
संस्कृत सुभाषितकार खूपच दूरदृष्टीचे होते, असे म्हणावे लागेल. कारण त्यांनी फार पूर्वीच आपल्या वृत्तवाहिन्यांच्या ताळतंत्राविषयी भाष्य करून ठेवलेले आहे. ते म्हणतात : ‘मर्कटस्य सुरापानं मध्ये वृश्चिकदंशनम्। तन्मध्ये भूतसंचारो यद्वातद्वा भविष्यति ।।’ अर्थ असा, की आधीच मर्कट. त्यात मद्य प्याला. तशात त्यास विंचू चावला. त्यातच अंगात भूत संचारले. अशा त्या माकडाच्या वर्तनाबद्दल काय बोलणार? तो काहीही बरळणार, धिंगाणाच घालणार. आपल्या वृत्तवाहिन्यांनी आधीच धार्मिक अतिरेकाची मोसंबी-नारिंगी प्राशन केलेली होती. अतिराष्ट्रवादाचा वृश्चिकदंश झालेला होताच. त्यात युद्धखोरीचं भूत अंगात संचारलं. मेंदूत अशी सारी विखारी नशा उतरल्यानंतर कुणाचंही जे काही होईल, तेच या वाहिन्यांतील पत्रकारू-नारूंचं झालं आहे. त्याचा परिणाम आपण गेला आठवडाभर पाहिला.
युद्धाचा ज्वर चढल्यानंतर कोणत्याही समाजाचा विवेक बाजूला पडतो. ते स्वाभाविकच. आपल्याकडे अनेकांचं सध्या तेच झालेलं आहे. परंतु समाजात सगळेच काही पंगू मेंदूचे वा अतिरेकी विचारांचे नसतात. देशाचं सुदैव असं, की अजूनही सुजाण, सुसंस्कृत नागरिक बहुसंख्य आहेत. त्यांना माध्यमांच्या या मर्कटलीला नापसंत आहेत. त्यांचे वेडेचाळे कोणते ते वेगळे सांगण्याचे कारण नाही. सर्वचजण ते जाणतात. त्या वेड्याचाळ्यांविरोधात आजही समाजमाध्यमांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यात नापसंतीबरोबरच दिसते ती लोकांची हतबलता. चाललेय ते वाईट आहे, पण त्याबाबत आपण काहीच करू शकत नाही, ते रोखू शकत नाही, त्याला सरकारही पायबंद घालत नाही, ही अनेकांची भावना आहे. यातून सुटकेचा एकच मार्ग आहे. तो म्हणजे डोळेझाक करणं, दुर्लक्ष करणं, वृत्तवाहिन्या पाहणं बंद करणे. अनेकांनी तो उत्तम मार्ग धरलेलाही आहे. पण हा झाला वैयक्तिक सुटकेचा मार्ग. यातून देशाची आणि समाजाची सुटका कशी आणि कधी होणार हा प्रश्न उरतोच.
याच्या उत्तराचा शोध खोलात जाऊन घ्यायला हवा. त्यासाठी आपल्याकडील इलेक्ट्रॉनिक माध्यमं अशी गधागोंधळी का बनली, हे पाहायला हवं. सुरुवातीला वृत्तवाहिन्यांचं उत्तम चाललं होतं. तेव्हा ‘दूरदर्शन’ नामक एकच वाहिनी होती. भावनांचं प्रदर्शन न करता, आवाजाची पट्टी एक सारखी ठेवून बातम्या देणं ही दूरदर्शनची रीत होती. त्याला पर्याय होता तो ‘बीबीसी’चा. संगीतात घराणी असतात, तसं बीबीसी हे वृत्तविश्वातील घराणं. विश्वासार्हतेसाठी ते वाखाणलं जाई. बातम्या देण्याची त्यांची पद्धत, बातम्यांची भाषा हे सारं खानदानी. आपण काही काळ या वृत्तखानदानाच्या प्रेमात होतो. पण मुळात शांत, संयत, संयम यांत लोक फार काळ रमत नाहीत. आपल्या भारतीयांना ते भावत नाही. याबाबत आपला समाज अजूनही चळवळ्या बालकाच्या पातळीवर आहे. लहान मुलांना पाहा, संयम नसतो. त्यांना मोठ्या आवाजाचं मोठं आकर्षण असतं. मोठ्याने भॉ केलं की ती दचकतात. फारच घाबरली की रडू लागतात. अन्यथा खिदळतात. पुढे हीच मुलं मोठ्या आवाजाचे फटाके फोडून आनंद घेऊ लागतात. आता आपली समाजस्थिती अशी, की मोठी माणसंही फटाके फोडतात. त्यात त्यांना आनंद वाटतो. अर्थ स्पष्ट आहे. फटाक्यांच्या मोठ्या आवाजाने आनंदित होणारी माणसं अजूनही बुद्धीच्या त्या बाल्यावस्थेतच असतात. या अशा माणसांच्या समाजाला मोठ्या आवाजात बोलणं, मोठ्याने हॉर्न वाजवणं, डीजेच्या भिंती उभ्या करणं, मोबाईलवर मोठ्याने गाणी वाजवणं अशा गोष्टींनीच उत्तेजना मिळणार. असा समाज बातम्या पाहण्यास गेल्यानंतर त्याला एकसुरी, संयत, संयमी वातावरण कसं मानवणार? त्याला काही तरी तडकभडकच लागणारच. अमेरिकेत माध्यमांचं तडकभडक घराणं आहे ‘फॉक्स’ टीव्हीचं. आपल्या वृत्तवाहिन्यांनी त्यांची शागिर्दी स्वीकारली. एकाच्या दोन वाहिन्या झाल्या आणि मग त्यांच्यात दोन प्रकारची स्पर्धा सुरू झाली. पहिली आवाजाची आणि दुसरी वेगाची.
घाईचं काम सैतानाचं असतं म्हणतात. एकदा सर्वांत आधी ‘बातम्या’ द्यायच्या म्हटल्यावर, तेथे सत्य आणि तथ्य यांचं पथ्य पाळण्यास कोणाला वेळ मिळणार? दुसरी बाब ‘बातम्यां’ची. अहोरात्र त्यांचा घाणा चालवायचा म्हटल्यावर तितक्या बातम्या तरी कुठून आणणार? चित्रवाहिन्यांत बातमीसाठी पहिली अट असते दृश्यात्मकतेची. बातमीला दृश्य हवं. ते लोकांना खिळवून ठेवणारे हवं. हे सारे करायचं, तर गावोगावी बातमीदार हवेत. त्यासाठी पैसे हवेत. एकंदरच सॅटेलाईट टीव्हीचा मामला अतिखर्चिक. त्यामानाने उत्पन्न कमी. हा मेळ कसा घालायचा? यावर वाहिन्यांनी उपाय शोधला तो चर्चात्मक कार्यक्रमांचा. ते कमी खर्चिक. वाहिन्यांनी असे कार्यक्रम सुरू केले. त्यात सूत्रसंचालकवजा संपादक सरकारला, व्यवस्थेला प्रश्न विचारू लागले. जे लोक स्वतःस कशासही उत्तरदायी समजत नाहीत, त्यांना आपले पत्रकार आजचा सवाल करत धारेवर धरताहेत, हे पाहणं सामान्यांसाठी पर्वणीच होती. पण ही झाली प्राचीन गोष्ट. आता सगळ्यांनीच असे कार्यक्रम सुरू केल्यानंतर त्यात काही तरी वेगळेपणा हवा. यातून मग स्पर्धा सुरू झाली किंचाळण्याची. फटाक्यांच्या आणि डीजेच्या आवाजाने आनंदी होणारा, ट्रेनच्या डब्यात वादावादी सुरू झाली की विंडोसीट सोडून तिकडे जाणारा अफाट प्रेक्षकगण समोर होताच. त्याला भुलवायचं तर अधिक मोठा आवाज हवा. नौटंकी हवी. हळूहळू हे कार्यक्रम भाषिक हिंसाचाराकडे वळले. हे सारं ‘टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट’ (टीआरपी)साठी चाललेलं आहे हे सगळेच जाणतात. अधिक टीआरपी, अधिक महसूल असा तो मामला आहे. हे सारं काही काळ सुखेनैव सुरू होतं. पण डिजिटल क्रांती झाली आणि याला पहिला फटका बसला.
डिजिटल क्रांतीने माध्यमविश्वात मोठी उलथापालथ केली. परवडणारे संगणक, मोबाईल फोन आणि स्वस्त डेटा यांनी माध्यमक्षेत्रातील ‘उत्पादक’ आणि ‘ग्राहक’ ही सीमाभिंत ध्वस्त केली. आता बातम्यांचा सर्वसामान्य ग्राहकही प्रसंगी बातमीदार बनला. हे ‘न्यूजकन्टेन्ट’चे ‘टिकटॉकीकरण’ ही त्याची पहिली पायरी होती. ऑल्विन टॉफ्लर यांच्या शब्दांत सांगायचे, तर माध्यमक्षेत्रातील ‘प्रोझ्युमरीझम’ची ही सुरुवात होती. त्याचंच रूपांतर आता यूट्यूबवरील वृत्तवाहिन्यांत झालेलं आहे. यूट्यूब हा टीव्हीचा मोठा स्पर्धक बनललेला आहे. डिजिटल जाहिरातींतील वाढ सांगतेय, की टीव्ही वृत्तवाहिन्यांचा अखेरच्या घरघरीचा काळ सुरू झालेला आहे. या काळात टिकण्यासाठी या वृत्तवाहिन्या आता कोणत्याही स्तरावर उतरायला तयार आहेत. त्यांनी कमरेचे सोडून डोक्यास बांधलेले दिसते ते यामुळेच.
यात प्रश्न असा पडतो, की यात जे खरेखुरे पत्रकार आहेत, त्यांचं काय? आपण रोजच्या रोज सुसंस्कृतता, सुजाणता, सभ्यता आदी बाबींचे दैनिक श्राद्ध घालत आहोत, हे त्यांना समजत नाही अशातला भाग नाही. टीव्ही असो, की यूट्यूब वा ई-दैनिके यांत आजही अनेक उत्तम पत्रकार, बातमीदार काम करीत आहेत. चांद्रयानची बातमी अवकाशवीरांसारखा पोशाख घालून सांगणं, युद्धाच्या बातम्या सांगताना सायरनचा भोंगा वाजवत राहणं या गोष्टी बालिशाहून बालिश आहेत हे अनेकांना कळतं. आपण करतोय ती पत्रकारिता नाही याचं भान त्यांनाही आहे. पण सवाल जगण्याचा आहे. विविध दैनिकांच्या आज स्वतंत्र ई-आवृत्त्या आहेत. त्यांत ‘क्लिक-बेट’ नावाचा प्रकार असतो. बातमीत काहीही असो, तिचा मथळा असा सनसनाटी द्यायचा, की वाचक नामक मासा गळाला लागलाच पाहिजे. याच्या पायी अनेक ई-आवृत्त्यांना ‘सॉफ्ट पोर्न’चं स्वरूप आलेले आहे. यातून वाचकांची फसवणूक होते आणि हे अंतिमतः पत्रकारितेच्या विश्वासार्हतेकरीता हानीकारक आहे, हे त्या माध्यमातील तरुण मुला-मुलींनाही कळतं. अनेक जण तसं बोलूनही दाखवतात. पण त्यांना ‘पेज व्ह्यू’चं लाखालाखाचं ‘टार्गेट’ ठरवून दिलेलं असतं. तुम्ही दिलेल्या बातमीला किती जणांनी ‘भेट’ दिली (वाचली नव्हे!) हे महत्त्वाचं. ते लक्ष्य पूर्ण करायचं. त्यासाठी मग कमरेचे सोडून डोक्याला बांधायचं. अनेकांना हे पटत नाही. पण पुन्हा नोकरीचा सवाल असतो. तुम्ही नाही केलं, तर दुसरं कोणी तरी ते करणारच आहे. या परिस्थितीला जबाबदार आहेत या माध्यमांचे मालक आणि त्यांच्यापुढे झुकलेले कणाहीन संपादक.
हे लोक कधी बदलतील का? शक्यता कमी आहे. उलट ही माध्यमं अधिक ताळतंत्र सोडून वागू लागतील. त्यांना ताळ्यावर आणण्याचं काम करू शकतील ते अखेर सार्वभौम प्रेक्षक आणि वाचकच. या माध्यमांचा प्राण ‘टीआरपी’ आणि ‘पीव्ही’च्या पोपटात आहे. लोकांनी आपापल्या पातळीवर ठरवलं, तर ते या पोपटाची मुंडी मुरगळू शकतात. यात अडचण इतकीच आहे, की असं करण्यात लोकांना, तुम्हाला-आम्हाला रस आहे का? आपल्याला स्वच्छ वार्तांकन हवं आहे का? की आपल्या बाजूने बोलतो तोच ‘निःपक्षपाती’, आपल्या मतांचे असतील तेच ‘विश्वासार्ह’ याच विकृत व्याख्या कवटाळून आपण टीव्ही आणि यूट्यूब आणि वृत्तपत्रांकडे पाहणार आहोत? आपला वर्ग सुजाण, सुसंस्कृतांचा आहे की फटाक्यांच्या आवाजाने आनंदी होणाऱ्यांचा आणि डीजेप्रेमींचा आहे, हे आता ज्याने-त्याने ठरवायचं आहे. ते करायचं नसेल, तर ‘आधीच मर्कट तशात युद्धखोरीचे मद्य प्याला’ अशी जी सध्याची माध्यमावस्था आहे, ती पाहून उगाच टीकाबिका करण्याच्या फंदात कोणी पडू नये.
रवि आमले | ravi.amale@gmail.com
रवि आमले मुक्त पत्रकार असून, त्यांची ‘रॉ’ व ‘परकीय हात’ ही पुस्तकं प्रसिद्ध आहेत