९ मार्च ते ३० मार्च २०१२ दरम्यान बारा आशियाई देशांच्या पुढाकाराने शांततापूर्ण मार्गाने पॅलेस्टाइनची मुक्ती साधावी, असा संदेश सर्वदूर पोहोचवण्यासाठी एक दीर्घ अशी शांति-यात्रा काढण्यात आली होती- ‘ग्लोबल मार्च टु जेरुसलेम'. ९ मार्च रोजी दिल्लीहून निघून पाकिस्तान, इराण, तुर्कस्तान अशा आशियाई व मध्यपूर्वेच्या देशांतील विविध शहरांना व नगरांना भेट देत देत बसमार्गे सुमारे दहा हजार किलोमीटर्सचा प्रवास साधत ही यात्रा इस्तंबुलला पोहोचली, व नंतर जहाजाने लेबनॉनची राजधानी बैरूत इथे थडकल्यावर हा काफिला लेबनॉन-इस्राइल सीमेवरील ‘अल्तकिफ कॅसल' या ठिकाणी ३० मार्च रोजी पोहोचला व तेथील जागतिक मेळाव्यात सहभागी झाला.
इस्राइल-पॅलेस्टाइन यामधील सहा दशकांहून अधिक काळ प्रलंबित राहिलेल्या समस्येवर शांतिपूर्ण तोडगा काढावा, ही आशियाई जनांची मागणी होती. त्याचप्रमाणे, इस्राइलने बळकावलेल्या पूर्व जेरुसलेमची शांतिपूर्ण मार्गाने मुक्ती साधावी आणि निधर्मी पॅलेस्टाइन राज्याची स्थापना करून पॅलेस्टिनी जनतेवरील अन्यायाचा अंत करावा, यासाठी आशियाई जनांनी एकत्रित प्रयत्न करावे, असा संदेश सर्वदूर पोहोचवावा, हा या यात्रेचा प्रमुख उद्देश होता. आंतरराष्ट्रीय इतिहासात प्रथमच पॅलेस्टिनीमुक्तीसाठी आशियाई जनांनी अशा चळवळीद्वारे पुढाकार घेतला होता हे विशेष महत्त्वाचं.
या शांतियात्रेत एक मुक्त पत्रकार, लघुपटकार आणि ‘जन-आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय' (एनएपीएम) या मेधा पाटकर यांच्या पुढाकाराखालील संघटनेचा पाईक या नात्यानेही मी या यात्रेत सहभागी झालो होतो. भारत, अफगाणिस्तान, पाकिस्तान, इराण, इराक, तुर्कस्तान, ताजिकिस्तान, अझरबैजान, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाइन्स आणि लेबनॉनमधील स्वयंसेवी संघटनांचे सभासद व नागरी समाजाचे घटक या यात्रेत सहभागी झाले होते. दिल्ली, अमृतसर, वाघा सीमारेषेमार्गे लाहोर, मुलतान, कराची (पाकिस्तान), कोम, तेहरान, झानझन, तबरिझ, बजरगाव (इराण), इद्गीर, इरझुरूम, अंकारा, इस्तंबुल, कोन्या, तुशुजा (तुर्कस्तान) असा मजल-दरमजल प्रवास करताना ठिकठिकाणी नागरी समाजाच्या सदस्यांशी संवाद साधत हा काफिला पुढे पुढे जात राहिला, विविध ठिकाणचे प्रतिनिधी त्यात सामील होत गेले आणि ‘यात्रेकरूं'ची संख्या वाढत गेली. अखेरीस दीडशेजणांचा हा कारवाँ विविध अडचणींना तोंड देत आपल्या गन्तव्यस्थानी पोहोचला.
हेही वाचा - इराण जनतेचं कधी ऐकणार?
साहजिकच हा अनुभव आगळा होता. एका सामायिक उद्देशासाठी एकत्र आलेल्या विविध आशियाई देशांतील तरुण व प्रौढ जनांशी भाषेचे व जीवनशैलीच्या भिन्नतेचे अडसर दूर करीत संवाद साधणं, हा अभूतपूर्व अनुभव होताच; परंतु त्याचसोबत आपल्या देशातील काश्मीर ते केरळपर्यंतच्या विविध प्रांतांच्या भिन्न दृष्टिकोनांच्या (माझ्यासह एकूण ३७) आणि पूर्णत: अपरिचित अशा सदस्यांशी एक दुवा साधणं हासुद्धा एक जटिल अनुभव होता. काफिल्यातील अशा विविधढंगी सहभागी सदस्यांसोबत आणि त्याचप्रमाणे विशेषकरून इराणमधील फारसी भाषक, तुर्कस्तानमधील टर्किश भाषक, लेबनॉन व पॅलेस्टाइनचे अरबी भाषक अशा सामान्यजनांशी संवाद साधणं; संवादासाठी व संवादाद्वारे त्यांची जीवनशैली व मानसिकता जाणून घेणं, हासुद्धा एक समृद्ध करणारा व अविस्मरणीय असा अनुभव होता. आपल्या सांस्कृतिक व राजकीय धारणा बाजूला ठेवून खुल्या मनाने त्यांची जीवनदृष्टी, जीवनमूल्यं आणि राजकीय दृष्टिकोन जाणून घेणं म्हणजेसुद्धा स्वत:च्या उदारमतवादी दृष्टिकोनाची कसोटीच ठरत होती.
या सर्व अनुभवांमध्ये वाचकांना सहभागी करून घ्यावं, या उद्देशाने इथे काही क्षणचित्रं, काही स्फुट विचार, काही निवडक प्रसंगांचं अनुभवकथन व काही व्यक्तिविशेष असा काहीसा संमिश्र प्रकार मी साधू पाहत आहे. व्हिसा व अन्य काही अडचणींमुळे महाराष्ट्रातील माझ्यासह पाच प्रतिनिधी या यात्रेत तेहरान इथे सहभागी झाले. त्यामुळे सुरुवात तिथूनच.
१६ मार्च २०१२ : तेहरान, इराण
सकाळी ११.३० वाजता मुंबईहून निघालेलं आमचं विमान भारतीय वेळेनुसार तिथे दुपारी ३.३० ला पोहोचलं; परंतु तेहरानची ‘घड्याळं' तीन तास पुढे असल्याने तिथे संध्याकाळचे ६.३० वाजले होते. अंधारून आलं होतं. स्थानिक तरुण आयोजकांनी आमचं स्वागत करून लगबगीने आम्हाला एका गाडीत बसवलं व एका तासात तेथील अयातोल्ला खोमेनी यांच्या स्मारकाच्या प्रशस्त प्रांगणात नेऊन सोडलं. दिल्लीहून मजल-दरमजल करीत निघालेल्या कारवाँशी आमची भेट इथेच होणार होती, परंतु नंतर असं समजलं, की बस रात्री उशिरा कधी तरी पोहोचेल. म्हणजे तिथेच ताटकळत बसण्याशिवाय पर्याय नव्हता.
काही वेळाने मधुमेही असलेल्या माझ्या ध्यानात आलं, की इन्शुलिन घ्यायचं तर खाण्याची काही सोय व्हायला हवी. परंतु, एक तर आजूबाजूला काही हॉटेल असण्याची शक्यता नव्हती आणि दुसरं म्हणजे आमच्याकडे खर्चासाठी इराणच्या ‘रियाल'ची एक नोटही नव्हती. माझं त्याबाबत सहकाऱ्यांशी बोलणं चालू होतं, तेव्हा लक्षात आलं, की बराच वेळ एक व्यक्ती तिथे बाजूलाच उभी होती. गौर, लालसर वर्ण, अंगाने धष्टपुष्ट, उंचीने साधारण, वयाने पन्नाशीची. बाजूलाच शांतपणे उभ्या असलेल्या त्या व्यक्तीचं आमच्याकडे लक्ष असल्याचं तेव्हाच जाणवलं. बहुधा माझी अस्वस्थता जाणवूनच त्या व्यक्तीने तोडक्या-मोडक्या इंग्रजीत मला विचारलं-
“डायबेतिझ प्रॉब्लेम?”
“यस. इज देअर एनी हॉटेल हिअर?”
“‘ओ... यस... यस... कम कम, आय विल तेक यू तु कॅन्तीन... आर यू फ्रॉम इंदिया?”
“यस. युवरसेल्फ?”
“फ्रॉम इस्तंबुल... तुर्की. यू हॅव कम फॉर...?”
असं त्याने विचारताच माझ्या एक सहकाऱ्याने ‘हा कुणी खबरी तर नाही ना' असं सुचवणारी नजर मला दिली.
परंतु मी बेधडकपणे त्या व्यक्तीला सांगितलं,“ग्लोबल मार्च टु जेरुसलेम.”
“ओ... ग्रेत!...” असं म्हणत त्याने माझ्याशी हस्तांदोलन केलं. “आय ॲम आल्सो फॉर ग्लोबल मार्च. यू वेतिंग फॉर द कॅराव्हान?”
“यस.”
“ओके. लेत्स गो तु कॅन्तीन... यू विल गेत बिस्कित्स... अँद चाय .. ती, तीऽऽऽ.”
“फाइन. बट वी डोन्ट हॅव ‘रियाल्स' ... कॅन वी गेट सम डॉलर्स ऑर रुपीज चेन्ज्ड हिअर?”
“ओऽऽ नो... नो. दोन्त वरी... नो नीद... यू आर माय गेस्त.”
दिलदारी त्याच्या स्वभावातच होती. त्यानं सर्वांना एका साध्याशा कँटीनमध्ये दालचिनी चहा पाजला; परंतु तो बिनदुधाचा व कडक असल्यानं काहींनी तोंडं वाकडी केल्यावर त्यानं कुठून तरी क्रीमर मिळवलं आणि पुन्हा चहा पाजला. आग्रहपूर्वक खास बिस्किटं आणि केक देऊ केले. ते खाल्ल्यावर बेकरी उत्पादनांबाबत आपल्याला इराणमध्ये चैन अनुभवायला मिळणार असल्याचे संकेत मला मिळाले.
हेही वाचा - गॅसच्या तुटवड्यामुळे मेसचालक, विद्यार्थी, नागरिक सारेच हवालदिल
त्या व्यक्तीचं नाव होतं ‘अनस'. तुर्कस्तानमधील इस्तंबुल या ऐतिहासिक शहराचा तो रहिवासी होता. तुर्कस्तानमधील यात्राप्रवासाच्या व्यवस्थेची सूत्रं तोच सांभाळणार होता. आता इथे पूर्वतयारीसाठी आला होता. मातृभाषा टर्किश, पण इराणवासीयांशी संवाद जमून जाण्याइतपत फारसीही त्याला येत होतं. त्यामुळे त्या ठिकाणी उपऱ्यासारखं ताटकळत उभं असणाऱ्या आम्हाला त्याचा मोठा आधारच वाटला. वास्तविक आमची बस नंतर मध्यरात्री १.३० वाजता आली आणि तेव्हाच खाणं मिळालं. दरम्यान त्याने ‘कॅन्तीन'मध्ये व्यवस्था केली नसती तर माझ्यासारख्या मधुमेही व्यक्तीचं काय झालं असतं काय माहीत! इथंच नाही, तर नंतरच्या प्रवासातही त्याने अनेक प्रकारे सहकार्य केलं आणि तो माझा चांगला मित्रच झाला.
आम्हा भारतीयांपैकी कुणाचीच प्रादेशिक वा हिंदी भाषा त्याला माहीत नव्हती, तरी केवळ देहबोलीवरून दुसऱ्याच्या मनातल्या गोष्टीचा अचूक अंदाज घेण्याची त्याची क्षमता अफाट होती, म्हणजे संवाद साधण्यासाठी मुळात भाषेची त्याला आवश्यकता पडत नव्हती. पुढील प्रवासात त्याच्या व्यक्तित्वाचे अनेक पैलू हळूहळू उलगडत गेले. १९२३ मध्ये तुर्कस्तानला निधर्मी प्रजासत्ताकाचं स्वरूप देणाऱ्या आणि तडकाफडकी इस्लाम धर्मातील बंधनं रद्दबातल ठरवू पाहणाऱ्या केमाल पाशा ऊर्फ अतातुर्क या ‘यंग टर्क' राष्ट्रवादी नेत्याबाबत मला अप्रूप होतं. एकदा त्याच्याबाबत विचारल्यावर त्याने स्पष्टच सांगितलं, “अफ कोर्स, आय ॲम अगेन्स्त हिम.” त्याबाबत कुठे तरी भाषण दिल्याबद्दल त्यानं तुरुंगवासही भोगलेला होता. सेक्युलर असण्याबाबत त्याला गैर वाटत नव्हतं, परंतु सुन्नी असलेल्या ‘अनस'ला इस्लाम मोडीत काढणं चुकीचं वाटत होतं. अमेरिकन साम्राज्यवाद, झायोनिझम आणि पॅलेस्टिनींवरील अन्याय याबाबतच्या त्याच्या भावना तीव्र होत्या.
परंतु काही असलं तरी राजकीय विचारांबाबत चर्चा करण्याच्या फंदात पडण्याचा त्याचा पिंड नव्हता, आणि खरं तर त्याच्याशी नातं जोडताना मलाही त्यात तथ्य वाटत नव्हतं. तो रंगमंचावर अभिनय करणारा कसदार अभिनेता होता आणि काही चित्रपटांमधून त्यानं लहान-मोठ्या भूमिकाही केल्या होत्या, परंतु त्याबाबतही त्यानं कधी फार गप्पा केल्या नाहीत. आत्मीयतेचा सतत वाहणारा झरा आणि दिलदारी हे गुण त्याच्याशी मैत्र जमण्याकरिता पुरेसे ठरले.
काही तरी नाट्यमय काल्पनिक संवाद रचून वातावरण हलकंफुलकं ठेवणारा आमचा एक चार-पाच जणांचा गटच निर्माण झाला होता. आमचा एक काश्मिरी सहकारी परवेझही तसा नाट्यमयतेत मजा घेणारा होता. इराणमधील चौथा दिवस असेल. मी त्याची अनसशी प्रथमच ओळख करून दिली, तेव्हा तो परवेझला सहज म्हणाला, “आय थिंक, आय हॅव सीन यू समव्हेअर.” परवेझ मस्करीत म्हणाला, “प्रॉबॅबली इन अवर तिहार जेल!” बस, जमलं!
अनस अभिनयगुणांचं दर्शन घडवत चेहऱ्यावरील शांत भाव कायम ठेवत म्हणाला,
“यस, यस.. आय रिमेम्बर... सो, व्हॉट डू यू डू नाऊ?”
“चिकन लिफ्टिंग!” परवेझने नाटक पुढे नेलं.
“इज इट? ग्रेट कोइन्सिडन्स.. आय डील इन सेम बिझनेस इन इस्तंबुल.” हे ऐकून बाजूला उभ्या असलेल्या एका इराणी मुलालाही त्या नाटकात भाग घेण्यावाचून राहवलं नाही.
“अँड ... ही इज ‘दि डॉन' इन दॅट बिझनेस.” तो म्हणाला.
“लेट अस फॉर्म एशियन असोसिएशन ऑफ चिकन लिफ्टर्स नाऊ!” परवेझ म्हणाला.
“यस, यस. बट मिलिंद शुड बी द सेक्रेटरी... माय कंडिशन.” अनस म्हणाला.
“माय प्लेजर, सर!” मी म्हटलं.
“ओ मिलनजी, आप भी इस फील्डमें हैं? (‘अनस'कडे वळून) दिस इज द थिंग.. वी काश्मिरी नेव्हर नो व्हॉट हॅपन्स इन इंडिया!”
सर्वजण खळखळून हसले. चार दिवसांपूर्वी परस्परांना पूर्णत: अपरिचित असलेल्या व्यक्ती पूर्णत: कल्पनेनं काही खेळकर प्रसंग निर्माण करू शकतात, ही गोष्टच मला मोठी वाटत होती. आशियाई जनतेच्या मानसिकतेत, संस्कृतीत साधर्म्य दर्शवणाऱ्या अनेक ज्ञात-अज्ञात सामायिक गोष्टी आहेत. त्याच बळावर आपण केलेली गम्मत अन्य देशातील व्यक्ती योग्य प्रकारे समजू शकेल, हा विश्वास अशा प्रसंगांतून ध्वनित होत होता. एखाद्या ‘पाश्चात्त्या'सोबत असं स्वातंत्र्य त्यांनी खचितच घेतलं असतं. ‘वन एशिया, युनायटेड एशिया' या घोषणेला कमालीचा प्रतिसाद उगाचच मिळत नव्हता!
१७ मार्च, आझादी स्क्वेअर, तेहरान
सकाळची वेळ. कोवळी उन्हं. स्वच्छ हवा. बसमधून जाताना अंतरावरूनच ‘आझादी स्क्वेअर'च्या सुमारे दीडशे फूट उंच, भव्य अशा संगमरवरी मनोऱ्यानं लक्ष वेधलं होतं. त्या चौकाच्या विस्तीर्ण प्रांगणात काफिल्याच्या बसेस थांबल्या. उतरल्या उतरल्याच इराणच्या जोशिल्या युवा-समूहानं दणदणीत घोषणा द्यायला सुरुवात केली-
“बीदम, बेरुह, नस्तिकिया अल कुद्स!”
(अर्थात, अखेरच्या श्वासापर्यंत प्राणपणाने जेरुसलेमच्या मुक्तीकरिता समर्पित राहीन.)
यासारख्या पोटातून ‘ह'कार काढल्यागत उच्चार करीत दिलेल्या इराणी युवाजनांच्या घोषणा सपूर्ण आशियाई कारवाँमध्ये चैतन्य निर्माण करणाऱ्या ठरत होत्या.
हेही वाचा - दोन हुकूमशहांनी मिळून तिसऱ्या हुकूमशहाला संपवलं
‘आझादी स्क्वेअर'चं खरं नाव होतं ‘शहायात स्क्वेअर'. इराणच्या शहाच्या काळात शहा राजघराण्याची शान दर्शवणारी वास्तू म्हणून १९७१मध्ये हा मनोरा बांधला गेला होता. १९७९मध्ये जी खोमेनीप्रणीत इस्लामी क्रांती झाली त्यासाठीची अनेक मोठी निदर्शनं इथेच झाली होती. १९७९मध्ये खोमेनीप्रणीत क्रांती यशस्वी झाल्यावर त्याच्या स्मरणार्थ या चौकाचं ‘आझादी स्क्वेअर' असं नामकरण केलं गेलं.
मनात आलं, भारतात खोमेनी हा ‘फतवे ‘काढणारा, मूलतत्त्ववादी, क्रूरकर्मा म्हणून मानला जातो; सलमान रश्दीसारख्या लेखकाच्या मृत्यूसाठी फर्मान काढून अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी करणारा मानला जातो. इराणी जनतेच्या मनात मात्र त्याचं आगळंच स्थान आहे. अमेरिकाधार्जिण्या ऐय्याश शहाला पायउतार करायला लावून इस्लामी प्रजासत्ताकाची स्थापना करणारा, ‘सादगी'चा पुरस्कार करणारा शियापंथीय महान नेता म्हणून ते त्याच्याकडे पाहतात. १९७९च्या क्रांतीनंतर वर्षभरातच इराकने इराणबरोबर युद्ध पुकारलं. आठ वर्षं हे युद्ध चाललं. खोमेनीच्या नेतृत्वाखाली इराणने समर्थतेने त्याचा मुकाबला केला. त्याचप्रमाणे, अमेरिकन साम्राज्यवादापुढेही कधी मान तुकवली नाही. याचं सर्व श्रेय इराणी जन खोमेनीला देतात. स्त्रियांवर अनेक बंधनं टाकली, तरी तेथील सुशिक्षित स्त्रिया म्हणतात, ती आवश्यकच होती. तेथील स्त्रियांनी चळवळी केल्यावर कालांतराने ती बंधनं सैल केली गेली आहेत, याकडेही त्या लक्ष वेधतात.
‘आझादी स्क्वेअर' बरेच प्रश्न मनात उभे करीत होता. स्वातंत्र्याचा अर्थ कुणासाठी कसा असू शकतो काय माहीत! अमेरिकन संस्कृतीला दरवाजे खुले करणाऱ्या शहापासून, अमेरिकी वर्चस्वापासून इराणला मुक्त करण्यासाठी पुकारलेली क्रांती ही त्यांच्यासाठी स्वातंत्र्याची ललकार ठरत होती. त्याच चौकात आज ज्यू झायोनिस्टांच्या वर्चस्वापासून पॅलेस्टिनींची मुक्ती साधण्याच्या गर्जना होत होत्या. त्याचप्रमाणं, तिथेच आज पॅलेस्टाइनमधील अल्पसंख्याकांसह निधर्मी राज्याची स्थापना हवी, असं आजची तरुण पिढी नि:शंकपणे म्हणत होती. शिया इस्लामी क्रांतीचा वणवा इतरत्र पसरू नये म्हणून कित्येक वर्षं अमेरिका, इस्राइल व आजूबाजूची सुन्नी राष्ट्रं धसका घेऊन आहेत. तरीही पॅलेस्टाइनच्या मुक्तीमध्ये विश्वशांतीचं सूत्र सामावलेलं आहे. त्यातून आजच्या साम्राज्यवादी अमेरिकाकेंद्री सत्तासंतुलनात सकारात्मक बदल घडून येईल, असा विश्वास आज विविध देशांतील शिया-सुन्नी बाळगून आहेत, हे कसं काय? इतकंच नाही, तर १८ मार्चला इराणचे आजचे अध्यक्ष अहमदिनेजाद यांनीही कारवाँच्या सभासदांना राष्ट्रपती प्रासादात अगत्यानं बोलावून असेच विचार मांडले- हे कसं काय? आशियाई एकत्रीकरण खरंच सुरू होत आहे का?... असे अनेक विचार मनात डोकावून गेले.
१८-२० मार्च : शहर आणि लोक
‘सादगी', साधेपणा याला एक महत्त्वाचं मूल्य म्हणून आजही इराणी जनमानसात स्थान असल्याचं दिसून येतं. अगदी १८ तारखेला इराणचे अध्यक्ष अहमदिनेजाद यांनी कारवाँच्या सभासदांना राष्ट्रपती प्रासादात येण्याचं आमंत्रण दिलं होतं तेव्हाही ते दिसून आलं. प्रासादात कुठेही बडेजावाचं प्रदर्शन नाही. अध्यक्षांचं वावरणंही सर्वसामान्यांतील एखाद्या व्यक्तीसारखंच. भाषणही अगदी सौम्य शब्दांत; कुठेही अलंकरण वा वल्गना नाहीत. पोशाखही साधा. सर्वच भारून गेले. सुरक्षा कर्मचारी, इतर कर्मचारी सर्वांच्या चालण्या-बोलण्यात एक अनौपचारिकता. पाश्चात्त्यांसारखी चेहऱ्यावर ‘इस्त्रीची घडी' नाही. सुरक्षाव्यवस्था कडक होती, पण सतर्कतेचं निष्कारण प्रदर्शन नव्हतं. रस्त्यावर वावरणाऱ्या लोकांचीही तीच गोष्ट. पोशाखात मोठं वैविध्य नाही. पुरुष जीन्स पँट, पांढरा शर्ट घालतात. स्त्रियाही जीन्सचा वापर करतात, पण अर्थात वरून ‘बुरखा' असतो. चेहरा पूर्ण झाकणाऱ्या स्त्रिया तशा कमीच, पण डोक्यावरून रुमाल जरूर बांधलेला. असं म्हणतात, इथे स्त्रियांवर खूप बंधनं आहेत, पण इथे-तिथे जा-ये करणाऱ्यांमध्ये झपझप पावलं उचलत लगबगीने जाणाऱ्या स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक वाटते. मोटारगाडी चालवणाऱ्यांमध्येही किमान ४० टक्के स्त्रिया आढळतात.
हेही वाचा - जनतेने ओढवून घेतलेली सत्ताधाऱ्यांची मनमानी
कुठल्याही शहराप्रमाणे इथेही रस्त्याच्या दुतर्फा घरं दिसून येतात; पण आतून मोठ्याने बोलण्याचा, भांडण्याचा आवाज कधीही ऐकू आला नाही. रस्त्यावरही चिडीचूप शांतता. (अर्थात बाजारभागात चित्र थोडं आगळं.) इराणमध्ये तेव्हा ‘नवरोझ' सण सुरू होता. आमचे काश्मीरचे सहकारी किरमाणीजी (वय ६७) रस्त्यांवरून फेरी मारण्यासाठी, चहा पिण्यासाठी नेहमीच माझ्यासोबत असत. ते म्हणाले, “सब तरफ शांति लगती है क्योंकि एक तो ‘नवरोझ' के कारण सब बाहर गये होंगे। या तो ऐसा होगा कि यहाँ आबादी कम है... सिर्फ सात करोड़। हमारे दिल्ली में तो इतनी भीड़ रहती है, गली गलीमें चाय की दुकान। यह तेहरान तो राजधानी है और फिर भी ऐसी शांति है।”
लोक नुसते शांतच नाही, तर सदैव मार्दवाने आदराने बोलणारे, दुसऱ्याची काळजी घेणारे. “सलाम अलैकुम। यू वॉन्त तु गो तु मार्केऽऽत?... तेेन मिनित्स... गो लेफ्त अँद तर्न राइत... ऑर तेक तॅक्सी... वन थाऊजंड तोमन... नॉत सो कॉस्तली... ओ केऽऽऽ?” असा अलगदसा, सौम्यसा हेल काढून प्रेमळ भाव व्यक्त करून वाक्य संपवण्याची खास लकब. आम्ही कधी परस्परांमध्ये गमतीत कडक शब्दांत बोललो तरी त्यांची नजर कावरीबावरी झालेली जाणवत असे. उद्धटपणा नावालाही नाही.
१९-२० मार्च रोजी आम्हाला फुरसतीचे एकूण दोन-तीन तास (म्हणजेच खूप!) लाभले असतील. मी व किरमाणीजींनी चहाची दुकानं धुंडाळून काढली, निष्कारण विविध दुकानांत जाऊन विक्रेत्यांशी गप्पा ठोकल्या. भाषेचा अडसर असल्यानं संवाद साधण्यासाठी हळूहळू इंग्रजी बोलणं वा किरमाणीजींच्या अरबी भाषेच्या माफक ज्ञानाचा वापर करणं वा हातानेच खाणाखुणा करून जाणून घेणं, असा प्रकार. मीही स्थानिक इराणी जनांप्रमाणं दुकानदारांना हेल काढून सौम्यपणे “याऽऽ, यू डोन्ट हॅव... कॅन आय गेट इट इन दि नेक्स्ट ॲलेऽऽ?” असं म्हटलं की दुकानदारांची कळी खुलायची. (‘ॲले' म्हणजे आपल्याकडच्यासारखी ‘आळी' बरं का!) बराच संवाद झाल्यावर किरमाणीजी म्हणाले, “आपने लोगों के चेहरे देखें?... बहोत खुश नहीं लग रहे हैं। लगता है धंदा कुछ खास नहीं और बेकारी भी है। आजुबाजू पूरी बंजर ज़मीन! खेती का नामोनिशान नहीं। तेल तो है पर खुशी नहीं है।' आम्ही एका दुकानातील तरुण विक्रेत्याला विचारलं, “डू यू थिंक दॅट इराण विल हॅव टु फेस वॉर इन निअर फ्युचर?” क्षणभर थांबून तो म्हणाला, “नो नो.. नो वॉर. नो वन कॅन हॅव वॉर विथ अस इझिली.”
काश्मिरी नजरेतून इराण
१९ तारखेचा दिवस तसा बराच मोकळा मिळणार असल्याचे संकेत असल्याने किरमाणीजींनी १८च्या रात्रीच मला मोठ्या उत्साहाने विचारलं होतं, “शिराज जा के आ सकते हैं? सुना है वो पुराना नगर बड़ा प्यारा है।” त्याबाबत माहिती काढून मी १९ला सकाळी त्यांना सांगितलं, “ट्रान्स्पोर्ट व्यवस्था कुछ खास नहीं है। एक दिन पूरा नहीं पड़ेगा।” वास्तविक, मला प्रश्न पडला होता, की वयाची साठी पार केलेल्या किरमाणींची नजर नक्की काय शोधत आहे?
किरमाणी माझे हॉटेलातील रूम पार्टनर असल्यानं तीन दिवसांत बरंच विश्वासाचं नातं निर्माण झालं होतं. १९च्या रात्री माझ्या-त्यांच्या विस्तृत गप्पा झाल्या. त्यातून त्यांच्या व्यक्तित्वाचं एक चित्र पुढे आलं. शेख अब्दुल्लांबाबत अजूनही त्यांच्या मनात मोठा आदर. “१९८० तक तो कश्मीर में सेक्युलॅरिझम याने क्या ये किसी को बताने की आवश्यकता भी नहीं थी....बाद में मामला बिगड़ गया। जैसे आपसे रिश्ता है ना वैसेही हिंदूओंसे रिश्ता था हमारा। अब भी वैसे बाकी है।” नंतर त्यांच्या बोलण्यातून हे लक्षात आलं, की इराण, तुर्कस्तानचे जुने व्यापारी रस्ते पूर्वापार काश्मीरपर्यंत असल्याने लहानपणापासून लोकांकडून त्यांना इराण-तुर्कस्तानची बरीच माहिती मिळत राहिली होती. त्यातून त्यांच्या डोळ्यांसमोर एक चित्र उभं झालं होतं. प्रत्यक्षात ते ताडून पाहण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
काश्मिरी आणि इराणी जनजीवनामध्ये काय साधर्म्य आहे याचा त्यांची नजर शोध घेत होती. कारंजी, उद्यानं अशा सर्व काश्मीरसारख्या गोष्टी ‘शिराज'मध्ये पाहायला मिळतील अशी त्यांची अपेक्षा होती. “अब तुर्कस्तानमें देखना...वहाँ यहॉंसे ज्यादा ‘प्रॉस्पेरिटी' दिखाई देगी। लोग भी जरा खुले दिमाग के होंगे।” याचा अर्थ, येथील लोक संवादाला फारसे खुले नाहीत, असं त्यांना म्हणायचं होतं.
हेही वाचा - देशांनी अमेरिकी वर्चस्व झुगारण्याची वेळ आलेली आहे
पुढे तुर्कस्तानमध्ये त्यांच्या अपेक्षेप्रमाणे रंगीबेरंगी पोषाख करणारे स्त्री-पुरुष दिसले. इथे बुरखा घालणाऱ्या स्त्रिया कमी, याचंही त्यांना आश्चर्य वाटत नव्हतं. दररोज पहाटे नेमाने नमाज करणारे किरमाणी तुर्कस्तानमध्ये एका शानदार मशिदीत रात्र काढण्याची वेळ आली तेव्हा मनोभावे त्या मशीदीत जाऊन नमाज पढले. आतील ‘इंटीरियर'चं सौंदर्य पाहण्यासाठी ते मला आग्रहाने आत घेऊन गेले. मी त्यांना म्हटलं, की केमाल पाशाने तुर्कस्तानच्या स्थापनेनंतर सुरुवातीला सुधारणांचा धडक कार्यक्रम राबवू पाहिला, तरी नंतर काही वर्षांनी नव्या, शानदार मशिदी बांधण्यासाठी आर्थिक सहकार्य केलं होतं, असं कुठे तरी माझ्या वाचनात आलं होतं. पुढे मी म्हटलं, “यह मशीद भी उसी जमाने में बनी, ऐसा किसीने मुझे कहा।” यावर ते बराच वेळ काही बोलले नाहीत. मग म्हणाले, “ऐसा है, आप बहुत सच बोलते हो। काश्मीर में ऐसा माहौल है कि अलग अलग डरसे झूठ बोलना जरूरी जैसा हो गया। अब लगता है सच बोले या ना बोले, ऐसा सोचते रहने की आदतसी पड गयी है।”
काही ठिकाणी स्थानिक टीव्ही वाहिन्या वा वृत्तचित्रपटकार आमच्या मुलाखती घ्यायचे. किरमाणीजी त्यांना टाळायचे. परंतु जेव्हा आम्ही ‘कोन्या'मधील श्रेष्ठ कवी जलालुद्दिन रूमीची मज़ार (समाधी) पाहण्यास गेलो तेव्हा ते भारावून गेले. शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम केलेल्या किरमाणींना रूमीच्या कविता तोंडपाठ होत्या. इथे त्यांनी एका वृत्तपटकाराला रूमीबाबत माहिती देणारी मुलाखतही दिली. इस्लामी जगतातील साहित्याच्या समृद्धीबाबत त्यांना अप्रूप होतं.
त्यांच्या मनातील आणखी एक अप्रूप मला लेबनॉनची राजधानी ‘बैरूत'मध्ये समजलं. २८ मार्च रोजी जशी आमची बोट बैरूत बंदरावर लागली आणि जशा चमचमत्या उंच इमारती दिसू लागल्या, तशी त्यांच्या नजरेत एक चमक दिसू लागली.
“बड़ा मार्केट है यहाँ, बडी ‘प्रॉस्पेरिटी' है। अरबों की ‘प्रॉस्पेरिटी' का दर्शन आपको यहाँ होगा।”
यापूर्वी एकदा गांभीर्याने बोलताना त्यांनी नकळतपणे मला ‘सेक्युलॅरिझम'ची व्याख्या सांगितली होती. “अपना धर्म पालना और दूसरे धर्मवालों के साथ ‘नॉन रिलिजस' तरीकेसे रिश्ता जोड़ना- यही होता हैं सेक्युलॅरिझम।” त्यांच्या सुज्ञ मनाचं दर्शन मला तेव्हा घडलंच होतं. आत्ता लेबनॉनमध्ये मुस्लिम मनाचा आणखी एक पैलू समजला. तो असा, की इतक्या इस्लामी सत्ता विविध देशांत असतानाही तिथे अस्थैर्य, अराजक आहे, खरी समृद्धी नाही याचा त्यांना विशाद वाटत होता. इस्लामी-अरबी जगात कुठे तरी रस्त्यावर झळकणारी समृद्धी त्यांना पाहायची होती. कोन्याला त्यांना ज्ञानाची, सर्जनशीलतेची समृद्धी दिसून आली होती. अरब जगतातील बैरूतमध्ये ‘याची डोळां' समृद्धी पाहिल्यावर त्यांचं चित्त उल्हसित झालं होतं. मोठं विचित्र असतं मनाचं! असं सर्व असलं तरी निधर्मी भारतावरची त्यांची श्रद्धा दृढ होती.
तुर्कस्तानचं जुनं शहर इस्तंबुल येथील २४ मार्चचा किस्सा. आम्ही दोघांनी गेल्या गेल्याच एक चहाचं दुकान शोधून काढलं आणि दोन-तीन वेळा तिथे गेलो.
त्या छोट्याशा पण स्वच्छ दुकानात एकीकडे कसलेसे बिल्ले वापरत तिथे गिऱ्हाइकांचे खेळ (जुगारच म्हणा ना) चालत असत. सोबत चहा पिणंही चालू. थंडी असल्याने प्रत्येक टेबलापाशी छोटंसं अग्निहोत्र सुरू असे. आम्ही त्या दुकानावर खूष होतो. दुसऱ्या दिवशी त्या मालकाने व कर्मचाऱ्यांनी आमच्याशी जमेल तशा इंग्रजीत भरपूर गप्पा मारल्या. चहाचे पैसे घेण्यास मोठ्या अदबीने नकार दिला. गप्पा सुरू असताना एका कर्मचाऱ्याने किरमाणीजींना विचारलं.
“यू आर फ्रॉम विच काश्मीर?”
किरमाणींनी त्याच्याकडे चमकून पाहिलं आणि ते म्हणाले,
“आय ॲम फ्रॉम जम्मू-काश्मीर स्टेट इन इंडिया.”
काही वेळाने मी त्या कर्मचाऱ्याला विचारलं, ‘डू यू नो अबाऊट एनी लीडर फ्रॉम इंडिया?”
“यस....गांधी....इंदिरा गांधी...” असं म्हणून तो खवचटपणे पुढे म्हणाला, “....हू ‘पॉकेटेड' काश्मीर.”
“नो, नो- यू आर राँग.” किरमाणीजी गांभीर्याने म्हणाले. विषयच संपला.
२३ मार्च, अंकारा, तुर्कस्तान-इस्रायली दुतावास
अंकारा म्हणजे तुर्कस्तानची राजधानी. इराण सोडण्यापूर्वी आम्ही इराणच्या बर्फाळ प्रदेशातील ‘कोंडवना केव्ह्ज' (आपल्या गोंडवनासारखं!) पाहून आलो होतो. तिथे चक्क -१५ अंश सेल्सियस तापमान होतं. तिथून निघालो आणि ‘अंकारा'मध्ये पोहोचलो तरी थंडी जारीच होती.
२३ मार्च रोजी सकाळी ‘अंकारा' येथील इस्रायली दूतावासाजवळ निदर्शनं होणार होती. सकाळपासूनच सर्वांमध्ये आगळा जोश होता. यापूर्वीही ठिकठिकाणी निदर्शनं झाली होती; पण इस्रायली एम्बसीवरील निदर्शनांच्या वेळी भावनिक तीव्रता जेवढी जाणवली तेवढी आधी वा नंतर कधीच जाणवली नाही.‘पॅलेस्टाइन'चा एक सुमारे साठ फुटी ध्वज सर्वांनी चहुबाजूंनी हातांनी आडवा धरून दीर्घकाळ फडकवत ठेवला. पॅलेस्टिनी मुक्तिगीतं आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. इथे पोलिस बंदोबस्तही मोठा होता; परंतु कारवाँ बेभान होऊन इस्राइलविरोधी घोषणा देत राहिला. पॅलेस्टाइनवर इस्राइलने केलेल्या अत्याचारांमुळे सगळीकडच्या मुस्लिमांच्या मनात इस्राइल आणि विशेषकरून झायोनिस्टांबाबत किती राग आहे, त्याबाबत त्यांच्या भावना किती तीव्र आहेत त्याची झलक त्या दिवशी खऱ्या अर्थाने पाहायला मिळाली.
हेही वाचा - नेतान्याहूंनी इराणशी लढाई का आरंभलीय?
निदर्शनं झाल्यावर दोनच तासांत समजलं, की इस्राइलने या निदर्शनांनंतर जॉर्डन, लेबनॉन व सीरिया आदी इस्राइल- लगतच्या देशांना धमकीची पत्रं धाडली होती. हे ‘ग्लोबल मार्च'वाले इस्राइलच्या सीमारेषेवर पोहोचले तर त्यांना अतिक्रमण करणारे मानले जाईल व त्यांना गोळ्या झेलाव्या लागतील, असा काहीसा त्या पत्रातील मजकुराचा सूर होता. शांतियात्रेच्या नेत्यांनीही ‘आमचा आवाज इस्राइलपर्यंत पोहोचला आहे, हे या पत्रातून आम्हाला लक्षात आलं आहे' असं उत्तर देऊन आव्हान स्वीकारल्याचं ध्वनित केलं.
२५ मार्च, कोन्या, तुर्कस्तान
गूढवादी सूफी कवी जलालुद्दिन रूमीच्या काही काव्यपंक्ती अशा आहेत (अनुवाद : फारुख धुंडी) -
ए मॅन कुड हिअर बियाँड ए बाउंडरी वॉल
दि मर्मर ऑफ ए स्ट्रीम, ही हर्ड दि कॉल
०००
दॅट गॉड हॅज सेड प्रोस्ट्रेट युवरसेल्फ अँड प्रे
ब्रेक डाऊन द वॉल्स अँड बॅरिअर्स
सो यू मे कम टु हिम ॲज दि थर्स्टी कम्स टु ड्रिंक
बियाँड दि वॉल, सो नाऊ ॲप्रोच दि ब्रिंक
-रूमी
कोन्या येथील रूमीच्या मज़ारीवर (समाधीवर) आम्ही २५ तारखेला सकाळी गेलो होतो. त्याच्या सुज्ञपणाची ओळख त्याच्या कवितांतून झालीच होती. इथेही आल्यावर वेगळीच शांती लाभली होती. तिकडचा मार्गदर्शक त्याची माहिती देत होता, ती ऐकून तमाम आशियाइ कारवाँ भारून गेला होता. हिंदू, मुस्लिम, निधर्मी सर्वांनाच या टर्किश कवीची आगळी-अज्ञात ओढ लागल्याचं जाणवलं. रूमीचा परिवार तसा मूळ अफगाणिस्तानचा, परंतु नंतर १९२८ नंतर इथे येऊन वसला. कोन्या हीच रूमीची कर्मभूमी ठरली.
रूमीच्या ‘अस्तित्वा'ची शांतता अनुभवल्यावर आम्ही येथील ‘सेंट्रल चौका'त गेलो. तिथे पाशाप्रणीत संमिश्र, निधर्मी तुर्कस्तानच्या खुलेपणाच्या खुणा जाणवल्या. भर चौकात सर्वजण चहा-नाश्ता करायला बसले होते. काही हातगाडीवाले विक्रेते तिथे उभे होते. कपडे, वहाणा आदी विविध गोष्टी खुल्यावरच विकायला होत्या. मुस्लिम, ख्रिश्चन आदी विविध धर्मांचे लोक त्या चौकात शांतपणे फिरत होते, वस्तूंचा भाव करीत होते, न जमल्यास परस्परांशी गप्पा करत होते. मोठा जिवंत आलम होता. मोकळी शुद्ध हवा आणि जनजीवनातही मोकळेपणा. काही स्त्रिया बुरखा घालून, डोक्याला रुमाल लावून होत्या- मात्र चालण्या-बोलण्यात मोकळेपणा होता. पण तुर्कस्तानमधील अल्पसंख्याक कुर्दवंशीयांचं काय? त्यांना न्याय का नाही? एका कुठल्याशा दुकानात काही खरेदी केल्यावर त्या दुकानदाराने कुर्दवंशीय सलाउद्दिनवरचं पुस्तक दाखवलं. अभिमानाने तो म्हणाला, “यू स्टडी धिस ऑल्सो!”
२७ मार्च ते २९ मार्च २०१२ : जहाजातच अटकाव
अंकाराच्या इस्रायली एम्बसीजवळील जोरदार निदर्शनांचे पडसाद पुढील प्रवासात जाणवले. म्हणजे मोठे नाट्यमय आणि भयावह असेच. २७ मार्च रोजी पहाटेच आम्ही ‘मेरिन तुशुजा' या दक्षिण तुर्कस्तानच्या बंदरावर लेबनॉनची राजधानी बैरूत इथे जहाजाने जाण्यासाठी पोहोचलो, परंतु ‘विश्वासार्ह' न वाटणाऱ्या कारणास्तव दिवसभर आम्हाला जहाज उपलब्ध झालंच नाही. पंधरा तास, म्हणजे रात्री उशिरापर्यंत उघड्यावरच दिवस काढल्यावर रात्री एक मोठी ‘फेरी शिप' आली. भूमध्य सागरातून रात्रीचा प्रवास साधून २८च्या सकाळी ८ वाजता आम्ही बैरूत बंदरावर पोहोचलो; परंतु तत्काळच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घेरलं आणि बोटीतून उतरण्यास मज्जाव केला. दुपारपर्यंत या अटकावाचं काहीच कारण दिलं गेलं नाही. मग ‘यात्रेकरूं'नी ‘डेक'वर प्रचंड घोषणा देत, सत्याग्रह करीत उच्चाधिकाऱ्यांचं लक्ष वेधलं. आमच्या कारवाँतील सभासदांना ‘ऑन अरायव्हल' व्हिसा देण्याचं ठरलं होतं; पण काही तांत्रिक कारणं देऊन टाळाटाळ सुरू होती. बरीच वादावादी झाल्यावर अखेरीस ‘संध्याकाळी ७ वाजता त्यांनी सर्वांचे ‘व्हिसा' तयार करतो, पण वेळ लागेल,' असं सांगून आमचे सर्वांचे ‘पासपोर्ट' ते अधिकारी घेऊन गेले. त्यापूर्वी दोन-तीन वेळा त्यांनी बोटीत येऊन ‘तपासणी' केली होती. पण नंतर अघटितच झालं. काही वेळानंतर त्यांनी इंडोनेशिया, तुर्कस्तान, इराण, मलेशिया आदी देशांच्या चमूंना बैरूत बंदरावर उतरू दिलं. देशादेशांमधील कराराद्वारे त्यांना ‘व्हिसा' घेण्याची गरज नसल्याने त्यांना प्रवेश दिला असल्याचं सांगण्यात आलं. म्हणजे भारत (३७), फिलिपाइन्स (३) आणि इराक (१) या देशांच्या चमूंना बोटीतच अटकाव करून ठेवणार हे स्पष्ट झालं.
दिवसभरात बोटीवर ना पाणी, ना अन्न, ना चहा. सर्व हवालदिल झाले. मग रात्री परत डेकवर आम्ही निदर्शनं केली. आता उच्च अधिकाऱ्यांनी चढा स्वर लावला व आवाज बंद करण्यास सांगितलं, आत जाऊन बसण्याचं फर्मान काढलं. कारवाँच्या सभासदांवर बंदुकीही रोखल्या. खूप शाब्दिक खडाजंगी झाली. अखेरीस रात्री बारा वाजता ‘दुसऱ्या दिवशी सकाळी पाहू' असं आश्वासन दिलं गेलं.
खाण्याचा पत्ता नव्हताच. ज्यांच्याकडे होते त्यांनी आपल्या बॅगेतून ‘भूक लाडू, तहान लाडू' काढले व सर्वांनी मिळून एक तीळ करंडून खाण्याचे प्रयोग सुरू झाले. कारण सोबत लेबनीज ‘लिरा' नसल्याने बोटीच्या कॅन्टीनमधील खाणं मिळणंही शक्य नव्हतं. मध्यरात्रीनंतर आम्ही दोन-चारजण धूम्रपानाच्या निमित्ताने डेकवर गेलो. तिथून १० एक फूट खाली बंदरावर उतरण्याची जागा होती. शिडी काढून घेण्यात आली होती. सुरक्षा कर्मचारी तिथेच गस्त घालत होते. आम्ही त्यांच्याशी गप्पा सुरू केल्या. ते खुलले. ऐन विशीतील ते तरणेबांड सुरक्षा कर्मचारी ‘बॉलिवुड'बाबत विचारू लागले. गप्पा रंगात आल्यावर मी एकाला विचारलं, “महात्मा गांधींबाबत काय माहीत आहे?” त्याने दुसऱ्याकडे पाहिलं व मग डोळे मिचकावत तो म्हणाला, “ही वॉज ऑब्सेस्ड अबाऊट वूमेन.” आम्ही हसलो. आमच्यातील एका तरुण मुलीने त्यांना महात्मा गांधींचं आत्मचरित्र बक्षीस दिलं आणि ती त्यांना म्हणाली, “गीव्ह प्रॉपर आन्सर टुमारो आफ्टर रीडिंग दिस.” तो खजील होऊन हसला. इतकंच नाही, तर त्याने स्वत:हून विचारलं, “यू वाँट चाय?” मी म्हटलं, “वुई ऑल वाँट चाय बॅडली.” काही वेळाने खरोखरच त्याने पूर्ण चमूच्या चहाची व्यवस्था केली. ‘गांधीगिरी' कामास आली होती.
हेही वाचा - इराणवर बॉम्ब टाकून अमेरिकेने काय मिळवलं?
२९ मार्च, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळीही काही चिन्हं दिसेनात. पुन्हा निदर्शनं. भारतातील नेत्यांना फोन केले गेले. आपल्या राज्यसभेत आमच्या ‘अटकावा'बाबत २९ मार्चला सकाळी प्रश्न उपस्थित केले गेले. मग पंतप्रधान कार्यालयाने लेबनॉनमधील भारतीय राजदूतांना फोन केले आणि सूत्रं हलू लागली. दुपारी स्थानिक आयोजकांना आम्हाला खाणं पुरवण्याची परवानगी दिली गेली. रात्रीपासून बोटीवरील चार ‘टॉयलेट्स'मध्ये पाणीही नव्हतं. पार घाणीचं साम्राज्य! तिथेही पाण्याची व्यवस्था केली गेली. परंतु तरीही संध्याकाळपर्यंत आमची सुटका होण्याची लक्षणं दिसत नव्हती. अखेरीस लेबनॉनमधील भारतीय ‘एम्बसी'च्या प्रतिनिधींनी येऊन कळवलं -अथक प्रयत्न सुरू आहेत... रात्रीपर्यंत सुटका होईल. सर्वांच्या जिवात जीव आला. आणि अखेरीस खरंच भारतीय एम्बसीचे अधिकारी आनंदकुमार यांनी जातीने केलेल्या प्रयत्नांनंतर रात्री ८ ते १०च्या दरम्यान ‘ट्रान्झिट व्हिसा' देण्याची प्रक्रिया पार पडून आम्हाला बैरूत बंदरावरून नियोजित हॉटेलवर जाऊ दिलं गेलं. इस्राइलची धमकी, लेबनॉनमधील राजकीय गटांमधील राजकारण, तांत्रिक चुका अशा अनेक कारणांस्तव तब्बल ४० तास आम्हाला अटकाव सोसावा लागल्याचं आम्हाला नंतर समजलं.
दरम्यान आणखी एक उपकथानक घडलं होतं. इराणमधील तुर्कस्तानच्या दूतावासाने पाकिस्तान-अफगाणिस्तानच्या (त्यांची शत्रुराष्ट्रं!) चमूला तुर्कस्तानचा व्हिसा देण्यास नकार दिला होता. त्यामुळे ते तेहरानमधून दमास्कस (सीरिया) इथे जाऊन थांबले होते. तेही त्याच दिवशी तिथून थेट बैरूतच्या लॉजवर-हॉटेलवर पोहोचले होते. आम्ही लॉजवर गेल्यावर इराण, तुर्कस्तान आदी सर्वांच्याच प्रतिनिधींनी आमचं भावपूर्ण स्वागत केलं. उराउरी आलिंगनं- कित्येकांच्या डोळ्यात अश्रू. अशा प्रसंगी सर्व आशियाईंमध्ये किती ऐक्य होतं व आत्मीयता होती त्याचा खरा प्रत्यय आला.
३० मार्च २०१२ : लेबनॉन-इस्राइल सीमारेषा
१९७६च्या ३० मार्च रोजी म्हणजे ३६ वर्षांपूर्वी इस्राइलमध्ये एक घटना घडली होती. तेथील सरकारने ‘सुरक्षा व पुनर्वसना'च्या कारणास्तव पॅलेस्टिनींच्या जमिनी हिसकावून घेण्याची योजना केली होती. त्याविरोधात तेथील अरब पॅलेस्टिनींनी ३० मार्च रोजी सार्वत्रिक संप पुकारला होता. १९४८ मध्ये इस्राइलची स्थापना झाल्यापासून त्या जनांनी प्रथमच संघटित कृतियोजना केली होती. शासनाने संपकऱ्यांवर गोळ्या झाडल्या; त्यात ६ जण ठार, तर शेकडो जखमी झाले होते. तेव्हापासून ३० मार्चचा दिवस ‘पॅलेस्टाइन लँड डे' म्हणून पाळला जातो. त्या दिवसाचं औचित्य साधून आमचा कारवाँ अखेरीस ३० मार्च २०१२ रोजी इस्राइल-लेबनॉन सीमेवरील ‘अल्तकिफ कॅसल' या ठिकाणी पोहोचला. तिथे दहा हजारांपेक्षा जास्त लोकांचा मोठा मेळावा होता. अमेरिका व इंग्लंड आदी युरोपियन देशांतील प्रतिनिधी, पॅलेस्टिनी समर्थक, ज्यू सहृदयी आणि हजारो पॅलेस्टिनी स्त्री-पुरुष व बालकं असे सर्व जमल्यावर एकच जल्लोष झाला. घोषणा, मुक्तिगीतं यांनी परिसर दुमदुमून गेला. हिरव्या-काळ्या-लाल ‘पॅलेस्टिन' रंगाचे शेकडो फुगे आकाशात सोडण्यात आले- इस्राइलच्या झियॉनिस्टांचं लक्ष वेधण्यासाठी.
१ एप्रिल २०१२, बैरूत : निर्वासितांची वस्ती
बैरूतहून भारतात परतून येण्यापूर्वी म्हणजे १ एप्रिल रोजी बैरूतमधील ‘बोर्ज अल बराजेन' कॅम्प भागातील एका पॅलेस्टिनी निर्वासितांच्या छावणीला भेट देण्याची संधी मिळाली. इस्राइलमधील १९४८ मधील हिंसक घटनांनंतर अनेक पॅलेस्टिनी तिथून पळाले व इथे येऊन राहिले...आज तीन पिढ्या इथे राहिल्या, तरी ते इथे वसले असं म्हणता येत नाही. अली अयुब या तेथील निर्वासितांच्या संघटनेच्या नेत्याने सांगितलं, की आज या वस्तीतील निर्वासितांची संख्या १७ हजारांवर पोहोचली आहे. त्यांना कोणतेच नागरी हक्क नाहीत. वस्तीच्या बाहेर त्यांना नोकरी करण्याचे हक्क नाहीत. त्यात डॉक्टर्स, वास्तुशिल्पकार ते कुशल कारागिरांपर्यंत सर्वांचा समावेश आहे व अत्यंत हलाखीच्या अवस्थेत त्यांना तिथे राहावं लागतं आहे. नागरिकांचा दर्जा नसल्याने सुरक्षेसाठी कोणती व्यवस्था नाही. रहिवाशांमधूनच वस्तीच्या संरक्षणासाठी काहींना कमांडो ट्रेनिंग दिलं जातं...पण असं सर्व असूनही एक दिवस आपल्या स्वतंत्र पॅलेस्टाइन देशाची नवनिर्मिती होईल व १९४८ साली जी घरं ते सोडून आले त्या घरांत ते पुन्हा जातील, असं स्वप्न ते तीन पिढ्यांनंतरही उरी बाळगून आहेत. अनेक वेळा व युद्धप्रसंगी त्यांच्यावर हल्ले झाले तरी त्यांनी हिमतीने स्वत:चं संरक्षण केलं आहे. उद्ध्वस्त घरांच्या खाणाखुणा अजूनही तिथे दिसतात. मरणानंतर दफनासाठी जमिनीचा एक तुकडा त्यांना मिळाला आहे, पण तिथेही आता दफनासाठी जागा उरलेली नाही.
पॅलेस्टाइनमुक्ती व आपला संबंध काय?
उपरोक्त निर्वासितांची कहाणी म्हणजे एका अंदाजानुसार अरबस्तानात इथे-तिथे विखुरलेल्या सुमारे ४ दशलक्ष निर्वासितांची प्रातिनिधिक कहाणी आहे. १९४८ व १९६७ मधील युद्धांनंतरही पॅलेस्टिनींच्या जमिनी हिसकावून घेणं इस्राइलने सुरूच ठेवलं आहे. त्यात त्यांच्याच वस्तीत ज्यू सेटलमेंट्स उभारणं हा एक वादग्रस्त मुद्दा ठरला आहे. परंतु, गेली सहा दशकं अशी सर्व बळजोरी ते करत असूनही इस्राइलला मिळालेल्या अमेरिकी वरदहस्तामुळे इस्राइलवर आंतरराष्ट्रीय संघटनेने कधीच कोणती कारवाई केलेली नाही. त्यामुळेच आशियाई जनांनी पुऱ्या शक्तीनिशी आता प्रयत्न केल्यास या समस्येला आगळा पैलू प्राप्त होईल व अमेरिकी साम्राज्यवादाकडे कल दर्शवणारं सत्तासंतुलन बदलण्याची प्रक्रिया सुरू होईल व ते भारतासह जगातील सर्वच देशांच्या दृष्टीने हितकारक ठरेल, असा विवास ग्लोबल मार्चच्या आशियाई कारवाँचे प्रमुख संघटक व ग्लोबल मार्चच्या कार्यकारी समितीचे सभासद फिरोज मिठीबोरवाला यांना वाटतं.
अरब जगत, आपण व आशियाई ऐक्य
या यात्रेदरम्यान असे सर्व अनुभव घेत असताना खूप नवी माहिती मिळत होती- परंतु त्याची संगती, अन्वय लावताना जीव मेटाकुटीस यायचा. परंतु, मुंबईच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विजया चौहान यांच्याशी विश्लेषणात्मक संवाद सुरू राहिला व बऱ्याच गोष्टींबाबत मनात स्पष्टता येत राहिली. या काफिल्यात सत्तर टक्क्यांच्या वर मुस्लिम असतील; भारतीय चमूतील सुफियाना देवबंदी मुस्लिमांसह सर्वांचं मिळून प्रमाणही तसंच असेल. परंतु, या सर्वांमुळे व या उपक्रमामुळे एकंदरच अरब जगत, त्यांची मानसिकता याबाबत बरंच काही समजून घेण्याची संधी प्राप्त झाली.
आपला देश १९४७ मध्ये स्वतंत्र झाला, पण पूर्वी तो ब्रिटिशांची वसाहत होता. त्यामुळेच इकडच्या (भारत-पाकिस्तानमधील) मुस्लिमांना जे अनुभव प्राप्त झाले ते एका पूर्वी वसाहत असलेल्या देशामधील बरे-वाईट अनुभव ठरतात. परंतु, इराण, लेबनॉन, तुर्कस्तानचं तसं नाही. त्यांना त्यांचा स्वतंत्र इतिहास आहे, वसाहती राज्याचा नाही. त्यांची स्वत:ची खास जीवनशैली आहे. पोशाख, रंगसंगतीपासून एकंदरीतच त्यांच्या जीवनशैलीवर स्वत:चा खास असा ठसा जाणवतो. पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभाव नाममात्र. त्यामुळेच, किती युद्ध झाली, आक्रमणं झाली, तरी आमची संस्कृती कायम राहील, ती कुणी हिरावून घेऊ शकत नाही, असा एक आत्मविश्वास त्यांच्यात जाणवतो, व तो अनाठायी नाही. असा इतिहास त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरतो.
एकंदरीतच इराण, तुर्कस्तान, लेबनॉनमधील जनांवर वसाहतवादाचं जोखड नसल्याने त्यांची विचारपद्धती आपल्याकडील मुस्लिमांपेक्षा अधिक आत्मविश्वास व आत्मीयता दर्शवणारी असल्याचं स्पष्टच दिसून येतं. आशियाई ऐक्याची प्रक्रिया सगळीकडच्या मुस्लिमांसाठी व निधर्मीयांसाठी मोठी उपलब्धी ठरू शकते- व्यापक विचार करायला लावू शकणारी. ‘ग्लोबल मार्च'मुळे पौरात्य जनांच्या परस्पर संपर्काद्वारे आशियाई ऐक्याची आगळी पक्रिया सुरू झाली आहे, असं निर्विवादपणे म्हणता येईल. परंतु ती पुढे कशी नेली जाईल, यावर त्याचं भविष्य निर्भर आहे.
(अनुभव, मे २०१२च्या अंकातून साभार..)
