आम्ही कोण?
वीकेंड स्पेशल 

जगाच्या पाठीवर भक्तीच्या वाऱ्या...

  • निरंजन घाटे
  • 26.07.26
  • वाचनवेळ 19 मि.
bhakteechya varya

वारी, तीर्थक्षेत्रांच्या यात्रा हा केवळ भारतीय मातीचा गुण आहे का? आयर्व्हिंग वॅलेस या लेखकाच्या ‘द मिरॅकल' नावाच्या कादंबरीत ‘द लुर्देस' या ख्रिश्चन तीर्थक्षेत्राच्या यात्रेबद्दल वाचल्याचं आठवत होतं. पण अखेर ती कादंबरी होती. लेखकाच्या कल्पनेचा त्यात विलास होता. खरं-खोटं यांची सीमारेषा अस्पष्ट होती. भारतात राहिलेल्या माणसाला देवाच्या नावच्या जत्रा, वाऱ्या, नवस फेडण्यासाठी केलेल्या यात्रा, वेगवेगळ्या परिक्रमा या नव्या नसतात. ज्यांच्यावर भारतीय संस्कृतीचा प्रभाव आहे त्या देशातही त्या आढळतात. त्यात आश्चर्य वाटण्याचंही कारण नव्हतं. पण मुख्यतः ख्रिश्चन संस्कृतीत अशा यात्रा असतात का, याची मी माहिती गोळा करत होतो. मागे एकदा एका मित्राच्या आजोबांच्या तोंडून ‘हज' यात्रेची हकीकत वाचली होती. अलीकडे त्यावर दूरचित्रवाणी कार्यक्रमही बघितले होते. लिऑन युरीसचं ‘द हज' हे पुस्तक वाचलं होतं. जगातला केवढा प्रचंड मानवी समुदाय केवळ श्रद्धेपोटी तिथे जमा होतो, हे वाचून, बघून चकित झालो होतो. माझ्या ओळखीच्या एका मुसलमान तरुणाला मी विचारलं, “तू का हजयात्रेस जात नाहीस?” तो म्हणाला, “इस्लाममध्ये कर्ज काढून यात्रेला जाणं योग्य मानत नाहीत. शेवटी सरकारी मदत घ्यायची म्हणजे तरी काय?” त्याचे हे विचार ऐकून मी थक्क झालो. तो पैसे साठवून साठवून स्वखर्चानश्र हजयात्रेस जाणार होता. अशी श्रद्धा हवी. 

ख्वाजा मोइनुद्दिन चिस्ती यांचा उरूस मी बघितलाय. पुष्करच्या मेळ्याला गेलोय. अर्धकुंभावर एक लेखही लिहिलाय. श्रद्धेचं कोडं काही सुटलेलं नाही. दरम्यान, दक्षिण अमेरिकेतील एका देशात ‘गुड फ्रायडे'च्या दिवशी लोक स्वतःला क्रुसावर चढवून घेतात हे वाचलं. ब्राझीलमधल्या इलायना बार्बोझावर लेख लिहिला. पावलो कोएल्लो या सध्या गाजत असलेल्या लेखकाच्या लेखनात १९८६ साली केलेल्या पदयात्रेचं वर्णन वाचलं. पावलो फ्रेंच सीमेपासून वायव्य स्पेनमधील सँटिएगो द काँपेस्तेलाच्या कॅथेड्रलपर्यंत पुराण्या यात्रामार्गाने चालत गेला होता. गोव्यात ‘एक्स्पोझिशन'च्या वेळी जमलेली गर्दी ही भारतीय मनोवृत्ती असावी, हा माझा समज इल्लायना बार्बोझा आणि पावलो कोएल्लो यांनी खोडून काढला.

१९८६पर्यंत दरवर्षी सुमारे साडेचारशे ते पाचशे माणसं ही पदयात्रा करत असत. आज सुमारे तेवढीच माणसं रोज ही पदयात्रा करताना दिसतात. बरं, यामागे कुणाचेही ‘मार्केटिंग एफर्ट्स' नाहीत, कसलीही जाहिरातबाजी नाही. २००७मध्ये सँटिएगो इथल्या रोमन कॅथॉलिक चर्चमध्ये १ लाख लोकांनी भेटी दिल्याच्या सह्या नोंदलेल्या आहेत. हे सर्व ७६४ कि.मी.ची मार्गक्रमणा करून आलेले होते. युरोपमधल्या अभ्यासकांच्या मते याच्या चौपट यात्रींनी इथे येऊन प्रार्थना केली असावी. याचं कारण साधारणपणे 

४-५ भक्तांपैकी एकजण अभ्यागत वहीत त्याच्या नावाची नोंद करतो. २००८मध्ये याहीपेक्षा जास्त यात्रेकरू इथे येतील असं दिसतं. जुलै आणि ऑगस्ट या युरोपीय उन्हाळ्यात इथे सर्वाधिक यात्रेकरू येत असतात. पिरनी पर्वतराजीतून घाटातल्या वळणावळणांच्या रस्त्यांवरून आणि पायवाटांवरचे दगड आणि काटे तुडवत हे यात्रेकरू येताना दिसतात. मध्यंतरी सर्दीने पछाडलेला एक ब्रिटिश यात्रेकरू या पदयात्रेत मरण पावला.

गॅलिशिया प्रांतातल्या टेकड्यांमधून जाणाऱ्या मार्गाला ‘कामिनो द सँटिएगो' म्हणजे ‘संत जेम्सची पाऊलवाट' असं म्हटलं जातं. इथे बऱ्याचदा इतकी गर्दी असते, की ही एखाद्या गावच्या आठवड्याच्या बाजाराची गर्दी आहे असं वाटावं. इथले यात्रेकरू फक्त युरोपातलेच असतात असंही नाही. इथे कसलाही भेदभाव पाळला जात नाही. गरीब, श्रीमंत असा भेद नाही की भाषाभेदही नाही. ऑस्ट्रेलिया ते अमेरिका अशा पाचही खंडांतल्या व्यक्ती आपल्याला इथे भेटू शकतात. काहीजण ही यात्रा चालत चालत पूर्ण करतात, काहीजण सायकलींवरून मार्गक्रमण करतात. याशिवाय घोड्यांवरून किंवा चाकाच्या खुर्च्यांचा वापर करून ही यात्रा करणाऱ्यांची संख्यासुद्धा कमी नाही. काहीजण सर्व यात्रा पायीच पूर्ण करतात. काहीजण थोडा रस्ता पायी चालतात आणि उरलेला मार्ग वाहनात बसून पार करतात. 

हे केवळ युरोपातच घडतंय असं नाही. जगभर अशा धार्मिक पदयात्रा सुरू झाल्या आहेत आणि मोठ्या संख्येने त्यात श्रद्धाळू सामील होत आहेत. फिल कुसिनॉ या लेखकाने ‘आर्ट ऑफ पिलग्रिमेज' नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे. तो म्हणतो, ‘गेली हजार वर्षं तरी माणसं तीर्थयात्रा करताहेत. त्यांचं वरवरचं ध्येय जरी एखादं पवित्र स्थळ असलं, तरी हा प्रवास आत्मशोधाचा असतो, आपण कोण हे जाणून घेण्याचा असतो. अशा तीर्थयात्रेत भाविक बनून वाटचाल करताना माणूस नकळत ढवळून निघतो आणि बदलतो. विसाव्या शतकात एकाएकी ह्या प्रथेचं झपाट्याने पुनरुत्थान व्हावं, यावरून माणसाला आध्यात्मिक आधाराची जोड हवी असतेच आणि त्याला आध्यात्मिक अनुभवाची ओढ असते हेच सिद्ध होतं.' तो पुढे म्हणतो, ‘ही सँटिएगोची वाट गेली ४००वर्षं निद्रिस्त होती. आज एकविसाव्या शतकाच्या पहाटे ती एकाएकी जागृत झाली.'

हेही वाचा - विठ्ठल विठ्ठल गाऊ रात्रंदिन...

ही जागृती व्हायला पावलो कोएल्लोसुद्धा कारणीभूत आहेतच. त्यांच्या ‘द पिलग्रिमेज' आणि ‘द अलकेमिस्ट'सारख्या प्रचंड खपाच्या पुस्तकांनी पाश्चात्त्य भौतिकवादाला आधिभौतिकाची जाणीव करून दिली. ही पुस्तकं कोट्यवधीच्या संख्येने खपली. त्यांची अनेक भाषांत भाषांतरं झाली. (एका अंदाजाप्रमाणे अधिकृत आणि अनधिकृत अनुवादांची संख्या पंचाहत्तरहून अधिक आहे). त्यांच्या मते माणूस पुन्हा खऱ्या नैतिक मूल्यांकडे वळू लागला आहे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या बाबींचं महत्त्व त्याला नव्याने पटू लागलं आहे, माणसामाणसांचे परस्परसंबंध महत्त्वाचे वाटू लागले आहेत. आयुष्याच्या वाटचालीत किरकोळ ओझं वाहणं योग्य नाही, याचीही जाणीव होऊ लागली आहे. यात्रेकरूंच्या डोळ्यांसमोर पंढरी किंवा सँटिएगो हे ध्येय असू देत, पण वाटचालीचा आनंद उपभोगायला शिकणं हेही तितकंच महत्त्वाचं असतं, हेही विसरून चालत नाही. जगात सर्वत्र हेच दिसतं. अनेक देशांतील पारंपरिक यात्रांना पुन्हा महत्त्व येऊ लागलं आहे. दरवर्षी काही कोटी व्यक्ती पायी चालत या धार्मिक पदयात्रा पूर्ण करताना दिसतात. दरवर्षी या वाऱ्यांसाठी नवनवी ठिकाणं निर्माण होतात, पदयात्रेचे नवे मार्ग अस्तित्वात येतात, जुन्या परंपरांना उजाळा मिळतो. बरं, या धार्मिक पदयात्रा किंवा वाऱ्यांसाठी धार्मिक किंवा सनातनी मंडळीच जातात असंही नाही, तर आजमितीस रस्त्याने चालताना वाटेत आलेल्या देवालासुद्धा ज्यांनी कधी हात जोडलेला नाही अशी माणसंही या पदयात्रा करताना आढळतात, तेव्हा त्यांना जवळून ओळखणाऱ्यांनासुद्धा आश्चर्याचा धक्का बसतो.

आजकाल दरवर्षी हजच्या यात्रेला २० लाखांहून अधिक मुस्लिम जातात. यात आता कॅनडा आणि अमेरिकेतील आफ्रिकन, अमेरिकन आणि काही गौरवर्णीय मुस्लिमही आढळतात. सौदी अरब राष्ट्राला शक्य असतं तर ह्या यात्रेत आणखीही यात्रेकरू त्यांनी सामील करून घेतले असते. गेल्या कुंभमेळ्याच्या वेळी अलाहाबादला जमलेली गर्दी इतकी प्रचंड होती की, ती अवकाश स्थानकातूनही लक्षात येत होती. दरवर्षी जगभरचे बौद्ध जसं जमेल तसं बोधिवृक्षाच्या दर्शनास येऊन जातातच, पण बुद्धाच्या जन्मस्थानाचं दर्शन व्हावं म्हणूनही धडपडत असतात. अनेक दिवस पाश्चात्त्य समाज याला मध्ययुगीन रानटी समजुतीचे अवशेष म्हणत असे; पण आता नव्या पिढीलाही धार्मिक यात्रेचं, तीर्थस्थळाला भेट देण्याचं आंतरिक महत्त्व वाटू लागल्यामुळे समाजशास्त्रज्ञ अशा तीर्थयात्रांचा अभ्यास करू लागले आहेत. 

हे नवे यात्रेकरू तरुण आहेत, स्वतंत्र बुद्धीचे आहेत, परंपरेवर विश्वास नसलेले आहेत. पारंपरिक धार्मिक समजुतींवर त्यांचा विश्वास नाही. त्यांच्यापैकी बरेचजण कधीच रविवारी साप्ताहिक सार्वजनिक प्रार्थनेसाठी चर्चमध्ये जात नाहीत किंवा त्यांच्या मृत आप्तांच्या स्मरणदिनी चर्चमध्ये मेणबत्त्या लावत नाहीत; पण तरीही ते या यात्रांच्या काळात शारीरिक त्रास सहन करतात, मोठ्या आशेने गुडघे टेकून लुर्देस या फ्रान्समधल्या तीर्थस्थानी प्रार्थना करतात किंवा पोर्तुगालमध्ये फातिमाच्या प्रतिमेपुढे गुडघे टेकून प्रार्थना करताना आढळतात. एकीकडे भक्तांची संख्या कमी झाल्यामुळे युरोप-अमेरिकेत चर्च ओस पडून हळूहळू बंद करावी लागत आहेत, त्याच वेळी अशा तीर्थक्षेत्रांकडचा गर्दीचा ओघ मात्र वाढतच चालला आहे. मुख्य म्हणजे त्यांना तीर्थस्थानाचं फारसं आकर्षण नसलं तरी तीर्थयात्रेला ते महत्त्व देतात.

या तीर्थयात्रेला येणारे काहीजण हौशी प्रवासी असतात हे मान्य करावंच लागतं. काहीजणांना आपण इतरांप्रमाणेच शरीरकष्ट सहन करण्यात मागे नाही, हेही सिद्ध करायचं असतं; पण हे तसे संख्येने थोडेच असतात. तीर्थयात्रेच्या सुरुवातीला असे वेगळ्या कारणांनी तीर्थयात्रेत सामील झालेले लोकसुद्धा ही तीर्थयात्रा संपवताना आध्यात्मिक समाधान मिळवून घरी परतताना आढळतात. एवढंच नव्हे, तर सश्रद्ध बनलेले ते पुन्हा यायचा निर्णयही जाहीर करतात. 

युरोपातील अशा तीर्थयात्रा क्रूसेड्स म्हणजे जिहादच्या काळात सुरू झाल्या. पण, अलीकडच्या काळात, म्हणजे दुसऱ्या महायुद्धोत्तर ३०-३५ वर्षांत या नव्या क्रूसेड्सना एक नवा अर्थ प्राप्त झाला होता, हेही विसरून चालणार नाही. स्टालिन सत्तेवर आल्यानंतर प्रथम काही पूर्व युरोपीय देश आणि दुसऱ्या महायुद्धानंतर जवळजवळ अर्धा युरोप रशियन जोखडाचं ओझं वाहत होता. साम्यवादी सरकारांनी जवळजवळ सर्व धार्मिक स्थळं सरकारजमा केली होती. त्या वेळी भाविक पोलंडमधील झेस्टोचोव्हाच्या व्हर्जिनच्या दर्शनाला, तसंच लिथुआनियातील ‘हिल ऑफ क्रॉसेस'च्या तीर्थयात्रेला जात होते. तिथे त्यांचा धर्म आणि त्यांचं राष्ट्रीयत्व या जाणिवांना उजाळा देऊन परतत होते. त्यामुळेच संधी मिळताच सोव्हिएत रशियाचं धार्मिक जोखड झुगारून पुढे त्यांनी पुन्हा त्यांच्या चर्चमध्ये गर्दी करायला आणि वाजत-गाजत तीर्थयात्रांना जायला सुरुवात केली.

आज युरोपमध्ये अशा अनेक तीर्थांचं आणि तीर्थक्षेत्रांचं पुनरुज्जीवन होत आहे. शासकीय पातळीवरून या तीर्थयात्रांना प्रोत्साहन मिळत आहे. गेली शेकडो वर्षं विस्मरणात गेलेले तीर्थयात्रांचे मार्ग आता परत शोधून त्यांना उजाळा देण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय सीमा या यात्रेकरूंसाठी खुल्या केल्या जात आहेत. यात धर्मसत्तेला राजसत्ता मदत करत आहेत, असं दृश्य दिसतंय. याचं कारण भारतात वेगवेगळी राज्यं असूनदेखील पारंपरिक तीर्थयात्रांनी धर्मभावना प्रबळ ठेवली आणि त्याचा परिणाम म्हणजे एकसंध भारताची निर्मिती झाली. धर्माच्या नावाने आजही या देशात फार मोठ्या प्रमाणावर समविचारी माणसं एकत्र येतात, हे उदाहरण युरोपच्या डोळ्यांसमोर आहेच. युरोपातदेखील देश आणि भाषा भारताप्रमाणेच अनेक आहेत, पण त्यांचा धर्म समाज-ख्रिश्चन आहे. युरोप काही करारांमुळं आर्थिक एकतेच्या मार्गावर चालला असला, तरी धर्माचं पुनरुज्जीवन कोणत्याही प्रकारे झालं तर युरोपियन युनियन खऱ्या अर्थाने एकसंध युनियन होईल याची त्यांना खात्री वाटते.

१९४९मध्ये युरोपातील ४६ देशांनी मिळून ‘द कौन्सिल ऑफ युरोप' नावाचा एक संघ स्थापन केला. ही संघटना १९८७नंतर अशा धार्मिक स्थळांचं आणि तीर्थयात्रांचं पुनरुत्थान करण्यासाठी धडपडत आहे. १९८७नंतर अनेक तीर्थयात्रांचं आयोजन करण्यात आणि मार्गदर्शिका तयार करण्यात या संघाने पुढाकार घेतला. या संस्थेने एखाद्या तीर्थयात्रेचा मार्ग ठरवला की त्या मार्गावरची गावं आणि नगरं त्यांच्या त्यांच्या देशाकडे आणि युरोपी संघराज्याकडे (युरोपियन युनियन) विकासनिधीसाठी अर्ज करतात. युरोपात आता बरेच मुस्लिम नागरिक असल्यामुळे त्यांच्यासाठी एक आणि ज्यूंसाठी एक अशा वेगळ्या तीर्थयात्रांचीही सोय करण्यात आली आहे. असं असलं, तरी प्रामुख्याने ख्रिश्चन युरोपमध्ये ख्रिश्चन संतांच्या नावे सर्वाधिक तीर्थयात्रा आयोजित करण्यात येतात, आणि त्या वाढण्याचीही शक्यता आहे.

हेही वाचा - भेदाभेद भ्रम अमंगळ

कॅथॉलिक धर्मसंस्थेने म्हणजे कॅथॉलिक चर्चने तीर्थयात्रांच्या पुनरुज्जीवनाचा धर्माच्या जाणिवेच्या प्रसारासाठी फायदा घ्यायचं ठरवलं आहे. प्रख्यात जर्मन कवी गोएथेचं एक वचन आहे : ‘युरोप वॉज बॉर्न इन पिलग्रिमेज अँड इट्स मदरटंग इज ख्रिश्चॅनिटी.' यात खोटं असं काही नाही. क्रूसेड्स सुरू झाल्यावर युरोपातले सर्व ख्रिश्चन एकत्र आले. जेरुसलेम आणि बेथेलहेम यांना तीर्थक्षेत्रं म्हणून युरोपीय दृष्टीने महत्त्व प्राप्त झालं. त्यामुळेच गोएथेनं हे वचन लिहिलं.

ऑपेरा रोमाना पेलेग्रिनागी या प्रमुख व्हॅटिकन ख्रिश्चन धर्मपीठाच्या तीर्थयात्रा शाखेचा प्रमुख फादर सीझर आत्युरे यांच्यावर या तीर्थयात्रांना व्यावहारिक वास्तवात आणण्याचं काम करावं लागतं. भारतात गेली हजारो वर्षं जे चालत आलं आहे ते आता फादर आत्युरे करतात. आधुनिक धर्मशाळा, यात्रेकरूंच्या जेवणाखाणाची, आरोग्याची व्यवस्था कमीत कमी खर्चात कशी पार पाडता येईल याचा ते सातत्याने पाठपुरावा करतात; पण ख्रिश्चन धर्मसंस्थेला या धार्मिक तीर्थयात्रांचा बाजार करायची इच्छा नाही, असं आत्युरे म्हणतात. पोप दुसरे जॉन पॉल यांना विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ यात्रेकरू असं म्हटलं जातं. ते जगात सर्वत्र ख्रिश्चन भाविकांना भेटण्याच्या निमित्ताने हिंडले. या प्रवासांना ते ‘पिलग्रिमेज' म्हणजे तीर्थयात्रा असंच म्हणत. ‘प्रवासी समुदाय' ही संकल्पना ख्रिश्चन जगात रुजवायचा त्यांचा संकल्प होता. बौद्ध, हिंदू आणि इस्लामी भाविक गेली कित्येक शतकं किंवा काही सहस्रकं तीर्थयात्रा करत आले आहेत. तीर्थयात्रा करण्याची नुसती कल्पनाच त्यांना धार्मिक प्रेरणा देत असते. मात्र, ख्रिश्चन जगाने हे प्रेरणादायित्व विसरून तीर्थयात्रांकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली, त्यामुळेच बऱ्याच मोठ्या प्रमाणावर धार्मिक अनास्था पसरली, असं त्यांचं मत होतं.

या म्हणण्याचं स्पष्टीकरण देताना आत्युरे म्हणतात- ‘युरोप-अमेरिकेत तीर्थयात्रांकडे दुर्लक्ष व्हायचं कारण त्या खेडवळपणाचं प्रतीक आहेत, असं उच्चभ्रू लोक मानू लागले. प्रोटेस्टंट ख्रिश्चनांनी, विशेषतः अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात, जिथे फार मोठ्या प्रमाणावर भाविक चर्चमध्ये जात होते, तिथेही तीर्थयात्रांकडे काहीशा संशयाने आणि बऱ्याचशा तुच्छतेने बघायला सुरुवात केली. तीर्थयात्रा करणं म्हणजे देवाने कृपा करावी म्हणून त्याच्याशी सौदा करण्याचा प्रकार आहे, अशा समजुतीमुळे प्रोटेस्टंट तीर्थयात्रेचं पावित्र्य आणि महत्त्व यांच्याकडे दुर्लक्ष करू लागले. पण देवावर श्रद्धा ठेवून, भेदभाव विसरून एकत्रित चालणं, हा एक सर्वस्वी वेगळा अनुभव असतो. तो स्वतःचा शोध घ्यायचा प्रयत्न असतो.'

१९८४मध्ये पोप दुसरे जॉन पॉल यांनी ‘वर्ल्ड यूथ डे' या महोत्सवास सुरुवात केली. हा महोत्सव दर तीन वर्षांनी साजरा होतो. २००५मध्ये जर्मनीतील कलोन येथे तो भरला होता. आता २००८मध्ये तो सिडने येथे भरणार आहे. हा महोत्सव कुठे साजरा झाला याहीपेक्षा नानाविध पंथांचे श्रद्धाळू भाविक एका स्थळी एका वेळी श्रद्धेपोटी हजारो कि.मी.ची वाटचाल करून एकत्र आले, हे इथे महत्त्वाचं ठरतं. मुख्य म्हणजे या तीर्थयात्रेत भाग घेणाऱ्या मंडळींतले बरेचजण तरुण होते. 

गेल्या काही दशकांत कॅथॉलिक पंथाने त्यांच्या धर्माचं महत्त्व पसरवण्यासाठी अशा तीर्थयात्रांचा वाढता वापर सुरू केला आहे. फादर आत्युरे हे मूळचे घानातले. इ. स. २००५पासून ते वीस ते पंचवीस उत्साही भाविकांसह लिबियातील वाळवंट ओलांडून सुदानमधील एल ओबेद या दार्फुरमधील धर्मस्थळापर्यंत जायची योजना आखत आहेत. इथे जोसेफाईन बाखिना या संत स्त्रीचे अवशेष पुरलेले आहेत. ही एक गुलाम स्त्री होती. तिला एकाएकी साक्षात्कार व्हायला लागले. ती इटालीत जाऊन जोगीण बनली. पुढे चर्चने तिला संतपद बहाल केलं. दार्फुर हा सुदानमधला एक अतिशय अस्थिर प्रांत आहे. तिथे यादवी युद्धाने हजारो बळी घेतले आहेत. अशा ठिकाणी यात्रेकरूंना न्यायच धाडस करण्यामागे एक कारण आहे. सुदान हे प्रामुख्याने एक इस्लामी राष्ट्र आहे. तिथे ख्रिश्चनांना वेचून मारलं गेलं. त्या ठिकाणी जायचा मार्ग निवडण्यामागेही एक कारण आहे. याच मार्गाने पूर्वी गुलामांना युरोपात नेलं जात असे आणि नंतरच्या काळात युरोपात जाण्याच्या इच्छेने जे त्यांचा देश सोडून पळ काढत असत तेही याच मार्गाने जात असत. त्यामुळेच हा मार्ग फादर आत्युरेंनी त्यांच्या तीर्थयात्रेसाठी निवडला. या मार्गावरून मानवी स्वातंत्र्य आणि शांतीचं प्रतीक म्हणून ते आणि त्यांचे २५ यात्रेकरू ही तीर्थयात्रा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहेत. सुदान सरकार ज्या वर्षी परवानगी देईल त्या वर्षीच्या ख्रिसमसच्या काळात ही तीर्थयात्रा पूर्ण करण्यात येणार आहे. 

गेली काही वर्षं यापेक्षाही मोठ्या संख्येनं युरोपातून अनेक ख्रिश्चन जथ्थे त्यांची यात्रा सुरू करतात. मजल-दरमजल करत ते ख्रिसमसच्या सुमारास जेरुसलेम आणि बेथेलहेमला पोहोचतात. तिथे ख्रिस्तजन्माचा सोहळा साजरा करून ते माघारी परततात. जेरुसलेम हे ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिमांच्या दृष्टीने एक अतिशय पवित्र तीर्थक्षेत्र आहे. तिथे एक प्रचंड मोठी सुरक्षा भिंत उभारण्यात आली आहे. पण त्यामुळेच प्रेरित होऊन ‘पाथ-वे सर्कल' नावाची एक संस्था ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिम यात्रेकरूंचा एकत्र जथ्था घेऊन इस्रायलमधील पवित्र स्थळांची पदयात्रा प्रतिवर्षी ख्रिसमसच्या काळात आयोजित करू लागली आहे. अशा तऱ्हेच्या वाऱ्यांमुळे परस्पर सामंजस्य वाढीस लागेल अशी अपेक्षा असली, तरी प्रत्यक्षात हे कितपत साध्य होईल याबद्दल आयोजक साशंकच आहेत; पण ही एक सुरुवात आहे असं ते मानतात. 

दक्षिण अमेरिकेत मेक्सिकोमध्ये दरवर्षी क्वेरेटासे येथून पंधरा दिवस चालणारी एक धार्मिक पदयात्रा निघते. ‘द व्हर्जिन ऑफ ग्वाडालूप' म्हणजे ग्वाडालूप येथील चर्चमधील मेरीच्या प्रतिमेच्या दर्शनासाठी ती निघते. या चर्चचे प्रमुख बिशप मारिओ द गास्पारिन म्हणतात, ‘ही यात्रा म्हणजे समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांतील ख्रिश्चनपंथीयांसाठी सहजीवनाची पाठशाळा ठरते. सर्वचजण कुठलाही भेदभाव न बाळगता चालत, एकत्रित वावरत ही वारी पूर्ण करतात. यातून परस्परांबद्दल प्रेम आणि आदर निर्माण होतो.'

या नव्या भाविकांना या पदयात्रांमधून निर्माण होणारा परस्परांबद्दलचा जिव्हाळा बंधुभाव आणि विश्वास या गोष्टी आकृष्ट करतात. त्यांनी गमावलेली श्रद्धेची भावना त्यांच्या मनात नव्याने निर्माण होते. या वाढत्या यात्रेकरूंपैकी निम्मेच यात्री श्रद्धा म्हणून या यात्रांमध्ये सामील होतात. उरलेले यात्रेकरू काही इतर कारणांनी सामील होतात, असं या यात्रांच्या पाहणीवरून दिसतं. यात अश्रद्ध आणि नास्तिकही असतात. रोजच्या धकाधकीच्या जीवनातील गळेकापू स्पर्धा त्यांना एकाएकी नकोशी वाटू लागते. मानवी जीवनातली भावनाशून्यता त्यांना उबग आणते. त्यावर उपाय म्हणून यातले काहीजण अवैध औषधंही सेवन करतात; पण त्यामुळं काही साध्य होत नाही, हे लक्षात आल्यावर ते या यात्रांकडे वळतात, असं सँटिएगो द काँपेस्तेलाच्या यात्रेकरूंच्या नोंदींच्या सांख्यिकी अभ्यासातून दिसून येतं. यातल्या दहा टक्के लोकांवर या यात्रेचा काहीच परिणाम जाणवत नाही. ते जरी सेंट जेम्सच्या अवशेषांचं दर्शन करतात, तरीही त्यांच्या हृदयातला भक्तीचा झरा पाझरू लागत नाही, असं या यात्रेकरूंच्या मुलाखतींवरून दिसलं, तरी याचाच अर्थ उरलेल्या सर्वांना या यात्रांमधून आध्यात्मिक समाधान लाभतं, असाही काढला जाऊ शकतो. दलाई लामांनी अमेरिकेतील प्रसिद्ध ‘टाइम' हे साप्ताहिक तसंच ‘सायकॉलॉजी टुडे' हे मासिक यांना प्रदीर्घ मुलाखती दिल्या आहेत. त्यात ते म्हणतात, ‘पिलग्रिमेज म्हणजे धार्मिक स्वरूपाच्या यात्रा किंवा वाऱ्या या परंपरेचा भाग आहेत. भारत आणि उत्तर आशियाई देशांत तो पुण्य जमवण्याचा एक मार्ग मानला जातो. धार्मिक यात्रा, सण आणि उत्सव, व्रतवैकल्यं मनापासून आणि श्रद्धेने पार पाडली तर पुण्य जमा होतं, त्यातूनच आत्मोन्नतीचा मार्ग सापडत असतो, अशी (आम्हा पौर्वात्यांची) श्रद्धा आहे. गौतम बुद्धाला शरण जाण्याने त्याच्या ठायी श्रद्धा ठेवून केलेली तीर्थयात्रा फलदायी ठरते.' 

हेही वाचा - दिंडी चालली पुढे, अर्ध्यात मी अडे

भारतातील इतर धर्मीयांच्या भावना वेगळ्या नसाव्यात. गेली सुमारे हजार वर्षं महाराष्ट्रात लोक पंढरपूरच्या जत्रेला जातात. त्या वारीबद्दल इतक्याजणांनी इतकं लिहून ठेवलंय की ते नव्याने पुन्हा सांगायची गरज नाही. ‘तीर्थ विठ्ठल। क्षेत्र विठ्ठल।' हा खऱ्या मराठी माणसाचा नाराच आहे; पण त्याशिवाय इतरही अनेक यात्रा महाराष्ट्रात सातत्याने निघत असतात. विठोबा, खंडोबा, म्हसोबा झालेच, पण तुळजापूरसह इतर अनेक देवस्थानं, अलीकडच्या पालख्या म्हणजे गजानन महाराज, स्वामी समर्थ वगैरे या आपण पाहतो. संपूर्ण भारतावर नजर टाकली तर अशा हजारो स्थानिक यात्रा आढळतात. कुंभमेळा तर सर्वांना ठाऊक आहे. प्रयाग आहे, पुष्कर आहे, पण त्याचबरोबर अनेक पीर आणि दर्गेही आहेत. ख्वाजा मोइनुद्दिन चिस्तीच्या दर्ग्याला जगभरचे भारतीय सर्वधर्मीय भाविक जातात. अशी किती तरी उदाहरणं आहेत. अलीकडे अनेक युरोपीय व दक्षिण अमेरिकेतील प्रायोजित यात्रेकरू या तीर्थयात्रांत सहभागी होऊन त्या त्या यात्रांचा अभ्यास करताना आढळतात.

वारकरी संप्रदायाला पाश्चात्त्यांच्या दृष्टीने एवढं महत्त्व यायचं कारण काय, या बाबीचा आपण एक उदाहरण म्हणून विचार करू या, म्हणजे पाश्चात्त्यांना भारतातील विविध तीर्थक्षेत्रांवर भरणाऱ्या मेळ्यांचं आणि तीर्थयात्रांचं महत्त्व का वाटतं हे थोडंफार स्पष्ट होईल. वारकरी आणि पंढरीची वारी ही एक एकमेवाद्वितीय घटना आहे, असं म्हटलं तर ते अतिशयोक्त ठरू नये. याचं कारण गेली ६ ते ७ शतकं एकाच घरातली अनेक माणसं वर्षानुवर्षं आणि पिढ्यान् पिढ्या विशिष्ट कालावधीमध्ये या यात्रेला येतात. असं इतरत्र कुठे घडत नाही. चारधाम किंवा अमरनाथच्या यात्रेला माणूस एकदाच जाऊन येतो. याउलट, पंढरपूरला तो प्रतिवर्षी जात असतो. या ऋतूत किंवा वारीच्या काळात महाराष्ट्र आणि कनार्टकाच्या काही भागांतून भजनं म्हणत चालत चालत बाया-बापडे डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन निघतात. आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहोचून विठ्ठलाच्या पायावर कसंबसं डोकं टेकवून परततात. चंद्रभागेचं स्नान आणि विठ्ठलाचं दर्शन याने कृतकृत्य होऊन घरी परततात. पाश्चात्त्य देशांत प्रचार करूनसुद्धा असं घडत नाही. तीच तीच माणसं दरवर्षी यात्रेला येत नाहीत. त्यामुळे पाश्चात्त्यांना हा चमत्कार अभ्यासावासा वाटतो. वारकरी निष्काम कर्मयोग समजून ही वारी करतात. बऱ्याच पाश्चात्त्य तीर्थक्षेत्रांबद्दल त्या यात्रेची फलश्रुती चमत्काराची असते. लुळेपांगळे चालायला लागतात, कर्करोग बरा होतो, वगैरे चमत्कार लुर्देस या फ्रान्समधील तीर्थक्षेत्राशी जोडलेले आहेत. आपल्याकडे गणपती दूध पितो म्हटल्यावर त्या अफवेचं दोन दिवसांत निराकरण होतं. युरोपात मेरीच्या डोळ्यांतून रक्त वाहतंय, या बातमीने एक नवं तीर्थक्षेत्र तयार होतं. 

महाराष्ट्रात मुसलमानी अम्मल असतानादेखील या वारकऱ्यांनी वारीच्या माध्यमातून भागवतधर्म टिकवून धरला. या सात-आठ शतकांच्या वाटचालीत अतिवृष्टी आणि दुष्काळासह अनेक संकटं पचवून वारीचं एक व्यवस्थापन तंत्र निर्माण झालं. ते कुणी प्राध्यापक किंवा विचारवंताने निर्माण केलेलं व्यवस्थापन तंत्र नव्हतं, तर अनुभवनिष्ठ, ज्याला इंग्रजीत ‘हँड्स ऑन एक्स्पीरियन्स' म्हणतात त्यातून निर्माण झालेलं तंत्र होतं. रोज किती चालायचं, मुक्कामाचे पडाव केव्हा आणि कसे गाठायचे, तिथली खाण्यापिण्याची सोय, अशा बाबींच्या पद्धती तयार झाल्या. त्या त्या गावच्या वैद्यराजांनी शुश्रूषेची व्यवस्था निर्माण केली. वारकऱ्यांच्या अनेक पिढ्या केवळ श्रद्धेच्या जोरावर आणि वैद्यराजांची चाटणं आणि काढ्यांवर वेगवेगळ्या साथींना तोंड देत चालत राहिल्या. त्या साथीतून ‘वैद्यो नारायणो हरि:।' म्हणत तरलेल्यांची रोगप्रतिकारक शक्ती हाही एक संशोधनाचा विषय व्हावा. आता वारकरी लसी टोचून घेऊन वारीस निघतात. असं असलं, तरी शारीरिक श्रम आणि हवामानातील बदल सुसह्य करणाऱ्या कोणत्याही लसी आणि औषधांची निर्मिती अजून तयार झालेली नाही, हे लक्षात ठेवायला हवं. आजही सर्दी, पडसं आणि काही विषाणुजन्य आजारांवर लसी नाहीत. त्यांना वारकरी विठ्ठलावरील श्रद्धेच्या साहाय्याने तोंड देतात. 

एका प्रकारे वारी हे एक ‘सार्वजनिक वेड' (किंवा मास हिस्टेरिया) असतं, असं स्पष्टीकरण या बाबतीत आपण देऊ शकतो. वारी चुकली तर पाप लागेल, असं कुणी म्हटलेलं नाही. उलट, सर्वच संत ‘भाव तेथे देव' असं म्हणत आले आहेत. आई-वडिलांची सेवा करताना भेटीस आलेल्या विठ्ठलाला उभं राहण्यासाठी वीट टाकणाऱ्या पुंडलिकाचा आदर्श सर्व वारकरी ठेवतात; पण आषाढाची चाहूल लागली रे लागली की वारीच्या तयारीला लागतात. यामागच्या प्रेरणेचा अभ्यास व्हायला हवा. त्या अभ्यासातून जे हाती लागेल त्यातून पुढच्या पिढीला ध्येयासक्ती शिकवणं शक्य होईल. वारकऱ्यांचं दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे माळकऱ्याने एकदा माळ घातली की किमान चातुर्मासात तरी तो मद्यमांस त्याज्य मानतो. हा मानसिक संयम कसा प्राप्त होतो? ईश्वरनिष्ठा हेच त्याचं कारण असेल, तर व्यसनमुक्ती केंद्रात ईश्वरनिष्ठा वापरता येईल का, याचाही विचार व्हायला हवा. 

वारीच्या काळात एवढ्या मोठ्या संख्येने एक प्रकारचं स्थानिक स्थलांतरण घडतं. मुक्कामाच्या ठिकाणी घडणाऱ्या किरकोळ चोऱ्या वगळता वारीच्या काळात कुठलाही मोठा गुन्हा घडत नाही, हेही आश्चर्यकारक मानावं लागतं. वारीत हौशे, नवशे आणि गवशे असतात असं म्हटलं जातं. या गवशांचं प्रमाण एकूण जनसमूहाच्या प्रमाणात अत्यल्प असतं. यामुळे वारीचा समाजशास्त्रीय अभ्यास व्हायला हवा असं वाटतं. याचं कारण विठ्ठल हा काही धाक दाखवणारा देव नाही. तो प्रेमळ पित्यासारखा आहे. ‘कानडा विठ्ठलू' असा हा देव वारकऱ्याला मानसिक शांती आणि समाधान मिळवून देतो. 

एकविसाव्या शतकात हा मुद्दा फार महत्त्वाचा ठरणार आहे. सतत मानसिक तणाव आणि गळेकापू स्पर्धा यामुळे मानसिक वैगुण्याने पछाडत चाललेली पुढची पिढी वेगवेगळ्या व्यसनांचा आश्रय मानसिक शांती मिळावी म्हणून घेते. ‘सर्वे गुण: कांचनमाश्रयंती' हे आपल्या पूर्वजांनी म्हणून ठेवलंय. अलीकडच्या भाषेत बोलायचं, तर ही पिढी २४७ आपली बुद्धी, शारीरिक क्षमता आणि मानसिक शांती एक तारखेला मिळणाऱ्या लठ्ठ पगारासाठी गहाण टाकते आणि मग ‘स्ट्रेस बस्टर्स' म्हणून कुठल्या तरी ‘पॅकेज टूर'ला जाते. तिथेसुद्धा आपल्या पश्चात आपल्या नोकरीचं काय झालं असेल याची काळजी करत सुट्टी घालवते. 

बऱ्याच बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये प्रत्येक सेवकावर कामाचा बोजा किती, त्यामुळे त्याच्या मनावर पडणारा ताण किती, असा हिशोब करून सर्व महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींना आणि इतरांनाही सक्तीने मनोविनोदनासाठी काही काळ सुट्टी घेऊन कंपनीच्या खर्चाने एखाद्या सहलीला पाठविण्यात येतं. 

या मंडळींचं जर वारीकडं लक्ष गेलं नि तिथली संघभावना, मानसिक ताण कमी करण्याची क्षमता आदी बाबी या मंडळींच्या लक्षात आल्या, तर या कंपन्या कदाचित वारी प्रायोजित करू लागतील असा एक अंदाज. वारीत तणावमुक्तता मिळते. तणावमुक्त अधिकारी अधिक कार्यक्षमतेने काम करतो. वारीत श्रद्धा आणि निष्ठा या दोन गुणांची जोपासना होते. कामावर श्रद्धा आणि कंपनीवर निष्ठा असलेली माणसं जर अशा एखाद्या उपक्रमामुळे तयार होत असतील तर या कंपन्यांना वारीचा अभ्यास करण्यात पैसे खर्च करणं ही गुंतवणूक वाटू शकेल. 

लहान वयात लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या करताना सामाजिक भान सुटलेली आणि निरनिराळ्या व्यसनांच्या आहारी गेलेली तरुण-तरुणींची टोळकी जागोजागी पाहायला मिळतात. त्यांना वारीच्या मार्गाला लावलं तर ती अधिक कार्यक्षमतेने कार्य करतील, हा फायदा ज्याला आजकाल ‘मानवी संसाधन' (ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट) म्हणतात त्या दृष्टीने फार मोठा ठरेल. 

पंढरपूरच्या वारीत येणारे पाश्चात्त्य हे सगळं टिपत असतात. हे सर्व चर्चच्या अधिकाऱ्यांपर्यंतही पोहोचत असतंच. त्या मंडळींनी केलेला वारीचा अभ्यास कदाचित आता प्रसिद्धीच्या मार्गावरही असेल. त्यांनी तो प्रसिद्ध करण्याच्या आधीच जर भारतीय संशोधकांनी वारीचा साकल्याने अभ्यास केला तर ते नक्कीच महत्त्वाचं आणि उपयुक्त ठरेल. 

(अनुभव, जुलै २००८)

निरंजन घाटे







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results