सत्याचा शोध हा मनुष्याच्या डोक्याला लागलेला कायमचा भुंगा आहे. सापडलेलं फळ खाण्याजोगं आहे की नाही, पाऊस पडेल की ऊन, अशा प्रश्नांपासून कदाचित सुरुवात झाली असेल. पुढे, समोरचा माणूस मित्र असेल का शत्रू, इथपासून ते दिवस-रात्र का होतात, प्रत्येक जीवाच्या जगण्याचं काय प्रयोजन, इथपर्यंत माणसाला प्रश्नच प्रश्न पडत गेले. उत्तरं मिळून अशी प्रश्नशृंखला थांबत नाही, ते एक; दुसरं म्हणजे मिळालेली उत्तरंही वेळोवेळी तपासून बघावी लागतात. कधी कधी जुने सिद्धांत पुढे चुकीचे ठरतात, नवे पुरावे हाती लागतात. याला आपण साधारणपणे प्रगती असं म्हणतो.
माणूसजात जीवसाखळीच्या सगळ्यात वरच्या पायरीवर कशी पोचली, या प्रश्नाचं उत्तर एका शब्दात ‘ज्ञानसंवर्धन' असं देता येईल. मानववंशशास्त्रज्ञांचा असा कयास आहे, की प्रगत भाषेचा आणि माहिती घोकून, लक्षात ठेवून पुढच्या पिढीला देण्याचा मंत्र केवळ मनुष्यजातीला अवगत झाला आणि मग अनेक पिढ्यांच्या एकत्रित ज्ञानापुढे बाकी प्रकारच्या वानरजाती स्पर्धेत टिकल्या नाहीत.
...आणि या ज्ञानपिपासेच्या प्रवासात आज आपण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या टप्प्यावर पोचलो आहोत.
पुरण वाटायला पुरणयंत्र किंवा गणितं करायला कॅल्क्युलेटर अशी यंत्रं आपण वापरत आलो आहोत. तसंच आता इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या टनावारी माहितीतून बरोबर कामाची गोष्ट शोधून नेमक्या शब्दांत सांगणारं चॅटजीपीटी हे यंत्र आपल्या हाताशी आलं आहे. बरं, चॅटबॉट हे काही एआयचं एकमेव स्वरूप नाही. ते वापरायला सोपं नि प्रत्येकापर्यंत पोचणारं आहे म्हणून सगळ्यांच्या माहितीचं आहे. पण आता जीवशास्त्र, रसायनशास्त्र, औषध संशोधन अशा आपल्या दैनंदिन जगण्यावर परिणाम करणाऱ्या विद्याशाखाही एआयवर अवलंबून आहेत.
शास्त्राच्या प्रत्येक शाखेत, किंबहुना जगण्याच्या सगळ्या परिघांमध्ये एआयचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे- हे वाक्य खरं असलं तरी तसं दिशाभूल करणारं आहे. म्हणजे तीनेकशे वर्षांपूर्वी याच्या जागी ‘जगण्याच्या प्रत्येक परिघात पुस्तकांचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे' असं वाक्य आलं असतं आणि कदाचित तीनेक हजार वर्षांपूर्वी भाषिक संज्ञा, दस्तऐवजीकरण अशा गोष्टींना ‘आयुष्य बदलून टाकणाऱ्या तंत्रा'चा दर्जा मिळाला असता.
हेही वाचा - बुद्धिमान यंत्रं : जब दिल्ली दूर थी
एआय म्हणजे अनुभवातून शिकू शकेल असा अल्गोरिदम किंवा काँप्युटर प्रोग्रॅम, हे आता आपल्याला माहिती आहे. माणसाला आपल्या मेंदूच्या क्षमतेची मर्यादा आहे. तांत्रिकदृष्ट्या यंत्राला अशी काही मर्यादा नाही. जगातलं सगळं ज्ञान एकाच अवाढव्य प्रोग्रॅममधे एकत्र करणं अशक्य नाही. सध्याचे जीपीटी हे अशा प्रयोगाचं बाळरूप आहेत असं म्हणता येईल. या अल्गोरिदमला त्याच्या कर्त्यांनी इंटरनेटवर उपलब्ध असलेली सगळी माहिती वापरून अनुभव दिला आहे- काय प्रश्न विचारल्यावर काय बरोबर उत्तर असू शकेल, कोणती उत्तरं अर्धवट बरोबर असतील, प्रतिप्रश्न काय येऊ शकतील, वगैरे.
सध्याचे चॅटबॉट किंवा लार्ज लँग्वेज मॉडेल विकी वाचून शिकतात. विकीची स्थापना २००१मध्ये झाली. विकीचा माहिती संकलनाचा प्रकल्प सुरू झाला तेव्हा त्याचा मूळ उद्देश होता इंटरनेटवर सहज उपलब्ध होईल अशा विश्वकोशाची जोडणी करणं. त्या प्रकल्पात लिहिलेली माहिती पाच-सात समीक्षकांकडून तपासली जात असे आणि मगच प्रकाशित होत असे. त्यांनी विकी हा एक आपला तात्पुरता मुक्त प्रयोग म्हणून चालू केला होता. दोनेक वर्षांत विकीवर हजारो लेख आणि भरपूर चांगली माहिती जमा झाली आणि मूळच्या प्रकल्पात डझनभर लेख कसेबसे तयार झाले. ज्ञान खुलं केल्याने भराभर वाढतं, हे पुन्हा अधोरेखित झालं. मग मूळचा प्रकल्प मागेच पडला.
समीक्षा, पडताळणी वगैरे नसली तरी विकीवरची बरीचशी माहिती विश्वासार्ह असते. कारण आपण लिहिलेल्या लेखाबद्दल आणि आपल्या आवडत्या विषयाबद्दल लोक जागरूक असतात आणि चुकीची माहिती पटापट दुरुस्त करतात. नवीन माहिती, नवीन पानं विकीवर भरताना संदर्भ द्यावे लागतात. त्याबद्दल चर्चा करण्याचीही तिथे सोय असते. एखादं चुकीचं गृहीतक किंवा बिनबुडाचं विधान विकीवर प्रसिद्ध झालं तरी ‘शेवटी' भरपूर संदर्भ आणि माहिती एकत्र होता होता चुका व्यवस्थित गाळल्या जातात.
सगळीच माहिती कायम अगदी बरोबर असेलच असा कोणाचाच दावा नाही, तरी सामान्य माणसाला विकीचा विश्वास वाटतो. आताच्या एआय प्रणाली तयार करणाऱ्या शास्त्रज्ञांनाही हा विश्वास वाटल्याने जीपीटी कुटुंबीय विकीच्या दुधावर पोसले गेले आहेत. उदा. ‘शेक्सपियरच्या यशाचं रहस्य काय?' असा प्रश्न विचारल्यास तेव्हाच युरोपात ज्ञानप्रसाराची चळवळ सुरू झाली, तेव्हाच केप्लर वगैरे मंडळी आपले सिद्धांत मांडत होती, छापील पुस्तकं परवडू शकत असल्याने साक्षरता वाढली, वगैरे माहिती विकी वाचून, समजून घेऊन जीपीटी आपल्याला सांगू शकतो. त्याही पुढे जाऊन शेक्सपियरच्या यशाबद्दल अतिशय ‘नॉर्मल' आणि विश्वासार्ह दिसणारं विकी पान एआय बॉट बनवू शकतो.
हेही वाचा - कृत्रिम बुद्धिमत्तेचं सीमोल्लंघन
एआय प्रणालीचा मुख्य फायदा हा, की सामान्य माणसाला सहज न दिसणारे आकृतिबंध (पॅटर्न) तिला सहज दिसतात. एआय आपण एकत्र केलेलं ज्ञान पडताळून, संदर्भ जुळताहेत का पाहून, स्फोटक किंवा वादग्रस्त माहिती गाळून नेमकी गोष्ट आपल्या पुढ्यात आणून ठेवू शकेल. अशा प्रणाली सध्या नव्या आहेत, पण दोन-पाच वर्षांत हाच आपला जगाची ओळख करून घेण्याचा मार्ग असेल...
आणि मग अशा प्रणालीच्या नाड्या कोणाच्या हातात आहेत, त्यावर काय माहिती मिळेल किंवा मिळणार नाही ते ठरेल. खरी मेख आहे ती तिथे.
खरं पाहता हे सध्या होऊ लागलंच आहे. म्हणजे सध्या चीनमध्ये तयार झालेल्या डीपसीकला तियानन्मेन घटनेविषयी बोलायची (म्हणजे उत्तर द्यायची) परवानगी नाही. चीनमध्ये दिसणारे नकाशे आणि अमेरिकेत दिसणारे नकाशे वेगवेगळे आहेत. कोणता चूक? कोणता बरोबर? सध्या रशियाच्या इतिहासानुसार युक्रेन रशियाचा अविभाज्य (आणि फुटीर!) भाग आहे. तर युक्रेनीय इतिहासात ते युगानुयुगे स्वतंत्र आहेत, फक्त मध्ये काही वर्षं परचक्र आलं होतं आणि आता परत येऊ पाहत आहे. उद्या आपल्याकडे कोणी नवी प्रणाली बनवली तर त्यात काश्मीर किंवा फाळणीविषयी काय उत्तरं असतील?
इतिहासाचे विद्यार्थी समजा चिनी प्रणालीच्या मदतीने शिकले तर एक ‘सत्य' शिकतील, अमेरिकन प्रणालीने दुसरं आणि भारतीय प्रणालीने कदाचित तिसरं? की एकच काय ते पूर्ण सत्य असलेली निःपक्षपाती, निरपेक्ष प्रणाली शक्य आहे? तसं झालं तर युद्ध करण्याची गरजच भासणार नाही. जर आपला सगळ्यांचा इतिहास एकच असेल, तो सगळ्यांना वस्तुनिष्ठतेने मान्य असेल तर..? आनंदी आनंद गडे!
आहे ते सगळं ज्ञान एकत्र करून ठेवलं तर पुढच्या पिढ्यांत मतभेद, युद्ध टळतील, आनंदीआनंद होईल असं वाटून ज्ञान एकत्रित करून ठेवण्याची कल्पना दरेक काही काळाने माणसांना सुचत असते. माणसाचा भित्तिचित्रं ते विकी हा सगळा इतिहास ‘जे जे आपणासि ठावे..' याच सूत्रात बांधलेला आहे. पुरातन ग्रंथांत दैनंदिन जीवन, लग्न, वारसाहक्क इथपासून ते पृथ्वीची निर्मिती, माणसाचं मूळ, अशा वाट्टेल त्या विषयावरची माहिती सगळीच एकत्रित करून ठेवलेली आहे. सगळ्यांनी सारखे नियम पाळले, सारखी गाणी गायली आणि शंका घेतल्या नाहीत तर एकोपा वाढीला लागणारच. शिवाय हे सगळं तंतोतंत पाठ करून, कोरून, लिहून, छापून ठेवलं तर लबाड लोकांना, भोंदूंना त्यात बदल करता येणार नाहीत, कोणी फसणार नाही, सगळ्यांचं भलं होईल, हा यातला मुख्य हेतू.
हेही वाचा - एआयचा जमाना: देखिले डोळा, खरे खोटे समजेना
पूर्वीपासून यच्चयावत सगळे धर्मपंडित उपलब्ध माहिती पुन्हा पुन्हा गोळा करून, चर्चा करून धर्मग्रंथ सिद्ध करत. विविध मठांमध्ये, विद्यापीठांमध्ये हस्तलिखितांच्या प्रती निघत. नवे विद्यार्थी हे वाचून, पाठ करून पंडित बनत. काळ बदलता लिहिलेली माहिती तशीच्या तशी वापरता येईनाशी होई आणि परत नवा ग्रंथ, नवी स्मृती, नवी टीका आणि नवी आवृत्ती. शिवाय पुस्तकाच्या वेगवेगळ्या हस्तलिखितांत एखाद-दुसऱ्या अध्यायात थोडा बदल होत होत मोठेच बदल घडत. कारण शेवटी प्रती काढणारे लेखनिक आणि वाचून अर्थ सांगणारे पंडित, सगळी माणसंच. बारीक स्वार्थ, ‘ग्रेटर गुड' परमार्थ, किंवा निरागस चुका होतच असत.
पंधराव्या शतकात छपाईयंत्र तयार झालं, त्यानंतरच धर्मग्रंथांतले शब्द बदलणं कमी झालं. त्या टप्प्यापासूनही आज आपण बरेच पुढे आलो आहोत. तरी पूर्ण आणि अंतिम सत्य काही आपल्या हाती अजून लागलेलं नाही. त्याच्या शोधासाठी आजही कित्येकांना आध्यात्मिक गुरूंची गरज भासतेच आहे.
...पण आता पाचेक वर्षांत एआय ही गरजही पूर्ण करेल. आणि कुणी सांगावं- एकेका अल्गोरिदमचे अनुयायी गट तयार होतील.
दरेक वेळेला नवं तंत्रज्ञान येतं तेव्हा एकूण मनुष्यजातीचा सुखवस्तूपणा वाढतो, पण पर्यावरणाची मोठी हानी होते. शिवाय काही गट अनपेक्षित दुष्परिणामांना सामोरे जातात आणि निःशेष होतात. एआयचं आगमन हे असं जगाचा चेहरा बदलणारं तंत्रज्ञान आहे. तेव्हा, याआधी असं जगाचा चेहरा बदलून टाकणारं तंत्रज्ञान आलं तेव्हाच्या काळातून काही शिकता येतं का हे पाहू.
याआधी असा नवा गियर पडला होता तो युरोपात छपाईयंत्राचा शोध लागल्यानंतरच्या शंभर वर्षांत. छपाईयंत्र उपलब्ध झाल्यावर सुरुवातीला केवळ बायबल आणि पापाची कबुली देण्याचे फॉर्म छापले जायचे. पुढच्या पन्नासेक वर्षांत यंत्रात अनेक सुधारणा झाल्या. विविध प्रकारच्या पुस्तिका, माहिती भराभर प्रकाशित होऊ लागली.
या कालखंडात विज्ञानाचीही वायुवेगाने प्रगती झाली. सोळाव्या शतकाच्या मध्यात कोपर्निकसने त्याचं ‘आकाशस्थ गोलांच्या भ्रमणाविषयी' पुस्तक प्रकाशित केलं आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते असं दाखवलं. गॅलिलिओ, केप्लर, टायको ब्राहे वगैरे मंडळींनी हा वसा पुढे नेला. कोपर्निकसने त्याचं पुस्तक चक्क तत्कालीन पोपना अर्पण केलं होतं. त्यामुळे त्यावर लगेच टीकेची झोड उठली नाही. पण या नव्या सिद्धांताचा गाभा लक्षात आल्यावर कॅथलिक चर्चने या बायबलविरोधी मतांना विरोध केला. गॅलिलिओला डांबून ठेवलं. पण तरी ज्ञान हळूहळू झिरपत गेलं. कोपर्निकस आणि मंडळींची सूत्रं नव्या प्रकारची यंत्रं तयार करायला वापरली गेली. सतराव्या शतकात न्यूटनचं आगमन झालं. तिथून पुढचा औद्योगिक क्रांतीचा इतिहास आपल्याला माहीत आहे.
हेही वाचा - चाहूल नव्या वसाहतवादाची
छपाईयंत्राचा दुसरा वारसा म्हणजे त्या काळातली रिफॉर्म आणि रेनेसॉन्स चळवळ. कॅथलिक चर्चच्या तोपर्यंतच्या निर्विवाद सत्तेला नव्या ख्रिश्चन पंडितांनी आव्हान दिलं. बायबलमधला नक्की संदेश काय, यावर अनेक एखाद-दोन पानी पत्रकं छापली आणि वाटली. त्यातून पुढे प्रोटेस्टंट पंथ निर्माण झाला आणि त्याच्याही शाखा पडल्या. थोडक्यात म्हणजे प्रत्येक ज्ञानशाखेत, अगदी धर्माचाही अपवाद न करता, पंडितांच्या टीका, प्रश्न एकमेकांना सहज वाचायला उपलब्ध होऊ लागले. गॅलिलिओपासून डार्विनपर्यंत सगळ्यांना बायबलमधल्या विधानांच्या विरोधी मतं मांडता आली. ज्ञानाच्या प्रसारावर चर्चचा अंकुश नसल्याने या मतांना पाठिंबा मिळू शकला.
म्हणजे वरवर पहाता छपाईयंत्र-कोपर्निकस-गॅलिलिओ-न्यूटन असा प्रगतीचा आणि ज्ञानाचा चढता आलेख दिसतो. आपल्याला चार-पाचशे वर्षांनंतर बघताना सगळे मूलभूत शोध या काळात लागलेले दिसतात. एकंदरीत मध्ययुगातल्या अंधारातून ज्ञानाचा दीप उजळणारा असा हा काळ वाटतो. त्या काळाची आपली कल्पना म्हणजे लिओनार्दो चित्रं रंगवतोय, कोलंबस वगैरे मंडळी जगाचे नकाशे काढतायत, शेक्सपियर नाटकं लिहितोय, देकार्त भूमितीची प्रमेयं मांडतोय, अशी काहीशी अद्भुत असते. पण पंधराव्या आणि सोळाव्या शतकातलं युरोपीय जनजीवन या माहितीच्या महापुराने ढवळून निघालेलं होतं. वेगात पसरणाऱ्या लोकप्रिय पुस्तिकांमध्ये रहस्यकथा, प्रणयकथा आणि पॉर्नदेखील होतं. सनसनाटी गोष्टी आता इंटरनेटवर वेगाने पसरतात, अगदी तशाच (पण अर्थातच त्यामानाने खूप कमी वेगाने) बिनबुडाच्या अफवा छापील पुस्तकांमधून पसरू लागल्या होत्या. यातला एक काळा अध्याय म्हणजे युरोपातील ‘विचहंट'- निरपराध माणसांना चेटूक, भुताटकी समजून हाल हाल करून मारणं.
१४८६मध्ये ‘मालियस मेलफिकारनम' (म्हणजे चेटुकाचा हातोडा) या नावाचं एक छापील पुस्तक प्रसिद्ध झालं. याचा लेखक होता हेन्रीख क्रामर नावाचा एक निलंबित चर्च अधिकारी. त्याने या पुस्तकात तोपर्यंतच्या सगळ्या चेटूक, करणी इत्यादी कल्पितकथांना अंतिम सत्य असल्याच्या थाटात एकत्र केलं, शिवाय चेटकिणींचे किस्से म्हणून काही विचित्र लैंगिक चाळेही आपल्या मनाने रंगवून लिहिले. चेटूक ओळखायची लक्षणं, चेटकिणींचा आणि जादुई गोष्टींचा नायनाट कसा करावा याची पायरी-पायरीने कृती, असंही सगळं नीट तपशिलात लिहिलं. पुस्तकाचा गाभा मात्र चेटकिणींचा छळ करून त्यांच्याकडून चेटुकाची कबुली घेणं आणि मग त्यांना हाल हाल करून मारणं यावर होता. हे पुस्तक पुढे खूपच प्रसिद्ध झालं. परिणामी, सोळाव्या शतकात युरोपात ४० ते ५० हजार लोक असे हाल हाल करून मारले गेले. आपल्याकडे शिवाजी महाराज स्वराज्य स्थापन करत होते त्या काळात युरोपात वर्षानुवर्षं हा माणुसकीला काळिमा फासणारा प्रघात चालू होता.
या ‘विचहंट'चा पूर्ण दोष छपाई तंत्रज्ञानाला देता येणार नाही. छपाईयंत्राच्या शोधाच्या आधीही हे चालू होतं. पण तुरळक. पुस्तकं छापून स्वतःच वाटता येऊ लागल्यावर कोणत्याही ‘माहितीचा' प्रसार जोमात सुरू झाला. पण ती माहिती खरी की खोटी हे तपासण्याची नि ठरवण्याची व्यवस्था एकदमच मोडून पडली... ती त्यानंतर सावरलेली नाही.
आज इंटरनेटमुळे माहितीचा प्रसार अनिर्बंध होतो आहे. तो पडताळण्याची व्यवस्था नाही ते एक. पण आता इंटरनेटवर काही प्रसिद्ध करायला दमडीही लागत नाही. मेसेजिंग ॲपवर माहिती पुढे पाठवायला एक सेकंद लागतो. तेवढीच काय ती गुंतवणूक. खरं तर स्मार्टफोन नव्हते तेव्हाच्या काळातही केवळ टीव्हीवरून गणपती दूध प्यायला लागल्याची ‘माहिती' वेगाने पसरली होतीच. आता पुढची पायरी म्हणजे एआय.
हेही वाचा - एआय टूल्स : कितपत विश्वासार्ह?
एआय आपले एक्सरे पाहून फुप्फुसात कर्करोग पसरला आहे की नाही हे सांगतं, आपले चेहरे ओळखतं, किंवा अगदी धनादेशावरचे किंवा गाडीच्या नंबरप्लेटवरचे आकडे वाचतं, हे ठीकच. पण आता ते स्वतःचं नवं कार्टून, नव्या कविता आणि गोष्टी लिहायला लागलं आहे. जी विकीची पानं वाचून भाषेची प्रारूपं (एल एल एम) तयार केली आहेत, त्या पद्धतीची नवी पानं लिहिणं जनरेटिव्ह एआयला सहज शक्य आहे.
एखाद्या एलएलएमने प्रति विकी तयार करायचं ठरवलं तर ते अब्जावधी पानं थोडक्या वेळात लिहू शकेल. त्यातली समजा ८० टक्के माहिती बरोबर असेल. पण बाकीची २० टक्के धादांत खोटी असेल- खोटं विज्ञान, खोटा इतिहास, खोटेच संदर्भ- तर ते कोण पडताळणार आणि कोण संपादित करणार? एआयला मर्यादेत ठेवायला दुसरं आणखी शक्तिशाली एआय आणणार का? आणि त्याच्याकडे लक्ष ठेवायला..? हजारो माणसांना मिळून अशी पडताळणी करता येईल का? ते शक्य तरी आहे का? आपल्याकडे एकसंध माणूसजात म्हणून असा निर्णय घेण्याची क्षमता आहे का?
खुलेपणाने एआयला बहरू दिलं तर वैज्ञानिक प्रगती वेगाने होऊ शकेल हे खरं, पण त्यात कोणी दुष्टबुद्धीने किंवा अनवधानाने ‘विचहंट' सुरू केली तर ती कोण थांबवेल? बरं, धार्मिक किंवा राजकीय परिघात एआय नको असं म्हटलं तरी लोकप्रिय काय, काय खपतं ते ओळखून त्या पद्धतीचं साहित्य लिहायला एआयला फारसा वेळ लागणार नाही. आणि काय खपतं ते आपल्याला माहीत आहेच. कोपर्निकसचं जगाला अक्षरशः बदलून सोडणारं पुस्तक, पहिल्या पन्नासेक वर्षांत त्याची ४०० प्रतींची एक आवृत्तीदेखील खपली नाही आणि तेवढ्या काळात चेटकाच्या हातोड्याने १० आवृत्त्या पार केल्या. अद्भुत, चमत्कारिक आणि भीतिदायक, शिवाय थोडं पॉर्न हे मनुष्यमनाला अडकवून ठेवणारे विषय आहेत- गणित आणि भूमिती नाही!
युरोपात एकीकडे विचहंट चालू असताना रोममध्ये १६०३ साली ‘अकॅडेमिया देई लिंची' स्थापन झाली. एकमेकांचे प्रयोग नि कल्पना पडताळणं, शास्त्रीय वाद-चर्चा करणं, असं या गटाचं स्वरूप होतं. पुढे १६६०मध्ये लंडनमध्ये रॉयल सोसायटीची स्थापना झाली आणि शास्त्रीय नियतकालिक, जर्नल आणि त्यातले लेख याचं प्रमाणीकरण सुरू झालं. ‘शास्त्रीय' प्रगतीचं मूळ हे आहे, की आपल्या क्षेत्रातील पूर्वसुरींना खोटं सिद्ध केलं तर कौतुक होतं आणि शिक्षा अजिबात होत नाही. विज्ञानाचा, वैज्ञानिकतेचा मूलभूत इष्ट गुण शंकिष्टता हा आहे, श्रद्धा नव्हे.
आता एआयला कह्यात ठेवायला समजा कायदे केले आणि त्यात शंका काढायला वाव ठेवला नाही तर शास्त्रीय प्रगतीच्या मुळावरच हल्ला होईल.
शाळेत सामान्य विज्ञानाच्या पुस्तकात प्रत्येक धड्याखाली ‘आपण काय शिकलो' असा एक भाग असायचा. आता हा प्रश्न आपण आपल्याला विचारायची वेळ झाली आहे. इतिहासातून आपण काय शिकलो? नवीन तंत्रज्ञान सतत येत राहणार. ते थांबवणं आपल्या हाती नाही. माणूसजात म्हणून एकोप्याने आपल्या हिताचे निर्णय घेणं अजून तरी आपल्या आवाक्यात नाही. पण एकेक माणूस म्हणून आपण शंका विचारू. समोर आलेली माहिती पुढे प्रसृत करण्याआधी तिच्या सत्यतेची खातरजमा करायचा प्रयत्न करू. दोन-चार उदाहरणांवरून सार्वत्रीकरण (जनरलायजेशन) टाळू. आणि समोरचा माणूस हा माणूस आहे, व्यक्ती म्हणून तिला तिची मतं आहेत; चुका करायची, सुधारायची संधी आहे; तसं एआयची मतंही परिपूर्ण, संशयाच्या पलीकडे नसणार हे लक्षात ठेवू. एआयमधला इंटेलिजन्स हा अनुभवातून येतो. आपण एआयला काय अनुभव देतोय त्यावर आपण लक्ष ठेवू. आणि मुख्य म्हणजे आर्टिफिशल- म्हणजे मानवनिर्मित- हा शब्द ठळक अक्षरात घालू. एकेक व्यक्ती म्हणून आपण इंटरनेटवर काय लिहितो आणि काय वाचतो यावर एआयची मतं आणि एकूण पुढची दिशा ठरणार आहे.
मृदुला गोरे | mrudula.gore@gmail.com
मृदुला गोरे पेशाने इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर असून एआय व ग्राफिक्स प्रोसेसिंग हे त्यांच्या कामाचे मुख्य क्षेत्र आहे.
