
स्त्रियांना विनोदबुद्धी नसते असं मानत आलेल्या समाजाचे पूर्वग्रह दूर करत त्याला हसवायचं आव्हान स्वीकारलेल्या स्टँड अप कॉमेडीमधल्या तरुणींबद्दल.
खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे- मला माझ्या आजीने आणि तिला तिच्या आजीने सांगितली होती. एकदा एका राजाने हुकूम सोडला, सर्व मंत्र्यांनी, महत्त्वाच्या लोकांनी आपल्या मोठ्या मुलाला दरबारात घेऊन यावं. त्यानुसार सारे मंत्री आपापल्या घरातल्या मोठ्या मुलांना दरबारात घेऊन आले. विदूषकाला फक्त एक मुलगीच होती, त्यामुळे तो तिला घेऊन आला. राजादेखील त्याच्या मोठ्या मुलीला घेऊन आला होता. राजाने सगळ्यांचं आगतस्वागत केलं. त्यानंतर त्याने मुलांना समोर बसवलं आणि एकेकाला विचारायला सुरुवात केली, “तू मोठा झाल्यावर काय करणार आहेस?” बहुतांश मुलांनी ‘आपण वडिलांचाच वारसा पुढे चालवणार आहोत' असं उत्तर दिलं. राजकन्येनेही त्याच अर्थाचं उत्तर दिलं. विदूषकाची मुलगी अतिशय चतुर आणि हजरजबाबी होती. तिनेही तेच उत्तर जरा वेगळ्या पद्धतीने दिलं. ती हसत म्हणाली, “माझे वडील जसे सगळ्यांच्या चेहऱ्यांवर हसू फुलवतात, तसंच हास्य मला राणीसाहेबांच्या दरबारात फुलवायचं आहे.” असं म्हणतात, की नंतर ना त्या राजाने आपल्या मुलीला वारस बनवलं, ना विदूषकाची मुलगी हास्याचे मळे फुलवू शकली...
स्त्रीविदूषक असल्याची नोंद इतिहासात कुठेही मिळत नाही. केवळ आपल्या समाजातच नव्हे तर पाश्चात्त्य जगातदेखील एक खूप मोठा गैरसमज होता, आजही आहे, की स्त्रियांना विनोदबुद्धी नसते. या समजातूनच मग ऑस्कर वाइल्डसारखा लेखक त्याच्या एका नाटकात पात्राच्या तोंडी ‘नथिंग स्पॉइल्स अ रोमान्स सो मच ॲज अ सेन्स ऑफ ह्युमर इन द विमेन' असं वाक्य टाकतो. इतिहास बदलता येत नाही, पण इतिहास रचता मात्र येतो. कारण गेल्या काही शतकांपासून अनेक स्त्रिया लोकांना हसवत स्वतःचं हसं करून न घेता ‘स्टँडअप कॉमेडी' क्षेत्रातल्या करियरची नवीन दालनं उघडत आहेत.
लोकांच्या मनोरंजनासाठी वागण्यातल्या, स्वभावातल्या विसंगती, शारीरिक विक्षेप करून किस्से सांगत मनोरंजन करणं हे तर अगदी प्राचीन काळापासून होत असणार; पण या सगळ्यांकडे कायम पुरुषांची मक्तेदारी म्हणूनच बघितलं गेलं. किंबहुना, स्त्रियांना विनोद कळत नाही, त्यांची विनोदबुद्धी अगदी बेताची असते, हाच अनेक विनोदी किश्श्यांचा पाया असतो. नाटक-चित्रपटांतदेखील स्त्री विनोदी पात्र हे स्थूल नाही तर विसरभोळं, खूप किंवा विशिष्ट लहेजात बोलणारं अशाच पद्धतीचं दाखवलेलं असतं. एखादा नायक विनोदाची पखरण करत स्वतःचं नायकत्व दाखवतो, मात्र हे भाग्य नायिकांना कधी मिळत नाही. त्यामुळेच की काय, भारतात ज्या कार्यक्रमाने विनोदाला नवीन व्यासपीठ मिळवून दिलं त्या ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'च्या तब्बल चौथ्या पर्वात स्त्री विनोदकारांना स्थान मिळालं आणि भारती सिंग, सुगंधा मिश्रा यांनी त्या संधीचं सोनं केलं. २००८ला स्त्रियांसाठी उघडलेलं हे हास्यदालन आज जागोजागी हास्याचे मळे फुलवत आहे.
‘स्टँडअप कॉमेडी' हे सध्याचं मनोरंजन क्षेत्रातलं चलतीचं नाणं आहे. छोटे छोटे चुटकले सांगणं किंवा काल्पनिक पात्रं घेऊन एकपात्री प्रयोग करणं, असं याचं स्वरूप असतं. कोणतंही नेपथ्य, साथसंगत लागत नसल्याने हे कार्यक्रम कुठेही सादर करता येतात. हॉटेलच्या छोटेखानी हॉलमध्ये, बारमध्ये, छोट्या सभागृहात अशी कुठेही ही हास्यमैफल रंगू शकते. या कार्यक्रमांचा एक ठराविक असा साचा असतो. चार घटका निखळ मनोरंजन इतकाच त्याचा प्राथमिक हेतू असतो. कार्यक्रमांमध्ये येणारे विषय हे मुख्यतः तरुणाईच्या रोजच्या जगण्यातले असतात. हा ‘नव्या पिढीचा, नव्या पिढीने केलेला कार्यक्रम आहे' असं म्हटलं तर ते चूक ठरणार नाही. त्यामुळे यात भाषेपेक्षा आशयाला जास्त महत्त्व असतं. कमरेखालचे विनोद, १८वर्षांवरच्या लोकांसाठीचे शिव्यांनी भरलेले विनोद, प्रसंगी किंचित अश्लीलतेकडे झुकणारे, थोडे चावट म्हणता येतील असे विनोद इथे सर्रास बघायला-ऐकायला मिळतात. गंमत म्हणजे अनेकदा हेच विनोद जास्त चालतात. स्टँडअप कॉमेडी करणाऱ्या महिलासुद्धा यात कुठे मागे नाहीत. त्यांचं स्त्रीत्व या स्पर्धेत कधी अडथळा ठरत नाही. त्या सादरीकरणात अवघडलेपण येऊ देत नाहीत. मुख्य म्हणजे पुरुषही त्यांच्या विनोदांना तेवढ्याच मोकळेपणी दाद देताना दिसतात.
आदिती मित्तल हे विनोदकर्तींच्या या मांदियाळीतलं सध्याचं मानाचं नाव आहे. आदितीनेच स्टँडअप कॉमेडीमध्ये स्त्रियांना वाट मोकळी करून दिली असं म्हणावं लागेल. २००९सालापासून आदिती तिचे कार्यक्रम हिंदी-इंग्रजी भाषेत, भारतात आणि परदेशांतही करत आहे. मुळात हा तरुण पिढीचा आवडता प्रकार असल्यामुळे तो प्रामुख्याने हिंदी-इंग्रजीमध्येच सादर होत होता. मात्र, गेल्या काही वर्षांत, खासकरून कोरोना लॉकडाऊनपासून अनेक प्रादेशिक भाषांमधील मुली-महिलादेखील हिरीरीने या प्रकारात उतरू लागल्या आहेत. कनीज सुरका, नीती पल्टा या अशाच काही बिनीच्या सुभेदारिणी. २००८-०९नंतर अनेक मनोरंजन वाहिन्यांवर हास्याला वाहिलेले कार्यक्रम सुरू झाले. त्यामुळे या स्त्रिया घरोघरी पोहोचल्या. याच काळात स्मार्टफोनसुद्धा हातोहाती दिसायला लागल्यामुळे असे कार्यक्रम वेगाने लोकांपर्यंत पसरायला मदत झाली. कनीज सुरका या २००६ सालापासून सायरस भरुचा आणि कुणाल विजयकर यांच्यासोबत ‘द वीक दॅट वॉझन्ट' या कार्यक्रमासाठी लेखन करत होत्या. २०१३-१४ नंतर अचानक या क्षेत्रात येणाऱ्या मुलींची संख्या खूप वाढली. सुमुखी सुरेश, राधिका वाझ, मल्लिका दुवा, उरूज अशफाक, ऐश्वर्या मोहनराज, श्रीजा चतुर्वेदी, प्रशस्ती सिंग अशा अनेकजणी आज या क्षेत्रात यशस्वीपणे लोकांना हसवत आहेत.
स्टँडअप कॉमेडी क्षेत्रात येणाऱ्या स्त्रियांमध्ये प्रांत, धर्म, शैक्षणिक पार्श्वभूमी यांचं वैविध्य आहे. अनेकजणी इंजिनियरिंगचं शिक्षण घेऊन, काही वर्षं नोकरी करून मग या क्षेत्राकडे वळल्या आहेत, तर काहीजणी रेडिओ किंवा इतर मनोरंजन क्षेत्रात काम करून नंतर इकडे आल्या आहेत. मुळात या क्षेत्रात आधी स्वतःची ओळख तयार करणं आणि त्यानंतर ती यशस्वीपणे पुढे टिकवण्यासाठीचा संघर्ष मोठा आहे. त्यांच्या हातात माइक येतो तेव्हा त्या निखळ मनोरंजन करण्याच्या भूमिकेत जातात. मात्र, त्यांनी प्रेक्षकांना पहिला किस्सा सांगण्याच्या आधीपासूनच त्यांचा संघर्ष सुरू झालेला असतो- तो असतो स्वतःची स्त्री ही ओळख विसरायला लावून ‘केवळ एक मनोरंजनकार म्हणून माझ्याकडे बघा' हे सांगण्याचा. याचमुळे बहुतांश मुली स्टँडअप कॉमेडी करताना ढगळ टी शर्ट, पॅन्ट, कुर्ते घालतात. हा जगभरातील स्त्रियांना भेडसावणारा प्रश्न आहे. त्यामुळेच अनेकजणी यातून बाहेर पडण्यासाठी स्वतःच्या शरीरयष्टीवर स्वतःच विनोद करतात. केवळ हे दाखवण्यासाठी, की मी स्वतःला स्वीकारलं आहे, आणि आता तुम्ही ते केलंत तर तुम्ही निखळ मनोरंजन अनुभवू शकता. सुदैवाने या अशा कार्यक्रमांना येणारा प्रेक्षकवर्ग नवीन पिढीतला असल्यामुळे याचा सहज स्वीकार होतो. यातले व्हिडिओ यूट्युब, इन्स्टाग्रामसारख्या माध्यमांवर येतात तेव्हा मात्र यांना अनेक गलिच्छ प्रतिक्रियांशी सामना करावा लागतो. त्यात बॉडी शेमिंगपासून त्यांच्या विनोदांपर्यंत सगळ्याच गोष्टींची चुकीच्या पद्धतीने खिल्ली उडवली जाते. आपण सांगितलेल्या विनोदाने समोरचा काही काळ तरी त्याच्या आयुष्यातले प्रश्न-चिंता विसरतो. ही झिंग इतकी मोठी असते, की त्यामुळे या मुली अशा सगळ्या ट्रोल्सना मागे सारून आपलं काम प्रभावीपणे करत असतात.
विनोद हे फक्त ऐकणाऱ्यांसाठी नव्हे, तर तयार करणाऱ्यांसाठीदेखील औषध असतं. यातल्या अनेकींचं वैशिष्ट्य असंही सांगता येईल, की त्या एकमेकींकडे प्रतिस्पर्धी म्हणून न बघता सहकारी म्हणून बघतात. उदाहरण द्यायचंच झालं, तर सुमुखी सुरेशने ॲमेझॉन प्राइमसाठी तयार केलेल्या पुष्पवल्ली या मालिकेत उरूज अशफाक, सुमेरा शेख, श्रद्धा, श्रीजा चतुर्वेदी, निहारिका दत्त अशा अनेक सह-कॉमेडीकरांना अभिनयाची संधी दिली होती, तर आदिती मित्तलने घरकाम करणाऱ्या दीपिका म्हात्रे यांना तिच्या चॅनेलवरून स्टँडअप कॉमेडीची संधी दिली. तिच्या चॅनेलवर नेत्रहीन निधी गोयलनेही कॉमेडी सादर केली. हसवण्यासाठी वय, कार्यक्षेत्र, अंधत्व या कशाचाही अडसर येऊ शकत नाही हेच आदितीने यातून दाखवून दिलं.
स्टँडअप कॉमेडीचा एक शो साधारणपणे १० मिनिटं ते एक तास असा चालतो. यात कधी दोघं-तिघं एकत्र येऊन आपापले कार्यक्रम सादर करतात, पण मुळात हा असतो एकपात्री कार्यक्रमच. एखाद-दुसरी ऐन वेळी केलेली शाब्दिक कोटी, विनोद सोडला तर सादरकर्त्याने सगळे किस्से व्यवस्थित लिहून त्याचा सराव केलेला असतो. ऊरूज अशफाकचा ‘उबर ड्रायव्हर आणि आजी' हा व्हिडिओ एक कोटी ३० लाखांहून जास्त वेळा बघितला गेला आहे. या व्हिडिओत ती मुंबईतून नवी मुंबईत येतानाच्या एका उबर ड्रायव्हरचा अनुभव सांगते. त्यात मार्मिकपणे धर्म, धर्माकडे बघण्याचा दृष्टिकोन, मनातले किंतू हे सर्व विनोदात सांगत कोपरखळ्या मारते. भीती बाळगत जगण्यापेक्षा त्यातली विसंगती शोधत हसणं जास्त सोपं असतं. या किश्शांत तिने सांगितलेला अनुभव तिलाच काय, अनेकांना आलेला असतो. त्यामुळे प्रत्येकजण तो स्वतःशी ताडून त्याचा आणखी आनंद घेतो. साधीशी घटना सांगताना आपण त्यात समोरच्याला सामील कसं करून घेतो, त्या घटनेतलं नाट्य कसं उभं करू शकतो यात विनोदाचे खरे पंचेस लपलेले असतात. ऊरूज तिच्या नवी मुंबईत घर असण्यावर विनोद करते, जे मुंबईच्या उपनगरात राहणाऱ्या अनेकांना त्यांचेच वाटतात. तसंच सुमुखी तिच्या तमिळ भाषेतल्या काही संवादांनी तिची मातृभाषेशी असणारी नाळ अधोरेखित करते. आदिती मित्तल मुंबईय्या हिंदीत बोलून तिचं आपल्यातलं असणं दाखवून देते. प्रशस्ती सिंग अमेठीचे राजकीय दाखले देत हशा पिकवते, तर रूपाली त्यागी मुझफ्फरपूरमधले तिचे अनुभव सांगत नकळत इंडिया आणि भारताचं दर्शन घडवते.
यातल्या अनेकींनी नवीन तंत्रज्ञान, समाजमाध्यमं यांचा सुरेख वापर करून घेतला आहे. त्यांच्या साध्या-सोप्या, रोजच्या जगण्यातल्या विनोदांतून स्फूर्ती घेऊन प्रादेशिक भाषांमध्ये छोटे छोटे व्हिडिओ (रील्स) करून सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्या अनेकजणी आहेत. ‘अय्यो श्रद्धा' म्हणजे श्रद्धा जैन मराठी, कन्नड, हिंदी, इंग्रजी अशा चार भाषांमध्ये मजेशीर व्हिडिओ तयार करते. तिच्या व्हिडिओमधील आशय तर चांगला असतोच, पण बोलताना ती जो हेल पकडते ते बघून ती आपल्याच आजूबाजूची एखादी व्यक्ती आहे असं वाटतं. ॲन नावाची एक मल्याळम-हिंदी बोलणारी महिलाही भन्नाट रील्स टाकते. सोनू वेणुगोपाल ही उत्तर कर्नाटकातील कन्नड भाषेचा हेल वापरून खुसखुशीत रील्स तयार करते. तसंच आँटी या नावाने स्नेहल मेहरा हिंदीमध्ये धमाल उडवत असते. हे सगळे रील्स म्हणजे सरसकट स्टँडअप कॉमेडी म्हणता येणार नाहीत, कारण यांचा कालावधी पाच मिनिटांपेक्षाही कमी असतो. मात्र, ही स्टँडअप कॉमेडीची पहिली पायरी जरूर समजली जाऊ शकते. या रील्सचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यांचा प्रेक्षकवर्ग सगळ्याच वयोगटांतला असतो. त्यामुळे यात कमरेखालचे विनोद किंवा शिव्यांचा भडिमार क्वचितच असतो.
मराठी मुलीदेखील या प्रकारात बिलकूल मागे नाहीत. मुंबईत वावरल्यामुळे आदिती मित्तल आणि श्रद्धा, प्राजक्ता कोळी, उरूजच्या बोलण्यात मध्येच मराठी शब्द येतातच. पण संपूर्ण मराठीमध्ये स्टँडअप कॉमेडी करणाऱ्यासुद्धा अनेकजणी आहेत. सावनी वझे, श्रिया जोशी, मोक्षदा लोखंडे, सायली राऊत, हर्षदा पटवर्धन, दिव्या राऊत ही काही उदाहरणादाखल नावं. उत्कर्षा पाटीलचं वैशिष्ट्य म्हणजे ती खानदेशी बोलीत स्टँडअप कॉमेडी करते. हिंदी-इंग्रजीत सुरू झालेला हा प्रकार आता आपल्याकडेही चांगलाच रुजत आहे; मात्र, त्यातली मराठी भाषा ऐकताना जाणत्या लोकांना ‘दातांखाली खडे' आल्यासारखं वाटू शकतं, हा वैधानिक इशारा. अश्लीलता आणि चावटपणा यांत एक धूसर रेषा असते. ती रेषा ओलांडली गेली तर जाणीवपूर्वक त्या विनोदाला परत रेषेच्या या बाजूला आणणं, ऐकणाऱ्या व्यक्तीला अवघडलेपण येऊ न देणं हे उत्तम विनोदकाराचं लक्षण असतं. हिंदी-इंग्रजी स्टँडअप कॉमेडीमध्ये प्रत्येक वाक्यात जितक्या सहज जागोजागी शिव्या येतात, तशा शिव्या मराठीत दिल्या तर ते खूपच अनैसर्गिक वाटतं. प्रादेशिक भाषेत विनोद करताना इथल्या भाषेचा, इथल्या माणसांचा गंध त्याला आला पाहिजे. निव्वळ इतरांचं अनुकरण करून हा प्रकार रुजणार नाही.
विनोदनिर्मिती ही म्हटलं तर सोपी, म्हटलं तर अवघड गोष्ट आहे. निखळ विनोद हा केवळ स्वभाव आणि आचरणातल्या विसंगतीवर केला जातो. निरीक्षणातून उत्तम विनोद पेरला जात असतो. पण फक्त निरीक्षणं, शब्द हाताशी असले म्हणून विनोद उचलला जाईल असं नसतं. योग्य वेळी, योग्य शब्दांवर जोर देत, योग्य पद्धतीने विनोद सांगितला तरच तो ‘चालतो', अन्यथा ‘पडतो'. स्टँडअप कॉमेडी करणाऱ्यांच्या भाषेत सांगायचं झालं, तर ‘जोकचं लँडिंग बरोबर झालं तर इट किल्स, एल्स इट फ्लॉप्स.' आपल्याकडच्या निरनिराळ्या टीव्ही वाहिन्यांवरील हास्यस्पर्धांमध्ये गेल्या १० वर्षांत अनेकजणी उत्तम लँडिंग करत आलेल्या आहेत. नवीन मुली आल्या तरीही जुन्या अजूनही तगून आहेत. कनीज सुरकाने आदिती मित्तलवर केलेला ‘मी टू'चा एक आरोप सोडला तर या सगळ्याजणी त्यांच्या विनोदांमुळेच चर्चेत आहेत. इन्स्टाग्राम, टिक टॉक, यू ट्युब यांनी भौगोलिक अंतरं मिटवून टाकली आहेत. हाँगकाँगमधल्या ॲनचे रील्स महाराष्ट्रातल्या छोट्या गावांतही तेवढेच मजेशीर वाटतात. तसंच झरना गर्गचे अमेरिकेत राहणाऱ्या पण आतून-बाहेरून भारतीय असणाऱ्या आईचे व्हिडिओ जगभर पसरलेल्या भारतीयांना त्यांचेच वाटतात. तशाच धर्तीवर रूपालीचे मुझफ्फरपुरमधले अनुभव आता अमेरिकेत असणाऱ्या पण अशाच एखाद्या निमशहरी भागात वाढलेल्यांना जवळचे वाटतात.
पुरुष विनोद सांगायला उभा राहतो तेव्हा स्त्री हा त्याच्या विनोदाचा भाग असते, तसंच स्त्रियांच्या विनोदांमध्ये पुरुष डोकावतोच; आणि ते स्वाभाविकदेखील आहे. फरक इतकाच आहे, की अनेकदा स्पष्टपणे बोलता न येणाऱ्या अनेक गोष्टी इथे विनोदाच्या आवरणाखाली थेट सांगता येतात. याखेरीज मासिक पाळी हा तमाम स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषयदेखील अनेकजणी विनोदाची फोडणी देत उत्तम मांडतात. प्रेमप्रकरणं, आई-वडिलांशी असणारे संबंध यावरदेखील या कार्यक्रमांमधून भाष्य केलं जातं. स्त्रियांचं खरेदीचं वेड, त्यांना स्त्री म्हणून जागोजागी येणारे अनुभव, अनेक वेळा सामना करावा लागणारा भेदभाव हे सारं त्या विनोदांतून उत्तमरीत्या सादर करतात. गमतीचा भाग म्हणजे हे अनुभव स्त्रियांच्या विश्वातले असले तरी पुरुष प्रेक्षकांना ते उपरे वाटत नाहीत. या विनोदांवर तेदेखील तेवढेच, किंबहुना स्त्रियांपेक्षा जास्त खळखळून हसतात. कारण बऱ्याचदा हे सगळेच अनुभव त्यांच्यासाठी नवीन असतात. एकाच गोष्टीकडे बघण्याचा स्त्री-पुरुष विनोदवीरांचा दृष्टिकोन कसा वेगळा असतो याचं एक उदाहरण घ्यायचं झालं, तर पाळीत होणारा रक्तस्राव याचा संदर्भ घेऊन पुरुष विनोदकार केवळ विनोदनिर्मितीसाठी म्हणतो- स्त्रिया दर महिन्याला रक्त बघतात. त्यामुळे त्यांना युद्ध, त्यात होणारा रक्तपात यात काही नावीन्य वाटत नाही. त्याच वेळी स्त्री विनोदकार म्हणते- पुरुषांना असा दर महिन्याला रक्तस्राव होत असता तर त्यांनी आतापर्यंत पिरेड मंत्रालय उभं केलं असतं, पिरेड जयंत्या सुरू केल्या असत्या, रिलीफ फंड सुरू केले असते. एकाच प्रश्नाकडे वेगवेगळ्या चष्म्यांतून बघण्याचा प्रकार आहे.
एक ऐकीव किस्सा आहे. एकदा एका बागेत काही बायका जमल्या होत्या आणि त्या सगळ्या शांत होत्या. दररोज यांच्या गप्पा, हास्यविनोद ऐकून अनेकांना वाटायचं, इथे एखादा हास्यक्लब आहे की काय. कोणी तरी न राहवून विचारलंच, “आज तुम्ही कोणीच काही बोलत का नाही?” त्यावर उत्तर मिळालं, “रोज आमच्यातली कोणी तरी गैरहजर असतेच. आम्ही तिच्याबद्दल बोलून, उखाळ्यापाखाळ्या काढत असतो. आज सगळ्याचजणी आल्या आहेत, त्यामुळे कोणाबद्दल बोलावं असा प्रश्न आम्हाला पडला आहे!” त्यावर झटकन त्या प्रश्नकर्त्याने सांगितलं, “मग आजच्यापुरतं प्रत्येकीने आपापल्या नवऱ्याबद्दल बोलून घ्या की!” कोणत्याही सणा-समारंभात, स्वयंपाकघरात एकत्र आलेल्या बायकांचा एकेक किस्सा म्हणजे त्या-त्या घरातील त्या-त्या वेळची स्टँडअप कॉमेडीच असते. लोकलमधला लेडीज डबा म्हणजे तर विनोदांची खाण असते. असं म्हणतात, की अनेक व्हॉट्सॲप विनोदांचा जन्म तिथेच होतो. स्त्रियांची निरीक्षणशक्ती, इतरांबद्दलचं कुतूहल जबरदस्त असतं. त्यातूनच होणाऱ्या चौकश्या, तिरकस शेरेबाजी, टिप्पण्या यामुळे सगळं वातावरण हास्यरसात बुडून गेलेलं असतं. आईचा कधीही येणारा फोन, पाळीच्या दिवसांतला त्रास, लग्नातली गडबड, आधी लग्न आणि नंतर मुलांची होणारी चौकशी, लॉकडाऊनमधला अनुभव, ऑफिसमधले सहकारी, अंतर्वस्त्रांची खरेदी अशा अनेक टिपिकल बायकी विषयांवरचे स्त्रीविनोदवीरांच्या कार्यक्रमांमधले भाग बघितले, त्यात खळखळून हसणारे पुरुष पाहिले की जाणवतं, विनोदाला भाषा, लिंग, वय यांची कुंपणं घालता येत नाहीत, आणि घालूही नयेत. बत्तिशी दाखवत हसणं, ओठ जरासे हलवून स्मितहास्य करणं, गडगडाटी हास्य करत गडाबडा लोळणं, तोंडावरची रेषसुद्धा न हलवता हसणं, खिंकाळणं, हसता हसता ठसका लागणं, डोळ्यांतून पाणी येणं अशा नानाप्रकारे आपण विनोद अनुभवतो. हा अनुभव घेणं महत्त्वाचं असतं, तो देणारी व्यक्ती ‘तो' असो की ‘ती' याने काही फरक पडत नाही.
स्त्रियांवरील विनोदापासून सुरू झालेला स्टँडअप कॉमेडीचा प्रवास आता ‘स्त्रियांनी केलेले विनोद' इथवर येऊन पोहोचला आहे. हा प्रवास यशस्वी तर होणारच आहे. कारण स्त्रियांना बोलायला आवडतं, समोरच्याला सूचना द्यायला आवडतं. आणि त्यासाठी कोणी पैसे देणार असेल तर मग काय बोलायलाच नको. म्हणजे बोलायला हवंच!
मानसी होळेहोन्नूर | manasi.holehonnur@gmail.com
Manasi Holehonnur