सोळावं वर्ष म्हणजे कुणाच्याही आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा. सोळाव्या वर्षापर्यंत पालकांच्या नियंत्रणात असलेली मुलं-मुली त्यानंतर बंधमुक्त होऊ पाहतात. गंमत अशी, की त्या वयात स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याची ऊर्मी असते, पण गाठीला अनुभवाची शिदोरी मात्र नसते. त्यामुळे निर्णय चुकू शकतात. ‘चकोते बेकरी आणि नमकीन'चे अण्णासाहेब चकोते यांनी सोळाव्या वर्षी त्याच ऊर्मीतून थेट स्वतःचा व्यवसाय सुरू केला, पुढे तो मोठ्या प्रमाणावर वाढवला. गाठीशी अनुभव नसतानाही व्यवसाय वाढवण्यासाठीचे काही धडाडीचे निर्णय घेतले; त्यांतले क्वचितच काही निर्णय चुकले असतील. आज भारतातल्या अनेक राज्यांत आणि भारताबाहेरही त्यांच्या बेकरीचा स्वाद दरवळतो आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातल्या नांदणी या अगदी छोट्या गावात अण्णासाहेबांचा जन्म झाला. त्यांचे आजोबा अल्पभूधारक शेतकरी होते, तर वडील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक. त्या काळी म्हणजे 1990च्या सुमाराला सरकारी शाळांमधल्या शिक्षकांना अतिशय तुटपुंजे पगार होते. त्यामुळे घरची परिस्थिती बिकट होती. रोजच्या रोज हाता-तोंडाची गाठ पडेलच याचीही शाश्वती नव्हती. अण्णासाहेब घरात भावंडांमध्ये थोरले. त्यांचं कसंबसं दहावीपर्यंत शिक्षण झालं. दरम्यान घराला हातभार लावण्यासाठी काही तरी कमावण्याची निकड निर्माण झाली होती. पण अण्णासाहेब उद्योगाकडे वळण्यामागे हे एकमेव कारण नव्हतं.
अण्णासाहेब जन्मत:च उद्योजकाचे गुण घेऊन आले असावेत. कारण दहावीत असतानाच ते त्यांच्या काकांच्या मागे लागून मुंबईला धडकले. तिथल्या क्रॉफर्ड मार्केटमधून त्यांनी घाऊक दराने कपडे विकत घेतले आणि गावी नांदणीला येऊन विकायला सुरुवात केली- कधी सायकलवर फिरून, तर कधी पतपेढी आणि सहकारी संस्थांच्या कार्यालयांसमोर. एवढा लहान मुलगा व्यवसाय करतो म्हणून लोक कौतुकाने पाहायचे. अण्णासाहेबांकडच्या कपड्यांचा दर्जा चांगला होता आणि गावातल्या दुकानांत मिळणाऱ्या कपड्यांपेक्षा ते स्वस्त होते. त्यामुळे सगळे कपडे विकले जाऊन अण्णासाहेबांना त्याही वयात नफा मिळायचा. कपड्यांची अशी विक्री करताना घाऊक आणि किरकोळ व्यापाराचं व्याकरण त्यांच्या लक्षात आलं.
दहावीनंतर अण्णासाहेबांनी पुढे शिकण्याचा थोडा प्रयत्न केला; पण त्यांचं अभ्यासात लक्ष लागत नव्हतं. कारण शिकून पदवीधर व्हायचं आणि एखाद्या साखर कारखान्यात किंवा सूतगिरणीत कामाला लागायचं, एवढंच भवितव्य समोर दिसत होतं. त्यापेक्षा व्यवसाय केला तर काही तरी करून दाखवण्याची संधी होती. त्यामुळे बारावीत असतानाच त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकला. एका बाजूला छोटे-मोठे व्यवसाय चालूच होते. कधी ते बोरं आणून गाडीवर विकायचे, तर कधी शाळेच्या बाहेर फुलांचे गजरे विकायचे.
हेही वाचा - मासळी व्यापाराची अनोळखी वाट : दीपक गद्रे
याच दरम्यान एका वेगळ्याच व्यवसायात त्यांचा प्रवेश झाला. झालं असं, की गावातली पिठाची गिरणी बंद पडल्यात जमा होती. अण्णासाहेबांनी काही पैसे ॲडव्हान्स देऊन ती चालवायला घेतली. दिवसभर कष्ट करत आणि ग्राहकांना चांगली सेवा देत त्यांनी गिरणीला ऊर्जितावस्था आणली. ते पाहून मूळ मालक गिरणी परत मागू लागला. अण्णासाहेबांनी लेखी करार केलेला नव्हताच. त्यामुळे मालकाने फक्त ॲडव्हान्स परत दिला आणि अण्णासाहेबांना बाहेरचा रस्ता दाखवला. गिरणीच्या व्यवसायात अण्णासाहेबांचं मन नुकतंच रमायला लागलं होतं. साहजिकच ते नाराज झाले.
इथे अण्णासाहेबांचे मामा मदतीला धावून आले. मामांची गावात जागा होती. त्यांनी नवी गिरणी सुरू करण्यासाठी अण्णासाहेबांना ती देऊ केली. अण्णासाहेबांची पोरवयातली धडाडी पाहा. त्यांनी वयाच्या सतराव्या वर्षी भूविकास बँकेत चकरा मारून आपल्या आईच्या नावे कर्ज मंजूर करून घेतलं. एवढ्या छोट्या मुलाचा प्रस्ताव आणि पाठपुरावा याकडे बँकेने कसं काय लक्ष पुरवलं याचं आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही.
त्या कर्जाच्या रकमेतून गिरणी सुरू तर झाली, पण केवळ गावातल्या घरांतली दळणं करून भागणार नव्हतं. अण्णासाहेबांनी युक्ती लढवली. त्यांच्या भागात उसाची शेती मोठ्या प्रमाणावर आहे. तिथे ऊसतोडणीसाठी बाहेरच्या गावांमधून मजूर येत असत. त्यांची पालं पडत. दिवसभर उसात काम करून संध्याकाळी पालावरच स्वयंपाक करून ते मजूर जेवत असत. अण्णासाहेबांना गिरणीच्या व्यवसायासाठी यात संधी दिसली. ते पालांवरून फिरले. तिथल्या मुकादमांशी त्यांनी संपर्क साधला. सगळ्या मजुरांचं दळणाचं काम मिळवलं. रोज पहाटे कामावर जाताना ती मजूर मंडळी धान्य ठेवून जात आणि दिवसभराची मजुरी मिळाल्यावर संध्याकाळी पीठ घेऊन जात. या एका गोष्टीमुळे गिरणी नफ्यात चालू लागली. मग अण्णासाहेबांनी गिरणीशेजारी कांडप यंत्र बसवलं. ते तिखट-हळद कांडून देऊ लागले. दोन्ही व्यवसायांची घडी बसली. आणि मग अण्णासाहेबांना आणखी एखादा व्यवसाय सुरू करण्याचे वेध लागले.
कुरुंदवाडजवळचं दत्तवाड हे अण्णासाहेबांच्या मावशीचं गाव. लहानपणी सुटीमध्ये ते मावशीकडे जायचे. एस.टी. स्टँडपासून मावशीच्या घरापर्यंत जाताना वाटेत एक पावाची भट्टी लागायची. भट्टीतल्या पाव भाजतानाच्या खमंग वासाची अण्णासाहेबांना भुरळ पडायची. ते घरी गेल्याबरोबर मावशीकडून एक रुपया घेऊन पावाची लादी आणायचे. पुढे अनेक वर्षं लोटल्यानंतरही भट्टीचा तो खरपूस सुगंध त्यांच्या मनात रेंगाळत राहिला होता. त्यातूनच एके दिवशी त्यांच्या डोक्यात पावभट्टी सुरू करण्याची कल्पना चमकली. आणि त्यांनी तसा निर्णय घेऊन टाकला.
हेही वाचा - सुहासिनी आणि यतिन शहा : सोलापूरचे जागतिक उद्योजक
निर्णय तर झाला, पण भट्टी उभी कशी करायची हे कुणाला माहीत होतं? त्यासाठी त्यांनी सांगलीतून एक मिस्त्री मिळवला. गूळ, पांढरी माती, काच, लोखंडाचा कीस, गारगोट्या वगैरे साहित्य वापरून भट्टी तयार केली. भट्टी उभी करण्यासाठी आणि चालवण्यासाठी किमान 25 हजार रुपये भांडवल लागणार होतं. ही जोखीम पत्करण्याची अण्णासाहेबांची तयारी होती. उद्योजकामध्ये हा मूलभूत गुण तर असावा लागतो. अण्णासाहेबांनी सावकाराकडून कर्ज काढलं. अशा रीतीने भट्टी सज्ज झाली.
भट्टीत रोजचं काम करण्यासाठी दत्तवाडच्या पावभट्टीतून अण्णासाहेबांनी एक माणूस आणला. आणि त्यांनी स्वतः चक्क त्याच्या हाताखाली काम सुरू केलं. त्यातून त्यांना पावभट्टीतली सगळी कामं अवगत झाली. पहाटेपासून संध्याकाळी पाचपर्यंत भट्टीतलं काम सुरू असायचं. त्यानंतर अण्णासाहेब पावाच्या लाद्यांच्या पिशव्या सायकलला अडकवून विक्रीसाठी बाहेर पडायचे. मालाची विक्री तर दररोज होत होती, पण व्यवहाराचा मेळ मात्र बसत नव्हता. कुठे तरी गणित चुकत होतं. किती रुपयांचा माल आणला, किती विकला गेला आणि किती पैसे सुटले याचा अंदाज येत नव्हता. परिणाम व्हायचा तोच झाला. दोन वर्षांत दीड लाख रुपयांचं कर्ज झालं. 1993-94 साली हा आकडा खूपच मोठा होता. मुलगा कर्जबाजारी झाला हे लक्षात आल्यावर घरी कटकट सुरू झाली. मुलाने यापुढे व्यवसायाचा नाद सोडावा, स्वतःच्या वाटणीची अर्धा एकर जमीन विकून कर्ज फेडावं आणि कारखान्यात नोकरीला लागावं असं घरच्यांना वाटत होतं.
अण्णासाहेबांना हे अर्थातच मान्य नव्हतं. नोकरीच्या चक्रात अडकण्याचा त्यांचा पिंड नव्हता. व्यवसाय करण्याची त्यांची इच्छा प्रबळ होती. त्यामुळे त्यांनी मोठ्या बुद्धिचातुर्याने घरच्यांना आपलं म्हणणं पटवून दिलं, की दोन वर्षांत तोटा आलेला असला तरी व्यवसायाचं ज्ञान पुरेपूर मिळालेलं आहे; त्यामुळे थोडं खेळतं भांडवल मिळालं तर मी व्यवसाय वाढवून दाखवेन, शिवाय नफाही भरपूर मिळेल. त्यांच्या वडिलांना ही गोष्ट पटली. वडिलांनी शिक्षक बँकेतून 50 हजार रुपयांचं कर्ज काढलं. शिवाय अण्णासाहेबांनी गावातला एक असा सावकार गाठला, की जो लगेच दोन लाख रुपये कर्ज देईल; पण पुढची तीन वर्षं मुद्दल परत मागणार नाही; त्याऐवजी त्याला दर महिन्याला व्याजाची रक्कम दिली जाईल. अशाप्रकारे अडीच लाख रुपये उभे राहिले. अण्णासाहेबांनी सर्वांची देणी देऊन टाकली. त्यापैकी काहीजणांनी तर पैसे परत मिळण्याची आशाही सोडली होती.
सांगलीतल्या एका व्यापाऱ्याचेही 70 हजार रुपये द्यायचे होते. ते दिल्यावर अण्णासाहेबांनी आणखी 40 हजार रुपये त्याला दिले आणि लाकूड, साखर, मैदा किंवा डालडा असा सगळाच माल आपल्याला नियमितपणे पुरवावा म्हणून सांगितलं. त्याचा उपयोग असा झाला, की रोजचा कच्चा माल विनाव्यत्यय मिळू लागला.
त्या काळी ग्रामीण भागामध्ये पाव-बटर हे पदार्थ फारसे मिळायचे नाहीत. लोकांना फक्त भाकरी आणि चपातीच माहीत होती. मात्र लोकांना बेकरी उत्पादनांचं आकर्षणही होतं. या परिस्थितीवर अण्णासाहेब अक्षरश: स्वार झाले. त्यांनी रोजचा पाच-सात हजारांचा माल बनवून, आठवडी बाजारामध्ये खाटेवर पसरून विकायला सुरुवात केली. सुरुवात बटरपासून झाली. बटरविक्रीत जम बसल्यावर त्यांनी ब्रेड, बनपाव आणि बिस्किटं बनवणं चालू केलं. परिणामी, पुढच्या दोन-एक वर्षांत सर्व खर्च आणि देणी वजा जाता त्यांच्याकडे तीन लाख रुपये शिल्लक राहिले.
हेही वाचा - चॉकलेट जायंट चंद्रकांत मोरडे
तोवर पाव बनवण्याचं काम लाकडाच्या भट्टीवर चालू होतं. त्या तीन लाख रुपयांतून त्यांना ओव्हन विकत घ्यायचा होता. पण नेमकं तेव्हाच त्यांच्या धाकट्या भावाला एका शिक्षणसंस्थेत शिक्षक म्हणून नोकरी मिळण्याची शक्यता होती. त्यासाठी तीन लाख रुपये खर्च येणार होता. त्यांनी व्यवसायापेक्षा कुटुंबाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. ओव्हन विकत घेण्याचं तात्पुरतं स्थगित केलं. मात्र व्यवसायवाढीचे इतर मार्ग होतेच. त्यांनी एकाच्या पाच भट्ट्या केल्या. ते दररोज 20 हजार रुपयांचा माल बनवू लागले. त्याचसोबत मार्केटिंगसाठी मनुष्यबळ घेण्याची गरज होती. नांदणीसारख्या छोट्या गावात मार्केटिंगला माणूस कुठून मिळणार? शिवाय तोवर नांदणीत बेकरीचा व्यवसायच नसल्याने अनुभवी माणूस मिळणं तर शक्यच नव्हतं. पण अण्णासाहेब स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी त्यांच्याच भट्टीवर काम करणाऱ्या एका मुलाला मार्केटिंगसाठी तयार केलं. आधी त्याला दुचाकी शिकवली. परवाना काढून दिला. मग त्याला दुचाकी विकत घेऊन दिली. त्यानंतर त्या मुलाचं काम सुरू झालं. बघता बघता संपूर्ण शिरोळ तालुका आणि तालुक्याबाहेरही त्यांचा माल विकला जाऊ लागला.
अण्णासाहेबांच्या मनात आता व्यवसायाचा आणखी विस्तार करण्याचा विचार सुरू झाला. त्यासाठी त्यांना बँकेकडून 15 लाख रुपयांचं कर्ज हवं होतं. त्यांनी बँक ऑफ बडोदाच्या नांदणी शाखेशी संपर्क साधला. बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना आधीच्या तीन वर्षांचे ताळेबंद आणि उत्पन्न कर भरल्याच्या नोंदी मागितल्या. अण्णासाहेबांना जिथे रोजचे जमा-खर्च लिहायला वेळ नव्हता तिथे बाकी कागदपत्रं त्यांच्याकडे कुठून असणार? दुसरी बाब म्हणजे नांदणी हे अगदी छोटं खेडं असल्यामुळे तिथे बँकेची ‘क' वर्ग शाखा होती. त्यामुळे एवढं मोठं कर्ज मंजूर कसं करणार हा प्रश्न होता. थोडक्यात, कर्ज मंजूर झालं नाही. मात्र अण्णासाहेब स्वस्थ बसणारे नव्हते. त्यांनी चक्क बँकेच्या शाखा व्यवस्थापकांनाच एक दिवस भट्टी बघायला बोलावलं. त्यांना दिवसभराचे सर्व व्यवहार प्रत्यक्ष दाखवले. कच्च्या मालाची निवड, उत्पादनाची पद्धत, गुणवत्तेचा आग्रह आणि दिवसाकाठी होणारा रोख नफा असं सगळं त्या शाखा व्यवस्थापकांनी पाहिलं. पुढे त्यांनी एका चार्टर्ड अकाउंटंटशी संपर्क साधून अण्णासाहेबांच्या तीन वर्षांच्या व्यवहाराचे ताळेबंद बनवायला सांगितलं. उत्पन्न कर भरायला लावला आणि कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर कर्ज मंजूर केलं.
बँकेने मंजूर केलेल्या पहिल्याच कर्जाचं अण्णासाहेबांनी अक्षरश: चीज केलं. पुढच्या दीडच वर्षात त्यांनी ते कर्ज फेडलं. मग लगेच 25 लाखांचं नवीन कर्ज काढलं. त्या रकमेतून नांदणीमध्येच नऊ हजार स्क्वेअर फूट जागा विकत घेतली. तिथे तीन हजार स्क्वेअर फुटांचं बांधकाम केलं. दोन ओव्हन विकत घेतले. इथे खऱ्या अर्थाने ‘चकोते बेकरी' या व्यवसायाची सुरुवात झाली. अण्णासाहेबांनी ते 25 लाखांचं कर्जही पुन्हा दीड वर्षात फेडलं आणि पुढचं कर्ज एक कोटीचं काढलं. त्यातून ब्रेड बनवण्यासाठी जर्मन ब्रँडची मशिनरी बसवली. एकीकडे त्यांच्या उत्पादनांना दररोज मागणी वाढत होती. त्यांनी कोल्हापूरसोबतच बेळगाव, सांगली, सोलापूरपर्यंत माल विकायला सुरुवात केली होती. ब्रेडच्या बरोबरीने खारी आणि केकचं उत्पादनही सुरू केलं होतं.
याच काळात अण्णासाहेबांनी एक असं पाऊल उचललं की ज्यामुळे त्यांचा व्यवसाय सर्वदूर आणि अनेक पटींनी वाढला. तोपर्यंतचं महाराष्ट्रातल्या बेकरी व्यवसायाचं चित्र वेगळं होतं. इथल्या मोठ्या शहरांमध्ये बेकरी उत्पादनांची विक्री करणारी काही दुकानं होती. मात्र दर्शनी भागात दुकानं आणि मागे भट्टी लावलेली, असं त्यांचं स्वरूप होतं. म्हणजे जो उत्पादक तोच दुकानदार. त्यामुळे वितरणाची साखळी अस्तित्वात नव्हती. अण्णासाहेबांनी मात्र आपल्या मालासाठी गावोगावी वितरक नेमायला सुरुवात केली. त्यामुळे त्या-त्या गावातल्या किराणा दुकानांमध्ये, हॉटेल्स किंवा स्वीट मार्ट्समध्ये त्यांचा माल विक्रीसाठी जाऊ लागला. त्यामुळे मालाची मागणी वाढत राहिली. पश्चिम महाराष्ट्रासह कोकण आणि मराठवाड्यातही असा विस्तार झाला. हा वेग लक्षात घेत अण्णासाहेबांनी दोन कोटी रुपयांचं कर्ज काढून आणखी बांधकाम केलं. पूर्वी मोजक्या ओव्हन्सवर सर्व पदार्थ बनायचे. पण आता ब्रेड, खारी, केक किंवा बनपाव अशा प्रत्येक उत्पादनासाठी स्वतंत्र ओव्हन्सची व्यवस्था झाली. मराठवाड्यातली वाढती गरज लक्षात घेऊन लातूरच्या औद्योगिक वसाहतीत त्यांनी स्वतंत्र प्लँट उभा केला. त्यामुळे उत्पादनाची क्षमता खूपच वाढली.
हेही वाचा - व्यवस्थेला आव्हान देणारी शेतकरी महिला
अण्णासाहेबांच्या दृष्टीने जाहिरातींवरचा खर्चही सुद्धा उत्कृष्ट गुंतवणूकच होती. त्यांनी रेडिओवर आपल्या उत्पादनांची जाहिरात सुरू केली. रेडिओवर अशी जाहिरात करणारे ते पहिले ठरले. ज्या ज्या किराणा दुकानांत किंवा हॉटेल्समध्ये त्यांचा माल विकला जात होता तिथे त्यांनी धडाक्याने ‘चकोते बेकरी'चे बोर्ड्स लावले. नंतरच्या काळात वृत्तपत्रं, मासिकं आणि टेलिव्हिजनवरही त्यांनी जाहिराती केल्या. या जाहिरातीचा मुख्य उपयोग असा झाला, की ग्राहक स्वत:हून दुकानात येऊन ‘चकोते' ब्रँडची उत्पादनं मागू लागले. त्यामुळे दुकानदार ‘चकोते'च्या वितरकांच्या नियमित संपर्कात राहू लागले. बाजारपेठेतली ही परिस्थिती लक्षात घेऊन देशातल्या वेगवेगळ्या भागांतून वितरणासाठी लोक स्वत:हून पुढे येऊ लागले. वितरक स्वत:हूनच बाजारपेठेतल्या गरजा अण्णासाहेबांना कळवू लागले. त्यातलं एक उदाहरण सांगण्यासारखं आहे. महाराष्ट्राच्या सर्व भागांत मिसळ किंवा तत्सम पदार्थ खाल्ले जातात. त्यासाठी शेव-फरसाणाची गरज असते. अनेक दुकानदारांना आणि हॉटेल्सना चांगल्या चवीचं आणि पुरेसं शेव-फरसाण मिळत नव्हतं. वितरकांकडून हे समजल्यावर अण्णासाहेबांनी ‘चकोते'च्या ‘नमकीन' विभागाची सुरुवात केली. यामध्ये शेव, फरसाण, बाकरवडीपासून साबुदाणा चिवड्यापर्यंत अनेक उत्पादनं तयार होतात. बेकरी उत्पादनांप्रमाणेच नमकीनसाठीही अण्णासाहेबांनी अत्याधुनिक यंत्रणा उभी केली आहे.
भारतातल्या बेकरी उद्योगातलं खास आकर्षण ठरावं अशा दर्जाचा उत्पादन प्रकल्प अण्णासाहेबांनी नुकताच उभा केला आहे. त्यासाठी युरोप-अमेरिकेसह जगातल्या विविध भागांत दौरा करून त्यांच्या टीमने जागतिक बेकरी व्यवसायाचा अभ्यास केला. अभ्यासांती नियोजन करून जर्मनी आणि जपानी बनावटीची यंत्रसामग्री या प्रकल्पात बसवली गेली. कच्च्या मालाचं मिश्रण, त्यावरची प्रक्रिया (भाजणं किंवा तळणं) आणि पॅकेजिंग असं सगळं यंत्रांवरच केलं जातं. मुख्य म्हणजे ही सर्व यंत्रणा हाताळणारी कर्मचारी-अधिकारी मंडळी स्थानिक आहेत. या प्रकल्पामध्ये कमालीची स्वच्छता आहे. सुरक्षेचे सर्व नियम कसोशीने पाळले जातात. असे प्रकल्प चालवण्याची जागतिक आचारसंहिता आचरणात आणली जाते. त्यामुळे एखाद्या प्रगत देशातल्या प्रकल्पाप्रमाणेच हा प्रकल्प चालवला जातो. बेकरी व्यवसायात एवढं आधुनिकीकरण करणारे अण्णासाहेब हे आघाडीचे भारतीय उद्योजक ठरले आहेत. बेकरी संघटनेतले भारतभरातले सदस्य त्यांना कौतुकाने ‘बेकरीचा बादशहा' म्हणतात.
अण्णासाहेबांचा त्यांच्या प्लँटमधला वावर अगदी पाहण्यासारखा असतो. तिथे काम करणाऱ्या कामगारांशी बोलताना ते ‘अण्णासाहेब' किंवा ‘चेअरमनसाहेब' नसतात. ते असतात कामगारांचे लाडके ‘अन्ना'. कामगार अगदी हक्काने त्यांच्याशी बोलतात, आणि तेही कामगारांशी घरगुती गप्पा मारतात. कामगारांची, त्यांच्या कुटुंबियांची नावं त्यांच्या लक्षात असतात. कुणाच्या पत्नीची तब्येत बरी नसते, कुणाच्या मुलाला परीक्षेत उत्कृष्ट यश मिळालेलं असतं, ‘अन्नां'ना त्या सगळ्याचीही खबर असते. ‘चकोते'च्या वितरकांशीही अण्णासाहेबांचं असंच नातं आहे. या सगळ्यांमधून ‘चकोते परिवार' नावाचं आगळंवेगळं औद्योगिक कुटुंब आकाराला आलं आहे.
अण्णासाहेबांनी मानवी नातेसंबंधांना सुरुवातीपासून महत्त्व दिलं. म्हणून आज त्यांना यशाचं शिखर पाहायला मिळतं आहे. त्यांच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल सध्या 250 कोटी रुपये आहे. पुढचा टप्पा अर्थातच 500 कोटींचा आहे. सध्या थेट नऊशे लोकांना आणि अप्रत्यक्षपणे अडीच हजार जणांना त्यांनी रोजगार दिलेला आहे. भारतात सर्वदूर त्यांच्या उत्पादनांचं वितरण चालू आहेच; पण भारताबाहेर दुबई, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, केनिया आणि नायजेरिया या देशांमध्येही ‘चकोते उत्पादनं' आता मिळू लागली आहेत.
अण्णासाहेबांना लहानपणी दत्तवाडच्या पावभट्टीच्या अरोमाची भुरळ पडली आणि त्यातून बेकरीचा एवढा मोठा व्यवसाय आज उभा राहिला. आज अण्णासाहेबांच्या व्यावसायिक यशालाही त्यांच्या प्रामाणिकपणाचा, कष्टाचा, कल्पकतेचा आणि उद्योजकीय धडाडीचा खास अरोमा आहे.
(अनुभव, मे 2023च्या अंकातून साभार)
आनंद अवधानी
आनंद अवधानी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आहेत. उद्योग आणि उद्योजकता विकास, प्रशासकीय अधिकारी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्तबगार व्यक्ती, तसंच स्वयंसेवी संस्था आणि स्वयंप्रेरित व्यक्ती यांच्या कामाबद्दल त्यांना विशेष आस्था आहे.
