
जगभरात वैज्ञानिक संशोधनक्षेत्रात उपेक्षा सोसाव्या लागलेल्या स्त्रियांची अनेक उदाहरणं आहेत. महिला दिनानिमित्त एक संशोधिकाच सांगतेय या उपेक्षेची, ‘मॅटिल्डा इफेक्ट’ची गोष्ट.
पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या चौकातला झाशीच्या राणीचा पुतळा मी लहानपणापासून बघत आले आहे. हातात तळपती तलवार घेऊन, लहान मुलाला पाठीला बांधून, घोड्यावर स्वार होऊन लढायला निघालेल्या योद्ध्याच्या वेशातल्या राणी लक्ष्मीबाई. पुतळ्याकडे मान उंचावून बघताना मी विस्मय, अभिमान या सगळ्या भावभावना अनुभवल्या आहेत.
वैज्ञानिक संशोधनासाठी अमेरिकेत आल्यावर एकदा पिट्सबर्गच्या माझ्या प्रयोगशाळेत अशीच एक आधुनिक झाशीची राणी मला दिसली- चार महिन्यांच्या आपल्या मुलाला पाठीवर बांधून, अंगात पांढरा एप्रन आणि हातात ग्लोव्हज घालून प्रयोगशाळेत काम करणारी व्हेरा. तिला पाहूनही मी अशीच अवाक् झाले होते.
गेल्या पंचवीस वर्षांत विद्यार्थीदशेपासून ते एका कंपनीमध्ये विभाग प्रमुख म्हणून काम करण्यापर्यंत एक स्त्री शास्त्रज्ञ म्हणून माझा प्रवास घडला. त्या दरम्यान अशा अनेक व्हेरा मी पाहिल्या आहेत, अनेकींबरोबर कामही केलं आहे. कोणाच्या पाठीवर लहान मूल, तर कोणाच्या पाठीवर संसाराची जबाबदारी. कोणी आपल्या वयस्कर आई-वडिलांच्या, कुटुंबांच्या चिंता सोबत बाळगून काम करणार्या, तर कोणी आयुष्याच्या विविधरंगी स्वप्नांची पोतडी पाठीवर घेऊन शास्त्रज्ञ म्हणून काम करणार्या. देश वेगळे, रंग-रुप-वेश वेगळे, जात-धर्म वेगळे, प्रत्येकीच्या संशोधनाचा विषयही वेगळा, पण तरीही या सगळ्या स्त्रियांमध्ये एक गोष्ट समान होती- ती म्हणजे स्त्री-वैज्ञानिक म्हणून रोजच्या आयुष्यातल्या लहानसहान गोष्टींपासून ते संशोधनकामाचं योग्य श्रेय दिलं जावं यासाठी करावा लागणारा संघर्ष...
स्त्रियांचे प्रश्न हा मोठा व्यापक विषय आहे. परंतु, या लेखात शास्त्रीय संशोधनक्षेत्रातील उपेक्षित स्त्रियांबद्दल थोडं बोलणार आहे.

यातील एक ठळक नाव, म्हणजे DNA रचनेचा शोध लावणारी शास्त्रज्ञ डॉ. रोजालिंड फ्रँकलिन. DNA च्या double helix रचनेचा शोध लावण्यात त्यांचं अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान होतं. मात्र त्याला मान्यता मिळाली नाही. १९६२ मध्ये जेम्स वॉटसन आणि फ्रान्सिस क्रिक यांनाच यासाठीचं नोबेल पारितोषिक दिलं गेलं.

दुसरं एक उदाहरण, म्हणजे अणूऊर्जा आणि अणूविभाजनाच्या शोधकार्यात महत्वपूर्ण योगदान असणार्या डॉ. लिसा माईटनर. Nuclear Fission चा शोध लावण्यात त्यांचं महत्त्वाचं कार्य आहे, पण १९४४ साली त्या कार्याबद्दलचं नोबेल पारितोषिक मिळालं ते केवळ तिचे सहकारी डॉ.ओटो हान यांना.

डॉ. जोसेलीन बेल बर्नेल यांनी Pulsar ताऱ्यांचा शोध लावला, पण १९७४ साली या कार्यासाठी नोबेल पारितोषिक मात्र त्यांचे मार्गदर्शक डॉ. अँटोनी हेविश यांना देण्यात आलं.
अशा कर्तबगार स्त्रिया जेव्हा सामूहिक उपेक्षेच्या बळी ठरतात, अनेकदा त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या पुरुष सहकाऱ्यांनाच केवळ त्या कामाचं सर्व श्रेय दिलं जातं, तेव्हा त्याला ‘मॅटिल्डा इफेक्ट’ (Matilda Effect) असं म्हटलं जातं. या नावामागची गोष्टही जाणून घेण्यासारखी आहे.

मॅटिल्डा गेज ही एकोणिसाव्या शतकातली एक स्त्रीवादी लेखिका. १९७० साली लिहिलेल्या ‘Woman as Inventor’ या दीर्घ निबंधात त्यांनी ‘स्त्रियांचं वैज्ञानिक आणि तांत्रिक क्षेत्रातलं योगदान पुरुषांनी कसं दुर्लक्षित केलं आहे किंवा चोरून स्वतःच्या नावावर प्रसिद्ध केलं आहे’ या विषयावर पहिल्यांदा प्रकाशझोत टाकला. या गोष्टीची दखल घेण्यासाठी विज्ञान-इतिहास तज्ज्ञ (science historian) मार्गारेट रॉसिटर यांनी विज्ञान आणि संशोधनातील लिंगभेद आणि विषमता मांडणाऱ्या संकल्पनेला १९९३ मध्ये 'मॅटिल्डा इफेक्ट' असं नाव दिलं.
'मॅटिल्डा इफेक्ट' या संकल्पनेला पुष्टी देणारी जगभरातील आणखी काही उदाहरणं बघू.
१६४७ साली जर्मनीमध्ये जन्माला आलेल्या मारिया सिबिला मेरियन एक निसर्गचित्रकार (naturalist), कीटकतज्ज्ञ (entomologist) आणि वैज्ञानिक होत्या. त्यांनी अळीपासून फुलपाखरू होण्यापर्यंतच्या परिवर्तन प्रक्रियेचा (metamorphosis) सर्वप्रथम अभ्यास केला आणि त्यांतल्या सर्व टप्प्यांचं वैज्ञानिकदृष्ट्या अचूक रेखाटन केलं. ‘मेटामॉरफॉसिस’ म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर काफ्का हे नाव येतं. पण कीटकांच्या जीवनचक्राचं अशा प्रकारे दस्तऐवजीकरण करणारी पहिली व्यक्ती, म्हणून मारिया सिबिला मेरियन यांच्या कामाची कुठेही ठळकपणे नोंद केलेली आढळत नाही.

कोलंबिया युनिव्हर्सिटी मेडिकल स्कूलमध्ये शिकलेल्या डॉ. डोरोथी हॅन्सिन अँडरसन या एक अमेरिकन चिकित्सक आणि वैज्ञानिक होत्या. फुफ्फुस आणि पचनसंस्थेशी संबंधित सिस्टिक फायब्रॉसिस (Cystic Fibrosis) या आजाराचं त्यांनी १९३८ मध्ये पहिल्यांदा निदान केलं; या आजाराची वैशिष्ट्यपूर्ण लक्षणं आणि कारणं स्पष्ट केली. या आजाराच्या उपचारासाठी प्राथमिक निदान पद्धती विकसित करण्यासही त्यांनी मदत केली. त्यांच्या कार्यामुळे सिस्टिक फायब्रॉसिसवर अधिक संशोधन होऊ लागलं, नवीन उपचारपद्धती विकसित करण्यात आल्या. पण डॉ. डोरोथी हॅन्सिन अँडरसन यांचं नाव मात्र पडद्यामागेच राहिलं.

हेरॉईन आणि इतर अंमली पदार्थांच्या व्यसनावरील उपचारासाठी ‘मेथाडोन थेरपी’ (Methadone Therapy) विकसित करण्यात महत्वाचं योगदान देणार्या मॅरी निसवाँडर (Marie Nyswander), ‘नासा’च्या अंतराळ मोहिमेत महत्वाची कामगिरी करणाऱ्या आफ्रिकी-अमेरिकी वंशाच्या महिला गणितज्ज्ञ कॅथरीन जॉन्सन, डोरोथी व्हॉन आणि मेरी जॅक्सन (‘हिडन फिगर्स’ या सिनेमामुळे थोडासा प्रकाशझोत पडलेल्या तिघी) अशी इतर अनेक उदाहरणं देण्यात येतील.
पाश्चात्त्य, प्रगत देशातील वैज्ञानिक संशोधक स्त्रियांची ही अवस्था, तिथे भारतीय स्त्री संशोधकांबद्दल तर बोलायलाच नको. मुळात भारतात अजूनही विज्ञान, संशोधन, शास्त्रज्ञ या गोष्टींकडे फार गांभीर्याने पाहिलं जात नाही. शिवाय संशोधन हे दीर्घकाळ चालणारं, यश-अपयशाच्या व्यवहारी गणितांना छेद देणारं आणि खर्चिक काम. त्यामुळे इथे मूलभूत आणि महत्वपूर्ण शोध लावणाऱ्या वैज्ञानिकांची संख्या पाश्चात्य देशांच्या तुलनेत कमीच. त्यात स्त्री-संशोधक तर आणखीनच कमी. थोडा विचार करून बघा, की आपल्याला भारतातल्या किती स्त्री-वैज्ञानिकांची नावं माहिती आहेत? कदाचित हाताच्या बोटावर मोजता येतील एवढी नावंही आपल्याला चटकन सांगता येणार नाहीत. कारण त्यांची नावं, त्यांचं कार्य कधी आपल्यासमोर मांडलंच जात नाही.

'मॅटिल्डा इफेक्ट' चा बळी ठरलेल्या अशा एक भारतीय संशोधिका म्हणजे डॉ. जानकी अम्मल. या भारतातील पहिल्या वनस्पतीशास्त्रज्ञ होत्या. त्यांनी कृषी सुधारणेसाठी संशोधन केलं. साखर उत्पादनासाठी सुधारित ऊसाच्या जाती विकसित केल्या. मात्र त्यांच्या कार्याचा फारसा उल्लेख केला गेला नाही. त्यांना विशेष सन्मानही मिळाले नाहीत.

दुसरं उदाहरण, म्हणजे पीएचडी करून डॉक्टरेट पदवी मिळवणारी पहिली भारतीय स्त्री संशोधिका डॉ. कमला सोहोनी. त्यांनी केम्ब्रिजमधून बायोकेमिस्ट्रीमध्ये पीएचडी मिळवली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस (IISc) मध्ये एक स्त्री म्हणून त्यांना प्रवेश नाकारण्यात आल्यावर त्यांनी त्याविरोधात आंदोलन करून प्रवेश मिळवला. प्रवेश मिळाल्यानंतरही त्यांना तिथे अतिरिक्त कठोर नियमांना सामोरं जावं लागलं. मात्र तरी त्यांनी शरीरातील प्रथिनं, व्हिटामिन्स आणि एन्झाइम्स (Enzymes) याविषयीचं उत्कृष्ट संशोधन केलं. कृत्रिमरित्या तयार केलेल्या अन्नातील पोषणतत्त्वं कशी टिकवता येतील, याचा त्यांनी अभ्यास केला. डाळी, भाजीपाला आणि धान्यातील पोषणतत्त्वांचा शोध घेतला, ज्यामुळे अन्न पोषणशास्त्राला नवी दिशा मिळाली. आदिवासी आणि ग्रामीण भागातील कुपोषणावर त्यांनी संशोधन केलं. पण आज किती जणांना त्यांचं नाव आणि काम माहिती आहे?

भारतातील पहिली महिला इलेक्ट्रॉनिक्स अभियंता डॉ. राजेश्वरी चॅटर्जी, यांनी भारतीय सैन्यासाठी रडार तंत्रज्ञान विकसित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. परंतु त्यांच्या संशोधनाबद्दल फारसं बोललं जात नाही. त्यांना राष्ट्रीय स्तरावर फार मान्यताही मिळाली नाही.
डॉ. चारुशीला चक्रवर्ती, थेरॉटिकल केमिस्ट्रीमध्ये संशोधन करणाऱ्या संशोधक. केमिस्ट्रीसारख्या मूलभूत विषयात काम करूनही त्यांच्या कामाला त्यांच्या सहकाऱ्यांइतकी मान्यता आणि दर्जा मिळाला नाही. स्त्री वैज्ञानिकांना मिळणारी दुर्लक्षित आणि दुय्यम वागणूक दाखवणारी अशी अनेक नावं घेता येतील !

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतर्फे (ISRO) राबवण्यात येणाऱ्या विविध अंतराळमोहिमा आणि संशोधनामुळे भारतात या क्षेत्रातील लोकांच्या कार्याविषयी उत्सुकता आणि सजगता निर्माण झाली आहे. कल्पना चावला या अंतराळात जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला, तसंच भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांची नावं लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना माहीत झाली आहेत. भारताचं पहिलं मंगळ अभियान यशस्वी करण्यासाठी नेतृत्व करणाऱ्या रितु करिधाल, चंद्रयान-२ च्या प्रकल्प संचालक मुथय्या वनिता, मंगळयान मोहिमेतील प्रमुख शास्त्रज्ञ नंदिनी हरिनाथ यांच्या कार्याचं महत्त्व आणि त्यांचं योगदान पाठ्यपुस्तकं, समाजमाध्यमं यांमधून सर्वांपर्यंत पोचत आहे, ही खूप दिलासा देणारी आणि हुरूप वाढवणारी गोष्ट आहे.
परंतु, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, वनस्पतीशास्त्र अशा मूलभूत विषयांत संशोधन करणाऱ्या कित्येक स्त्रियांना अजूनही त्यांच्या योगदानाची पावती मिळत नाही.
जरा विचार करा, आपण शेअर केलेल्या एखाद्या फोटोला लाईक्स मिळाले नाहीत तर आपण खट्टू होतो. अगदी रोजच्या जेवणात ‘आजची भाजी मस्त झाली आहे’ अशी साधी दाद मिळाली तरी स्वयंपाक करणाऱ्याला बरं वाटतं.
मग वर्षानुवर्षं एका ध्येयाने झपाटून, त्यासाठी अनेकदा सामाजिक चालीरीतींपेक्षा वेगळे पर्याय निवडून, एखाद्या वैज्ञानिक प्रश्नाच्या मुळापर्यंत पोचण्यासाठी बौद्धिक, शारीरिक, मानसिक क्षमता पणाला लावून संशोधक स्त्रिया काम करत असतात, तेव्हा त्यांच्या कामाची दखल न घेतली गेल्याने त्यांना काय वाटत असेल?
अनेक शास्त्रज्ञ स्त्रिया लिंगभेद, शिक्षणाच्या अपुऱ्या संधी, नोकरीच्या ठिकाणी पगारातील, हुद्द्यातील, विकासाच्या संधीमधील दुय्यम वागणूक, अशा अनेक पातळ्यांवरच्या विषमतेला सामोर्या जातात. त्यातून येणाऱ्या नैराश्यावर मात करत वर्षानुवर्षं शास्त्रज्ञ म्हणून काम करत राहतात. त्यांच्या कामाची नोंद घ्यायला नको का? किंबहुना त्याही पुढे जाऊन एक माणूस म्हणून, एक समाज म्हणून त्यांच्या या धडपडीमध्ये आपल्या परीने शक्य ते सहाय्य सर्वांनी करायला हवं, पण ते देखील होताना दिसत नाही.
आपल्या आसपासच्या अशा स्त्रियांच्या कामाबद्दल माहिती करून घेण्यापासून ते त्यांना त्यांच्या योगदानाबद्दल वैयक्तिक, संस्थात्मक, राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत मान्यता मिळणं, यासाठीचा सामूहिक सगजपणा आला तरच वैज्ञानिक स्त्रिया 'मॅटिल्डा इफेक्ट' चा बळी ठरण्यापासून वाचतील. अधिकाधिक स्त्रिया संशोधनाच्या नव्या, अनवट वाटा चालायचा प्रयत्न करतील.
संशोधन किंवा कोणत्याही क्षेत्रातील काहीही मूलभूत सिद्धांत मांडायचा असेल तर अभ्यास, वाचन, चिंतन, विचार यासाठी देखील मोठ्या प्रमाणात वेळ द्यावा लागतो. अशा कामात मेंदू, चित्त दीर्घकाळ गुंतवावं लागतं. नवीन संकल्पना मांडून त्या पडताळून पाहण्यासाठी प्रयोग करावे लागतात. अशावेळी अनेक गोष्टीत गुंतण्याचा मोह टाळावा लागतो. किंवा ज्या बाह्य गोष्टीत तुम्हाला गुंतवलं जातं त्यातून स्वतःची सुटका करून घ्यावी लागते. आजच्या आधुनिक काळातही पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये ही गोष्ट स्त्रीसाठी अजिबातच सोपी नाही. हे कटू सत्य जाणवल्यावर किंवा अशी कसरत जमेनाशी होऊ लागल्यावर अनेक स्त्रिया संशोधनकाम बंद करून इतर कामाकडे वळताना दिसतात. काही थोड्या जोमाने याला प्रतिकार करत टिकून राहतात. पण कित्येकदा त्यांची शक्ती, उमेदीची वर्षं त्यात खर्ची पडतात.
मध्यंतरी लेखक, अभिनेता मानव कौल याची एक मुलाखत ऐकण्यात आली. त्यातला काही भाग मला फार महत्त्वाचा वाटला. मानव कौल म्हणाले - “जगभरातील स्त्री लेखिकांचं साहित्य वाचल्यावर मला असं जाणवलं की माझी आई सुद्धा उत्तम गोष्टी सांगू शकते. ती तिच्या अनुभवाबद्दल, तिच्या जीवनाबद्दल, तिच्या कल्पकतेतून उत्तम लिहू शकते. पण मला मात्र ‘माँ के हाथ की दाल अच्छी लगती है’ असं म्हणण्याइतकीच आई दिसते, लक्षात राहते, याची मला खंत वाटते”.
हे विधान विचार करायला लावणारं आहे.
घर-स्वयंपाक-संसार-मुलं अशा लौकिकाच्या एकाच फुटपट्टीवर प्रत्येक स्त्रीचं मूल्यमापन करणं जोवर खुद्द एक स्त्री आणि इतरही समाज करणं थांबवणार नाही तोवर बुद्धीची क्षमता, शैक्षणिक पात्रता आणि विचारांची झेप असूनही अनेक स्त्रिया कोणत्याही क्षेत्रातील, कोणत्याही विषयातील मूलभूत मुद्दे मांडणारं, भरीव, भक्कम काम करू शकणार नाहीत.
या फूटपट्ट्या बदलण्यासाठी लागणारं धाडस आणि समज, उमज येण्यासाठी संशोधनक्षेत्रातलंच नव्हे तर इतरही विविध क्षेत्रातल्या स्त्रियांचं काम, त्यांचं योगदान समाजापुढे यायला हवं. त्यांच्या कामाला मान्यता मिळायला हवी, पावती मिळायला हवी.
आजपर्यंत जे घडून गेलं त्यात आता बदल करता येणार नाही. पण इथून पुढे तरी पुढे विचार करणाऱ्या, संशोधन कार्यातून शास्त्राच्या आणि समाजाच्या प्रगतीसाठी काम करणाऱ्या वैज्ञानिक संशोधक स्त्रियांची, त्यांच्या योगदानाची दखल घेणं, त्यांना त्यांच्या कामाचं श्रेय देणं, याचं प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. ‘मॅटिल्डा इफेक्ट’ हे शब्दच रद्दबातल ठरवण्यासाठी आपण सर्वांनीच झटायला हवं.
डॉ. आरती रानडे | aaratiranade@gmail.com
डॉ. आरती रानडे या स्टेम सेल्स आणि कॅन्सर या विषयांत पोस्ट-डॉक्टरेट असून वैज्ञानिक संशोधन क्षेत्रात काम करतात. त्याचबरोबर त्या विविध विषयांवर लेखनही करतात. त्यांना व्यायाम, रनिंग, सायकलींग, हायकिंगची देखील आवड आहे.