आम्ही कोण?
ले 

नेतान्याहूंनी इराणशी लढाई का आरंभलीय?

  • निळू दामले
  • 14.06.25
  • वाचनवेळ 5 मि.
netanyahu israel iran

इस्रायलने इराणवर हल्ला केला. इराणने इस्रायलवर प्रतिहल्ला केला. हे घातक युद्ध किती दिवस चालेल? एका लघु महायुद्धाची शक्यता निर्माण होतेय काय? या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळेल.

इस्रायलने इराणमधल्या दहापेक्षा अधिक ठिकाणांवर हल्ला केला. राजधानी तेहरानवरही गोळे डागले, रॉकेटं फेकली. इराणचे काही अणुशास्त्रज्ञ, लष्करी अधिकारी आणि धर्मलष्कराचे काही अधिकारी मारले गेले.

इस्रायलचं म्हणणं होतं की इराणने अण्वस्त्रं विकसित करायला घेतलीत, ती अण्वस्त्रं इराण इस्रायलवर टाकेल, ते टाळण्यासाठी एक खबरदारी म्हणून इस्रायलला हल्ला करावा लागला.

इराण गेली २५ वर्षांपेक्षा अधिक काळ अणूइंधन विकसित करत आहे. सुरुवातीला शांततेसाठी (औषधं, ऊर्जा,खतं इ.) अणुइंधन विकास करत आहोत असं इराणचं म्हणणं होतं. नंतर इराणने शस्त्रास्त्रांसाठी वापर करता यावा यासाठी युरेनियम शुद्धीकरण सुररू केलं. इस्रायल, अमेरिका इत्यादी देशांचा युरेनियम विकासाला विरोध होता. इराणचं नेतृत्व हिंसक आणि धोकादायक असल्याने इराणकडं अण्वस्त्रं असणं धोक्याचं आहे अशी त्यांची भूमिका होती. (नेतान्याहू-ट्रंप या मानसिक संतुलन ठीक नसलेल्यांच्या हाती इस्रायल-अमेरिकेची शस्त्रं आहेत त्याचं काय?)

इराणचं म्हणणं होतं की स्वसंरक्षणासाठी, इस्रायल या शत्रू देशावर वचक ठेवण्यासाठी अण्वस्त्रं बाळगण्याचा अधिकार इराणला आहे. या मुद्द्यावर जगभर दुमत होतं. मधली वाट म्हणून युनोने इराणला अण्वस्त्र वापराबाबतच्या आंतरराष्ट्रीय करारात सामील होण्याची सूचना केली. म्हणजे आंतरराष्ट्रीय संस्था अणुसंशोधनावर लक्ष ठेवेल.

इराणने करारात सामील व्हावं यासाठी अमेरिकेने इराणवर दबाव आणला. आर्थिक निर्बंध लादले. ओबामा यांच्या काळात आर्थिक निर्बंध शिथील करून इराणला आंतरराष्ट्रीय देखरेखीत आणण्याचा प्रयत्न झाला. बायडन यांच्या काळात तो प्रयत्न सुरू राहिला, ट्रंप यांनी मात्र निर्बंध पुन्हा उगारले, इराणबरोबरची चर्चा बंद केली. परिणामी इराणने युरेनियम शुद्धीकरणाचा कार्यक्रम सुरू ठेवला.

एक बातमी अशी आहे की, इराणने ८०० टन युरेनियम इंधन सुमारे ६० टक्के शुद्ध केलं. आठ दहा अण्वस्त्रं तयार करण्याइतपत इराणची तयारी झाली होती. या बातमीने अमेरिका आणि इस्रायल हादरलं. इस्रायलने इराणला ताकीद देण्यासाठी इराणच्या दमास्कसमधील (सीरिया) दूतावासावर हल्ला केला. ही घटना एप्रिलमधली. इराणने प्रत्युतर म्हणून इस्रायलवर रॉकेटं आणि ड्रोन फेकले.

अमेरिकेने मे महिन्यात इराणशी वाटाघाटी सुरू केल्या. युरेनियम शुद्धीकरण बंद केलंत तर आर्थिक निर्बंध उठवू असा प्रस्ताव इराणसमोर ठेवला. इस्रायलचा ट्रंप यांच्या प्रस्तावाला विरोध होता. आर्थिक विकास झाला की इराण आपल्या जिवावर उठणार असं इस्रायलचं मत होतं. इस्रायलबरोबर अमेरिकेचे पूर्वापार घनिष्ट संबंध आहेत. पण ट्रंप हा व्यापारी माणूस. डील करणारा. ट्रंपनी इस्रायलला टांग मारली, स्वतंत्रपणे इराणशी वाटाघाटी सुरू केल्या.

इराण-अमेरिका वाटाघाटी चालल्या असतानाच इस्रायलने इराण हल्ल्याची तयारी सुरू केली. ट्रंपना याची कुणकुण लागली होती. त्यांनी नेतान्याहूना लढाई करू नका, मुत्सद्देगिरीच्या वाटेने जा असा निरोप पाठवला. वाटाघाटी यशस्वी झाल्या की तेहरानमधे ट्रंप टॉवर उभारण्याचा त्यांचा बेत असावा. नेतान्याहू म्हणाले ‘तुमच्या नानाची टांग. मी हल्ला करणारच.’

सहा आठवडे वाटाघाटी होत होत्या. इराण मागे हटलं नाही. आपल्या अस्तित्वासाठी अण्वस्त्रं तयार करणं हा आपला सार्वभौम अधिकार आहे असं इराणने सांगितलं, वाटाघाटी फेल झाल्या. त्या क्षणी इस्रायलने हल्ला करण्याचा निर्णय अमेरिकेला कळवला. अमेरिकेने मध्य पूर्वेतल्या आपल्या दूतावासांना सावधगिरीचा इशारा दिला, अमेरिकन माणसांना अमेरिकेत परत धाडा असा आदेश दिला. याचा अर्थ लढाईची तयारी झाली होती.

सौदी अरेबिया, कतार, ओमान, अमिराती, जॉर्डन या देशांनी इस्रायल हल्ल्याचा निषेध केला. इराणचा उल्लेख ‘बंधु इस्लामी देश’ असा केला. आजवर वरील सर्व देश अमेरिका धार्जिणे होते, इस्रायल धार्जिणे होते. अमेरिकेकडून मिळणाऱ्या आर्थिक व इतर फायद्यांचा विचार करून हे देश इस्रायलचे मित्र झाले होते. त्यामुळेच इस्रायल गाझाला कुटत असताना हे देश थंड राहिले. पण अलीकडे सौदी अरेबियाने गाझातल्या इस्रायलच्या कारवायांबद्दल जाहीर नापसंती दाखवून इस्रायलशी संबंध ठेवणार नाही, असा सूर आळवला.

इस्रायलने केलेला हल्ला हे एका सार्वभौम देशावरचं आक्रमण होतं. इराण-इस्रायल यांच्यात जुनं शत्रुत्व आहे, दोन्ही देश एकमेकाला खतम करू पहातात. इराण अण्वस्त्रं वापरेल ही भविष्यातली कल्पना सत्य मानून इराणवर हल्ला करणं आंतरराष्ट्रीय संकेतांना धरून नाही. खबरदारी म्हणून हल्ला करणं हा खूपच घातक तर्क आहे. हा तर्क वापरून जगातला कुठलाही देश इतर कुठल्याही देशावर आक्रमण करू शकतो. इस्रायलचं कृत्य चुकीचंच होतं. स्वतःची सत्ता वाचवण्यासाठी नेतान्याहू युद्धखोरी करत आहेत.

इस्रायलच्या कोर्टात नेतान्याहूवर भ्रष्टाचाराचा खटला दाखल आहे. इस्रायली कायद्यात बदल करून न्यायव्यवस्था लुळी करण्याच्या प्रयत्नात ते आहेत. इस्रायलमधले अनेक पक्ष नेतान्याहूवर दंडेली-हुकूमशाहीचा आरोप करत आहेत. सैन्यातल्या व पोलिसातल्या अनेक अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत, संरक्षण मंत्रीही नेतान्याहूंवर हुकूमशाहीचा आरोप करून सत्तेबाहेर पडले आहेत. युद्ध उकरून काढल्यामुळे झक मारत देशाला नेतान्याहूंना सहन करावं लागत आहे. युद्ध केलं की देशांतर्गत विरोधकांची तोंडं बंद करता येतात. नेतान्याहूंना विरोध म्हणजे देशद्रोह असं वातावरण नेतान्याहूंनी निर्माण केलंय.

इराण आणि हमासची वर्तणूक अयोग्य आहे यात शंका नाही. पण युद्ध हा शेवटला पर्याय असतो हा सर्वमान्य संकेत नेतान्याहूंना मान्य नाही. वाटाघाटी, समजुतीने वागणं, मुत्सद्देगिरी इत्यादी गोष्टी नेतान्याहूंना नको आहेत.

गाझा-इराण युद्धखोरीबद्दल युरोपीय देश, चीन, रशिया इस्रायलवर नाराज आहेत, त्यात आखाती मुस्लिम देशांचीही भर पडलीय.

एकटा पडलेला इस्रायल चिरडीला येऊन लघू युद्ध घडवेल की कूंकूं करत युद्ध थांबवेल? पाहायचं!

निळू दामले | 9820971567 | damlenilkanth@gmail.com

निळू दामले हे जगभरातील विविध विषयांवर अभ्यासपूर्ण आणि सहज शैलीत लिखाण करणारे ज्येष्ठ पत्रकार आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 2

Mahesh Kulkarni14.03.26
निळू दामले यांचा लेख वाचनीय आहे. लेख जुन 2025 मधील असुनही तो आजच्या परिस्थितीत ही तेवढाच रिलेव्हनंट आणि दखल घेण्याजोगा आहे. इस्त्रायल पुर्वी स्वसंरक्षणासाठी लढतोय असं जगाच मत बनविण्यात (अमेरिकेच्या सहाय्याने) यशस्वी ठरला. आपण हल्ल्याचे वारंवार बळी ठरतोय /पडतोय, तेव्हा स्वसंरक्षणासाठी हे हल्ले कसे योग्य आहेत हे ठसवतांना किंवा हे वारंवार प्रतिहल्ले करत असतांना त्यांची वाटचाल चुकली आणि ते आधिकाधिक आक्रमक, हल्लेखोर, क्रुर, होऊ लागले. हमास व हूती हे दहशतवादी गट आणि त्याला पोसणारे इराण हे तितकेच हल्लेखोर आहेत आहे हे मान्य करून देखील मुत्सद्देगिरीचा प्रयत्न नेत्यानाहू सारख्या नेता करणार नसेल तर मग दहशतवादी गट आणि तुमच्यात तुलनात्मक तरी फरक कसा करणार...? अमेरिका जेव्हा इराण वर अर्थिक निर्बंध लादते तेव्हा अमेरिकेच्या गळ्यात गळे घालायचे. मात्र अमेरिकेतील सरकारे बदलल्याने जर इराण वरील आर्थिक निर्बंध शिथिल करून चर्चा व वाटाघाटी करून प्रश्न सोडवायला नुसती सुरवात जरी केली तरी ती कशी सफल होणार नाही यांची ते नेहमीच योग्य ती काळजी घेतात. आणि अमेरिकेची दिशाभूल करण्याची खेळी ते खेळतात. यावेळीस तर ट्रम्प महाशय अध्यक्ष असल्याने त्याचे काम अधिक सुकर झाले. स्वतः चे लक्ष्य साध्य करत मनसोक्त हल्ले करून आधी इराणची पुरती वाट लावली वरून अमेरिकन हल्याचा वरवंटा देखील फिरवला. इस्त्रायल - इराण युध्दाचे स्वरूप असतांना ते प्रामुख्याने अमेरिका विरूद्ध इराण असे करून जगाची कोंडी करण्याइतपत परिस्थिती चिघळवत नेली. अमेरिकेला मात्र देशांतर्गत तसेच जागतिक स्तारावर अश्या दोन्ही ठिकाणी प्रतिवाद करावा लागतोय. इराणचे जे प्रचंड नुकसान झाले त्यामुळे तो सहजासहजी माघार घेणार नाही आणि डुबेंगे तो सनम आप को साथ में लेके डुबेंगे अशी अवस्था नक्की करणार. अमेरिका आणि इस्त्रायल या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. इस्त्रायला अरब आणि मुस्लिम राष्ट्रांच्या पासून स्वतः चे संरक्षण करायचे आहे तर अमेरिकेला अरब आणि तेल उत्पादक राष्ट्रांवर आपला ताबा हवाय. या परिस्थितीत आपले सार्वभौमत्व टिकवतांना दुसर्‍या राष्टांचे अध्यक्ष मारणे, सत्तांतर करणे, व अण्वस्त्रे आहेत म्हणून जी काही युध्दखोरी चाललीय तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर इतर राष्ट्रांची साथ आता देखील मिळतांना दिसत नाही. व जसे जसे युध्द लांबेल तशी ती अधिक दुर्मिळ होत जाणार.. या युध्दात उडी मारून अमेरिकेने स्वतःचे हात पोळवून घेतले आहेतच आणि अफगाणिस्तान युध्दाप्रमाणे हाती काही न लागता युध्द मात्र त्यांना अनिश्चित काळासाठी लढावे लागेल असेच सध्याचे प्रखर वास्तव आहे.

Pawan 14.06.25
In this scenario and the other conflicts burning in the world......UN is doing nothing .....US president is looking business in every situation......self defense is above all.....but who will decide the actual threat ......seeing opportunity in worse is now a days business.

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results