राहुरी तालुक्यातल्या गुहा गावाने तिथल्या मुस्लिम गावकऱ्यांवर सामाजिक- आर्थिक बहिष्कार घातलाय. त्याविरोधात हे मुस्लिम नागरिक राहुरी तहसिल कार्यालयासमोर कार्यालयीन वेळेत नेमाने धरण्याला बसतायत. आम्ही या गावी गेलो, तो तिथल्या मुस्लिम नागरिकांच्या धरणे आंदोलनाचा ५१२ वा दिवस होता. म्हणजे तब्बल एक वर्ष, पाच महिने ही मंडळी शांततेने आंदोलन करत आहेत.
गेली काही वर्षं, खासकरून २०२३पासून गावात वाढता तणाव असल्याचं तिथला गावकरी आणि सामाजिक कार्यकर्ता अल्लाउद्दीन शेख गेले दोन महिने सांगत होता. तणावाला निमित्त झाला आहे गावातला अनेक शतकं अस्तित्वात असलेला आणि १८५७ सालात ब्रिटिश सरकारची मंजुरी मिळालेला बाबा रमजान शाह माही सवार बाबांचा दर्गा. गावात सुमारे १२० मुस्लिम कुटुंबं आहेत. तुषार गांधी, फिरोज मिठिबोरवाला, शरद कदम यांनी देशाचं ऐक्य अबाधित राखण्याच्या उद्देशाने ‘हम भारत के लोग’ या नावाची संघटना नुकतीच स्थापन केली. त्या निमित्ताने झालेल्या बैठका, भेटी यात गुहा गावाची चर्चा सुरू झाली आणि आम्ही तिथे जायचं ठरवलं.
नगरपासून ५० आणि राहुरीपासून १८ किमी अंतरावरचं हे गाव. संपूर्ण महाराष्ट्रात सुफी आणि नाथ संप्रदायाच्या परंपरा एकात एक गुंफलेल्या आढळतात. महाराष्ट्रातल्या हिंदू आणि मुसलमान लोकांनी मिळून या परंपरा जोपासल्या आहेत. पण सध्याच्या द्वेषपूर्ण राजकारणाच्या चलतीमुळे सलोख्याचा हा घट्ट गोफ सुटू लागला आहे. नगरच्या या परिसरात कान्होबा नावाचे संत होऊन गेले. मूळचे हिंदू असले तरी या कान्होबांनी सुफी संत सय्यदुस्सादात निजामुद्दिन-इद्रीस-अलहुसैनी यांच्या संपर्कात आल्यानंतर मुस्लिम धर्म स्वीकारला. भ्रमण करत ते नगरच्या ‘मढी’ या गावी येऊन राहिले. त्यांच्या चमत्काराच्या अनेक आख्यायिका आजही परिसरात प्रसिद्ध आहेत. कान्होबांनी मुस्लिम धर्म स्वीकारल्यानंतर धारण केलेलं नाव होतं ‘शाह रमजान’. ही नोंद सिद्धेश्वरश चित्राव यांच्या भारतवर्षीय मध्ययुगीन चरित्रकोशात आढळते. १८८४मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या तेव्हाच्या बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या ब्रिटिश गॅझेटियरमध्येही याचं सविस्तर वर्णन आहे. इतिहासकार सेतूमाधवराव पगडी यांचंही हेच मत असल्याची नोंद त्यांनी त्यांच्या ‘सुफी संप्रदाय’ (तत्त्वज्ञान आणि परंपरा) या पुस्तकात केली आहे. (हे कान्होबा म्हणजेच नाथपंथीय कानिफनाथ असंही मानलं जातं. पण कानिफनाथ कान्होबांच्या कितीतरी आधी होऊन गेले असावेत आणि मढीचे कान्होबा किंवा शाह रमजान १५ व्या शतकाच्या शेवटी झाले असावे असं पगडींनी लिहिलंय.) तेरावं ते पंधरावं शतक या काळात सुफी आणि नाथ पंथ यांच्या बऱ्याच एकत्रित परंपरा तयार झाल्या. ते सारं आपल्या विविधतेने नटलेल्या आणि नव्या नव्या पंथांना सामावून घेणाऱ्या भारतीय संस्कृतीमुळे शक्य झालं. जगात दोन धर्मांचा असा मेळ क्वचितच आढळेल. हे या भूमीचं खरं सौंदर्य आणि सामर्थ्य. गुहा गावातलं कान्होबाचं स्थान किंवा रमजान शाह यांचा दर्गा हे या शतकानुशतकं चालत आलेल्या सलोख्याचं प्रतीक.
या दर्ग्यातले उत्सव वर्षानुवर्षं हिंदू-मुस्लिम सलोख्याने करत होते. गुहा गावातले गावकरी एकमेकांसोबत मिळूनमिसळून राहत होते. अल्लाउद्दिनचे ८८ वर्षांचे अब्बा, मकबूल शेख आम्हाला भेटले. या गोड आजोबांनी गुहा गावच्या मातीत सद्भावनेचं शिंपण केलंय. गावातल्या कुठल्याही घरात जराशी कुरबुर झाली तरी ते वडिलकीच्या नात्याने समजावत आणि लोक या बुजुर्गाचा शब्द खाली पडू देत नसत. गावातल्या हॉटेलांत दलितांना वेगळा कप देण्याची भेदभावाची रीत त्यांनी मोडून काढली. पण आता त्यांचा शब्द चालेनासा झालाय. त्यांना गावातल्या आत्ताच्या विखारी वातावरणाचं अतोनात दुःख होतंय.
हा विखार तयार होण्याचा घटनाक्रम थोडक्यात असा : २०२३ साली फाल्गुनातल्या उरुसाचं परंपरेने चालत आलेलं यजमानपण मुस्लिमांकडून हिसकावून घेतलं गेलं, ‘कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट’ तयार करून त्याची नोंदणी करण्यात आली, जून २०२३मध्ये वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सव भरवला गेला, त्यात १७ जूनला सनातन संस्थेचे श्रीहरी आंबेकर यांनी केलेलं चिथावणीखोर भाषण, गावातल्या मुस्लिमांचा उल्लेख ‘जिहादी’ असा करून, बाराशे वर्षांपूर्वी इथे मंदिरच होतं असं सांगत आता ‘आपला’ देव परत मिळवायचा अशी घोषणा करणं. खरं तर, असं भाषण करणाऱ्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा होता. पण, सध्याच्या ‘न्यू इंडिया’त तसं झालं नाही. हिंदू गावकऱ्यांनी २८ डिसेंबर २०२३ रोजी दर्ग्यात कानिफनाथांची मूर्ती बसवली, तिथे नित्यनेमाने सुरू केलेली पूजा-आक्रस्ताळी आरती सुरू केली. एवढंच नव्हे, तर ‘हटाओ लांडे, लगाओ डंडे’ अशी घोषणाबाजीही चालू झाली. या सर्व बळजबरीविरोधात मुस्लिमांनी कायदेशीर कारवाईची, न्यायाची मागणी केल्यावर मुस्लिमेतर गावकऱ्यांनी बहिष्काराचं अस्त्र वापरायला सुरुवात केली. हा बहिष्कार गेली दीड वर्षं सुरू असून त्यामुळे मुस्लिमांवर उपासमारीची वेळ आली आहे.
आम्ही आधी दर्ग्याशीच पोचलो. तिथेच जवळ गावातली मशिददेखील आहे. मशिद आणि दर्गा यांची देखभाल पिढ्या न् पिढ्या करणारी मुजावरांची ३५ घरं या परिसरात आहेत. सय्यद, बागवान, पठाण ही अन्य मुस्लिम कुटुंबं गावात इतरत्र राहतात. चिंचेची बरीच झाडं दर्ग्याच्या परिसरात आहेत. या झाडांच्या गारव्यातच आम्ही त्यांच्याशी बोलायला बसलो. ते सांगत असलेल्या घटना मात्र चटका लावणाऱ्या होत्या. झाडांना सर्व बाजूंनी चिंचा लगडलेल्या होत्या. पण मुस्लिमांना त्या काढण्यास मनाई केली आहे. दर्ग्यालगतच आता कायमस्वरूपीच म्हणावी अशी पोलिस चौकी तयार केली आहे. ड्युटीवरच्या पोलिसांच्या साक्षीनेच मुस्लिम बाया-पुरुषांबरोबर आमची चर्चा झाली. अशीच चर्चा आम्हाला हिंदू गावकऱ्यांसोबतही करायची असल्याचं आम्ही पोलिसांना सांगितलं. आणि त्यासाठी त्यांना आमंत्रण द्यावं किंवा आम्ही त्यांच्या घरी जायला तयार आहोत, हेही कळवलं. पण प्रतिसाद मिळाला नाही. तेवढी एक कमतरता राहिली.
ऑक्टोबर २०२३ मध्ये गुहा ग्रामसभेने मुस्लिमांवरच्या बहिष्काराचा ठराव केला. नियम मोडणाऱ्याला दोन हजार रुपये दंड ठोठावणाऱ्या या ठरावाची वैधता तपासली पाहिजे, असं मुस्लिम गावकरी म्हणतात. ही बहिष्काराची कृती अर्थातच बेकायदेशीर आणि असंविधानिक आहे. खरं तर सामाजिक बहिष्काराला गुन्हा ठरवणारा कायदा सर्वप्रथम महाराष्ट्रानेच केला आहे- महाराष्ट्र अधिनियम २०१७. तरीही गुहा गावात कुटुंबीयांना स्वतःच्याच शेतजमिनीत कामं करायला रोखलं जातंय. पेरणीचा काळ आला तरी अजून त्यांना नांगरणी करता आलेली नाही. गावातले ट्रॅक्टर्स तर त्यांना दिले जातच नाहीयेत. म्हणून त्यांनी बाहेरून ट्रॅक्टर्स आणले तेव्हा जमाव चालून आला. ड्रायव्हरला मारहाण करण्याचा, शेतकाम करणाऱ्या बायकांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. मैमूनाआपा हे सांगत होत्या. त्या जमावापुढे आडव्या पडल्या. मैमुना हिंमतबाज आहेत, खणखणीत बोलतात. पण आता हताश झाल्यात. शेळ्या विकण्याचा व्यवसाय करणाऱ्या एका विधवाबाईंना त्यांचं काम बंद करायची वेळ आलीये. कारण गावात कोणत्याही बांधावर त्यांच्या शेळ्यांना चरायला बंदी केली आहे. राजू बागवानचं भेळ, चिवडा, वडा, चहा देणारं गावातलं हॉटेल बंद करायला लावलं. मग त्याने गुहा-सिबलापूर मार्गे संगमनेर इथल्या एसटी स्टॅंडवर गाडी लावायला सुरुवात केली. तर तिथूनही त्याला हाकलून लावण्यात आलं. वेल्डिंग, फॅब्रिकेशन करणारा मन्सूर सय्यद. त्याला केवळ पोटासाठी संगमनेरला स्थलांतरित व्हावं लागलं. मुस्लिम स्त्रिया शेतमजुरी करून दिवसाला दोन-तीनशे रुपये मिळवायच्या. बहिष्कारामुळे हा मार्ग आता बंद. दर किलो चिंचोक्यांमागे दहा रुपये दराने चिंच फोडायचं काम त्या करत असत. आता तेही बंद. तुटलेली चप्पल शिवणं, केस कापणं या साध्या साध्या कामांसाठीही गावाबाहेर जावं लागतंय. एकाचं झेरॉक्सचं दुकान त्याला रोजचे तीन-चार हजार मिळवून देत असे. आता दुकान गेलं. झेरॉक्स मशीन घरी आणून ठेवलंय. मिळकत शंभर-दोनशेवर आलीये. अल्लाउद्दीनच्या भावाला गावातल्या त्याच्या हिंदू मित्राने घरातल्या लग्नाची आमंत्रणपत्रिका दिली. तर त्या मित्राला दंड ठोठावला गेला. गावच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर बहिष्काराचे आदेश उघडपणे दिले जातात.
गुहा गावातल्या मुस्लिमांवरच्या सामाजिक-आर्थिक बहिष्काराच्या या निवडक कथा. या वातावरणाचा गावातल्या लहान मुलांवर काय परिणाम होत असेल, याची कल्पनादेखील करवत नाही. या विखारातून वाट काढू शकणारे एक हिंदू सज्जन गावात होते. पण त्यांचा इंतकाल झाल्याचं कळलं. सगळे हळहळले. मुस्लिम मंडळी म्हणत होती की जे घडतंय ते सगळ्याच हिंदूंना मान्य आहे, असं नाही. पण गावातल्या आणि गावाबाहेरून येणाऱ्या दांडग्यांना लोक घाबरतात. सकाळी नऊ आणि संध्याकाळी सातला आरती करायला दर्ग्यात जमावाने लोक येतात. दर्ग्यात परवानगीविना स्पीकर्स लावले आहेत. आवाजाची कोणतीही मर्यादा सांभाळली जात नाही. हे पोलिसांदेखत घडतंय.
गुहा गावाच्या भेटीने ८० आणि ९०च्या दशकातल्या लग्नगडी या वेठबिगारी प्रथेविरोधात संघटित होणाऱ्या ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासींवर तिथल्या जमीनदारांनी आणि मराठवाड्यात जातीआधारित वेठबिगारीतून मुक्त होऊ पाहणाऱ्या दलितांवर गावातल्या सवर्णांनी घातलेल्या बहिष्काराची आठवण झाली. एक प्रथा आपल्याकडच्या सरंजामी व्यवस्थेतून आलेली आणि दुसरी हिंदू धर्मातल्या जातींच्या उतरंडीतून तयार झालेली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केलेल्या वेठबिगार निर्मूलन आणि दलित अत्याचार प्रतिबंधक अशा दोन कडक कायद्यांची मदत तेव्हा झाली होती. आज कायदा आहे, पण त्याची मदत होत नाहीये.
मुस्लिमांवरचा बहिष्कार हा प्रकार ‘आपण विरुद्ध ते’ असा धार्मिक दुभंग आहे. मशिदी आणि दर्ग्यांभोवती संशयाचे भोवरे तयार करण्याचं काम गेली दहा-बारा वर्षं सुरू आहे. हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समुदायांचे लोक पूर्वग्रह बाजूला ठेवून एकत्र येतात अशा दर्ग्यासारख्या अनेक सामायिक जागा नष्ट केले जाताहेत. महाराष्ट्रात जिल्ह्याजिल्ह्यांत भाईचाऱ्याच्या सुरेल कहाण्या सांगणारे दर्गे आहेत. तिथल्या जमिनींवर, उत्पन्नावर डोळा ठेवून तिथे संघटितपणे विष पसरवलं जातंय. मुस्लिमांना अडकवण्यासाठी नवनवे सापळे रचले जातायत. मुस्लिमविरोधाला शासन-प्रशासनच हवा देत आहे. गुहाच्या मुस्लिम गावकऱ्यांनी तहसिलदारापासून जिल्हाधिकाऱ्यापर्यंतच्या, धर्मादाय आयुक्त, वक्फ बोर्ड अशा सगळ्या प्रशासन यंत्रणेकडे न्यायासाठी साकडं घातलंय. न्यायलयातही ते पोचले आहेत. पण अजून तरी स्थिती ‘जैसे थे!’ आहे.
पोलिसांपासून न्यायालयांपर्यंत सगळ्याच यंत्रणांचा कल मुस्लिमविरोधात आहे, हे सिद्ध करणारी उदाहरणं रोज आपल्या आसपास घडतायत. देवभूमी म्हणवणाऱ्या उत्तराखंड राज्यात याचप्रकारे बहिष्कार टाकून मुस्लिमांना हद्दपार केलं गेलं; महाराष्ट्रातही तेच सुरू आहे. त्यामुळे गुहावासी मुस्लिमांची लढाई त्यांच्या संयमाची, चिकाटीची कठोर परीक्षा घेणारी आहे. खणखणीत संविधान असलेल्या स्वतंत्र भारतात अशी लढाई लढण्याची वेळ एका धर्माच्या नागरिकांवर, त्यांच्या धर्मामुळे येणं ही शरमेची आणि दुःखाची बाब आहे. ही स्थिती पालटण्यासाठी प्रयत्न करण्याचं बळ त्यांना आणि सन्मती अन्य सगळ्यांना मिळो!
