शाळेत असताना एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला ‘एकविसावं शतक हे विज्ञानाचं आणि माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे’ असं म्हटलं जात होतं. शाळेत आणि महाविद्यालयात या विषयावर व्याख्यानं आणि वक्तृत्व स्पर्धाही आयोजित केल्या जात होत्या. अलीकडे मात्र हे शतक विज्ञानाचं नसून अज्ञानाचं आहे की काय असं वाटतंय. माहिती तंत्रज्ञानाचा नुसता प्रसार नाही झालेला, तर त्या पलीकडे जाऊन त्याचा स्फोट झाला आहे. नदीला पूर यावा त्याप्रमाणे माहितीचा महापूर दररोज लोकांच्या टीव्हीवर, मोबाइलवर येतो आहे. आलेली माहिती खरी आहे की खोटी आहे हे समजून घेण्यासाठी जी विवेकबुद्धी, चौकसबुद्धी आणि चिकित्सकबुद्धी पाहिजे तिचा अभाव आहे. त्यामुळेच खोटी, फसवी माहिती सहज पसरवली जाते. या सगळ्या प्रकारच्या माहितीतून अज्ञानाचाच प्रसार होतो आहे. तशा तर अनेक प्रकारच्या अज्ञानाचा प्रसार केला जातो, पण त्यापैकी तीन मुद्द्यांची मी या लेखात चर्चा करणार आहे. ही सगळी चर्चा माझ्या अनुभवावर आणि निरीक्षणावर आधारित आहे. त्यामुळे कदाचित त्याला काही मर्यादा येऊ शकतात. कारण जीवनानुभव महत्त्वाचा असला तरी तो प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. त्यामुळे माझाच अनुभव अस्सल आणि इतरांचा कमअस्सल, असा दावा मी करणार नाही.
रंगीबेरंगी क्वीअर दुनियेचे ताणेबाणे
काही वर्षांपूर्वी माझ्या एका लेस्बियन विद्यार्थिनीने मला सांगितलं होतं, की ‘आपल्याला जेवढं माहिती आहे त्यापेक्षा जग किती तरी जास्त क्वीअर आहे.’ दुसरी एक विद्यार्थिनी वर्गात चर्चा करताना म्हणाली, की ‘भविष्यात सगळेच लोक बायसेक्शुअल होतील.’ विद्यार्थिनींच्या या दोन्ही मुद्द्यांनी मला विचार करायला भाग पाडलं. दहा-पंधरा वर्षांपूर्वीही समलैंगिकता किंवा भिन्न लैंगिक ओळख असणाऱ्या लोकांविषयी बोललं जात होतं, मात्र त्याला म्हणावी तशी प्रसिद्धी मिळत नव्हती. तसंच, भिन्न लैंगिक समूहांविषयी म्हणावी तशी माहितीही समाजाला नव्हती. त्यामुळे काही साचेबद्ध धारणा पसरल्या होत्या. मात्र, मागच्या काही वर्षांमध्ये बराच बदल होताना दिसतो आहे. अनेक शहरांमध्ये सन्मान यात्रा (प्राइड परेड) काढल्या जातात. त्यामध्ये स्ट्रेट लोकही सहभागी होतात. भिन्न लैंगिक समूहांतील मुला-मुलींच्या पालकांच्या दृष्टिकोनांतही काहीसा बदल होताना दिसतो आहे. शासन-प्रशासन यांच्या पातळीवरही त्यांची दखल घेतली जात आहे. महाराष्ट्र निवडणूक आयोग, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यांनी भिन्न लैंगिक ओळख असलेल्या आणि पारलिंगी लोकांसोबत कार्यक्रम आयोजित केले हा त्यापैकीच एक सकारात्मक बदल आहे. तसंच, चित्रपट आणि साहित्यामध्येही त्यांचं चांगलं चित्रण होत आहे.
मागील दशकभरात सामाजिक चर्चाविश्व बदलत गेलं, तशीच माझी याविषयीची भूमिकासुद्धा बदलत गेली. दहा वर्षांपूर्वी ‘भिन्न लैंगिक ओळख असलेल्या लोकांच्या हक्कांच्या बाजूने तू आहेस का?’ असा मला कोणी प्रश्न केला असता, तर तेव्हाही न संकोचता ‘मी त्यांच्या बाजूचा आहे’ असंच म्हटलं असतं. मात्र, ‘तू क्वीअर आहेस का?’ असं कोणी म्हणालं असतं तर मी ‘नाही’ म्हणालो असतो. कारण त्या वेळी माझं लैंगिक नीतिमत्तेबद्दलचं आकलन चौकटबद्ध आणि साचेबद्ध होतं. मात्र मागील दहा वर्षांच्या लैंगिकता, क्वीअर, जेंडर, स्त्री-पुरुष मैत्री यांच्या अभ्यासाने त्यामध्ये बराच बदल झाला आहे. बहुतेक सगळेच लोक कमी-अधिक प्रमाणात क्वीअर असतात. काही प्रत्यक्ष आचरण करतात, काहींना ते शक्य होत नाही म्हणून ते फक्त कल्पनाविश्वात रमतात. क्वीअर असणं म्हणजे बहुरंगी असणं, काळ्या-पांढऱ्यात न अडकणं, बायनरीच्या पलीकडे जाणं असेल, अनेकवचनी असणं असेल तर मीही समलैंगिक पुरुष नसतानाही क्वीअर आहे, असं मी अलीकडे ठामपणे म्हणू शकतो. काही वर्षांपूर्वी ‘पुरुष उवाच’च्या दिवाळी अंकामध्ये मी याच विषयावर ‘मी वाममार्गी पुरुष आहे’ या शीर्षकाचा लेख लिहिला होता.
हेही वाचा - समलिंगी व्यवहार ही ‘विकृती' कशी?
क्वीअर समूहातील मंडळींच्या संदर्भात बहुतेक वेळा लैंगिक चर्चा अधिक केल्या जातात. परंतु लैंगिक मुद्द्यांच्या सोबतच सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय असेही अनेक प्रश्न या समुदायातील लोकांचं आयुष्य घडवत असतात.
एकीकडे काही सकारात्मक गोष्टी होत असतानाच दुसरीकडे क्वीअर लोकांमधील ताणेबाणेही जगजाहीर होऊ लागले आहेत. हा समूहही एकंदर समाजाप्रमाणेच एकसाची नाही, त्यातही अनेक प्रकारचे लोक आहेत. त्यांना सगळ्यांना एकाच मापात मोजणं योग्य होणार नाही, हे अलीकडे ठळकपणे दिसून येत आहे. दलित आणि मुस्लिम समलैंगिक पुरुषांना या समलैंगिक पुरुषांच्या वर्तुळात वगळलं जाण्याची बरीच उदाहरणं आहेत. तसेच, समलैंगिक स्त्रिया आणि समलैंगिक पुरुष यांच्यातही काही ताणतणाव दिसतात. बरेच समलैंगिक लोक हे उभयलिंगी लोकांकडे साशंकपणे पाहतात, असंही उभयलिंगी लोकांचं म्हणणं आहे. संस्कृती आणि धर्म यावरूनही क्वीअर लोकांमध्ये तणाव असल्याचं दिसून येतं.
या समूहांमध्ये महत्त्वाचा गट म्हणजे पारलिंगी समूहाचा. त्याला हिजडा-किन्नर म्हणूनही पारंपरिकपणे ओळखलं जातं. त्यांची संस्कृती संमिश्र स्वरूपाची होती. हिंदुधर्मीय देवता आणि इस्लामधर्मीय परंपरा अशा एकत्रितपणे या समूहामध्ये पाळल्या जात होत्या. मात्र, मागील काही वर्षांमध्ये पारलिंगी/हिजडा/किन्नर समूहाचं ‘हिंदुत्वीकरण’ करण्याचा प्रयत्नही मोठ्या प्रमाणात होतो आहे. अलीकडेच भाजपने पुण्यात केलेल्या काही आंदोलनांमध्ये पारलिंगी/ हिजडा/किन्नर समूहातील काही लोकांचा सहभाग दिसून आला. काही वर्षांपूर्वी लक्ष्मी त्रिपाठी यांनी कुंभमेळ्यामध्ये स्वतःचा आखाडा स्थापन केला होता. त्या आखाड्यात नंतर अनेक वादही झाले, ती वेगळीच गोष्ट.
पारलिंगी/हिजडा समूहाच्या हिंदुत्वीकरणासोबतच इतर भिन्न लैंगिक ओळख असलेल्या मंडळींचाही हिंदुत्ववादी राजकारणात सहभाग वाढला आहे, असं अलीकडे दिसून येत आहे. दीर्घकाळापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका ही भिन्न लैंगिक ओळख असलेल्या लोकांच्या विरुद्ध होती. मात्र, अलीकडे त्यांचे या समूहासंदर्भातील धोरण आणि डावपेच बदललेले दिसतात. पण अजूनही मोठ्या हिंदुत्ववादी वर्तुळात याविषयी स्पष्टता नाही. कारण, एकीकडे ‘समलैंगिकता ही विकृती आहे, ती पाश्चिमात्य संस्कृतीचं अपत्य आहे, तिच्यामुळे भारतीय संस्कृती भ्रष्ट आणि खराब होत आहे’, असं म्हटलं जातं. तर दुसरीकडे, ‘भारतीय संस्कृतीत तृतीय प्रकृती आहे, आम्ही कधीही समलैंगिक समूहाला वगळलं नव्हतं, मुस्लिम आणि ख्रिस्ती लोक इकडे आले आणि त्यांनी तसं करायला सुरुवात केली’, असंही म्हटलं जातं. त्यामुळे हिंदुत्ववादी वर्तुळात यावरून बराच गोंधळ आहे असंच म्हणावं लागेल. तथाकथित पुरोगामी मंडळीही हिंदुत्ववादी लोकांपेक्षा या बाबतीत काही फार वेगळी नाहीत असंच दिसतं. कारण सामाजिक, धार्मिक बाबतीत पुरोगामी असलेली बरीच मंडळी क्वीअर संकल्पनांच्या बाबतीत सनातनी आणि परंपरावादीच असल्याचं अनेक उदाहरणांवरून दिसून येतं. उदाहरणार्थ, संघाच्या लोकांवर टीका करताना तथाकथित पुरोगामी लोकांनी ‘संघ हा समलैंगिक लोकांची संघटना आहे’ असं म्हटलेलं आहे. यावरून लैंगिक बाबतीत त्यांचा दृष्टीकोन अजूनही संकुचित असल्याचं दिसून येतं.
हेही वाचा - प्रेमळ नातेसंबंधांची हळवी बाजू दाखवणारा - साबर बोंडं
समलैंगिक संबंध हे नैसर्गिक आहेत हे अलीकडच्या अनेक वैज्ञानिक संशोधनांनी दाखवून दिलं आहे. भारतात तर या संदर्भात अनेक ऐतिहासिक पुरावेही आहेत. बऱ्याच पुस्तकांमध्ये आणि लेणी, मंदिरं यांच्यावरील मैथुनशिल्पांमध्ये समलैंगिक कामक्रीडा दाखवल्या आहेत. मात्र, अजूनही आपली लैंगिक नीतिमत्ता सार्वजनिक पातळीवर मोठ्या प्रमाणात संकुचितच राहिलेली दिसते. कारण त्यामध्ये भिन्न भिन्न प्रकारच्या लैंगिक ओळखींचा, लैंगिक वर्तनव्यवहारांचा आणि लैंगिक कल असलेल्या मंडळींचा समावेश केला गेलेला नाही.
वैचारिक साम्राज्यवाद आणि मनाचं निर्वसाहतीकरण
मागच्या पाच-सहा वर्षांत आपल्या देशात निर्वसाहतीकरण (डीकोलोनायझेशन) या संकल्पनेची वर्तमानपत्रांपासून सरकारी प्रचारयंत्रणेपर्यंत आणि टीव्ही कार्यक्रमापासून ते साहित्य वर्तुळापर्यंत चर्चा होताना दिसते आहे. हल्लीचं सरकार रस्त्यांची, वास्तूंची, योजनांची आणि कायद्यांची नावं बदलून ‘आम्ही निर्वसाहतीकरण करत आहोत’, असा प्रचार करत आहे. मात्र, ते निर्वसाहतीकरण या संकल्पनेचा मूळ अर्थ समजून घेत नाहीत असंच दिसतं. पूर्वीच्या साम्राज्यवादी लोकांची बदनामी करून स्वत:च्या देशाचं गौरवीकरण करणं याला निर्वसाहतीकरण म्हणत नाहीत. त्याला जास्तीत जास्तीत राष्ट्रवादीकरण म्हणू शकतो. राष्ट्रवाद आणि निर्वसाहतवाद यामध्ये गुणात्मक आणि मूल्यात्मक फरक आहे. अलीकडच्या काळात आपल्या देशात आणि इतर देशांमध्येही निर्वसाहतीकरणाच्या नावाखाली संकुचित राष्ट्रवादी भूमिका घेऊन वसाहतकाळात निर्माण झालेल्या गोष्टींचं पुनरुत्पादन केलं जात आहे.
वसाहतवादाचं संपूर्ण तत्त्वज्ञान हे मॅनिकियन तर्कावर आधारित होतं. त्यामध्ये समाजाची दोन कप्प्यांमध्ये विभागणी केली जात होती. वसाहतवादी सरकार आणि त्यांचे लोक हे सुसंस्कृत, चांगले आणि उर्वरित जनता वाईट, असंस्कृत अशी ती विभागणी असायची. अलीकडच्या काळात राष्ट्रवादाच्या नावाखाली समाजामध्ये अशीच कप्पेबंद विभागणी केली जात आहे. जो सरकारशी सहमत आहे, जो सरकारच्या बाजूचा आहे, तो राष्ट्रवादी, चांगला आणि राष्ट्रहित जोपासणारा. याउलट, जे सरकारशी सहमत नाहीत, सरकारशी मतभेद नोंदवतात किंवा सरकारवर टीका करतात ते वाईट, देशद्रोही असंच म्हटलं जातं. वसाहतवादी राजवटीत स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या लोकांना बदनाम केलं जात होतं, त्याच चालीवर अलीकडच्या काळात स्वतःला कट्टर राष्ट्रवादी म्हणवून घेणारी जगभरातील सरकारं आणि त्यांची भक्त-अनुयायी मंडळी ही विरोधकांना बदनाम करत असतात. एका अर्थाने समाजाला कप्पेबंद करण्याचा वसाहतवादी कित्ता राष्ट्रवादी सरकारं उत्तरवासाहतिक काळात गिरवत आहेत. म्हणूनच निर्वसाहतीकरणाची सखोल आणि चिकित्सक चर्चा करणं महत्त्वाचं वाटतं.
माझ्या व्यक्तिगत आयुष्यातही बराच काळ माझी विचार करण्याची पद्धत ही कप्पेबंद स्वरूपाची होती. साचेबद्ध पद्धतीने विचार करत असल्यामुळे त्यामध्ये अनेक प्रकारचे पूर्वग्रह होते. मागील पाच-सहा वर्षांत निर्वसाहतीकरणविषयक लिखाण वाचून समजून घेतल्यामुळे त्यातून काहीसा मुक्त होण्याचा प्रवास सुरू झाला आहे. अलीकडे मला असंही वाटतं, की नुसतं रीथिंकिंग करून चालणार नाही, तर काही वेळा आपल्याला थिकिंगचं अनथिकिंग सुद्धा करावं लागतं. म्हणजे एका बाजूचा दुसऱ्या बाजूने विचार करू नये, असं नसून आपल्याला ठरवून दिलेल्या कोणत्याही बाजूने विचार करू नये. उदा. मुसलमान वाईट आहे, असं कोणी म्हटलं, की आपण मुसलमान चांगले आहेत असं म्हणतो. त्यातून आपल्याला वाटतं, की आपण त्यांचा मुद्दा खोडून काढत आहोत. मात्र, मुसलमानांना केंद्रस्थानी ठेवून चर्चा घडवून आणण्यात त्यांचा फायदा आहे, हे आपण ओळखतच नाही. याचाच अर्थ असाही आहे, की त्यांनी ठरवून दिलेल्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा आपणच आपले मुद्दे ठरवले पाहिजेत. हे सगळं वैचारिक दास्यत्वाच्या चौकटी मोडल्याशिवाय होणार नाही असं माझं अनुभवांती मत बनलं आहे.
सय्यद हुसैन अलातास या मलेशियन समाजशास्त्रज्ञाने ‘वैचारिक साम्राज्यवाद’ अशी संकल्पना विकसित केली आहे. त्या माध्यमातून त्यांनी, वसाहतवाद हा फक्त राजकीय साम्राज्यवाद किंवा आर्थिक साम्राज्यवाद नव्हता तर तो एक वैचारिक साम्राज्यवादही होता हे दाखवून दिलं आहे. साम्राज्यवादाची काही गुणवैशिष्ट्यं आहेत. शोषण- सत्तेच्या माध्यमातून लोकांचं शोषण केलं जातं आणि त्यांना नियंत्रित केलं जातं. एकपालकत्वाची व्यवस्था- साम्राज्यवादी व्यवस्थेत सत्ताधारी हे पालकाच्या भूमिकेत असतात आणि त्या पद्धतीने ते आपलं वर्चस्व वासाहतिक समाजावर लादत असतात. ते काही गोष्टी शिकवतात, ते काही गोष्टी करायला सांगतात. वासाहतिक सत्तेने निर्माण केलेल्या गोष्टींशी ते बांधील असतात. जुळवून घेणं- वासाहतिक समाजातील लोकांनी वासाहतिक सत्ताधीशांच्या जीवन, संरचना आणि नियम यांच्याशी जुळवून घेतलं पाहिजे, अशी वासाहतिक सत्तेची अपेक्षा असते. साम्राज्यवादाची नैतिक अधिमान्यता- यामध्ये वसाहतवादी लोकांकडून साम्राज्यवाद हा कसा वासाहतिक लोकांच्या हितासाठी, त्यांना संस्कारी करण्यासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला जातो. साम्राज्यवादी सत्ताधीश- वासाहतिक समाजांमध्ये अधिकारी म्हणून अनेकदा निकृष्ट दर्जाचे अधिकारी पाठवले जात असत. या संदर्भात सय्यद हुसैन अलातास म्हणतात, की एकदा एक वासाहतिक अधिकारी म्हणाला होता, की वसाहतींमध्ये जे लोक अधिकारी म्हणून येतात ते इंग्लंडमधील ब्रिटिश समाजातील उत्कृष्ट लोक नसतात. ज्यांना इंग्लंडमध्ये नोकरी मिळत नाही ते लोक नोकरी करण्यासाठी वसाहतींमध्ये येतात.
हेही वाचा - असंतोष असलेल्या सर्व देशांतली सरकारं अमेरिका बरखास्त करणार आहे काय?
ही साम्राज्यवादाची गुणवैशिष्ट्यं आहेत. साम्राज्यवाद हा नुसता राजकीय, आर्थिक आणि सामाजिक नाहीय तर वैचारिकही आहे, हे यातून स्पष्ट दिसतं. वैचारिक साम्राज्यवाद म्हणजे ‘काही ठराविक लोकांचं दुसऱ्यांच्या विचारविश्वावर वर्चस्व असणं’. म्हणूनच वैचारिक साम्राज्यवाद हा साम्राज्यवादाचा थेट परिणाम आहे.
साम्राज्यवादी राजकीय व्यवस्थेत वासाहतिक समाजातील एक मोठा समूह साम्राज्यवादी सत्तेचं श्रेष्ठत्व स्वीकारत असतो. त्यांना असं वाटतं, की पश्चिमेकडूनच योग्य ज्ञान येऊ शकतं, त्यांच्याकडेच चांगली पुस्तकं लिहिली जातात. जे पश्चिमी अर्थशास्त्रज्ञांचं वाचतात ते आशियाई अर्थशास्त्रज्ञ मंडळींचे विचार समजून घेण्याची तसदीही घेत नाहीत. जे पश्चिमी राज्यशास्त्राचा अभ्यास करतात ते आशियाई राजकीय विचारवंताचं योगदान पाहतही नाहीत. पश्चिमी इतिहास आणि तत्त्वज्ञान अभ्यासणारे लोक हे आशियाई लोक आपल्या इतिहासाची कल्पना कशी करतात आणि तत्त्वज्ञानातून शहाणपण कसं शिकतात हेही पाहत नाहीत. आशियाई वैचारिक प्रयत्न या लोकांना निरर्थक वाटतात. उपयोगी आणि खरं ज्ञान आपल्याला इकडे मिळणार नाही म्हणून आपण ते पश्चिमेत जाऊन घेतलं पाहिजे, असं या लोकांना वाटतं. म्हणूनच, सय्यद हुसैन अलातास म्हणतात, की ‘साम्राज्यवादाच्या आर्थिक आणि राजकीय संरचनाच वासाहतिक लोकांच्या विचार करण्याच्या समांतर संरचना निर्माण करतात.’ त्यामुळेच आपण राजकीय, आर्थिक, सामाजिक साम्राज्यवाद आणि वैचारिक साम्राज्यवाद वेगळे करू शकत नाही. त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. वैचारिक साम्राज्यवादाची मांडणी केल्यामुळे काहीसा गैरसमज होईल. म्हणून ते म्हणतात, ‘मी असं काहीही सुचवत नाही, की जगातील चांगल्या ज्ञानाकडे कानाडोळा करा, त्याच्याकडे बघू नका. जगातील सगळ्या साधनांमधून, भागांमधून आपणास शक्य तेवढं ज्ञान गोळा केलं पाहिजे. मात्र, हे सगळं आपण आपल्या वैचारिक वारशाकडे दुर्लक्ष न करता स्वतंत्र आणि चिकित्सकपणे केलं पाहिजे. वैचारिक दास्यत्व आणि वैचारिक मलमपट्टी आणि देशी-परदेशी वैचारिक परंपरेचं अस्सल संमिश्रण या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत.’
यांच्याप्रमाणेच भारतात के. सी. भट्टाचार्य यांनी ‘स्वराज इन आयडियाज’ हा अत्यंत महत्त्वाचा लेख लिहून वसाहतवादाच्या मानसिक परिणामांची चिकित्सा केली आहे. त्यांच्या मते मानसिक आणि वैचारिकदृष्ट्या आपण स्वतंत्र झाल्याशिवाय राजकीय आणि आर्थिक स्वातंत्र्याला अर्थ राहणार नाही. म्हणून पाश्चिमात्य संस्कृती आणि समाजाची नक्कल आणि अनुकरण करणाऱ्यांची त्यांनी चिकित्सा केली आहे. मात्र, पाश्चिमात्य समाजाकडून आपण काहीही शिकू नये असं ते अजिबात म्हणत नाहीत. आपण सगळ्यांकडून डोळसपणे शिकलं पाहिजे, मात्र त्यांचं आंधळेपणाने अनुकरण करू नये. आंधळेपणाने अनुकरण केल्यामुळे चिकित्सक मन तयार होत नाही, तर एक बेगडी आणि बांडगूळ मन तयार होतं, ज्यामध्ये स्वत:चा विचार नसतो. यालाच सय्यद हुसैन अलातास यांनी बंदिस्त मन म्हटलं आहे. वैचारिक साम्राज्यवाद तुम्हाला चिकित्सक बनू देत नाही, झापडबंद करून टाकतो. यालाच फ्रांत्ज फेनन यांनी ‘वसाहतवादाचा मानसशास्त्रीय हिंसाचार’ असं म्हटलं आहे.
वैचारिक साम्राज्यवादातून मुक्ती मिळवायची असेल तर त्याने निर्माण केलेली विचारचौकट मोडली पाहिजे किंवा ओलांडली पाहिजे. वसाहतवादाची/साम्राज्यवादाची विचारचौकट ही द्वैतावर आधारित आहे. त्यामध्ये असं मानलं जातं, की आम्ही श्रेष्ठ-तुम्ही कनिष्ठ, आम्ही चांगले-तुम्ही वाईट, आम्ही सुसंस्कृत-तुम्ही असंस्कृत, आम्ही प्रकाशवान-तुम्ही अंधार, आम्ही गोरे-तुम्ही काळे, आम्ही विकास आणि प्रगतीच्या बाजूचे तर तुम्ही त्या विरोधी. याचाच अर्थ असा आहे, की साम्राज्यवाद नेहमीच बायनरीत विचार करतो. आमच्या सुरात सूर मिसळतात तोच सूर चांगला, बाकी सगळा बेसूर! म्हणूनच विचारांचं आणि मनाचं निर्वसाहतीकरण करायचं असेल तर सर्वांत प्रथम बायनरीच्या पलीकडे पाहिलं पाहिजे. सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तव हे काळ्या-पांढऱ्या रंगात पाहिलं तर विशिष्ट आणि सोयीच्या बाबी दिसतात, संपूर्ण चित्र दिसत नाही. वसाहतवादी लोक स्वतःला चांगलं म्हणायचे आणि इथल्या लोकांना वाईट म्हणायचे. अलीकडे राष्ट्रवादी लोक स्वतःला चांगलं म्हणतात आणि इतरांना वाईट म्हणतात. लोक बदलले, मात्र मानसिकता तशीच आहे. उदा. इंडियन पिनल कोड बदलून भारतीय न्याय संहिता आणली. त्यामध्ये फक्त नंबर खाली-वर केले आणि काही गोष्टी कमी-जास्त केल्या, मात्र मानसिकता तशीच आहे.
अलीकडेच सय्यद हुसैन अलातास यांचे चिरंजीव आणि समाजशास्त्राचे अभ्यासक फरीद हुसैन अलातास यांनी लिहिलं, की ‘अचिकित्सकपणे परकीयांवर टीका करणं आणि आंधळेपणाने आपल्या इथल्या संस्कृती, पितृसत्ता, बहुसंख्याकवाद, धार्मिक कट्टरता यांचा गौरव करणं हा निर्वसाहतवाद नाही.’ जगातील सगळ्या कानाकोपऱ्यांतून शिकणं आणि तरीही आपली भूमिका न सोडता एकाच वेळी जागतिक आणि स्थानिक होणं, बायनरीच्या पलीकडे जाऊन इतिहास, संस्कृती आणि राजकारणाचा विचार करणं, सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तव हे बहुरंगी आहे हे मान्य करणं म्हणजे निर्वसाहतीकरण होय.
केनियन लेखक एन्गुंगी यांनी मनाच्या निर्वसाहतीकरणावर एक स्वतंत्र लेख लिहिला आहे. तो आवर्जून मिळवून वाचावा असं मी सुचवेन.
इतिहास : एक युद्धभूमी
अलीकडे संसदेपासून चव्हाट्यापर्यंत सगळीकडेच इतिहासावर भरभरून चर्चा होताना दिसते. सोशल मीडियावर तर इतिहासावरील चर्चेचा आणि कंटेंटचा महापूरच आलेला दिसतो. मात्र, यातील कोणती गोष्ट किती तथ्यांवर आधारित आहे आणि किती विश्वसनीय आहे, या प्रश्नांशी मात्र कोणाला काहीही देणं-घेणं नाही. सोशल मीडियाच्या विस्तारामुळे सगळेच लोक आपापला इतिहास धुंडाळत आहेत, इतिहासाविषयी आपली मतं मांडत आहेत, तसेच इतिहासाविषयी काही ना काही लिहीत आहेत किंवा त्यामध्ये रुची आणि रस दाखवत आहेत. या सगळ्या गोष्टी चांगल्याच आहेत. सर्वसामान्य लोकांनी इतिहासामध्ये रस घेतलाच पाहिजे. त्यांनी इतिहास वाचला पाहिजे, समजून घेतला पाहिजे. या सगळ्यांमधूनच संपूर्ण समाजाची इतिहास-साक्षरता होऊ शकते. सोशल मीडियावर चालणाऱ्या चर्चेचा बारकाईने आणि चिकित्सकपणे विचार केला तर असं दिसून येतं, की लोक इतिहासाविषयी भरपूर बोलत आहेत, मात्र त्या बोलण्याला अभ्यासाचा आधार नाहीय. काही लोक अभ्यास करूनही बोलत आहेत किंवा लिहीत आहेत; मात्र सोईच्या आणि आवडीच्या गोष्टींचाच अभ्यास करतात आणि त्याविषयी लिहितात.
यासोबतच, खरा इतिहास आणि खोटा इतिहास, आमचा इतिहास आणि त्यांचा इतिहास यावरूनही बऱ्याच चर्चा होताना दिसत आहेत. शाळेच्या पाठ्यपुस्तकांमध्ये कोणता इतिहास शिकवायचा, कोणाला वगळायचं आणि कोणाला सामावून घ्यायचं याचंही राजकारण दिल्लीपासून गल्लीपर्यंत होताना दिसत आहे. इतिहासावरून विचारसरणीचं राजकारणही घडतं. म्हणूनच आपल्या समाजात डावे इतिहासकार, उजवे इतिहासकार असेही प्रकार दिसून येतात. कारण इतिहासकार हीही एक व्यक्ती असते. तिच्यावर विचारांचा आणि विचारसरणीचा प्रभावही असतो. यासोबतच पुरोगामी इतिहास आणि प्रतिगामी इतिहास असंही विभाजन समाजात केलं जातं. काही लोक इतिहासाचा वापर करून मानवमुक्तीची लढाई लढतात, तर काही लोक इतिहासाचा गैरवापर करून लोकांमध्ये जाती, धर्म, लिंग, राष्ट्र, वंश यांवरून भेदभाव निर्माण करतात. इतिहासाच्या अभ्यासातून शांतताही शिकवता येते आणि हिंसाही घडवता येते. या सगळ्या गोष्टींमुळेच इतिहास ही एक रणभूमी बनली आहे.
हेही वाचा - सलोख्याची वीण उसवतेय..
प्रसिद्ध इतिहासकार रोमिला थापर यांनी अलीकडे ‘आपला इतिहास, त्यांचा इतिहास, कोणाचा इतिहास’ असा ग्रंथ लिहिला आहे. त्यामध्ये इतिहासाचं सांस्कृतिक राजकारण आणि वर्तमानातील राजकारण कसं घडतं किंवा घडवलं जातं याचा मागोवा घेतला आहे. बहुतांश लोक इतिहासाकडे संकुचित दृष्टीने पाहतात. माझ्या आयुष्यातील अनेक वर्षं मीही तसाच पाहत होतो. माझ्याही डोक्यात आमचा इतिहास, त्यांचा इतिहास अशा गोष्टी होत्या. त्या सामाजिक वातावरणातून आल्या होत्या. मात्र, इतिहासाला एका जातीच्या, धर्माच्या, संस्कृतीच्या, वंशाच्या, प्रदेशाच्या दृष्टीने पाहणं महत्वाचं असलं तरी परिपूर्ण नाही. एकाच विशिष्ट चौकटीतून इतिहासाकडे पाहिलं तर इतिहासातील अनेक गोष्टी दिसत नाहीत याची जाणीव मला माझ्या पीएचडीच्या संशोधनाच्या काळात झाली. संकुचित दृष्टीने इतिहासाकडे पाहिल्याने ज्या आपल्याला आवडतात, ज्या आपल्याला पाहायच्या आहेत त्याच गोष्टी किंवा घटना इतिहासात दिसतात. मात्र, वास्तवात इतिहास हा अनेकवचनी, बहुमुखी आणि बहुरंगी असतो. त्याला काळ्या-पांढऱ्यात पाहणं हे इतिहासाची गुंतागुंत, अनेकवचनी आणि बहुरंगी स्वरूप नाकारणं असतं, असं मला इतिहासाचा शास्त्रीय, वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करताना जाणवलं.
बहुतेक वेळा लोक इतिहासाकडे एकाच चष्म्यातून पाहत असल्यामुळे एक तर त्यांना फक्त हिंसा दिसते किंवा मग फक्त अहिंसा दिसते. कधी त्यांना फक्त भेदभाव दिसतो तर कधी त्यांना फक्त बंधुभाव दिसतो. वास्तवात मात्र भारताचा आणि संपूर्ण जगाचा इतिहास हा गुंतागुंतीचा आहे. त्यामध्ये स्त्रीमाहात्म्य आहे तसाच भरपूर स्त्रीद्वेषही आहे. त्यामध्ये वैराग्याची, ब्रह्मचर्याची चर्चा आहे तशाच मैथुनाच्या, कामक्रीडेच्या आणि वासनेच्याही अनेक गोष्टी आहेत. इतिहासामध्ये अहिंसेप्रमाणेच हिंसाही भरपूर दिसते. सांस्कृतिक झगड्यासोबतच सांस्कृतिक देवाणघेवाणही भरपूर दिसते. म्हणूनच शास्त्रीय दृष्टिकोनातून इतिहासाचा अभ्यास करणारे व्यावसायिक इतिहासकार म्हणतात, की इतिहासाला एकसाची, एकरंगी करू नये. त्याला त्याच्या गुंतागुंतीच्या संदर्भात समजावून घ्यावं. अलीकडे मात्र धार्मिक कट्टरतावादी लोक इतिहासात धार्मिक वादविवाद होते असं सांगून समाजात धार्मिक संघर्ष वाढवण्याचा प्रयत्न करतात. तसाच काहीसा मात्र आशयाच्या बाबतीत थोडासा वेगळा प्रयोग धर्मनिरपेक्षतावादी लोक समाजात धार्मिक सलोखाच होता असं म्हणणारा इतिहास सांगतात. धर्मांध आणि धर्मनिरपेक्षतावादी लोकांचे हेतू जरी वेगवेगळे असले तरी इतिहासाला एकरंगी, एकसाची करण्याची कृती मात्र सारखीच आहे. म्हणूनच वरील दोन्ही गट एकमेकांना अप्रत्यक्षपणे मदतच करत असतात.
इतिहासाला पुरोगामी करू नये तसंच त्याला प्रतिगामी करू नये. त्याला डावं-उजवं करू नये. या प्रकारचं इतिहासाचं रूपांतर हे इतिहासालाच नव्हे तर समाजालासुद्धा युद्धभूमी बनवतं. त्यातून समाजाचं मानसिक आणि बौद्धिक आरोग्य खराब होतं आणि संपूर्ण समाजच समस्याग्रस्त बनतो. इतिहासाला पुरोगामी-प्रतिगामी किंवा डावं-उजवं करू नये असं एकीकडे मी म्हणत असलो, तरी दुसरीकडे याचीही जाणीव आहे, की पुरोगामी-प्रतिगामी किंवा डावा-उजवा यांचाही एक इतिहास असतो. त्यांच्या लिखाणाचं एक वैचारिक राजकारण असतं. त्याचाही चिकित्सक अभ्यास झाला पाहिजे.
समकालीन वर्तमानाचा विचार करताना वरील तीन मुद्दे मला महत्त्वाचे वाटतात. तिन्ही मुद्दे काहीसे वेगळे वाटत असले तरी विचारसूत्राच्या बाबतीत तिन्हींमध्ये महत्त्वाचं साम्य आहे. ते म्हणजे द्वैत/बायनरी-पलीकडचा विचार करणं. आजच्या आपल्या समकालीन वर्तमानात (भारतात आणि जगभरात) समाजांचं, लोकांचं सगळंच विचारविश्व, व्यवहारविश्व बायनरी/द्वैती विचारांनी घडवलेलं आणि नियंत्रित केलेलं दिसतं. त्यामुळेच सगळीकडे धृवीकरण होताना दिसत आहे. या स्थानिक आणि जागतिक पेचप्रसंगातून मार्ग काढायचा असेल तर आतापर्यंत न कल्पिलेले वैचारिक-व्यावहारिक हस्तक्षेप करावे लागतील आणि त्यामध्ये बायनरीची मोडतोड करावीच लागेल. ही मोडतोड लैंगिकतेसारख्या खासगी जीवनापासून ते इतिहासावरील चर्चेसारख्या सार्वजनिक जीवनात करावी लागेल.
देवकुमार अहिरे | 9923777232 | devkumarahire@gmail.com
देवकुमार अहिरे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, इतिहास विभागात सहायक प्राध्यापक आहेत. लिंगभाव, हिंदुत्व, जमातवाद, दलित अभ्यास हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.
