
अमेरिकेतल्या आफ्रिकन-अमेरिकन जनतेच्या हक्कांसाठी शांततापूर्ण लढा देणारे नोबेल पुरस्कार प्राप्त नेते मार्टिन ल्युथर किंग (ज्यु.) यांचा आज स्मृतिदिन. मार्टिन ल्युथर किंग यांचं भारताशी वेगळं नातं होतं. 'इतर देशांमध्ये मी पर्यटक म्हणून जातो, पण भारतात मात्र मी भाविक म्हणून नतमस्तक होऊन आलो आहे', असे उद्गार त्यांनी त्यांच्या जुलै १९५९ मधल्या भारतदौऱ्यात काढले होते. मार्टिन ल्युथर यांनी उभारलेल्या लढ्यामागे महात्मा गांधींची प्रेरणा होती हे या उद्गारांमागचं कारण.

मार्टिन ल्युथर यांच्या जीवनावर आणि चळवळीवर गांधीजींचा मोठा प्रभाव होता. "गांधीजींनी दाखवलेला अंहिसात्मक लढ्याचा मार्ग म्हणजे वंचितांना त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यात उपयोगी पडणारा एकमेव नैतिक आणि व्यवहार्य मंत्र आहे", असं मार्टिन ल्युथर म्हणत असत.

त्यामुळेच १९५९ मध्ये मार्टिन ल्युथर किंग महिन्याभरासाठी 'गांधीजींच्या भारतात' आले होते. त्यांनी या भेटीत महात्मा गांधींच्या दिल्लीतल्या स्मृतिस्थळाला, 'राजघाट'ला भेट दिली.
पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू, राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद, उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन, राजकुमारी अमृत कौर, जयप्रकाश नारायण अशा अनेकांच्या त्यांनी भेटी घेतल्या.
त्यावेळी विनोबा भावेंची भूदान यात्रा सुरू होती. विनोबांना भेटण्यासाठी मार्टिन ल्युथर राजस्थानात गेले. त्यांच्या भेटीमुळे ते इतके भारावून गेले की अजमेर-किशनगढ दरम्यान ते भूदान यात्रेत विनोबांसोबत चालले देखील.
अमेरिकेत परतल्यावर मार्टिन ल्युथर यांनी या भारत भेटीवर एबनी या मासिकात लेखही लिहिला होता.
टीम युनिक फीचर्स पोर्टल | 9156308310 | uniquefeatures.portal@gmail.com
टीम युनिक फीचर्स पोर्टल