
गंगा-यमुनेच्या संगमावर प्रयागराजमध्ये (पूर्वीचं अलाहाबाद) भरलेल्या कुंभमेळ्यात २९ तारखेला रात्री चेंगराचेंगरी होऊन ३० भाविकांचा मृत्यू झाला. मौनी अमावस्येचा मुहूर्त गाठण्यासाठी प्रचंड प्रमाणात गर्दी झाल्याने ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जातंय. या चेंगराचेगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांचे सुन्न चेहरे आपल्याला फोटोंमधून बघायला मिळू शकतात. पण कुंभमेळा सुरळीत चाललेला असतानाही त्यामागची अदृश्य घुसमट मात्र कोणाच्याच खिजगणतीत नाही. ती घुसमट आहे या अजस्र कुंभमेळ्यातल्या स्वच्छतागृहांची सफाई करणा-या कर्मचा-यांची.
यंदाचा कुंभमेळा हा जगातला आजवरचा सर्वात मोठा धार्मिक मेळावा ठरेल, असं बोललं जातंय. १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या काळात कुंभमेळ्याला तब्बल ४० कोटी लोक भेट देतील, असा अंदाज आहे. एवढ्या प्रचंड प्रमाणात लोकांची राहण्या-खाण्याची व्यवस्था लावणं हे मोठंच आव्हान आहे. त्यातही सर्वाधिक ताण आहे तो या भाविकांसाठी उभारलेल्या स्वच्छतागृहांवर आणि दिवसरात्र त्यांची सफाई करणा-या सफाई कर्मचा-यांवर. प्रयागराजच्या संगमावर दीड लाख तात्पुरती स्वच्छतागृहं उभारण्यात आली असून ५००० कर्मचारी त्यांच्या स्वच्छतेचं काम करत आहेत. मुद्दा असा की दुर्दैवाने हे जवळपास सर्व कर्मचारी परंपरागत मैला सफाईचं काम करणा-या तथाकथित दलित जातींमधले आहेत. पण कुंभमेळ्यात स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य टिकून राहावं यासाठी स्वतःला घाणीत गाडून घेतलेल्या या कर्मचा-यांचा कुंभमेळ्याच्या बातम्यांमध्ये साधा उल्लेखही नाही.
कुंभमेळ्यातल्या स्वच्छतागृहांची स्वच्छता हा एरवीपेक्षा अवघड आणि घाणेरडा प्रकार आहे. कारण या स्वच्छतागृहांमध्ये पाण्याची सोय (जाणूनबूजून) करण्यात आलेली नाही. त्याऐवजी स्वच्छतागृहांच्या बाहेर पाण्याचा नळ आणि दहा स्वच्छतागृहांना मिळून फक्त एक बादली ठेवण्यात आली आहे. साहजिकच या बादल्या कमी पडतात. बादली रिकामी होण्याची वाट बघण्याऐवजी लोक काम झालं की साफसफाई न करताच बाहेर पडतात. "त्यांची घाण स्वच्छ करण्याचं काम आम्हा खालच्या जातीतल्या लोकांचंच आहे, असं मानणारे उच्चजातीतले लोक कशाला ही स्वच्छता करतील," असा थेट प्रश्न इथले स्वच्छता कर्मचारी विचारतात. आत पाणी नसल्याने लोक पाण्याच्या बाटल्या आत घेऊन जातात आणि काम झाल्यावर तिथेच टाकून देतात. त्या उचलण्यासाठी घाणीत हात घालण्याशिवाय पर्यायच उरत नाही. "बाटल्या आत घेऊन जाऊ नका. गेलात तर त्या बाहेर घेऊन या, असं सांगून सांगून घसा कोरडा पडतो, पण लोक ऐकत नाहीत. उलट आम्हालाच तुच्छतेचे कटाक्ष आणि कामचुकारपणा करत असल्याचे अपशब्द ऐकून घ्यावे लागतात," असं गा-हाणं हे कर्मचारी ऐकवतात.
स्वच्छतागृहांमध्ये पाण्याची सोय ठेवली तर सेप्टिक टँक लागलीच भरतील आणि दर काही तासाने ते उपसून काढावे लागतील. त्यामुळे ते शक्य नसल्याचं आयोजकांचं म्हणणं आहे. पण या निर्णयाचा परिणाम मात्र सफाई कर्मचा-यांना भोगावा लागतो आहे. सध्या २५० सक्शन युनिट्स सेप्टिक टँक उपसण्याचं काम करत असले तरी सफाई कर्मचा-यांना घाणीत उतरून काम करावंच लागत आहे. आयोजकांच्या मते सफाई कर्मचा-यांना ग्लोव्ह्ज, मास्क वगैरे साहित्य पुरवण्यात आलं आहे. शिवाय हाताने घाण काढावी लागू नये यासाठी जेट स्प्रेही देण्यात आलेत. पण "ग्लोव्ह्ज पुरेसे नाहीत आणि जेट स्प्रेला कधीच प्रेशर नसतं. त्यामुळे हाताने घाण साफ करण्याखेरीज पर्यायच उरत नाही", असं इथे काम करणारी माणसं सांगतात. शिवाय कुंभमेळ्यातली लोकांची संख्या पाहता हे काम दिवसरात्र अथक करावं लागतं. "एक टॉयलेट स्वच्छ करून बाहेर येईतो दुसरं घाणं झालेलं असतं, आणि ते स्वच्छ करेतो पहिलं पुन्हा घाणीने भरतं. ही घाण स्वच्छ करत राहणं हेच आमचं आयुष्य आहे. पोट भरायचं असेल तर या घाणीला पर्याय नाही", असं ही मंडळी आगतिकतेने बोलत असतात. त्याचे वृत्तांत काही मोजक्या समांतर माध्यमांनी प्रसिद्ध केले आहेत.
ही परिस्थिती फक्त कुंभमेळ्यातली नाही. शहरांमधली गटारं आणि सेप्टिक टँक स्वच्छ करणा-या दहामधले नऊ कर्मचारी तथाकथित दलित, पूर्वाश्रमीच्य़ा अस्पृश्य समजल्या जाणा-या जातींमधले आहेत, असं आकडेवारी सांगते. देशातल्या सहा मेट्रो शहरांमध्ये मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगला बंदी घालणारा आदेश नुकताच सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. इतर ठिकाणची परिस्थितीदेखील सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपाशिवाय बदलू शकेल, असं दिसत नाही.
गेल्या कुंभमेळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छता कर्मचा-यांचे पाय धुतले होते. त्या घटनेला वारेमाप प्रसिद्धी मिळाली होती. आता देशातली जातपात संपली आणि सामाजिक समरसतेचा नवा अध्याय सुरू झाला वगैरे भाषा केली गेली होती. तेव्हा लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असल्याने ते सारं अपेक्षितही होतं. त्यावेळी बातम्यांवर बातम्या देणा-या माध्यमांनी यंदा सफाई कर्मचा-यांची परिस्थिती काय आहे, याकडे ढुंकून पाहण्याची तसदी घेतलेली नाही, हेही साहजिकच.
गौरी कानेटकर | gauri.uniqueportal@gmail.com
गौरी कानेटकर या युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाच्या संपादक आहेत. मितानिन फाउंडेशनच्या `सलाम पुणे` या उपक्रमाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. उपेक्षितांचं जगणं, त्यांचे प्रश्न आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती-संस्था समाजासमोर आणण्याची त्यांना कळकळ आहे.