आम्ही कोण?
ले 

इराणवर बॉम्ब टाकून अमेरिकेने काय मिळवलं?

  • निळू दामले
  • 23.06.25
  • वाचनवेळ 4 मि.
america iran israel

आठवडाभर घोळ घातल्यावर अमेरिकेने इराणवर प्रत्येकी ३० हजार पाऊंडापेक्षा जास्त वजनाचे बाँब टाकले. ट्रंप म्हणतात, की इराणची अणुविकास व्यवस्था संपली आहे. इराणचं कधीही भरून निघणार नाही इतकं नुकसान झालं आहे.

इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे हे खरंच आहे. इराणचा अणुकार्यक्रम दीर्घकाळ रखडेल. परंतु तो नष्ट झालेला नाही. तो ठिकठिकाणी आधीच विखुरलेला आहे, इराण तो पुन्हा दुरूस्त करून कामाला लावेल.

इराण चिरडीला आला आहे. दुखावला आहे. आता तो शरण येण्याची शक्यता दुरावली आहे. उरल्यासुरल्या ताकदीचा वापर करून तो अमेरिकेचं, इस्रायलचं नुकसान करेल. अमेरिका आणि इस्रायलची ताकद एवढी आहे, की इराणचं फार म्हणजे फार नुकसान होईल. त्या मानाने इस्रायल-अमेरिकेचं नुकसान कमी असेल.

इराणची अर्थव्यवस्था आणि इराणची जनता काही वर्षं मागे पडेल. त्यातून काय साधेल? अशा परिस्थितीत इराणमध्ये धर्मांध सत्ता नाहीशी होईल की पुन्हा शक्तीशाली होईल? जगाला हवी असलेली शांततावादी, लोकशाहीवादी, लिबरल सत्ता इराणमध्ये जन्माला येईल? ती शक्यता कमी आहे. पेझेशक्यान यांच्यासारखे नेमस्त अमेरिकेला हवे असते तर अमेरिका-इस्रायलने आधीच मुत्सद्देगिरीने वाट काढली असती.

कुठल्याही खेळाचा एक शेवट असतो. युद्धातून काही तरी उद्दीष्ट साध्य करायचं असतं. इराणचा अणुकार्यक्रम नष्ट करणं हे इस्रायल आणि अमेरिकेचं एक उद्दीष्ट असू शकतं. इराणमध्ये सत्तापालट घडवून आणणं असंही उद्दीष्ट असू शकतं. की इराणने अणुशक्तीचा उपयोग शांततेसाठी करावा अशी त्यांची अपेक्षा आहे?

अणुकार्यक्रम नष्ट होणं शक्य नाही. इराण पुन्हा उभारणीला लागेल. अणुशक्तीचा उपयोग नियंत्रित करायचा असता तर केवळ आणि केवळ वाटाघाटी आणि दबावाचं राजकारण करूनच ते साध्य झालं असतं. आर्थिक निर्बंधांचं शस्त्र वापरून ते उद्दिष्ट साध्य करता आलं असतं. ओबामा यांच्या काळात युरोपीय देशांच्या मदतीने आर्थिक निर्बंध अंशतः शिथील करून इराणचा अण्वस्त्रनिर्मितीचा कार्यक्रम स्थगित केला गेला होता. नेतान्याहू आणि ट्रंप यांनी हाणामारी करून तो कार्यक्रम संपवण्याचा प्रयत्न केला. पण ते जमण्यासारखं नाही.

इस्रायल आणि अमेरिकेने इराण युद्ध सुरू करताना म्हटलं होतं, की इराणचा अणुकार्यक्रम नष्ट करण्यासाठीच युद्ध आहे. नंतर इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांना मारण्याची भाषा दोघांनी सुरू केली. नंतर हळूच इराणमधली सत्ता पालटली पाहिजे असं म्हटलं. इस्रायलने तर इराणी जनतेला थेट आवाहन केलं, की त्यांनी खामेनी यांची सत्ता उलथवावी, त्यांच्या जागी दुसरा माणूस आणावा.

म्हणजे इस्रायल-अमेरिकेचा हेतू इराणमध्ये राजकीय हस्तक्षेप करण्याचा आहे तर! हे फार डेंजरस आहे. एखाद्या देशातली सत्ता कशी असावी हा सर्वस्वी त्या देशातल्या लोकांचा प्रश्न असतो. सत्ता घातक असेल तर इतर देशांनी ती घातकता कमी करण्याचा प्रयत्न करायचा असतो, सत्तेला वळण लावण्याचा प्रयत्न करायचा असतो. सत्ताबदल हा त्या-त्या देशाच्या जनतेचा प्रश्न असतो. इस्रायल- अमेरिकेला तो अधिकार नाही. उद्या सभोवतालचे सर्व देश जर म्हणू लागले, की इस्रायलमध्ये सत्तापालट व्हावा आणि त्यासाठी इस्रायलवर हल्ला करू, तर इस्रायलची प्रतिक्रिया काय असेल?

हा न्याय भारत-पाकिस्तानला लावून पहावा. अमेरिकने काही कारणाने (पाकिस्तानच्या दबावापोटी) भारतात सत्तापालट मागितला तर?

अमेरिकेकडे प्रचंड संख्येने आणि प्रचंड ताकदीच्या शस्त्रांची भरमार आहे. त्यांची पंचवीस टक्के अर्थव्यवस्था शस्त्रांच्या निर्मितीवर अवलंबून आहे. शस्त्रं विकणं हा अमेरिकेचा मुख्य धंदा आहे. अमेरिकेला आपल्या शस्त्रांच्या ताकदीचं प्रदर्शन करायचं असतं. त्यासाठी शस्त्रं कुठे वापरायची या विचारात ते असतात. बाँब इथे टाकू की तिथे टाकू असं त्यांना झालेलं असतं. अमेरिका युद्धाच्या शोधात असतं.

अमेरिकेने अणुबाँब तयार केला. त्या बाँबची ताकद ओपनहायमर इत्यादी वैज्ञानिकांना कागदावर समजली होती. प्रत्यक्षात काय घडतं ते अमेरिकेला तपासायचं होतं. अमेरिकेने जपानमध्ये बाँब टाकले, लाखो जपानी मारले. अमेरिकेला हजारो किलो वजनाचा बंकर बाँब टेस्ट करायचा होता. त्यांनी तो इराणमध्ये टेस्ट केला.

अमेरिकेच्या मदतीने आणि स्वतःची कुशाग्र बुद्धीमत्ता वापरून इस्रायलने माणसं मारण्याची विविध तंत्रं विकसित केली होती. सेलफोनमध्ये स्फोटकं भरणं आणि सेलफोन टॅप केला रे केला की फोनचा स्फोट होणं हे तंत्रज्ञान इस्रायलने विकसित केलं होतं. त्याची टेस्ट त्यांनी लेबनॉनमध्ये केली. माणसं मेली, जखमी झाली.

अणुकार्यक्रम नष्ट करणं, सत्तापालट मागणं ही निमित्तं आहेत. आपली खरी ताकद हिंसा आणि विध्वंस करण्यात आहे हे या दोन्ही देशांना दाखवायचं असतं. इराणमध्ये ते त्यांनी दाखवलंय.

इस्रायल-अमेरिकेच्या तुलनेत इराण अगदीच लल्लू-पंजू आहे, अगदीच अशक्त आहे. त्यामुळे इराणचं अतीव नुकसान होणं अटळ आहे. पण कोणताही समाज आपली ओळख नष्ट होऊ देत नाही, तो अधिक प्राणपणाने पुन्हा उसळी मारत असतो.

इराण दहा वर्षं मूर्खासारखा इराकशी लढला. इराकही तितकाच मूर्ख. इराणला इराकची अरब ओळख संपवायची होती. इराकला इराणची शिया-फारसी ओळख संपवायची होती. कोणाचीही ओळख संपली नाही. पण दोन्ही बाजूंची करोडो माणसं मेली एवढंच झालं.

इस्रायल आणि अमेरिकेचं चुकतंय.

निळू दामले | 9820971567 | damlenilkanth@gmail.com

निळू दामले हे जगभरातील विविध विषयांवर अभ्यासपूर्ण आणि सहज शैलीत लिखाण करणारे ज्येष्ठ पत्रकार आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 2

महेश 24.06.25
सर, इस्त्रायल आणि अमेरीका चुकतयं असं मान्य केले तरी काही प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहेत १) इराण यहुदी आणि ख्रिश्चन यांचे शिरकाण करण्याची चिथावणीखोर भाषा आणि गरळ ओकतो... धर्माध सत्तेचा प्रभावी वापर करून आपलं अस्तित्व दाखवण्याच्या कायम प्रयत्नात असतो.. हे अनिर्बंध चालूच राहणार आहे किंवा यांत काही बदल संभवतो का? २)छुप्या मार्गाने अणुअस्त्र सज्जता कशा साठी? ह्या प्रश्नावर सोयिस्कर मौन बाळगण्या इतपत इराण हुशार आहे..! किंबहुना स्वत :हून या अण्वस्त्राचा वापर आम्ही करणार नाही किंवा ते फक्त स्वसंरक्षणासाठी असेल आणि शांतता भंग होणार नाही यांची ग्वाही तो आंतरराष्ट्रीय समुदायाला जाहीरपणे दिल्याचे ऐकिवात नाही....! ३) आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थे कडून त्यांच्या अणुअस्त्र प्रकल्पाचे निरीक्षण सुध्दा करण्यास नकार देतो. ४) युद्धपुर्व वाटाघाटीनां देखील भीक घालत नाही... या प्रश्नावर जर कायमच गप्प राहुन युध्दखोर भाषा तसेच डझन अतिरेकी गटांना मध्य अशियात छुप्या पद्धतीने मदत आणि शस्त्रअस्त्रे पुरवत हिंसक पध्दतीने इतर राष्ट्रांना वेठीस धरण्याचे धोरण अवलंबले असेल तर मग तुमचा हेतू काय आहे हे सांगायला कोण्या ज्योतिषाची गरज नाही...! युध्दखोर भाषा करायची नंतर युध्द लादले म्हणून कांगावा करायचा आणि परत कट्टर धर्मवादी वर्चस्वाखाली खाली इराणी जनतेला ढकलायचे. स्वत: च्या नागरिकांची काळजीच इराण करणार नसेल तर मरणाऱ्या जनतेचे सोयरसुतक फक्त तुम्हाआम्हाला असून काय उपयोग? त्यामुळे इराण देखील या युद्धाला तेवढाच जवाबदार आहे...! शेवटी कोणीतरी म्हणलं आहेच की.... If you are powerful it is not fair to rule but if you are powerless you can't rule....! यातील नेमका अर्थ अमेरीका, इस्त्रायल आणि इराण यांच्या कडून बाळगणे हे दिवास्वप्न आहे... किंबहुना इराक आणि इस्त्रायली जनतेने युध्दाचे परिणाम भोगण्याची तयारी ठेवावी लागेल असे खेदाने म्हणावे लागते..

विकास नातू 24.06.25
छान 👍

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results