
पहलगामला दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यामुळे देश संतप्त झाला आहे. अनेक वर्षांनंतर देशात युद्धाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. एकदा का युद्धाला तोंड फुटलं की दोन्ही बाजूंचे सैनिक आवेशाने, त्वेषाने हल्ला-प्रतिहल्ला करतात. युद्धांमध्ये सूडाच्या विकृत घटना घडतच असतात.
सौरभ कालियाचं प्रकरण भारतीय विसरले नसतील. कारगिल युद्धात जून १९९९ मध्ये कॅप्टन सौरभ कालिया यांच्या नेतृत्वाखालील सहा जणांच्या गस्तीपथकाला काकसर सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी पकडलं. कॅ. कालिया आणि त्याच्या माणसांना २२ दिवस छळण्यात आलं आणि त्यांना ठार करून त्यांचे छिन्नविछिन्न केलेले मृतदेह भारतीय सैन्याला परत देण्यात आले.. राजौरी जिल्ह्यातील नौशेरा येथे सात भारतीय सैनिकांना ठार मारून त्यातील एकाचं डोकं पाकिस्तानमध्ये ट्रॉफी म्हणून नेण्यात आलं..
याउलट कारगिल युद्धात पाकिस्तानने त्यांच्या सैनिकांची शवं परत घेतली नाहीत, तेव्हा भारतीय सैन्याने इस्लामी पद्धतीने त्यांचं दफन केलं.. मनाचा दिलदारपणा दाखवणाऱ्या अशा घटना मनात घर करून बसतात.
कारगिलच्या युद्धातच कर्नल शेरखान शाहीद या पाकच्या अधिकाऱ्याने मोठा पराक्रम गाजवला होता. त्यासाठी त्याला पाकिस्तान सरकारने 'निशाने हैदर' हा सर्वोच्च पुरस्कार बहाल केला. पण त्याला कारणीभूत होते ते भारताचे ब्रिगेडियर बाजवा. भारतीय सैनिकांशी लढताना शेरखान मृत्युमुखी पडला. पण तो शौर्याने लढला होता. जेव्हा तुमचा शत्रू प्रबळ असतो, तेव्हा त्याला हरवणं हा खरा मोठा पराक्रम असतो ! हा पराक्रम भारतीय सैन्याने गाजवला.पण त्याच वेळी त्यांनी कर्नल शेरखानच्या पराक्रमाची दखल घेण्याचा मनाचा मोठेपणाही दाखवला. ब्रिगेडियर बाजवांनी मृत शेरखानच्या शर्टाच्या खिशात एक चिठ्ठी ठेवली, त्यात लिहिलं होतं 'ये बच्चा बहादुरी से लडा।' त्याची दखल घेऊन पाक सरकारने त्याला मरणोत्तर 'निशाने हैदर' हा किताब बहाल केला.

मग त्याचा पुतळा उभारला गेला आणि दोन वर्षांपूर्वी मे महिन्यात इम्रान खानला अटक झाल्यावर झालेल्या सरकारविरोधी आंदोलनात इम्रानच्या समर्थकांनी तो पुतळा तोडला. भारताने त्याची इज्जत राखली,पण पाकिस्तान्यांनीच त्याला बेइज्जत केलं. देशासाठी आपले पंचप्राण ओवाळणाऱ्यांची हेटाळणी करणारे असे राजकारणी साऱ्या जगात असतात, भारतात सुद्धा !
१९७१च्या युद्धातही भारतीय अधिकाऱ्यांनी मनाचा असाच दिलदारपणा दाखवला होता. पूर्व बंगालमध्ये माघार घ्यावी लागत असल्याचं लक्षात आल्यावर पाकिस्तानने पश्चिम आघाडी उघडली. परंतु तिथेही पाक सैन्याचा धुव्वा उडवत भारतीय सैन्य जारपालपर्यंत पोहचलं. या युद्धात ग्रेनिडियर्स रेजिमेंटच्या मेजर होशियार सिंह यांनी मोठं शौर्य गाजवलं. पाकचा तिखट हल्ला होत असतानाही त्यांनी जारपालचं ठाणं दोन दिवस राखलं. त्यासाठी त्यांना पुढे परमवीर चक्र मिळालं.
भारताविरुद्ध लढताना पाकच्या ३५ फ्रंटियर रायफलच्या लेफ्टनंट कर्नल मोहमद अक्रम रजानेही या युद्धात चांगलंच शौर्य गाजवलं. पण होशियारसिंहच्या सैनिकांपुढे त्याचा टिकाव लागला नाही. तो व त्याचे सैनिक मृत्युमुखी पडले. भारताच्या ग्रेनेडिअर्सच्या लेफ्टनंट कर्नल वेद एअरींनी रजाच्या शौर्याची प्रशंसा केली. त्याची दखल घेऊन पाक सरकारने रजाला मरणोत्तर 'हिलाल इ जुरात'ने गौरवलं.
पश्चिम आघाडीवर तत्कालीन बिग्रेडिअर अरुण श्रीधर वैद्य यांच्या नेतृत्वाखाली आपलं सैन्य लढलं. त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन सरकारने त्यांना महावीर चक्र बहाल केलं. त्यांचं हे दुसरं महावीर चक्र होतं. याअगोदर १९६५ च्या युद्धात त्यांनी बजावलेल्या पराक्रमामुळे त्यांना महावीर चक्र मिळालं होतं.
पुढे हा लढवय्या सेनाधिकारी भारताचा लष्करप्रमुख बनला. निवृत्तीनंतर ते पुण्यात राहायला आले. एकदा एका महाविद्यालयाचे प्राचार्य पुरुषोत्तम शेठ हे एका कार्यक्रमासाठी त्यांना आमंत्रित करण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. त्यावेळी जनरल अरुणकुमार वैद्य यांना धमक्या येत असत. तरी देखील ते पुण्यात खुलेपणाने फिरत असत. बोलता बोलता ते शेठना म्हणाले, 'माझ्यावरचा धोका अजून टळलेला नाही.' आणि त्यांची ती भीती खरी ठरली. खलिस्तान्यांच्या भ्याड हल्ल्यात ते मृत्युमुखी पडले.

१९७१च्याच युद्धात बसंतार येथे झालेल्या लढाईत 'पुणे हाँर्स रेजिमेंट'च्या सेकंड लेफ्टनंट अरूण खेत्रपालने पाकचे तीन ते चार पॅटन रणगाडे नष्ट केले. त्यांच्या रणगाड्याचीही पाकच्या गोळीबारात हानी झाली होती. तरीसुद्धा गन चालू असल्याने त्यांनी रणगाडा सोडला नाही. शेवटी पाकच्या १३ लँन्सरच्या मेजर ख्वाजा नासेरच्या टँकने त्यांचा सरळ वेध घेतला. या शौर्याबद्दल अरुण खेत्रपाल यांना मरणोत्तर परमवीरचक्र दिलं गेलं.
तीस वर्षांनंतर अरुण खेत्रपाल यांचे वडील ब्रिगेडियर एम.एल. खेत्रपाल पाकिस्तानातील सरगोधा या ठिकाणी आपल्या वडिलोपार्जित घराला भेट देण्यासाठी गेले होते. तेव्हा ब्रिगेडियर ख्वाजा मोहम्मद नासेर यांनी त्यांचं लाहोरमध्ये आदरातिथ्य केलं. शेवटच्या दिवशी खेत्रपाल भारतात येण्यासाठी निघाले, तेव्हा नासेर यांनी त्यांच्यापुढे कबुली दिली, की १९७१मध्ये तुमचा मुलगा माझ्याकडून मारला गेला. त्याचा हा कबुलीजबाब ऐकून खेत्रपाल सुन्न झाले. आपल्या मुलाचा मारेकरी आपल्या समोर उभा राहून सांगतोय, की मी तुमच्या मुलाला मारलं. तो पिता स्तंभित होऊन पाहतच राहिला. पण थोड्याच वेळात त्यांनी स्वतःला सावरलं. त्यांच्यातील सैनिकाने नासेरच्या सच्चेपणाला दाद दिली. नासेरनीही त्यावेळी अतुलनीय शौर्य गाजवलेल्या अरुण खेत्रपालची प्रशंसा केली.

१९ सप्टेंबर १९६५ रोजी भारताचं नागरी जेट विमान पाकच्या साबरजेटने गुजरातमधील द्वारकाजवळ पाडलं. त्यात गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री बलवंतराय मेहता व त्यांची पत्नी ठार झाले. हे विमान जहांगीर इंजिनीअर चालवत होते. तर पाकचं विमान फ्लाईग आँफिसर क्यू. ए. हुसेन चालवत होते. या घटनेनंतर ४५ वर्षांनी हुसेन यांनी वैमानिक जहांगीर इंजिनीअर यांची मुलगी फरिदा सिंग यांना पत्र पाठवून या चुकीबद्दल माफी मागितली. या घटनेचं स्पष्टीकरण देताना त्यांनी लिहिलं, की ‘जेव्हा एक विमान पाकिस्तानच्या रडारवर दिसायला लागलं तेव्हा त्या विमानाचा शोध घेण्याचा मला आदेश मिळाला. त्वरित मी अमेरिकन एफ ८६ विमानाने निघालो. शोध घेतल्यावर कळलं की ते नागरी विमान आहे. तसं मी एअर चीफ कंट्रोलरला कळवलं. पण तरीसुद्धा त्यांनी मला ते विमान पाडण्याचा हुकूम दिला आणि मग ते पाडलं गेलं.' पुढे त्यांनी लिहिलं की, ' फायटर पायलटला आदेश मिळाल्यानंतर दोन गोष्टींच्या वेळी खुलासा करावा लागतो. जर तो विमान पाडण्यात चुकला तर त्या चुकीसाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी होते. आणि त्याने जाणूनबुजून विमान पाडलं नाही तर आदेश पाळण्यात कसूर का केली गेली याची चौकशी होते. माझं मन खात असतानाही मी इतकी वर्षं तुमची माफी मागितली नव्हती.' त्यांची ही माफी फरिदा सिंगने स्वीकारली. 'दुर्दैवी युद्धकालीन तातडीच्या गोंधळात' हे विमान पाडलं गेलं ही समजूत करून घेऊन तिने या विषयावर पडदा पाडला. हे विमान पाडलं म्हणून तेव्हा शिवाजी पार्कवर - शिवतीर्थावर - पाकिस्तानचा निषेध करणारी सभा घेण्यात आली होती. महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री बाळासाहेब देसाई व आचार्य अत्रे यांची त्या सभेत भाषणं झाली होती.
१९६५ च्या युद्धात खेमकरण भागातून पाक सैन्याला हुसकावून लावण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या फ्लाईट लेफ्टनंट नंदा करिअप्पा यांचं विमान पाकने पाडलं. ते पकडले गेले. ही बातमी पाक राष्ट्राध्यक्ष अयूबखानना कळताच त्यांनी त्यांना खास वागणूक देण्याचे आदेश पाक सैनिकांना दिले. कारण फाळणीपूर्व काळापासून त्यांची नंदांच्या वडिलांशी घनिष्ट दोस्ती होती. ते मित्र म्हणजे फिल्डमार्शल के.एम.करिअप्पा. भारताचे पहिले लष्कर प्रमुख. अयूबखाननी नंदांना सोडून देण्याचीही तयारी दर्शवली. परंतु करिअप्पांनी या दोन्ही गोष्टी नाकारल्या. 'नंदा आता केवळ माझा नव्हे तर भारताचा सुपुत्र आहे. फक्त तो एकटा नव्हे तर सारे भारतीय सैनिक माझी मुलं आहेत,' असं त्यांनी अयूबखानना कळवलं. जेव्हा युद्धकैद्यांची परत पाठवणी झाली , तेव्हा भारतीय हवाई दलाच्या शेवटच्या जत्थ्यात नंदा होते.

१९६२च्या चीनसोबतच्या युद्धात भारताची अतोनात हानी झाली. अनेक मृत्युमुखी पडले, तर काही जखमी झाले. या जखमींपैकी एक होते मेजर अण्णा पवार. चीनविरुद्धच्या चकमकीत बोमदिलाजवळच्या जंगलात ते जखमी झाले. ते पळून जाऊ शकत होते. पण त्यांच्यासोबतचा कर्नल आत्यंतिक जखमी झाला होता. त्याला सोडून ते पुढे जाऊ शकत नव्हते. तेव्हा त्या बहादूर कर्नलने अण्णांना सांगितलं, "अण्णा, तू पळून जा. फक्त पळून जाताना माझ्या तोंडात सिगरेट ठेव व तुझ्या जवळचा ट्रॅन्झिस्टर खाली ठेव. त्यावर 'विविध भारती' लाव." जड मनाने मेजर पवार तिथून निघून गेले. थोड्याच वेळात पाठलागावर असलेले चिनी सैनिक तेथे पोहचले. आडव्या पडलेल्या त्या जखमी कर्नलला त्यांनी लाथ मारली आणि नाव विचारलं. कर्नल म्हणाले, " आय डोन्ट नो माय फादर्स नेम, आय डोन्ट नो माय मदर्स नेम, आय नो ओन्ली मदर इंडिया."
युद्धांच्या मोठमोठ्या बातम्यांच्या आत बहादुरीच्या आणि माणुसकीच्या अशा छोट्या छोट्या कथा दडलेल्या असतात.
संदर्भ:
India's wars: A Military History, 1947- 1971 (Arjun Subramaniam)
स्मारिका, गोड्या पाण्याच्या विहिरी (पुरुषोत्तम शेठ)
आंतरजाल
प्रदीप राऊत
प्रदीप राऊत हे विविध विषयांवर लिखाण करणारे हौशी लेखक असून सध्या एकोणीसाव्या शतकातील घडामोडींचा अभ्यास करत आहेत.