
वाचकप्रिय ज्येष्ठ लेखक निरंजन घाटे यांचं ‘वाचत सुटलो त्याची गोष्ट' हे वाचनचरित्र समकालीन प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. घाटे यांचं अफाट वाचनवेड या पुस्तकाने पहिल्यांदाच वाचकांसमोर आणलं आहे. त्या निमित्ताने घेतलेली ही मुलाखत.
निरंजन घाटे यांना वाचक सहसा विज्ञानलेखक म्हणून ओळखतात. अर्थात त्यांनी विज्ञानासह अनेक विषयांवर विपुल लेखन केलं आहे. गेली चार दशकं ते सातत्याने लिहीत आहेत. १८० हून अधिक पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत. पण लेखक असण्याबरोबरच त्यांची दुसरी महत्त्वाची ओळख म्हणजे ते गाढे वाचक आहेत. पुस्तकांच्या गोतावळ्यात ते रमतात. पुस्तकांनी त्यांचं अवघं जगणं व्यापून टाकलेलं आहे. त्यांच्या वाचनाला विषयांच्या मर्यादा नाहीत. साहसकथांपासून ते विज्ञानकथांपर्यंत, लैंगिक साहित्यापासून परामानसशास्त्रातील विविध शाखांपर्यंत आणि चरित्र-आत्मचरित्रांपासून शब्दकोशांपर्यंत अनेक प्रकारचं जागतिक वाङ्मय त्यांनी वाचून पालथं घातलं आहे. त्यांचा ग्रंथसंग्रहच दहा हजारांहून अधिक आहे. त्यावरून त्यांनी आजवर वाचलेल्या पुस्तकांचा आकडा किती असेल याची कल्पना करता येईल. त्यांच्या या ग्रंथवेडाचा प्रवास सांगणारं पुस्तक म्हणजे ‘वाचत सुटलो त्याची गोष्ट'.
सहसा लेखकमंडळी आत्मचरित्र लिहितात. वाचनचरित्र ही काय भानगड आहे? आत्मचरित्र न लिहिता वाचनचरित्र लिहावं असं तुम्हाला का वाटलं?
मी लेखक आहे हे खरंच. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे माझी १८० वगैरे पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. या पुस्तकांनी मला पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळवून दिली आहे हेही खरं; पण तरीही माझी स्वप्रतिमा वाचक अशीच आहे.याचं कारण मुळात मी लिहायला सुरुवात केली ती या वाचनामुळेच. आपण वाचलेलं इतरांना सांगायला हवं, या ऊर्मीतून लिखाण सुरू झालं. अगदी लेखक बनल्यावरही माझं वाचन थंडावलं नाही. उलट, लिखाणामुळे त्याला विशिष्ट दिशा मिळत गेली. हा वाचनप्रवास आपल्यासारख्या वाचकांना सांगायला हवा, या हेतूने मी हे पुस्तक लिहायला घेतलं.
वाचनातून आपल्याला जग कळतं. जगाकडे बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन कळतात. आपण समजतो तेच खरं, ही संकुचित समजूत दूर होऊ लागते. अनेकदा माझा अभ्यासविषय नसलेल्या एखाद्या भलत्याच क्षेत्रातल्या खाचाखोचा मी सांगू लागतो तेव्हा त्या विषयातले तज्ज्ञही चाट पडतात. ही आत्मप्रौढी नव्हे, तर केवळ वाचनामुळे तुमचा आवाका विस्तारू शकतो असं मला वाटतं. हा आनंद इतरांनाही घेता यावा असं मला वाटत होतं.
मला आत्मचरित्र लिहिणं मान्य नव्हतं. मी आत्मचरित्र लिहायला घेतलं असतं तरी त्यात पुस्तकांबद्दलच जास्त लिहिलं गेलं असतं. म्हणून हे वाचनचरित्र.
हा वाचनप्रवास कधी सुरू झाला?
मी आजवर पुष्कळ वाचू शकलो याचं कारण बहुतेक मी फार लवकर वाचायला सुरुवात केली यातच असावं. माझी आई सांगायची, अगदी पाचव्या वर्षीपासून मी वाचायला लागलो होतो. माझ्या आईलाही वाचनाची आवड होती. त्यामुळेच माझं वाचनवेड जोपासलं गेलं. लहानपणी घरची परिस्थिती फारशी बरी नव्हती. पुस्तकं विकत घ्यायला पैसे नसत; पण वाचनालयांमधल्या पुस्तकांचा फडशा पाडेपर्यंत मला त्याची फिकीर नव्हती. पाचवी ते सातवीच्या वयात मला बाबुराव अर्नाळकरांच्या पुस्तकांचं वेड लागलं. ती पुस्तकं मी वेड्यासारखी वाचत गेलो. पुढे वाचनवेडे मित्र मिळाल्यामुळे त्यांच्या घरातला इंग्रजी ग्रंथसंग्रहाचा खजिनाही माझ्यासमोर खुला झाला. मला आठवतंय, एकदा मी धनंजय डोळे या मित्राच्या घरी गेलो होतो. तो घरी नव्हता म्हणून त्याच्या खोलीत वाट पाहत बसलो. तिथे अर्न स्टॅन्ले गार्डनरचं एक पुस्तक दिसलं. मी ते ताबडतोब वाचायला सुरुवात केली. तेवढ्या वेळात त्याचा मोठा भाऊ बाबा दोन वेळा खोलीत डोकावून गेला. मला ते पुस्तक आवडल्याचं बघून त्याने गार्डनरची इतर पुस्तकंही मला दाखवली आणि हवं ते पुस्तक कधीही वाचायला घेऊन जा, असं सांगितलं. बाबा डोळेचा वैयक्तिक संग्रह, किताबमिनार ग्रंथालय आणि पुढे ब्रिटिश लायब्ररी, असा तिहेरी खजिना माझ्या हाती लागला. तेव्हापासून मी जो वाचत सुटलो तो सुटलोच.
शाळा-कॉलेजात असताना तुम्ही अभ्यास सांभाळून वाचत होतात हे ठीक; पण पुढे नोकरी-व्यवसाय सुरू झाल्यावर हे वाचनवेड आणखी वाढत गेलं. त्यासाठीचा वेळ तुम्हाला कसा मिळायचा?
या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी माझं शिक्षण आणि नोकऱ्यांबद्दल थोडं सांगतो. मी पुणे विद्यापीठातून भूशास्त्रात पदवी घेतली आणि तिथेच शिकवायला लागलो. तिथेही माझं काम आणि वाचन या दोनच गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या होत्या. पुढे एकदा कुठे तरी आकाशवाणीला लोक हवे असल्याची जाहिरात आली होती. काही मित्रांनी सुचवल्याप्रमाणे मी तिथे अर्ज केला. मुलाखतीसाठी निवडलेल्या पहिल्या दहा लोकांमध्ये मी होतो. बहुतेक मी कुठेही पोस्टिंग घ्यायला तयार असल्याचं सुचवल्यामुळे माझी निवड झाली आणि मी नागपूर आकाशवाणीमध्ये रुजू झालो. मिळेल त्या पुस्तकाचा फडशा पाडणं, एवढाच एकमेव छंद असल्यामुळे मला पुणं काय आणि नागपूर काय, दोन्ही सारखंच होतं.
काम संपलं की मी वाचत असायचो. माझ्या पिशवीत कायम एक पुस्तक असायचंच. कुठल्याही छोट्या-मोठ्या प्रवासात, बसस्टॉवर, कुणा मित्राची वाट बघत असताना, बस-रेल्वेच्या आरक्षण रांगेत, बँकेत किंवा कधीही अन् कुठेही थोडा वेळ मिळाला की आजूबाजूचं जग विसरून वाचायला सुरुवात करायचो. मला आठवतं, पुण्याच्या ब्रिटिश लायब्ररीमधल्या वसंत जोशी यांनी ओळख झाल्यावर मला विचारलं होतं, 'घाटे, फार पूर्वी जोशी-गोडबोल्यांच्या दुकानाबाहेर तुम्ही खुर्ची टाकून वाचत बसायचात का?' त्यांचं खरं होतं. कुठल्याही रांगेत थांबायचं म्हटलं की मी सोबत फोल्डिंगची खुर्ची अन् पुस्तक घेऊन जायचो आणि निवांत वाचत बसायचो.
ही माझी सवय आताआतापर्यंत कायम होती. आता तब्येतीच्या तक्रारींमुळे फारसं बाहेर पडणं होत नसल्यामुळे रांगेत उभं राहून वाचण्याचा प्रसंग सहसा येत नाही. पण तरीही बाहेर पडलोच, तर माझ्या पिशवीत पुस्तक असतं हे नक्की. थोडक्यात काय, तर दारुड्याला जसा दारू प्यायला वेळ मिळतो, तसा मला वाचायला वेळ मिळतो एवढं खरं.
एरवी वाचनाचा छंद असलेल्या बहुतेक व्यक्ती एक तर ललित वाचनात रमलेल्या दिसतात, किंवा अभ्यासक प्रकृतीच्या व्यक्ती आपापल्या विषयांमध्ये सखोल वाचन करत असतात. तुमच्या वाचनाला मात्र विषयांच्या मर्यादा नाहीत की फिक्शन-नॉन फिक्शनच्या. हे कसं काय?
बहुतेक या प्रश्नाचं उत्तर लहानपणीच्या दांडग्या वाचनभुकेत दडलेलं असणार असं वाटतं. त्या वेळी वाचनाची गोडी लागली होती, पण स्वतःची पुस्तकं खरेदी करणं शक्य नसायचं. त्यामुळे जे समोर येईल ते वाचायचं, असा माझा दंडक होता. अगदी लहानपणी तर दुकानातून रद्दीच्या ज्या कागदांमध्ये बांधून वस्तू घरी यायच्या, ते सुरकुतलेले कागदही मी वाचून काढायचो, म्हणजे बघा! मी वाचलेला नाही असा एकही कागद या घरात नसेल, असं आई थोडं वैतागाने आणि बरंचसं कौतुकाने म्हणायची. पुढे वाचनालयातही तीच सवय लागली. जी मिळतील ती पुस्तकं घरी आणायची आणि वाचून काढायची. त्यामुळे एरवी इतर चोखंदळ वाचकांसमोर कधीच न येणारे अनेक विषय मला लहानपणीच कळत गेले. मुख्य म्हणजे त्यातले अमुक विषय चांगले आणि तमुक वाईट, असे शिक्के माझ्या मनात कधीच तयार झाले नाहीत.
सुरुवातीला बाबुराव अर्नाळकरांमुळे माझा ओढा रहस्यकथांकडे होता. मग मराठी रहस्यकथांमधून इंग्रजीकडे वळलो. इंग्रजी रहस्यकथांच्या शोधात मी ब्रिटिश लायब्ररीत जाऊन पोहोचलो. तिथे ब्रिटिश लेखकांचं अद्भुत दालनच माझ्यासाठी खुलं झालं. त्या दालनाने मला इतरही अनेक विषयांची गोडी लावली. रहस्यकथांबरोबरच साहसकथा आणि युद्धकथांनीही मी झपाटलो गेलो. ब्रिटिश लायब्ररीतल्या एका पुस्तकातून इतर अनेक विषयांचे आणि त्या विषयांवरच्या पुस्तकांचे संदर्भ मिळायचे. मग ती पुस्तकं शोधायची, वाचायची, त्यातून पुन्हा पुढच्या पुस्तकांचे संदर्भ, असा न संपणारा सिलसिला सुरूच राहायचा. एकदा का विषयाची गोडी लागली की तो विषय माझा आहे की नाही वगैरे प्रश्न निकालात निघायचे.
'वाचत सुटलो त्याची गोष्ट'मध्ये दोन अतिशय वेगळ्या विषयांवरील पुस्तकांचे संदर्भ येतात. एक म्हणजे लैंगिक वाङ्मय आणि दुसरा विषय परामानसशास्त्र. लैंगिक वाङ्मय म्हणजे नेमकं काय? असं वाङ्मय आपल्याकडे आजही निषिद्ध मानलं जातं. तुम्ही तीस-चाळीस वर्षांपूर्वी तिकडे कसे वळलात?
लैंगिक वाङ्मय वाचणारे आणि त्यापेक्षा ते जाहीरपणे कबूल करणारे आजही आपल्याकडे फार थोडे सापडतात हे खरं आहे. माझ्या तरुणपणी तर हा विषय भलताच ‘टॅबू' होता. पण शृंगार हा मानवी भावनांचा मुख्य भाग असल्याने तो साहित्यात येणं स्वाभाविकच आहे, असं मला तेव्हाही वाटायचं. कॉलेजमध्ये मी बराचसा वेळ ग्रंथालयात पडीक असायचो. या ग्रंथालयाला अनेक पोटमाळे होते. तिथली कपाटं धुंडाळत असताना मला ‘वात्सायनाचे कामसूत्र'ची प्रत बघायला मिळाली. त्याच कपाटात ‘अनंगरंग रतिशास्त्र', कोका पंडिताचं ‘कोकशास्त्र' अशी पुस्तकं होती. मी त्या काळात संस्कृत वाचायलाही शिकत होतो. शिवाय या पुस्तकांमध्ये प्रत्येक संस्कृत श्लोकाखाली इंग्रजी अनुवाद दिलेला असायचा. वेदांपासून लोककलांपर्यंतचं शृंगारिक वाङ्मय मी त्या काळात वाचलं. पिवळ्या पानांवर छापलेलं छचोर साहित्यही माझ्या हातात पडलं, पण त्यात मी अडकून पडलो नाही. मला जास्त रस होता तो आपल्या पुराणात अन् इतिहासात, हा विषय किती मोकळेपणाने हाताळला गेलाय हे समजून घेण्यात. माझं तर म्हणणं आहे, की आपल्या वेदांचं वाचन केलं तर आजच्या संस्कृतिरक्षकांना फेफरं आल्याशिवाय राहणार नाही. लैंगिक वाङ्मयातला दुसरा प्रकार संशोधनात्मक पुस्तकांचा. लैंगिकतेचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणारी पुस्तकं, स्त्रियांच्या लैंगिकतेबद्दलच्या सर्वेक्षणात्मक किंवा अभ्यासात्मक पुस्तकांनी माझी या विषयातली समज बरीच वाढत गेली. ते विषय मराठी वाचकांपर्यंत पोहोचवायला हवेत, असं वाटल्यामुळे त्याबद्दल मी पुस्तकंही लिहिली आहेत.
आणि परामानसशास्त्र? तुमची ओळख खरं तर विज्ञानलेखक अशी. तरीही अध्यात्म, ज्योतिष, अतींद्रिय जाणिवा वगैरे विषयांकडे तुम्ही कसे वळलात?
गूढकथा आणि परामानसशास्त्र हे विषय तसे सीमारेषेवरचेच. गूढकथा वाचताना मला अशा अतींद्रिय विषयांबद्दलही कुतूहल निर्माण झालं. विशेषतः दिवाकर नेमाडे आणि नारायण धारप यांच्या कथांमुळे. शिवाय दुसरं कारण माझ्या लहानपणातल्या घटनांमध्ये असावं. मी लहान असताना माझ्या वडिलांचा खून झाला. त्यांच्यावर चाकूचे सोळा वार झाले होते. त्याही अवस्थेत ते गाडी चालवत हॉस्पिटलमध्ये गेले आणि शेवटपर्यंत आईला ‘तू काळजी करू नकोस' असं सांगत होते. त्यामुळे पुढे मी थोडा मोठा झाल्यावर कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्यांच्याशी संवाद साधावा आणि एवढं धैर्य त्यांच्यात कुठून आलं असं विचारावं असं वाटायचं. मृतात्म्यांशी संवाद साधण्याचे कोणते मार्ग असतात हे जाणून घेण्यासाठी मी अशा वाचनाकडे वळलो असणार. इंग्रजीत तर असं विपुल साहित्य उपलब्ध आहे.
एका अमेरिकी नियतकालिकात वाचलेली एक गोष्ट सांगतो. एका अभिनेत्रीवर एका अपघातानंतर शस्त्रक्रिया झाली. शुद्धीवर आल्यावर तिला असं जाणवलं, की आपण ही शस्त्रक्रिया छताजवळ तरंगत बघत होतो. तिने डॉक्टरांना हा अनुभव तर सांगितलाच, पण शस्त्रक्रियेचे बारकावे, कोणते डॉक्टर काय बोलत होते हेही तिला आठवत होतं. ते ऐकून डॉक्टरही चाट पडले. अशा अनेक कथा. त्या तुम्ही पुस्तकात वाचालच. पण सुरुवातीला या विषयावरील शक्य त्या सर्व पुस्तकांचा फडशा पाडल्यावर परामानसशास्त्राच्या शाखेमध्ये जगभरात जे प्रमाणित संशोधन चालू होतं ते समजून घेण्याकडे माझा कल वाढला. आहारी गेला नाहीत तर कोणताही विषय वाईट नसतो असं मला वाटतं. त्यामुळे विज्ञानलेखक असूनही असे विषय वाचण्यात काही गैर आहे असं मला वाटलं नाही. शिवाय काय बरोबर आणि काय चुकीचं हे कळण्यासाठीही वाचावं लागतंच की!
तुमच्या पुस्तकात एक प्रकरण आहे ते शब्दकोशांचं. शब्दकोशांचंही तुम्ही इतर साहित्यासारखं वाचन करता?
शब्दकोश हेही साहित्यच असतं असं मला खरोखर वाटतं. मी इंग्रजी वाचन करायला सुरुवात केली तेव्हा त्यातले अनेक शब्द अडायचे. शब्दकोश पाहिल्याशिवाय पर्याय नसायचा. पुन्हा ब्रिटिश इंग्रजी वेगळं आणि अमेरिकन इंग्रजी वेगळं. पुढे काही लेखकांचं इंग्रजी वाचताना माझ्या लक्षात आलं, की आपण वाचतोय त्या वेब्स्टर किंवा ऑक्सफर्ड डिक्शनऱ्याही पुऱ्या पडत नाहीयेत. मग फुटपाथवर मिळणाऱ्या विविध प्रकारच्या डिक्शनऱ्यांकडे माझं लक्ष वेधलं गेलं. पुढे पुढे एकेका विषयाला वाहिलेल्या डिक्शनऱ्या असतात हे मला कळलं. मग काय, मोठी खिडकीच खुली झाली या डिक्शनऱ्यांची नुसती नावं वाचूनही आपण चक्रावून जाऊ. डिक्शनरी ऑफ युफेमिझम अँड स्लँग, ट्रकर्स डिक्शनरी, अशा त्या त्या देशातल्या असभ्य भाषेतील शब्दांच्याही असंख्य डिक्शनऱ्या आहेत. त्याशिवाय प्रत्येक विद्याशाखेच्या डिक्शनऱ्या वेगळ्याच. याशिवाय डिक्शनरी ऑफ झेन बुद्धिझम, डिक्शनरी ऑफ फिलॉसॉफी, डिक्शनरी ऑफ बायबल, असे असंख्य प्रकार. एखादी डिक्शनरी उघडून ती चाळत बसलं तरी आपण अजब दुनियेत प्रवेश करतो. माहितीत केवढी तरी भर पडते.
शब्दकोशांमधलाच आणखी एक प्रकार म्हणजे लघुरूपं. प्रत्येक डिक्शनरीत शेवटी ॲब्रिव्हिएशन्स आणि ॲक्रोनिम्स दिलेली असतातच, पण काही खास ॲब्रिव्हिएशन्स आणि ॲक्रोनिम्सचेही शब्दकोश आहेत. ते वाचायलाही मला खूप आवडतं. आणखी एक इंटरेस्टिंग आणि उपयोगी शब्दकोश म्हणजे डिक्शनरी ऑफ बायोग्राफिकल टर्म्स. वेगवेगळ्या नावांचं मूळ आणि त्यांचे उच्चार या शब्दकोशात कळतात. अशी किती उदाहरणं देऊ? इंग्रजी आणि मराठीतले मिळून असे दोनेकशे कोश तर माझ्याकडेच असतील. माझ्या ग्रंथसंग्रहातला तो एक अतिशय मोलाचा ठेवा आहे.
वाईट याचं वाटतं, की मराठीत त्यामानाने असे शब्दकोश आणि ते वापरण्याची बुद्धी होणारेही खूपच कमी आहेत.
तुमच्या ग्रंथसंग्रहाचा उल्लेख केलात. तुमच्याकडे एकूण किती पुस्तकांचा संग्रह असेल? तुमचं एक घर बहुतेक पुस्तकांनीच भरलेलं आहे. हा संग्रह कसा आणि कधी सुरू झाला?
माझ्याकडच्या पुस्तकांचा अचूक आकडा मलाही सांगता येणार नाही. कारण मी ती कधीच मोजलेली नाहीत. तो हजारांमध्ये आहे एवढं नक्की. गेली जवळजवळ चाळीस वर्षं मला आवडलेली विविध विषयांवरची पुस्तकं मी मिळतील तिथून घेत आलो आहे. माझं एक छोटं घर फक्त पुस्तकांनीच भरलेलं आहे. शिवाय आजवर हजाराहून जास्त पुस्तकं मी विविध शाळांना आणि ग्रंथालयांना भेटही दिलेली आहेत. त्यामुळे ग्रंथसंग्रहाचा नेमका आकडा सांगणं अशक्य आहे.
माझा पुस्तकसंग्रह सुरू झाला तो पैसे कमावायला लागल्यावर. पुढे लेख लिहून थोडेफार पैसे मिळतात आणि त्यातून पुस्तकं घेता येतात हे माझ्या लक्षात आलं. माझ्या लिखाणामागची पहिली प्रेरणा बहुतेक हीच असणार. पुण्यातले जुन्या पुस्तकांचे विक्रेते, रद्दीची दुकानं आणि पुस्तक प्रदर्शनं हे माझे पुस्तकं विकत घेण्याचे मुख्य सोर्स. माझ्याकडच्या संग्रहातली बहुतेक पुस्तकं मी जुन्या पुस्तकविक्रेत्यांकडून घेतलेली आहेत. त्या काळी नवी पुस्तकं विकत घेणं परवडत नसे, हे त्यामागचं मुख्य कारण. पण दुसरीकडे या विक्रेत्यांकडे अशी काही झंगड पुस्तकं मिळत की ती सहसा नव्या पुस्तक दुकानात तुम्हाला दिसणारही नाहीत. मला वेगवेगळ्या विषयांची गोडी लावण्यात हे जुने पुस्तकविक्रेतेही कारणीभूत आहेत. आपल्याला हवं ते पुस्तक मिळवण्यासाठी किंवा एखादं दुर्मिळ पुस्तक त्यांच्याकडे आलेलं नाही ना यावर नजर ठेवण्यासाठी मी किती काळ या विक्रेत्यांकडे घालवला असेल ते माझं मला माहिती. पण त्यात वेगळीच झिंग असायची. जोगेश्वरीच्या बोळातले गिजरे, बाजीराव रोडवरचे वसंत आठवले, टिळक रोडवरचे काटकर, लक्ष्मी रोडवर बसणारा बाळू आणि त्याचा मावसभाऊ पोपट, फर्ग्युसन रोडवरच्या सोनवणे बाई अशा अनेक विक्रेत्यांकडून मला दुर्मिळ पुस्तकांचा बराच मौल्यवान खजिना मिळालेला आहे. माझ्या वाचनचरित्रात या अवलिया विक्रेत्यांना मोठं स्थान आहे, हे तुम्हाला पुस्तक वाचल्यावर कळेल. आज मला हवं असलेलं एखादं पुस्तक माझी मुलगा-मुलगी किंवा मित्रमंडळी मला चटकन अमेझॉनवरून वगैरे मागवून देतात. ही मोठी सोय झाली आहे, हे मी नाकारत नाही. पण विक्रेत्यांकडच्या पुस्तकांवर डोळा ठेवण्यासाठी घिरट्या घालत हवं ते पुस्तक इतर कुणाच्या हातात पडण्याआधी मिळवण्यातली मजा या घरपोच पुस्तकखरेदीत नाही, हे कुणीही मान्य करेल. शिवाय कमी पैशांत बरीच पुस्तकं खरेदी करता यायची, हा मुख्य फायदा वेगळाच.
तुमचं वाचन आणि लिखाण हातात हात घालून चालत आलं आहे. वेगवेगळ्या विषयांवरची तब्बल १८० हून अधिक पुस्तकं म्हणजे गेल्या चाळीस वर्षांत तुम्ही दरवर्षी किमान चार पुस्तकं लिहीत आलेले आहात. नोकरी- वाचन सांभाळून हा झपाटा कसा काय शक्य झाला?
आधी म्हटल्याप्रमाणे आपल्याला आवडलेलं इतरांना सांगायला हवं, ही त्यामागची मूळ प्रेरणा. सुरुवातीच्या काळात जेव्हा इंटरनेटचा वगैरे शोध लागायचा होता, तेव्हा माझ्या वाचनात येणारे अनेक विषय मराठी वाचकांपर्यंत पोहोचलेले नाहीत हे मला जाणवायचं. त्यामुळे त्याबद्दल लिहावंसं वाटायचं. मी असे विषय हाताळतो म्हटल्यावर प्रकाशक-संपादकांनीही माझ्याकडे मागणी करायला सुरुवात केली. पण लिखाणाचं मुख्य कारण म्हणाल तर वाचनाचा हँगओव्हर उतरवणं हेच!
-निरंजन घाटे
(निरंजन घाटे यांच्याशी वेळोवेळी झालेल्या गप्पा आणि त्यांचं पुस्तक यावरून ही मुलाखत तयार केली आहे.)
वाचत सुटलो त्याची गोष्ट
-निरंजन घाटे
समकालीन प्रकाशन
पानं : २४४ । किंमत : ३०० रु.
गौरी कानेटकर | gauri.uniqueportal@gmail.com
गौरी कानेटकर या युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाच्या संपादक आहेत. मितानिन फाउंडेशनच्या `सलाम पुणे` या उपक्रमाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. उपेक्षितांचं जगणं, त्यांचे प्रश्न आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती-संस्था समाजासमोर आणण्याची त्यांना कळकळ आहे.