आम्ही कोण?
वीकेंड स्पेशल 

बहिरेपणाच्या उंबरठ्यावर महानगरं

  • युनिक फीचर्स
  • 05.09.26
  • वाचनवेळ 18 मि.
noise pollution

पुण्यात आवाज फार वाढला आहे. कधीही कोणत्याही रस्त्यावर जा, मोठमोठयानं हॉर्न वाजवत, इंजिनांचा आवाज करीत जाणारी वाहनं, माणसांच्या बोलण्याचा कोलाहल, इतरही वेगवेगळ्या प्रकारचे आवाज कानावर येऊन आदळत असतात. त्यातून दिवस गणेशोत्सवाचे किंवा सणासुदीचे असतील तर विचारायला नको, अशी परिस्थिती. पण अशा रीतीने वाढलेली आवाजाची पातळी ही काही फक्त पुण्यातलीच बाब नव्हे. असह्य होईल असा गोंगाट हा औद्योगिकरण, वाढती लोकसंख्या, अपुरी जागा, वाढती वाहतूक, हे सगळे प्रश्न घेऊन वेगानं वाढत असलेल्या कोणत्याही शहराचा प्रश्न आहे. पण विशेषत: पुण्यातलं ध्वनिप्रदूषण, त्याची कारणं, परिणाम या विषयावर गेली तीन-चार वर्षं काही मंडळी अभ्यास करत आहेत. पुण्यातल्या ध्वनिप्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे असं त्यांच्या अभ्यासातून स्पष्ट होतं. मुख्य म्हणजे या अभ्यासातून व्यक्त होणारं ध्वनिप्रदूषणाचं गांभीर्य कोणत्याही शहराला लागू पडेल इतकं प्रातिनिधिक आहे.

आपल्या रोजच्या जगण्यात वेगवेगळ्या प्रमाणात आपल्या कानावर आवाजाचं, म्हणजे ध्वनीचं आक्रमण होत असतं. वास्तविक आंतरराष्ट्रीय पातळीवर ध्वनीच्या चार पातळ्या मानल्या गेल्या आहेत. त्यापैकी औद्योगिक विभागात दिवसा ७५ आणि रात्री ७०, व्यापारी विभागात दिवसा ६५ आणि रात्री ५५, नागरी विभागात दिवसा ५५ आणि रात्री ४५ आणि शांतता विभागात दिवसा ५० आणि रात्री ४५ एवढी आवाजाची पातळी ग्राह्य मानली गेली आहे. ही आवाजाची पातळी डेसिबल या एककात मोजतात. ध्वनी नीटपणे ग्रहण करण्याची माणसाच्या कानांची क्षमता मर्यादित, म्हणजे १० ते ७० डेसिबल एवढी आहे. यापुढच्या तीव्रतेचा आवाज गोंगाट स्वरूपात त्रासदायक ठरतो आणि अतितीव्र आवाजानं ती तीव्रता सहन न होऊन तात्पुरतं किंवा कायमस्वरूपी बहिरेपण येण्याची शक्यता असते. थोडक्यात, माणसाची ध्वनी ग्रहण करण्याची क्षमता ओलांडली जाणं म्हणजे ध्वनिप्रदूषण.

ध्वनिप्रदूषणाचा माणसाच्या कानांवर काय परिणाम होतो हे पाहायचं तर आधी कानाची रचना पाहावी लागेल. माणसाच्या कानाचे बाह्यकर्ण, मध्यकर्ण आणि अंतर्कर्ण असे तीन भाग असतात. प्रत्यक्ष ऐकण्याचं काम कानाच्या पडद्यापासून, म्हणजे मध्यकर्णाच्या बाहेरच्या भागापासून सुरू होतं. बाहेरून येणाऱ्या ध्वनिलहरी कानाच्या पडद्यावर आदळतात आणि तेथून त्या कॉर्टीच्या इंद्रियात नेल्या जातात. तिथल्या असंख्य सूक्ष्म केशपेशी या लहरींचं विद्युत स्पंदांत रूपांतर करून ते स्पंद चेतापेशींमार्फत मेंदूपर्यंत पोचवतात. हे कार्य अखंड सुरू असतं. पण सतत उच्च कंपनाचा आवाज या पेशींवर आदळत राहिला तर त्या हळूहळू नष्ट होत जातात आणि मेंदूपर्यंत विद्युत स्पंदनं पोचवलीच जात नाहीत. मुख्य म्हणजे एकदा नष्ट झालेल्या केशपेशी पुन्हा निर्माण होत नाहीत. त्यामुळे ध्वनिप्रदूषणातून येणारं बहिरेपण गंभीर ठरतं. आज वेगवेगळ्या कारणांमुळे माणसाच्या ध्वनी ग्रहण करण्याच्या क्षमतेवर प्रचंड आक्रमण होत चाललं आहे, ते भयंकर आहे.

औद्योगिकरणाचा अटळ परिणाम

पुण्यासारखं शहर तर एके काळी पेन्शनरांचं निवांत शहर होतं. आता या शहराची ओळख ‘गोंगाटाचं, प्रचंड आवाजाचं शहर' अशी बनली आहे. खरं म्हणजे पाच-दहा वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती, पण मुंबईपासून ३-४ तासांच्या अंतरावर असलेल्या या शहराचं वेगाने औद्योगिकीकरण झालं. नवनवे उघोग आले. त्यामुळे लोकसंख्या वाढली. वाढत्या लोकसंख्येच्या गरजांनुसार इथे सेवा क्षेत्र विकसित होत गेलं. त्या अनुषंगाने शहरात येणाऱ्या गर्दीच्या गरजेचा भाग म्हणून शहराच्या मध्यवस्तीत हॉटेल व्यवसाय वाढला आहे. मध्यवस्तीत एकवटलेला बाजार, चिंचोळे रस्ते या अडचणींमध्ये उपनगरी भागातून येणाऱ्या वाहनांची गर्दी आणखीनच भर घालते. या वाहनांची प्रचंड संख्या, त्यांचा आवाज, प्रत्येक वाहनचालकाचा हॉर्नचा वापर, या सगळ्यामुळे इथला गोंगाट वाढला आहे. काही विशिष्ट प्रकारची वाहनं या ध्वनिप्रदूषण आणखी भर घालत असतात. उदाहरणार्थ - डिझेल रिक्षा, जड वाहनं. पुणे विद्यापीठाच्या हेल्थ सायन्स विभागाचे डॉ. भूषण पटवर्धन सांगतात, की डिझेल इंजिनं इतर देशांमध्ये १९६० पूर्वीच बंद झाली आहेत. ती सार्वजनिक वाहतुकीसाठी तिकडे अजिबात वापरली जात नाहीत. आपल्याकडे मात्र ती सर्रास चालतात आणि ही वाहनंच सर्वाधिक प्रदूषण निर्माण करत असतात. त्यात घाऊक बाजारपेठ भर मध्यवस्तीत असल्यामुळे जड वाहनांचा तिथं रोजचाच वावर असतो. ती वाहतुकीच्या कोंडीबरोबरच मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण निर्माण करतात.

वाढती लोकसंख्या, वाहतूक याबरोबरच काही नव्या बाबींनीही शहराच्या ध्वनिप्रप्रदूषणात भर घातली आहे. सध्या लहान लहान दुकानांमधून वीज गेल्यावर सर्वत्र पेट्रोल, डिझेल किंवा रॉकेलवरचे जनरेटर वापरले जातात. हे जनरेटर मोठ्या प्रमाणावर ध्वनिप्रदूषण निर्माण करत असतात. वातानुकूलित यंत्रणेचा वाढता वापरही या प्रश्नांचं स्वरूप आणखी तीव्र करतो. त्याशिवाय बदलत्या राहणीमानामुळे आणखी दोन घटक ध्वनिप्रदूषणाला कारणीभूत ठरले आहेत. एक म्हणजे, प्रचंड वेगानं सुरू असलेली बांधकामं आणि वाढता हॉटेल व्यवसाय. मोठमोठ्या हॉटेलांमध्ये भटारखान्यातील गरम हवा बाहेर सोडण्यासाठी ब्लोअर्सचा वापर केला जातो. काही हॉटेलांनी या ब्लोअर्सना ध्वनिरोधक यंत्रणा जोडली असली तरी काही ठिकाणी अशी यंत्रणा नाही. हे ब्लोअर्स प्रचंड तीव्रतेचा, असह्य ठरेल असा आवाज निर्माण करतात.

हेही वाचा - पुणे ट्रॅफिक : उपायच समस्या ठरताहेत का ?

वाढत्या शहरीकरणातून निर्माण होणाऱ्या या घटकांशिवाय परंपरांचा भाग उरतोच. लोकांच्या उत्साहाचा भाग म्हणून त्याला कुठेही अडसर घालता येत नाही. त्यात गणेशोत्सवासारखा सण म्हणजे पुण्याचा मानबिंदू. शिवाय आता त्यानंतर येणारं देवीचं नवरात्रही सार्वजनिक स्वरूपात साजरं करण्याची पद्धत पडत चालली आहे. शिवाय दिवाळीसारखा सण आणि लग्नसराई या गोष्टी आहेतच. पण आता चतुर्थीसारख्या दिवशीही लाऊडस्पीकर लावला जातो. या सगळ्यातूनच निर्माण होणारा आवाज स्थानिक रहिवासी, वृद्ध, रुग्ण सगळ्यांमध्येच प्रचंड अस्वस्थता निर्माण करतो.

पुणे शहराच्या, पर्यायाने प्रत्येकच शहराच्या ध्वनिप्रदूषणात या सगळ्या गोष्टी आपापल्या परीने हातभार लावतात. खरं म्हणजे हे सगळे घटक सुटे सुटे आहेत. पण संपूर्ण शहरावर त्या सगळ्यांचा मिळून एकत्रित परिणाम होतो आणि शहराची ध्वनिप्रदूषणाची पातळी वाढत जाते.

हरवलेली शांतता

वास्तविक ध्वनिप्रदूषण निर्माण करणारे घटक इतके आपल्या आसपास असतात, की आपल्याला त्यांची जाणीवही होत नाही. डॉ. एस. एस. भुतडा आणि त्यांची रमझानी इन्स्टिट्यूट ही संस्था गेली पंचवीस वर्षं, हवा, पाणी आणि त्यात ध्वनिप्रदूषणासंदर्भात काम करतात. त्यांनी नुकताच पुण्याच्या ध्वनिप्रदूषणावर एक विस्तृत अहवालही केला आहे. त्याबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण पॉप-रॅप संगीत नित्यनियमाने ऐकणाऱ्या मुलांमध्ये बहिरेपणाचं प्रमाण फार मोठं आहे. दहा वर्षं पॉप संगीत ऐकणारी मुलं हमखास बहिरी झालेली असतात. सतत वॉकमन ऐकणाऱ्या मुलांच्या बाबतीतही हेच घडतं. जास्त तीव्रतेचा आवाज सतत कानावर आदळण्याचा हा परिणाम आहे. फक्त होतं एवढंच, की ही मुलं इतपत बुद्धिमान, स्मार्ट असतात, की त्यांना आपोआपच लिपरीडिंगची सवय लागलेली असते. त्यामुळे त्यांचं बहिरेपण लक्षातही येत नाही. रमझानी इन्स्टिट्यूटनं मध्यंतरी वाहतूक पोलिसांचीही एक पाहणी केली. त्यातून पुढे आलेला धक्कादायक निष्कर्ष म्हणजे, या पोलिसांमध्ये सात ते सत्तर टक्के वाहतूक पोलिस बहिरेपणाला तोंड देत आहेत.

आवाजातलं सातत्य आणि काळ यांचा फार जवळचा संबंध असतो. त्यामुळे सतत ऐकावा लागणारा आवाज मग तो वाहतुकीचा असो किंवा आवडणारं संगीत - तो धोक्याचाच ठरतो. त्यामुळे सतत मोठ्यानं संगीत ऐकणं, व्हॅक्युम क्लिनर, मिक्सर, जुना पंखा, शिवणमशीन यांचे आवाज सतत ऐकणं हे कानांच्या दृष्टीनं गंभीर आहे. आपल्या रोजच्या व्यवहारातल्या वेगवेगळ्या आवाजांची तीव्रता लक्षात घेतली तर हे गांभीर्य प्रकर्षानं जाणवतं. मुलं आवडीनं ऐकतात ते पाश्चात्य संगीत १२० डीबीए एवढ्या तीव्रतेचं असतं, तर पाण्याचा एक हॉर्स पॉवरचा पंप १०० ते ११० डीबीए ध्वनी निर्माण करतो. याहीपेक्षा अधिक तीव्रतेचा आवाज तर याहून गंभीर परिणाम करतो. आवाजाच्या सान्निध्यात काम करणाऱ्यांच्या बाबतीत अशी अनेक निरीक्षणं नोंदवली गेली आहेत.

पाहण्यांचे निष्कर्ष धक्कादायक

ध्वनिप्रदूषणाच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या लोकांनी पुण्याच्या ध्वनिप्रदूषणासंदर्भात केलेल्या पाहण्या महत्त्वाच्या ठरतात.

शमिता कुमार या पुणे विघापीठाच्या एम. एस्सी. फिजिक्सच्या विद्यार्थिनी. त्यांनी १९९३ मध्ये पुण्यातल्या ध्वनिप्रदूषणाच्या पातळ्या तपासणारा एक विस्तृत अभ्यास केला. पुणे शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी आठ दिवस वेगवेगळ्या २२ वेळांमध्ये आवाजाच्या पातळीची तपासणी त्यांनी केली. शाळा-कॉलेज, बाजार, दवाखाने, व्यापारी परिसर असे वेगवेगळे भाग त्यांनी निवडले होते. त्यांच्या पाहणीतला कलानिकेतन म्हणजे शिवाजीनगरजवळचा भर गर्दीचा परिसर. या परिसरात ध्वनीची सर्वसाधारण पातळी ७८ डीबीए होती. त्याहून गर्दीच्या बालगंधर्व चौकात ती ८० डीबीएच्या आसपास होती. अलका टॉकिज या मध्यवस्तीच्या परिसरात ती गर्दीच्या वेळी ७५ ते ८० डीबीए होती, तर अप्पा बळवंत चौकात ७० डीबीए होती. कूंटे चौक या अत्यंत गजबजलेल्या परिसरात ती ७९ डीबीए होती, तर अलीकडे वेगाने वाढलेल्या कर्वेरोडवर ती ७० ते ७५ डीबीएदरम्यान होती. टिळक रोड या गर्दीच्या रस्त्यावरही ध्वनीची पातळी ७० ते ७९ डीबीए एवढी नोंदली गेली आहे. ही सगळी आकडेवारी १९९३ मधली, म्हणजे चार वर्षांपूर्वींची आहे, हे लक्षात घ्यायला हवं.

यानंतरची दुसरी पाहणी केली ती पुणे विद्यापीठाच्या पराग देशपांडे यांनी १९९४ मध्ये. त्यांनी एकूण १६ ठिकाणांच्या आवाजाच्या पातळ्यांचा ठराविक वेळांमध्ये अभ्यास केला. त्यांच्या अभ्यासानुसार इंजिनिअरिंग कॉलेज या मुंबई-पुणे महामार्गाजवळच्या परिसरात सकाळी ८ ते १२ या वेळात ध्वनीची पातळी ८५.४३ डीबीए होती, ती संध्याकाळी ८७.२१ वर गेली, तर बालगंधर्व परिसरात ही पातळी ८० डीबीएच्या आसपास होती. डेक्कन जिमखाना परिसरात ध्वनीची सर्वाधिक पातळी ७८.७८ डीबीए होती. अलका टॉकिज या गजबजलेल्या भागात संध्याकाळी ध्वनीची सर्वाधिक पातळी ८२.८३ डीबीए होती. कर्वेरोडवर १९९४ मध्ये ध्वनीची सर्वाधिक पातळी ७८.७४ डीबीए होती. वाहतुकीच्या दृष्टीने संवेदनशील ठरलेल्या सध्याच्या पौडफाटा परिसरात तेव्हा ध्वनीची सर्वाधिक पातळी ७५.९९ डीबीए होती आणि आवाजाच्या पातळीच्या दृष्टीने संवेदनशील विभागात असणाऱ्या ससून हॉस्पिटल परिसरात तेव्हाही आवाजाची पातळी ७९.८ डीबीए होती. या सगळ्या पाहणीवरून वाहतूक, त्यातही जड वाहनं सर्वाधिक ध्वनिप्रदूषण निर्माण करतात, असा निष्कर्ष पराग देशपांडे यांनी काढला आहे.

यानंतरची एक पाहणी रमझानी इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ सर्व्हिसेस या संस्थेने १९९५मध्ये केली आहे. या पाहणीनुसार अलका टॉकिज परिसरात त्या काळात दिवसा आवाजाची पातळी ८६ डीबीए होती, तर रात्री याच परिसरात ५८ डीबीए एवढ्या तीव्रतेचा ध्वनी होता. स्वारगेट परिसरात दिवसा ८३ डीबीए असलेली ध्वनीची पातळी रात्री ५७ डीबीएवर आली, तर संभाजी बाग, जंगली महाराज या गर्दीच्या परिसरात दिवसा ध्वनीची पातळी अनुक्रमे ८४ आणि ८९ डीबीए होती. डेक्कन जिमखाना परिसरात ही पातळी ८८ डीबीए होती, तर सिमला ऑफिस, पुणे विद्यापीठ चौकात ती अनुक्रमे ८७ आणि ८९ डीबीए होती. रमझानी इन्स्टिट्यूटने नोंद केलेली ध्वनीची सर्वाधिक पातळी ससून हॉस्पिटल परिसरात ९१ डीबीए एवढी होती. दिवसा आणि रात्री असणारा ध्वनीच्या पातळ्यांमधील फरक पाहिला तर मुख्यत: वाहतूकच ध्वनिप्रदूषणात भर टाकते, असं म्हणता येतं.

‘मशाल' ही विकास कामं आणि नागरी प्रश्न या संदर्भात काम करणारी संस्था. पुणे महापालिकेसाठी पुण्याच्या प्रश्नासंदर्भातला एक विस्तृत अहवाल त्यांनी तयार केला आहे. या अहवालात पुण्याच्या ध्वनिप्रदूषणासंदर्भात केलेल्या पाहणीची माहिती आहे. त्यावरुन १९९७ या वर्षातलं ध्वनिप्रदूषणाचं प्रमाण लक्षात येतं ‘मशाल'च्या पाहणीनुसार गर्दीच्या नगर रोडवर येरवडा चौकात ध्वनीची कमाल पातळी ७८ डीबीए आहे, तर बंडगार्डन रोड परिसरात ती ८० डीबीए आहे. पौड फाटा परिसरातली ध्वनीची पातळी गेल्या तीन वर्षात तिपटीनं वाढली असल्याचं ‘मशाल'चे शरद महाजन सांगतात.

या सगळ्या पाहण्या वेगवेगळ्या लोकांनी, वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या भागात केल्या आहेत. त्यामुळे या पाहण्यांचा तुलनात्मक अभ्यास करता येत नाही; पण त्यामुळे ध्वनीनं ओलांडलेलं धोक्याच्या पातळीचं गांभीर्य नाकारता येत नाही. दिवाळी, गणेशोत्सव या काळात केल्या गेलेल्या पाहण्या बघितल्या तर हे गांभीर्य अधिकच अधोरेखित होतं.

गणेशोत्सवाच्या काळात पुण्यातल्या ध्वनिप्रदूषणाने कोणती पातळी गाठलेली असते, या संदर्भात पुणे विघापीठाच्या हेल्थ सायन्सेस विभागातर्फे गेली चार वर्षं पाहणी केली जाते. शहराच्या मध्यवस्तीत वेगवेगळ्या १२ भागांमध्ये हा अभ्यास केला जातो. गेल्या चार वर्षांत त्यांनी नमूद केलेल्या पाहण्या अभ्यासल्या तर ध्वनिप्रदूषणाची तीव्रता अंगावर येऊन आदळते. या चार वर्षांच्या पाहणीनुसार, अप्पा बळवंत चौकात १९९४ मध्ये गणेशोत्सवाच्या काळात ध्वनीची पातळी १०० डीबीए होती. १९९५ मध्ये ती ९० डीबीएवर आली असली तरी १९९६-९७मध्ये ती पुन्हा ९८ डीबीएवर गेली आहे. तुळशीबाग या शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या परिसरात १९९४मध्ये ध्वनीची पातळी ९१ डीबीए होती. १९९५ मध्ये ती ७० डीबीएवर आली आणि पुढच्या दोन वर्षांत पुन्हा वाढली. बाबू गेनू चौकातही ध्वनीची पातळी गेल्या चार वर्षांत १०५ डीबीएवर जाऊन पोचली आहे. डेक्कन जिमखाना परिसरात मात्र गेल्या चार वर्षांत ध्वनीची पातळी १०२ डीबीएच्या आसपास आहे. अलका टॉकिज चौकातही १९९५ हे वर्ष वगळता ध्वनीची पातळी ९९ डीबीएच्या आसपास आहे. हिराबाग या परिसरात ध्वनीची पातळी ९५ ते १०६ डीबीएच्या आसपास आहे. गेल्या दोन वर्षांत कर्वेरोडवर ध्वनीची पातळी १०५ ते १०७ डीबीएच्या आसपास आहे. हे सगळं प्रमाण दहा दिवसांपुरतंच असलं तरी अत्यंत धोकादायक असल्याचं हेल्थ सायन्स विभागाचे डॉ. भूषण पटवर्धन सांगतात.

गणेशोत्सवाइतकाच आवाजी सण म्हणजे दिवाळी. दिवाळीमध्ये फटाके वाजवणं आणि आनंद साजरा करण्याचं एवढं समीकरण आहे, की कोणताही आनंदाचा क्षण फटाके वाजवून साजरा केला जातो. पण फटाक्यांमुळे निर्माण होणाऱ्या ध्वनीची तीव्रता पाहिली तर हे प्रकरण किती घातक आहे हे लक्षात येतं. हजार, दहा हजार फटाक्यांची माळही आता फॅशनच झाली असली, तरी अगदी लहानात लहान एक इंची लवंगी फटाकासुद्धा बंदुकीच्या गोळीएवढा आवाज करत असतो आणि या आवाजाचा श्रवणयंत्रणेवरच नव्हे, तर मानसिक स्वास्थ्यावरही परिणाम होत असतो.

एक इंची लवंगी फटाक्यामुळे १०१ डीबीए एवढा ध्वनी निर्माण होतो, तर २ ते ३ इंची फटाक्यामुळे १०५ ते १०७ डीबीए एवढा ध्वनी निर्माण होतो. वास्तविक नागरी परिसरात ध्वनीची क्षमता ४५ ते ५५ डीबीए एवढीच गृहित धरली गेली आहे. असं असतानाही १०० ते १०६ डीबीए क्षमतेचा ॲटमबॉम्ब सहज लावला जातो. १०० फटाक्यांची माळ १०५ ते ११० डीबीए ध्वनी निर्माण करते, तर १००० फटाक्यांची माळ १०८ ते ११६ डीबीए ध्वनी निर्माण करते. आपल्या कानांची ध्वनी ग्रहण करण्याची क्षमता पाहिली तर एवढ्या तीव्रतेचे ध्वनी कानावर येऊन आदळत असतील तर कानाचं काय होईल, याची कल्पना केलेली बरी.

बहिरेपणा नव्हे, अल्सरसुद्धा!

ध्वनिप्रदूषणाने गंभीर पातळी गाठली आहे, हे त्या संदर्भातले अभ्यासच स्पष्ट करतात. म्हणूनच पुढचा प्रश्न निर्माण होतो, की त्याचे परिणाम काय असू शकतात? तज्ज्ञांच्या मते, गंभीर बाब म्हणजे, बहिरेपणा एवढाच ध्वनिप्रदूषणाचा परिणाम नाही. त्यातून निर्माण होणारे बहिरेपणाव्यतिरिक्तचे जवळजवळ १४-१५ वेगवेगळे आजार आहेत. ते तेवढेच महत्त्वाचे आणि गंभीर आहेत. सतत ऐकाव्या लागणाऱ्या नकोशा आवाजामुळे मानसिक संतुलन ढळण्याची शक्यता असते. त्याचा परिणाम म्हणून चिडचिड करण्याची प्रवृत्ती वाढते. सततच्या नकोशा आवाजामुळे थकवा येणं, एकाग्रता कमी होणं, झोपेवर परिणाम होणं, अशा अनेक गोष्टी घडत जातात. नोकरी-व्यवसाय करणाऱ्यांच्या बाबतीत या सगळ्याचा परिणाम उपस्थिती , कामाची क्षमता, काम करण्याची इच्छा या गोष्टींवर होतो. त्यामुळे अपघात वाढण्याचीही शक्यता असते. ध्वनिप्रदूषणाला सतत तोंड घावं लागलं तर रक्तदाब वाढू शकतो, हृदयविकाराचे झटके येऊ शकतात. एवढंच नव्हे, तर शरीरातली चरबी वाढणं, अल्सर, पचनसंस्थेचे विकार, नर्व्हस सिस्टिम बिघडणं, डोकं दुखणं, छातीतून कळा येणं, असे अनेक विकार होऊ शकतात. अर्थात हे सगळे विकार थेट ध्वनिप्रदूषणाशी संबंधित नसले तरी ते होण्यामागे ध्वनिप्रदूषण हे एक महत्त्वाचं कारण असू शकतं. सतत ऐकाव्या लागणाऱ्या आवाजाचा काय परिणाम होतो, या संदर्भात टेलिफोन ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्यांचं उदाहरण बोलकं आहे. सतत आठ तास फोनवर काम करणाऱ्या व्यक्ती-म्हणजे मुख्यत: स्त्रिया घरी गेल्यानंतर प्रचंड तापदायक वागतात. वाद घालतात, भांडणं करतात, मुलांना मारतात; मात्र रात्रभर झोप घेऊन सकाळी उठल्यानंतर आपण रात्री असं का वागतो, हे त्यांनाच सांगता येत नाही. डॉ. भुतडा यांच्या मते, सतत फोनची घंटा ऐकणं, फोनवर बोलणं, ऐकणं यामुळे त्यांच्यामध्ये चिडचिडेपणाची प्रवृत्ती वाढत जाते. रमझानी इन्स्टिट्यूटने पुण्यात गणेशोत्सवाच्या काळात ५००० लोकांची एक पाहणी केली होती. या पाहणीत सहभागी झालेल्या व्यक्तींनीही गणेशोत्सवातल्या आवाजामुळे आपल्या काम करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो, हे मान्य केलं होतं. विमानतळाच्या जवळ राहणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीत गर्भपाताचं प्रमाण मोठं आहे, असाही एक निष्कर्ष आहे. याशिवाय विमानतळावर काम करणारे तंत्रज्ञ उलट्या, तोल जाणं, घेऱ्या येणं या विकारांचा सतत सामना करतात.

याशिवाय हायपरटेन्शन, भूक मंद होणं, एकदम येणाऱ्या आवाजामुळे अकारण भीती वाटणं, याबरोबरच ध्वनिप्रदूषणातून निर्माण होणारा एक परिणाम आहे संवादाच्या अभावाचा. समोरचा माणूस काय बोलतोय हेच समजत नसेल, चिडचिडेपणातून ते समजून घेण्याचीच क्षमता उरली नसेल, तर अनेक प्रश्न निर्माण होतात. टिनिटस हा तर ध्वनिप्रदूषणातून येणारा सर्वांत गंभीर आजार आहे. खूप मोठ्या आवाजामुळे कानांतल्या संबंधित नर्व्हला धक्का पोचतो आणि त्याचा एक वेगळाच परिणाम होतो. तो म्हणजे ही नर्व्ह कानात वेगळा आवाज निर्माण करायला लागते. याला टिनिटस म्हणतात. या आवाजामुळे संबंधित व्यक्ती एवढी हैराण होते, की तिला बाहेरचे प्रचंड आवाज परवडले, असं वाटायला लागतं. परदेशात टिनिटस झालेल्या व्यक्तींच्या संघटना आहेत. एकत्र येऊन एकमेकांच्या अनुभवांमधून, चर्चांमधून ही मंडळी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात. पण दुर्दैवाने टिनिटसवर कोणताही उपचार नाही.

प्रयत्न : अपुरे पण आशादायक

या गोष्टी खऱ्या असल्या तरी ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न कुणा एकट्याच्या आवाक्यातला आणि तितका सोपा नाही, हे स्पष्टच आहे. त्यामुळे मग ‘आपण काय करणार?' असं म्हणत प्रत्येकाच्या घरातले टीव्ही, टेपरेकॉर्डरही जोरजोरात वाजायला लागतात. पण आपापल्या पातळीवर करायच्या प्रयत्नांचा भाग म्हणून काही माणसं स्वत:च्या वाटा शोधत आहेत. अरविंद घाटपांडे हे अशांपैकीच एक. ते मूळचे पुण्याचे. नोकरीव्यवसायासाठी मुंबईत जाऊन राहिले. काही वर्षांनंतर परतले तेव्हा पुण्याचं स्वरूप बदललं होतं. त्यांच्या लहानपणीच्या गणपती उत्सवातल्या मेळ्यांची जागा कर्णकर्कश लाऊडस्पीकरने घेतली होती. त्यांच्या घराजवळच्या गणपती मंडळांतूनही रात्री-अपरात्री लाऊडस्पीकर विनाकारण वाजत असायचे. त्यांनी रस्तेही बरेच अडवले होते. त्या विरोधात घाटपांडे यांनी उच्च न्यायालयात जनहितार्थ याचिका दाखल केली. त्यांच्या याचिकेचा परिणाम म्हणून पुढच्या वर्षी पोलिसांना गणपती मंडळांसंदर्भात ताठर भूमिका घ्यावी लागली. त्यामुळे त्या काळात, म्हणजे १९९५ मध्ये गणेशोत्सवात होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाची पातळी खाली आली होती.

दुसरं उदाहरण आहे पुण्यातल्या टिळक रोडचं. हा रस्ता रहदारीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. इथे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्था आहेत. या रस्त्याच्या दोन्ही टोकांना ठळक पाट्या आहेत, ‘जड वाहनांना प्रवेश बंद'. पण मुंबई, पुणे आणि सातारा रस्ता जोडला जात असल्यामुळे या रस्त्यावरून जड वाहनं भरघाव जात. त्यामुळे टिळक रोडवर हमखास अपघात होत. शिवाय आवाज, धूळ या गोष्टींनाही इथल्या नागरिकांना तोंड घावं लागत होतं. दोन वर्षांपूर्वी इथले पंधरा-वीस तरुण एकत्र आले आणि त्यांनी ‘टिळक रोड नागरिक शक्ती समिती' स्थापन केली. जड वाहन त्यांनी ठरविलेल्या टापूत आलं की हे तरुण ते थांबवतात. चालकाला नियमाची कल्पना देतात आणि त्याला प्रवेशबंदीच्या पाटीपर्यंत वाहन रिव्हर्समध्ये मागे घ्यायला लावतात. एरवी ट्रॅफिक पोलिसांच्या अंगावर दीड-दोनशे रुपयांचा दंड सहज फेकून जाणाऱ्या वाहनचालकाला भर गर्दीत एक-दीड किलोमीटर अंतर रिव्हर्समध्ये मागे जाणं, ही बाब भयंकर दिव्य ठरते. याचा परिणाम म्हणून या रस्त्यावरून जड वाहनं येणं बंद झालं आहे. ‘याचा सगळ्यांत मोठा परिणाम झाला आहे तो आवाजावर आणि अपघातांवर.' टिळक रोड नागरिक शक्तीचे प्रकाश रानडे सांगतात, ‘गेल्या दोन वर्षात आम्ही जागरूकता दाखवल्यानंतर इथे एकही अपघात झाला नाही आणि एकही माणूस दगावला नाही. शिवाय पूर्वी इथून जड वाहनं गेली तर त्या आवाजानंसुद्धा आमची घरं हादरायची. आम्हाला एकमेकांशी उंच आवाजात बोलण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. आता निदान दिवसा तरी हे बंद झालं आहे. पहाटे दोन ते पाच या वेळात मात्र कुणीच नसतं, हे गृहित धरून त्या वेळात मात्र ट्रक, टुरिस्ट गाड्या इथून प्रचंड वेगाने जातात. पण आम्ही तरी किती लक्ष देणार? एक मात्र खरं, की आम्ही जेवढा प्रयत्न केला त्यातून आज प्रचंड आवाजाचा त्रास कमी झाला आहे.'

वास्तविक थोड्याफार फरकाने ध्वनिप्रदूषण हा सगळ्यांचाच प्रश्न आहे. त्यावरही गावात, मध्यवस्तीत राहणारे लोक तर ध्वनिप्रदूषणाचे सर्वाधिक बळी आहेत. खरं म्हणजे ध्वनिप्रदूषण, त्यातून होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन त्या संदर्भात काही कायदे केले गेले आहेत. १९८६मध्ये झालेल्या भोपाळ वायू दुर्घटनेनंतर या संदर्भातल्या कायद्यांमध्ये सुधारणा केल्या गेल्या. त्यानुसार कामगारांना जास्तीत जास्त सुरक्षितपणे काम करता यावं यासाठी काही तरतुदी केल्या गेल्या आहेत. तीन वर्षांनी १९८९ मध्ये झालेल्या आणखी एका सुधारणेनुसार समाजात वेगवेगळे झोन ठरवले गेले आणि त्या झोननुसार आवाजाच्या पातळ्या ठरवल्या गेल्या. आंतरराष्ट्रीय पातळीवर औद्योगिक विभागासाठी ८५ डीबीए एवढी पातळी ठरवली असताना आपल्याकडे मात्र ती जाणीवपूर्वक ७५ ते ६५ डीबीए ठेवण्यात आली आहे. ध्वनीची पातळी मुळातच कमी असावी, असा दृष्टिकोन त्यामागे आहे.

कायदे आणि त्यावर काम करणारी माणसं असली तरी मुख्य प्रश्न असतो तो लोकांच्या जागरूकतेचा. अशा सामाजिक प्रश्नांच्या बाबतीत आपल्याकडचे लोक उदासीन आहेत. त्यामुळे पाहण्या, अभ्यास करणाऱ्या लोकांनी कितीही सूचना केल्या असल्या, उपाय सुचविले असले, तरी लोक या प्रश्नाबाबत किती आग्रही भूमिका घेतात, याच्यावर पुढच्या बाबी अवलंबून आहेत. परदेशात ध्वनिप्रदूषण झाल्याची कुणी तक्रार केली तर त्या तक्रारीवरून संबंधितांना अटक करण्याची, एखाद्या माणसाने रस्त्यावर विनाकारण हॉर्न वाजविला तर त्याच्यामागे जाऊन पोलिसांनी त्याला दंड करण्याची पद्धत आहे. इतक्या पातळीवर आपल्याकडे घडामोडी घडणं शक्य नाही. पण हॉर्नचा लाऊडस्पीकरचा, घरातल्या टीव्ही आणि रेडिओचा आवाज यांच्यावर आपलं आपणच नियंत्रण ठेवू शकतो. मोठा आवाज करणारे उघोगधंदे, विमानतळ नागरी वस्त्यांपासून लांब असावेत, असा आग्रह धरू शकतो. अनेक गोष्टी आपल्या हातातल्याच आहेत. मुख्य म्हणजे हा प्रश्न आज वाढत असलेल्या शहरांभोवती निगडित आहे. आजची शहरं ही उद्याची महानगरं आहेत. त्यांचा आज वेळीच विचार केला नाही तर आपणच पाळलेला ध्वनिप्रदूषणाचा भस्मासुर आपल्यालाच संपवल्याशिवाय राहणार नाही.

पुणे शहरातील वाढत गेलेली वाहनं

वेगवेगळ्या पाहण्या, त्यांनी काढलेले निष्कर्ष यावरून एक बाब स्पष्टच होते, की ध्वनिप्रदूषणात सर्वाधिक भर घालणारा घटक वाहतूक हाच आहे. एरवी मोठमोठ्या कारखान्यांकडे याबाबत बोट दाखवता येतं. पण पुण्याच्या संदर्भात मात्र वाहतूक हाच घटक प्रदूषणाचं प्रमुख कारण ठरला आहे. जड वाहनं, सहा आसनी रिक्षा, तीन आसनी डिझेल रिक्षा आणि दुचाकी वाहनं एकत्रितरित्या प्रचंड आवाज निर्माण करतात. अलीकडच्या काळात या वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. १९६० मध्ये दुचाक्यांची संख्या १३१३ एवढी होती ती १९९७पर्यंत ४६२०२१ एवढी झाली आहे. १९६० मध्ये तीन चाकी वाहनं २०७ होती ती १९९७ मध्ये ३९९७४ झाली आहेत. कार, जीप या वाहनांची संख्या १९६० मध्ये २६५८ होती ती आता ७०६१७ झाली आहेत. बस आणि जड वाहनं २४४५ वरून ४४३०६ वर पोचली आहेत. वाहनांच्या वाढलेल्या संख्येची ही आकडेवारी पाहिली तर त्यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाची सहज कल्पना येते. परत ही वाहनं फक्त ध्वनिप्रदूषणातच भर घालत नाहीत, तर त्यांच्यातून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे होणारं हवेचं प्रदूषण, अपघात यांच्या तीव्रतेतही भर पडली आहे. उपलब्ध असलेल्या १९९६च्या आकडेवारीनुसार या वर्षभरात एकूण २२७९ अपघात झाले आणि त्यात २८३ व्यक्ती मरण पावल्या. वाढत्या वाहतुकीतून निर्माण होणाऱ्या प्रश्नांची तीव्रता यावरून लक्षात येते. 

वरील आकडेवारीत १९६० ते १९९६ या ३५ वर्षांमध्ये वाढत गेलेल्या वाहनांची संख्या आहे. पण वाहनं मुख्यत: वाढली आहेत ती गेल्या पाच-सात वर्षांतच खाली दिलेल्या आकडेवारीवरून हा वेग लक्षात येईल. 

noise pollution

(साप्ताहिक सकाळ डिसेंबर १९९७मधून साभार)

युनिक फीचर्स







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results