आम्ही कोण?
ले 

चाहूल नव्या वसाहतवादाची

  • सुकल्प कारंजेकर
  • 21.08.25
  • वाचनवेळ 12 मि.
ai sukalp

कोलकाताजवळच्या खेड्यात राहणारी १९ वर्षांची मोमिता साहा दास तिच्या म्हशींना चरायला घेऊन जाते तेव्हा मोबाइलवर काही नवी कामं आली आहेत का याकडेही लक्ष ठेवते. नवी कामं आली असल्यास एकीकडे म्हशी सांभाळताना ती दिलेली कामं पूर्ण करते. एरवी दररोज पहाटे चार वाजता उठून सर्वप्रथम ती मोबाइलवर आलेली नवी कामं पूर्ण करते आणि मग तयार होऊन कॉलेजला जाते. या कामांमुळे तिला मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. नाही तर आर्थिक तरतुदीसाठी तिला मजुरी करण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नसता...

ओडिशामधील एका खेड्यात राहणारी १८ वर्षांची चंद्रमा रोज आतुरतेने मोबाइलवर नव्या कामांची वाट बघते. तिच्या खेड्यात बहुतांश कुटुंबं तुटपुंज्या कमाईवर जगतात. मोबाइलवरील कामांमुळे चंद्रमाला मात्र काही हजार रुपये मिळतात. त्यावर तिचं घर चालतं. याच कमाईवर चंद्रमा आता उच्च शिक्षणाचं स्वप्न बघते आहे...

मोमिता आणि चंद्रमा या दोघींनाही ही कामं मिळतात ती ‘कार्या’ नावाच्या संस्थेकडून. ‘कार्या’ देशभरातील खेड्यांत राहणाऱ्या गरजू स्त्री-पुरुषांना रोजगाराचा आधार देते आहे. हा बदलत्या जगातला रोजगार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या लार्ज लँग्वेज मॉडेल्सना भारतातील विविध भाषा हाताळता येण्यासाठी प्रशिक्षणाची गरज असते. खेड्यांमध्ये राहणाऱ्या हजारो स्थानिक लोकांच्या मदतीने हे प्रशिक्षण दिलं जातं. ‘कार्या’ संस्था खेड्यांतील गरजू व्यक्तींना स्थानिक भाषांमध्ये बोलण्याचं, छायाचित्रांना लेबल देण्याचं काम देते. ही कामं मोबाइलवरून सहज पूर्ण करता येतात. त्यासाठी लॅपटॉप किंवा ऑफिसची गरज नसते. यामुळे एकीकडे अशा गरजू लोकांना रोजगार मिळतो, तर दुसरीकडे चॅटजीपीटी, बार्डसारख्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मोठमोठ्या मॉडेल्सना भारतीय भाषा वापरण्याचं प्रशिक्षण मिळतं.

या कामासाठी गुगलने ‘कार्या’ला २०२४ साली १ दशलक्ष डॉलर्सची देणगी जाहीर केली. ‘आमचं उद्दिष्ट कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्रांतीचा लाभ समाजातील सर्व घटकांपर्यंत पोचवण्याचं आहे’ असं ‘कार्या’च्या वेबसाइटवर नमूद केलं आहे. तिथे दिलेल्या आकडेवारीनुसार ‘कार्या’ने आतापर्यंत देशभरातील एक लाखाहून अधिक गरजू व्यक्तींना रोजगार मिळवून दिला आहे. हे काम त्यांना पुढे वाढवायचं आहे. ‘कार्या’चं काम आणि प्रभाव महत्त्वपूर्ण असला तरी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित रोजगार मिळवून देणारी ही एकमेव संस्था नाही. गेल्या काही वर्षांमध्ये भारतात आणि जगभरात अशा अनेक संस्था, स्टार्ट-अप्स वाढत आहेत.

विविध क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढतो आहे आणि त्यावर आधारित कामांची मागणीही वाढते आहे. ही कामं ‘गिग्स’ स्वरूपाची आहेत. म्हणजे मागणीनुसार तात्पुरत्या स्वरूपाची छोटी कामं. भारतीय अर्थव्यवस्थेत ‘गिग्स’चा वाटा वाढतो आहे. नीती आयोगाने जाहीर केलेल्या अहवालानुसार भारतातील गिग्स कामं करणाऱ्यांची संख्याही सतत वाढते आहे. २०२९-३० र्यंत २३.५ दशलक्ष लोकांना गिग्स कामं रोजगार मिळवून देतील अशी आशा आहे. यात मोठा वाटा कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कामांचा असेल. या कामांचं स्वरूप नेमकं काय असणार आहे?

कृत्रिम बुद्धिमत्तेला प्रशिक्षण देण्यासाठी मोठ्या प्रमाणात माहितीचा संचय लागतो. छायाचित्रांमधील वेगवेगळे घटक ओळखणं, त्यांचं वर्गीकरण करणं, व्हिडिओंचं वर्गीकरण करणं यासाठी माणसांची गरज लागते. या प्रशिक्षणाच्या आधारे कृत्रिम बुद्धिमत्ता स्वतः नावं देणं, वर्गीकरण करणं शिकते; पण कृत्रिम बुद्धिमत्तेने केलेलं कामही कोणाला तरी पडताळून बघावं लागतं आणि त्यात आवश्यक ते फेरबदल करावे लागतात. ही कामं परत माणसांकडेच येतात. यातील काही कामं अगदी सोपी असतात आणि कमी वेळात पूर्ण करता येतात. उदाहरणार्थ, एका छायाचित्रामधील वेगवेगळ्या वस्तू ओळखणं. अशा छोट्या कामांसाठी माणसांना प्रत्येकी १५-५० रुपये मिळतात. अशा कामांमधून महिन्याला २०-२५ हजार किंवा वर्षाला २.५ ते ३ लाख रुपये मिळू शकतात. सरकारी माहितीनुसार भारतातील लोकांचं दरडोई उत्पन्न १,७२,००० रुपयांच्या दरम्यान आहे. यावरून असं वाटतं, की कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कामं भारतातील गरजू लोकांसाठी वरदान ठरू शकतील, लोकांना घरबसल्या चांगलं उत्पन्न मिळवून देऊ शकतील. अशा कामांची मागणी सध्या संपूर्ण जगभरात आहे. फिलिपीन्सपासून व्हेनेझुएलापर्यंतच्या गरजू लोकांना अशी छोटी कामं जगण्याचा आधार देत आहेत.

दुसरीकडे ‘गिग्स’ व्यवस्थेमागील धोके हळूहळू जाणवू लागले आहेत. अशी कामं करणारी माणसं त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवू लागले आहेत. गिग्सआधारित व्यवस्था ही एका अर्थाने ‘नवा वसाहतवादच’ आहे अशी टीका केली जाते आहे. गिग्स व्यवस्थेत नेमका काय धोका आहे, अशा कामांना का विरोध होतो आहे, त्याची पार्श्वभूमी आता समजून घेऊ.

व्हेनेझुएलामधील ऑस्करीना फ्युन्ट्स या तरुणीने महाविद्यालयात शिकत असताना आर्थिक मदत मिळावी म्हणून कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कामं करायला सुरुवात केली. सुरुवातीला काम भरपूर होतं आणि त्यातून नियमित पैसे मिळत होते. या दरम्यान व्हेनेझुएलामधील राजकीय आणि आर्थिक परिस्थिती ढासळल्यामुळे ऑस्करीनाला कोलंबिया देशात स्थलांतर करावं लागलं. गेल्या काही वर्षांमध्ये व्हेनेझुएलामधील बिघडलेल्या परिस्थितीमुळे तिथल्या लाखो लोकांनी स्थलांतराचा मार्ग निवडला आहे. व्हेनेझुएला, कोलंबिया या देशांमध्ये बेरोजगारीचा प्रश्न बिकट झाला आहे. अशा वेळी घरखर्च चालवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कामं तरुणांना आधार देऊ लागली. दक्षिण अमेरिकन देशांमधील राजकीय अस्थिरता ही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांसाठी पर्वणी ठरली. कारण त्यांना अगदी स्वस्तात काम करू शकणारे लाखो कामगार मिळाले. पण ऑस्करीनाच्या असं लक्षात आलं, की हळूहळू तिला मिळणारं काम कमी होत आहे आणि शिवाय तासानुसार कामाची किंमतदेखील कमी मिळते आहे. एका कामाची किंमत काही (अमेरिकन) पेनी इतकी असायची आणि कमीत कमी १० डॉलर्स जमा झाल्याशिवाय पैसे काढता यायचे नाहीत. एखाद्या कामाची सूचना आल्यावर ते लगेच स्वीकारावं लागायचं. कामाचा स्वीकार करण्यात थोडासा जरी विलंब झाला तरी ते काम दुसऱ्या व्यक्तीला पाठवलं जायचं. एकदा ऑस्करीना घराबाहेर चालायला गेली तितक्यात तिला नवीन काम आलं आणि त्याचा तिला लगेच स्वीकार न करता आल्यामुळे ते काम तिच्याकडून काढण्यात आलं. त्यानंतर तिला कामांच्या दिवसांत साधं फिरायला जाणंही बंद करावं लागलं. अशी कामं वेळी-अवेळी कधीही येतात. अगदी मध्यरात्रीदेखील येतात. ऑस्करीनाने तिच्या लॅपटॉपवर नवीन काम आल्यास मोठा आवाज होईल (नोटिफिकेशन वाजेल) असं सेटिंग केलं आहे. म्हणजे ती रात्री झोपेत असताना नवं काम आलं तरी लॅपटॉपवरील मोठ्या आवाजामुळे तिला जाग येते आणि विनाविलंब कामाचा स्वीकार करता येतो. पण या ताणामुळे तिची शारीरिक स्थिती खालावली आहे. ती आता अशा कामांमधील समस्यांबद्दल आवाज उठवते आहे.

अशा कामाचा लगेच स्वीकार करणं पुरेसं नसतं. अशी कामं करणाऱ्यांचा असा अनुभव आहे, की काम ठराविक वेळेत पूर्ण केलं नाही तर ते दुसऱ्याकडे पाठवण्यात येतं. कुठल्या कामाला किती वेळ द्यायचा हे कृत्रिम बुद्धिमत्ता ठरवते. त्यात तडजोड करायची संधी नसते. त्यामुळे एकदा काम हातात घेतलं की काही लोकांना बाथरूमला जाण्याची भीती वाटते. कारण तेवढा वेळ हालचाल दिसली नाही तर काम त्यांच्या हातातून काढून दुसऱ्या कोणाला तरी दिलं जाऊ शकतं. या कामांपुढे झोप, कुटुंब जणू दुय्यम ठरतात. काही प्लॅटफॉर्मवर दररोज कामाचा स्वीकार करणं अनिवार्य ठरतं, नाही तर नवी कामं मिळत नाहीत. अशा वेळी आजारी पडल्यामुळे कोणी जर २-३ दिवस नवी कामं स्वीकारली नाहीत तर नंतर काम मिळणं अवघड होऊ शकतं. त्यामुळे घाबरून काही लोक आजारपणातही अशी कामं करतात, तर काहीजण त्यांची लॉगिन करण्याची माहिती ओळखीच्या लोकांना देऊन तेवढ्या काळात त्यांच्यातर्फे कामं करून घेतात. कधी कधी अशा लॉगिन माहितीचा काळा बाजारही होतो. अशी माहिती शेअर केल्याचं जर कंपनीला कळलं तर पुढील कामं येणं बंद होतं.

अशी कामं करताना पूर्ण केलेल्या कामांच्या गुणवत्तेनुसार कामगारांना रेटिंग दिलं जातं. पुढे काम मिळत राहण्यासाठी चांगलं रेटिंग महत्त्वाचं ठरतं. पण काम कोण देतं आहे, त्यात नेमकं काय अपेक्षित आहे, काम केव्हा पूर्ण झाल्याचं मानलं जाईल याबद्दल अनेकदा पुरेशी माहिती काम करणाऱ्यांना दिली जात नाही. अनेकांना असा अनुभव येतो, की त्यांनी कामं पूर्ण करून दिल्यानंतर ती स्वीकारली जात नाहीत. शिवाय त्याची नीट कारणंही दिली जात नाहीत. यात वेळ वाया जातो, पैसे मिळत नाहीत, शिवाय कामं अपूर्ण केली म्हणून रेटिंगही खराब होतं. अशी कामं करणाऱ्या लोकांनी एकत्र येणं, अधिकृत युनियन बनवणं, झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं ‘गिग्स’ व्यवस्थेत शक्य नाही. त्यामुळे कामगारांची पिळवणूक होत असेल तर त्यांना आवाज उठवणं अवघड होतं. तरीही काही लोकांनी असा संघर्ष करण्याचा प्रयत्न केला आहे.

दोन-एक वर्षांपूर्वी केनियामधील १४०हून अधिक कामगारांनी फेसबुकच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली. हे कामगार कन्टेन्ट मॉडरेटर म्हणून काम करत होते. फेसबुकवर जी छायाचित्रं आणि व्हिडिओ अपलोड केले जातात त्यातील काही खूप हानिकारक स्वरूपाचे असतात. ही छायाचित्रं आणि व्हिडिओ काढून टाकणं आवश्यक असतं. याचा निर्णय फेसबुकची कृत्रिम बुद्धिमत्तेची यंत्रणा करते. परंतु या यंत्रणेला प्रशिक्षण देण्यासाठी माणसांची गरज पडते. कन्टेन्ट मॉडरेटर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींना अशी छायाचित्रं, व्हिडिओ स्वतः बघून निर्णय घ्यावे लागतात. यातील काही छायाचित्रं, व्हिडिओ खूप हिंसक असतात- कोणाची तरी हत्या होताना, किंवा हायपाय तोडताना किंवा कोणी आत्महत्या करताना त्यात पाहावं लागतं, तर काही व्हिडिओ लैंगिक अत्याचाराचे असतात. अगदी छोट्या मुलांवर, बाळांवर झालेले लैंगिक अत्याचारही त्यात असतात. सतत अशी छायाचित्रं, व्हिडिओ बघितल्यामुळे कन्टेन्ट मॉडरेटर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींचं मानसिक स्वास्थ्य पार बिघडून जातं. अनेकांना निराशा येते, रात्री झोप येत नाही, सतत भीती वाटते. काही लोकांच्या मनात आत्महत्येचे विचार डोकावू लागतात.

केनिया, इथियोपियासारख्या देशांमध्ये अगदी कमी पगारावर अशी कामं करवून घेतली जातात. काम देणारी कंपनी या कर्मचाऱ्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी कोणतीही अतिरिक्त सेवा पुरवत नाही. दुसरीकडे, अशी कामं करणाऱ्या लोकांवर बाहेरूनही दबाब असतो. उदाहरणार्थ, काही राजकारणी जाणीवपूर्वक द्वेष पसरवणारे संदेश फेसबुकवर टाकतात. ते मेसेज काढले जाऊ नयेत यासाठी कन्टेन्ट मॉडरेटर म्हणून काम करणाऱ्या लोकांवर दबाव टाकला जातो. इथिओपियामध्ये जेव्हा हिंसेच्या घटना सुरू होत्या तेव्हा तिथल्या कन्टेन्ट मॉडरेटर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींना अशा पोस्ट्स न काढण्याच्या धमक्या दिल्या जायच्या. या धमक्यांचा भीतीमुळे काही व्यक्तींना घरदार सोडून पळ काढावा लागला.

या पार्श्वभूमीवर ‘गिग्स’ व्यवस्थेतील धोके दिसू लागतात. एकीकडे कृत्रिम बुद्धिमत्तेमधील प्रगतीमुळे जगभरात अनेक क्षेत्रांमधील स्थिर रोजगार कमी होत आहेत. मॅकेन्झीने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार २०३० सालापर्यंत कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे ४०० ते ८०० दशलक्ष लोकांच्या रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. काही लोकांचे रोजगार कायमचे नष्ट होतील, काहींना प्रशिक्षण घेऊन नव्या पद्धतीचं काम करावं लागेल, तर काही लोकांसाठी नवे रोजगार निर्माण होतील.

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे जे नवे रोजगार निर्माण होत आहेत त्यातील मोठा वाटा ‘गिग्स’ कामांचा आहे. यात वर सांगितलेल्या प्रकाराची कामं आहेतच. शिवाय काही कामं मोठ्या स्वरूपाची, चांगला पगार मिळवून देणारीही आहेत. पण अशी कामं विशेष प्रावीण्य असलेल्या तंत्रज्ञांसाठीच उपलब्ध आहेत. बहुतांश लोकांसाठीची साधारण कामं ही कृत्रिम बुद्धिमत्तेला प्रशिक्षण देण्याच्या स्वरूपाची आहेत आणि ही कामं मुख्यत्वे गरीब, विकसनशील देशांमधील लोकांना दिली जात आहेत. व्हेनेझुएला, कोलंबिया, केनिया, फिलिपीन्स, भारतासारख्या देशांमध्ये कमी पैशांत काम करायला तयार असलेला गरजूंचं मोठं मनुष्यबळ उपलब्ध आहे. अशा देशांमध्ये कामासाठी स्पर्धादेखील तीव्र आहे. त्यामुळे काम आवडलं नाही, त्याची किंमत न्याय्य वाटली नाही, कामं करताना पिळवणूक झाली तरीही कामगारांकडे तक्रार करण्याला फारसा वाव नाही.

‘गिग्स’ कामांसाठी काम करणारा माणूस महत्त्वाचा नाही, फक्त काम पूर्ण होणं महत्वाचं आहे. ते एकाने केलं नाही तर कामाची वाट पाहणारे दहा लोक तयारच आहेत. बेरोजगारांचं मोठं हतबल मनुष्यबळ जणू कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रगतीसाठीचा ‘कच्चा माल’ ठरत आहे. या कच्च्या मालाची नजीकच्या भविष्यात मोठी गरज आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा चुकीचा वापर सामाजिक ध्रुवीकरण वाढवण्यास, राजकीय अस्थिरता वाढवण्यास जबाबदार ठरतो आहे. दुसरीकडे, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगभरातील वाढत्या वापरामुळे त्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेची, डेटा सेंटर्ससाठी पाण्याची मागणी अनेक पटींनी वाढते आहे. यातून जागतिक तापमानवाढीचा प्रश्न अधिकच तीव्र होतो आहे. आणि या प्रश्नांमुळे विस्थापित झालेलं मनुष्यबळ कृत्रिम बुद्धिमत्तेचे ‘गिग्स’ करण्यासाठी स्वस्तात, विनातक्रार उपलब्ध होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे काही कंपन्या आणि काही व्यक्तींच्या हाती प्रचंड भांडवल एकवटत चाललं आहे. बहुतांश लोकांची मात्र पिळवणूक होते आहे. हे दुष्टचक्र एका अर्थाने ‘नव्या वसाहतवादाची’ चाहूलच आहे.

वरवर विचार करता कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित छोटी कामं निरुपद्रवी आणि चांगली वाटतात. उन्हापावसात शारीरिक त्रासाची, मजुरीची कामं करण्याऐवजी मोबाइल, लॅपटॉपवरील अशी कामं काय वाईट आहेत, असा प्रश्न पडू शकतो. पण या कामांचा पुरवठा भविष्यात दीर्घकाळ टिकणार नाही. जगभरातील लाखो गरजू लोकांच्या प्रशिक्षण देणाऱ्या कामांच्या आधारे कृत्रिम बुद्धिमत्तेची क्षमता, अचूकता वाढते आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेची अचूकता जशी वाढेल तशी प्रशिक्षणाच्या सोप्या कामांची गरज उरणार नाही. ती कामं कृत्रिम बुद्धिमत्ता सहज अचूकपणे करेल. आज फेसबुकसारख्या सामाजिक माध्यमांवर जी काही विकृत छायाचित्रं, व्हिडिओ अपलोड केले जातात ते माणसांना बघून त्यावर निर्णय घ्यावा लागतो. उद्या हे निर्णय पूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्ता घेईल. एका अर्थाने ते चांगलंच आहे, कारण त्यामुळे कन्टेन्ट मॉडरेटरला अशा छायाचित्रांमुळे जो मानसिक त्रास होतो त्याला आळा बसेल, पण त्याचबरोबर त्यांचा रोजगारदेखील नाहीसा होईल.

दुसरीकडे कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नव्या प्रकारची कामंदेखील निर्माण होतील; परंतु ती कृत्रिम बुद्धिमत्तेने प्रावीण्य न मिळवलेली, त्यामुळे खूप गुंतागुंतीची असतील. अशी क्लिष्ट कामं करणाऱ्यांना उच्च तंत्रज्ञानाचं कौशल्य आत्मसात असावं लागेल. ते अर्थातच मोजक्याच लोकांपुरतं मर्यादित असेल. अशा प्रकारे आज छोटी, सोपी कामं करणाऱ्या जगभरातील लाखो लोकांचा रोजगार कालांतराने हिरावला जाईल. त्यानंतर या लोकांचं भवितव्य काय असेल याचं उत्तर शोधावं लागणार आहे. लोकांना रोजगार पुरवण्याची किंवा युनिव्हर्सल बेसिक इन्कम देण्याची जबाबदारी शेवटी सरकारची असते. परंतु त्यासाठी देशात राजकीय आणि सामाजिक स्थैर्य टिकणं आवश्यक असतं आणि दुसरीकडे कृत्रिम बुद्धिमत्तेचाच चुकीचा वापर सामाजिक आणि राजकीय स्थैर्याला तडा देऊ शकतो. असा सगळा गुंता आणि पेच निर्माण होतो आहे.

...म्हशी चरायला घेऊन जाताना मोबाइलवर छोटी कामं पूर्ण करणारी मोमिता, उच्च शिक्षणाचं स्वप्न बघणारी चंद्रमा आज आनंदात आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेची छोटी कामं आज त्यांना जगण्याचा आधार पुरवत आहेत. मात्र उद्या त्यांचं काय होईल, आपल्या सर्वांचं काय होईल, याचा गंभीर विचार करणं आवश्यक झालं आहे.

(अनुभव, ऑगस्ट २०२५च्या अंकातून साभार)

key highlights-

In his article, Sukalp Karanjekar explores the downsides of the AI revolution, calling it a new colonialism. He explains how companies are using gig work to train AI, and this work often takes advantage of people in poorer countries. The author raises important questions about what the situation means for the future of jobs and social balance.

सुकल्प कारंजेकर







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results