व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर दावे आणि उजवे असे दोन बबल्स आहेत. मी स्वतः दोन्ही बाजूंच्या व्हॉट्सॲप ग्रुप्सचा मेंबर आहे. एक कडवा उजवा ग्रुप आणि एक डावीकडे झुकलेला-काँग्रेस समर्थक ग्रुप! एके दिवशी मी ठरवले की, या दोन्ही बाजूंना प्रश्न विचारायचे-अडचणीत आणणारे प्रश्न! यामुळे गोंधळ माजणार आहे हे कळत होते, परंतु नुसत्या पोस्ट्स फॉरवर्ड करून काय साधत होते हे लोक? प्रश्न तर विचारले जायलाच पाहिजेत.
उजव्या ग्रुपला मी खालील प्रश्न विचारले:
१. १२ साली काँग्रेसच्या राज्यात रुपया ६२च्या पुढे गेला तेव्हा तुम्ही 'हाय तौबा' करत होता. आज रुपया ९० पार गेला आहे, तेव्हा तुम्ही रुपयाचे पडणे भारताच्या इकॉनॉमीला फायदेशीर कसे आहे, हे सांगणारे मेसेजेस फॉरवर्ड करत आहात. यात तुम्हाला विरोधाभास दिसत नाही का?
२. उरी, पठाणकोट, पुलवामा आणि पहलगाम युद्धानंतर भारताने पाकवर एक-दोन दिवसांत संपतील असे स्ट्राईक्स केले. नोव्हेंबरमधील दिल्ली बॉम्ब ब्लास्टनंतर भारत शांत का राहिला? ऑपरेशन सिंदूरमध्ये पाक-चीन युतीने भारताची विमाने पाडली म्हणून भारत शांत आहे का? विमाने पाडली नसतील, तर सगळी राफेल विमाने सुखरूप आहेत हे भारत एकदाचे सगळ्या जगाला दाखवत का नाहीये?
३. मोदी जर लोकप्रिय आहेत आणि भारतात आज जर अमृतकाळ अवतरला आहे, तर स्त्रियांना सरकारी पैसा देऊन जिंकण्याची वेळ मोदीजींवर का आली आहे? हे लाखो कोटी रुपये असे वाटून टाकण्याऐवजी हे पैसे उत्पादन कार्यात का लावत नाही? सरकारी पैसा वाटून निवडणुका जिंकण्यात कोणती देशभक्ती आहे?
यावर एकही उत्तर मिळाले नाही. कुठल्याही उजव्या ग्रुपमध्ये एक-दोन खूंखार सदस्य असतात, तसा इतर धर्मांच्या आणि संस्कृतींच्या द्वेषाने माखलेला एक सदस्य इथेही होता. तो खवळून उठला. "तू देशद्रोही आहेस, लिब्रंडू आहेस, अर्बन नक्षल आहेस" वगैरे वगैरे सुरू झाले. मी एवढेच म्हटले की, "तू वरील प्रश्नांना समर्पक उत्तरे दे, नाहीतर तू विचार न करता मते बनवणारा भक्त माणूस आहेस असे मी समजेन." त्यावर अजून आकांडतांडव. शेवटी "तू विकृत आहेस" इथपर्यंत गाडी आली. मग मी चर्चा थांबवली.
इकडे डाव्यांच्या ग्रुपमध्ये मी प्रश्न विचारले:
१. शाह बानो केसमध्ये मुस्लिम तलाक पीडितांना पोटगी मिळावी असा सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाला होता, तो राजीव गांधी सरकारने संसदेत कायदा करून उलटवून लावला. कारण मुल्ला आणि मौलवींनी हा निर्णय शरीयत विरोधी आहे असा हलकल्लोळ केला. काँग्रेस या लोकांच्या समोर मतांसाठी नमली. आता भाजप मतांसाठी साधू आणि साध्वी यांच्यासमोर नमत असेल, तर त्यावर आक्षेप घ्यायचा लिबरल लोकांना काय अधिकार आहे?
२. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर शिखांचे शिरकाण झाले. तेव्हा पोलीस गप्प बसले होते असे आरोप शिखांकडून झाले. गोध्रा दंगलींच्या वेळी पोलीस गप्प बसले, असे आरोप मुस्लिम करत होते. गोध्रा दंगलींचे जेवढे लिबरल लोकांना वाईट वाटले होते, तेवढे त्यांना शीख दंगलींच्या बाबतीत का वाटले नव्हते?
३. भाजपमध्ये भ्रष्ट नेता गेला की तो पवित्र होतो अशी टीका काँग्रेसवाले करतात. या भ्रष्ट लोकांनी भ्रष्टाचाराची सुरुवात काँग्रेसच्याच राज्यात केली ना? या लोकांच्या भ्रष्टाचाराबद्दल आज लिबरल लोकांना जेवढे वाईट वाटते आहे, तेवढे या लोकांना काँग्रेसचे राज्य असताना वाईट वाटत होते का?
लिबरल लोकांना या प्रश्नांची समर्पक उत्तरे देता आली नाहीत. इथे खूंखार लोक थोडे कमी असतात. परंतु, उघड द्वेष कमी असला तरी उजव्यांबद्दलचा छुपा द्वेष कमी नसतो. संताप कमी नसतो. मी प्रश्न पोस्ट केल्यावर लगेच— "संघ कधी जॉइन केलास? भक्त कधी झालास? भाजपच्या दमनतंत्राला घाबरलास का?" मी म्हणालो की पहिल्यांदा वरील प्रश्नांची समर्पक उत्तरे द्या! उजव्या ग्रुपमध्ये जशी उत्तरे आली नाहीत, त्याचप्रमाणे डाव्या ग्रुपमध्ये सुद्धा उत्तरे आली नाहीत. हळूहळू तापमान वाढत गेले तसे भक्तुला, भक्ताड, देशद्रोही अशी विशेषणे येऊ लागली.
एकाने चिडून लिहिले— "उजवा मार्ग फॅसिझमकडे जातो! हिटलरकडे जातो."
मी म्हटले— "डावा मार्ग कम्युनिझममधून येणाऱ्या नृशंस हुकूमशाहीकडे गेला हे आपण पाहिले नाहीये का? हिटलरपेक्षा स्टॅलिन आणि माओने कमी माणसे मारली आहेत का?"
याचे उत्तर— "तू फॅसिस्ट झाला आहेस!"
उजव्या ग्रुपमध्ये "तू विकृत आहेस" असे तो खूंखार मोदीभक्त म्हणाला तेव्हा मी चर्चा बंद केली. इथे "तू फॅसिस्ट झाला आहेस" असा आरोप झाल्यावर मी चर्चा बंद केली!
दोन्ही ग्रुप आपापल्या बबलमध्ये राहणारे. दोन्ही ग्रुपमध्ये संताप हा कॉमन! दुसऱ्या विचारसरणीबद्दलचा तीव्र द्वेष कॉमन!
हेही वाचा - आपली संतप्त सार्वजनिक संस्कृती
किती वेगवेगळ्या विचारसरणी परंतु दोन्हीकडच्या माणसांच्या प्रतिक्रिया किती समान! संताप किती समान! अज्ञानाला मिठी मारून बसण्याची वृत्ती किती समान! अडचणीत आणणारे प्रश्न समोर आले की संताप हे त्यावरचे उत्तर नसते, ही साधी गोष्ट दोन्ही बाजूंना कळू नये? माझ्याविषयी मित्रत्वाची भावना असलेले लोक दोन्ही बाजूला होते. परंतु माझे प्रश्न न आवडल्यामुळे त्यांनी घुमेपणा धारण केला होता. दोन्ही बाजूला मी चर्चा एकदम बंद केल्यामुळे दोन्ही बाजूच्या संतापी जनांना चर्चा जिंकल्याचा प्रचंड आनंद झाला. दोन्ही बाजूच्या गप्प बसलेल्या घुम्या लोकांनाही हायसे वाटले. एकाही प्रश्नाचे उत्तर दोन्ही बाजूंनी दिले नव्हते, तरीही चर्चा जिंकल्याचा आनंद दोन्ही बाजूंना मिळाला होता.
या दोन्ही बाजूकडच्या लोकांना आणखीही अनेक प्रश्न विचारता आले असते. मी विचारलेले प्रश्न बिनतोड होते अशातलाही भाग नव्हता. या प्रश्नांना सहज उत्तरे देता येऊ शकतात. परंतु या अतिशय कमिटेड लोकांना ती उत्तरे माहीतच नव्हती. नुसताच संताप! ही फक्त भारतातच दिसून येणारी प्रक्रिया नाहीये. जगभरच्या राजकारणात दोन बाजू असतात. जगभर कमिटेड लोक असतात. त्यांचे त्यांचे ग्रुप असतात. आपली निष्ठा विचारसरणीला वाहिलेले लोक जगभर असतात. या निष्ठावान लोकांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारले की त्यांच्या मनात संतापाची भावना तयार होताना दिसते. मानवी मनाचा हा मोठा विलक्षण आविष्कार आहे.
आपण ज्या विचारसरणीचे इतके निष्ठावान पाईक आहोत, तिच्या विरोधकांच्या प्रश्नांना आपल्याला उत्तरे देता येत नाहीयेत म्हणून लाज वाटण्याऐवजी आपल्याला त्या प्रश्न विचारणाऱ्याचा राग येतो! या रागाच्या भावनेचे कारण काय? अनेक जगन्मान्य मानसशास्त्रज्ञांनी माणसात दिसणाऱ्या या वृत्तीचे कारण दिलेले आहे.
‘थ्रेट डिफेन्स’ ही मानसशास्त्रातली संकल्पना आपण समजून घेतली तर हा गुंता थोडा कमी होतो. आपण कोण आहोत, या प्रश्नाचे उत्तर आपण आपल्या विचारसरणीमध्ये शोधलेले असते. मी म्हणजे हिंदुत्ववादी, मी म्हणजे हिंदू संस्कृतीचा पाईक, मी या उच्च संस्कृतीचा प्रतिनिधी वगैरे. याउलट मी म्हणजे लोकशाहीवादी, मी म्हणजे समानतेच्या तत्त्वाचा पाईक, मी उच्च मानवतेच्या तत्त्वांचा प्रतिनिधी! थोडक्यात 'मी म्हणजेच माझी विचारसरणी' असे समीकरण आपल्या मनात तयार होऊन बसलेले असते.
त्यामुळे जेव्हा आपल्या विचारसरणीवर हल्ला होतो, तेव्हा आपल्या व्यक्तिमत्त्वावरच हल्ला झाला आहे असे आपला मेंदू समजतो. या ‘धोक्या’पासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न मेंदू करतो. कुठलाही धोका समोर आला की आपला मेंदू 'स्ट्रेस हार्मोन्स' शरीरात सोडण्याचे आदेश देतो. त्यामुळे माणूस तणावात जातो. ब्लडप्रेशर वाढते, हृदयाचे ठोके वाढतात. या सगळ्या अस्वस्थतेमुळे आपण संतापतो.
१९७०मध्ये हेन्री टाजफेल आणि जॉन टर्नर या मानसशास्त्रज्ञांनी अजून एक सिद्धांत मांडला— ‘सोशल आयडेंटिटी थिअरी’! सामाजिक अस्मितेचा सिद्धांत! 'आपली विचारसरणी म्हणजेच आपण', अशी भावना असते, त्याचप्रमाणे 'आपला समाज म्हणजे आपण', 'आपला राजकीय पक्ष म्हणजे आपण', 'आपले राष्ट्र म्हणजे आपण' अशीही भावना तयार झालेली असते. त्यामुळे यातील कशावरही प्रश्न उपस्थित केला गेला, तर आपल्यावरच हल्ला झाला आहे असे आपला मेंदू समजतो आणि त्याप्रमाणे भावनिक प्रतिक्रिया देतो.
जर कोणी म्हणाले की, "तुझा राजकीय पक्ष देशाचे नुकसान करत आहे", तर आपला मेंदू त्या वाक्याचा अर्थ ‘तू एक वाईट माणूस आहेस’ असा घेतो. आपल्या मनात तणाव निर्माण होतो. आपल्या पक्षावर टीका म्हणजे आपल्यावरच टीका!
या पलीकडे जाऊन लिऑन फेस्टिन्जर याने या संदर्भात अजून एक स्पष्टीकरण दिले. १९५२मध्ये त्याने ‘कॉग्निटिव्ह डिसोनन्स थिअरी’ मांडली— ‘मानसिक विसंगती सिद्धांत’!
हेही वाचा - क्षुल्लक कारणांवरून माणसं संतापतायत का?
आपल्याला प्रामाणिकपणा आवडत असतो. आपल्याला चांगुलपणा आवडत असतो. आपण नैतिक जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो. आपला पक्ष, आपला नेता एक नेक इन्सान आहे, अशी आपली धारणा असते. जेव्हा आपला विरोधक आपला पक्ष किंवा आपला नेता भ्रष्ट आहे असा पुरावा आपल्या पुढे ठेवतो, तेव्हा आपले व्यक्तिमत्त्व त्या विसंगतीमुळे अस्वस्थ होते. मानसिक वेदना तयार होते. त्यावर प्रतिक्रिया म्हणून आपण तो पुरावा नाकारतो. त्या विरोधी व्यक्तीवर चिडतो. किंवा कधीकधी याही पुढे जाऊन आपण त्या भ्रष्टाचाराचे समर्थन करतो. तो पुरावा आपल्या समोर ठेवल्याबद्दल समोरच्या माणसाचा आपल्याला प्रचंड राग येतो. आपला नेता विसंगत वागत नसून खरंतर, ही विसंगती आपल्याच व्यक्तिमत्त्वात आहे असा अर्थ आपला मेंदू काढतो. आपला मेंदू घाबरून जातो, वैतागतो!
झिवा कुंडा आणि डॅन कहान या मानसशास्त्रज्ञांनी अजून एक स्पष्टीकरण आपल्यासमोर ठेवले आहे. विविध प्रयोग करून त्यांनी दाखवून दिले की, आपण एखाद्या शास्त्रज्ञासारखा शास्त्रशुद्ध विचार करत नाही. त्याऐवजी, आपण एखाद्या वकिलासारखा विचार करायला शिकलेलो असतो. शास्त्रज्ञ समोर आलेले पुरावे तपासतो आणि ते खरे असतील तर मोकळ्या मनाने स्वीकारतो. शास्त्रज्ञाला सत्यात रस असतो. वकील मात्र समोर आलेले पुरावे आपल्या आणि आपल्या अशीलाच्या स्वार्थासाठी कसे वापरता येतील हे बघतो. आपल्या विचारसरणीच्या विरोधात समोर आलेले पुरावे बघितले की आपण एखाद्या वकिलासारखे वागतो. त्या पुराव्यांच्या विरोधात काय बोलता येईल हे आपण बघतो. ते पुरावे समोर आणणाऱ्या संस्थेविषयी, वृत्तसंस्थेविषयी किंवा विचारवंताच्या हेतूविषयी शंका उपस्थित करतो. आपण त्या पुराव्यांमधून आपल्याला सोयीस्कर अर्थ काढण्याचा प्रयत्न करतो. ही विसंगती समोर आल्याबद्दल आपला संताप संताप होतो. ही विसंगती उघड करणाऱ्या व्यक्तीविषयी आपल्या मनात शत्रुत्वाची भावना तयार होते.
आपल्या विचारसरणीच्या विरोधाने आपण पराकोटीचे अस्वस्थ का होतो, याचे अजून एक कारण अर्नेस्ट बेकर या मानवशास्त्रज्ञाने दिले आहे. त्याने ‘डिनायल ऑफ डेथ थिअरी’ मांडली. आपला मृत्यू नाकारण्याची एक सुप्त गरज माणसाला असते. बेकरचे म्हणणे असे की, माणूस या ना त्या प्रकारे मृत्यू नाकारून अमरत्व शोधायचा प्रयत्न करत असतो. यासाठी त्याला सांस्कृतिक आणि धार्मिक संकल्पना उपयोगी पडतात. त्यामुळे तो या संकल्पनांच्या प्रेमात पडतो. मी लोकशाहीवादी पक्षाचे समर्थन केले तर लोकशाही टिकेल, मला जे स्वातंत्र्य आवडते ते टिकून राहील; मी माझ्या धर्माचे रक्षण केले तर तो धर्म मृत्यूनंतरच्या प्रवासात माझे रक्षण करेल; मी माझ्या राष्ट्राचे रक्षण केले तर या राष्ट्राच्या आदर्शांच्या रूपाने मी अमर होईन—असे अनेक विचार माणूस कळत-नकळत करत असतो.
अर्नेस्ट बेकर यांच्या या मार्गावरचा पुढचा टप्पा म्हणून जेफ ग्रीनबर्ग, शेल्डन सॉलोमन आणि टॉम सायझेन्स्की या मानसशास्त्रज्ञांनी ‘टेरर मॅनेजमेंट थिअरी’ मांडली. माणसाला आपल्या मृत्यूची भीती सतत ‘मॅनेज’ करत राहायला लागते. विविध प्रयोग करून त्यांनी सिद्ध केले की, माणसाच्या मनात मृत्यूचे विचार ठाण मांडून बसले की आपल्या जीवनदृष्टीवरची त्याची श्रद्धा वाढते. आणि त्याचबरोबर, आपल्या जीवनदृष्टीच्या विरोधी जीवनदृष्टीविषयीचा त्याचा विरोध वाढत जातो. थोडक्यात सांगायचे तर, यांनी सिद्ध केले की आपली जीवनदृष्टी मृत्यूच्या भीतीपासून आपले रक्षण करत असते. ग्रीनबर्ग, सॉलोमन आणि सायझेन्स्की यांचे कर्तृत्व असे की, यांनी अर्नेस्ट बेकरची ‘डिनायल ऑफ डेथ थिअरी’ अनेक प्रयोग करून सिद्ध केली.
अर्नेस्ट बेकरला आपल्याला सांगायचे आहे की, आपल्या विचारसरणीला विरोध झाला की आपले जीवन आणि आपले अमरत्व धोक्यात आले आहे असे आपल्याला वाटते. आपली जीवनदृष्टी जर खरी नसेल, तर आपले जीवन व्यर्थ गेले की काय असे आपल्याला वाटू लागते. आपल्या जीवनदृष्टीने आपल्याला दाखवलेला ‘अमरत्वाचा’ मार्ग खोटा आहे की काय असे वाटू लागते. आपले ‘अमरत्व’ धोक्यात येते आणि त्यामुळे आपण अस्वस्थ होतो. याचा परिणाम म्हणून आपण संतापाच्या भावनेच्या आहारी जातो. मृत्यूची जाणीव सुप्तावस्थेत का होईना आपल्यात सतत अस्तित्वात असते. राष्ट्र, धर्म किंवा विचारसरणी यांच्या मार्गाने आपल्या मृत्यूनंतरही आपण कायम राहू असे आपल्याला वाटत असते.
शास्त्रीय प्रगती होत गेली तसे आधुनिक तंत्रे घेऊन शास्त्रज्ञ या प्रश्नाला सामोरे गेले. विचारसरणीला विरोध झाला की आपल्या मेंदूमध्ये ‘डिस्ट्रेस’ तयार होतो, हे आधुनिक शास्त्रज्ञांनी ‘ब्रेन-स्कॅन’ वापरून सिद्ध केले आहे. मार्टा गॉझी यांनी सिद्ध केले आहे की, विचारसरणीला विरोध झाला की मेंदूमधील ‘आमिग्डाला’ नावाचा भाग कार्यरत होतो. हा भाग साधारणपणे माणसाला काहीतरी धोका समोर आला आहे अशी भीती वाटली की कार्यरत होतो. ‘आमिग्डाला’ कार्यरत झाला की संपूर्ण शरीर ‘स्ट्रेस हार्मोन्स’ने भरून जाते. ब्लडप्रेशर वाढते, हृदयाचे ठोके वाढतात. या अत्यंत त्रासदायक अनुभवामुळे आपल्या मनात अत्यंत तीव्र अशा भावनिक प्रतिक्रिया तयार होतात. आपल्या विचारसरणीला विरोध झाला की आपण संतापतो ते यामुळे!
आपल्या विचारसरणीप्रमाणे जगरहाटी चालू आहे अशी आपली भावना असते. आपल्या विचारसरणीने या अनागोंदी जगाला सुसंगती बहाल केलेली असते. आपल्या विचारसरणीला विरोध झाला की आपल्याला आपले सुसंगत असलेले जग विसंगतींनी भरून जाते आहे की काय असे वाटू लागते. आपल्या विचारसरणीने आपल्याला आपली अस्मिता बहाल केलेली असते. विचारसरणीला विरोध हा आपल्या अस्मितेला झालेला विरोध असतो. ज्या अस्मितेवर विश्वास ठेवून आपण जगत आहोत ती अस्मिता धोक्यात आली आहे असे वाटले की, मानवी जीवनातील विरोधाभास आपल्या डोळ्यात डोळे घालून आपल्याला त्रास देऊ लागतात. आपल्या मनातली सामाजिक आपलेपणाची भावना धोक्यात आली आहे असे आपल्याला वाटू लागते.
विचारसरणीला विरोध झाल्यामुळे असे अनेक गोंधळ सुरू होतात. खूप साऱ्या ‘निगेटिव्ह’ भावना भरून येतात, आमिग्डाला कार्यरत होतो, ‘स्ट्रेस हार्मोन्स’ सर्व शरीरात थैमान घालू लागतात! अशा या अत्यंत कटू अवस्थेत आपल्या विचारसरणीच्या विरोधात दिले गेलेले सर्व पुरावे आपण कसलाही तार्किक विचार न करता नाकारतो. आपली तर्कशक्ती काम करेनाशी झालेली असते. या परिस्थितीत आपल्या विचारसरणीच्या विरोधात कितीही ‘डेटा’ आपल्या समोर टाकला तरी आपण आपले विचार सोडत नाही. असो! तर आपल्या संतापाची ही इतकी आणि इतकी सखोल अशी कारणे आहेत.
आपल्यातील बहुतेक लोक अशा संतापाला बळी पडत असले तरी काही लोक मात्र या परिस्थितीमध्ये अत्यंत शांत राहू शकतात. विचारसरणींची टक्कर चालू असताना हे लोक शांतता टिकवून धरू शकतात. या लोकांची व्यक्तिमत्त्वे अत्यंत प्रगल्भ आणि विशाल अशी असतात. या प्रगल्भ लोकांची व्यक्तिमत्त्वे कशी असतात याचा विचार करणे फार आवश्यक आणि महत्त्वाचे आहे. परंतु हा एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे.
श्रीनिवास जोशी
श्रीनिवास जोशी नाटककार आहेत आणि गेली दोन दशके वैचारिक लिखाण करत आहेत.
