'महाभृंगराज'चा पहिला कारखाना पुण्याच्या पर्वती पायथ्याला १९८३ साली सुरू झाला. तसं पाहता हे अगदीच साधं वाक्य आहे, पण ते वाचताक्षणी नजरेसमोर अनेक प्रतिमा उभ्या राहतात. याचं कारण 'कारखाना' हा शब्द आपण अनेक संदर्भासहच वाचतो. कारखाना म्हटलं की मोठं आवार, यंत्रांचे आवाज, निळ्या कपड्यांतले कामगार, काही वाहनं आणि बरंच काही काही आपसूकच समोर उभं ठाकतं; पण या प्रतिमांमधलं काहीच प्रत्यक्षात नसलेला कारखाना 'महाभृंगराज'ने उभा केला. मग इथे कारखाना म्हणून काय असेल? तर आठ शेगड्या आणि एक खलबत्ता. झाला कारखाना !
पुढे याच कारखान्याने 'महाभृंगराज' नावाचा एक ब्रँड जन्माला घातला. चालू वर्षी या ब्रँडची वार्षिक उलाढाल पंधरा कोटी रुपयांची आहे. शेगड्यांच्या मंद आचेवर एवढा मोठा ब्रँड तयार होण्याचा हा प्रवास अर्थातच सहजसोपा नव्हता. या प्रवासात जसे खाचखळगे होते तसे काटेकुटेही होते. आज मागे वळून पाहिलं तर नजरेस पडते ती साठ वर्षं चालू असलेली अडथळ्यांची शर्यत.
या शर्यतीमधलं पहिलं पाऊल उद्धव कुलकर्णी यांनी १९५० साली टाकलं. कुलकर्णी मूळचे धुळ्याचे. ते आयुर्वेदिक वैद्य होते. शिवाय त्यांचं औषधांचं दुकानही होतं. त्या काळच्या इतर अनेक वैद्यांप्रमाणे त्यांनाही वेगवेगळी औषधं तयार करून त्यांच्या चाचण्या घेण्याची आवड होती. माणसाच्या अंगात प्रयोगशीलता असेल तर ती त्याला स्वस्थ बसू देत नाही- त्याच्या मेंदूचा छळ करते. आसपासची मंडळी चाकोरीतलं जिणं जगत दिवस रेटत असताना ही माणसं मात्र काही ना काही उद्योग करत असतात. अशा उद्योगांना 'उचापती' हा शब्द अधिक योग्य आहे. अशा चांगल्या आणि सकारात्मक 'उचापतीं'मधूनच अनेक शोध लागल्याचा जगाचा इतिहास आहे. तर कुलकर्णी यांच्या नानाविध उचापतींमधली एक म्हणून त्यांनी एका आयुर्वेदिक तेलाचा फॉर्म्युला तयार केला. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे तेल तयार झाल्यावर प्रश्न आला, की याला नाव काय द्यायचं? थोडा विचार करता लक्षात आलं, की या प्रश्नाचं उत्तर त्या तेलाच्या फॉर्म्युल्यामध्येच दडलेलं आहे. इतर अनेक घटकांबरोबरच माका या वनस्पतीचा पाला हा मुख्य घटक या तेलामध्ये वापरला गेला होता. माका या वनस्पतीला आयुर्वेदामध्ये खूपच महत्त्व आहे. वनस्पतींचा राजा असंही त्याचं वर्णन केलं जातं. या वनस्पतीच्या बीजाला संस्कृतमध्ये 'भृंगराज' असं म्हणतात. त्यावरून कुलकर्णी यांनी स्वतः तयार केलेल्या तेलाला नाव दिलं 'महाभृंगराज'.
'महाभृंगराज' हे तेल अनेक अर्थांनी गुणकारी म्हटलं पाहिजे. या तेलामुळे केसांची गळती थांबते, केस पांढरे होण्यापासून वाचतात, केसांची लांबी वाढते, इथपासून ते या तेलापासून शांत झोप लागते, इथपर्यंत अनेक दावे केले गेले. हे दावे अर्थातच या तेलाचे जनक उद्धव कुलकर्णी यांनी केले होते. जसजसा या तेलाचा वापर सुरू झाला तसतशी त्याच्या उपयुक्ततेची प्रचिती अनेकांना येऊ लागली. वापरणारी माणसं त्याबद्दल समाधान व्यक्त करू लागली. त्यामुळे अर्थातच कुलकर्णी यांचा हुरूप वाढला.
हेही वाचा - चॉकलेट जायंट चंद्रकांत मोरडे
आपण एक बहुउपयोगी तेल तयार केलं असून त्याचा व्यवसाय होऊ शकतो याची जाणीव त्यांना खूपच लवकर झाली. त्याच काळात त्यांना जाणवलं, की धुळ्यासारख्या एका बाजूच्या गावात राहून आपण व्यवसाय उभा करू शकत नाही. ते लक्षात घेऊन त्यांनी सहकुटुंब सहपरिवार पुणं गाठलं.
कुलकर्णी कुटुंबाचं पुण्यातलं व्यावसायिक जीवन हे स्वतंत्र लेखाचा विषय ठरावं इतकं वेगळं होतं. ते कसबा पेठेत राहत होते, तर सदाशिव पेठेत त्यांनी औषधांचं दुकान सुरू केलं होतं. उद्धव कुलकर्णीच्या पत्नी इंदिराबाई घरची कामं आवरून दुपारच्या वेळेमध्ये शेगडीवर तेल बनवायला घेत. त्यानंतर अनेक कार्यालयांत आणि घरोघरी जाऊन कुलकर्णी स्वतः ते तेल विकत असत. रूढ अर्थाने पाहिलं तर हे उद्योजक कुटुंब होतं, पण त्यांची आर्थिक स्थिती मात्र कनिष्ठ मध्यमवर्गीय होती.
त्या काळच्या, म्हणजे पन्नास आणि साठच्या दशकातल्या पुण्याने कुलकर्णी कुटुंबाला चांगला प्रतिसाद दिला असं म्हणायला हरकत नाही. तेलाची विक्री खूप मोठ्या प्रमाणावर होत नसली तरी त्याच्याविषयी चांगलं बोललं जाऊ लागलं. याचं कारण उद्धव यांनी 'महाभृंगराज' नावाने बनवलेला फॉर्म्युला खरोखरच उत्तम आणि गुणकारी होता. तिळाच्या आणि खोबऱ्याच्या तेलाचं मिश्रण हा त्याचा बेस होता, तर माक्याच्या आणि ब्राह्मीच्या झाडांच्या पाल्याचा रस हे त्यातले प्रमुख घटक होते. माक्याचा पाला हा केसांसाठी उत्तम असतो, तर ब्राह्मीचा पाला हा बुद्धिवर्धक मानला जातो. या पाल्यांमध्ये याशिवायही अनेक गुणधर्म आहेत. याबरोबरीनेच नागरमोथा, हिरडा, बेहडा, आवळकाठी, कचोरा, बावची, गुलाबकळी, कापूरकाचरी, जटामांसी आणि वाळा असे घटकही तेलामध्ये मिसळलेले होते. आश्चर्य म्हणजे १९५० साली कुलकर्णी यांनी तयार केलेलं त्यांचं मिश्रण आज २०१७ मध्येही त्याच प्रमाणात आणि त्याच पद्धतीने वापरलं जातं.
कुलकर्णींचं कुटुंब आणि व्यवसाय पुण्यामध्ये स्थिरावत असतानाच कोणी कल्पनाही केली नव्हती अशी भयंकर दुर्घटना घडली. पुण्याला अगदीच लागून असलेलं पानशेत धरण फुटलं आणि त्याचं पाणी पुणे शहरात पसरलं. सगळीच वाताहत झाली. या तडाख्यातून कुलकर्णीही सुटले नाहीत. कसबा पेठेच्याही बऱ्याच भागाला पाण्याने घेरल्यामुळे त्यांचा घरसंसारच वाहून गेला. हा फटका नव्याने उभ्या राहत असलेल्या उद्योजकासाठी खूपच भारी होता. त्यातून सावरण्यासाठी कुलकर्णी कुटुंबाला अनेक वर्षं संघर्ष करावा लागला. एका ब्रँडच्या घडणीची वर्षं भलत्याच कामासाठी कारणी लागली.
हेही वाचा - व्यवस्थेला आव्हान देणारी शेतकरी महिला
पुराने संसार वाहून नेला तरी हिंमत टिकून होती. महाभृंगराज बनवण्यासाठी आणि विकण्यासाठी संपूर्ण कुटुंब झटत होतं. उद्धव यांचे चिरंजीव सोमनाथ आता व्यवसायात उतरले होते. सोबत त्यांचे दोन बंधूही होते. कसबा पेठ विस्कळीत झाल्यानंतर शासनाने अनेक कुटुंबांप्रमाणेच याही कुटुंबाला लोकमान्यनगरमध्ये जागा दिली होती. त्या जागेत उद्धव यांच्या पत्नी दररोज तेल बनवत असत. दोन शेगड्या आणि एका खलबत्त्याच्या मदतीने त्या उत्पादन करत असत. त्या काळात हे तेल काचेच्या बाटल्यांमध्ये भरलं जाई. या बाटल्याही जुन्या बाजारातून विकत घेतलेल्या असत. त्यामुळे या बाटल्यांचा आकार एकसारखा नसे. हातानेच 'महाभृंगराज' असं लिहिलेलं लेबल त्यावर चिकटवलं जाई. ताडपत्रीच्या पिशव्यांमध्ये या बाटल्या भरल्या जात. या काचेच्या बाटल्या फुटू नयेत म्हणून पिशवीत गवत भरलं जाई. दररोज सकाळ झाली की मार्केटिंग टीम विक्रीसाठी बाहेर पडे. ही टीम म्हणजे अर्थातच कोणी एमबीए झालेले तरुण नव्हते, तर स्वतः उद्धव कुलकर्णी आणि सोमनाथ, पुरुषोत्तम आणि विकास हे त्यांचे चिरंजीव होते. "उद्योजकता' हा शब्द ऐकला तरी अंगावर पाल पडल्याप्रमाणे झटकून टाकणाऱ्या त्या काळच्या पुण्यामध्ये एक ब्रँड घरगुती स्वरूपात बाळसं धरत होता.
वाढत्या वयाच्या मुलाला ज्याप्रमाणे सतत मोठ्या मापाचे कपडे शिवावे लागतात, त्याप्रमाणे वाढीस लागलेला व्यवसायही लहान जागेत मावत नाही. इथेही तेच झालं. जसजसा लोकांना गुण येऊ लागला तसतशी मागणी वाढू लागली. दोन शेगड्यांवर बनणारा माल पुरेना. पण, आणखी शेगड्या ठेवण्यासाठी घरात जागाच नव्हती. मग आठ शेगड्या ठेवता येतील एवढी जागा पर्वती पायथ्याच्या जनता वसाहतीत मिळाली. 'महाभृंगराज'चा पहिला कारखाना तो हाच.
इथे घरातली सगळी माणसं आणि बाहेरची काही मोजकी माणसं काम करू लागली. नदीकाठी फिरून माका आणि ब्राह्मीची झाडं शोधायची. त्यांचा पाला तोडून आणून खलबत्त्यात कुटायचा. दुसरीकडे बाकी पदार्थ दळायचे आणि ते तेलात मिसळून शेगडीवर माल बनवायचा. आधी पुण्यापुरतीच असलेली बाजारपेठ आता विस्तारत होती. कुलकर्णी कुटुंबातले फिरते विक्रेते आता सातारा, सांगली, सोलापूर किंवा नाशिक अशा आसपासच्या जिल्ह्यांमध्येही जात होते. ठिकठिकाणच्या दुकानदारांनी आता माल ठेवायला सुरुवात केली होती. एकदा गुण आलेले लोक नंतर स्वतःहून 'महाभृंगराज' मागत होते. आपलं उत्पादन प्रसिद्ध होतं आहे ही बाब समाधान देत होती, पण यालाच ब्रँड तयार होणं म्हणतात ही गोष्ट मात्र कुलकर्णींच्या ध्यानीमनीही नव्हती.
गुणवत्तेच्या जोरावर बाजारात मागणी वाढत असताना उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करणंही आवश्यक होतं. त्यासाठी पुन्हा जागेची गरज होती. पुण्यातल्याच हिंगणे परिसरात तशी जागा मिळाली. आधीच्या आठ शेगड्यांच्या पार्श्वभूमीवर तिथे आता सोळा शेगड्या लावता येणार होत्या. म्हणजे उत्पादनाची क्षमता दुप्पट होत होती. त्याच प्रमाणात खलबत्ते आणि इतर साहित्यामध्येही वाढ केली गेली. आधीच्या जुन्या बाजारातल्या बाटल्यांऐवजी आता स्वतःसाठी बाटल्या बनवून घेतल्यामुळे एकाच आकाराच्या सर्व बाटल्या वापरता येत होत्या. शिवाय विशिष्ट प्रकारची लेबल्सही तयार होत होती. आधी चालणारां व्यवसाय आता धावू लागेल अशी शक्यता तयार झाली होती. पण नेमक्या याच टप्प्यावर आणखी एक संकट या ब्रँडची वाट पाहत होतं. ते जेव्हा समोर उभं ठाकलं तेव्हा सगळेच हादरून गेले.
हेही वाचा - मासळी व्यापाराची अनोळखी वाट : दीपक गद्रे
एखाद्या उद्योगाच्या वाटचालीत मोठं संकट आलं तर त्याचं किती खच्चीकरण होऊ शकतं याचं उदाहरण म्हणून या संकटाकडे पाहावं लागेल. १९८८ साल चालू होतं. कल्पकता, कष्ट आणि सातत्याच्या बळावर व्यवसाय चालवत असताना कुलकर्णी कुटुंबाला बाकी कसलंच भान नव्हतं. बाकी जगात काहीही चाललं असलं तरी आपण मात्र प्रामाणिकपणे अहोरात्र कष्ट करायचे एवढंच ठाऊक होतं. पण एके दिवशी अनपेक्षितपणे एक्साइज खात्याची धाड या व्यवसायावर पडली आणि तोवर साधलेली एकतानता भंग पावली.
मुळात एक्साइज (अबकारी) नावाचा कर म्हणजे नक्की काय असतं हे घरात कोणालाच ठाऊक नव्हतं. त्यामुळे हा कर आपल्या व्यवसायाला लागू असतो की नाही याचा पत्ता असायचं काही कारण नव्हतं. पण हा 'सरकारी अडथळा' दार अडवून उभा राहिल्यावर सगळी माहिती मिळवण्याखेरीज पर्यायच नव्हता. संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांच्या मते 'महाभृंगराज' हे केसांना लावण्याचं तेल असल्यामुळे ते कॉस्मेटिक उत्पादन होतं. त्या काळच्या नियमांप्रमाणे कॉस्मेटिक उत्पादनांना साडेबारा टक्के कर होता. हा कर अनेक वर्ष बुडवल्यामुळे दंडात्मक कारवाई करण्याची भाषा अधिकारी बोलत होते. प्रकरण गंभीरच नाही तर भीषण होतं.
हा नेमका प्रकार काय आहे हे समजून घेण्यासाठी काही माहितगारांची आणि वकिलांची मदत घेतली गेली. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर नेमकं काय झालं आहे हे लक्षात आलं. खरंतर 'महाभृंगराज' हे कॉस्मेटिक उत्पादन नसून आयुर्वेदिक उत्पादन होतं. शासनाच्या तेव्हाच्या नियमांप्रमाणे आयुर्वेदिक उत्पादनाला कोणताही कर लागू नव्हता. त्यामुळे नकळतसुद्धा कोणतीही चूक किंवा गुन्हा 'महाभृंगराज'च्या व्यवस्थापनाच्या हातून घडलेला नव्हता. पण हा युक्तिवाद अर्थातच शासकीय अधिकाऱ्यांना मान्य नव्हता. त्यांच्या मते 'महाभृंगराज' हे उत्पादन कॉस्मेटिकच होतं. त्यामुळे उत्पादन सुरू झाल्यापासून १९८८ पर्यंत झालेल्या उत्पादनावरचा कर आणि त्यावरचा जबर दंड भरला जावा, असा त्यांचा आग्रह होता. आर्थिक स्थिती पाहता हा आग्रह मान्य करणं शक्य नव्हतं आणि मुळात तो चुकीचाच असल्याने मान्य करण्याचं कारणही नव्हतं. दोन्ही बाजू आपापल्या बाजूवर ठाम असल्यामुळे व्हायचा तोच परिणाम झाला. प्रकरण कोर्टात गेलं.
एक्साइज खात्याची केस कोर्टात सुरू झाली म्हणून रोजचे व्यवहार थांबवणं शक्य नव्हतं. तसे ते थांबलेही नाहीत. हिंगणे परिसरात बाकी उत्पादन ठीक चाललं होतं; पण तरीही दोन अडचणी न सांगता आल्याच. एक म्हणजे सोळा शेगड्यांची क्षमता आता कमी पडू लागली होती. त्यामुळे आणखी शेगड्या वाढवाव्या लागणार होत्या. दुसरं म्हणजे माका आणि ब्राह्मीचा पुरेसा पाला मिळत नव्हता. आसपासची झाडं संपत होती आणि दुरून पाला आणून उपयोग नव्हता. कारण आयुर्वेदाच्या नियमाप्रमाणे झाडांचा पूर्णपणे ताजा पाला वापरला तरच त्याचे गुण तेलामध्ये उतरतात आणि अपेक्षित उपयोग होतो. पण हिंगण्यात आणखी झाडं लावणं शक्य नव्हतं. यावर एक वेगळाच उपाय शोधला गेला. सोमनाथ कुलकर्णी यांच्या पत्नी आणि सध्याचे संचालक गणेश कुलकर्णी यांच्या मातोश्री या मूळच्या उस्मानाबादच्या आहेत. त्यामुळे तिथे कारखाना हलवला तर तेलाची उत्पादनक्षमता वाढवता येईल आणि वृक्ष लागवडही करता येईल, अशी कल्पना पुढे आली. ती सर्वांनाच आवडली.
हेही वाचा - अण्णासाहेब चकोते : बेकरी व्यवसायातला मराठमोळा अरोमा
लवकरच, म्हणजे १९९३ साली उस्मानाबादला नव्या कारखान्याचं उद्घाटन झालं. तिथल्या एमआयडीसीमध्ये जागा मिळाली. सोळाच्या ठिकाणी बहात्तर शेगड्यांची क्षमता तयार झाली. जवळच पंचवीस एकरांवर ब्राह्मी आणि माक्याची लागवड केली गेली. त्यामुळे कच्च्या मालाचा प्रश्न सुटला. दरम्यान, काचेच्या बाटल्यांच्या तक्रारी वाढत होत्या. ट्रान्स्पोर्टमध्ये आणि मालाच्या हलवाहलवीमध्ये या बाटल्या फुटत होत्या. शिवाय 'महाभृंगराज तेल उत्तम आहे, पण बाटली हातातून सटकून फुटायची भीती असते' अशा प्रतिक्रिया ग्राहकांकडूनही कधीमधी येत असत. यावर प्लास्टिकच्या बाटल्या हाच उपाय होता. तो अमलात आणला गेला. पण एवढं करून पुरणार नव्हतं. कारण काळ बदलत होता. कुलकर्णींची तिसरी पिढी व्यवसायात उतरली होती. संपूर्ण प्रकल्पाचं आधुनिकीकरण करण्याची गरज या पिढीला जाणवत होती. या पिढीचे प्रतिनिधी असलेले गणेश, योगेश, केदार आणि मंदार असे समस्त कुलकर्णी त्या दिशेने प्रयत्नही करत होते.
सर्वांत महत्त्वाचा बदल म्हणजे शेगड्यांची जागा बॉयलरने घेतली. खलबत्त्याची जागा मिक्सरने घेतली. पूर्वी हाताने भरल्या जाणाऱ्या बाटल्या मशिनद्वारा भरण्यासाठी बॉटलिंग युनिट बसवण्यात आलं. 'महाभृंगराज' या नावाचा लोगो तयार होऊन विशिष्ट रंगसंगतीमधली लेबल्स छापून तयार होऊ लागली. एका बाजूने तेल आणि मसाला ओतल्यानंतर दुसऱ्या बाजूने पॅकबंद बाटल्या बाहेर येऊ लागल्या. मानवी हाताचा स्पर्शही न होता ही प्रक्रिया पूर्ण होऊ लागली. दोन शेगड्या ते आधुनिक प्रकल्प, असा प्रवास आकाराला येण्यासाठी २००१ साल उजाडावं लागलं.
भारतातल्या उद्योजकांना कोणत्या परिस्थितीत काम करावं लागतं हे या ठिकाणी पाहण्यासारखं आहे. काळाची पावलं ओळखत आणि सर्व अडचणींवर मात करत ही प्रगती साधली जात असताना कोर्टाच्या केसची टांगती तलवार डोक्यावर तशीच होती. प्रकरण सुरुवातीला म्हणजे १९८८ साली जेव्हा कोर्टात गेलं तेव्हा सुरुवातीचा निकाल हा 'महाभृंगराज'च्या बाजूनेच लागला. मग वाटलं, की 'सुटलो बाबा एकदाचे !' पण व्यावसायिक आयुष्य इतकं सोपं कधीच नसतं. त्यातूनही सरकारी संकट एकदा मागे लागलं की सहजासहजी पाठ सोडत नाही. या प्रकरणात 'महाभृंगराज'चं म्हणणं बरोबर आहे हे न्यायालयाने स्पष्टपणे सांगितल्यावर शासनाने वरच्या कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला. पुन्हा कोर्टाचे आणि वकिलाच्या कार्यालयाचे हेलपाटे सुरू झाले. वरच्या न्यायालयानेही आधीसारखाच निकाल दिला. पण सरकार हट्टाला पेटलं. ते आणखी वरच्या कोर्टात गेलं. अखेर सुप्रीम कोर्टानेही 'महाभृंगराज'च्याच बाजूने निकाल दिला तेव्हा कुठे हे प्रकरण शांत झालं. पण तोवर २००५ साल उजाडलं होतं. कोर्ट-कचेऱ्यांच्या चक्रात सतरा वर्षं गेली होती. ही सतरा वर्षं डोक्यावर टांगती असलेली तलवार साधी नव्हती. कारण या काळात दरवर्षी सरकारी अधिकारी येऊन उत्पादनाचे आणि विक्रीचे तपशील घेऊन जात होते. याचा अर्थ असा होता, की जर २००५ साली सरकारने केस जिंकली असती तर दरम्यानच्या काळातला सर्व कर आणि त्यावरचा दंड भरावा लागला असता. तो प्रसंग आठवताना आजही गणेश कुलकर्णी यांच्या अंगावर काटा येतो. ते म्हणतात, "अहो, ती रक्कम चार ते पाच कोटी रुपयांच्या घरात गेली असती. आहे नाही ते सगळं विकूनही इतकी रक्कम आम्ही उभी करू शकलो नसतो. त्यामुळे कोणत्याही कारणाने ही रक्कम भरावी लागली तर काय करायचं, ही भीती सतत आमच्या मनात होती. अशा प्रकारे मनःस्वास्थ्य ठीक नसेल तर त्याचा परिणाम व्यवसायावरच काय पण वैयक्तिक जीवनावरही पडतो." एखादं व्यावसायिक कुटुंब स्वतःच तयार केलेला ब्रँड वाढवण्याची खटपट करतं तेव्हा त्याला कशाकशाला तोंड द्यावं लागतं हे या उदाहरणावरून समोर येतं.
पानशेतची धरणफुटी आणि न्यायालयाचा फेरा ही दोन संकटं पाहता त्यानंतरचा या उद्योगाचा काळ हा बराच सुरळीत म्हटला पाहिजे. सध्या हे उत्पादन उस्मानाबादलाच चालू आहे. तिथे दरवर्षी पन्नास लाख बाटल्यांचं उत्पादन होतं. त्यातून दरवर्षी पंधरा कोटी रुपयांची उलाढाल होते. पूर्वी फक्त महाराष्ट्रात असलेली विक्री आता गुजरात, राजस्थान आणि दिल्लीमध्येही होते. काही प्रमाणात निर्यातही होते.
हेही वाचा - सुहासिनी आणि यतिन शहा : सोलापूरचे जागतिक उद्योजक
या ब्रँडपुढची आव्हानं ही खूप निराळ्या स्वरूपाची आहेत. 'महाभृंगराज' हे आयुर्वेदिक उत्पादन असल्यामुळे त्याची निर्मिती कोणीही करू शकतो. त्याप्रमाणे काही बड्या कंपन्या त्यांच्या त्यांच्या ब्रँडनेमखाली हे तेल बनवतात. याचा पहिला परिणाम दिल्लीत पाहायला मिळाला. तिथे या कुलकर्णींच्या तिसऱ्या पिढीने उत्पादन वितरित केलं आणि जाहिराती सुरू केल्या. त्यानंतर काही दिवसांनी लक्षात आलं, की दुकानांमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचं 'महाभृंगराज तेल' उपलब्ध असल्यामुळे जाहिरातीचा खर्च आपण करायचा आणि उत्पादन मात्र वेगळ्याच कंपन्यांचं विकलं जायचं, असा प्रकार सुरू झाला. त्यावर उपाय म्हणून 'पुण्याचं महाभृंगराज तेल' अशी जाहिरात महाराष्ट्रात सुरू केली. तीच जाहिरात दिल्लीमध्ये 'पुनेका महाभृंगराज' आणि गुजरातमध्ये 'पुनानु महाभृंगराज' अशी केली गेली. त्यामुळे मात्र विक्रीला आणि ब्रँड पक्का होण्याला खूपच उपयोग झाला.
हे आव्हान अगदीच छोटं वाटावं असं महाप्रचंड आव्हान या ब्रँडसमोर सध्या उभं आहे. ते आहे अर्थात स्थानिक आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांनी उभ्या केलेल्या स्पर्धेचं. या कंपन्या महाकाय आहेत. त्यांच्याकडे विकण्यासाठी शेकडो उत्पादनं आहेत,
हजारो व्यक्तींचं मनुष्यबळ आहे, जाहिरातीसाठी काहीशे कोटी रुपयांचं बजेट आहे. या सगळ्याबरोबरच भांडवल उभं करण्याची अफाट क्षमता आहे. जागतिकीकरणानंतरच्या भारतात मोठ्या माशांनी लहान माशांना गिळण्याचा कार्यक्रम सततचा बनला आहे. अशा घनघोर वातावरणात 'महाभृंगराज' सारख्या मराठी ब्रँड्सना टिकून राहणं आणि वाढत राहणं असं दुहेरी आव्हान आहे. हे आव्हान पेलण्यासाठी 'महाभृंगराज'ची सध्याची पिढी सरसावली आहे, भारतीय बाजारपेठेत पाय रोवून उभी आहे. त्यांच्यासाठीच काय पण सर्वच मराठी ब्रँड्ससाठी यापुढचा सामना हा कठीण कसोटीचा ठरणार आहे. काळ मोठा कठीण आहे !
(अनुभव, जानेवारी २०१७च्या अंकातून साभार.)
आनंद अवधानी
आनंद अवधानी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आहेत. उद्योग आणि उद्योजकता विकास, प्रशासकीय अधिकारी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्तबगार व्यक्ती, तसंच स्वयंसेवी संस्था आणि स्वयंप्रेरित व्यक्ती यांच्या कामाबद्दल त्यांना विशेष आस्था आहे.
