वाढती महागाई ही गोष्ट आपल्याला नवीन नाही. कधी पेट्रोल, तर कधी डाळी, फळं भाज्या यांचे दर सतत वाढतच असतात. पाचेक वर्षं मागे वळून हिशोब लावला तर लक्षात येतं की इतर वस्तूंचे दर दुप्पट झाले असतील तर खोबरेल तेलाची किंमत मात्र एका वर्षात तिपटीहून अधिक झाली आहे. १६० रुपयांत मिळणारी एक लिटर खोबरेल तेलाची बाटली आता ५०० रुपये पार पोहचली आहे.
उत्पादनात अग्रेसर असूनही दरवाढ
नारळ उत्पादनाच्या बाबतीत जागतिक स्तरावर भारत पहिल्या तीन देशांमध्ये येतो. जगातील जवळपास २५ ते ३० टक्के नारळ उत्पादन भारतात होतं. पैकी बहुतांश उत्पादन तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये होतं. एकीकडे नारळाचं विक्रमी उत्पादन असूनही खोबरेल तेलाच्या किंमती मात्र वाढत चालल्या आहेत. ‘केराफेड’ या देशातील सर्वात मोठ्या खोबरेल तेल उत्पादक कंपनीने तेलाची किंमत प्रति लिटर ५२९ रुपयांपर्यंत वाढवली आहे, तर अनेक लोकप्रिय ब्रँड्सची किंमत ६०० रुपयांच्या वर गेली आहे. किरकोळ बाजारात नारळाची किंमत प्रति किलो ७५ ते ८५ रुपयांच्या दरम्यान पोचली आहे.
दरवाढीची कारणं
१. उत्पादनात घट
२०११-१२ साली भारतात २३३५ कोटी नारळ उत्पादन घेतलं गेलं होतं. हाच आकडा २०२३-२४ मध्ये २१३७ कोटी पर्यंत घसरला.
२. वापर वाढला
भारतात वर्षभरात दरडोई साधारण १४-१५ नारळ वापरले जातात. यामध्ये अन्नपदार्थ, सौंदर्यप्रसाधनं, औषधं अशा विविध प्रकारांनी नारळाचा वापर केला जातो. पण गेल्या दोन दशकांत हा वापर २५ टक्क्यांनी वाढलाय, असं कोकोनट डेव्हलपमेंट बोर्डाचा अभ्यास सांगतो. गेल्या काही वर्षांत भारतात सौंदर्यप्रसाधनं आणि पर्सनल केअर उत्पादनांमध्येही नारळाचा वापर वाढतो आहे. त्याचप्रमाणे सुक्या खोबऱ्याचा किस, नारळाचं दूध आणि नारळ पाणी अशी उत्पादनं बाजारात वाढत आहेत.
३. निर्यातीची मागणी वाढली
नारळ निर्यातीत भारत इंडोनेशिया आणि फिलिपिन्सनंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. अलीकडच्या काळात अमेरिका, युरोप आणि मध्य पूर्वेमध्ये खोबऱ्याचा कीस आणि नारळाच्या दुधाचा खप वाढला आहे. नारळाच्या औषधी गुणधर्मांच्या प्रसारामुळे युएई, अमेरिका इत्यादी देशांमध्ये खोबरेल तेलाची निर्यात वाढली आहे. त्याचबरोबर नुसतं खोबरंदेखील कच्चा माल म्हणून निर्यात केलं जातंय. यंदा किसलेल्या खोबऱ्याच्या निर्यातीत ३०० टक्के तर ताज्या नारळाच्या निर्यातीत १२ टक्के वाढ झाली आहे. परदेशातील खोबऱ्याची मागणी वाढल्याने देशात खोबऱ्याचा तुटवडा जाणवतोय का आणि त्यामुळे त्याचे दर वाढतायत का हा प्रश्न आहे.
४. नैसर्गिक कारणं
उन्हाळा हा नारळ काढणीचा हंगाम असतो. पण या वर्षी मान्सून लवकर सुरू झाला. त्यामुळे नारळांची आवक काही प्रमाणात घटल्याचं दिसून येतं.
शिवाय २०२० पासून दक्षिणी राज्यांमध्ये वारंवार दुष्काळ आणि उष्णतेची लाट येत आहे. याचबरोबर नारळ शेतीवर पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावही वाढतो आहे.
५. शेतकऱ्यांचं शहाळं विकण्याला प्राधान्य
नारळाच्या देशांतर्गत विक्रीमध्ये, थेट शहाळं विकण्याकडेही शेतकऱ्यांचा ओढा दिसतो. त्यामध्ये झटपट आणि जास्तीतजास्त नफा कमावता येतो. शहाळ्यांच्या विक्रीत वाढ झाल्यामुळे खोबरेल तेलाच्या निर्मितीसाठी लागणारा परिपक्व नारळ बाजारातून कमी होताना दिसतोय.
लोक पर्यायी तेलाच्या शोधात
संपूर्ण भारतात विविध कारणासाठी खोबरेल तेल वापरलं जातंच पण दक्षिण भारतीयांसाठी खोबरेल तेल हा रोजच्या खानपानातील अविभाज्य घटक आहे. खोबरेल तेलाचा मुद्दा त्यांच्या खाद्य सवयींशी निगडित आहे. असं असलं तरी तेलासाठी लिटरमागे ५०० रुपये खर्च करणं परवडणारं नाही. त्यामुळे लोक सूर्यफूल, पाम किंवा सोयाबीन तेल असे स्वस्त पर्याय निवडताना दिसतात. भारतातील सुमारे २९ टक्के घरांनी खाद्यतेल बदललंय असं लोकल सर्कलचा सर्व्हे सांगतो. त्यांनी स्वस्त आणि प्रसंगी कमी दर्जाचं खाद्यतेल वापरायला सुरुवात केलीय.
पण फक्त खोबरेल तेलाच्याच किंमती वाढल्या आहेत असं नाही. सूर्यफूलाचं तेल गेल्या वषर्भरात १८० रुपयांवरून २५० रुपयांवर पोचलं आहे. पाचेक वर्षापूर्वी सूर्यफूल तेलाच्या किंमती ९०च्या घरात होत्या. म्हणजे गेल्या पाच वर्षांत भारतातील सर्वाधिक वापर असणाऱ्या सूर्यफूल तेलाच्या किंमतीतही तिपटीने वाढ झाली. पण खोबरेल तेलाच्या किंमती मात्र एका वर्षभरातच तिप्पट झाल्या आहेत.
याचे परिणाम काय?
- किंमती वाढल्याने खप कमी होतो. त्यामुळे किंमत कमी ठेवण्याच्या प्रयत्नात खोबरेल तेलात स्वस्त तेलाची भेसळ होण्याची शक्यता वाढते. अशा भेसळयुक्त तेलाचा आरोग्याला धोका आहेच, शिवाय ग्राहकांचा खोबरेल तेलावरील विश्वासही कमी होऊ शकतो. परिणामी तेलाची दीर्घकालीन मागणी कमी होऊ शकते.
- यापूर्वी, शेंगदाणा तेलही असंच स्वस्त वनस्पती तेलांमुळे बाजारातून बाहेर फेकलं गेलं. त्याच धर्तीवर खोबरेल तेलही बाजारातून बाहेर पडेल का असा प्रश्न आहे.
यावर उपाय काय?
स्थानिक शेतकऱ्यांचं संरक्षण करण्यासाठी भारताने नारळ आणि त्यांच्या उत्पादनांच्या आयातीवर दीर्घकाळापासून बंदी घातली होती. पण आता वनस्पती तेल उद्योगाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतातील 'सॉल्व्हेंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन' (SEA)ने नारळ तेल आणि खोबऱ्यावरील आयात बंदी तात्पुरती शिथिल करण्याची मागणी केली आहे. तसं झालं तर नारळ उत्पादक शेतकरी, नारळ आधारित इतर उद्योग आणि त्यावर अवलंबून असणारा स्थानिक रोजगार यांचं भविष्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.
त्यामुळे तात्पुरता प्रश्न सोडवण्यापेक्षा दीर्घकालीन विचार करून नारळाचं उत्पादन वाढण्यावर भर देणं गरजेचं आहे. नारळाच्या उत्पादनावर परिणाम करणाऱ्या नैसर्गिक आणि बाजारविषयक घटकांवर गंभीरपणे विचार करावा लागेल. सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात खोबरेल तेल बाजारात टिकवून ठेवण्यासाठी अनेक दीर्घकालीन अंमलबजावणी करावी लागेल.
Key insights- The price of coconut oil in India has surged dramatically, with a one-liter bottle now costing over ₹500, up from ₹160 a year ago. This increase is happening despite India being one of the world's top coconut producers.
मन्सूर मुल्ला
मन्सूर युनिक फीचर्समध्ये संपादकीय विभागात कार्यरत असून डिजिटल मीडिया हा त्याचा आवडीचा विषय आहे.
