आम्ही कोण?
ले 

संतांचे पुकार वांझ ठरले?

  • कृष्णात स्वाती
  • 01.04.26
  • वाचनवेळ 5 मि.
superstition and maharashtra

महाराष्ट्राला संतविचारांचा आणि समाजसुधारकांच्या कृतिशील प्रयत्नांचा समृद्ध वारसा आहे. अशा पुरोगामी महाराष्ट्रात अशोक खरातसारखा भोंदू आणि लिंगपिसाट बाबा कसा तयार झाला, असं आश्चर्याने विचारले जाऊ लागलं आहं. संत ज्ञानेश्वरांनी साडेसातशे वर्षांपूर्वी सांगून ठेवलं आहे,

योग याग विधी, येणे नोहे सिद्धी,
वायाचि उपाधी दंभ धर्म

तर तुकाराम महाराज म्हणतात,

ऐसें कैसे झाले भोंदू। कर्म करोनि म्हणती साधू।
अंगा लावूनिया राख। डोळे झाकुनी करिती पाप।
दाऊनी वैराग्याची कळा। भोगी विषयाचा सोहळा।
तुका म्हणे सांगो किती। जळो तयाची संगती।

भोंदूगिरीच्या विरोधात डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी अनेक संत मंडळी त्यानंतरही महाराष्ट्रात होऊन गेली. संत गाडगेबाबा तर नमस्कार करायला येणाऱ्याच्या पाठीत हातातील दंडुका घालून ‘मी कुणाचा गुरु नाही, माझा कुणी शिष्य नाही,’ असे ठासून सांगायचे. अशा या संतसुधारकांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात आजही सुशिक्षित लोक भोंदूबाबांच्या नादी लागतात, याचं आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. महाराष्ट्राची ही सामाजिक दुर्दशा पाहिली की ‘महाराष्ट्र पुरोगामी नाही. तो पुरोगामी होता. आता पुन्हा आपल्याला तो पुरोगामी बनवायचा आहे,’ हे कॉ. गोविंद पानसरे यांचं म्हणणं आठवतं.

हेही वाचा - जादूटोणा विरोधी कायदा – नियमांची प्रतीक्षा कधी संपणार?

खरातच्या लैंगिक दुष्कृत्यांची चर्चा होत आहे. पण तो करत असलेल्या इतर बुवाबाजीकडे अजूनही समाजाचं फारसं लक्ष गेलेलं नाही. मुळात गंभीर लैंगिक शोषण किंवा नरबळीसारखा अमानुष आणि अघोरी प्रकार समोर आल्याशिवाय आपलं समाजमन विचलित होत नाही ही खरी शोकांतिका आहे. खरातची त्याने पसरवलेली खरी ओळख ज्योतिषी म्हणून आहे. सत्ताधारी पक्षांमधले अनेक नेते खरातकडे आपलं भविष्य विचारायला जायचे, असं म्हणतात. याशिवाय करणी-भानामती काढण्यासाठी गंडेदोरे देणं, धनलक्ष्मी मिळवून देण्यासाठी विधी करणं, प्रश्न सोडवण्यासाठी रत्न म्हणून चिंचोके, साधे खडे देणे, संततीप्राप्तीसाठी योनिपूजा करणं (महिलेशी लैंगिक संबंध ठेवणे), कर्णपिशाच्च विधी करणं (भूताशी बोलणे), ब्रह्म-विष्णू-महेश यांची त्रयोपूजा करणं, लोकांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अनुभद्र पूजा करणं, गुन्हेगार पकडण्यासाठी पोलिसांना मदत करणं, निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी व धनप्राप्तीसाठी काळी विद्या करणं (त्यासाठी वन्यजीवांची तस्करी करणं), पुरुषांची लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी औषधी मध देणं (साधं जंगलातलं मध तुर्कीहून आणल्याचं सांगून लाखो रुपये किलो दराने विकणं) अशा अनेक गोष्टी तो करायचा. भक्तांना प्रभावित करण्यासाठी (खरंतर घाबरवण्यासाठी) तो रिमोटवर चालणारा खोटा २० फूटांचा नाग दाखवायचा.

या सगळ्याच गोष्टी अंधश्रद्धा आहेत. यातील अनेक गोष्टी राहणारे स्वतःला देवऋषी म्हणवून घेणारे गल्लीबोळातले अनेकजण करत असतात. आपल्यापैकी अनेकजण अशा भोंदूंकडे जातही असतात. खरंतर खरात प्रकरणावर आश्चर्य व्यक्त करणारं समाजमन एका अर्थाने दांभिक आहे. खरातने लैंगिक शोषणाची सीमा ओलांडल्यामुळे आज त्याच्याशी नाव जोडून घ्यायला लोक घाबरत आहेत; पण याच समाजातील हजारो लोकांनी, शेकडो राजकारण्यांनी धर्माच्या नावाने वाढलेली ही अंधश्रद्धा आणि त्याचसोबत लिंगपिसाट वृत्ती समाजात रुजू दिली आहे; नव्हे, वाढण्यासाठी तिला खतपाणी घातलं आहे.

आज महाराष्ट्रातील प्रत्येक चौकात, प्रत्येक वृत्तपत्रात, प्रत्येक वृत्तवाहिनीत अशोक खरातची आणि त्याच्या कृष्णकृत्यांची चर्चा होते आहे; पण त्याचवेळी लोकांच्या देव-धर्मभावनेचा गैरफायदा घेऊन लोकांची फसवणूक करणाऱ्या, शोषण करणाऱ्या गल्लीबोळांतून वाढणाऱ्या बांडगुळांकडे मात्र समाज सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे. अशोक खरात ही केवळ एक व्यक्ती नाही, तर ती एक प्रवृत्ती आहे—लोकांच्या देव-धर्मभावनेचा वापर करून त्यांचे आर्थिक, शारीरिक, मानसिक आणि लैंगिक शोषण करणारी संधिसाधू, गुन्हेगारी प्रवृत्ती! लोक आपल्या आयुष्यातील न सुटणारे किंवा सुटणार नाहीत असे वाटणारे प्रश्न घेऊन अशा भोंदूंकडे जातात. हे भोंदू त्यांच्याकडे असलेल्या तथाकथित दैवी शक्तीने आपले प्रश्न सोडवतील, असा भाबडा आशावाद या लोकांना असतो. श्रद्धेच्या क्षेत्रात अंधश्रद्धेचा काळाबाजार भरवून देवाधर्माच्या नावाने लोकांना लुबाडणारे अनेक भोंदू करोडो रुपयांची स्थावर, जंगम संपत्ती जमा करतात. यांनी दिखाव्यापुरत्या केलेल्या आरोग्य किंवा तथाकथित सामाजिक कामाकडे बोट दाखवत लोक या अवैध संपत्तीकडे कानाडोळा करतात. त्यांचे काही गंभीर कारनामे उघड झाल्यावर हाच समाज डोळे फाडून अविश्वासाने बघतो.

हेही वाचा - जादूटोणाविरोधी कायदा असूनही भोंदूगिरी का वाढतेय?

आपल्या समाजात कुटुंबातूनच रुजवलेला दैववाद आणि अवतारवाद आपल्याला या बुवाबाजीच्या दिशेने घेऊन जातो. आपल्या सोप्या-अवघड सर्व प्रश्नांची उत्तरे शोधून देणारा, त्यावर मार्ग सांगणारा, आपल्या मनातील अतृप्त इच्छा पूर्ण करणारा कुणीतरी अवतार आपल्या पाठीशी असणार, असा संस्कार बालपणापासून आपल्यावर होत असतो. अनिर्बंध वाढलेला सोशल मीडिया, त्यातील ‘स्टेटस’ नावाची भिंत आणि तथाकथित संस्कारासाठी तयार झालेले ग्रुप हे दैववादाचे वेगळेच संस्कार रुजवत असतात. सण-समारंभ साजरे करताना सर्वच धर्मांत वाढलेली टोकाची अस्मिता, कर्मकांडप्रियता आणि पुराणकथांचा उदोउदो, मनोरंजनाच्या नावाने दाखवल्या जाणाऱ्या पण प्रत्यक्षात अंधश्रद्धा वाढवणाऱ्या टीव्ही मालिका, आत्मिक शांतीच्या नावाने समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पसरलेले सर्वधर्मीय तथाकथित आध्यात्मिक संप्रदाय—या सगळ्यांमुळे या संस्काराला खतपाणी मिळतं.

खेळांतील देव मानल्या गेलेल्या व्यक्ती, अभिनय क्षेत्रातील बादशहा, विज्ञान क्षेत्रातील मान्यवर संशोधक, उच्च शिक्षण घेतलेले प्रशासक आणि देश चालवणारे राजकारणी जेव्हा अशा भोंदू बाबांच्या दरबारात हजेरी लावतात आणि त्यांच्या यशाचे श्रेय या दांभिकांना देतात, बुवाबाजीच्या विरोधात बातम्या देणारी वृत्तपत्रंसुद्धा आतील पानांवर न चुकता राशीभविष्याचा कॉलम देतात तेव्हा त्यांना आयडॉल मानणाऱ्या या समाजाने वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा, अशी अपेक्षा कशी ठेवायची? विज्ञानाच्या कोणत्याही आधारावर टिकणार नाहीत अशी फलज्योतिष, वास्तुशास्त्र, अंकशास्त्र यांसारखी थोतांडे एक प्रकारे राजाश्रयाने वाढवली जात असतील, तर समाजात कार्यकारणभाव आणि प्रयत्नवाद रुजणार कसा?

या सगळ्या निराशाजनक वातावरणातही सुरेश भट यांनी म्हटल्याप्रमाणे - ‘हे असे आहे तरीही हे असे असणार नाही,’ असा आशावाद घेऊन काम करण्याची गरज आहे. कुटुंबात पालकांनी, शाळा-महाविद्यालयांत शिक्षकांनी, माध्यमांत पत्रकारांनी, प्रशासनात अधिकाऱ्यांनी आणि राजकारणात कार्यकर्त्यांनी संविधानाने सांगितलेला वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ‘प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का आणि तसेच का?’ असं म्हणत संत समाजसुधारकांनी दाखवलेल्या सत्यशोधनाच्या वाटा पुन्हा नव्याने रुजवल्या पाहिजेत. तरच आजचा आक्रोश मगरीचे नक्राश्रू ठरणार नाही. त्यातून शोषणमुक्त समाजाची नवी पहाट उगवेल आणि संतांनी चिकित्सक आणि शोषणमुक्त समाजरचनेसाठी केलेले पुकार वांझ ठरणार नाहीत.

कृष्णात स्वाती | 8600230660 | krishnatswati@gmail.com







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 12

Dhaireshil 04.04.26
खूप छान लिहिलं आहे

लक्ष्मण मारुती देवकर03.04.26
श्रद्धा असावे. अंधश्रद्धा असू नये अंधश्रद्धेच्या नावाखाली गोरगरिबांना लुटत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने यावर काहीतरी उपाय करून कठोरात कठोर कारवाई करा वी

Sanjay Kadam01.04.26
लेख खूपच छान आणि अभ्यासपूर्ण आहे

सुहास शिगम01.04.26
समाजाची मानसिकता घडायची असेल तर वैज्ञानिक हृष्टीकोन व कार्यकारण भाव गरजेचा आहे .

Jivan kakde01.04.26
अंधभक्तांना जागृत करण्यासाठी छान प्रयत्न 📚📚📚

Dattatray Patil01.04.26
समाजातील वास्तव मांडण्याचा आपण केलेला प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे, कायद्याचा अंमल करणारे नेते जर या भोंदू बाबांच्या नादी लागत असेल तर कायद्याचा वापर कसा होणार ही शंकाच आहे, सारा देश अंधश्रद्धेच्या विळख्यात सापडलेला आहे कसा सोडवायचा मोठा प्रश्न आहे कारण कुंपणच शेत खात असल्यामुळे रखवाली तरी कशी करायची, एक सुंदर लेख आणि वास्तव वाचण्याचे समाधान मिळाले 🙏

नम्रता बेलेकर 01.04.26
अतिशय सुंदर लेख सर 👌🏻👌🏻

Rajendra Phegade01.04.26
गेल्या काही वर्षांत धर्म, राजकारण आणि त्याचबरोबर भांडवलशाही यांचे जे विषारी मिश्रण तयार झालेले आहे, सामाजिक, आर्थिक विषमता, अगतिकता प्रचंड वाढते आहे त्यातून सामान्य जनतेला अज्ञान, अंधश्रद्धा,शोषण, मानसिक गुलामी यांकडे हेतूपूर्वक ढकलले जात आहे. यातून फायदा उचलणारा हितसंबंधी वर्ग म्हणूनच जनतेला शहाणी करण्याच्या भानगडीत पडत नाही. सामान्य जनतेने विज्ञानवादी,विवेकवादी, चिकित्सक बनल्याशिवाय यातून सुटकेचा मार्ग नाही.

प्रकाश पंडीत पाटील01.04.26
आजची आणि भविष्यातील गंभीर समस्या म्हणजे शिक्षित आणि धनवान असणारेच या अंधश्रद्ध मार्गावर अधिक आहेत. आणि प्रमाणही वाढत आहे. अंधश्रद्धेच्या मार्गावरून एक बाजूला होतो आणि दहा त्या मार्गावर जाताना दिसतात. तरीपण अंधश्रद्धा निर्मूलन कार्याची चिकाटी सोडून चालणार नाही. अनेक भोंदूबाबांचे पितळ उघडे पडत आहे. त्यामुळे काहीजण सुधारतील अशी अपेक्षा आहे. शिक्षित स्त्रियांचे अंधश्रद्धधा,देवधर्म, बुवा महाराज....यांच्याकडील ओढा पहाता तळपायाची आग मस्तकात जाते... तरीपण अंधश्रद्धा निर्मूलनाची पणती तेवत ठेवावीच लागणार आहे... वेळ लागेल पण यश येईलच

शिवाजी सावंत 01.04.26
वास्तव चित्रण

Bhau Kamble01.04.26
खूपच माहितीपूर्ण आणि उपयुक्त लेख.

Jagdish Kabre01.04.26
अत्यंत पोटतिडकिने लिहिलेले आहे. पण हे अंधभक्तांना केव्हा कळणार? माझ्या मते जी माणसे स्वतःशीसुद्धा प्रामाणिक नसतात त्यांनाच भोंदू बाबांची गरज लागते.

See More
gangotree homes advertisement

Select search criteria first for better results