सनडान्स या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'साबर बोंडं' हा मराठी चित्रपट परीक्षकांच्या पसंतीस उतरला. त्याचं खूप कौतुक झालं आणि पुरस्कारही मिळाला. त्यानंतर लगेच म्हणजे १९ सप्टेंबरला महाराष्ट्रातील चित्रपटगृहात साबर बोंडं प्रदर्शित झाला. त्याच्या समलैंगिकतेच्या थीमवर बरीच चर्चा सुरू आहे. या सिनेमात आवर्जून बघावं असं काय आहे?
दिग्दर्शक रोहन कानवडे यांच्या आयुष्यातील घटनांशी साधर्म्य सांगणारा आणि त्याला आसपासच्या कौटुंबिक आणि सामाजिक गोष्टींची जोड देणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाने माणसाच्या जीवनातील मैत्री, प्रेम, नातेसंबंध याची नव्याने उजळणी करून दिली आहे. अस्सल ग्रामीण बाजात चित्रित झालेला हा चित्रपट संवेदनशील माणसाला प्रेमभावनेने कनेक्ट करतो. साबर बोंडं म्हणजे निवडुंगाचं फळ. त्याचं नेमकं काय करतात ते चित्रपटात तुम्हाला समजेलच.
आनंद हे चित्रपटातलं मध्यवर्ती पात्र. आनंदच्या वडिलांचं किडनीच्या आजाराने निधन झालेलं असतं आणि तो सुन्न अवस्थेत बसलेला असतो- इथून चित्रपट सुरू होतो. मुंबईतील हॉस्पिटलमधून मृतदेह गावाकडे न्यायचा असतो. गावावरून नातेवाईक येतात. गावी जायचं तर आठ-पंधरा दिवसांच्या नियोजनाने जायला पाहिजे अशी आनंदच्या आईची भावना. आनंद मात्र 'मी दोन दिवसांत परत येईन आणि दहाव्याच्या विधीला पुन्हा गावाकडे येईन', असं म्हणत स्वतःची घालमेल आईजवळ बोलून दाखवतो. त्यावर आई काहीतरी बोलून त्याची समजूत काढते आणि किमान १० दिवसांच्या नियोजनाने ते गावाकडे जायला निघतात.
चित्रपटाच्या या पहिल्या दृश्यात शहरी माणसाचं गावाकडे जाण्याचं प्रमाण कोणकोणत्या गोष्टींनी कमी झालेलं आहे, हे ओझरतं लक्षात येतं. आनंदच्या बाबतीत तो प्रश्न असतो लग्नाचा. वयाची तिशी ओलांडली तरी आनंद लग्नाला तयार होत नसतो. त्याचं कारण त्याच्या आई-वडिलांना माहीत असतं. बाकी लोकांना ते कारण सांगण्यात आनंदला रस नसतो. त्याला वारंवार त्याच त्या प्रश्नाला सामोरं जायचं नसतं. म्हणूनच त्याला गावात फार रहायचं नसतं.
आनंदचे गावातले दहा दिवस आणि त्याच्या संदर्भाने येणाऱ्या नात्यांचा तरल भावपट ही साबर बोंडं चित्रपटाची कथा आहे. गावाकडच्या माणसाला शहरातील लोकांविषयी पडणारे भाबडे प्रश्न चित्रपटात अगदी सहजपणे दाखवले आहेत. कुठल्याही धार्मिक आणि पारंपरिक कार्यात गावातील अनुभवाने शहाणे असलेले लोक जे ज्ञान देत असतात त्याबद्दलचे प्रसंग चित्रपटात आहेत. कमाईच्या दृष्टीने स्थिरस्थावर झालेला शहरी माणूस चांगलं जीवन जगतो की गावाकडे मोकळ्या आभाळात मनसोक्त जगणारा शेतकरी, याचं उत्तर प्रेक्षकांनी त्यांच्या त्यांच्या अनुभवानुसारच शोधायचं आहे. नापिकी, दुष्काळ, शेतमालाला पुरेसा भाव न मिळणं आणि म्हणून लग्नासाठी मुली न मिळणं हा एक सामाजिक प्रश्न दिग्दर्शकाने मुख्य कथानकाला बाधा न आणता खुबीने मांडला आहे.
आता येऊया नातेसंबंधांच्या थीमकडे. चित्रपट समलैंगिकतेबद्दल बोलतो अशी बरीच चर्चा पोस्टरवरून झाली. त्यासंदर्भात अनेक कमेंट आणि अगदी दिग्दर्शकाच्या मुलाखतींचा संदर्भही बऱ्याच ठिकाणी आला. तर हो, समलैंगिक व्यक्तींमधील प्रेमभावना चित्रपटात उत्कट आणि सहजपणे दाखवली आहे. आपल्या भावनिक, शारीरिक गरजांसाठी त्यांना एकमेकांसोबत वेळ घालवावासा वाटू शकतो, हे व्यवस्थित सांगितलेलं आहे. लैंगिकता या विषयावर मोकळेपणाने बोलायला हवं, शालेय अभ्यासक्रमात त्याचा समावेश असायला हवा या गोष्टी बऱ्याचदा बोलल्या जातात. पण कृतीच्या पातळीवर त्यात येणारं अवघडलेपण आपल्या सगळ्यांनाच माहिती असतं. अनेकांना तर हा विषय वेगळा, विचित्र आणि भयानक वगैरे वाटत असतो. मात्र दिग्दर्शकाच्या स्वतःच्या जाणिवा प्रगल्भ असल्याने त्या पडद्यावर नेमकेपणाने आणण्यात तो यशस्वी ठरलाय. हे समलैंगिक जोडपं नेमकं कोण ते तुम्हाला चित्रपटातच पहावं लागेल.
अलीकडे अनेक शहरांमध्ये LGBTQI+ समुदाय प्राईड मार्च काढतात. आपण संख्येने अल्प असलो तरी एकत्र यायला हवं आणि स्वतःचा आहे तसा स्वीकार करायला हवा ही भावना त्यामागे असते. मात्र हा समुदाय फक्त शहरातच आहे असं नाही. शहरात शिक्षण आणि कामाच्या निमित्ताने आलेले बरेचजण ग्रामीण भागातले असतात. स्वतःच्या लैंगिकतेची जाणीव नव्याने झाल्यानंतर ती गोष्ट वैयक्तिक आणि कौटुंबिक पातळीवर स्वीकारताना अनेकांना मोठा संघर्ष करावा लागतो. बऱ्याचदा कुटुंब आणि समाजापासून तुटलेपणाची भावना घेरून टाकते. अशा अनेकांसाठी हा चित्रपट दिलासा देणारा आहे. आपला आवाज कलाकृतीच्या माध्यमातून सामान्य जनांपर्यंत पोहोचतोय ही भावना LGBTQI+ समुदायालाही यानिमित्ताने समाधान देणारी आहे.
याशिवाय चित्रपट प्रभावी वाटतो तो वेगवेगळ्या नातेसंबंधांच्या हलक्याफुलक्या स्टोरीजमुळे. यामध्ये आनंदचं त्याच्या वडिलांसोबत असलेलं कनेक्शन, आनंदने बऱ्याच दिवसांनी आईसोबत मारलेल्या मनमोकळ्या गप्पा, आनंदचे आजोबा, मामा, चुलते, चुलतभाऊ, वहिनी आणि बालपणीचा मित्र बाळू यांच्याशी होणारा त्याचा संवाद पाहणं सुखद आहे. शहरात बरीच वर्षं वास्तव्य केलेली मुलं गावाकडे जातात तेव्हा ती बुजरी होतात, काय बोलावं, कसं वागावं हे त्यांना कळत नसतं. अशात टाळावेसे वाटणारे विषय आणि माणसं समोर आली की भलतंच अवघडलेपण वाटू शकतं. मात्र ते अवघडलेपण आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रवास चित्रपटात सहज दाखवला आहे.
चित्रपटाचा विषय अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावा आणि वेगवेगळ्या व्यासपीठावर चर्चिला जावा यासाठी नागराज मंजुळे, निखिल अडवाणी, विक्रमादित्य मोटवाणे आणि सई ताम्हणकर यांनी निर्माता म्हणून भूमिका पार पाडली आहे. भूषण मनोज (आनंद), सूरज सुमन (बाळ्या) आणि जयश्री जगताप (आनंदची आई - सुमन) यांचा अभिनय लाजवाब आहे. चित्रपटातील इतर पात्रांनीही चांगलं काम केलं आहे. चित्रपट शांत आणि संथ लयीत पुढे जातो, कुठेही कंटाळवाणा वाटत नाही. प्रसंग बांधण्याचं हे कौशल्य दिग्दर्शकाला जमून आलंय. समलिंगी व्यक्तींविषयी संवेदनशीलता दाखवणारा आणि नातेसंबंधांमधील अलवार प्रेमाची, करुणेची मांडणी करणारा हा चित्रपट आवर्जून पहायला हवा.
