आम्ही कोण?
आडवा छेद 

इराण जनतेचं कधी ऐकणार?

  • निळू दामले
  • 12.01.26
  • वाचनवेळ 4 मि.
iran

इराणमधे दोनेक हजार आंदोलकांना सैनिकांनी गोळ्या घातल्या आहेत. इराणमधल्या सत्तेची घडण बदलू घातलीय. खूप माणसं मारल्याशिवाय, खूप रक्त सांडल्याशिवाय इराणमधे सत्ता बदल होत नाही असा गेल्या ऐंशी नव्वद वर्षांचा इतिहास आहे. इतिहासाचं तेच सूत्र पुढं सुरू रहाणार असं दिसतंय.

गेले दोनेक आठवडे इराणमधली जनता रस्त्यावर उतरलीय. इराणी रियाल काहीच्या काही घसरला. अन्नपदार्थ आणि घरात वापरायचं तेल यांच्या किमती तिप्पट झाल्या, हे निमित्त झालं. सरकार या दुरवस्थेला जबाबदार आहे असं म्हणत इराणी जनता आंदोलनात उतरली, आंदोलनाने हिंसक वळण घेतलं.

सुरुवातीला अध्यक्ष पेझेशक्यान समजुतीची भाषा करत होते, आंदोलकांशी संवाद करायला तयार झाले होते, अगदी ताबडतोबीचा इलाज म्हणून त्यांनी नागरिकांना काही रक्कम मदत-नुकसानभरपाई म्हणून देऊ केली. पण ती मदत म्हणजे उपाशी माणसाला भाकरीऐवजी शब्द देण्यासारखी होती. शिवाय आंदोलकांना नेतृत्वच नसल्यामुळे त्यांच्याशी संवादही सुरू झाला नाही. इराणला राजकीय पक्षांची सवय नाही, मोकळा संवाद आणि मोकळी वर्तमानपत्रं याला इराण गेली कित्येक दशकं मुकलेला आहे. त्यामुळं जनतेला नेमकं काय हवंय ते सांगणारी माणसं, जनतेच्या मताला वळण लावणारी माणसं समाजात तयार झालेली नाहीत. परिणामी जनतेचं बाह्य रूप एक गर्दी, एक जमाव असं झालं. जमावाशी संवाद कसा होणार?

दुसऱ्या बाजूला पेझेशक्यान काहीही म्हणोत, पण त्यांच्या सरकारची रचनादेखील दंडेली करणारी संघटना अशाच स्वरूपाची आहे. समाजात व्यवस्था राखणाऱ्या दोन संस्था असतात, पोलिस आणि लष्कर. या दोन्ही संघटनांचा इराणमधला इतिहास वाईट आहे. काही दशकं पहलावी या राजाची सत्ता होती, त्यानंतर आजवर अयातुल्ला लोकांची सत्ता आहे. राजा असो किंवा इराणचे ‘सर्वोच्च नेते’ अयातुल्ला असोत; दोघंही पोलिस आणि लष्कर ही त्यांची व्यक्तिगत मालमत्ता मानतात. पहलावी घराणं स्वतःला आर्यांचा नेता म्हणवत असे, त्या अधिकाराने ते देशावर राज्य करत. अयातुल्ला स्वतःला इस्लामचे रक्षक मानतात, त्या नात्याने ते राज्य करतात. सबब काहीही असो, राजकारण एकहाती आणि हुकूमशाही पद्धतीनेच चालतं, तिथे पोलिस आणि लष्कर सर्वोच्च नेत्याच्या हुकूमानुसार चालतं, जनतेला त्यात काही वाव नसतो.

खोमेनी यांनी १९८९ साली सत्ताग्रहण केल्यानंतर क्रांतिकारी शिपायांची (रेव्होल्युशनरी गार्ड्स) संघटना तयार केली. ही संघटना लष्कराचा एक भाग होती. ती लष्कर आणि पोलिसांच्या आदेशानुसारच चालत असे. या शिपायांवर खोमेनींचं थेट नियंत्रण होतं. शिपायांच्या नेमणुका, बढत्या या सगळ्या गोष्टी खोमेनी करत. इराणचं आणि जगाचं राजकारण कसं करायचं हे खोमेनी ठरवत आणि त्यांच्या हातातलं मुख्य हत्यार हे शिपाई होते. खोमेनी आणि क्रांतीकारी शिपाई मिळून देश चालवत.

इराणातल्या अनेकांना क्रांतिकारी शिपाई प्रकरण वांध्याचं आहे हे कळत होतं. देशाचे आर्थिक निर्णय इत्यादी सर्व गोष्टींत त्यांची ढवळाढवळ असे. थोडक्यात देशाचे सर्वच निर्णय ते घेत हे बरोबर नाही असं अनेकांचं मत होतं. इराणवर पगडा असणाऱ्या इस्लामी संघटनांतल्याही अनेकांना त्यात बदल घडवायला हवेत, असं वाटत असे. पण खोमेनींच्या काळात कोणाची बोलायची टाप नव्हती. खोमेनींच्या नंतर इस्लामी एस्टॅब्लिशमेंटमध्ये सुधारकी विचारही काहीसा फोफावला. खतामी हे त्या सुधारकी विचारांचे होते. सुधारकी इस्लामला धरून होते; पण शिपाईगिरी आटोक्यात ठेवावी आणि देशकारण अधिक व्यवहारी करावं असं त्यांचं मत होतं. पेझेशक्यान हे त्या सुधारक गटाचे आहेत.

खतामी गेले, पेझेशक्यान आले. पेझेशक्यान यांना लोकांचा भरधोस पाठिंबा आहे, ते पेशाने मुल्ला नसून डॉक्टर आहेत. ते नेमस्त आहेत, आगखाऊ नाहीत. रोग्याशी दंडेली करून चालत नाही, रोग्याला समजून घेऊन त्याच्या कलाने घेऊन उपचार करावे लागतात हे त्यांना समजतं. इराणला दाबून ठेवणाऱ्या मुल्लांमधे ती समज नाही. त्यामुळे शिपाईगिरी आटोक्यात ठेवायला ते तयार नाहीत.

पेझेशक्यान यांना संसदेचा पाठिंबा आहे. पेझेशक्यान यांना बहुदा जनतेचाही पाठिंबा आहे. पण क्रांतिकारी शिपाई आणि त्या शिपाई दलाच्या आधारे राज्य करणाऱ्या मुल्लांचा पाठिंबा पेझेशक्यान यांना नाही.

त्यामुळंच पेझेशक्यान समजुतीची भाषा करत असताना तिकडे या शिपायांनी दोनेक हजार नागरिकांना गोळ्या घातल्या आहेत. किती नागरिकांचा तुरुंगात छळ होतोय ते कळायला मार्ग नाही. इराणमधे पत्रकार सत्ताधाऱ्यांचंच ऐकतात, स्वतंत्रपणे माहिती वाचकांसमोर ठेवण्याची सवय इराणमधून नाहिशी झाल्याला दशकं लोटलीत. प्रॉब्लेम इराणचा, इराणी जनतेचा आहे. इस्लामबद्दलच्या कालबाह्य, अतिरेकी,अव्यवहारी आणि थिजलेल्या विचारांच्या पायी इराणने इराकशी युद्ध उकरून काढलं. दहा वर्षं युद्ध चालवलं. त्यात लाखो माणसं मारली. तिकडे दुसऱ्या बाजूलाही तितकाच थोर सद्दाम हुसेन होता. या खोमेनींच्या उद्योगात नाइलाजाने म्हणा किंवा कसंही म्हणा इराणी जनता सामील होती.

काही इराणी म्हणत आहेत की अण्वस्त्रं काय चुलीत घालायचीत? चुलीत घालायला लाकडं लागतात, भाकऱ्या करायला धान्य आणि इंधन लागतं त्याची व्यवस्था न करता अण्वस्त्रं करून काय मिळवणार? जनतेचं हे म्हणणं सरकारच्या निर्मितीत, सरकारच्या कामांत प्रतिबिंबित व्हायला हवं. इराणी जनतेला ते जमलं नाहीये ही अडचण आहे.

इराणी जनता शिरीन एबादीबरोबर जात नाही; पॅलेस्टाईनमधे हन्नान अश्रावी यांच्या बरोबर बहुसंख्य पॅलेस्टिनी जात नाहीत. समाज आणि संघटित राजकीय संस्था यातील दुरावा; संघटित राजकीय संस्था आणि शहाणपण यातला दुरावा; या जागतिक संकटात इराणही सापडलेला आहे.

एकेकाळी अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स यांनी इराणमध्ये सत्ता बदल घडवले, आता अमेरिका तो उद्योग करणार आहे. इराणी जनतेनेच यातून आपली वाट काढायची आहे.

निळू दामले | 9820971567 | damlenilkanth@gmail.com

निळू दामले हे जगभरातील विविध विषयांवर अभ्यासपूर्ण आणि सहज शैलीत लिखाण करणारे ज्येष्ठ पत्रकार आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 1

Moon11.02.26
Your article reads more like a personal opinion piece than objective journalism. Many claims appear exaggerated or unsupported, and complex historical and political realities are reduced to simplistic conclusions. A more nuanced and evidence-based approach would make the analysis more credible.

Select search criteria first for better results