हडप्पा संस्कृतीतले लोक कोण होते? हडप्पा संस्कृती वैदिक संस्कृतीच्या आधीची की नंतरची? आर्य बाहेरून भारतात आले की भारतातून बाहेर गेले? जातिव्यवस्था कधी सुरू झाली? या आणि अशा अनेक वादग्रस्त प्रश्नांची उत्तरं देणारी, ‘अर्ली इंडियन्स' या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक-अभ्यासक टोनी जोसेफ यांची मुलाखत.
कुठल्याही देशाचा नजीकचा इतिहास कायमच वादग्रस्त असतो. पण भारतात मात्र इतिहासपूर्व काळातील मुद्द्यांबाबतही वर्षानुवर्षं वाद सुरू आहेत. सिंधू संस्कृतीतले लोक कोण होते, सिंधू संस्कृती वैदिक संस्कृतीच्या आधीची की नंतरची, आर्य बाहेरून भारतात आले की भारतातून बाहेर गेले, हे त्यातले काही ज्वलंत विषय. पण गेल्या काही वर्षांमध्ये पुरातत्त्वशास्त्र, पुराहवामानशास्त्र आणि विशेषतः लोकसांख्यिकी अनुवंशशास्त्रांत झालेल्या संशोधनामुळे या प्रश्नांना शास्त्रीय उत्तरं मिळाली आहेत.
एरवी या तीन शास्त्रशाखांमधील तज्ज्ञ आपल्याला त्या त्या शाखांमधील संशोधनांची माहिती देऊ शकतात; पण या तिन्ही शाखांमधील संशोधनांचा अभ्यास करून भारतीय जनमानसात असणाऱ्या शंकांना सविस्तर उत्तरं देण्याचं, आपण भारतीय कोण आहोत हे उलगडून दाखवण्याचं काम ज्येष्ठ पत्रकार टोनी जोसेफ यांनी ‘अर्ली इंडियन्स' या पुस्तकातून केलं आहे. हे पुस्तक २०१८ साली प्रकाशित झालं. म्हणजे तसं जुनंच. त्यानंतरच्या संशोधनांचा समावेश असलेली या पुस्तकाची सुधारित आवृत्तीही चार वर्षांपूर्वी प्रकाशित झाली आणि मंजूल प्रकाशनातर्फे त्याचं मराठी भाषांतरही प्रकाशित झालं आहे. पण तरीही त्यातले सुस्पष्ट निष्कर्ष अद्याप सर्वसामान्य मराठी वाचकांपर्यंत पोहोचले नसल्याचं सतत जाणवत होतं. म्हणूनच या पुस्तकावर आधारित टोनी जोसेफ यांची मुलाखत प्रकाशित करत आहोत.
तुम्ही मुळात पत्रकार-संपादक. बिझनेस वर्ल्डसारख्या मासिकाचे संपादक म्हणून काम केलेले. तुम्ही पुरातत्त्वशास्त्राकडे कसे वळलात? ‘अर्ली इंडियन्स' या पुस्तकापर्यंतचा प्रवास कसा झाला?
मला स्वतःला आपल्या देशाच्या इतिहासपूर्व काळात पहिल्यापासून रस होता. विशेषतः हडप्पा संस्कृतीमुळे आणि या संस्कृतीशी संबंधित अनुत्तरित प्रश्नांमुळे मी या विषयाकडे ओढला गेलो. पाच हजार वर्षांपूर्वी एवढी मोठी विकसित नगरं वसवणारे लोक कोण होते, ते कुठून आले होते, कुठे गेले, या प्रश्नांच्या शोधात मी भारतातील हडप्पा संस्कृतीच्या स्थळांना भेटी द्यायला सुरुवात केली. या क्षेत्रातले भारतातले आणि जगभरातले महत्त्वाचे पुरातत्त्वज्ञ, इतिहासतज्ज्ञ, भाषाशास्त्रज्ञ, अनुवंशशास्त्राचे अभ्यासक यांनी लिहिलेले प्रबंध वाचायला, प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी चर्चा करायला सुरुवात केली. नवी दिल्लीतील रोमिला थापर आणि बी. बी. लाल, न्यू यॉर्कमधील शेल्डन पोलॉक, हार्वर्ड येथील मायकेल विट्झेल, डेव्हिड राइच आणि वाघीश नरसिंहन; चेन्नईमधील इरावथम महादेवन, यूकेमधील मार्टिन बी. रिचर्ड्स, स्टॅनफर्डमधील पीटर अंडरहिल; पुण्यातील एम. के. ढवळीकर, व्ही. एन. मिश्रा, वसंत शिंदे आणि के. पद्दय्या; मुंबईतील शिरीन रत्नागप, धारवाडमधील रवी कोरीसेट्टर, कोलकाता येथील पार्थ मजुमदार, हैदराबादमधील के. थंगराज, वाराणसीमधील लालजी सिंग, लखनौ येथील नीरज राय, जर्मनीतील मायकेल पेट्राग्लिया.. ही यादी खूप मोठी आहे.
त्यांच्याशी बोलून मला काही प्रश्नांची उत्तरं मिळाली, तर काही नवे प्रश्न पडले. मुख्य म्हणजे हे लक्षात आलं, की भारताचा इतिहासपूर्व काळ समजून घ्यायचा असेल तर हडप्पाच्या मागे, अगदी आफ्रिकेतील स्थलांतरांपासून हडप्पानंतरच्या स्थलांतरांपर्यंतच्या काळाचा एकत्रित विचार करायला हवा.
याच प्रवासात हेही लक्षात आलं, की सध्या या विषयात प्रचंड नवीन संशोधन सुरू आहे. आपली आजवरची गृहितकं उलटीपालटी करण्याचं सामर्थ्य असणारी नवी माहिती समोर येते आहे. विशेषतः अनुवंशशास्त्रातील नवीन संशोधनामुळे, म्हणजे पुरातत्त्वीय अवशेषांमध्ये सापडलेल्या मानवी अस्थींची डीएनए चाचणी आणि आजच्या माणसांची डीएनए चाचणी यांच्या तौलनिक अभ्यासामुळे आजवर अनुत्तरित किंवा संदिग्ध राहिलेल्या अनेक प्रश्नांची शास्त्रीय उत्तरं मिळू लागली आहेत. फक्त भारताचाच नव्हे तर जगाचा इतिहासही त्यामुळे नव्याने आपल्यासमोर येतो आहे. (जनुकीय पुरावे म्हणजे नेमकं काय आणि हे संशोधन कसं केलं जातं हे समजून घेण्यासाठी पुस्तकातील सविस्तर प्रकरण वाचू शकता.)
उदा. हडप्पा संस्कृतीचे लोक नेमके कोण होते, त्यांचं आजच्या भारतीयांशी जनुकीय नातं आहे का, ही संस्कृती लयाला गेल्यावर हे लोक कुठे गेले, या प्रश्नांची उत्तरं पूर्वी आपल्याला माहिती नव्हती. आता ती जनुकीय संशोधनामुळे माहीत झाली आहेत. आपल्या देशातला आजवरचा सर्वांत वादग्रस्त प्रश्न म्हणजे आर्य भारतातलेच होते की ते बाहेरून आले, याचंही उत्तर पूर्वी पुराव्यांच्या आधारे देता येत नव्हतं, ते आता अगदी खात्रीशीररीत्या देता येऊ शकतं. एवढंच नव्हे, तर ६५ हजार वर्षांपूर्वी आफ्रिकेतून आलेल्या आपल्या पूर्वजांचा अंश भारतातल्या कोणत्या भागांत किती आढळतो यावरही आता संशोधन झालं आहे. बहुशाखीय संशोधनातून समोर येणारी ही सगळी माहिती सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी ‘अर्ली इंडियन्स' हे पुस्तक लिहिलं. कारण आपण भारतीय कोण आहोत, कुठून आलो आहोत याबद्दल देशातल्या सर्वांनाच उत्सुकता असणार असं मला वाटत होतं.
मग आपण भारतीय कोण आहोत, या प्रश्नानेच सुरुवात करूयात. पुस्तकात तुम्ही म्हटलंय, की सर्वांत पुरातन भारतीय कोण, याची दोन उत्तरं देता येऊ शकतात. ती कशी? अर्ली इंडियन्स नेमके कोण होते?
मध्य प्रदेशातील भीमबेटका या ठिकाणाचं नाव आपण सगळ्यांनी ऐकलेलं असतं. हे ठिकाण भारतातील पुरातत्त्वशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचं ठिकाण. भीमबेटकातील गुहांमध्ये सुमारे एक लाख २० हजार वर्षांपासून आदिमानवांची वस्ती असल्याचे पुरावे मिळाले आहेत. भारतातले सर्वांत पुरातन होमो सेपियन्स कोण आणि ते कधी अस्तित्वात होते, असा प्रश्न आपण पुरातत्त्वशास्त्रज्ञांना विचारला, तर भीमबेटकाच्या गुहांमध्ये सुमारे एक लाख २० हजार वर्षांपूर्वी वावरलेले होमो सेपियन्स, असं त्याचं उत्तर असेल.
पण हाच प्रश्न आपण अनुवंशशास्त्रज्ञांना विचारला तर सर्वांत पुरातन भारतीय याचा अर्थ ते आजच्या भारतीयांचे सर्वांत पुरातन पूर्वज असा काढतील, आणि त्याचं उत्तर मात्र वेगळं असेल. सुमारे ६५ हजार वर्षांपूर्वी आफ्रिकेतून भारतात आलेले होमो सेपियन्स हे आजच्या भारतीयांचे सर्वांत पुरातन पूर्वज आहेत. म्हणजे भारतात सुमारे एक लाख २० हजार वर्षांपूर्वी होमो सेपियन्स वावरत असले तरी त्यांचे वंशज आज अस्तित्वात नाहीत.
आपण आजचे सर्व भारतीय आफ्रिकेतून बाहेर पडलेल्या माणसांचे वंशज आहोत यात आता वाद उरलेला नाही, असं तुम्ही या पुस्तकात नोंदवलं आहेत. कोणत्या नव्या पुराव्यांच्या आधारे हे सिद्ध झालं आहे?
भारतीयच नव्हे, तर जगात आज अस्तित्वात असलेली सर्वच माणसं ही आफ्रिकेतून बाहेर पडलेल्या होमो सेपियन्सच्या एका गटाची वंशज आहेत, हे आता जनुकीय संशोधनातून सिद्ध झालं आहे.
खरं तर उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणाऱ्या चार्ल्स डार्विनने संपूर्ण मानवजातीचं मूळ आफ्रिकेत आहे, असं १८७१मध्येच म्हटलं होतं. पण तरीही त्या त्या देशातले लोक त्या त्या ठिकाणी उपजलेल्या आदिमानवांचे वंशज असू शकतात, अशी थिअरी काही दशकांपूर्वीपर्यंत जगात सर्वत्रच प्रचलित होती. प्रत्येक देशातल्या नागरिकांना आपले पूर्वज याच मातीत जन्मले असणार असं वाटणं साहजिकच आहे. त्यानुसार आपण इथेच जन्मलेल्या पूर्वजांचे वंशज आहोत आणि आपले पूर्वज बाहेरून आले आहेत असं मानण्याची गरज नाही असा एक मतप्रवाह आपल्याकडेही होताच. पण आज हे सिद्धांत शास्त्रज्ञांनी संशोधनाने आणि पुराव्यानिशी फेटाळून लावले आहेत. चीनमधील काही शास्त्रज्ञांचा अपवाद वगळता आज जगातील कोणताही खराखुरा शास्त्रज्ञ आता ही शक्यतादेखील गृहीत धरत नाही. कारण जगातल्या सर्व माणसांच्या डीएनएमध्ये आफ्रिकेतून ७० हजार वर्षांपूर्वी बाहेर पडलेल्या एका छोट्या गटातील होमो सेपियन्सचे जीन्स सापडले आहेत. आफ्रिकेतून हा गट बाहेर पडण्यापूर्वी जगात सगळीकडे होमो सेपियन्स आणि इतर प्रजातींचे आदिमानव होतेच, पण त्यांचे जीन्स आजच्या माणसांमध्ये त्या प्रमाणात सापडत नाहीत.
आफ्रिकेतून बाहेर पडलेली माणसं भारतात कधी पोहोचली? त्या वेळी भारतात होमो सेपियन्सची किंवा आदिमानवांच्या इतर प्रजातींची वस्ती होती का? त्यांचं पुढे काय झालं?
पुरातत्त्वशास्त्र, अनुवंशशास्त्र आणि इतिहासपूर्व काळातील हवामान बदलांचा अभ्यास अशा तिन्ही शाखांतील संशोधनातून आफ्रिकेतून बाहेर पडलेल्या होमो सेपियन्सच्या स्थलांतराचा काळ ठरवण्यात शास्त्रज्ञांना यश आलं आहे.
आफ्रिकेतून निघालेले होमो सेपियन्स भारतात नेमके कधी पोहोचले याचे पुरावे उपलब्ध नाहीत. (ते का नाहीत, यालाही कारणं आहेत. पण त्याचं उत्तर देत बसलं तर बरंच विषयांतर होईल. त्याबद्दल पुस्तकात सविस्तर माहिती आहे.) पण इतर काही पुराव्यांवरून त्यांचा भारतातल्या आगमनाचा काळ ठरवता येतो. साधारणपणे ६३ हजार वर्षांपूर्वी हे होमो सेपियन्स दक्षिणपूर्व आशियात पोहोचले होते असं तिथे सापडलेल्या जीवाश्मांवरून सिद्ध झालं आहे. तसंच ऑस्ट्रेलियामध्ये सापडलेल्या दगडी हत्यारांवरून आफ्रिकेतून बाहेर पडलेली माणसं तिथे सुमारे ५९ हजार वर्षांपूर्वी पोहोचली होती, हेही आता स्पष्ट झालं आहे. दक्षिणपूर्व आशिया आणि ऑस्ट्रेलियात ही माणसं भारतातूनच गेली असण्याची शक्यता सर्वाधिक आहे. त्यावरून ७० हजार ते ६३ हजार वर्षं या कालावधीत होमो सेपियन्स आफ्रिकेतून भारतीय उपखंडात पोहोचले असावेत, अशी शक्यता मांडली जाते. भारतातून दक्षिणपूर्व आशियात पोहोचण्यासाठी त्या काळी लागणारा वेळ लक्षात घेता भारतात ही माणसं ६५ हजार वर्षांपूर्वी आली असावीत, असं मानण्यास वाव आहे. याचाच अर्थ आफ्रिकेतून भारतात पोहोचण्यासाठी त्या काळी माणसांना ५००० वर्षं लागली असावीत.
साधारणपणे २०-२५ जणांचा एक गट अशा १५-२० गटांनी हा प्रवास केला असणार. वंश पुढे चालू राहण्यासाठी तेवढी संख्या गरजेची असते, हे आता सिद्ध झालं आहे. पण भारतात त्या काळी नेमकी किती माणसं पोहोचली याबाबतचे पुरावे आपल्याला मिळालेले नाहीत.
आफ्रिकेतून बाहेर पडलेले हे होमो सेपियन्स भारतात (आणि जगाच्या इतर भागांतही) पोहोचले तेव्हा इथेच जन्मलेले विविध प्रजातींचे आदिमानव आणि कदाचित होमो सेपियन्सही अस्तित्वात होते. हे आदिमानव भारतातून कधी नामशेष झाले याचेही पुरावे आपल्याकडे नाहीत. पण युरोपमधील निएंडरथल आदिमानव ४० हजार वर्षांपूर्वी, म्हणजे तिथे होमो सेपियन्स पोहोचल्यानंतर ५००० वर्षांनी नामशेष पावले, हे आता आपल्याला खात्रीशीररीत्या माहीत आहे. आफ्रिकेतील माणूस भारतात पोहोचण्याआधी इथेही निएंडरथल, डेनिसोव्हन्स, होमो इरेक्टस इ. आदिमानव, तसंच होमो सेपियन्सही राहत होते. त्यामुळे आफ्रिकेतून आलेले होमो सेपियन्स त्यांच्यासोबत वावरले आणि त्यांच्यात संकरही घडला यात वाद नाही. कारण आजच्या भारतीयांमध्येही निएंडरथल आणि डेनिसोव्हन्स या आदिमानवांच्या दोन प्रजातींचे जनुकीय अंश शिल्लक आहेत, हे डीएनए तपासणीवरून सिद्ध झालं आहे. पण ही जनुकं अत्यल्प, म्हणजे एक ते दोन टक्के असून आफ्रिकेतून आलेल्या मानवाची जनुकं तुलनेने खूप जास्त आहेत.
आपले हे पूर्वज कसे दिसत होते? आपण सारे आफ्रिकेतील मानवाचे पूर्वज असू, तर आपण इतके वेगवेगळे कसे दिसतो?
आपण सारे वेगवेगळे दिसतो असं आपण म्हणतो तेव्हा आपण फक्त बाह्यरूपाबद्दल बोलत असतो. आपल्या जनुकांमधल्या क्षुल्लक भेदांमुळे हे दृश्य फरक तयार झाले आहेत. त्याला प्रामुख्याने कारणीभूत आहे ती त्या भौगोलिक परिस्थितीतील हवामानाला तग धरून राहण्याची आणि त्यानुसार शारीरिक बदल घडवण्याची मानवी शरीराची क्षमता. आफ्रिकेतून स्थलांतरित झालेली माणसं जगभर स्थिरावली, त्यानंतर म्हणजे साधारणपणे २९ हजार ते १४ हजार वर्षांपूर्वी जगात हिमयुग होतं. त्या वेळी प्रतिकूल हवामानामुळे माणसांचं स्थलांतर थांबलं. माणसं वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांत, पूर्ण भिन्न अशा हवामानात अडकून पडली. हजारो वर्षं तिथे राहिल्यामुळे त्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी त्यांच्या त्वचेचा रंग, नाकाचा आकार, केसांचे रंग आणि पोत किंवा डोळ्यांचे आकार यात बदल होत गेले. त्यामुळेच आपण सारे आज वेगवेगळे दिसतो. बाकी आपल्यातील जनुकीय साम्य तब्बल ९९ टक्के आहे.
आणखी एक बाब स्पष्ट केली पाहिजे. आपण जेव्हा तीन लाख वर्षांपूर्वीच्या होमो सेपियन्सचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर आजच्या आफ्रिकन माणसांचं रूप येतं, ही कल्पना पूर्ण चुकीची आहे. त्या काळच्या होमो सेपियन्सपेक्षा आज आपण आफ्रिकेतर लोक जितके वेगळे दिसतो, तितकेच आफ्रिकेतील लोकही त्या मानवापेक्षा वेगळे दिसतात, हे आधी समजून घेतलं पाहिजे. तसंच भारताबाबतही बोलता येईल. अंदमान बेटावरच्या ऑंग जमातीतले लोक आफ्रिकेतून आलेल्या मूळ स्थलांतरितांचे थेट वंशज आहेत, असं म्हणता येऊ शकतं. कारण त्यांचा अन्य समूहांशी फारसा संपर्क आलेला नाही. पण याचा अर्थ या जमातीतले लोक त्या काळी आफ्रिकेतून भारतात आलेल्या आपल्या पूर्वजांसारखे दिसतात, असं म्हटलं तर ते चुकीचं ठरेल. ६५ हजार वर्षांपूर्वी आफ्रिकेतून आलेल्या माणसांमध्ये आणि आजच्या भारतीय माणसांमध्ये जितका फरक आहे तितकाच तो अंदमानमधील आजचे आदिवासी आणि तेव्हाचे स्थलांतरित यांच्यामध्येही आहे.
जगातल्या इतर सर्व देशांप्रमाणेच भारत हाही स्थलांतरितांचा देश आहे आणि भारताच्या लोकरचनेवर परिणाम करणारी आजवर एकूण चार स्थलांतरं झाली आहेत, असं तुम्ही पुस्तकात मांडलं आहे. ‘आऊट ऑफ आफ्रिका' स्थलांतरानंतर भारतात झालेलं पुढचं स्थलांतर कोणतं होतं?
एक लक्षात घेतलं पाहिजे, की माणसं अजून कुठेच कायमची स्थिरावली नव्हती अशा इतिहासपूर्व काळाबद्दल आपण बोलतो आहोत. ना तेव्हा कुठले देश होते, ना देशांच्या-प्रांतांच्या सीमा होत्या. पृथ्वी हे काय प्रकरण आहे याचाही शोध माणसाला लागलेला नव्हता. त्यामुळे बाहेरचे आणि आतले, मूळ आणि आक्रमक या शब्दांना तेव्हा काहीही अर्थ नव्हता. त्या पार्श्वभूमीवर या स्थलांतरांकडे बघायला हवं.
त्या काळी मानवी स्थलांतर हे प्रामुख्याने हवामान बदलांवर आधारित होतं. हिमयुग संपून उबदार काळ सुरू झाल्यावर माणसांना एका प्रदेशातून दुसरीकडे स्थलांतर करणं शक्य होई. ७० हजार वर्षांपूर्वी तसं अनुकूल हवामान तयार झाल्यामुळेच आफ्रिकेतून होमो सेपियन्स बाहेर पडू शकले. आधी सांगितल्यानुसार साधारणपणे २९ हजार ते १४ हजार वर्षांपूर्वी जगात हिमयुग होतं, पण त्यानंतर १२,९०० ते ११,७०० वर्षांपूर्वीच्या कालखंडात जवळपास १३०० वर्षं हवामान पुन्हा अतिशीत झालं. त्यानंतरच्या काळात खऱ्या अर्थाने हवामान पुन्हा शुष्क आणि उबदार व्हायला सुरुवात झाली. माणूस-प्राणी आणि वनस्पती या साऱ्यांसाठीच पोषक असणारा होलोसिन हा दीर्घकाळ सुरू झाला. (आता आपण या होलोसिन काळातच आहोत.)
या होलोसिनच्या सुरुवातीच्या काळातच माणसाला शेतीचा शोध लागला. पश्चिम आशिया, दक्षिण आशिया, इजिप्त आणि चीन या भागांमध्ये शेतीतले पहिले यशस्वी प्रयोग झाले. शेती होऊ लागल्यावर लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आणि त्यामुळे लोकांना राहण्यासाठी नवे प्रदेश धुंडाळण्याची गरज भासू लागली. त्यातूनच स्थलांतरं सुरू झाली. अशाच प्रकारे इ. स. पूर्व सुमारे ७००० वर्षांपूर्वी पश्चिम आशियामधल्या आजच्या इराणमधील झॅग्रोस पर्वतरांगांच्या भागातून काही आद्य शेतकरी बाहेर पडले आणि भारतीय उपखंडात येऊन तेव्हाच्या भारतीयांसोबत मिसळून गेले.
भारतीय उपखंडातल्या मेहेरगढ इथे अशा प्राचीन काळी केल्या गेलेल्या शेतीचे पुरावे सापडले आहेत. (हे ठिकाण आज पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात आहे.) हे मेहेरगढ म्हणजे हडप्पा संस्कृतीचंच छोटं पाऊल होतं. पुढे इ. स. पूर्व २६०० ते १९०० या काळात पाकिस्तानमधील हडप्पा, मोहेंजोदारो, भारतात हरियाणामधील राखीगढी, तसंच आजच्या गुजरातमधील ढोलाविरा आणि लोथलपर्यंत एक प्रगत नागरी संस्कृती भरभराटीला आली. त्या काळी इथे राहत असलेले मूळ भारतीय आणि झॅग्रोस पर्वतरांगांच्या प्रदेशातून आलेले स्थलांतरित इराणी शेतकरी यांच्या संकरातून तयार झालेल्या लोकांनी ही संस्कृती वसवली, हे आता डीएनए मॅपिंगवरून सिद्ध झालेलं आहे. म्हणून झॅग्रोस पर्वतरागांमधून आलेले लोक हे भारतातील लोकरचनेची घुसळण करणारं दुसरं मोठं स्थलांतर होतं, असं म्हणावं लागेल.
इथे सिंधू संस्कृतीऐवजी हडप्पा संस्कृती हा शब्द मी मुद्दामून वापरतो आहे. हडप्पा आणि मोहेंजो दारो ही शहरं सिंधू नदीच्या खोऱ्यात वसलेली होती. पण कालांतराने हरियाणातील राखीगढी आणि गुजरातमधील ढोलाविरा आणि लोथल इथे झालेल्या उत्खननामुळे ही संस्कृती सिंधूच्या खोऱ्यापलीकडे पसरली असल्याचं लक्षात येत गेलं आहे. या नागरी संस्कृतीतलं उजेडात आलेलं पहिलं शहर म्हणजे हडप्पा. त्यामुळे तिला हडप्पा संस्कृती म्हणणं अधिक सयुक्तिक ठरतं.
(संपूर्ण लेख वाचा, यंदाच्या अनुभव मासिकाच्या दिवाळी अंकात..)
अंक पुढील संकेतस्थळांवर उपलब्ध आहे-
१. इंस्टामोजो
२. बुकगंगा
३. ॲमेझॉन
गौरी कानेटकर | gauri.uniqueportal@gmail.com
गौरी कानेटकर या युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाच्या संपादक आहेत. मितानिन फाउंडेशनच्या `सलाम पुणे` या उपक्रमाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. उपेक्षितांचं जगणं, त्यांचे प्रश्न आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती-संस्था समाजासमोर आणण्याची त्यांना कळकळ आहे.
