आम्ही कोण?
वीकेंड स्पेशल 

गणपतीचं गाव

  • मुकुंद ठोंबरे
  • 06.09.26
  • वाचनवेळ 25 मि.
pen ganesh

पेण या गावाची ओळख एकदम ठसठशीत आहे. गणपतीच्या सर्वांगसुंदर मूर्ती बनवण्यासाठी हे गाव प्रसिद्ध आहे. या गावाची ख्याती सातासमुद्रापार पोहचली आहे. इथे तयार होणाऱ्या मूर्तींचा एक ब्रँड तयार झालेला आहे. हा ब्रँड लोकप्रिय आहे. या ब्रँडमुळे पेणला वैशिष्ट्यपूर्ण वलय लाभलं आहे. 

काही गावं अशी असतात की, त्या गावांना जाण्याचा कधी योग आलेला नसला; तरीही ती गावं ओळखीची वाटतात. त्या गावांबद्दल आपण बरंच काही वाचलेलं, ऐकलेलं असतं; मात्र पेणबद्दल असं काही खात्रीने सांगता येत नाही, पेणबद्दल कोणी भरभरून बोलताना दिसत नाही. तरीही पेण ओळखीचं वाटतं. गणपतीच्या मूर्ती हा या ओळखीचा दुवा आहे. पेण ओळखीचं वाटण्यासाठी मराठी भाषिकांसाठी एवढा दुवा पुरेसा आहे. महाराष्ट्रातील अनेक गावं काही विशिष्ट कारणांसाठी प्रसिद्ध आहेत. सावंतवाडी लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहे तर सोलापूर चादरींसाठी विख्यात आहे; तसा गणपतीच्या मूर्ती हा पेणचा ठसा आहे. हा व्यवसाय जवळपास संपूर्ण गावाने स्वीकारलेला आहे. या व्यवसायात गावातील सर्व जातिपातींची माणसं आहेत. असं सहसा दुसरीकडे बघायला मिळत नाही. 

श्रावण महिना मध्यावर आला की महाराष्ट्रातील प्रमुख शहरात ‘पेणच्या सुबक, सुंदर मूर्ती मिळतील' असे बोर्ड झळकू लागतात. यातलं पेण हे जे गाव आहे ते रायगड जिल्ह्यातलं तालुक्याचं ठिकाण आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरीप्रमाणेच रायगड हा कोंकणातला प्रमुख जिल्हा. हा जिल्हा तळकोकणापासून दूर असला तरी कोंकणच्या निसर्गसौंदर्याचं वरदान रायगड जिल्ह्याला मुबलक प्रमाणात लाभलेलं आहे. तसंच ते पेणलाही लाभलेलं आहे. कोंकणचाच एक भाग असल्याने पेणवर पावसाळ्यात पावसाची संतत धार सुरू असते. साहजिकच उतरत्या छपरांची घरं हे कोंकणातील गावांचं वैशिष्ट्य पेणमधेही जाणवतं. गावात बैठ्या घरांचं प्रमाण जास्त असून, काही ठिकाणी अपार्टमेन्टस्‌‍नी डोकं वर काढलेलं दिसतं. बसस्टॅण्ड हे पेणमधलं सर्वांत वर्दळीचं ठिकाण. आठवडी बाजार याच भागात भरतो. पेणमध्ये हिरव्या भाज्या, फळं, फुलं, मासे यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असल्याने बसस्टँडजवळील बाजार हा आठवडी बाजाराप्रमाणे कायम गजबजलेला दिसतो. 

गावातून जाणारा खोपोली-अलिबाग हाच पेण शहराचा प्रमुख रस्ता असून, अलिबागकडे जाताना उजव्या हाताला या गावाने आपले हात-पाय आणि व्यवहार पसरले आहेत. गावातील मुख्य रस्त्यावरच नगरपालिकेचं कार्यालय, सार्वजनिक वाचनालय, सरकारी कार्यालयं, बँका, शेती अवजारं, खतं औषधं, किराणा, हॉटेल्स वगैरे व्यवसाय असं सारं एकवटलेलं आहे. बँका- पतपेढ्या यांची कार्यालयं याच भागात मोठ्या प्रमाणावर नजरेस पडतात. पेण गाव फार मोठं नाही. चालत निघालं की दोन अडीच तासांत सगळ्या गावाला फेरफटका मारून होतो. 

पेण गावात आळी प्रसिद्ध आहेत. आळी म्हणजे गल्ली अथवा परिसर. झिराळ आळी, गुरव आळी, तांबट आळी, दातार आळी अशा सात-आठ आळ्या म्हणजे पेण! या सर्व आळ्यांची स्वतंत्र ओळख असली तरी तिथे असलेले गणपतीचे शेकडो कारखाने हीच या आळ्यांची आणि पेणचीही खरी ओळख आहे. असंख्य गणेशाकारातून ती सामोरी येते. रंगविलेल्या, बिनरंगविलेल्या, तळहातावर मावतील अशा आकारापासून पुरुष, तीन पुरुष उंच असलेल्या गणपतींच्या मूर्ती आपली नजर खिळवून ठेवतात. प्रत्येक मूर्ती सुबक आणि सुरेख. पेणला आधी पेणं किंवा पेणे म्हणत, असं काहीजण सांगतात. पेणं म्हणजे पाणवठ्याची जागा. पेण पूर्वी तळ्यांनी वेढलेलं गाव होतं. हा व्यापारी लोकांचा थांबा होता. पुणे-मुंबई भागात व्यापार करणारे व्यापारी इथे काही वेळ विश्रांतीसाठी थांबत. अलिबाग बंदरा खालोखाल व्यापारी केंद्रं म्हणून पेणला महत्त्व होतं. पेणपासून जवळच असणाऱ्या अंत्रोली नावाच्या बंदरातही व्यापारी जहाजं थांबत. (आता हे अंत्रोली बंदर काळाच्या ओघात पुसून गेलं आहे.) अंत्रोली अलिबाग बंदरातून मुंबई-पुणे आणि घाटावर कुठल्या प्रकारचा माल जायचा याच्या काही नोंदी उपलब्ध आहेत. त्यानुसार भाजीपाला, फळं, फुलं, सागवान लाकूड, सुके आणि ओले मासे, तांदूळ, मीठ, सरपण (जळाऊ लाकडं), गवताचे भारे अशा गोष्टींसोबतच मातीची भांडी, माठ, रांजण, खेळणी, मूर्ती या वस्तूंचा व्यापार चालायचा. पुणे-नाशिक या भागातून तांब्याची भांडी, हळद, साखर, तेल, गहू, ज्वारी, डाळी, लसूण, मसाल्याचे पदार्थ पेण, अलिबागला यायचे. 

रस्ते आणि सागरी वाहतुकीमुळे अलिबाग-पेणला जास्त महत्त्व होतं. त्या काळात पेण हे गाव उत्तम प्रतीचा तांदूळ आणि मातीची भांडी, खेळणी या दोन गोष्टींसाठी प्रसिद्ध होतं. इथल्या तांदळापासून बनणारी तांदळाची पेज साजूक तुपाइतकी रवाळ आणि पांढरीशुभ्र असे की, त्यात फुलवात पेटवून निरांजन लावण्याचा मोह व्हावा! शेती हाच पेण गावाचा प्रमुख व्यवसाय होता. (तसा तो बऱ्याच प्रमाणात आजही आहे!) शिवशाहीत पेण हे स्वराज्यातलंच एक गाव होतं. पुढे पेशवाईत या गावाचा पेशव्यांसोबत घरोबा झाला. इथले कोल्हटकर हे पेशव्यांचे व्याही होते. साहजिकच पेशव्यांची गाणपत्य उपासना कोल्हटकर आदी ब्राह्मण कुटुंबांनी स्वीकारली. महाराष्ट्रातील प्रसिद्ध अष्टविनायकांप्रमाणे पेणमध्ये गणेशाची आठ प्रसिद्ध मंदिरं असून, पेणचे अष्टविनायक म्हणून ही मंदिरं प्रसिद्ध आहेत. 

pen ganesh

असं म्हणतात की, पेणमध्ये देवधर, टिळक, फाटक यांसारखी काही ब्राह्मण घरं पेशवे आणि त्यांच्या दरबारातील सरदारांसाठी पगड्या बांधणं, देवीचे मुखवटे तयार करणं, विविध सण उत्सवासाठी कलात्मक वस्तू बनवून देण्याचं काम करत. पुढे पेशवाई अस्तंगत झाल्यावर, काळानुसार पगड्या वगैरेंची मागणी आटल्यावर पेणमधल्या या ब्राह्मण कुटुंबांनी पर्यायी व्यवसाय म्हणून गणपती बनवण्यास सुरुवात केली! पेणमध्ये दत्तात्रय वैरागी हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते पेणमधले जुने व्यापारीही आहेत. पेणचा इतिहास, पेणची वैशिष्ट्यं, पेणमधील गणपती कारखाने, त्यांची परंपरा याबद्दल त्यांनी नवयुग, नवाकाळमधून वेळोवेळी लेख लिहिलेले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार पेण हे गणपतीचं गाव म्हणून प्रसिद्धीस आलं याचं श्रेय कोणा एका व्यक्तीचं नाही किंवा एका घराण्याचंही नाही. एका गरजेतून या व्यवसायाला आकार मिळत गेला असं त्यांचं म्हणणं आहे. ते म्हणतात, “पार्थिव गणपतीपूजन ही आपल्या संस्कृतीतली महत्त्वाची प्रथा आहे. या प्रथेनुसार प्राचीन काळापासून भाद्रपद महिन्यात घरोघरी शाडू म्हणजे मातीपासून गणपतीच्या पार्थिव मूर्ती बनवून त्याची पूजा केली जाते. काही ठिकाणी कुंभारांकडून गणपतीची मूर्ती बनवून घेतली जाई. पेण हे कुंभार कारागिरीसाठी सुरुवातीपासून प्रसिद्ध गाव होतं. पेणमध्ये पूर्वी लाल मातीपासून स्वयंपाकाची भांडी, पाण्याचे हंडे, रांजण, लहान मुलांसाठी खेळ, बाहुल्या वगैरे बनत. त्यात गणपतीच्या मूर्तींचाही समावेश होता. पेणमध्ये बनणाऱ्या मूर्तींना मुंबई आणि कोंकणपट्ट्यात चांगली मागणी होती. हळूहळू या मागणीत सातत्याने वाढ होत गेली आणि गावातील पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांनी या व्यवसायाला प्रारंभ केला. त्यात जम बसवला.”

पेणमध्ये गणपती मूर्ती व्यवसायाचा पाया कोणी घातला याबद्दल वेगवेगळी माहिती ऐकायला मिळते. पेण हे गाव १८व्या शतकाच्या आधीही गणपती मूर्तींसाठी प्रसिद्ध होतं असं म्हणतात. पेण आणि गणपतीच्या मूर्ती यांचा सांधा गेल्या शंभर-सव्वाशे वर्षांत जुळलेला आहे एवढं मात्र खात्रीने सांगता येतं. पेशवाई अस्तंगत झाल्यावर पेशव्यांसाठी पगडी, देवीचे मुखवटे तयार करणाऱ्या देवधर कुटुंबाने गणपतीच्या मूर्ती बनवायला सुरुवात केली. या व्यवसायाची सुरुवात भिकाजी कृष्णा देवधर यांनी केली. आज त्यांची चौथी पिढी गणपती तयार करण्याच्या व्यवसायात आहे! देवधर व इतर ब्राह्मण मंडळींनी पेणमध्ये गणपतीमूर्ती व्यवसायाचा पाया घातला हे पत्रकार वैरागी यांच्याप्रमाणे अनेकांना मान्य नसलं तरी या व्यवसायाचं उत्तम मार्केटिंग देवधरांनी केलं, त्यांच्यामुळे पेण परिसरातील अनेकांना चरितार्थाचं नवं साधन मिळालं हे देवधराचं योगदान वैरागींसह सगळे मान्य करतात!

हेही वाचा - कोल्हापुरी चप्पल: झिजत चाललेला उद्योग?

आज विज्ञानाच्या प्रगतीमुळे, आधुनिकीकरणामुळे वा जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे जीवनशैलीत झपाट्याने परिवर्तन होताना दिसतंय. विशेषत: शहरांमध्ये हे परिवर्तन सहजतेने जाणवतं. या नव्या रेट्यामुळे जातिपातीच्या मर्यादा सैलावल्या त्याचप्रमाणे पारंपरिक व्यवसायांच्या भिंतीही ढासळू लागल्या. आज सराफी, सोनाराच्या व्यवसायात सोनारांच्या शिवाय इतरही समाजघटक आहेत. फॅशन डिझायनिंगच्या नावाखाली शिंपीकामात अनेकजण शिरलेले दिसतात. हा बदल ब्रिटिशांच्या आगमनानंतर, त्यांच्या हाती सत्तेची सूत्रं गेल्यावर दिसू लागला होता; पण तो खूपसा शहरी भागातच मर्यादित होता. शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी ग्रामीण भागात स्वत:चा पारंपरिक व्यवसाय सोडून दुसरा व्यवसाय स्वीकारणं व करणं एवढं सोपं आणि सहजशक्य नव्हतं; पण आश्चर्यच आहे! पेणसारख्या कोंकणातील छोट्याशा गावात सामाजिक परिवर्तन अगदी सहजतेने झालं! ब्राह्मण, सुतार, सोनार, लोहार, शिंपी, आगरी, मराठे, कुणबी, आगरी, तांबट, गुरव या सगळ्या जातिपातींनी गणपती तयार करण्याचा व्यवसाय स्वीकारलेलं पेण हे एकमेव गाव आहे गावात देवधर-फाटक या ब्राह्मण कुटुंबांचे गणपतीचे कारखाने प्रसिद्ध आहेतच; पण पवार, वडके, समेळ, तांबट, गुरव, चाचड, पाटील यांच्याही कारखान्यांना काही दशकांची परंपरा आहे. 

अशारीतीने जवळपास सगळ्या गावाने एकाच व्यवसायाचा अंगीकार करणं हे आश्चर्यकारक असलं तरी पेणचं ते वास्तव आहे. गणपती बनवणं ही कला आहे. ते कौशल्याचं, कारागिरीचं काम आहे. अगदी साच्याचा उपयोग करून मूर्ती घडवायची म्हटली तरी ते काम कुणालाही जमेलच असं नाही. असं असतानाही जवळपास सगळ्या गावानं पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांनी हा व्यवसाय स्वीकारला याचं आश्चर्य वाटतं. मात्र हे कसं घडलं याचं एकच एक ठोस उत्तर हाती लागत नाही. पण काही शक्यता दिसतात. त्यातून पेणमध्ये झालेला सामाजिक बदल उलगडू लागतो...

देवधर वगैरे मंडळींनी गणपतीच्या मूर्ती बनवायला सुरुवात केल्यावर त्याला व्यवसायाचं स्वरूप देण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न केले. पेणमधील आघाडीचे गणेशमूर्तीकार श्रीकांत देवधर यांचे वडील वामनराव देवधर यांनी यादृष्टीने खास प्रयत्न केले. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद या ठिकाणी परिचितांच्या माध्यमातून गणपती पाठविण्यास सुरुवात झाली. हापूस आंबे बघितले की रत्नागिरीचे की, देवगडचे हा प्रश्न हमखास विचारला जातो. त्याचप्रमाणे पेणमधे तयार झालेल्या मूर्ती सुबक, सुंदर असल्याने त्याबद्दल विचारणा होऊ लागली. त्यातून पेणचं नाव ठसत गेलं. नाव झालं. ब्रँड तयार झाला. ‘मूर्ती कुठली?' या प्रश्नाला ‘पेण' हे हमखास उत्तर मिळू लागलं. यातून पेणमधील गणपती व्यावसायिकांकडे मागणी वाढू लागली. मागणीप्रमाणे पुरवठा होत गेला की त्यातून विश्वास निर्माण होतो हा बाजाराचा नियम आहे. पेणबद्दल हा विश्वास निर्माण झाला. वर्षातून फक्त एकदाच; तेही अकरा दिवसांच्या उत्सवासाठी लागणाऱ्या पेणमधील मूर्तींची एवढी ख्याती झाली, की ती पूर्ण करणं एकट्या-दुकट्याचं काम नव्हतं. वाढती मागणी त्यातून होणारा फायदा लक्षात घेऊन गणपतीचे कारखाने गावात वाढीस लागले. 

मागील काळाचा आढावा घेताना असं लक्षात येतं की, १९५० नंतर पेणमधील या व्यवसायाला गती मिळू लागली. १९८० नंतर म्हणजे गेल्या २०-२५ वर्षांत पेणच्या गणपती मूर्तींचा ब्रँड तयार झाला. तोपर्यंत इतरांनीही त्यात स्वत:साठी जागा करून घेतली. दहा वर्षांपूर्वी पेणमधून दीड ते दोन लाख मूर्तींची विक्री झाली होती. मागणीचा रेटा किती होता हे यावरून लक्षात येतं. हा कसबाचा व्यवसाय इतरांनी स्वीकारण्यामागे आर्थिक गरज हे एक महत्त्वाचं कारण तर होतंच ; पण यांत्रिकीकरण आणि सामाजिक बदलाचाही तो परिणाम होता.  

भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेती हा मुख्य व्यवसाय आहे हे जरी खरं असलं तरी साधारण दुसऱ्या महायुद्धानंतर जगाची मांडणी नव्या अर्थरचनेनुसार होऊ लागली. त्याचे बरे-वाईट परिणाम सगळ्या जगाला भोगावे लागले. या याचा परिणाम भारतावरही झाला. यांत्रिकीकरणामुळे बलुतेदारी संपुष्टात येऊ लागली. अनेक पारंपरिक व्यवसायांना घरघर लागली. नव्या बदलांचा, व्यवसायांचा अंगीकार करणं क्रमप्राप्त होतं. पेणमधील शेतकऱ्यांसह पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांनी मूळ व्यवसाय सोडून वा तो काही प्रमाणात कमी करून गणपती तयार करण्याचा व्यवसाय स्वीकारला. त्यामागे आर्थिक गरज, यांत्रिकीकरण आणि परिस्थितीत झालेला बदल हीच कारणं समोर होती.

घाटावर काय किंवा कोंकणात काय, एकदा पावसाची झड सुरू झाल्यावर सगळेच पारंपरिक व्यवसाय मंदावतात. भाताची पेरणी झाल्यावर कोंकणातल्या शेतकऱ्यांकडे तर बसून राहण्याशिवाय काही पर्यायच नसतो. हाताशी फावला वेळ बराच असतो, पण त्यात कमाई नसते. हा वेळ सत्कारणी लावावा म्हणून पेणमधल्या कातकरी, शेतकऱ्यांची मुलं मूर्तिकला शिकून घेण्याच्यादृष्टीने, चार पैसे मिळविण्याच्या हेतूने या व्यवसायाकडे ओढली गेली. मुख्य म्हणजे गावातच तशी सोय होती. पेणमध्ये देवधर - फाटक यांच्यासह जी काही घरं गणपती बनविण्याच्या व्यवसायात होती त्यांनाही कारागिरांची गरज होती. गाव आणि पंचक्रोशीतली बरीच माणसं त्यांच्याकडे कामाला होती. त्यात पारंपरिक व्यवसायात मंदी आलेले तांबट, कासार, लोहार, शिंपी वगैरेही होते. या सर्व घटकांनी पुढे स्वत:चे गणेश मूर्तींचे कारखाने सुरू केले आणि मूर्तीकार म्हणून प्रसिद्धीस आले. पेणमध्ये वामन माणिक वडके नावाचे मूर्तिकार आहेत. आज त्यांचं वय ऐंशी वर्षाच्या पुढे आहे. ते कल्हई लावण्याचं काम करत. दुसऱ्या महायुद्धानंतर स्टेनलेस स्टीलची, हिन्डालियमची भांडी आल्यावर त्यांच्या कल्हई व्यवसायावर विपरीत परिणाम झाला; तेव्हा त्यांनी काळाची पावलं ओळखून गणपती मूर्ती कला शिकून घेतली. अशी अनेक उदाहरणं पेणच्या आसपास सापडतात. 

pen ganesh

थोडक्यात गरज होती, मागणी होती, फावला वेळ होता, शिकणारे होते तसंच शिकविणारेही होते. त्यामुळे पेणमध्ये हा व्यवसाय चांगलाच फोफावला. आणखीन एक गोष्ट कारणीभूत ठरली. ती म्हणजे माती! पेणमधील प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे तसंच शाडूचे म्हणजे मातीपासून बनणाऱ्या गणपती मूर्तींना चांगली मागणी असते. प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून गणपती हा गेल्या काही दशकांमधला बदल आहे. मात्र पूर्वी पेणमध्ये शाडूचेच गणपती मोठ्या प्रमाणावर बनायचे. ज्या मातीपासून पेणमध्ये गणपती बनतात ती माती पेणच्या आसपास सापडतदेखील नाही. पण याच मातीने पेणचं नशीब बदललं हे सत्य आहे.  

पूर्वी पेणमध्ये कोंकणच्या लाल मातीपासूनच भांडी, मूर्ती वगैरे बनत; पण भांड्यांना, मूर्तींना कालांतराने तडे जायचे, भेगा पडायच्या. यावरचा उपाय इथल्या मूर्तीकारांना सागर किनाऱ्यावर योगायोगाने सापडला. कुठलंही जहाज ज्यावेळी प्रवासावर निघतं, तेव्हा त्या जहाजाचा तळ हा पुरेसा जड असणं आवश्यक असतं. त्याशिवाय ते तरंगू शकत नाही. यासाठी आवश्यक तेवढ्या वजनाचा माल किंवा वाळू, माती वगैरेची पोती टाकून जहाजाचा तळ जड करतात. मगच ते जहाज प्रवासाला निघतं. अलिबाग,अंत्रोली ही गावं ज्यावेळी बंदरं म्हणून प्रसिद्ध होती; तेव्हा जामनगर, भावनगर म्हणजे गुजरातमधली जहाजं, अलिबाग, अंत्रोली बंदराला लागायची. इथला माल जहाजात भरण्याआधी जहाजावरची वाळू, मातीची पोती या पट्ट्यातील किनाऱ्यावर मोकळी केली जाई. सागर किनाऱ्यावर या मातीचे अनेक ढिगारे होते. ही माती कुंभारांनी वापरली. ती त्यांच्या उपयोगाची ठरली. या मातीपासून बनविलेल्या भांड्यांना वा मूर्तींना तडे जात नव्हतेच. शिवाय मूर्तींना विशेष लकाकी मिळत होती! गुजरातमधली माती पेणमध्ये या प्रकारे कामास आली. कालांतराने कोंकण किनाऱ्यावरची सागरी वाहतूक मंदावली; पण गुजरातमधून पेणमध्ये येणारा मातीचा ओघ कायम राहिला. त्यातून पेणची मूर्तिकला आकारास येत गेली. गुजरातच्या मातीने पेणचं भाग्य बदललं ते असं! 

कोंकणातल्या हिरवाईची समृद्धी लाभलेलं पेण हे गाव टुमदार आहे. शहराचा तोंडवळा असलेलं पेण फार मोठं नाही; पण स्वच्छ आहे. समृद्धी ओसंडून वाहताना दिसत नसली तरी हे खातं-पितं गाव आहे. टेलिफोन-मोबाईलसह सर्व आधुनिक सोयी गावात आहेत. लोकसंख्या लाखभराच्या आसपास आहे. हिंदू, बौद्ध, पारशी, मुस्लीम अशा सर्व धार्मियांचं हे नांदतं गाव आहे. आगरी समाजाचं गावात प्राबल्य असून या भागाचे आमदार रवींद्रशेट पाटील असून, ते काँग्रेस पक्षातर्फे निवडून आलेले आहेत. नगरपालिकेवर काँग्रेस पक्षाची सत्ता असून, रेखा धारकर या नगराध्यक्षा आहेत. बाहेरून नोकरी व्यवसायासाठी आलेल्यांमुळे शहराची लोकसंख्या वाढत गेलेली दिसते. भातशेती आणि गणपती तयार करणं हा स्थानिकांचा मुख्य व्यवसाय आहे. शहरात गणपतीचे छोटे-मोठे असे पाचशेच्या आसपास कारखाने आहेत. दुसरं असं की, हा व्यवसाय केवळ शहरापुरता सीमित नाही. पंचक्रोशीतल्या गावांमध्ये, पेण तालुक्यातील खेड्यापाड्यांत गणपतीचे अनेक कारखाने सुरू झालेले आहेत. ग्रामीण भागातील गणपतीच्या कारखान्यांची ही संख्या गृहीत धरली तर, पेण परिसरात एकूण बाराशेच्या वर गणपतीचे कारखाने आहेत. 

गणपतीचा कारखाना! ऐकायला मोठं मजेदार वाटतं. ‘कारखाना' म्हटलं की, मोठा परिसर, अनेक यंत्र, यंत्रावर काम करणारे कामगार, अनेक प्रकारचे आवाज वगैरे जे ठराविक दृष्य डोळयांसमोर उभं राहतं तसं गणपतीच्या कारखान्यांचं दृष्यस्वरूप नाही. गणपतीचा कारखाना म्हणजे घरंच आहेत. चौसोपी वाडा असो, पडवी असो, छोटंसं घर असो वा खास बांधून घेतलेले मजले असोत; घरातलं सामान दाटीवाटीने ठेवून जास्तीत जास्त जागा गणपती ठेवण्यासाठी केलेली असते. कारखान्यातील सर्वाधिक मोकळ्या जागेत कारखान्याच्या मालकासह इतर कलाकार गणपतीच्या मूर्ती बनविण्यात मग्न असतात. घरातलं रांगतं मूलही गणपतीच्या मूर्तींमध्येच खेळत असतं. अंघोळ, पूजा, स्वयंपाक, जेवण वगैरे दिनक्रम एकीकडे सुरू असतो दुसरीकडे कलाकारांचे हात वेगवेगळ्या कामांत गुंतलेले असतात. कोणी माती चाळत असतं, कोणी माती कालवत असतं. कोणी हाताने अगर साच्यातून गणपतींना आकार देत असतं. घरातील भिंतीलगत लाकडाचे, लोखंडाचे रॅक्स लावलेले दिसतात, त्यावर तयार झालेल्या मूर्ती वाळत ठेवतात. नीट वाळलेल्या मूर्तींचं रंगकाम एकीकडे सुरू असतं. रंगाचा वास, मातीचे गोळे, साचे पूर्ण वा अर्धवट अवस्थेतील मूर्ती; त्यात काम करणारे कारागीर असं गणपती कारखान्याचं एकदम घरगुती स्वरूप असतं. 

हेही वाचा - कातळशिल्पं : कोकणातलं दुर्लक्षित नवल

पेणमधील कारखान्यात गणपतीशिवाय गौरीच्या सणासाठी लागणारे मुखवटे, दिवाळी-दसऱ्याच्या सुमारास लागणाऱ्या लक्ष्मीच्या मूर्ती, दिवे, किल्ले सजाविण्यासाठी मुलांना लागणारे खेळ, ऑर्डर असेल तर इतर देवादिकांच्या मूर्ती असं बरंच काही बनवणं सुरू असतं. पण गणपती बनवणं हाच मुख्य व्यवसाय आहे बारा महिने, चोवीस तास हे गाव गणपती बनविण्यात मग्न असतं. कारखान्याला सुटी अशी नसतेच. शेती, इतर व्यवसाय सांभाळून या व्यवसायाशी निगडित असलेला प्रत्येकजण स्वत:ची जबाबदारी पार पाडत असतो. भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीला गणपतीची स्थापना झाल्यावरही पेणमधल्या कलाकारांना उसंत मिळत नाही. पुढच्या मोसमाच्या आखणीला, नियोजनाला त्यांना सुरुवात करायची असते. 

पेणमधील गणपतीच्या कारखान्याचे मालक फार पूर्वीपासून एक प्रथा पाळत आलेले आहेत. अवघा महाराष्ट्रीय समाज ज्यावेळी अकरा दिवसांचा गणेशउत्सव आनंदात साजरा करून गणपती बाप्पाला ‘पुढच्या वर्षी लौकर या' अशी आळवणी करत अकराव्या दिवशी विसर्जनाच्या तयारीला भरल्या अंत:करणाने लागलेला असतो, तेव्हा गणपती कारखान्याचे मालक त्यादिवशी शुचिर्भूत होऊन स्वत:च्या हाताने गणपतीची शाडूची मूर्ती बनवितात, या मूर्तीचं विधिवत पूजन करतात. आणि इथून नव्या मोसमाला सुरुवात होते!

पेणमध्ये वर्षाला सर्व प्रकारच्या आकारातील जवळपास पंधरा लाख मूर्ती बनतात. गणेशोत्सवात घरोघरी देवपूजेत पूजल्या जाणाऱ्या गणपतीच्या मूर्तींनाच सर्वाधिक मागणी असते. सिंहासनावर बसलेली मूर्ती असं या मूर्तींचं स्वरूप असतं. या मूर्तींची उंची शास्त्राप्रमाणे आठ ते नऊ इंच इतकीच असते; मात्र ग्राहकांच्या आवडीनुसार मोठ्या आकाराचेही गणपती बनवून दिले जातात. पुरुष-दीड पुरुष उंचीच्या गणपतींसाठी पेण फारसं प्रसिद्ध नाही. मोठे अवाढव्य गणपतीही बनतात; पण ते मागणीनुसारच. त्यांची संख्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी असते. 

पेणमधील या व्यवसायाची उलाढाल साधारणपणे दहा कोटींच्या आसपासची असून, त्यात सातत्याने वाढ होत आहे. मुंबई, पुणे, नाशिक यासह महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरांत, तसंच अहमदाबाद, बडोदा, इंदौर, बेळगाव वगैरे ठिकाणी पेणच्या मूर्ती विक्रीला जातात. इथल्या सुबक, सुंदर मूर्तींची ख्याती परदेशातही पोहोचली असून, अमेरिका, लंडन, दुबई शहरांतली मंडळं गणेशोत्सवासाठी खास पेणवरून मूर्ती मागवतात. 

पेण शहराचे व्यवहार सकाळी सातच्या सुमारास वेग घेऊ लागतात. बस, टमटम (सहा आसनी रिक्षा)मधून खालापूर-अलिबागकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू होते. सकाळच्या वेळी बस - टमटमची सुरू झालेली वाहतूक रात्री आठ-नऊ वाजेपर्यंत सतत सुरू असते. बस, रिक्षा वा सायकलवरून गणपतीच्या कारखान्यात काम करणारे कारागीर आपापल्या कारखान्यात पोहोचतात. पुढचे आठ-दहा तास मातीतून कलात्मक मूर्ती घडविण्याचं त्यांचं काम सुरू होतं. 

दिनेश गुरव नावाचा कारागीर पेणमध्ये भेटला. गेली पाच वर्ष तो गणपतीच्या कारखान्यात काम करतोय. तो बारावीपर्यंत शिकलेला आहे. साच्यातील मूर्तीला आकार देण्याचं काम तो शिकला आहेच; शिवाय स्वतंत्रपणे तो शाडूची मूर्तीही बनवू शकतो. ‘या व्यवसायात कसा आलास?' या प्रश्नावर तो म्हणाला, “अगदी सहज. खरं म्हणजे आधी मला मूर्तीकलेतलं काहीही येत नव्हतं. घरी थोडी भातशेती आहे. बारावीनंतर पुढे शिकण्याची परिस्थिती नव्हती. लहानपणापासून मूर्ती बनविण्याचं काम बघत होतोच. वाटलं आपणही ही कला शिकावी या म्हणून कामाला लागलो. पुढे जमलं.”

चाचड नावाचे गणपतीच्या कारखान्याचे मालक म्हणाले, “ मुंबईला वा इतर ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न करण्याआधी पेणमधली मुलं आधी गणपतीच्या कारखान्यात प्रयत्न करतात. या व्यवसायात सतत कारागिरांची आवश्यकता असतेच; त्यामुळे त्यांना किमान रोजगाराचं काम नक्कीच मिळतं. थोडं शिकलेल्यांना मुंबईत रोजगार किंवा नोकरी मिळाली तरी त्यांना फारसे पैसे मिळत नाहीत. तीन ते चार हजार रुपये महिना हे त्यांचं उत्पन्न असतं. शिवाय राहण्याचा, खाण्या-पिण्याचा, प्रवासाचा खर्च असे अनेक प्रश्न असतात. पेणमध्ये चार-पाच हजार रुपये त्यांना मिळत नाहीत पण किमान तीन ते चार हजार त्यांना हमखास मिळतात. गावातच रोजगार मिळत असल्याने अनेक तरुण इतर ठिकाणी नोकरी शोधण्यापेक्षा या व्यवसायात येतात. ते त्यांना परवडतं.” 

पेणमध्ये गणपतीचे जवळपास सत्तर प्रमुख व्यावसायिक असून, कंत्राटी पद्धतीने काम करणारे बरेच व्यावसायिक आहेत. दीड ते दोन हजार मूर्ती बनविणारा कारखाना हा छोटा कारखाना समजला जातो. अशा कारखान्यांची संख्या बरीच असून, देवधर, फाटक, चाचड, समेळ, गुरव, वडके यांच्यासारख्या मोठ्या कारखान्यांमध्ये वीस हजारांहून अधिक गणपती बनतात. या व्यवसायाने म्हणून किमान चार-पाच हजार लोकांना कायमचा रोजगार पुरविला आहे. याशिवाय माती पुरवठा, रंग, गणपतीमूर्तींची वाहतूक याप्रकारे अनेकजण या व्यवसायाशी संबंधित असून, या व्यवसायावर अप्रत्यक्षरीत्या अवलंबून असणाऱ्यांचं प्रमाणही मोठं म्हणजे पंचवीस हजारांच्या आसपास आहे. 

pen ganesh

पेणमधे गणपती व्यवसाय हा दोन-तीन प्रकारे चालतो. एक म्हणजे परिसरातील विक्री. ही विक्री प्रत्येक व्यावसायिक स्वत: करतो. काही कारखानदार पुणे, मुंबई, बडोदासारख्या ठिकाणी मूर्तींची स्वत: विक्री करतात. या व्यवहारात एजंट नसतो. गावोगावचे विक्रेते पेणमधील कारखानदारांशी संपर्क साधून मूर्तींची ऑर्डर नोंदवितात. हा प्रकार मोठ्या प्रमाणात रुळलेला आहे. एजंटच्यामार्फत व्यवसाय करणारेही बरेच आहेत. काही कारखानदार एजंटच्या माध्यमातूनच आपल्या विक्रीचं उद्दिष्ट गाठतात. पेणमध्ये गणपतीच्या मूर्तींची दोन प्रकारे विक्री होते. एक म्हणजे तयार रंगविलेल्या मूर्ती; या मोठ्या प्रमाणावर खपतात. दुसऱ्या प्रकार म्हणजे न रंगविलेल्या, पॉलिश न केलेल्या मूर्तीं. या मूर्तींची विक्री ठोक पद्धतीने होते न रंगवलेल्या मूर्तींची किंमत कमी असते. बाहेर गावचे कारागीर कच्च्या मूर्ती विकत घेऊन त्यांना रंगवतात आणि पेणच्या मूर्ती म्हणून विकतात. पेणमधल्या व्यावसायिकांचं एकच उद्दिष्ट असतं, ते म्हणजे शक्यतो एकही मूर्ती शिल्लक राहता कामा नये. शंभरातले नव्वदजण तरी हे उद्दिष्ट पूर्ण करतात. 

गावाच्या मानाने पेणमधल्या गणपती व्यवसायाची उलाढाल मोठीच आहे. हा व्यवसाय सोपा नाही. त्यात अनेक अडचणी आहेत. पेणमध्ये वर्षभर गणपती तयार होत असले तरी त्यांचा विक्री व्यवहार वर्षातून एकदाच होतो तेही श्रावण महिना सुरू झाल्यावर. या व्यवहारांचा शेवटचा दिवस असतो भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीचा दिवस. या महिना सव्वा महिन्यात होणाऱ्या विक्रीवर नजर ठेवत कारखानदारांना संपूर्ण वर्ष काढावं लागतं. वर्षभर खेळतं भांडवल पुरवणं हा मोठा प्रश्न असतो. शिवाय कारागिरांना आठवड्याला त्यांच्या रोजगाराची किंमत अदा करायची असते. साहजिकच अशी क्षमता असलेल्या कारखानदारांच्या हाती हा व्यवसाय काही प्रमाणात एकवटलेला दिसतो. त्यामुळेच कारखानदारांपेक्षाही सावकारांच्या हाती गणपती निर्मिती व्यवसायाची सूत्र गेली आहेत. पेण आणि पेण परिसरातील ग्रामीण भागात व्यवसाय करणाऱ्या असंख्य छोट्या गणेशमूर्तीकारांना स्थानिक सावकारांच्या वळचळणीला जाऊन व्यवसाय करण्याला पर्यायच नसतो. पेणमधे सावकारीही आहे आणि सावकारी व्यवस्थेतली पिळवणूकही आहे. मात्र त्याबद्दल कोणी उघडपणे बोलत नाही किंवा बोलू शकत नाही. मात्र आता रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक, पेण को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (पेण), बँक ऑफ बडोदा (पेण) अशा बँकांनी मुदतकर्ज; खेळते भांडवल या योजनांमधून गणपती व्यावसायिकांना भांडवल पुरवण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे. या कर्ज योजनांचा लाभ घेणाऱ्यांची संख्या धिम्यागतीने वाढत असून एका आकडेवारीनुसार यंदा सहकारी आणि राष्ट्रीयीकृत बँकांनी पेण शहर आणि ग्रामीण भागातील ३१५ गणेश मूर्तीकारांना एकूण २९२ लाख रूपये कर्ज रूपात अदा केले आहेत. 

पेणमधील गणेश मूर्तीकारांच्यादृष्टीने आणखी एक चांगला बदल होत आहे. रायगड जिल्ह्यात विशेषत: पेण तालुक्यात ओलावा, सद्भाव फांऊडेशन, युसुफ मेहेरअली सेन्टर यासारख्या स्वयंसेवी संस्था तसंच रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (पेण) यांच्या माध्यमातून ४०० महिला बचतगट कार्यरत असून या बचतगटांनी ग्रामीण भागातील गणेश मूर्तीकारांना अर्थपुरवठा करायला सुरुवात केली असून त्यामुळे स्थानिक सावकारीला आळा बसू लागला आहे. पेण तालुक्यातील शिक्रीचाळ, हमरापूर, वाशी वगैरे गावात झालेले प्रयत्न त्यादृष्टीने उल्लेखनीय आहेत. या बदलांचे व्यापक परिणाम दिसायला कदाचित काही काळ लागेल. मात्र सध्या खेळतं भांडवलं आणि कारागिरांच्या मागण्या यांचा सामना कारखानदारांना इतर अडचणीसोबत करावा लागतो आहे. 

हेही वाचा - सूर्यमंदिराची अनोखी कहाणी : कनकादित्य

कारखान्यात परिसरातीलच कारागीर कामाला असले तरी त्यांच्याही मागण्या असतातच. किमान ऐंशी रुपये हा रोजगारीचा दर असून, कारागीराच्या कसबाप्रमाणे तो ३०० ते ५०० रुपये इतका सुद्धा आहे. सीझन जवळ आला की, कारागिरांच्या रोजगारात वाढ करावी लागते अन्यथा ऐन मोसमात कारागीर काम सोडून जातात. त्यांना सांभाळून घेण्यासाठी त्यांच्या गरजा, दुखणं-खुपणं, अडचणी कारखानदारांना निस्तराव्या लागतात. ‘श्री गणेश मूर्तीकार आणि व्यावसायिक कल्याणकारी मंडळ' नावाची गणपती व्यावसायिकांची संघटना स्थापन झाली आहे; मात्र या संघटनेचं अस्तित्व म्हणावं तसं नाही, अशी अनेक व्यावसायिकांची तक्रार आहे. श्रीकांत देवधर हे या संघटनेचे अध्यक्ष असून, बळीराम पवार हे उपाध्यक्ष आहेत. सचिव अनंतराव ढवळे, तर खजिनदार माधवराव फाटक आहेत. 

“ऐन मोसमात एजंटांनी बाहेर गावातील व्यापाऱ्यांशी संधान बांधून त्यांना फितवण्याचे प्रकार आता पेणमध्ये वाढत आहेत. त्याचा फटका छोट्या कारखानदारांना अधिक बसतो. या संदर्भात संघटनेने लक्ष घालावं”, असं कारखानदार चाचड यांचं म्हणणं आहे. व्यावसायिकांना भारनियमनाचा त्रास होऊ नये, सरकारने गणपती कारखानदारांसाठी विशेष औद्योगिक क्षेत्र तयार करून तिथे प्रत्येकाला जागा द्यावी, इतर कॉटेज इंडस्ट्रीला सरकारकडून जसं साहाय्य मिळतं त्याप्रमाणे सगळ्या सुविधा इथेही मिळाव्यात, नैसर्गिक आपत्तीमुळे अथवा अन्य काही कारणाने नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळावी या मागण्या संघटनेने सरकारकडे लावून धरलेल्या आहेत. परंतु त्यांचे प्रयत्न अजून कमी पडत आहेत. 

पेण परिसरातील छोट्या-मोठ्या सर्व मूर्तीकारांनी, व्यावसायिकांनी संघटनेचं सदस्यपद स्वीकारून त्याचा लाभ घ्यावा, यासाठी नाबार्डही प्रयत्नशील आहे. गेल्या वर्षीच्या आणि यंदा आलेल्या पुरात पेणमधील भोगावती-नदीच्या किनारी असलेल्या अनेक गणपती कारखान्यांचं नुकसान झालं. पण नुकसान भरपाई मात्र मोजक्याच लोकांना मिळाली. व्यावसायिकांना नुकसान भरपाई देण्यात शासनाने उदार धोरण स्वीकारलं पण ज्यांनी बँकांकडून कर्ज घेतलं होतं, ज्या व्यावसायिकांनी विमा सरंक्षण घेतलं होतं, त्यांना नुकसान भरपाई तुलनेने अधिक मिळाली. याचा एक चांगला परिणाम असा झाला आहे की गणेश व्यावसायिकांना त्यांच्या संघटनेचं महत्त्व पटत असून सदस्यत्व स्वीकारण्याकडे त्यांचा कल वाढत आहे. या संदर्भात संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत देवधर म्हणाले, “सर्व मूर्तीकार संघटनेचे सदस्य झाल्यास शासनाच्या सहकारी तत्वावरील विविध योजनांचा लाभ त्यांना मिळू शकेल. जवळपास शतकाची परंपरा असलेल्या या व्यवसायाला आधुनिक स्वरूप देण्याची गरज आहे. पेण, रामवाडी किंवा गोवा राष्ट्रीय महामार्गाजवळ एमआयडीसीच्या धर्तीवर औद्योगिक क्षेत्र उपलब्ध करून दिल्यास या व्यवसायाला आणखी स्थिरता मिळू शकेल.” 

संघटनेच्या मागण्या आहेत त्याचप्रमाणे संघटनेकडून अपेक्षाही आहेत. पण सोबतच पेणमधील गणेश व्यावसायिकांची ही कल्याणकारी संघटना अद्याप बाल्यावस्थेत आहे, हेही एक वास्तव आहेच. त्यामुळे पेणमधील गणेश मूर्तीकारांना समान आणि योग्य पद्धतीने फायदा होत नाही. प्रत्येकजण स्वत:चा फायदा डोळ्यासमोर ठेवत या व्यवसायावर आपली पकड घट्ट करण्याच्या प्रयत्नात आहे. 

आजघडीला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गणेशमूर्ती बनतात. परंतु त्यांना पेणच्या मूर्तींची सर नाही. असं का होतं, असा प्रश्न कुणालाही पडावा. “आम्ही बनविलेल्या मूर्तीकडे बघा मग त्याचं रहस्य तुमच्या लक्षात येईल” चाचड म्हणतात. त्यांच्या कारखान्यातील दीड-दोन हजार मूर्ती समोर होत्या. प्रत्येक मूर्ती बोलकी. आकार, रंगकाम इतकं सुरेखपणे जुळून आलेलं की, नजर काढण्याची इच्छा होऊ नये. इतक्या मूर्ती बघतानाही त्यांचं खास वैशिष्ट्य लक्षात येत नव्हतं. तेव्हा चाचड म्हणाले, “पेणच्या मूर्ती आणि इतर मूर्तींमधला फरक आम्ही सहज सांगू शकतो. तुम्ही या मूर्तींचा बॉडी कलर बघा. ते आमचं खास वैशिष्ट्य आहे. अत्यंत सौम्य बॉडी कलर. पेण व्यतिरिक्त इतर कुठल्याही मूर्तीमध्ये तुम्हांला ही गोष्ट बघायला मिळणार नाही.”

पत्रकार दत्तात्रय वैरागी यांनीही याला दुजोरा दिला. ते म्हणाले, “पूर्वीच्या मूर्ती यापेक्षाही सुरेख असायच्या तेव्हा म्हणजे जवळपास पाच-सहा दशकांपूर्वी चीन, जपान, अमेरिका वा इंग्लंडवरून आयात केलेले रंग वापरले जायचे. त्या रंगातून पेणच्या कलाकारांनी रंगाचं खास रसायन तयार केलं आणि ते मूर्तींसाठी वापरलं. बॉडी कलर हा त्यातलाच एक भाग आहे.” 

पेणच्या मूर्तींचं दुसरं वैशिष्ट्य चाचड सांगतात, ”इथल्या मूर्तींना हलक्या हाताने पॉलिश केलेलं असतं. हातापासून तयार केलेली वा साच्यातून काढलेली मूर्ती ही थोडी रफ म्हणजे खडबडीत असते. तिला अभ्रकाने वा चामड्याच्या तुकड्याने घासून पॉलिश करावं लागतं. अशी पॉलिश केलेली मूर्तीही तितकीच सुंदर दिसते. पण खरं कसब असतं ते बॉडी कलर, पीतांबर, दागिने वगैरे रंगवून झाल्यावर गणपती आखण्यात.”

गणपती आखणं म्हणजे गणपतीचे डोळे रंगविणं. हे अत्यंत कसबी काम असतं. हे काम स्वत: कारखानदार अथवा अनुभवी कारागीरच करतात. बहुतेक कारखान्यात घरातील महिला सदस्य डोळे आखण्याचं काम करतात. गणपतीच्या डोळ्यांमध्ये मूर्तीचं सगळं सौंदर्य एकवटलेलं असतं. ते डोळे आश्वासक, भावपूर्ण, बोलके वाटावे लागतात. प्रत्येक कारखानदार प्रत्येक मूर्तीच्या डोळ्यांची तपासणी करतो. त्यात कुठे किंचितसाही फरक आढळला तर ती मूर्ती बाजूला काढली जाते. ‘विशेष म्हणजे असा प्रसंग कुठल्याच कारखान्यावर येत नाही' चाचड म्हणाले. इतर कारागिरीसोबतच गणेशाच्या मूर्तीचे डोळे कसे आहेत यावरही मूर्तीची निवड, किंमत अवलंबून असते. पेणमधील कारागिरांमध्ये महिला सदस्यांचंही प्रमाण लक्षणीय असून, डोळे आखणं व इतर नाजूक नक्षीकाम करणं ही जबाबदारी महिलाच पार पाडतात. 

पेणमध्ये बनणारी प्रत्येक गणेशमूर्ती ही किमान सात ते आठ कारागिरांच्या हाताखालून जाते. माती कालवणं ते डोळे आखणं असं प्रत्येकाने काम वाटून घेतलेलं असतं. स्वत:चं काम करताना आपोआपच इतरही गोष्टी डोळ्यांसमोर घडत असल्याने, व त्या शिकण्याची मोकळीक असल्याने प्रत्येक कलाकार हा चार ते पाच वर्षांत सगळ्यादृष्टीने तयार होतो. मग यातलेच काही कलाकार स्वत:चा छोटासा का होईना कारखाना घरी वा गावी सुरू करतात. पेणमध्ये गणपतीचे कारखाने वाढत आहेत त्यामागे हे सूत्रही आहे. हातातील कसब आणि कारागिरांचं संघटन हेच या व्यवसायाचं खरं भांडवल आहे. नव्यानेच सुरू झालेल्या कारखान्याला कंत्राटी पद्धतीचं काम का होईना अवश्य मिळतं. त्यामुळेच गणपतीचा कारखाना सुरू केला आणि तो चालला नाही असं उदाहरण पेणमध्ये सापडत नाही. सततची वाढती मागणी हे पेणमध्ये हा व्यवसाय उत्तमप्रकारे स्थिर होण्याचं महत्त्वाचं कारण आहे. 

कारखाना म्हटलं की वाढती स्पर्धा ही त्यासोबत येणारी अपरिहार्य बाब असते. पेणप्रमाणे मुंबई, पुणे, बडोदा, नाशिक, हुबळी या ठिकाणीही गणपतीचे कारखाने मोठ्या प्रमाणावर आहेत, पण तरीही या स्पर्धेचा परिणाम पेणच्या व्यवसायावर झालेला नाही. कारण पेणमध्ये बनणाऱ्या मूर्तींची सगळी वैशिष्ट्यं जपत पेणने मागणी तेवढा किंबहुना जास्त पुरवठा नेहमीच केलेला आहे. मूर्तींमधली साचेबद्धता त्यांनी कुशलतेने मोडलेली आहे. पेणमध्ये दरवर्षी जवळपास पाचशे प्रकारचे गणपती बनतात. त्यात दरवर्षी विविधता आणली जाते. तसे साचे नव्याने ओतले जातात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सर्व कसब ओतून दरवर्षी नव्या स्वरूपातल्या मूर्ती बनवून विक्रीचा तोल अचूकपणे सांभाळला जातो. काही कारखानदारांनी केवळ शाडूच्या मूर्ती बनविण्याशी एकनिष्ठ राहून स्वत:चं वैशिष्ट्य सांभाळलेलं आहे. मूर्तिकार दिलीप समेळ हे त्यापैकी एक आहेत. ‘गणपतीची मूर्ती बनविताना त्यातून समाधान मिळणं हे तेवढंच महत्त्वाचं असतं, प्लॅस्टर ऑफ पॅरिसमधून हे समाधान मिळत नाही', असं त्यांचं मत आहे!

स्पर्धेचा परिणाम पेणमधल्या व्यवसायावर जाणवत नसला तरी इथल्या मूर्तींची नक्कल रोखणं त्यांच्या आवाक्याबाहेर आहे. यासंदर्भात श्रीकांत देवधर म्हणतात, “या व्यवसायाचा पाया आमच्या आजोबा-पणजोबांनी घातला. त्यांनी बनविलेल्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण मूर्तींची नक्कल करून अनेकांनी ती स्वत:ची कला असल्याची जाहिरात केली. हे सगळं क्लेशदायक आहे; पण प्रत्येक मूर्तीचं पेटंट मिळवणं सोपं नसतं. नक्कल करणाऱ्यांना प्रतिबंध कसा घालावा हा आमच्यासमोर मोठा प्रन आहे.” 

देवधर वगैरे कसबी कलाकारांची ही व्यथा समजण्यासारखी आहे; पण त्यावर मात करण्यासाठी त्यांच्यासारख्या अस्सल, खऱ्या कलाकरांनी यावर एक उपाय शोधलेला आहे तो म्हणजे अधिक सुरेख, सुबक,उत्तम मूर्ती बनवणं. एका अर्थाने पेणमधल्या व्यावसायिकांची स्पर्धा स्वत:शीच आहे. त्यामुळेच ते सगळ्यापेक्षा पुढे आहेत, म्हणूनच गणपती मूर्ती व्यवसायाचा एक मोठा हिस्सा म्हणजे एकूण बाजारपेठेच्या वीस ते पंचवीस टक्के व्यवसाय पेणकरांच्या ताब्यात आहे. त्यांचा नावलौकिक सातत्याने वाढतोच आहे. 

पेण हे असं एकदम वेगळं गाव आहे. इथे ‘कारखाने' आहेत, पण कारखान्यांमुळे होणारं प्रदूषण नाही. कामगार आहेत पण कामगार संघटना नाहीत. व्यवसायाचे छोटे-मोठे प्रश्न जरूर आहेत, पण त्यासाठी एकमेकांत तेढ नाही. स्पर्धा आहे पण त्यात खुलेपणाही आहे. एका अर्थाने हे एक आगळंवेगळं गाव आहे. मानवी स्वभावाचे आणि व्यवहारांचे कंगोरे सांभाळत हे गाव मूर्ती बनवण्याची कला एका पिढीतून पुढच्या पिढीत हस्तांतरित करत पुढे पुढे सरकत आहे.

(अनुभव, सप्टेंबर २००६च्या अंकातून साभार..)


मुकुंद ठोंबरे







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results