौंडर, मुदलियार, वण्णियार असे स्वतंत्र जातिगट आहेत..
• इथल्या ओबीसी समाज घटकांचीही दोन वैशिष्ट्यं आहेत. एक म्हणजे, ‘ओबीसी अस्मिता’ म्हणून ते एका राजकीय पक्षाच्या छत्राखाली एकत्र येत नाहीत. त्यांचं विविध पक्षांमध्ये विभाजन झालेलं आहे. दुसरं, विशिष्ट भागात एक किंवा दोन ओबीसी समाज एकवटलेले आहेत. त्यामुळे त्या भागात त्या गटाचं वर्चस्व दिसतं. उदा. उत्तरेकडील आणि पूर्वेकडील भागात वण्णियार, दक्षिणेकडे थेवर, पश्चिम भागात गौंडर राजकारणात प्रबळ आहेत. त्याचप्रमाणे परय्या, वेल्लाळ, मुदलियार, मुक्कलथोर, वेल्लाळ गौंडर, द्रविडर, नाडर, नायडू हे अन्य समाज घटकही राज्यात महत्त्व राखून आहेत.
हेही वाचा - तामिळनाडू : राजकीय घमासानात भाजपची उडी
• २०११ ते २०२१ अशी सलग दहा वर्षं तमिळनाडूमध्ये अण्णाद्रमुकची सत्ता होती. त्यामुळे २०२१ साली अँटी-इन्कंबन्सीचा फायदा घेत द्रमुकने निवडणूक जिंकली आणि एम. के. स्टॅलिन मुख्यमंत्री झाले. त्यासाठी स्टॅलिन यांनी ‘सेक्युलर प्रोग्रेसिव्ह अलायन्स’ स्थापन केलं होतं. द्रमुकवर स्टॅलिन यांचं पूर्ण नियंत्रण आहे. त्यांचे चिरंजीव उदयनिधी स्टॅलिन हेही राजकारणात सक्रिय आहेत. अभिनेते असलेले उदयनिधी तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. त्यांनी गेल्या पाच वर्षांत तरुणांमध्ये पक्षाची संघटन बांधणी मजबूत केली आहे.
• यंदाही द्रमुक पक्षाने एकूण १३ पक्षांना सोबत घेत ‘सेक्युलर प्रोग्रसिव्ह आलायन्स’ आघाडी कायम ठेवली आहे. यात काँग्रेसपासून ते सर्व डावे पक्ष सहभागी झालेले आहेत. अण्णाद्रमुकने बडतर्फ केलेले माजी मुख्यमंत्री पनीरसेल्वम आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनीही नुकताच द्रमुकमध्ये प्रवेश केला आहे. पनीरसेल्वम यांना पक्षाने त्यांच्या हक्काच्या बोदिनायक्कनुर मतदारसंघातून उमेदवारीही दिली आहे. या पक्षांतराचा फायदा द्रमुक आघाडीला होईल असं सांगितलं जात आहे.
• गेल्या पाच वर्षांत सरकारने केलेलं काम मतदारांपर्यंत पोहोचवण्यात द्रमुकला बऱ्यापैकी यश येत असल्याचं मानलं जातं. त्यामुळे अँटि इन्कम्बन्सी फॅक्टर यंदाच्या निवडणुकीत लागू होणार नाही, असा अंदाज आहे.
• २०११ आणि २०१६ असे सलग दोनवेळा अण्णाद्रमुकने जयललिता यांच्या नेतृत्वाखाली सत्ता मिळवली होती. मात्र जयललिता यांच्या निधनानंतर सहानुभूतीचा राजकीय फायदा या पक्षाला घेता आला नाही. उलट नेतृत्वामधील संघर्ष, गटबाजी टोकाला जाऊन मतदारांमध्ये नाराजी तयार झाली. २०२१ साली सत्ता गमावल्यानंतरही विरोधी पक्ष म्हणूनही अण्णाद्रमुकला सूर गवसलेला नाही.
हेही वाचा - लोककेंद्री विकासाचं केरळी मॉडेल
• माजी मुख्यमंत्री उडापडी के. पलनीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली अण्णा द्रमुक निवडणूक लढवते आहे. त्यांची भाजपसोबत युती आहे. २०२३ अण्णा द्रमुक एनडीएमधून बाहेर पडला होता. मात्र राजकीय ताकद ओळखून त्यांनी पुन्हा भाजपशी जुळवून घेतलं आहे. तमिळनाडूमध्ये हातपाय पसरण्याची भाजपची इच्छा लपून राहिलेली नाही. पण यावेळी अण्णा द्रमुकने भाजपसह इतर आणखी ११ पक्षांची मोट बांधून ‘अण्णा द्रमुक लीड अलायन्स’ केला आहे. त्यात दिनकरन यांच्या ‘एएमएमके’ पक्षासह इतर अनेक छोट्या पक्षांचा समावेश आहे.
• सत्ताधारी द्रमुकने राबवलेल्या योजनांना टक्कर देण्यासाठी अण्णा द्रमुकनेही या निवडणुकीत आश्वासनांचा भडिमार केला आहे. उदा. महिलांना दोन हजार रुपये आर्थिक मदत, मोफत बस प्रवास, १५० दिवसांची रोजगार हमी, अम्मा टू व्हिलर योजना पुन्हा सुरू करणं इत्यादी. याशिवाय गेल्या पाच वर्षांत महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये झालेली वाढ, राज्यातील कर्जवाढ असे त्यांचे प्रचारातले मुख्य मुद्दे आहेत.
• यंदा अभिनेते विजय थलपती यांचा ‘तमिळगा वेत्री कळगम’ हा पक्ष निवडणुकीत उतरला आहे. त्यांच्या रूपाने जनतेसमोर तिसरा पर्याय उभा आहे. त्यांच्या टीव्हीके पक्षाने धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर भर देत महिला आणि तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. विजययांनी लोकप्रियतेच्या आधारावर सभांना गर्दी खेचली आहे. पण गर्दीचं मतांमध्ये रुपांतर करतील असे मुद्दे त्यांनी अद्याप प्रचारात आणलेले दिसत नाहीत.
• सिने अभिनेत्यांनी यशस्वीरीत्या राजकारण करण्याचा प्रदीर्घ इतिहास तमिळनाडूत आहे. अण्णा द्रमुकचे संस्थापक एम. जी. रामचंद्रन, अण्णा द्रमुकच्याच जयललिता हे दोघेही चित्रपट अभिनेते मुख्यमंत्री राहिलेले आहेत. २०२१ साली सिने अभिनेते कमल हसन ‘मक्कल नीधी मैयम’ या पक्षाची स्थापना करून निवडणुकीत उतरले होते. त्याशिवाय शिवाजी गणशेन, विजयकांत, खुशबू अशा अनेक कलावंतांनी राजकारणात आपलं नशीब आजमावलं आहे.
• यंदा एस. रामदास यांचा पीएमके व जयललिता यांची सहकारी शशिकला यांचा एपीटीएमइमके यांनी एकत्र येत तिसरी आघाडी केली आहे. ही वण्णियार आणि थेवर समाजाची आघाडी आहे. याशिवाय सीमन यांचा ‘नाम तमिळर कची’, के. कृष्णस्वामी यांचा ‘पुतीय तमिळगम’ हे छोटे पक्षही अनेक वर्षांपासून काही भागात अस्तित्व दाखवून आहेत.
• एकुणात सत्ताधारी द्रमुक आघाडी, अण्णाद्रमुक-भाजप महायुती अशा दोन आघाड्या दिसत असल्या, तरीही पक्षीय स्पर्धा चौरंगी होण्याची शक्यता आहे.
सोमिनाथ घोळवे | 9881988362 | sominath.gholwe@gmail.com
सोमिनाथ घोळवे हे ग्रामीण समाज व्यवस्थेचे अभ्यासक आहेत.
