प्रत्येक पिढी आधीच्या पिढीपेक्षा वेगळी असते का? आपण कुठल्याही पिढीत जन्मलो तरी माणूस म्हणून आपण एकसारखे नसतो का? याचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला जर्मन तत्त्वज्ञ विलहेल्म हेगेल याची ‘झाइटगाइस्ट' ही संकल्पना समजून घ्यावी लागेल. ‘झाईटगाइस्ट' म्हणजे ‘स्पिरिट ऑफ टाइम'! झाईट म्हणजे काळ आणि गाइस्ट म्हणजे मन. एखाद्या काळाचं मन म्हणजे झाईटगाइस्ट. झाईटगाइस्टचं मराठी भाषांतर आपण युगधर्म किंवा एखाद्या युगाचा आत्मा असंही करू शकतो.
हेगेलने ही संकल्पना समजावून सांगताना खूप मोठमोठ्या कालखंडांची उदाहरणं दिली आहेत. या जगात सतत काही ना काही क्रिया केल्या जात असतात. या क्रियांचे काही परिणाम होत असतात, त्यावर काही प्रतिक्रिया उमटत असतात. या क्रिया आणि प्रतिक्रियांच्या मंथनातून काही तरी नवं उदयाला येत असतं. थोड्या काळाने या नव्यालाही काही प्रतिक्रिया तयार होतात आणि त्या मंथनातून अजून काही नवं तयार होतं. ही मालिका सतत सुरू असते.
राजेशाहीपासून सुरू झालेल्या मालिकेचं उदाहरण घ्या. मध्ययुगात राजेशाही होती. कायदा आणि सुव्यवस्था आणण्यासाठी जगातल्या विविध धर्मसंस्थांनी ही व्यवस्था तयार केली होती. राजाचं का ऐकायचं, असा प्रश्न प्रजेने विचारला तर उत्तर दिलं जात होतं, की राजा हा दैवी योजनेप्रमाणे जन्माला आला आहे, राजा आपल्या धर्माचं रक्षण करत असतो म्हणून तुम्ही त्याचं ऐकायचं! प्रजेने राजाचं ऐकायचं, आणि राजाने धर्माचं ऐकायचं अशी ही व्यवस्था होती. पुढे पुढे राजांनी राजधर्म पाळणं बंद केलं. यातून जुलूम वाढत गेला. राजावर अंकुश ठेवणारं कोणी राहिलं नाही. प्रजा गुलामीत गेली. याला प्रतिक्रिया म्हणून प्रजा आपले हक्क मागू लागली. राजाचे हक्क आणि प्रजेचे हक्क यांची लढाई उभी राहिली! राजा दमन करू लागला. यावर प्रतिक्रिया म्हणून फ्रेंच राज्यक्रांतीसारख्या क्रांत्या झाल्या. धर्मसंस्था विरुद्ध व्यक्तीचं स्वातंत्र्य अशी लढाई उभी राहिली. त्यातूनच लोकशाही जन्माला आली.
मध्ययुग ते आधुनिक युग या मोठ्या कालखंडाने एक मोठं मंथन पाहिलं. तशीच अनेक मंथनं वेगवेगळ्या पिढ्यांच्या कालखंडांमध्ये सुद्धा घडलेली दिसतात. ही मंथनं समजून घेणं म्हणजे इतिहास समजून घेणं. एखाद्या पिढीची संस्कृती कुठली? ती कशी घडत गेली? तिच्या काळातल्या नैतिकतेच्या संकल्पना कशा घडत आणि व्यक्त होत गेल्या? तिच्या काळातलं बौद्धिक वातावरण कसं घडलं? तिच्या काळातलं साहित्य कसं घडलं? कला कशी घडली? तिच्या काळातलं राजकारण कसं घडत गेलं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधत जाणं म्हणजे त्या पिढीतील काळाच्या मनाचा, झाईटगाइस्टचा अंदाज घेत जाणं.
भारतात गेल्या शंभर वर्षांत पाच पिढ्या झाल्या असं म्हणता येईल. १९२८ ते १९४५ मधल्या पिढीला ‘द सायलेंट जनरेशन' म्हटलं जातं, १९४६ ते १९६४ मधल्या पिढीला ‘बेबी बूमर्स' म्हटलं जातं, १९६५ ते १९८० जनरेशन एक्स, १९८० ते १९९६ मिलेनियल, १९९७ ते २०१२ जनरेशन झी आणि त्यापुढची जनरेशन अल्फा. या सगळ्या पिढ्यांच्या जडण-घडणीचा अंदाज घेत जाणं म्हणजे हेगेलच्या दृष्टिकोनातून गेल्या शंभर वर्षांचा इतिहास बघणं.
युरोप-अमेरिकेतील सायलेंट जनरेशन १९३०च्या भयानक आर्थिक मंदीमध्ये जन्माला आली होती. त्यात ही पिढी मोठी होत असताना दुसरं महायुद्ध झालं. या दोन अनुभवांमुळे ही पिढी डोकं ठिकाणावर ठेवून अत्यंत सावधतेने आर्थिक निर्णय घेणारी झाली. साहित्याच्या आणि तत्त्वज्ञानाच्या बाबतीत या पिढीने जुना रोमँटिसिझम आणि आदर्शवाद सोडून दिला होता. मानवी आयुष्याला काही अर्थ नाही असं म्हणणारी तत्त्वज्ञानं या पिढीला आपली वाटली. लहान वयात प्रचंड विध्वंस पाहायला मिळाला तर माणूस आयुष्याला अर्थ आहे, असं कसं म्हणणार? लहान वयात आपली काही चूक नसताना घरं आणि शहरं उद्ध्वस्त होताना दिसत असतील, आई-वडील मारले जात असतील, तर या आयुष्याला अर्थ आहे, असं माणूस कसं म्हणणार?
या उलट, भारतातली सायलेंट जनरेशन भारतीय स्वातंत्र्ययुद्ध बघत मोठी झाली. तिने १९४२ची छोडो भारत चळवळ बघितली, १९४३चा बंगालचा दुष्काळ बघितला, १९४७ साली स्वातंत्र्य बघितलं आणि फाळणीचाही अनुभव घेतला. अमर्त्य सेन यांच्या म्हणण्यानुसार बंगालच्या दुष्काळात ३० लाख लोक मरण पावले. हार्वर्ड आणि कोलंबिया युनिव्हर्सिटींच्या अंदाजानुसार तर फाळणीच्या काळात हिंसा, विस्थापन आणि रोगराई यामुळे २० ते ३० लाख लोक मृत्युमुखी पडले. परंतु, या दारुण अनुभवांनंतरही भारतीय सायलेंट जनरेशन अर्थहीनतेच्या तत्त्वज्ञानांपासून दूर राहिली.
हेही वाचा - बकालतेचे पिऊन ॲसिड तरारलेली शहरे कृत्रिम
पाश्चात्त्य जगात दुःख हे राजकीय आणि आर्थिक कारणांमुळे तयार होत असल्याची भूमिका घेतली गेली. पाश्चात्त्य जगात खरं तर १८व्या आणि १९व्या शतकातच लोकशाही स्थापन झालेली होती. औद्योगिक क्रांतीही याच काळात उदयाला आली होती. औद्योगिक क्रांतीमधल्या शोषणाला प्रतिक्रिया म्हणून राजकीय क्षितिजावर आलेला मार्क्सवादसुद्धा रशियामध्ये पाय रोवून उभा होता. एकीकडे फ्रेंच राज्यक्रांतीमुळे तयार झालेली उमेद आणि दुसरीकडे मार्क्सवादामधल्या आर्थिक समानतेच्या आदर्शांमुळे तयार झालेली उमेद, असं न्यायाचं वातावरण असूनही १९११ ते १९४५ या काळात दोन महायुद्धं झाली. जर्मनी, इटली, जपान आणि तुर्कस्तान यांना औद्योगिकदृष्ट्या मोठं व्हायचं होतं. त्यासाठी कच्चा माल उपलब्ध करून देणारी राष्ट्रं आपल्या टाचेखाली हवी होती. हिटलरचं म्हणणं होतं, की जर्मनीला ‘लेबेनस्रॉम' म्हणजे ‘जगण्यासाठी' जागा हवी आहे, ‘लिव्हिंग स्पेस' हवी आहे. ही ‘लिव्हिंग स्पेस' ब्रिटन, फ्रान्स, हॉलंड, स्पेन अशा राष्ट्रांनी आफ्रिका, आशिया आणि दक्षिण अमेरिका या खंडांमध्ये अनेक वसाहती बनवून व्यापली होती. जर्मनीने मोठं राष्ट्र कसं व्हावं? म्हणून विश्वयुद्ध झालं!
पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धांमध्ये मिळून ८ ते ११ कोटी लोक मारले गेले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर पाश्चात्त्य जग मानवी जगण्याला तसा काही अर्थ नाही असं म्हणत होतं. अर्थाशिवाय जगणं अशक्य होत असेल तर आपण आपल्या आयुष्याला अर्थ द्यावा, असंही काही तत्त्वज्ञानं सांगत होती! त्यामुळे आपण देऊ तो आपल्या आयुष्याचा अर्थ, अशी धारणा सायलेंट जनरेशनची झाली होती. भारतात मात्र दुःखाची कारणं दैववादात शोधली जात राहिली. नियती दुःख तयार करते, ही भूमिका स्वीकारली गेली. त्यामुळे भारतातली सायलेंट जनरेशन अर्थहीनतेच्या तडाख्यात सापडली नाही. याला दुसरं एक कारण होतं. १९२०नंतर स्वातंत्र्ययुद्ध तेज झालं होतं. स्वातंत्र्याच्या स्वप्नाने भारतीय लोकांचं आयुष्य मंत्रून टाकलं होतं. गांधीजींची अहिंसा, आंबेडकरांचा समानतेचा लढा, भगतसिंगांसारख्या क्रांतिवीरांनी समाजात आणलेली चेतना, असं वातावरण होतं. भारतीय सायलेंट जनरेशन मुन्शी प्रेमचंद, हरिवंशराय बच्चन, सआदत हसन मंटो, मुल्कराज आनंद असे लेखक वाचत मोठी झाली. पाश्चात्त्य जनरेशन मात्र सार्त्र, काम्यू, फ्रान्झ काफ्का, सॅम्युअल बेकेट, युजिन आयनेस्को, हेरल्ड पिंटर, टॉम स्टॉपर्ड, डब्ल्यू एच. ऑडेन हे अर्थहीनतेवर बोलणारे साहित्यिक वाचत मोठी झाली. मराठी पिढी या काळात ना. सी. फडके, आचार्य अत्रे, वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, बा. भ. बोरकर, पु. ल. देशपांडे असे साहित्यिक वाचत मोठी झाली. हे सगळे मूलतः रोमँटिक प्रकृती असलेले साहित्यिक होते. मानवी आयुष्यातल्या मांगल्य, उदात्तता, सौंदर्य या गोष्टींमध्ये रमलेले हे साहित्यिक होते. पाश्चात्त्य पिढी जोसेफ हेलरचा ‘कॅच ट्वेंटी टू'मधला ‘ब्लॅक ह्युमर' वाचत हसत होती आणि त्याच वेळी मराठी पिढी आचार्य अत्रे आणि पु. ल. देशपांडे यांचा निर्मळ विनोद वाचत मोठी होत गेली.
पाश्चात्य सायलेंट जनरेशन दुसऱ्या महायुद्धानंतर संपूर्ण जगाच्या पुनर्बांधणीच्या मागे लागली. जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन, रशिया आणि पूर्व यूरोप सगळीकडेच प्रचंड विध्वंस झाला होता. सगळं पुन्हा बांधून काढायचं होतं. पाश्चात्य सायलेंट जनरेशन मानेवर खडा ठेवून काम करणारी झाली. दुसऱ्या महायुद्धाने नाश केला खरा, पण त्याने अमेरिकेला आर्थिक मंदीमधून बाहेर काढलं. महायुद्धासाठी लागणारी सामग्री बनवणारे कारखाने जोरात पळू लागले. १९४४ मध्ये केवळ एका वर्षात अमेरिकेने ९६,२७० विमाने तयार केली. म्हणजे प्रत्येक दिवशी २६४. हीच गोष्ट रणगाडे, तोफा, बंदुका, बॉम्ब, युद्धनौका या सगळ्यांची. युद्ध संपल्यावर अमेरिकेची ही ताकद नागरी बांधकामांमध्ये लागली.
भारतातली सायलेंट जनरेशनसुद्धा स्वातंत्र्यानंतर राष्ट्रनिर्माणाच्या कामात मग्न झाली. पण इथे अमेरिकेची मुबलकता नव्हती. आर्थिक चणचण सर्वगामी होती. पोलाद, रसायनं, रासायनिक खतं, खनिज उत्पादनं अशी औद्योगिक आव्हानं होतीच, पण आयआयटीसारख्या शिक्षणसंस्था, अणुशक्ती यंत्रणा, एम्ससारखी इस्पितळं, शाळा-कॉलेजं असं सर्वच नव्याने निर्माण करायचं होतं. भारताची सायलेंट जनरेशन यात मग्न होऊन गेली.
सुंदर राष्ट्रभावना, समता आणि न्याय अशा वातावरणात वाढलेल्या भारतीय सायलेंट जनरेशनला अर्थातच सामाजिक आशय असलेले सिनेमे आवडत गेले. १९५७चा ‘मदर इंडिया', १९५३चा ‘दो बिघा जमीन' आणि १९५७चा ‘नया दौर'! शेतकरी-जमीनदार संघर्ष, खेड्यांतून शहरांकडे होणारे स्थलांतर, भारतीय स्त्रीचा सन्मान आणि नैतिकता असे विषय या काळात लोकप्रिय होत गेले. या काळाची भावनिक स्पंदनं दिलीपकुमार, राज कपूर आणि देवानंद या तिघांनी आपल्या व्यक्तिमत्त्वातून प्रतिबिंबित केली. दिलीपकुमार म्हणजे शोकांतिकांचा बादशाह. देवदास, मधुमती आणि मुगल-ए-आझम या सिनेमांमधून त्याने प्रेमाची शोकांतिका मांडली. राज कपूरचा भोळाभाबडा चांगुलपणा सायलेंट जनरेशला स्पर्शून गेला. त्याचं ‘मेरा जूता हैं जपानी' हे गाणं तर त्या काळातलं अनधिकृत राष्ट्रगानच बनून गेलं होतं. नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारताची अस्मिता या गाण्यातून प्रतीत होत राहिली. देवानंद म्हणजे आधुनिक युगातील साहेबी रोमान्स जगणारा!
हे सगळं आधुनिक वातावरण अवतीभवती असलं तरी आपल्या धार्मिक आयुष्यात ही पिढी वैदिक कर्म करणारी होती. या कर्मांना पुढे कर्मकांड म्हटलं जाऊ लागलं. सनातन संस्कृतीची ही छाप पुढे दोन दशकं राहिली आणि हळूहळू क्षीण होऊ लागली. स्त्रीची अवस्था या काळात फारशी चांगली नव्हती. नवऱ्याला ‘मालक' किंवा ‘धनी' म्हटलं जात होतं. बहुतांश स्त्रिया घरातच कोंडल्या गेल्या होत्या. १९०० सालानंतर हळूहळू पाश्चात्त्य रोमान्सच्या कल्पना मूळ धरू लागल्या. त्यांचा परिणाम होऊ लागला. त्यात स्त्री शिकू लागली, समाजात काम करू लागली.
राजकीयदृष्ट्या ही पिढी नेहरू आणि त्यांच्या काँग्रेसमागे गेली. महात्मा गांधी यांच्या हत्येचं शल्य आणि भारताच्या फाळणीचं शल्य या पिढीच्या हृदयात खोलवर रुतून राहिलं. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीचे काही भाग फ्रान्स आणि पोलंडला दिले गेले. ही एक प्रकारची फाळणीच होती. त्यामुळे हिटलरी प्रकारच्या वंशवादाला आणि अतिरेकी राष्ट्रवादाला जर्मनीमध्ये सुपीक मनोभूमिका मिळाली. भारताच्या फाळणीमुळे भारतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदुत्ववादी राष्ट्रवादाला खतपाणी मिळालं. यातून प्रतिगामी विचारसरणी तयार होत गेली. सुरुवातीला पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी अशा विरोधाचं बीज तयार झालं. हा विरोध पुढच्या पिढ्यांमध्ये विकोपाला गेला.
१९४६ सालानंतर जन्मलेली बेबी बूमर ही जनरेशन १९६०-६५पर्यंत विचार करू लागली होती. पाश्चात्त्य बेबी बूमरने सायलेंट जनरेशनपेक्षा स्थिर आयुष्य बघितलं. पुनर्बांधणीच्या काळात अर्थव्यवस्था वेगाने पळत होत्या. खूप काम केलं की सामाजिक आणि आर्थिक फळ प्राप्त होतं, हा या पिढीचा अनुभव होता. ही पिढी स्वतःवर विश्वास ठेवत मोठी झाली. प्रयत्न, इच्छाशक्ती आणि शिस्त यांच्या बळावर उत्कर्ष साधता येतो हा विश्वास तिच्या ठायी होता. आणि प्रयत्न करूनही यश मिळालं नाही तेव्हा या पिढीने हताशाही अनुभवली.
सायलेंट जनरेशनपेक्षा या पिढीने आर्थिक सुस्थिती पहिली. त्याचबरोबर ही सुस्थिती आपण आपल्या कष्टांनी आणली आहे, हा विश्वास होता. यातून या पिढीमध्ये प्रखर व्यक्तिवाद तयार झाला. स्वतःची मानसिक आणि कलात्मक प्रगती करायची प्रागतिकता तयार झाली. यामुळे या काळात हर्मन हेससारखे वैचारिक-आध्यात्मिक लेखक लोकप्रिय झाले. हेसची सिद्धार्थ ही कादंबरी हिंदू-बौद्धिक संस्कृतीमधील आत्मिक शोध दाखवते. स्वतःचा शोध आणि मानवी आयुष्याच्या अर्थाचा शोध. ही कादंबरी आधीच्या पिढीतील असली तरी बेबी बूमर्सनी उचलून धरली. सिल्व्हिया प्लाथची वैयक्तिक मानसिक वेदना प्रतीत करणारी कविता या पिढीला आपली वाटली. गॅब्रिएल गार्सिया मार्क्वेझच्या ‘वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड'मधील ‘मॅजिक रिॲलिझम' या पिढीला आपला वाटला.
भारतीय बेबी बूमर मात्र आपल्या आयुष्यात आपल्या आधीच्या सायलेंट जनरेशनच्या मार्गावर चालत राहिला, राष्ट्रनिर्माणाचं कार्य करत राहिला. सायलेंट जनरेशनपेक्षा तो जास्त व्यक्तिवादी झाला खरा, पण तो मुख्यतः कुटुंबाचाच राहिला. आर्थिक स्थिरता हा त्याच्या आयुष्याचा सुवर्णनिकष होता. स्थिर नोकरी, स्थिर पगारपाणी, सोनं-नाणं हे सारं त्याला हवं होतं, ते आपल्या स्वतःसाठी नाही तर कुटुंबासाठी.
हेही वाचा - राज्यव्यवस्था आणि भ्रष्टाचार अनादी काळाचं अद्वैत
भारतीय बेबी बूमरला सुनील गंगोपाध्याय, सत्यजित राय, रवींद्रनाथ टागोर, फणीश्वरनाथ रेणू, आर. के. नारायण, अनिता देसाई, निराद सी. चौधरी असे लेखक आवडून गेले. मराठी बेबी बूमरला पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, विजय तेंडुलकर असे लेखक आपले वाटले. ग. दि. मा., राजा परांजपे आणि राजा गोसावी या लोकांचे सिनेमे त्याला आपले वाटत गेले. मराठी नाटक हा मराठी बेबी बूमरचा वीक पॉइंट होता. जुनी संगीत नाटकं बघता बघता महाराष्ट्रातला सुरुवातीचा बेबी बूमर बाळ कोल्हटकर थाटाची खोट्या आदर्शवादाने नटलेली सेंटिमेंटल नाटकं सायलेंट जनरेशनच्या खांद्याला खांदा लावून पाहू लागला. वसंत कानेटकर यांच्या ‘उथळ वास्तववादी' नाटकात आनंद मानू लागला.
सायलेंट जनरेशनचा मराठी माणूस शाहिरी छापाच्या ऐतिहासिक आणि पौराणिक कादंबऱ्यांमध्ये रमला. रणजित देसाई, शिवाजी सावंत, ना. सं. इनामदार या शाहिरी लेखकांमध्ये रमला. बेबी बूमर मात्र हळूहळू यातून बाहेर पडत गेला. खरा इतिहास शोधू लागला. रियासतकार सरदेसाई यांचा इतिहास तो वाचू लागला. याच काळात इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचं ‘भारतीय लग्नसंस्थेचा इतिहास' हे पुस्तक अत्यंत लोकप्रिय झालं. इतिहास हे केवळ पूर्वजपूजन नसून ती एक उत्क्रांती असते, ही भूमिका या काळात लोकमान्य झाली.
सत्तरच्या दशकात बेबी बूमर महागाई, युद्ध आणि बेरोजगारी या सर्वांमुळे असंतुष्ट झाला. या काळातल्या विजय तेंडुलकर यांच्यासारख्या लेखकांच्या खऱ्या वास्तववादाने तो हादरून गेला. सुरुवातीच्या रागानंतर त्याने तेंडुलकरी पद्धतीच्या नाटकांना आपलं मानलं. माणूस जसा आहे तसा बघायचं हे व्रत या काळात मराठी नाटकाने आणि साहित्यानेही घेतलं. याच काळात नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ, राजा ढाले, केशव मेश्राम यांच्या दलित संवेदनांमधून आलेल्या लिखाणाने उदारमतवादी बेबी बूमरचं मन जिंकून घेतलं.
पुढे पुढे रोमँटिक साहित्य वाचून बुद्धिमान बेबी बूमरचं समाधान होईना. हळूहळू या काळातला मराठी वाचक फक्त रोमान्समधून बाहेर आला. भालचंद्र नेमाड्यांच्या कोसलामधील काव्यात्म डिप्रेशन त्याला आपलं वाटलं. सार्त्र, काम्यू, काफ्का यांच्या साहित्यातल्या अर्थहीनतेचा अनुभव त्याला आपला वाटू लागला. त्याचबरोबर टॉलस्टॉय आणि डोस्टोव्हस्की यांच्या कादंबऱ्या त्याला आपल्या वाटू लागल्या. त्यांच्या कादंबऱ्यांमधील पराकोटीचा वास्तववाद त्याला भावून गेला. टॉलस्टॉय आणि डोस्टोव्हस्की यांच्या वास्तववादाच्या प्रवाहातून होत राहणाऱ्या तत्त्वचिंतनामुळे तो अतिशय इम्प्रेस झाला. श्री. ना. पेंडसे यांची ‘तुंबाडचे खोत' ही महाकादंबरी टॉलस्टॉय आणि डोस्टोव्हस्की यांच्या कादंबऱ्यांवरूनच प्रेरणा घेऊन लिहिली गेली. पेंडसे आधीच्या पिढीतील होते, परंतु बेबी बूमरने त्यांची कादंबरी उचलून धरली.
सत्तरच्या दशकात सॅम्युएल बेकेट, युजिन आयनेस्को, हेरल्ड पिंटर वगैरे नाटककार बेबी बूमरमधील नाटक चळवळीने उचलून धरले. हे सगळं पूर्वीच्या पाश्चात्त्य सायलेंट जनरेशनला आपलं वाटलं होतं. विजया मेहता, अरविंद देशपांडे, जब्बार पटेल अशा नाट्यकर्मींनी या सर्व संवेदना महाराष्ट्रात आणल्या. महेश एलकुंचवार यांनी ‘वाडा चिरेबंदी'मध्ये आंतोन चेकॉव्ह थाटाचा रिॲलिझम आणला आणि गो. पु. देशपांडे यांनी ‘उद्ध्वस्त धर्मशाळा'मध्ये तत्कालीन राजकीय तत्त्वज्ञानांची चर्चा केली.
प्रत्येक पिढीला मानवी आयुष्य इंटरप्रिट करणारे विचारवंत हवे असतात. बेबी बूमरच्या काळात हे काम नरहर कुरुंदकर, इरावती कर्वे आणि दुर्गा भागवत यांनी केलं. महाभारत, भारतीय संस्कृती आणि भारतीय तत्त्वज्ञानं यांच्यावर या त्रयीने विपुल लिखाण केलं. भारतीय पातळीवर रोमिला थापर या इतिहासकार, एम. एन. श्रीनिवास आणि आन्द्रे बेताय यांच्यासारखे समाजशास्त्रज्ञ, रजनी कोठारी यांच्यासारखे राज्यशास्त्रामधले विचारवंत यांनी भारतीय समाजातील चलनवलन बेबी बूमरला इंटरप्रिट करून सांगितलं.
सत्तरच्या दशकात बेबी बूमरच्या अनुभवाला आलं, की भारतीय राज्यव्यवस्था म्हणावं तशी काम करत नाहीये. यंत्रणा काम करत नाहीयेत; त्याऐवजी भ्रष्टाचार काम करतो आहे, वशिलेबाजी काम करते आहे. या सर्व रागाला अमिताभ बच्चनच्या अँग्री यंग मॅनच्या प्रतिमेने वाट करून दिली. प्रेमभंगाने उद्ध्वस्त होणारा दिलीप कुमार, निष्पाप आवारा राजकपूर, स्मूथ आणि सॉव्ह देव आनंद, उनाड शम्मी कपूर आणि गोड गुलाबी स्टायलिश राजेश खन्ना या हीरोंचं जग १९७५ येता येता संपलं. आता परिस्थितीच्या छातीवर पाय रोवून उभ्या राहिलेल्या अमिताभचं जग आलं. व्यवस्थेवरील रागाला शाब्दिक वाट करून देणारा आणि वेळ आली तर हाणामारी करून न्याय पदरात पाडून घेणारा अमिताभ! पूर्वी सूड वगैरे व्हिलन लोक घेत. आता हीरो सूड घेऊ लागला. दीवारमधला अमिताभ स्मगलर बनून परिस्थितीवर सूड घेतो. त्रिशूलमधला अमिताभ आपल्या आईवर झालेल्या अन्यायाचा सूड घेतो. न्याय हवा, मग भले तो सूडाच्या मार्गाने का असेना. सायलेंट जनरेशनचा आदर्शवाद संपून गेला. ५५ सालानंतर जन्मलेला बेबी बूमर ४६ ते ५५ मध्ये जन्मलेल्यांपेक्षा थोडा वेगळा होता. ४६ साली जन्मलेला बेबी बूमर राग आला तरी तो दबून व्यक्त करत होता. ५५ सालानंतर जन्मलेला बूमर जे. पी. आंदोलनात उतरला, रेल्वे संपात उतरला, अगदी काही नाही तर अमिताभच्या सिनेमांचा प्रेक्षक झाला.
आधी सायलेंट जनरेशनच्या काळात भारतीय सिनेमा समाजामुळे इम्प्रेस झाला होता. नंतर हळूहळू भारतीय सिनेमा व्यक्तिवादी होत गेला. बेबी बूमर सिनेमामुळे एक व्यक्ती म्हणून इम्प्रेस होऊ लागला. खरं तर, मानसशास्त्रज्ञ सुधीर कक्कर म्हणतात त्याप्रमाणे बेबी बूमर दोन मानसिक स्तरांवर विभागला गेला होता. त्याचं अंतर्मन भावनिक हळुवारपणा, आपल्या कुटुंबाशी असलेली निष्ठा आणि आपल्या जातीशी असलेली निष्ठा यांनी व्यापलं होतं; परंतु त्याचं बाहेरचं मन मात्र तर्कशुद्धतेला आणि आपल्या व्यक्तिगत स्वातंत्र्याला महत्त्व देत होतं. कक्कर यांनी बेबी बूमरचं आणखी एक वैशिष्ट्य सांगितलं आहे. पारंपरिक लग्नांमध्ये सायलेंट जनरेशनमधील स्त्रीला भावनिक न्याय मिळाला नाही. त्यामुळे आई झाल्यावर तिचं सारं प्रेम मुलांच्या वाट्याला आलं. बेबी बूमर पिढी आईचं उदंड प्रेम मिळाल्यामुळे भावनिकदृष्ट्या हळुवार झाली.हा हळुवारपणा बेबी बूमरच्या कुटुंबवत्सलतेमध्ये उतरून आला.
१९६५नंतर बेबी बूमर हळूहळू काँग्रेसच्या पंखांखालून बाहेर पडत गेला. देशात विविध राज्यांत विरोधी पक्षांची सरकारं बनू लागली. १९७७च्या निवडणुकीत तर काँग्रेस केंद्रातूनसुद्धा हटवली गेली. हा आणीबाणीमधील दमनाचा राग तर होताच, परंतु अस्ताव्यस्त होत गेलेल्या व्यवस्थेचाही राग होता.
१९६५नंतर जन्माला आलेली जनरेशन एक्स म्हणजे दोन जगांना सांधणारी पिढी बनली. एकाच वेळी या पिढीने समाजवादी अर्थव्यवस्थेमधील चणचण पाहिली आणि १९९१ला भारतीय अर्थव्यवस्था मुक्त झाल्यावर आलेली मुबलकतासुद्धा पाहिली. ही पिढी लहानपणी रेशनिंगच्या रांगेमध्ये उभी राहिली आणि नंतर ब्रॅन्डेड जीन्स, टी शर्ट आणि नाइके वगैरेंचे शूज घालून मॉलमध्येसुद्धा फिरली. या पिढीने बजाज स्कूटरसाठी नंबर लावून दहा-दहा वर्षं वाटसुद्धा पाहिली आणि पुढे याच पिढीने शोरूममध्ये जाऊन अगदी सहजपणे महागड्या स्पोर्ट्स कारची एका तासात डिलिव्हरीसुद्धा घेतली.
परंतु लहानपणी तयार झालेल्या चणचणीच्या संस्कारांनी ही पिढी आर्थिक बाबतीत अत्यंत कॉन्झर्व्हेटिव्ह राहिली. स्थिर नोकरी करणं, एफडीमध्ये पैसे ठेवणं, सोन्यात आणि जमिनीत पैसे गुंतवणं हेच या पिढीचं मुख्य ध्येय राहिलं. बेबी बूमरप्रमाणे ही पिढी कुटुंबवत्सल राहिली, तरी जातीच्या पाशातून ही पिढी थोडी मोकळी झाली आणि पारंपरिक कर्मकांडांमधूनही ही पिढी थोडी का होईना, मोकळी झाली.
हेही वाचा - कोंडी फोडणारी युवा चळवळ आज उभी राहील?
एका बाजूला या पिढीने आपल्या आई-वडिलांची काळजी घेतली आणि दुसऱ्या बाजूला आपल्या मुलांना अत्यंत महागड्या शिक्षणाची दारं उघडी करून दिली. वेळ पडल्यास अगदी परदेशी शिक्षणही उपलब्ध करून दिलं.
परंतु बेबी बूमरपेक्षा या पिढीला स्थिर होण्यासाठी जास्त कष्ट करायला लागले. याचं कारण म्हणजे आता लोकसंख्या वाढली होती, परंतु समाजवादी अर्थनीतीमुळे अर्थव्यवस्था पाहिजे त्या प्रमाणात वाढली नव्हती. त्यात भर म्हणून आधीच कमी झालेल्या नोकऱ्या मिळवण्याचा प्रयत्न ही पिढी करत असतानाच १९९० साली मंडल कमिशनच्या तरतुदी लागू करण्याचा निर्णय झाला. आरक्षणाची टक्केवारी वाढली. त्यामुळे तथाकथित खालच्या जातीच्या तरुणांना जास्त संधी मिळाल्या, तर उच्चवर्णीय समाजातील तरुणांच्या संधी कमी झाल्या. त्यामुळे भारतीय समाजात जातीय द्वेष वाढत गेला.
मंडल आयोगाच्या पार्श्वभूमीवर आपले मतदार कमी होऊ नयेत म्हणून भारतीय जनता पक्षाने रामजन्मभूमी आंदोलन सुरू केलं. ‘मंडल'च्या राजकारणावर ‘कमंडल'चा उतारा काढला गेला. यातून या काळात बाबरी मशीद पाडली गेली. त्यामुळे भारतीय समाजात धार्मिक तेढ वाढत गेली.
निधर्मी पक्षांच्या आर्थिक नीतींमुळे जातीय तेढ वाढली आणि हिंदुत्ववादी राजकारणामुळे धार्मिक तेढ वाढली. काँग्रेस पक्षाने शाहबानो प्रकरणात मुस्लिम मुल्लांचा अनुनय केला. यामुळेही पहिल्यांदा जनरेशन एक्सचा हिंदू, आणि नंतर मिलेनियल हिंदूही हळूहळू काँग्रेसविरोधात जात राहिला. याच काळात काश्मीरमधून पद्धतशीरपणे काश्मिरी पंडितांना हाकलून देण्यात आलं. याच काळात पाकिस्तानने दहशतवादाला आपल्या कूटनीतीचा एक भाग बनवलं. त्यात भरीस भर म्हणून भारतातील हिंदू संघटनांनीही रामजन्मभूमी आंदोलन तेज केलं. याचा परिणाम म्हणून बाबरी मशीद पाडली गेली. त्यापाठोपाठ मुंबईमध्ये पाकप्रणित अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट केले. दहशतवादाची ही मालिका पुढे तीस वर्षं कायम राहिली आहे. या सगळ्या घटनांमुळे जनरेशन एक्सच्या हिंदूला ‘सीज मेन्टॅलिटीने' घेरलं. आपण एक धर्म म्हणून आणि देश म्हणून घेरले गेलो आहोत, असं या पिढीला वाटू लागलं.
या सर्व अत्यंत महत्त्वाच्या सामाजिक आणि राजकीय घटना त्या काळातल्या लोकप्रिय सिनेमामध्ये मात्र म्हणाव्या तशा उतरल्या नाहीत. जनरेशन एक्सला आवडणारे सिनेमे कौटुंबिक मूल्यं आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांचा समन्वय साधणारे होते. रेखाचा ‘खूबसूरत', माधुरी दीक्षितचा ‘हम आपके हैं कौन?' शाहरूख खानचा ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या सिनेमांनी जनरेशन एक्सला आवडणारा कुटुंब आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांचा सुंदर समन्वय साधला.
हिंसा हे या जगातलं एक नागडं सत्य आहे, हे या पिढीने दहशतवादातून बघितलं होतं. सुव्यवस्था निर्माण करण्यात सरकारं अयशस्वी होत आहेत हे या पिढीला दिसत होतं. यातून जनरेशन एक्स जास्त जास्त सिनिकल होत गेली. त्यातून राम गोपाल वर्माच्या ‘सत्या'सारखे सिनेमे पुढे आले. ‘रॉ रिॲलिझमचा' म्हणजे नग्न सत्य आहे तसं मांडण्याचा हा काळ होता. मराठी नाटक या काळात नवनवीन प्रयोग करत पुढे गेलं. संजय पवार यांचं ‘कोण म्हणतो टक्का दिला' आणि जयंत पवार यांचं ‘अधांतर', शफाअत खान यांचं ‘शोभायात्रा' अशा नाटकांनी सामाजिक आणि राजकीय चर्चा हा नाटकाचा महत्त्वाचा विषय बनवला.
या काळात अर्थव्यवस्था मुक्त झाल्यानंतर समाजात आर्थिक सुस्थिती आली. या काळानंतर पाश्चात्त्य आणि भारतीय पिढ्या हळूहळू एकसारख्या होत गेल्या. मुक्त अर्थव्यवस्थेनंतर समाजात सुबत्ता आली. लोक आर्थिक चिंता सोडून पहिल्यांदाच स्वतःच्या प्रगतीचा विचार करू लागले. वैयक्तिक, मानसिक आणि तात्त्विक प्रगतीला पराकोटीचं महत्त्व प्राप्त झालं. यावर मार्गदर्शन करणाऱ्या पुस्तकांना मागणी तयार झाली. या प्रकारच्या पुस्तकांना ‘न्यू एज बुक्स' असं म्हटलं गेलं. जीवन इंटरप्रिट करायचं जे काम बेबी बूमरसाठी कुरुंदकर, इरावतीबाई आणि दुर्गाबाईंनी केलं, ते जनरेशन एक्ससाठी या न्यू एज बुक्सनी केलं. पारंपरिक साहित्याऐवजी या पुस्तकांचा खप वाढला. डॅनिएल गोलमनच्या ‘इमोशनल इंटेलिजन्स'सारख्या पुस्तकांनी या काळात विक्रीचे विक्रम केले. त्याचबरोबर पाऊलो कोहेलो, एकहार्ट टोल, दीपक चोप्रा अशा लेखकांची अनेक पुस्तकं प्रचंड खपली आणि त्यांची सर्व भारतीय भाषांमध्ये भाषांतरं झाली. अध्यात्म, मानसशास्त्र, आयुर्वेद, मिथकं जगभरामधील विविध दंतकथा, मानवी मेंदूच्या कार्याबद्दलचे नवनवीन शोध, अशा सर्व विषयांच्या विविध कोनांमधून मानवी आयुष्याबद्दल नवनवीन इन्साइट्स देण्याचा प्रयत्न या पुस्तकांमधून केला गेला. हिंसा, सीज मेंटॅलिटी, कॉर्पोरेट नोकऱ्यांतून आलेले ताण या सर्वांच्या गोंधळातून अर्थाचं काही तरी सूत्र शोधण्याचाही हा एक प्रयत्न होता. अरुंधती रॉय यांच्याबरोबर झुम्पा लाहिरी, अमिताभ घोष, किरण देसाई, अरविंद अडिगा यांच्यासारख्या लेखकांचा हा जमाना होता. हे सगळे लेखक सामाजिक आणि अगदी मानवाबाबतची सत्यं अतिशय विदारकपणे मांडत होते. भारतीय वाचक आता पारंपरिक रोमँटिक आणि आदर्शवादी साहित्यापासून खूप दूर आला होता.
१९८० साली पिढी बदलली होती. जनरेशन एक्स संपून मिलेनियल जनरेशन सुरू झाली होती. ही पिढी विशीमध्ये येईपर्यंत भारतात मुक्त अर्थव्यवस्था स्थिर झाली होती. खूप सारे मीडिया आणि न्यूज चॅनेल्स, कॉम्प्युटर आणि नेट, आर्थिक सुबत्ता आणि कॉर्पोरेट कल्चर या वातावरणात ही पिढी वाढली. आपल्या काळातील ग्लोबल कल्चरशी ही पिढी खऱ्या अर्थाने संलग्न झाली. आधीच्या पिढ्या जागतिक सांस्कृतिक वातावरणाशी फक्त वर्तमानपत्रांद्वारा जोडलेल्या असत. आता कॉम्प्युटर, नेट, परकीय न्यूज चॅनेल्स आणि सिनेमाच्या चॅनेल्समुळे भारताच्या या पिढीने जागतिक कल्चर अक्षरशः अनुभवलं.
त्यामुळे जातीच्या संदर्भात मिलेनियल्स पूर्वीच्या पिढ्यांपेक्षा जास्त मोकळी झाले. याचं अजून एक कारण म्हणजे या काळात वाढत गेलेलं शहरीकरण. शहरीकरणामुळे लोक जास्त जास्त मिसळू लागले. जातीबाबतचे पूर्वीचे टॅबू सामाजिक आयुष्यात कमी झाले. असं असलं, तरी मिलेनियल आपल्या खासगी आयुष्यात अजूनही जातीचा विचार करताना दिसतो. प्यू रिर्सचच्या सर्व्हेनुसार अजूनही ८० ते ९० टक्के लग्नं आपापल्या जातींमध्येच होतात. भाषेचा बाज, इंग्रजीवरचं प्रभुत्व, खाद्यसंस्कृती या गोष्टी मिलेनियलला महत्त्वाच्या वाटतात. अशा बाबतीत त्याला आपल्या जातीच्या संस्कृतीच्या बाहेरचं फारसं काही आवडत नाही.
आर्थिक बाबतीत मात्र मिलेनियल जनरेशन आधीच्या पिढ्यांपेक्षा जास्त मोकळी झाली. आधी मुख्यतः एफडी आणि सोनं हे इनव्हेस्टमेंटचे सगळ्यात लोकप्रिय मार्ग होते. आता स्टॉक मार्केट्स, म्युच्युअल फंड्स आणि रियल इस्टेट हे मार्ग जास्त प्रमाणात स्वीकारले जाऊ लागले.
मिलेनियल्स मोठे होत असताना काश्मीर प्रश्न चिघळत गेला, बाबरी मशीद पाडली गेली, भारतावर पाकिस्तानप्रणित दहशतवादी हल्ले केले गेले, गोध्राकांड आणि त्यानंतरच्या दंगली झाल्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर मिलेनियल जनरेशन फार मोठ्या प्रमाणात मुसलमानविरोधी झालेली दिसत नाही. सीएसडीएसलोकनीती सर्व्हेप्रमाणे ८१ टक्के मिलेनियल्स भारत सर्व धर्मांचा देश आहे, असं मानताना दिसतात. पूर्वीच्या पिढ्यांमध्ये हे प्रमाण ७३ टक्के होतं. अर्थात, मिलेनियल जनरेशनमध्येदेखील फक्त २ टक्के आंतरधर्मीय लग्नं होतात, हेही खरंच. जनरेशन एक्सच्या मानाने मिलेनियल्स आंतरजातीय लग्नं मात्र जास्त प्रमाणात करू लागले. एक्समध्ये हे प्रमाण ४ ते ५ टक्के होतं, मिलेनियलमध्ये हे प्रमाण १० ते १२ टक्के झालं.
मिलेनियल जनरेशन मोठी होत गेली तशी भारतीय स्त्री वेगाने मुक्त होत गेली. अगदी सगळ्या क्षेत्रांत भारतीय स्त्री आपल्या कर्तृत्वाची छाप पाडू लागली. स्त्रीमुक्तीच्या बाबतीत मिलेनियल जनरेशन एक ‘वॉटरशेड जनरेशन' ठरली असं म्हणावं लागेल. मैलाचा दगड!
हेही वाचा - इतके अनर्थ एका अविद्येने केले
न्यू एज बुक्स वाचून मिलेनियलसुद्धा आपल्या आयुष्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होते. मिलेनियल्सचा हा आत्मशोध सिनेमांमधूनही व्यक्त होत गेला. या प्रकारचे सिनेमे मिलेनियल जनरेशनला आवडून गेले. थ्री इडियट्स (२००९), वेकअप सिड (२००९), जिंदगी ना मिलेगी दोबारा (२०१३), ये जवानी है दीवानी (२०१३) असे सिनेमे व्यक्तीच्या आत वळून बघणारे होते, व्यक्तीच्या स्वतःशी असलेल्या नात्यांबद्दल बोलत होते.
थ्री इडियट्स हा सिनेमा म्हणजे पालकांचं प्रेशर, घोकंपट्टी करायला लावणारं वेदनादायक शिक्षण, मेडिकल आणि इंजिनियरिंगविषयीचं ऑब्सेशन याविरुद्धचं बंड होतं. वेकअप सिड हा सिनेमा जीवनाची दिशा शोधण्यामधलं नाट्य प्रतीत करत होता. ज़िंदगी ना मिलेगी दोबारामध्ये स्वतःच्या भीतींवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न होता आणि ये जवानी है दीवानीमध्ये महत्त्वाकांक्षा आणि स्वातंत्र्याविषयीचं चिंतन होतं.
मिलेनियलनंतर आले १९९७ नंतर जन्मलेले जेन झी. नव्याने अवतरलेल्या डिजिटल एजचे हे खरे नेटिव्ह! हे मोठे होत गेले तेव्हा यू ट्यूब, टिक टॉक, व्हॉटस अप, फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम अशा सगळ्या सोशल मीडियांचा अक्षरश: स्फोट झाला. ही पिढी संस्कारक्षम वयात असताना तिला जगाचं, माहितीचं आणि विविध संस्कारांचं प्रचंड ‘एक्सपोजर' मिळालं. त्यामुळे ही पिढी अत्यंत हायपर कॉन्शस झाली. अत्यंत संस्कारक्षम वयात प्रचंड एक्स्पोजर!
सायलेंट जनरेशन ते बेबी बूमरपर्यंत भारतीय पिढ्या आणि तत्कालीन पाश्चात्त्य पिढ्या यांच्यात खूपसा फरक होता. एक्स आणि मिलेनियलमध्ये हा फरक हळूहळू कमी होत गेला. आता तो खूपसा संपून गेला आहे. संपूर्ण जगामधील जेन झीच्या तुलनेत भारतीय जेन झी जास्त कौटुंबिक आहे, एवढाच महत्त्वाचा फरक. बाकी, जगातील जेन झीप्रमाणेच भारतीय जेन झी अतिशय व्यक्तिवादी आहे. भारताच्या इतिहासातली ही सगळ्यात व्यक्तिवादी पिढी आहे. अजून एक म्हणजे या पिढीमधील मुला-मुलींना पूर्वीच्या पिढ्यांमधील लोकांसारखे टॅबू नाहीत. म्हणजे पूर्वीच्या पिढ्यांना जे जे काही निषिद्ध वाटतं, त्या सगळ्याबद्दल या पिढीचं मन मोकळं आहे. आयुष्यात अस्वस्थ वाटत असेल तर ही पिढी अगदी मोकळ्या मनाने मानसशास्त्रज्ञांची मदत घेताना दिसते. त्याचबरोबर लेस्बियन, गे, ट्रान्सजेन्डर्स, बाय सेक्शुअल आणि क्विअर अशा लोकांबद्दल या पिढीला फारसा टॅबू नाही. स्त्रीने-स्त्रीशी आणि पुरुषाने-पुरुषाशी शारीरिक संबंध ठेवणं या पिढीला गैर वाटत नाही. एवढंच काय, स्त्रीने किंवा पुरुषाने दोन्ही लिंगाच्या व्यक्तींशी संबंध ठेवणं आणि अगदी, तृतीयपंथीयांशीही संबंध ठेवणं याबाबतही जेन झीला फारसं काही गैर वाटत नाही. कुणीही कुणाशीही संबंध ठेवावेत. मानवा-मानवांमधील सेक्सचे हे सर्व प्रकार निसर्गमान्य आहेत असं या पिढीला वाटतं.
याचबरोबर पॅन सेक्शुअल, ओम्निसेक्शुअल, ॲब्रोसेक्शुअल आणि पॉलिसेक्शुअल यातले सगळे फरक या पिढीला माहीत आहेत. मराठीत ‘बापाला सेक्स म्हणजे काय ते शिकवू नये' अशा अर्थाची एक ग्राम्य म्हण आहे. ही म्हण या पिढीच्या सेक्ससंदर्भातल्या अगाध ज्ञानामुळे कालबाह्य झाली आहे. ही पिढी आपल्या पिताश्रींना सेक्सविषयी खूप काही शिकवू शकते. बाकीच्या पिढ्यांच्यापेक्षा ही पिढी अगदी वेगळी घडली आहे. एक्सपोजरच तेवढं मोठं!
प्रेमसंबंधांच्या बाबतीत या पिढीने एक फार मोठा शोध लावला आहे. हा शोध असा, की प्रेमाच्या बाबतीत शारीरिक आकर्षण वेगळं आणि रोमँटिक फील असणं वेगळं. हा शोध फार महत्त्वाचा आणि लक्षात घेण्यासारखा आहे. एखाद्या व्यक्तीविषयी आपल्याला प्रेम न वाटता सेक्शुअल आकर्षण वाटू शकतं आणि एखाद्या व्यक्तीविषयी आपल्याला सेक्शुअल आकर्षण न वाटता प्रेम वाटू शकतं. आपल्या भावनांकडे फार प्रामाणिकपणे बघणारी ही पिढी आहे.
लग्नाच्या बाबतीतसुद्धा ही पिढी जास्त मुक्तपणे विचार करताना दिसते. इंडियन ह्युमन डेव्हलपमेंट सर्व्हेप्रमाणे ८० ते ८५ टक्क्यांपेक्षा जास्त जेन झी लग्नाच्या बाबतीत जात आणि धर्मापेक्षा वैयक्तिक अनुरूपतेला जास्त महत्त्व देतात. एकमेकांचं जमलं पाहिजे, त्यापुढे जात आणि धर्म दुय्यम, असा विचार आहे; परंतु हा विचार अजूनही प्रत्यक्षात उतरताना दिसत नाही.
अरुंधती रॉय यांच्या ‘गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज' या कादंबरीत भारतीय जातिव्यवस्थेचं एक अमानवी लक्षण सांगितलेलं आहे. भारतीय जातिव्यवस्थेने ‘लव्ह लॉज' तयार केलेले आहेत. कुणी कुणावर प्रेम करावं, किती प्रेम करावं आणि कधी प्रेम करावं याचे कायदे जातिव्यवस्थेने तयार केलेले आहेत. प्रेमासारख्या उदात्त गोष्टीला जखडून टाकणारी बंधनं! त्यांची अम्मू ही उच्चवर्णीय नायिका दलित वेलुथाच्या प्रेमात पडते. १९६९ साली ती लव्ह लॉ मोडते. तिला मीनाचील नदीच्या काठावर वेलुथाच्या मिठीत आनंद, समजूत, सौंदर्य आणि प्रेम सापडतं. माणुसकीने नटलेल्या प्रेम वगैरे ‘छोट्या' गोष्टींच्या देवता बनून अम्मू आणि वेलुथा दोन आठवडे काढतात. मग जात, धर्म, त्यांचा अभिमान या ‘मोठ्या' गोष्टी त्यांच्या नात्याचा ताबा घेतात. उच्चवर्णीय पोलिस वेलुथाला खोट्या गुन्ह्यात अडकवतात. त्यांच्या मारहाणीत वेलुथा मृत्यू पावतो.
अम्मू आणि वेलुथाचं प्रेम बघून बेबी बूमर हादरला होता. केरळमध्ये तर कादंबरीवर अश्लीलतेची केस केली गेली होती. उच्चवर्णीय अम्मू दलित वेलुथावर प्रेम करते म्हणजे साक्षात अश्लीलताच! एका उच्चवर्णीय स्त्रीला एका दलिताच्या मिठीत आनंद, समजूत, सौंदर्य आणि प्रेम सापडतंच कसं? बेबी बूमरच्या खूप शिव्या या कादंबरीने खाल्ल्या. पुढे मग जनरेशन एक्सने ही कादंबरी ‘ॲप्रिशिएट' केली आणि त्यानंतर मिलेनियलने ‘सेलिब्रेट' केली. जेन झींनी तर तिला आता ‘क्लासिक' पदावर पोहोचवलं आहे. भारतात जन्माला आलेल्या विविध पिढ्या ‘लव्ह लॉज'बद्दल काय विचार करत आहेत हे आपण समजून घेत गेलो तर सामाजिक इतिहासाचं एक सूत्र आपल्या हाती लागतं. आज गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज देशातल्या विविध युनिव्हर्सिटीजमध्ये अभ्यासक्रमात आहे. लक्षावधी जेन झी ही कादंबरी वाचत आहेत, या कादंबरीच्या प्रेमात पडत आहेत.
लव्ह लॉजबद्दल जेन झी इतर पिढ्यांपेक्षा वेगळी आहे, त्याचप्रमाणे आज्ञाधारकतेच्या बाबतीतसुद्धा जेन झी इतर पिढ्यांपेक्षा मोकळी आहे. वडीलधाऱ्यांचं आज्ञापालन हे आधीच्या पिढ्यांचं मुख्य लक्षण होतं. प्रत्येक काळात बंडखोर असतातच; परंतु पिढीच्या पिढीने आज्ञाधारकतेला बाय बाय केला आहे, असं चित्र जेन झीच्या बाबतीत दिसून येतं आहे.
आधीच्या पिढ्यांमध्ये आज्ञाधारकतेला संस्कार पाळणं असंही नाव दिलं गेलं होतं. या गोंधळात या पिढ्या स्वतःची मतं बाजूला ठेवून बाह्यजगाच्या ‘आज्ञा' पाळत जगताना दिसतात. या उलट, अनेक समाजशास्त्रीय सर्व्हेंमध्ये नोंदवलं गेलं आहे, की जेन झी मोकळ्याढाकळ्या चर्चा करत मोठी झाली आहे, प्रश्न विचारत मोठी झाली आहे. हे प्रश्न आई-वडिलांना विचारले गेले, समाजातील लव्ह लॉजना विचारले गेले, परंपरांना विचारले गेले आणि धार्मिक रूढींनाही विचारले गेले. धर्मामधील मूलतत्त्वं महत्त्वाची, रूढी नव्हेत, अशी भूमिका घेताना ही नवी पिढी दिसते आहे. बेबी बूमर किंवा एक्स जनरेशनमधील सुरुवातीच्या मंडळींच्या डोक्याच्या पलीकडचा हा प्रकार आहे.
जनरेशन एक्सच्या काळात भारतीय स्त्रीची स्थिती निर्णायकरीत्या बदलली. त्याचप्रमाणे जेन झीच्या काळात भारतीय समाजपुरुषामधील विचारप्रकिया निर्णायकरीत्या बदलत चालली आहे. समता, स्वातंत्र्य, मानवता, मोकळ्या चर्चा, मुक्त अभिव्यक्ती ही मूल्यं अधिकाधिक महत्त्वाची ठरत आहेत.
असं सगळं असताना जेन झी ही पिढी आर्थिकदृष्ट्या अँक्शस आहे, घाबरलेली आहे. आज किमान ३५ कोटी जेन झी भारतात आहेत. म्हणजे लोकसंख्येच्या २८ टक्के! या सर्वांना नोकऱ्या द्यायचं आव्हान भारतीय अर्थव्यवस्थेसमोर आहे. नुकत्याच झालेल्या जेन झी आंदोलनामुळे आपल्याला हे मान्य करावं लागत आहे, की भारतीय अर्थव्यवस्था आणि राज्यव्यवस्था यात कमी पडत आहे.
सिनेमांमध्ये गँग्ज ऑफ वासेपूरसारख्या सिनेमांनी जेन झीला आकर्षित केलं; मात्र, जेन झीची खरी आवड ओटीटी सिनेमे आणि मालिका. यातही आदर्शवादी प्रेम कथांपेक्षा डेटिंगमधील, रिलेशनशिपमधली कॉम्प्लिकेशन्स ही जेन झीची खरी आवड ठरली. नेटफ्लिक्सवरील ‘खो गए हम कहाँ'सारख्या फिल्म्सनी सोशल मीडिया व्हॅलिडेशन, डेटिंग ॲप कल्चर, अतिरेकी काम करून बर्न-आऊट होणं या गोष्टी मांडल्या. ॲमेझॉन प्राइमवरील ‘गेहराईयाँ' या सिनेमाने प्रेमातलं चीटिंग, इमोशनल ट्रॉमा आणि टॉक्सिक कौटुंबिक नात्यांचा त्रास या गोष्टी मांडल्या. यावरून जेन झीला खरं जीवन कसं आहे यात रस आहे हे दिसून येतं. उगीच खोटं, आदर्शवादी समोर मांडू नका, असं त्यांचं म्हणणं आहे.
जीवन इंटरप्रिट करण्यासाठी मिलेनियल देवदत्त पटनायक यांच्या लिखाणाकडे वळले. पटनायक यांनी भारतीय दंतकथा ‘री-इंटरप्रिट' करून सांगितल्या, मानवी आयुष्याशी त्यांचं नक्की काय नातं आहे हे सांगितलं. मानसशास्त्रामध्ये जेन झींचे सगळ्यात आवडते लेखक म्हणजे बेसेल व्हान डर कोल्क आणि निकोल ल पेरा!
हेही वाचा - ध्येयवाद ते ध्रुवीकरण - प्रवास भारतीय पत्रकारितेचा
तुम्ही खरे जेन झी असाल तर तुम्ही कोल्क यांचं ‘द बॉडी कीप्स द स्कोअर' वाचलेलं असायलाच लागतं. एंग्झायटी आणि ट्रॉमा आपल्या शरीरावर काय परिणाम करतात आणि त्यातून बाहेर कसं यायचं हे कोल्क सांगतात. निकोल पेरा यांचं ‘हाऊ टु डू द वर्क' हे पुस्तक स्वतःवर नियंत्रण कसं मिळवायचं, लहानपणी तयार झालेल्या कंडिशनिंगमधून बाहेर कसं पडायचं हे शिकवतं. भावनिकदृष्ट््या स्वतःच्या पायावर उभं राहायची जिद्द असलेल्या जेन झीचं हे लाडकंपुस्तक!
जगभरातील जेन झी हे एक वेगळंच राजकीय रसायन आहे. बांगला देश आणि नेपाळमध्ये या पिढीच्या आंदोलनांनी सरकारं उलथून टाकली आहेत. याशिवाय केनिया, इंडोनेशिया, जॉर्जिया, व्हेनेझुएला, पेरू आणि पॅराग्वे अशा देशांमध्ये जेन झींनी राजकीय आंदोलनं केली आहेत. भारतातही जुलै महिन्यात जेन झींनी प्रचंड आंदोलन करून संपूर्ण राजकारण हलवून टाकलं आहे. या सगळ्या प्रकाराला राजकीय विचारवंत ‘ग्लोबल यूथक्वेक' म्हणत आहेत. जागतिक युवकांनी घडवलेले राजकीय भूकंप!
या सगळ्या आंदोलनांमध्ये अनेक साम्यं दिसून आली आहेत. ही सगळी आंदोलनं इन्स्टाग्राम, टिक टॉक, एक्स आणि डिस्कॉर्ड अशा सोशल मीडियावरून सुरू झाली आहेत. इतर पिढ्यांमध्ये आंदोलन सुरू झाल्यापासून वेग पकडायला काही महिन्यांचा काळ लागत असे. आता जेन झीची आंदोलनं एक-दोन आठवड्यांमध्येच तीव्र होताना दिसतात. दुसरं असं की, ही आंदोलनं कुठल्याही राजकीय पक्षाशी संलग्न होताना दिसत नाहीत. आधीच्या पिढ्यांची आंदोलनं विरोधी पक्षांशी हातमिळवणी करत आली होती. जेन झींची आंदोलनं निष्पक्ष आहेत. जेन झींची आंदोलनं समस्याकेंद्रित राहिली आहेत. हीच त्यांची ताकद आहे.
पक्षनिरपेक्ष राहिल्यामुळे ही आंदोलनं सगळ्या लोकसमूहांतून पाठिंबा मिळवताना दिसतात. याही पलीकडे जाऊन ही आंदोलनं नेतृत्वनिरपेक्ष राहिलेली दिसतात. यामुळे या आंदोलनांची सुरुवात मोठी होते, परंतु नंतर ही आंदोलनं जास्त काळ टिकताना दिसत नाहीत. राजकीय पक्ष आणि नेतृत्व आंदोलनांना स्थिरता देतं, धोरण देतं आणि राजकीय डावपेचांविषयीची नीती देतं. या गोष्टींचा विचार जेन झीच्या आंदोलकांना करावा लागणार आहे. असं असलं, तरी जेन झींच्या आंदोलनांनी अयोग्य कायदे आणि नीती बदलायला भाग पाडल्या आहेत. केनियामध्ये वादग्रस्त फायनान्स बिल मागे घ्यायला लावलं आहे, इंडोनेशियामध्ये पेट्रोल किमती कमी करायला लावल्या आहेत, तिथल्या खासदारांचे बेसुमार भत्ते कमी करायला लावले आहेत आणि भारतात परीक्षा यंत्रणेत बदल करायला लावले आहेत. त्याहीपेक्षा मोठं काम म्हणजे या आंदोलनांनी राजकीय यंत्रणांना उत्तरदायित्व स्वीकारायला लावलं आहे, त्यांना ‘अकाउंटेबल' बनवलं आहे. आता यापुढे संपूर्ण राजकीय क्षेत्रामध्ये लोकशाहीला मजबूत करणारे बदल जेन झी घडवून आणतील की नाही याचं उत्तर काळच देऊ शकेल. परंतु संपूर्ण जगभरात जेन झीने राजकीय चेतना आणली आहे हे मान्य करावं लागतं.
भारतातील आंदोलनात देशाच्या नेतृत्वाला अश्लील आणि अश्लाघ्य शिव्या दिल्या गेल्या. या गोष्टीचा भारतातील बेबी बूमर आणि एक्स जनरेशनला खूप त्रास झाला. हे कसलं आंदोलन, अशा आशयाच्या कॉमेंट्स झाल्या. जेन झी ही पूर्वीच्या पिढ्यांसारखी दांभिक नाही. खासगीत शिव्या द्यायच्या आणि जाहीरपणे मात्र शिष्ट भाषा बोलायची, ही हिप्पॉक्रसी तिला मान्य नाही. पूर्वीच्या पिढ्या राजकीय नेतृत्वाला खासगीत अतिशय वाईट शिव्या देत आल्या आहेत हे कुणालाही नाकारता येत नाही. जेन झी परिपक्व होत जाईल तसा हा प्रश्न अर्थातच उरणार नाही. पण इथून पुढे कुणी नेता आपण देवस्वरूप आहोत असं सांगायला लागला तर जेन झी त्याची अतिशय क्रूर चेष्टा करणार आणि त्याला जमिनीवर खेचणार हे नक्की! आधीच्या पिढ्यांसारख्या या पिढीला बाह्य जगाच्या ‘आज्ञा' आणि ‘संस्कार' महत्त्वाच्या वाटत नाहीत. संस्कार मानवता करेल, कुणी संघटना नाही, अशी या पिढीची भूमिका आहे.
जेन झीने जंतर मंतरवर केलेल्या आंदोलनाकडून प्रेरणा घेऊन जेन अल्फाने आपली आंदोलनं सुरू केली आहेत. जनरेशन अल्फाचा सगळ्यात सीनियर मेंबर आज १४ वर्षांचा आहे. परंतु ही मुलं आणि मुली उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मणिपूर, महाराष्ट्र, तमिळनाडू अशा सगळ्या भारतातील ग्रामीण भागांत चांगल्या शाळांसाठी आणि चांगल्या शिक्षणासाठी आंदोलनं करत आहेत, धरणं धरत आहेत. फळे नाहीत, शिक्षक नाहीत, शौचालयं नाहीत, वर्गांवर न गळणारी छतं नाहीत, पाणी नाही, अशा अनेक बेसिक मागण्या! भारत विश्वगुरू आहे या दांभिक प्रचाराला या मुलांनी सणसणीत चपराक मारली आहे. भारतीय राज्यव्यवस्थेची आणि शिक्षणव्यवस्थेची अब्रू या मुलांनी वेशीवर टांगली आहे. त्यांना आपले प्रश्न सोडवून हवे आहेत. बारा-बारा वर्षांच्या शालेय गणवेश घातलेल्या मुली जिल्हाधिकाऱ्याला झापत असल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. जेन झी आंदोलन ग्रामीण भागातसुद्धा पसरलं, परंतु त्याचं नेतृत्व शहरी होतं. अभिजित दिपके, नेहा बोरा, आशुतोष रांका, रत्ना सिंग आणि सौरभ दास हे सगळे शहरी होते. आज जेन अल्फा चळवळ ग्रामीण भागातून उत्स्फूर्तपणे जन्मलेली आहे. अतिशय शांततावादी आणि सकारात्मक असं हे आंदोलन आहे. १९४२च्या आंदोलनाची आठवण व्हावी, भारतीय लोकशाही योग्य पिढ्यांच्या हाती आहे हे बघून कुणालाही समाधान वाटावं अशी ही परिस्थिती आहे.
एकुणात काय, तर इतिहासाचा हा युगानुयुगांचा प्रवास आहे. अत्यंत धीमेपणाने हा प्रवास सुरू राहणार आहे. आजच्या क्रिया उद्याच्या प्रतिक्रिया ओढवून घेत राहणार आहेत. यातून नवनवीन गोष्टी रूप घेत राहणार आहेत. यातूनच कधी तरी मानवता आणि समानता हे आदर्श वास्तवात उतरणार आहेत. आज स्त्री निर्णायकरीत्या मुक्त झाली आहे तशी मानवजातसुद्धा कदाचित निर्णायकरीत्या एकसमान होत जाणार आहे. तेव्हाच्या अम्मूला एखाद्या दलिताच्या मिठीत सौंदर्य आणि प्रेम सापडलं, तर त्याला कुणी ठार मारणार नाही. किंबहुना, अरुंधती रॉय यांचं पुस्तकच तेव्हा खऱ्या अर्थाने कालबाह्य होईल. स्वतः रॉय यांनाही तसं झालेलं आवडेलच!
इतिहासाचा हा प्रवास कुठे जाणार आहे हे कुणालाच सांगता येणार नसलं तरी तो कुठे जावा हे नामदेव ढसाळ यांनी सांगून ठेवलं आहे. ‘गोलपिठा' या कवितेच्या शेवटी ढसाळ लिहितात-
नंतर उरल्यासुरल्यांनी कुणालाही
गुलाम करू नये, लुटू नये
काळा-गोरा म्हणू नये, तू ब्राह्मण तू क्षत्रिय
तू वैश्य तू शूद्र असे हिणवू नये,
कुठलाही पक्ष काढू नये,
घरदार बांधू नये,
नाती न मानण्याचा,
आयभन न ओळखण्याचा गुन्हा करू नये,
आभाळाला बाप आणि जमिनीला आई
मानून त्यांच्या कुशीत गुण्यागोविंदाने आनंदाने रहावे,
चंद्रसूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे,
एक तीळ सर्वांनी करंडून खावा,
माणसावरच सूक्त रचावे,
माणसाचेच गाणे गावे माणसाने..
(अनुभव, सप्टेंबर २०२६च्या अंकातून साभार)
श्रीनिवास जोशी
श्रीनिवास जोशी नाटककार आहेत आणि गेली दोन दशके वैचारिक लिखाण करत आहेत.
