संभाजीनगरमधील बाईजीपुरा या मोहल्ल्यात एका साध्याशा घराच्या तळमजल्यावर एक छोटेखानी वाचनालय आहे- 'डॉ. एपीजे अब्दुल कलाम लायब्ररी'. इथे मुलं कुतुहलाने पुस्तकं हाताळताना दिसतात. वाचनालयात मराठी, उर्दू, इंग्रजी, हिंदी भाषांतली विविध विषयांवरची भरपूर पुस्तकं आहेत. मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून ‘रीड अँड लीड’ फाऊंडेशनच्या माध्यमातून संभाजीनगरमध्ये सुरू झालेल्या ३६ मोहल्ला वाचनालयांपैकी हे एक.
याची सुरुवात केलीय ‘किताब चाचा’, म्हणजे मिर्झा अब्दुल कय्युम नदवी यांनी. ते एकेकाळी सायकलवरून पुस्तकं विकत असत. आज त्यांनी काही लाख मुलांपर्यंत पुस्तकं पोहोचवली आहेत. त्यांनी सुरू केलेल्या मोहल्ला वाचनालयांशी पाच हजारांहून अधिक मुलं जोडली गेली आहेत.
ही मोफत वाचनालयं गरीब मोहल्ल्यांमध्ये आहेत. त्यांचा व्याप इतका वाढलाय, की परभणीत १५, हैदराबादमध्ये ५, बुऱ्हाणपूरमध्ये ५ अशी वेगवेगळ्या शहरांतही ही वाचनालयं सुरू झाली आहेत. मुलांनी यावं, हवं ते पुस्तक वाचायला न्यावं आणि परत आणून जमा करावं, इतकं साधं सोपं गणित.
हेही वाचा - जेव्हा तरुण मुलं उलगडतात पुस्तकाची पानं… ‘नाशिक रीड्स’
‘मुलं वाचतच नाहीत’ असं सतत बोललं जात असताना मुलांच्या हातात पुस्तकं देऊन त्यांना ‘वाचनवेडं’ करण्याचं आगळंवेगळं काम मिर्झा यांनी केलं आहे. या कामात मिर्झा यांची मुलगी मरियमही त्यांना साथ देते.
मिर्झा यांचा सायकल ते मोहल्ला वाचनालय हा प्रवास फारच रोचक आहे. त्यांचं लहानपणही पुस्तकांशीच जोडलेलं होतं. बालपणी नारेगावमध्ये ते जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत होते तेव्हा तिथे एक पुस्तकांची पेटी होती. ‘श्यामची आई’, ‘विक्रम वेताळ’… अशी मुबलक पुस्तकं त्या पेटीत असल्याने त्यांनी तिचं नावच ‘जादूची पेटी’ असं ठेवलं होतं. इथेच त्यांना पुस्तकांचं वेड लागलं. नवीन पुस्तक आलं, की ते मिळवून वाचल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. नारेगावात चौथीपर्यंतच शाळा होती. पुढे त्यांच्या वडिलांची बदली औरंगाबादमध्ये झाली. तिथे ते उर्दू, इंग्रजी भाषा शिकले. पण शाळा सुटली ती सुटलीच.
हेही वाचा - आणि कचऱ्यातून उभं राहिलं भव्य ग्रंथालय!
…शाळा सुटली, पण काही वर्षांनी पुन्हा त्यांच्या आयुष्यात पुस्तकं आली, ती साथ न सोडण्यासाठीच. ही पुस्तकं त्यांच्या जगण्याचा आणि चरितार्थाचा भाग झाली. एका पुस्तकविक्रेत्याने त्यांना ‘पुस्तकं विकणार का?’ असं विचारल्यावर त्यांनी आनंदून होकार दिला. शाळा, महाविद्यालयं, घरोघरी सायकलवरून जाऊन त्यांनी पुस्तकं विकायला सुरुवात केली. शहरभर पुस्तकांचं ओझं घेऊन फिरावं लागायचं. पण त्यांची तक्रार नसे. पुस्तकांची थप्पी सायकलवर ठेवून घरोघरी जाणाऱ्या मिर्झा यांना अनेकजण ओळखायला लागले होते.
पुढे चार वर्षांनी त्यांनी मोटरसायकलही घेतली. जमलेल्या पैशांमधून २००२ मध्ये एक गोडाऊन घेतलं. तसंच ‘मिर्झा बुक वर्ल्ड’ हे पुस्तकांचं दुकानही सुरू केलं. हे दुकान म्हणजे खऱ्या अर्थाने 'गंगाजमनी तहजीब'चं उदाहरण. उर्दू भाषेतलं ऋग्वेद, महाभारत यांपासून विज्ञान, तंत्रज्ञान, तत्वज्ञान- अशी अनेक विषयांवरची पुस्तकं इथे पाहायला मिळतात.
पुस्तकांच्या राज्यात वावरताना मिर्झा यांच्या मनात आलं, ‘आपलं बालपण पुस्तकांमुळे समृद्ध झालं, आताच्या पिढीचं काय? मुलांच्या हातात पुस्तकच दिलं नाही तर ती वाचतील कशी? यासाठी आधी पुस्तकं त्यांच्यापर्यंत पोहोचवायला हवीत.’ मग त्यांनी खास मुलांसाठीची मराठी आणि उर्दू पुस्तकं अत्यल्प किंमतीत गरीब वस्तीतील शाळांमध्ये द्यायला सुरुवात केली. मिर्झा शाळेत आले, की मुलांना कोण आनंद होई. आपल्या घरी एक तरी पुस्तक असावं, असं यातून मुलांना वाटायला लागलं.
एक मध्यमवर्गीय माणूस हजारो मुलांना पुस्तकं मोफत देऊ शकेल का? पैशांचं सोंग कसं आणणार!- या विचारांत रस्त्यावरून जात असताना एकदा त्यांना एक गल्ले विकणारा माणूस दिसला. त्यातून त्यांना एक भन्नाट कल्पना सुचली. हे गल्ले मुलांना शाळांमधून वाटायचे आणि प्रत्येकाच्या गल्ल्यात जितके पैसे साठतील तेवढ्याची पुस्तकं मुलांना विकत द्यायची.
हेही वाचा - प्रदीप पाटील: ‘अक्षरयात्रे’चा ध्यास
या गल्ल्यांना त्यांनी ‘किडी बँक’ असं नाव ठेवलं. एकूण ५८ हजार किडी बँक स्वखर्चाने घेऊन त्यांनी मराठी आणि उर्दू शाळांमध्ये मुलांना मोफत वाटल्या. मुलांनाही वाचायची गोडी लागली होती. त्यामुळे त्यांनी आपापल्या गल्ल्यात पैसे साठवायला सुरुवात केली. एक महिन्यानंतर साठलेल्या पैशांतून हवी ती पुस्तकं विकत घेतली. हा प्रयोग यशस्वी झालाच, गुंतवलेले पैसेही वसूल झाले. आपण साठवलेल्या पैशातून घरी एकतरी पुस्तक आणलं, याचा मुलांना आनंद झाला. त्यांना बचतीचं महत्त्व कळलं. या उपक्रमामुळे मिर्झा यांना मुलांनी ‘गल्लेवाले अंकल’ असंही नाव देऊन टाकलं.
बाजारात नवीन पुस्तकं आली, की ओळखीचे प्रकाशक हक्काने मिर्झा यांना पुस्तकांसाठी फोन करायला लागले. पुस्तकांची मागणी वाढली. आतापर्यंत साडेपाच लाख पुस्तकांची विक्री त्यांनी केली आहे. तो एक विश्वविक्रमच झालाय.
नवनवीन पुस्तकांसाठी मिर्झा गेली वीस वर्षं 'दिल्ली वर्ल्ड बुक फेअर'ला जातात. एकदा तिथे त्यांना मानव संशोधन विकास मंत्रालय आणि उर्दू भाषा विकासतर्फे प्रकाशित ‘बच्चों की दुनिया’ हे उर्दू भाषेतलं मासिक मिळालं. बोधकथा, विज्ञानकथा, राजाराणीच्या गोष्टी, शास्त्रज्ञांच्या गोष्टी, आरोग्य, शेती… असं सगळं त्या रंगीत मासिकात होतं. ते मासिक त्यांना इतकं आवडलं की त्यांनी ते उर्दू शाळाशाळांपर्यंत पोहोचवायचं ठरवलं. त्यांनी तिथेच ५० मासिकांची मागणी केल्यावर प्रकाशक चकित झाले. त्यानंतर पाचशे, हजार असं करत करत २०१३ सालापर्यंत हा आकडा आठ हजारपर्यंत गेला. तेवढ्या प्रती उपलब्ध नसल्याने आगाऊ रक्कम देऊन मिर्झा यांनी त्या पुनर्मुद्रित करून घेतल्या. २०१४ मध्ये मिर्झा यांनी या मासिकाच्या लाखभर तरी प्रती मुलांपर्यंत पोहोचवल्या.
उर्दू शाळांमध्ये मराठी भाषेची आवड निर्माण होण्यासाठी त्यांनी त्या शाळांमध्ये ‘किशोर’ मासिक पोहोचवलं. मराठी दिनानिमित्त मराठी पंधरवडा या मोहिमेंतर्गत 'चला बोलूया मराठी', 'पुस्तकांची रॅली' या उपक्रमांबरोबरच स्वखर्चाने पंचवीस हजार पोस्टकार्डांचं वाटप करून मुलांना त्यावर मराठी भाषेत लिहायला प्रोत्साहन दिलं. महापुरुषांची जयंती साजरी करण्यासाठी त्यादिवशी प्रत्येकाने त्यांच्याबद्दलचं पुस्तक वाचण्याचा नवा पायंडा त्यांनी पाडला.
मिर्झा यांना त्यांच्या कामाबद्दल आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. वाचन चळवळीला वाहून घेतलेल्या मिर्झा यांच्यासारख्या एकांड्या शिलेदारांच्या कामाचं मूल्य करू तितकं कमीच.
शिल्पा दातार | 7020659314 | mrs.shilpapankaj@gmail.com
शिल्पा दातार या मुक्त पत्रकार आहेत.
