आम्ही कोण?
वीकेंड स्पेशल 

असा उभा राहिला अन्नपूर्णा परिवार

  • डॉ. मेधा पुरव सामंत
  • 08.03.26
  • वाचनवेळ 21 मि.
swayampurna

अन्नपूर्णा परिवाराची स्थापना झाली त्याच वर्षी 'राष्ट्रीय महिला कोष' (आर.एम.के.) स्थापन झाला. मागोमाग 'राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास वित्तसंस्था' (एन.एम.डी.एफ.सी.) स्थापन झाली. अन्नपूर्णा परिवाराच्या प्रयोगाला सुरुवातीची काही वर्षं आर.एम.के.तून ४ टक्के व्याजाने निधी मिळायचा. परंतु मायक्रो फायनान्समध्ये सातत्याने वित्तपुरवठा व्हावा लागतो. एक कर्ज फेडलं की महिलांना लगेच पुढील जादा रकमेचं कर्ज पाहिजे असतं. आर.एम.के.ची बोर्ड मीटिंग झाल्याशिवाय पुढील कर्जाची मंजुरी मिळत नसे. त्यादरम्यानच्या काळात या महिलांना पुन्हा खासगी सावकाराकडे जाण्याशिवाय पर्याय राहिला नसता. त्यामुळे सभासदांच्या कर्जसाखळीत अंतर पडू नये असं माझं मत होतं.

सुरुवातीला अन्नपूर्णा परिवाराची सबकुछ मीच होते. कर्जवाटपासाठी मी माझ्याच खिशातले पैसे घालायचे, लिखापढी मीच करायचे, वसुलीला जाणारी मीच आणि नवीन वस्त्यांमध्ये अन्नपूर्णाची माहिती देऊन गट करायला शिकवणारीही मीच, अशी स्थिती होती. शेवंताबाई, लक्ष्मीबाई, जहिदाबी, पाटीलबाई, सोजरबाई या माझ्या सहकारी. त्यांच्यापैकी फक्त पाटीलबाईंना लिहिता-वाचता येत होतं, बाकी सगळ्या अंगठेबहाद्दर. पण सर्वांचा उत्साह मात्र दांडगा होता. या माझ्या मैत्रिणी मला पुण्यातील वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये त्यांच्या ओळखीच्या, नात्याच्या, भाजीवाल्या, फुलं-फळं विकणाऱ्या, मासेवाल्या, कोंबड्या-बकऱ्या पाळणाऱ्या महिलांकडे घेऊन जायच्या. 'ताईचं पैसं घेऊन धंदा करा, ताईच्या पैशाला बरकत हाय,' अशी माझी ओळख करून द्यायच्या. त्यांच्या बोलण्यातील अंधश्रद्धेचा भाग माझ्या तत्त्वांविरुद्ध होता, पण त्यामागील कळकळ मनाला भिडत होती. त्यांना वाटे, मेधाताईचं काम खूप वाढावं आणि आपल्यासारख्यांची गरिबी दूर व्हावी.

अनेक अडचणी, मजेदार अनुभव यांनी भरलेले दिवस होते ते. कर्ज घ्यायला महिला, त्यांचे नातेवाईक दूरदूरून यायचे. आमची दगडाच्या सिंहासनाची बैठक, मोडकी टेबलं अशी ८ बाय ८ ची बँक बघून ते चाट पडायचे. मी त्यांना या कामाचं महत्त्व समजावून सांगितलं की ते सगळे भारावून जायचे, आपलेसे होऊन अन्नपूर्णा परिवाराशी जोडले जायचे. अर्थात प्रत्यक्ष कर्जवाटपापूर्वी मी त्यांच्या वस्तीत किमान चार-पाच वेळा जात असे. त्यांची वस्ती, घरांमधली परिस्थिती याचा माझ्या पद्धतीने अभ्यास करत असे. त्यांच्या वस्तीतल्या, ओळखीच्या महिलांचा गट का बनवायचा, कसा बनवायचा याचं छोटं प्रशिक्षणच मी देत असे. मग त्या आपला गट बनवून पुन्हा मला फोन करून बोलवायच्या- "ताई, गट बनवलाय. समद्यांची घरं बघायला कवा येनार?" मग मी प्रत्येकीच्या घरी जाऊन त्यांची माहिती घ्यायचे. कुटुंबात किती माणसं, त्यातली कमावणारी किती, काय कामधंदे करतात, उत्पन्न किती, कर्ज घेऊन त्यातून काय करणार, हप्ता किती रकमेचा, किती महिने भरणार, गटातल्या एका महिलेने हप्ता भरला नाही तर इतर महिला तिला मदत करणार का, अशी सगळी माहिती मी लिहून घेत असे. या माहितीच्या आधारेच मी अन्नपूर्णा परिवारात (थोडीशी बँकेच्या पद्धतीने) कर्जमंजूरी प्रक्रिया रचत गेले. अर्थात त्यासाठी मलाच गरजेनुसार बरेच फॉर्म्स घडवावे लागले- गृह तपासणीचा फॉर्म, गट बांधणी फॉर्म, कर्जमंजुरीचा फॉर्म वगैरे. हे फॉर्म्स मी अनुभवातून बनवत, सुधारत गेले.

हेही वाचा - ‘मी क्रांती, मी संघर्ष’: प्रतिसरकारमधल्या लढवय्या स्त्रीची कहाणी

या सगळ्या प्रक्रियेत ८-१० दिवस जात. मग त्यानंतर त्या गटाला गोपीनाथ नगरच्या ऑफिसमध्ये बोलावलं जायचं. गटातील महिलांनीच एकमेकींच्या कर्ज अर्जावर जामीनदार म्हणून सह्या करायच्या, असं सर्वांना सांगितलेलं असे. त्याचबरोबर प्रत्येक कुटुंबातील एक जामीनदार, शक्यतो पती- पण तो हयात नसेल किंवा खूपच व्यसनी असेल तर थोडा जाणता मुलगा/मुलगी यांनी ऑफिसमध्ये येणं अपेक्षित असे. असे सर्वजण गोपीनाथ नगरला येत आणि कर्ज घेऊनच जात. सुरुवातीच्या सभासदांनी गोपिनाथ नगरच्या त्या ऑफिसला 'ताईचा डोंगरावरचा बंगला' असं नाव दिलं होतं.

सुरुवातीच्या खटपटीदरम्यानच 'कम्युनिटी मीटिंग' हे आणखी एक तंत्र मला सुचलं. काम सुरू केल्यावर मला जाणवायला लागलं होतं, की गरीब वस्तीतल्या या महिलांचे पुष्कळसे प्रश्न समान होते. त्यांचं काम कोणतंही असो, अंधश्रद्धा, व्यसनं, कुपोषण, आरोग्याचा अभाव या त्यांच्या समस्या निव्वळ कर्जपुरवठा-आर्थिक विकास या साखळीतून सुटणाऱ्या नव्हत्या. वस्ती पातळीवर सर्वच गटांनी एकत्र येणं; चर्चा, सहमती, ज्ञान-शिक्षण यातूनच हळूहळू सर्वांगीण विकासाकडे त्यांची वाटचाल होऊ शकते, या विचारातून आणि विश्वासातून मी बऱ्याच गटांची एकत्र मासिक मीटिंग घ्यायला सुरुवात केली.

आधी मीच महिन्यातून एकदा अशी कम्युनिटी मीटिंग घ्यायचे. (पुढे स्टाफ आणि बँचेस वाढल्यावर मी यात बदल केला. आमच्या २२ ब्रँच ऑफिसेसमध्ये ब्रँच मॅनेजर दरमहा कम्युनिटी मीटिंग घेतात. लेखी सर्क्युलर्स मी लिहून द्यायला सुरुवात केली. अलीकडे मी व्हिडिओ करून देते - ज्यातून समाज, देशपातळीवरील घडामोडींची माहिती, ज्ञान देते.) मी सुरुवातीपासूनच सभासद महिलांशी सातत्याने संवाद करण्यावर भर देत आले आहे. कारण आपलं जीवनविश्व वेगळं असतं. आपल्या ऑफिसच्या खुर्चीत बसून त्यांच्या अनुभवांची नुसती कल्पना करून भागणार नाही हे मला कळत होतं. त्यामुळे माझा त्यांच्या अनुभवाच्या शाळेवर, संवादावर खूप विश्वास होता. अजूनही आहे. टॉप टु बॉटम, बॉटम टु टॉप असा संवाद ठेवल्यामुळेच आजवर 'अन्नपूर्णा'चे सगळे प्रकल्प यशस्वी झाले आहेत.

'अन्नपूर्णा परिवारा'ची सुरुवात तर झाली. त्यात शेवंताबाईंचा गट सर्वांत पहिला. दुसरा गट होता पार्वतीबाई कडू, सुशीला साळेकर, दीक्षितबाई आणि आणखी दोन-तीन जणींचा. त्यानंतर भाजी मंडईमधल्या पाटीलबाईंनी स्वतःहून माझ्याशी ओळख करून घेतली. त्यांचं शिक्षण दहावीपर्यंत झालेलं. पण त्या अनाथ होत्या, त्यामुळे त्यांचं लहान वयात लग्न झालं होतं. नवरा अगदीच अडाणी, पहिलवान, काहीच स्थैर्य नसलेला. दोन मुलगे होते, पण एकंदर संसार म्हणजे डगमगती नौकाच. अशातही पाटीलबाईंचा स्वभाव मजेदार, बोलका ! भाजी मंडईमधल्या सगळ्या बाया त्यांना 'रंजा, रंजा' म्हणून हाक मारत. कोणाला हिशोब समजावून सांग, कोणाला काही कळत नसेल तर पटवून सांग, असं त्यांचं मिळून मिसळून वागणं होतं. 'कसली स्कीम आहे तुमची?' असं मला विचारताना त्यांच्या चेहऱ्यावर खूप बेरकी भाव होता. मग मी तिथेच त्यांच्यासमोर पोत्यावर बसून त्यांना 'अन्नपूर्णा परिवारा'ची योजना सांगितली. त्यावर त्यांनी भरपूर चौकश्या केल्या कुठली संस्था, कुठे ऑफिस, किती व्याज, काय नि काय। मीही सगळं अगदी खरं, मोकळेपणाने सांगत गेले. मग काय, पुढच्या आठ दिवसांत त्यांनी स्वतःचा एक गट तयार केलासुद्धा. त्यांच्या गटाने कैकदा कर्ज घेतलं, फेडलं. त्या खूप गप्पिष्ट होत्या. केवळ त्यांच्यामुळे पुढे अन्नपूर्णाचे गट पार पद्मावतीपर्यंत पसरत गेले. एवढंच नव्हे, तर त्यांनी मार्केटमध्ये हप्ते गोळा करणं, हिशोब लिहून ठेवणं अशा कामातसुद्धा मला मदत करायला सुरुवात केली. अशा प्रकारे पाटीलबाई अन्नपूर्णा परिवाराच्या प्रचारक व कार्यकर्त्या बनल्या. पुढे तर त्यांनी अन्नपूर्णाला अगदी वाहून घेतलं. annapurna medha samant

पौड फाटा भाजी मार्केटमधील पुढचा गट म्हणजे लीलाबाई ढोक आणि त्यांच्या गटातील चार-पाच महिला. या थोड्याशा श्रीमंत भाजीवाल्या ! म्हणजे काय, की त्या सगळ्यांकडे छान रंगवलेली चारचाकी हातगाडी होती. तिच्यावर सर्व प्रकारची ताजी, टवटवीत भाजी मांडलेली असे. हिरवा मटार, फ्लॉवर, टोमॅटो अशा महाग भाज्यासुद्धा सदासर्वदा त्यांच्या गाडीवर असत. त्यांची आमदनी ठीकठाक असावी, कारण त्या कधीच अण्णाकडून कर्ज घेत नसत.

गोऱ्या, सडसडीत बांध्याच्या, मोठं लाल कुंकू लावणाऱ्या, देखण्या, मध्यम वयाच्या लीलाबाई तशा स्वतःच्या रुबाबात वागत. त्यामुळे आमचे पहिले चार-पाच गट होईपर्यंत त्यांनी आमची अजिबात दखल घेतली नव्हती. उलट, शेवंताबाई. लक्ष्मीबाई या मंडळींचं काय काय चाललंय ते त्या थोड्याशा कुत्सितपणानेच पाहत असत. पण पाटीलबाई आमच्यात आल्या आणि लीलाबाईंसह उर्वरित मार्केटमधील उच्चभ्रू मंडळींचा नूर पालटला. 'शिकलेली रंजा या ताईंच्या कर्जात घुसली, म्हणजे यात काही तरी दम दिसतोय,' अशा विचाराने या मंडळींनी पाटीलबाईंकडे आमची चौकशी सुरू केली. कुठली संस्था, ऑफिस कुठे, व्याजदर काय, अशा सगळ्या चौकशा करून खातरजमा केल्यानंतर मग त्या सर्वांचेही गट कर्ज घ्यायला लागले.

अशा प्रकारे पहिल्या एका वर्षातच आम्ही पूर्ण पौड फाटा भाजीमंडई, त्याच्या मागच्या बाजूला वसलेली एस.एन.डी.टी.वस्ती (एस.एन.डी.टी. विद्यापीठाच्या शेजारी वसल्यामुळे ती वस्ती त्याच नावाने ओळखली जायची), समोरच्या बाजूला दशभुजा गणपतीच्या शेजारी वसलेली खिलारे वस्ती, इथल्या २५०- ३०० कुटुंबांपर्यंत पोहोचलो. तसंच शेवंताबाई-लक्ष्मीबाई या जोडगोळीच्या ओळखीची-नात्याची कुटुंबं जिथे जिथे होती तिथेही गट तयार झाले, कर्ज दिली गेली. त्यामुळे औंध भागातील आय.टी.आय.च्या समोर आय.टी.आय. नावाचीच ७०-८० कुटुंबांची छोटी वस्ती 'अन्नपूर्णामय' झाली. तिथून मग एकमेकींच्या ओळखीने औंध गावठाण, संजयनगर, कस्तुरबा व इंदिरा वसाहत, आंबेडकर नगर असा आमचा प्रचार व प्रसार होत गेला.

पाटीलबाईंच्या ओळखीने मी पद्मावतीला तळजाई माता वसाहतीत गेले. तिथे चावीवाले कांबळे आणि त्यांची पत्नी सोजरबाई कांबळे हे उत्साही जोडपं भेटलं. त्या वस्तीत सोजरबाईंनीच पहिला गट बनवला. त्या स्वतः बकऱ्या, कोंबड्या पाळायच्या. चौकात गाडी लावून पेरू, बोरंसुद्धा विकायच्या. त्यांच्या गटातील इतर महिला भंगार वेचायच्या, झाडूकाम करायच्या. त्यांच्यापासून सुरुवात होऊन तिथेही हळूहळू आमची अन्नपूर्णा पसरली. मग मार्केटयार्ड, अपर इंदिरानगर अशा अवतीभवतीच्या वस्त्यांमधून महिला मला भेटायला यायला लागल्या, गट बनवायला लागल्या. हळूहळू गट कसा बनवायचा ते या महिला एकमेकींना आपणहून शिकवायला लागल्या. ओळखीच्या महिलांना जमा करून, गट बनवून मगच त्या मला साद घालायच्या.

हेही वाचा - उपेक्षित स्त्री शास्त्रज्ञ आणि ‘मॅटिल्डा इफेक्ट’

अन्नपूर्णाच्या सभासद महिलांच्या या सर्वच वस्त्या उच्चभ्रू सोसायट्यांच्या सावलीला उभ्या होत्या. कोथरूडमधल्या हॅपी कॉलनीला लागून असणारी गोसावी वस्ती, डहाणूकर कॉलनीच्या भिंतीला लागून लक्ष्मीनगर वस्ती अशा इतरही अनेक. सोसायटीमधल्या लोकांना कष्टाच्या कामांसाठी माणसं मिळतात आणि वस्तीतल्या लोकांना काम मिळतात, असं त्यामागचं देवाणघेवाणीचं गणित. उच्चभ्रू कॉलनी कुठे संपते आणि वस्ती कुठे सुरू होते हे तिथल्या रस्त्यांमुळे लगेच कळायचं. वस्तीतले रस्ते खड्ड्यांनी आणि डबक्यांनी भरलेले असायचे. तिथल्या गल्ल्या म्हणजे एक माणूस कसाबसा जाऊ शकेल अशी बोळीच.

सुरुवातीला मी गोसावी वस्तीतल्या शेवंताबाईंच्या छोट्याशा खोलीत आठ-दहा बायकांसह दाटीवाटीने बसायचे. मी त्याला गोणपाटावरची बैठक म्हणायचे. बायका गोलातली मीटिंग म्हणायच्या. मातंग, महार, बौद्ध, ख्रिश्चन, कर्नाटकी अशा विविध समाजांतल्या बाया अन्नपूर्णाशी जोडल्या गेल्या होत्या. कुणाचे कान चार ठिकाणी टोचलेले, कुणाच्या उजव्या नाकपुडीत भल्या थोरल्या चमक्या, कुणाची गोल साडी, कुणाची घोट्यापर्यंत साडी, तर कुणाचा डोक्यावरून पदर. कुणाच्या मराठीला कानडी हेल, कुणाची दखनी मराठी, कुणाच्या तोंडात इरसाल शिव्या; पण त्या एकत्र येऊन गट तयार करायच्या. कारण कित्येक वर्षं वस्त्यांमध्ये त्या एकमेकींच्या शेजारी राहत होत्या. त्या एकमेकींची सुखदुःखं वाटून घ्यायच्या, प्रसंगी भांडून पुन्हा एक व्हायच्या. माझी त्यांच्याशी मैत्री झाली तसं त्यांच्यातलं वेगळेपण आणि सारखेपण असं दोन्ही मला उमगत गेलं. त्यांच्या आयुष्यातले कष्ट आणि आर्थिक प्रश्न मी फार जवळून बघितले. 'अन्नपूर्णा परिवार'सारख्या संस्थेची गरज माझ्या मनात अधिकाधिक ठळक होत गेली.

या बायका उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये धुण्या-भांड्याची, स्वयंपाकाची, इमारती झाडण्याची कामं करतात. सुशिक्षित लोकांशी संपर्क आल्याने त्यांना शिक्षणाचं महत्व काही प्रमाणात समजलेलं असतं. त्या-त्या घरची सुशिक्षित माणसंही या बायकांना मुलांच्या शिक्षणासाठी किंवा आजारपणात काही प्रमाणात मदत करतात, चार समजुतीच्या गोष्टी सांगतात. त्यामुळे सुशिक्षित घरांमध्ये काम करणाऱ्या बायांची घरं तुलनेने वेगाने वर येतात. या उलट परिस्थिती हायवेलगतच्या पाटील इस्टेटसारख्या वस्तीची असते. इथे जवळपास सुशिक्षित वस्ती नाही. इथल्या महिला-पुरुषांमध्ये भंगार व्यवसाय करणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे इथे तुलनेने प्रगतीचा वेग कमी दिसतो असं माझ्या लक्षात आलं.

लक्ष्मीनगरमध्ये एक मातंग सभासद होती. तिला मी माझ्याकडे झाडण्या-पुसण्याच्या कामासाठी बोलावलं. नंतर त्यांच्या दोन मुली कमल आणि हेमा यांना ८-१० वर्ष माझ्याकडेच ठेवून घेतलं. या दोघींना मी माझ्या मुलीच असल्याप्रमाणे सांभाळलं, सगळं शिकवलं. त्यांनी शाळेचं तोंडही पाहिलेलं नव्हतं. घरी अशिक्षित आई-बाप, खंडीभर भावंडं; पण या मुली शिकून खूप हुशार झाल्या. पण शेवटी आई-वडिलांनी सोळा-सतराव्या वर्षी त्यांची लग्नं लावून दिली. त्यानंतर त्यांना खडतर आयुष्याला सामोरं जावं लागलं. मातंग समाजातल्या बायांना तेव्हा सोसायटी झाडणं, कचरा गोळा करणं, अशासारखी कामं मिळायची, पण स्वयंपाकाची कामं मिळायची नाहीत. तथाकथित उच्चवर्णीयांच्या सोवळ्याओवळ्यात ते बसायचं नाही. आपल्यापासून सुरुवात करावी म्हणून मी त्या दोन मुलींना माझ्या घरी स्वयंपाकासाठी बोलावत असे. गरीब वस्त्यांमधल्या स्वच्छतेविषयी उच्चभ्रू लोक नाकं मुरडतात. पण अरुंद रस्ते, उघडी गटारं, सांडपाण्याची व्यवस्था नाही, एवढंच कशाला, पाण्याची देखील सुविधा नाही, अशा परिस्थितीत माणसाने चकाचक स्वच्छता कुठून आणायची? तरी इतरांनी कधी तरी त्यांच्या एवढ्याशा आठ बाय दहाच्या घरात जाऊन बघितलं तर कळेल, की त्यांनी घर अतिशय स्वच्छ आणि नेटकं ठेवलेलं असतं. लक्ष्मीनगरमधल्या काही मुलांना जयंतने 'नासान'मध्ये काम दिलं. २५ वर्षं झाली, त्यातले काहीजण आजही तिथे काम करत आहेत. त्यांनी वस्ती सोडून दुसरीकडे फ्लॅटसुद्धा घेतले आहेत. आजही माझ्या घरी स्वयंपाकापासून इतर सर्व कामं मातंग समाजातल्या स्त्रियाच करतात. मी आणि जयंतने लग्न झाल्या झाल्याचं ठरवलं होतं की आपण एकच मूल होऊ द्यायचं, मग तो मुलगा असो वा मुलगी. पण जमेल तेवढ्या गरीब मुला-मुलींना शिक्षणासाठी मदत करायची. पुढे आम्ही शिरवळच्या रूपा-शिल्पा या दोन मुलींना १२-१४ वर्ष आमच्याच घरी ठेवून शिकवलं. बेळगावचे दोन मुलगे मारुती आणि परशुरामही आमच्याकडेच लहानाचे मोठे झाले.

हेही वाचा - कोण म्हणतं स्त्रियांना विनोदबुद्धी नसते ?

वस्त्यांबद्दल बोलता बोलता जरा विषयांतर झालं.

अन्नपूर्णाच्या कामाच्या निमित्ताने एकेका वस्तीशी आमचं नातं तयार होत होतं. लक्ष्मीनगर, रामनगर, किष्किंधानगर, पद्मावती या सगळ्या डोंगरावरल्या वस्त्या. किष्किंधानगरला तर चढावर सगळा कोबा केलेला. बाहेरचा एखादा माणूस चुकून त्या रस्त्याने गेलाच तर हमखास धडपडणार अशी अवस्था. पण मी हे डोंगर चढून सगळ्या वस्त्यांमध्ये जायचे. वस्तीतल्या बायका पाण्याच्या कळश्या डोक्यावर घेऊन इथून चढून जातात, सामानाची ओझी नेतात, मग आपण सड्या चालू शकत नाही का, असं म्हणून मी चप्पल काढून, पदर खोचून चालत सुटायचे.

दारूचे गुत्ते नाहीत अशी एकही वस्ती यात नसेल. मी कित्येकदा संध्याकाळी उशिरा वस्त्यांमध्ये जायचे. 'तुम्हाला वस्तीतल्या गुंडांची भीती नाही वाटली का?' असं मला कित्येकजणांनी विचारलं. पण या गुंडांच्या आया अन्नपूर्णाच्या सभासद असायच्या. त्यामुळे मला भीती नसायची. एक प्रसंग सांगते. औंधमधल्या वस्तीत असाच एक २२-२४ वर्षांचा गुंड होता. आमची गोलातली मीटिंग सुरू झाली की तिथे येऊन उभा राहायचा. त्याच्या हातात हमखास एखादं शस्त्र असायचं. मीही तेव्हा वयाने जास्त नव्हते - पस्तीसेक वर्षांची असेन. मी त्याला सरळ म्हणायचे, "ये ना. तूसुद्धा गोलातल्या मीटिंगला येऊ शकतोस." मग तो खरंच येऊन बसू लागला. आमच्या चर्चा आणि कर्जवाटप बघून तो इतका खूष झाला, की माझा खंदा समर्थक बनला. मी वसुलीचे पैसे घेऊन निघाले, की 'मेधाताई, मी आहे तुमच्या सेक्युरिटीसाठी' असं म्हणून तो मला गाडीपर्यंत सोडायला यायचा. ही मुलं गुंडगिरीकडे का वळतात याचाही विचार व्हायला पाहिजे. शिक्षण नाही, नोकरी नाही, सरकारी व्यवस्थेत त्यांच्यासाठी काहीच जागा नाही, अशा परिस्थितीत मग ती वाईट मार्गाला लागतात. कोणत्याही वस्तीत वावरताना मला आणखी एक जाणवलं, ते म्हणजे तिथल्या पुरुषांना कुणी विचारायचं नाही, आदराने वागवायचं नाही. मी आपुलकीने त्यांना 'या, आमच्यात बसा' म्हटलं की त्यांना बरं वाटायचं.

अन्नपूर्णाच्या कामासाठी कष्टकरी बायकांचे गट ही एक मुख्य गरज आम्ही सुरुवातीपासून नक्की केली होती. मात्र गटाचा आकार तेव्हा निश्चित ठरला नव्हता. कमीत कमी चार ते जास्तीत जास्त १० महिला एकत्र आल्या की गट बनायचा. यातल्या कोणत्याही महिलेच्या घरात फारसं सामान, भांडीकुंडी, फर्निचर नसायचं. सर्वांचं हातावरचं पोट. घरचे पुरुष रिक्षाचालक, रखवालदार, गाडीचालक, माळी, धोबी किंवा बिगारी काम करणारे. या सर्वांसोबत आधी माझं जिव्हाळ्याचं नातं जुळायचं आणि मग अन्नपूर्णाच्या कर्जाच्या रूपाने व्यावहारिक संबंधही पक्के व्हायचे.

अन्नपूर्णा परिवार एक-एक पाऊल टाकत पुढे निघाला होता. काही काळाने आम्ही अन्नपूर्णा परिवाराचा एक ट्रस्ट आणि एक सहकारी सोसायटी रजिस्टर केली. तोपर्यंत मला हे कळलं होतं, की नोंदणीकृत संस्थेची तीन वर्षांची बॅलन्सशीट असेल तर राष्ट्रीय महिला कोष/राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास वित्तसंस्था यांसारख्या संस्था कर्जपुरवठा करू शकतात. तसंच काही प्रमाणात ग्रँट/डोनेशनसुद्धा उभं करता येतं. पण म्हणजे त्यासाठी आणखी तीन वर्षं अशीच धडपडत काढावी लागणार होती. 'धडपडत' असं का म्हणतेय ते सांगते. आमची सभासदांची संख्या वाढत चालली होती. पहिलं एक हजाराचं कर्ज फेडून दुसरं मोठं कर्ज, मग ते फेडून तिसरं त्यापेक्षा मोठं कर्ज, असं करत करत बऱ्याच महिला दहा हजार रुपयांच्या कर्जापर्यंत पोचल्या होत्या. बऱ्याचजणींचे छोटे व्यवसाय स्थिरावताना-वाढताना दिसत होते. त्या काळात अन्नपूर्णामध्ये दरमहा ४-५ लाखांपर्यंतची कर्जफेड रक्कम जमा व्हायची, परंतु कर्जवाटपाचा आकडा मात्र ६-७ लाखांपर्यंत जायचा. कर्जफेडीचे ४-५ लाख आम्ही गुंतवले तरी व्याजाचा दर माफक असल्याने फारसा फरक पडायचा नाही. कर्जवाटपापायी सतत तूटच येत राहायची. मग 'बेग अॅण्ड बॉरो' या म्हणीप्रमाणे मी कधी जयंतकडून उधारी मागत असे, कधी कुठून तर कधी कुठून. सुरुवातीची ३-४ वर्ष आम्ही अशीच काढली.

हेही वाचा - महिलांना ‘उद्योजिका' बनवणाऱ्या ‘स्वयंसिद्धा'च्या कांचनताई परुळेकर

पण या प्रायोगिक वर्षांमध्येच आमचं गटाचं एक मॉडेल स्थिर झालं. पाचजणींचा गट असला तर चांगला भक्कम राहतो हे आम्हाला कळलं. कोणी हप्ते भरायला टाळाटाळ करत असेल तर सगळ्या गटानेच त्या महिलेच्या घरी जाऊन बसायचं, तिच्याशी, तिच्या घरच्यांशी बोलून, वाटाघाटी करून कमी रकमेचे का असेना पण हप्ते भरायला लावायचं, असं 'पिअर सपोर्ट पिअर प्रेशर' तंत्र विकसित झालं. गटातील सदस्यांनी अडचणीत असलेल्या महिलेला मदत करणं व अडचण नसताना गैरफायदा घेऊन हप्ते थकवणाऱ्या महिलेवर दबाव आणणं, ही कार्यपद्धत आपोआप तयार होत गेली.

या काळात अन्नपूर्णा परिवारात पूर्ण वेळ कर्मचारी, प्रशिक्षित कर्मचारी असे नव्हतेच. आम्हाला ते परवडणारं देखील नव्हतं. या महिलांमधूनच कुणी तरी या कामांसाठी तयार व्हावं, किंवा यांच्या घरच्या मुलींना-बायांनाच ही कामं द्यावीत, अशी माझी योजना होती. आमच्या कर्जदार सभासद महिला. त्यामुळे ही इतर कामं करायला देखील महिलाच असाव्यात, त्या निमित्ताने त्यांच्या हाताला काही काम देता यावं, असा दुहेरी उद्देश होता. मग सभासदांच्या शिकणाऱ्या मुली, सुनांना मी अर्धवेळ कामावर घेण्यास सुरुवात केली. वसुली, हिशोब लिहिणं, पावत्या बनवणं, लेजरमध्ये नोंदी करणं इत्यादी कामं मी त्यांना शिकवत असे. त्यांना माझ्यासोबत वस्तीत घेऊन जाऊन प्रत्यक्ष कामाचंही प्रशिक्षण देत असे. वस्ती पातळीवर पूर्णवेळ काम करणाऱ्या महिलांची टीम २००० सालानंतर हळूहळू घडत गेली. त्यापैकी बऱ्याचजणी आजही ब्रँच मॅनेजर, लोन अॅन्ड सेव्हिंग ऑफिसर म्हणून काम करत आहेत.

१९९५-९६पासून बँक ऑफ इंडियातील माझी जुनी मैत्रीण शैला दीक्षित अन्नपूर्णा परिवारात सामील झाली. शनिवारी दुपारी अर्ध्या दिवसाची बँक सुटल्यावर ती अन्नपूर्णामध्ये येऊ लागली. मग आम्ही दोघी मिळून लेजर्स लिहिणं, पावत्यांचा ताळा करणं, हिशोब तपासणं अशी कामं करायचो. पुढे चित्रा खिंवसरा ही बँकेतलीच आणखी एक मैत्रीणही दर शनिवारी येऊ लागली. अशा प्रकारे हिशोबांची कामं करणारी विनावेतन (व्हॉलंटरी) टीम हळूहळू उभी राहत गेली. सुरुवातीची तीन-चार वर्षं मी एकटी होते, पण पुढील चार-पाच वर्ष व्हॉलंटिअर्सची टीम होती. त्यानंतर म्हणजे जवळजवळ दहा वर्षांनी पूर्ण वेळ पगारी टीम उभी राहिली.

एकीकडे मला वाटत होतं, की आता आपण पूर्णवेळ समाजकार्यात उतरलो आहोत, तर समाजसेवेचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलं पाहिजे. मी स्टॅटिस्टिक्समध्ये पदवी घेऊन आता १२-१३ वर्षं होऊन गेली होती. त्यानंतर १२ वर्षं बँकेतल्या नोकरीचा अनुभव गाठीशी होता. तरीही संस्था रजिस्टर करणं, ग्रँटसाठी प्रस्ताव लिहिणं, असे विषय नीट शिकून घेणं आवश्यक वाटत होतं. त्याचबरोबरीने मानसशास्त्र, समाजशास्त्र असे विषयही शिकणं गरजेचं वाटत होतं. मग मी कर्वे समाजसेवा संस्थेची प्रवेश परीक्षा दिली. १९९४ ते १९९६ या काळात दोन वर्षांचं 'मास्टर ऑफ सोशल वर्क (एम.एस.डब्ल्यू.)' पूर्ण केलं. घर, संसार, अन्नपूर्णाचं काम आणि पूर्ण वेळ कॉलेज हे सगळं पार पाडताना बरीच ओढाताण झाली. तरी मी प्रामाणिकपणे आणि आवडीने शिक्षण घेतलं. प्रवेश परीक्षेपासून ते शेवटच्या परीक्षेपर्यंत सर्व परीक्षांमध्ये पहिली आले. माझ्या वर्गातले विद्यार्थी-विद्यार्थिनी माझ्यापेक्षा १०-१५ वर्षांनी लहान होते. प्राध्यापकच माझ्या वयाचे होते. त्यामुळे मला कॉलेजमध्ये फारसं रमता आलं नाही, पण शिकायला खूप मिळालं. कम्युनिटी डेव्हलपमेंट, रिसर्च मेथडॉलॉजी, कम्युनिकेशन, सोशियोलॉजी, पॉलिटिकल सायन्स असे अनेक विषय मी तिथे शिकले. त्या शिक्षणाचा पुढे मला अन्नपूर्णा परिवार वाढवताना बराच उपयोग झाला. कर्वे इन्स्टिट्यूटमध्ये मला शिकवणाऱ्या, पण वयाने माझ्या एवढ्याच असलेल्या अंजली मायदेव, नागमणी राव, उज्ज्वला मसदेकर या पुढे माझ्या मैत्रिणीच झाल्या. सिस्टर डॅफ्नी ही वर्गमैत्रीण पुढे व्हॅटिकनपर्यंत पोहोचली. आमची मैत्री अजूनही पक्की आहे.

दरम्यान, १९९५मध्ये आम्ही गोपीनाथ नगरमधून लुणावत कॉम्प्लेक्समध्ये राहायला आलो. हे घर कोथरूडमध्येच होत, पण मुख्य रस्त्यावर होतं. तिथे अन्नपूर्णा परिवाराच्या ऑफिसकरता दोन खोल्यांची स्वतंत्र जागा आम्हाला मिळाली. जयंतचं 'नासान'चं ऑफिस त्याच कॉम्प्लेक्समध्ये खालच्या मजल्यावर होतं. अन्नपूर्णा परिवाराचं लाइट बिल, टेलिफोन बिल, भाडं इत्यादी 'नासान'तर्फे भरलं जाई. या घराला जोडून प्रशस्त गच्ची होती. तिथे आम्ही महिलांच्या बैठका घ्यायला सुरुवात केली. कल्पना, शुभांगी, संगीता, अनिता, पुष्पा इत्यादी पाच-सहा तरुण महिला कर्मचारी वस्ती पातळीवर कर्जवाटप, कर्जवसुली, बैठका घेणं या कामांत एव्हाना तयार झाल्या होत्या. या सगळ्याजणींना मी संस्थेतर्फे दुचाक्या घेऊन दिल्या. त्यांना दुचाक्या चालवायलाही मीच शिकवल्या. रोज सकाळी १० वाजता त्या येत आणि मग आमचा दुचाकीचा सराव सुरू होई. मी चालवून दाखवायचं, मग त्यांना चालवायला लावायचं आणि मी बाजूबाजूने चालत मार्गदर्शन, धीर द्यायचा, असं आमचं सुरू असायचं. त्यामुळे लुणावत कॉम्प्लेक्सच्या रहिवाशांना काही काळ असं वाटत होतं, की माझा दुचाकी शिकवण्याचा क्लास आहे. त्यांतल्या काहीजणांनी 'आमचा पण दुपारच्या वेळात क्लास घ्याल का?' इत्यादी चौकशीही केली. आमची हसून हसून पुरेवाट झाली.

हेही वाचा - श्रीलंकेतील 'लाडक्या बहिणीं'कडे येताहेत सत्तेची सूत्रं

या मुली दुचाकी शिकल्यामुळे त्यांना दूरदूरच्या वस्त्यांमध्ये जाणं सोपं झालं. कोथरूडमधील आमच्या ऑफिसमधून दोघी-दोघींच्या जोड्या पद्मावती ते औंधपर्यंत पसरलेल्या सभासदांच्या वस्त्यांमध्ये जाऊ लागल्या. तिथे सभासदांच्या वस्ती-बैठका घेऊन, गटचर्चा करून वसुलीचं कामही करू लागल्या. या सगळ्या तरुण मुली अगदी साध्यासुध्या, स्वतःही वस्त्यांमध्ये राहणाऱ्याच होत्या. दुचाकी चालवणं, रोख पैसे हाताळणं, साधा हिशोब लिहिणं यातलं काहीच त्यांना सुरुवातीला येत नव्हतं. पण त्या चुणचुणीत होत्या. मी त्यांना कामं शिकवत गेले, त्या शिकत गेल्या.

एका बाजूला हा प्रवास मला सुखद व अचंबित करून टाकणारा होता. गरीब गरजू महिलांना, विनातारण-कमी व्याजदराने आणि सोप्या पद्धतीने कर्ज उपलब्ध करून दिलं तर त्या आपणहून उत्साहाने त्यात पुढाकार घेतात असं म्हटलं जातं. अन्नपूर्णा परिवाराचा विस्तार हा एका अर्थाने या संकल्पनेची योग्यता आणि आवश्यकता सिद्ध करणारा होता, पण दुसऱ्या बाजूला माझ्यासमोर प्रश्नांचे डोंगर उभे ठाकत होते. एवढ्या उलाढालीला पुरेल एवढं भांडवल, कर्ज देण्यासाठी निधी कुठून, कसा उपलब्ध करू, इतक्या विविध वस्त्यांमध्ये वसुलीसाठी जाणारी वस्ती पातळीवरची टीम कशी उभी करू, असे अनेक प्रश्न होते.

पहिली काही वर्षं मी आठवड्यातल्या एकेका दिवशी एकेका विभागात जायचे. सोमवारी कोथरूडमधील सर्व वस्त्या, मंगळवारी सातारा रोडवरील सर्व वस्त्या, बुधवारी औंध, परत गुरुवारी कोथरूडमधील उरलेल्या वस्त्या, शुक्रवारी कमी सभासद असलेले विभाग, अशी संपूर्ण आठवडाभर मी माझ्या कायनेटिक स्कूटरवरून हिंडायचे. केवळ वसुली नव्हे, तर वस्ती पातळीवर गटागटांत छोट्या बैठका घ्यायचे.

बायकांनी बैठकांना यावं यासाठी मी काही गाणी रचली होती. त्यापैकी एक-

'चल गं सये मीटिंगला, मीटिंगला गं, सुखदुःख मनातलं सांगायला, सांगायला गं' असं होतं.

त्यामुळे मी वस्तीपाशी पोहोचले की वस्तीतली छोटी छोटी मुलं-मुली पळत पळत घराघरांत वर्दी द्यायची 'मीटिंगचं गानं म्हननाऱ्या, कर्ज देणाऱ्या ताई आल्या.' मग बघता बघता बायका गोळा व्हायच्या. वस्तीत मध्येच कुठे तरी गोणपाट टाकून आम्ही सगळ्या बसायचो. गाणं म्हणून इतरांना गोळा करायचो.

अवतीभवती चिखल असे. माश्या, कुत्री, डुकरं फिरत असत. छोट्या मुलांचा गोंधळ सुरू असे, पण महिलांचा उत्साह दांडगा असे. मी म्हणजे त्यांच्यासाठी जशी काय माहेराहून आलेली आवडती व्यक्तीच ! ताईंना किती आणि काय सांगू असं त्यांना झालेलं असायचं. त्यांच्या वरवर अशुद्ध वाटणाऱ्या बोलीभाषेत गप्पा, थट्टा, विनोद, गावरान म्हणी, गाणी सारं काही धो-धो कोसळत असे. दोन-तीन तास कसे निघून जायचे ना त्यांना कळायचं, ना मला. सुरुवातीला त्या 'ताई, थंड काय आणू का?' विचारायच्या. मला वाटायचं, त्यांना थंड पेयाचा खर्च कशाला करायला लावायचा. आणि मला दुकानात मिळणाऱ्या शीतपेयांची आवडही नव्हती. मग मी त्यांना चहाच द्यायला सांगायचे. कारण मी 'काहीच नको' म्हटलं तर त्यांना वाईट वाटणार, हेसुद्धा मला कळायचं.

तशी मी चहा न घेणारी. पण वस्ती पातळीवर चहा हेच एक स्वस्त सुलभ पेय होतं. चहा किती विविध प्रकारचा असू शकतो हे मला वस्त्यांमध्ये जायला लागल्यावर नव्यानेच समजल. त्या बायका घरात असेल त्या साहित्यातून चहा करून आणायच्या. त्यामुळे तो चहा म्हणजे कधी साखरेचा पाक, तर कधी गूळ घातलेला, कधी बिनदुधाचा, कधी बकरीच्या दुधाचा, असा असायचा. एकदा तर थोडी चहाची भुकटी आणि थोडी कॉफीची पावडर घातलेला चहाही मी प्यायले आहे. पण चहाचा स्वाद ही दुय्यम बाब होती. त्या बायकांच्यातली एक होणं हे माझ्यासाठी महत्त्वाचं होतं.

याच काळात आमची मूळ जागा म्हणजे पौडफाटा भाजी मंडई इथे काही घडामोडी घडत होत्या. त्यापैकी एक म्हणजे खाजगी सावकार, अण्णा, अक्का मंडळी माझ्यावर खार खाऊ लागली होती. ही शिकलेली बाई आपल्यामध्ये लुडबूड करतेय हे त्यांना लक्षात येऊ लागलं होतं. त्यांची गिऱ्हाइकं माझ्यामुळे कमी होऊ लागली होती. हे तर सरळ सरळ त्यांच्या पोटावर पाय आणल्यासारखंच होतं. त्यामुळे मी संध्याकाळच्या वेळात मंडईत दिसले की ते माझ्याशी डाफरूनच बोलत. मला घालवून द्यायला बघत. त्यांतल्या एका अक्काने तर मला एकदा सरळ सरळ ढकललं. अशा वेळी मी त्यांच्या तोंडाला न लागता शांतपणे एका बाजूलाच थांबत असे. मग शेवंताबाई, लक्ष्मीबाई डोळा मारून हातगाडीवरचं गोणपाट कडेने जरासं उचलून मला खूण करत, की 'तुम्ही थांबा, तुमचे पैसे गोणपाटाखाली लपवले आहेत.' काही दिवस असं सुरू राहिलं. पण मग एकदा मनात विचार आला, की या लोकांनी कधी माझा पाठलाग केला, घर बघितलं आणि नचिकेतला काही केलं तर? मी शेवंताबाई, लक्ष्मीबाई यांना माझी ही शंका बोलून दाखवली. पुढच्या दोन-तीन दिवसांत आमची शनिवारची बैठक होती. तेव्हा दोघींनी मला एक युक्ती सांगितली. आणि त्याप्रमाणे पुढच्या महिन्याभरात सगळे अण्णा-अक्का मंडईतून चक्क गायब झाले !

शेवंताबाई, लक्ष्मीबाईंनी नेमकं काय केलं? त्या सर्व बायांनी महिन्या दीड महिन्यात संगनमत करून गरज नसताना अण्णाकडून हजार-दोन हजार रुपयांची कर्ज काढली. कर्जाचे हप्ते मात्र त्यांनी दररोज चोख न देता, एक दिवस थकवत, एक दिवस भरत पूर्ण केले. 'आज धंदाच नाही झाला' असं त्या तोंड पाडून अण्णाला सांगत राहिल्या. काही आठवड्यांतच त्याला कळलं, ही गिऱ्हाइकं पूर्वीसारखी चोख पैका भरणारी राहिली नाहीत. यांच्यात गुंतवणूक करायची म्हणजे पैसे बुडण्याची लक्षणं. शिवाय एखाद-दुसरी महिला हप्ता भरत नसेल तर तिला दमदाटी करता यायची. तिच्या गाडीवरचा मालच उचलून ने, तिच्या मुलाला - जावयाला धकाबुक्की कर, असले प्रकार करता यायचे.

पण आता तर मार्केटमधील जवळजवळ सगळ्याच महिला असं करू लागल्या हे पाहिल्यावर त्या अण्णा-अक्कांनी गाशाच गुंडाळला.

आपलं पुस्तकी शिक्षण कितीही झालेलं असलं, तरी जीवनाच्या शाळेत शिकलेल्या कष्टकरी महिलांकडे काही प्रश्नांची समर्पक उत्तरं असतात, ती आपल्याला सुचतही नाहीत, हे मी यातून शिकले.

(मेधा पुरव सामंत लिखित समकालीन प्रकाशनाच्या 'आम्ही स्वयंपूर्णा' या पुस्तकातून साभार.)

डॉ. मेधा पुरव सामंत







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results