भारतातलाच नव्हे तर जगातल्या सर्वात मोठ्या घोटाळ्यापैकी एक महाघोटाळा घडल्याचं नुकतंच उङडकीला आलंय! सर्वसामान्य माणसांचे हजारो कोटी रुपये गिळंकृत करणारा मती गुंगवून टाकणारा हा अजस्त्र नि संतापजनक स्कॅम आहे.
एलआयसीमध्ये सामान्य माणसांचा पैसा गुंतला आहे. त्यामुळे तिथले पैसे अन्यत्र गुंतवताना तारतम्याने आणि काळजीपूर्वक गुंतवले जाणे अपेक्षित असतं. मात्र एका फ्रॉड कंपनीत गुंतवणूक केल्याने काल एका दिवसात एलआयसीला १६०० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. एका व्यक्तीने जवळपास साडेपंधरा लाख कोटी रुपयांच्या फेक फिगर्स दाखवून हा घोटाळा केला आहे. या घोटाळेबाजाचं नाव राजेश मेहता! त्याच्या ‘राजेश एक्सपोर्ट्स’ या कंपनीच्या एकूण भांडवलात एलआयसीचं भांडवल आहे तब्बल १० टक्के! एलआयसीने या कंपनीत २००० कोटींहून अधिक गुंतवणूक केलीय.
कंपनीच्या एका सजग शेअरहोल्डरने सेबीला मेल करून याबाबत कळवलं म्हणून हा घोटाळा उघडकीला आला. या शेअरहोल्डरचं म्हणणं असं की, या कंपनीने सर्व आकडे फुगवून दाखवले असावेत. कारण या कंपनीची फिजिकल आयडेंटीटी एक टक्का देखील नाही, तसंच इतक्या मोठ्या स्तरावरील कंपनीकडे जे इन्फ्रास्ट्रक्चर असायला हवं ते तर अजिबातच नाही. या व्हिसलब्लोअर ईमेलमुळे सेबीला जाग आली. पुढे सेबीच्या चौकशीतून जगातला सर्वात मोठा स्कॅम ठरेल असा हा अजस्त्र घोटाळा उघडकीस आला.
‘राजेश एक्सपोर्ट्स’ ही खरं तर सोन्याचे दागिने बनवणारी छोटीशी कंपनी. या कंपनीने दाखवलेली तब्बल ९९.८० टक्के आकडेवारी खोटी असल्याचा आरोप आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांच्या शेअरची किंमत ऐंशी टक्क्यांनी घसरलीय. एलआयसीने त्यात २००० कोटी गुंतवले आहेत. या घसरणीचा दर त्या गुंतवणुकीस लावल्यास २००० कोटींपैकी ८० टक्के, म्हणजे १६०० कोटी रुपये बुडाले आहेत. हा पैसा सर्वसामान्य माणसांचा होता. विश्वास ठेवा किंवा न ठेवता तसेच मरा, पण आपल्या देशातील भ्रष्टाचार आज सर्वोच्च पातळीवर आहे, हे कटूसत्य या घोटाळ्यामुळे उघड झालं आहे.
हेही वाचा - सरकारी तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या 'फेक सर्जरी'
२० जून १९६४ रोजी बेंगळुरू येथे एका मध्यमवर्गीय जैन कुटुंबात जन्मलेल्या राजेश मेहताचं मूळ कुटुंब गुजरातच्या मोरबी इथलं. हे कुटुंब १९४६ मध्येच बेंगळुरूमध्ये स्थायिक झालं. त्याचे वडील जसवंतराय मेहता हे एका खाजगी कंपनीत काम करायचे आणि नंतर त्यांनी ‘राजेश डायमंड कंपनी’ नावाने रत्नांचा छोटा व्यापार सुरू केला.
राजेशचं शालेय शिक्षण बेंगळुरूच्या ‘सेंट जोसेफ स्कूल’ मधून झालं. लहानपणी डॉक्टर व्हायची स्वप्ने पाहणाऱ्या राजेशने उच्चशिक्षण घेण्याऐवजी तरुणपणीच कौटुंबिक व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. १९८० च्या दशकात भारतातील दागिन्यांचा व्यवसाय हा असंघटित होता. राजेश आणि त्याचा भाऊ प्रशांत मेहता यांनी बँकेत काम करणारा आपला मोठा भाऊ बिपिन याच्याकडून फक्त १२०० रुपयांचं कर्ज घेतलं आणि चांदीच्या दागिन्यांचा व्यापार सुरू केला.
त्या काळात बँका सोन्या-चांदीच्या व्यापाराला किंवा असंघटित क्षेत्रातील नवख्या व्यावसायिकांना सहज कर्ज देत नसत. त्यामुळे राजेशला घरगुती कर्जावरच अवलंबून राहावं लागलं. तो चेन्नईमधून चांदीचे दागिने खरेदी करायचा आणि राजकोटमधील आपल्या नातेवाईकांना व व्यापाऱ्यांना विकायचा. यातून मिळणाऱ्या छोट्या नफ्यातूनच त्याने हळूहळू आपलं व्यावसायिक भांडवल वाढवलं.
चांदीच्या व्यवसायात काही पैसे गाठीशी लागल्यावर १९८९ मध्ये त्याने सोन्याच्या दागिन्यांच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यावेळीही त्याच्याकडे स्वतःचं मोठे कार्यालय किंवा कारखाना नव्हता. त्याने बेंगळुरूमधील आपल्या घराच्या छोट्या गॅरेजमध्ये अवघ्या १० कामगारांसोबत ‘राजेश एक्सपोर्ट्स’ची पायाभरणी केली. या कथित कंपनीने अल्पावधीतच मोठी प्रगती केली. १९९५ मध्ये त्याने आपली कंपनी शेअर बाजारात सूचिबद्ध केली (IPO आणला) आणि बाजारातून १० कोटी रुपये उभे केले. त्याने ताब्यात घेतलेला हा पहिला पब्लिक मनी होता! त्याने संपूर्ण कर्नाटकांत ‘शुभ ज्वेलर्स’ या नावाने स्वतःची रिटेल आऊटलेट्सही सुरू केली.
हेही वाचा - तकलादू वस्तूंच्या अदृश्य विळख्यात
२०१५ मध्ये राजेश मेहताने जगाला चकित करणारा निर्णय घेतला. ही झेप त्याने २०१५ साली घेतली होती, ही नोंद महत्वाची आहे. कारण या सालावरून याकामी त्याला कुणी मदत केली असेल याचा अंदाज तुम्ही बांधू शकता! त्याने स्वित्झर्लंडमधली तेव्हाची जगातली सर्वात मोठी गोल्ड रिफायनरी 'वाल्कॅम्बी' (Valcambi SA) तब्बल ४०० दशलक्ष डॉलर्स, म्हणजे सुमारे २५६० कोटी रुपये रोख देऊन विकत घेतली. या व्यवहारामुळे ‘राजेश एक्सपोर्ट्स’ ही जगातील ३५ टक्के सोन्यावर प्रक्रिया करणारी सर्वात मोठी कंपनी बनली. मात्र सोन्यावरची प्रक्रिया हा एक भुलभुलैय्या होता. ती गोष्ट केवळ कागदोपत्रीच होती!
२०१७ मध्ये फोर्ब्सच्या यादीनुसार राजेश मेहताची एकूण संपत्ती २.६ अब्ज डॉलर्स होती. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये त्याचा नंबर ६१वा होता. त्याला बेंगळुरूमधील सर्वात श्रीमंत उद्योजकांपैकी एक मानलं जाऊ लागलं. खोट्या फुगवलेल्या आकडेवारीमुळे ‘राजेश एक्सपोर्ट्स’ फॉर्च्यून ग्लोबल फाईव्ह हंड्रेड (Fortune Global 500) यादीत समाविष्ट होणारी भारतातील मोजक्या खाजगी कंपन्यांपैकी एक होती.
कंपनीच्या खात्यातून कोट्यवधी रुपये राजेश मेहताच्या स्वतःच्या वैयक्तिक खात्यात वळवण्यात आले. त्यानंतर या पैशांमधून त्यांनी वैयक्तिकरित्या सोन्याचे डेरिव्हेटिव्ह्ज ट्रेडिंग केले. खासगी ट्रेडिंगमध्ये मेहताला कोट्यवधी रुपयांचा तोटा झाला. तोटा लपवण्यासाठी, त्याने आपल्या वैयक्तिक व्यवहारांचे आकडे कंपनीच्या अधिकृत पुस्तकात हजारो पटींनी जास्त दाखवून बनावट विक्री-खरेदीचे व्यवहार नोंदवले.
‘राजेश एक्सपोर्ट्स’ आपल्या परदेशी उपकंपन्यांमधून (विशेषतः स्वित्झर्लंडमधील वाल्कॅम्बी - Valcambi SA) ९९ टक्के महसूल येत असल्याचं भासवत होती. परंतु, या स्विस कंपनीची कागदपत्रं तपासली गेल्यावर लक्षात आलं, की या उपकंपनीने मेहता यांना असा कोणताही महसूल दिलेला नव्हता! ही माहिती सेबीच्या पायाखालची जमीन हादरवणारी ठरली. ‘राजेश एक्सपोर्ट्स’ची प्रत्यक्षातली कमाई दाखवलेल्या उत्पन्नाच्या ०.५ टक्क्यांपेक्षाही कमी निघाली.
हेही वाचा - सायबर फ्रॉडचा नागपाश
राजेश मेहताच्या कंपनीने आफ्रिकेतील एका सुवर्ण खाणीत केलेल्या १०३५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे पुरावे देण्यातही तो अपयशी ठरलाय. याशिवाय कॅनरा बँकेच्या ५०९ कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड न झाल्यामुळे बँकेने त्यांची खाती स्ट्रेस्ड अॅसेट्स म्हणून घोषित केली आहेत.
राजेश मेहताच्या कंपनीने रिफायनरीसाठी सोन्याची जी खरेदी विक्री केली त्याची आकडेवारी रिफायनरीचा महसूल म्हणून दाखवली होती. प्रत्यक्षात त्याने सोन्याच्या शुद्धीकरणातून मिळालेला नफा हे उत्पन्न म्हणून दाखवायला हवं होतं. त्याऐवजी किती टन सोने घेतलं आणि ते परत कितीला विकलं या खरेदी विक्रीची आकडेवारी महसूल म्हणून दाखवली आणि उत्पन्नाचा आकडा सोळा लाख कोटीपर्यंत फुगवत नेला.
राजेश मेहताचं बिंग फुटण्याआधी त्याची आणखी एक गोष्ट संशयास्पद वाटली होती आणि याच गोष्टीमुळे तो संशयाच्या भोवऱ्यात अडकत गेला. कंपनीच्या अधिकृत वार्षिक अहवालानुसार जगभरात हजारो कोटी रुपयांचं सोनं विकणाऱ्या या कंपनीत केवळ सव्वाशेच्या दरम्यान स्थायी कर्मचारी काम करत असल्याचं दाखवण्यात आलं होतं. या मोजक्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी आणि पगारासाठी कंपनीने २१५ कोटी रुपये खर्च केल्याचं दाखवलं होतं. याचा साधा अर्थ असा होतो की, कंपनीमधील प्रत्येक सामान्य कर्मचाऱ्याचा सरासरी पगार वार्षिक सव्वा ते दीड कोटी रुपये इतका असणार. भारतीय ज्वेलरी उद्योगाच्या मानकानुसार हा पगार अशक्य आणि संशयास्पद मानला गेला आणि राजेशची कंपनी खऱ्या अर्थाने रडारवर आली.
ज्या कंपनीचा महसूल लाखो कोटी रुपयांमध्ये आहे, ती कंपनी केवळ शंभर कर्मचाऱ्यांच्या बळावर कशी काय चालू शकते, या प्रश्नाने तपासकर्ते चक्रावून गेले. यामुळेच ही कंपनी केवळ कागदावर ‘बोगस व्यवहार’ (Circular Trading) दाखवून महसूल फुगवत असल्याच्या संशयाला बळकटी मिळाली. तपासात हा संशय खराही ठरला.
हेही वाचा - सायबर गुन्हेगारीचा ऑक्टोपस गिळतोय हजारो कोटी
थोडक्यात सांगायचं तर एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील या तरुणाने अवघ्या १२०० रुपयांच्या भांडवलावरून अब्जावधी रुपयांचं साम्राज्य उभं केलं असल्याची रोमांचक यशोगाथा अनेक वर्षं सांगितली जात होती. त्याचं पितळ आता उघडं पडलं आहे.
देशात मोठे आर्थिक घोटाळे प्रामुख्याने गुजराती मंडळींनी केले आहेत आणि सद्यघडीला देशाबाहेरही मनमर्जीने वागून देशाचं नाव खराब करण्यात गुजराती मंडळी आघाडीवर आहेत. दोन गुजराती माणसं देशाचं सुकाणू हाकत असताना ही गोष्ट अधिक ठळक व्हावी हे गुजरातसाठी नक्कीच अशोभनीय आहे. असो.
ज्या बँका शेतकऱ्याला हजार रुपडे देण्यासाठी रडवतात, त्या डोळे झाकून हजारो कोटी रुपयांची माती कशी होऊ देतात आणि त्यानंतरही त्या कशा मौन राहतात? जी एलआयसी एखाद्या गरीब पॉलिसीधारकाने दोन पाचशे रुपयांचा प्रीमियम मुदतीत भरला नाही तर त्याला लगेच पेनल्टी लावते, त्या एलआयसीला २०००कोटी रुपये उधळून देताना लाज शरम का वाटत नाही? सामान्य भारतीयांच्या पैशांवरचा हा ढळढळीत दरोडा आहे! या घोटाळ्याची जबाबदारी कोणावर? याबाबत जाब विचारला जाणार की नाही? मीडिया त्यात काय भूमिका पार पाडणार की आपल्याला न्यूज चॅनलवर सामान्य जनतेचे पैसे बुडाल्याचे दहा फायदे समजावून सांगण्याचा कार्यक्रम बघावा लागणार, असाही प्रश्न पडतो!
तुम्हाला काही प्रश्न पडतात की नाही? आपण यावर प्रश्न उपस्थित करू की नाही माहीत नाही. मात्र दहा वर्षांनी नेटफ्लिक्सवर या घोटाळ्यावर आधारित वेबसिरीज आली की तिचे दोन तीन सीझन मात्र आपण एन्जॉय नक्की करू!
