आम्ही कोण?
वीकेंड स्पेशल 

समलिंगी व्यवहार ही ‘विकृती' कशी?

  • अशोक रावकवी
  • 06.06.25
  • वाचनवेळ 8 मि.
ashok ravkavi

अशोक रावकवी हे समलिंगी व्यवहारांचे कट्टर पुरस्कर्ते आहेत. त्यांचे आपल्या समाजातील लैंगिक व्यवहारांबद्दलचे विश्लेषण काय आहे? समसंभोगी पुरुषांचा स्त्रियांकडे पाहण्याच्या दृष्टिकोन हा विषमसंभोगी पुरुषांपेक्षा अधिक निकोप का वाटतो? समाजाच्या एकूण लैंगिक व्यवहारांत ते स्वत:सारख्या लोकांना कुठे पाहतात? समाज त्यांना जे स्थान देतं त्याबद्दल त्यांना काय वाटतं?

‘लैंगिक संबंध' हा मोठा आवाका असलेला विषय आहे. समलिंगी संबंधांकडे विकृत म्हणून पाहणाऱ्यांचा भिन्नलिंगी व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन पाहून आम्हाला आश्चर्य वाटतं. विशेषतः पुरुष स्त्रियांकडे ज्या रीतीने पाहतात, त्यांना धक्के देतात, अश्लील हावभाव, कॉमेंट करतात, ही कोणती प्रकृती आहे? गंमत म्हणजे, लोकांना खरी विकृती यात आहे, हे लक्षातच येत नाही. समाजाचे दृष्टिकोन परंपरेने इतके घट्टपणे आपल्या डोक्यावर बसलेले असतात!

पुरुष हा मर्दानी, धडधाकट, आडदांडच असला पाहिजे आणि स्त्री ही नाजुक, कृशच असली पाहिजे, हा आपल्याकडे अगदी घट्ट असलेला समज आहे. ‘अनुरूप जोडीदार पाहिजे' म्हणजे असं. अशा पारंपरिक कल्पनेत बसणारे ते अनुरूप. स्त्री जरा धडधाकट, पुष्ट असली की, ती ‘बिनकामाची' ठरते. पुराणांतही बघा. ‘चेटकीण' कशी रंगवली आहे? बलदंड स्त्रीकडे ‘चेटकीण' म्हणून पाहणारा समाज, आणि त्याचा लैंगिक दृष्टिकोन सुसंस्कृत आहे, असं कोणत्या आधारावर म्हणणार? भिन्नलिंगी संबंधांनाच मान्यता देणाऱ्या समाजाचा स्त्रीकडे बघण्याचा हा दृष्टिकोन आमच्यासारख्या समसंभोगी लोकांना विकृत वाटतो. समसंभोगी पुरुषांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यापेक्षा कितीतरी दोषरहित आहे.

समलिंगी संभोग म्हणजे काहीतरी अचाट विपरित असल्याची भावना समाजात व्यक्त होते. खरं तर ते तेवढं विपरित नाही. पाश्चिमात्य संस्कारांच्या, विचारांच्या प्रभावाने आपल्यात घुसलेलं हे फॅड आहे. खरं तर, भारतात समलिंगी संबंध हे अप्रूप नाही. प्राचीन काळी त्याचे पुरावे सापडतात आणि समाजाने सर्व काळात त्याला अप्रत्यक्ष मान्यता दिली असल्याचे दाखलेही मिळतात. दक्षिणेत ज्याला मोठ्या भक्तीभावाने पूजलं जातं तो देव अयप्पा ‘हरिहर पुत्र' असल्याचे उल्लेख आहेत. वेदांनी तर ‘विकृती एवम्‌‍ प्रकृती' असं लिहूनच ठेवलं आहे. पण लैंगिक विषयावर बोलायला, लिहायला लोक आपल्याकडे घाबतात. त्यात एखाद्या महनीय व्यक्तीचे लैंगिक विचार, दृष्टिकोन मांडणं म्हणजे तर कठीणच. एखाद्या थोर व्यक्तीचं सगळं जीवनचरित्रं लिहिलं जाईल. त्यांचं सगळं कार्य, त्यामागचा दृष्टिकोन, त्यांचे जीवनविषयक, सामाजिक विचार मांडले जातील. त्यांच्यावर चर्चाही होईल. फक्त, त्याच्या लैंगिक दृष्टिकोनाला कोणी हात लावणार नाहीत. भोंदुपणाशिवाय याला आणखी काय म्हणणार?

पूर्वी आपल्याकडे एकत्र कुटुंबपद्धती होती. त्या कुटुंबात आमच्यासारख्या समसंभोगींची उत्तम सोय होती. कुटुंबाच्या रचनेतच आम्हाला अगदी व्यवस्थित स्थान होतं. एखादा काका-आजोबा-चुलतचुलत कोणीतरी लग्न न केलेला, अविवाहित राहायचा. मोठ्या कुटुंबात त्याचं सगळं सहजपणे चालून जायचं. अप्रत्यक्ष, नेणीवेच्या पातळीवर सर्वांनीच त्याचं तसं असणं, त्याच्या स्वाभाविक गरजा मान्य केलेल्या असायच्या. त्यामुळे फार समस्या निर्माण व्हायच्या नाहीत. पण गेल्या शतकात युरोपातून आपल्याकडे विभक्त कुटुंबपद्धती आली. वाढतं औद्योगिकीकरण, नागरीकरण यांमुळे त्याला पोषक अशीच ही कुटुंबपद्धती होती. या कुटुंबपद्धतीतून नवेच प्रश्न निर्माण झाले. समसंभोगी लोकांची फार गोची झाली. नवरा-बायको आणि त्यांची लहान मुलं, या रचनेत आम्हाला स्थानच उरलं नाही. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. कुटुंबात सामावलेली आमची स्थानं कुटुंबाबाहेर, रस्त्यावर आली. त्याची चर्चा वाढली आणि आपोआपच जाहीर दांभिक विरोधही वाढला.

मुंबईच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवरच्या मुताऱ्यांतून आज काय चालतं तुम्हाला माहीत आहे? सगळं हेच चालतं. त्याला इलाज नाही. आम्हाला आधार देईल अशी कोणती व्यवस्थाच या समाजात राहिली नाही. मग, आपोआपच ही माणसं रस्त्यावर आली. आता ते नवी आधार व्यवस्था निर्माण करू पाहताहेत. समलिंगी संभोगींची जागतिक पातळीवर संघटना आहेच. आम्हीही इथे काम करतो. परस्परांना आधार देण्याबरोबरच काही अन्य बाबींकडेही लक्ष देतो. केवळ उथळ मस्ती म्हणून लोकांनी अडचणीचे प्रश्न निर्माण करू नयेत यासाठी आम्ही वेगवेगळे प्रयत्न करत आहोत. प्लॅटफॉर्मवरच्या मुताऱ्यांबाहेर आम्ही कंडोम वाटतो. ते कसे वापरायचे ते सांगतो. त्या संदर्भातलं साहित्य आकृत्यांसह आम्ही छापलं आहे. एड्सचा प्रसार हा मोठा धोका आहे. कंडोम हे त्यासाठी चांगलं प्रतिबंधक साधन आहे. पण लोक साधारणतः त्याकडे गर्भनिरोधक म्हणूनच पाहतात. ‘ये तो सिर्फ मस्ती है. इससे क्या होता है?' असं त्यांचं विचारणं असतं. आम्ही त्यांना समजावून देतो.

१० लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेली पन्नास शहरंही १९५५ मध्ये नव्हती. आता अशा शहरांची संख्या २५० पर्यंत गेली आहे. समलिंगी संभोगींची संख्या आपोआपच वाढली आहे. छोट्या घरांत जागा नाही. आम्हाला लग्न करायचं नाही. लग्न न करता एकट्याने राहिलं तर छोट्या छोट्या घरात विभागलेला हा प्रचंड लोकसंख्येचा समाज विचित्रपणे पाहतो. समाजाचा बिल्कुल आदर नाही. अशावेळी आधारव्यवस्था म्हणून संघटनेला पर्याय नाही, असं आम्हाला वाटतं.

आपल्या समाजाबाहेर पाहिलं तर, तिथेही समलिंग संभोगाची परंपरा आहे. प्राचीन काळी साहजिकपणेच याला धार्मिक संदर्भ दिले गेले होते. काही ठिकाणी काही वेळा सकारात्मक, काही ठिकाणी काही वेळा नकारात्मक. ख्रिस्तपूर्व ५०० वर्षांपूर्वी पोपने समलैंगिक संबंधांचे परिणाम भूकंप, पूर म्हणून दाखवले होते. तुम्हाला जर स्वर्गात जायचं असेल तर तरुण मुलं आणि मद्यपानापासून दूर राहा असं कुराणातच सांगितलं आहे. १ लाख ८० हजार समलिंगी संभोगींना हिटलरने त्याच्या हत्यासत्रात यमसदनाला पाठवलं, अरबांमध्ये समलिंगी संभोगाला केवढा इतिहास आहे, हे प्रसिद्धच आहे. समलिंगी संभोगींची ही परंपरा जगातल्या सर्व भागांत, सर्व देशांत पूर्वापार आहे. मला वाटतं, हिंदू आणि बौद्ध तत्त्वज्ञानाने, धर्माने या प्रकाराला बऱ्यापैकी समजावून घेतलं. ख्रिश्चन आणि इस्लाम धर्माने मात्र फार क्रूरपणे समलिंगी संभोगींना वेगळं काढलं. धार्मिक आधारावरच त्यांना गुन्हेगार ठरवलं आणि समाजापासून वेगळं काढलं.

धर्माने आपल्या मूळ तत्त्वज्ञानातच समलिंगी संभोग हा गुन्हा मानला असला तरी, त्यामुळे त्याला प्रतिबंध झाला असं नाही. विवाहित समलिंगींचं सर्वात जास्त प्रमाण आज लखनौत आहे. मुंबईत उच्चभ्रू पंचतारांकित संस्कृतीत तर समलिंगींची रेलचेल आहे. चित्रपटसृष्टीतले ९९ टक्के मेकअपमन्स समलिंगी असल्याचं सांगितलं जातं. जाहिरात क्षेत्रात मॉडेलिंग करणाऱ्या मुलींची तर तक्रार आहे ‘इसमें एकभी मर्द नहीं!' आधुनिक समाजातलं समलिंगी संभोगी विश्वाचं हे रूप पाहताना काही गोष्टींवर गंभीरपणे संशोधन व्हायला हवं. उदाहरणार्थ, वैद्यकीय क्षेत्रात, विशेषतः न्यूरोसर्जरी, कार्डीआक सर्जरीच्या क्षेत्रातले ६० टक्के तज्ञ समलिंगी संभोगी का? मॅरेथॉनपटू, जलतरणपटू, गिर्यारोहक यांच्यातही हे प्रमाण ७० ते ८० टक्क्यांपर्यंत का जातं?

आमची जमात अल्पसंख्यांक आहे खरी, पण अल्पसंख्यांक समाजाने कसं जगायला हवं, याचा वस्तुपाठ आम्ही समाजाला देतो आहोत. आम्ही सहजपणे लक्षात यावं असे ओळखू येणारे नाही. मुस्लिम, शीख डोळ्याने पटकन ओळखता येतात. त्यामुळे, त्यांना अल्पसंख्यांक म्हणून सहजपणे ओळख मिळते. आम्हाला तशी ओळख नाही. पण तरीही आमची संख्या कमी नाही. पुरुष लोकसंख्येच्या दहा टक्के लोकसंख्या समलिंगी संभोगींची आहे. आमच्या मागण्या इतर अल्पसंख्यांक्यांसारख्या नाहीत. नोकरीत, व्यवसायात लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा आम्ही मागत नाही. पण, संख्येच्या प्रमाणात स्थान आणि मान्यता मात्र मिळायला हवी. १९८९ मध्ये माँट्रियलला पाचवी जागतिक एड्स परिषद झाली. अमेरिकेत समलिंगी संभोगींचं प्रमाण एकूण लोकसंख्येच्या किमान ६० टक्के तरी असेल. पण, तरीही त्यांच्या वाट्याला सरकारी निधी येतो अवघा ६ टक्के! आम्ही अभिजात अल्पसंख्यांक आहोत. जगातली वेगवेगळी सरकारं आमचा उपयोग करून घेतात. राजकीय मान्यता तेवढी देत नाहीत. राजकीय मान्यता देण्याचा प्रश्न आला की, मग एकदम हल्ला सुरू करतात. नष्ट करण्याची भाषा सुरू करतात. रशियन सरकारने ब्रिटनमधून खास समलिंगी संभोगींची लष्करात भरती केली होती. आपल्याकडेही सरकार नक्षलवादी दलम्मधे समलिंगी संभोगींना घुसवतात आणि त्यांचा उपयोग करून दलम्‌‍ फोडतात...

म्हणूनच समलिंगी संभोग हा ‘प्रश्न' मानायचं काही कारण नाही. हा प्रकार कधीच नव्हता असं नाही आणि तो ‘नाहीसा करू' प्रकारच्या मानसिकतेला, धोरणांना आणि प्रतिज्ञांनाही काही अर्थ नाही. मुळात ही एक मनोअवस्था आहे. आतून उमलून आलेली अवस्था आहे. त्याला उपाय त्याच पातळीवर असू शकतो. आणि तसा उपाय नाही, हे स्पष्ट आहे. त्यासाठीचे सर्व प्रयोग अयशस्वी झाले आहेत. रक्त, हार्मोन्स, मनाच्या सगळ्या चाचण्या झाल्यात. पण, त्यात वेगळं-विकृत असं कुणालाच काही सापडलेलं नाही.

समलिंगी व्यक्तीच्या विचाराची, दृष्टिकोनाची, लैंगिक आकलनाची दिशा बदलण्याचे बरेच प्रयत्न झाले. पण ते अजून तरी कुठेही यशस्वी झाले नाहीत. मनाची घडी, लैंगिक दृष्टिकोनाची दिशा अशी सहजासहजी बदलता येत नाही. आज उपाय म्हणून भीती निर्माण करतात, ‘शॉक ट्रीटमेंट' देतात. पण त्याने काही होत नाही. दिमाग के अंदर चलनेवाला चलताही रहता है।

समलिंगी लग्न करत नाहीतच असं नाही. अनेकांची लग्न झाल्यानंतर ही रुची वाढीला लागते. एका प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या पत्नीने न्यायालयात नवरा नपुंसक आहे, या सबबीखाली घटस्फोटासाठी अर्ज केला होता. प्रत्यक्ष सुनावणीवेळी न्यायाधीश म्हणाले, हे काही घटस्फोटासाठी कारण होऊ शकत नाही. नपुंसकत्वावर आता उपाय आहेत. क्रिकेटपटूच्या त्या पत्नीने त्यावेळी न्यायाधीशाला दिलेलं उत्तर फार मार्मिक होतं. ती म्हणाली, ‘ही इज इंपोटेंट ओन्ली अबाऊट वुमेन!'

‘महाराष्ट्र श्री' आणि ‘मुंबई श्री'च्या स्पर्धा म्हणजे कसलं प्रदर्शन असतं? पुरुषांचे स्नायू आणि उघड्या शरीराचे अवयव पाहून जमाव टाळ्या पिटत असतो, शिट्या वाजवत असतो, तो कशासाठी? ही स्पर्धा संपल्यानंतर काय होतं तुम्हाला माहीत आहे!... तेव्हा सांगण्याचा मुद्दा एवढाच, समलिंगी संभोगींची भरती अशी वेगवेगळ्या माध्यमांतून चहूबाजूंनी सुरूच असते. सुरूच आहे. या समाजात भविष्यात आम्हाला निश्चित स्थान मिळेल. सन्मानाचं स्थान मिळेल हेही निश्चित. त्यासाठी वेगळ्या पद्धतीने लढा द्यावा लागेल.

या समाजाने आम्हाला पाश्चिमात्य समाजासारखं वेगळं काढलेलं नाही. या समाजाचंच आम्हीही एक अंग आहोत. कुणाचे तरी मुलगे आहोत. कुणाचे तरी भाऊ आहोत. आमच्यात आणि इतरांच्यात फरक फार नाहीच. असलाच, तर फक्त दृष्टिकोनाचा, समाजाकडे बघण्याचा आहे!

मुलाखत व शब्दांकन : पद्मभूषण देशपांडे

(अनुभव, दिवाळी १९९७च्या अंकातून साभार)

अशोक रावकवी







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 1

Bhaurao bende 01.10.25
खुप चांगला लेख आहे

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results