आम्ही कोण?
आडवा छेद 

दोन हुकूमशहांनी मिळून तिसऱ्या हुकूमशहाला संपवलं

  • निळू दामले
  • 02.03.26
  • वाचनवेळ 5 मि.
khamenei death iran

अमेरिका-इस्रायलच्या बाँबिंगमध्ये इराणचे सर्वेसर्वा अली हुसेनी खामेनाई बळी पडलेत. इराणच्या रस्त्यावरची काही दृश्यं माध्यम दाखवत आहेत. एका दृश्यात माणसं भयचकित झाली आहेत. आपल्या देशाच्या सर्वोच्च माणसाला बाहेरच्या देशातल्या कोणी तरी ठार मारलंय याचा जबर धक्का त्यांना बसलाय. एका दृश्यामधे माणसं आनंदचकित झाली आहेत. गेली वीस वर्षांपेक्षा जास्त काळ आपल्याला छळणाऱ्या क्रूर माणसाचा मृत्यू झालाय याचा आनंद त्यांना झालाय.

इराण-अमेरिकेत ठिणगी पेटणार अशी चिन्हं दिसायला लागली होतीच. गेले महिनाभर इराण आणि अमेरिकेचे प्रतिनिधी जगात कुठं कुठं चर्चा करत होते. ट्रंप यांचं सुरुवातीचं म्हणणं होतं की इराणने अण्वस्त्रं तयार करणं थांबवावं. अमेरिकेने इराणविरोधात आर्थिक बंधनं घातली होती, त्याचा फटका इराणला बसला होता. इराण म्हणत होतं की बंधनं काढा आणि अण्वस्त्राबाबत चर्चा करू. चर्चा अनिर्णित होती.

गेल्या वर्षी अमेरिकेने इराणच्या अणुविकास केंद्रावर हल्ला केला होता, इराणचा अणुकार्यक्रम आम्ही पूर्ण उद्ध्वस्त करून टाकला आहे, असं ट्रंपनी जाहीर केलं होतं. असं असाताना पुन्हा अण्वस्त्रांचा प्रश्न कसा काय उद्भवला? चार सहा महिन्यात अण्वस्त्रं कार्यक्रम विकसित करता येतो का? वैज्ञानिक सांगतात की अणुकार्यक्रम विकसित करायला कित्येक वर्षं लागत असतात.

हेही वाचा - अमेरिकेचा इराणवर एवढा राग का?

त्यानंतर एकाएकी अण्वस्त्रांच्या बातम्या थांबल्या. इराणकडे लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रं आहेत, ती धोकादायक आहेत. ती इराणनं नष्ट करावीत अशी मागणी कधी ट्रंप, तर कधी नेतान्याहू करू लागले. इस्रायल आणि अमेरिका तर ऊठसूठ प्रचार करतात की क्षेपणास्त्रं थांबवण्याची आणि नष्ट करण्याची अत्यंत प्रभावी यंत्रणा त्यांच्याजवळ आहे. आयर्न डोमचं गुणगान इस्रायलची पीआर यंत्रणा सतत करत असे. मग अचानक इराणची क्षेपणास्त्रं चर्चेत कशी काय उपटली?

एकीकडे चर्चेचं गुऱ्हाळही सुरूच होतं.

पण दोन दिवसांपूर्वी एकाएकी थकलेले ट्रंप कॅमेऱ्यासमोर आले. ‘या अनिर्णित चर्चेला मी कंटाळलो आहे. इराणचं सरकार बदलणं सोडून दुसरा पर्याय मला दिसत नाहीये’ असं ते म्हणाले. दुसरीकडे काही दिवसांपासून अमेरिकेने आपलं नौदल जाहिराती करत जगभर पसरवलं होतं. ट्रंप इराणवर हल्ला करणार हे स्पष्ट होत होतं.

आठवून पहा. पुतीननी युक्रेनच्या हद्दीवर दीड लाख सैन्य नेऊन ठेवलं होतं. पुतीन युक्रेनवर हल्ला करणार आहेत हे जगाला कळलं होतं. दीड लाख सैन्य हद्दीवर चणेफुटाणे भेळ खायला कुणी नेऊन ठेवतं काय? पण पुतीन सांगत होते की बरेच दिवस एका जागी बसून कंटाळलेल्या सैन्याला पाय मोकळे करायला युक्रेनच्या हद्दीवर पाठवलंय. असं बोलून पुतीनने रीतसर युद्ध सुरू केलं. आज चार वर्षं झाली तरी युद्ध थांबलेलं नाही. युद्ध आपण थांबवलं असा दावाही ट्रंपनी केला आणि शांततेच्या नोबेलची मागणी केली. युद्ध अजूनही सुरूच आहे.

हेही वाचा - इराणवर बॉम्ब टाकून अमेरिकेने काय मिळवलं?

इराणमध्ये सगळं आलबेल नाहीच. तिथली जनता हुकुमशाही आणि बुरसटलेल्या सरकारला कंटाळली आहे. एका इराणी स्त्रीने योग्य रीतीनं बुरखा न घालता चेहरा-केस उघडे ठेवले होते या आरोपावरून त्या स्त्रीला तुरुंगात घालण्यात आलं होतं. तिथं तिचा छळ झाला, छळात ती मेली. हज्जारो स्त्रिया सरकारच्या क्रूर सैनिकांना न घाबरता रस्त्यावर आल्या. त्यांनाही सरकारनं मारलं.

गेली किमान १० वर्षं इराणी जनता आंदोलन करत आहे. जनतेची मागणी होती की त्यांना बोलण्याचं स्वातंत्र्य द्या, सत्तेवर बसलेल्या धर्मनेत्याला हटवण्याचं स्वातंत्र्य द्या.

इराणची अर्थव्यवस्था पार कोसळलेली आहे. त्याचं एक कारण अमेरिकेनं घातलेले आर्थिक निर्बंध हे आहे. अमेरिकेच्या आर्थिक निर्बंधाचं कारण इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम होता. तेव्हां चुलीत घाला अण्वस्त्रं, तो पैसा देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी वापरा असं काही इराणी नागरीक म्हणत होते.

हेही वाचा - नेतान्याहूंनी इराणशी लढाई का आरंभलीय?

इराणी सरकारकडे सैन्य आहे, शस्त्रं आहेत. नागरिक निःशस्त्र आहेत. जगात सर्वच ठिकाणी असं असतं. इराणचं वैशिष्ट्यं म्हणजे इराणी धर्मनेत्यांची एक खाजगी सेनाही इराणमधे आहे. ही सेना माणसं धर्माचरण नीट करतात की नाही ते तपासत असते. नमाजाच्या वेळी लोक नमाज पढतात की ऑफिसात कामं करत असतात याची पहाणी धर्मसैनिक करतात. कोणी संगीत ऐकतंय कां? कोणी पश्चिमी साहित्य वाचतंय कां? कोणी जगभरातले सिनेमे पहातंय का यावर हे सैनिक लक्ष ठेवतात. अफगाणिस्तानात तर लोकांच्या दाढीची लांबी मोजत, फूटपट्ट्या घेऊन. अमूक इंचापेक्षा कमी दाढी दिसली की तुरुंग आणि फटके.

इराणमधे हुकूमशाही होती. हुकूमशाही एका माणसाची होती, त्या माणसाने जमवलेल्या गँगची होती. हुकूमशहाने धर्माचा आधार घेतला होता. प्रत्येक हुकूमशहाला कसला तरी आधार लागतो. चीनमधे कम्युनिझमचा आधार, रशियात रशियन अस्मितेचा आधार, इस्रायलमधे अरब मुस्लीमांना नष्ट करण्याचा आधार, इराणला इस्लामचा आधार. हिटलरला ज्यू मुक्त जग हवं होतं, नेतान्याहूना अरब मुक्त पॅलेस्टाईन हवंय. हूकूमशाहीकडे पाशवी शक्ती असते, जनतेकडे याचना करणं एवढंच असतं.

हेही वाचा - देशांनी अमेरिकी वर्चस्व झुगारण्याची वेळ आलेली आहे

अयातुल्ला खोमेनी यांच्या नंतर अली खोमेनाई यांचं राज्य आलं. खोमेनी आणि खामेनाई दोघांनीही लाखो माणसं (इराणी आणि इराकी) मारली. ते त्यांना जमलं कारण इराणी जनतेची दुर्बलता. जनतेनं क्रूरकर्म्यांना सत्तेत बसवलं आणि त्यांच्या हातून स्वतःचा नाश करवून घेतला.

बरं, खामेनाईना मारणारे नेतान्याहू आणि ट्रंप काही वेगळे आहेत का? तर नाहीच. या दोघांवरही भ्रष्टाचार आणि कायदा तुडवण्याचे अनंत आरोप आहेत. कोणाची तरी भ्या दाखवून दोघंही आपली सत्ता टिकवून आहेत. दोघंही लोकशाहीच्या वाटेने हुकूमशहा झाले आहेत. इराणच्या जनतेने जसे हुकूमशहा उरावर घेतले तसेच इस्रायल आणि अमेरिकेची जनता हुकूमशहा उरावर घेतेय.

दोन हुकूमशहांनी टोळी करून तिसऱ्या हुकूमशहाला संपवलंय. याचं विश्लेषण कसं करणार?

निळू दामले | 9820971567 | damlenilkanth@gmail.com

निळू दामले हे जगभरातील विविध विषयांवर अभ्यासपूर्ण आणि सहज शैलीत लिखाण करणारे ज्येष्ठ पत्रकार आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 1

Anil Khandekar02.03.26
जगात सर्वत्र लोकशाही विरोधी व्यक्ती आणि पक्ष /संघटना /शक्ती धुमाकुळ घालत आहेत . जनता पण खोट्या आश्वासनांना भुलून हिंसाचार करणाऱ्यांना पाठीशी घालत आहे . ट्रंप , नेत्यानाहू , आणि इराण चे सत्ताधारी... सर्व एकाच प्रकारचे व्यक्तीनिष्ठ हिंसक राजकारण, धर्मकारण करतात हे जागरूक लोकशाही वाद्यांनी लक्षात ठेवले पाहिजे.

Select search criteria first for better results