अमेरिकेने आक्रमण करून व्हेनेझुएला या देशाचं सरकार ताब्यात घेतलंय. तिथले अध्यक्ष निकोलस मदुरो यांना अटक करून अमेरिकेत नेण्यात आलं आहे. पुढला काही काळ व्हेनेझुएलातलं सरकार आपण चालवणार, असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी जाहीर केलं आहे.
गेले काही महिने अमेरिकन नौदल आणि हवाई दल व्हेनेझुएलाची जहाजं जप्त करत होतं, नष्ट करत होतं. ती जहाजं ड्रग्जची तस्करी करत असत, अमेरिकेचं तेल चोरत असत, असं ट्रंप यांचं म्हणणं होतं. व्हेनेझुएलातून येणाऱ्या ड्रग्जमुळे अमेरिकेत लाखो लोकं मरतात, असा ट्रंप यांचा दावा होता. तसंच व्हेनेझुएलन गुन्हेगार अमेरिकेत बेकायदा घुसत असतात. व्हेनेझुएलाने नीट वागावं नाही तर तिथलं सरकार बदलावं लागेल, असंही गेले काही महिने ट्रंप म्हणत होते.
निकोलस मदुरो गेली १२ वर्षं व्हेनेझुएलाचे अध्यक्ष होते. मदुरो पूर्वी ट्रक ड्रायव्हर होते. त्यांनी ड्रायव्हरांची युनियन चालवली. व्हेनेझुएलाचे माजी समाजवादी अध्यक्ष ह्युगो शावेझ यांचे मदुरो हे शिष्य. शावेझ यांच्या मृत्यूनंतर मदुरो यांच्याकडं अध्यक्षपद चालत आलं.
मदुरो अफरातफरी, दंडेली करून निवडणूक जिंकत असा आरोप होता. जबाबदार संस्थांनी या आरोपात तथ्य असल्याचं म्हटलं होतं. मदुरो हुकूमशहा आहेत, ते विरोधकांचे गळे दाबतात, त्यांना मारून टाकतात; वृत्तपत्रांना व्हेनेझुएलात स्वातंत्र्य नाही, असा आरोप व्हेनेझुएलातले विरोधी पक्ष करत असत. मदुरो यांच्या दंडेलीविरोधात आंदोलन करणाऱ्या मारिया मचाडो यांना देश सोडून अज्ञातवासात जावं लागलं होतं. यंदा त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं आहे.
ड्रग्स आणि तेल हे व्हेनेझुएलातले दोन मोठे उद्योग आहेत. पैकी तेल उद्योग देशमालकीचा झालाय, तर ड्रग्स उद्योग खाजगीच आहे. ड्रग उद्योगाचा व्हेनेझुएलन समाजावर पगडा आहे, राजकीय पुढारी त्या उद्योगाच्या पैशावर सरकारं काबीज करत असतात. मदुरो ड्रग्स उद्योगाचे अनधिकृत संचालक आहेत, असा आरोप होत असे. दोन्ही उद्योगातलं उत्पन्न पुढारी आणि धनिक यांच्या खिशात जातं, देश मात्र टंचाई आणि महागाईचा शिकार झालाय हे व्हेनेझुएलातलं वास्तव आहे.
परिणामी व्हेनेझुएलातली बहुसंख्य प्रजा त्रस्त होती. त्यांना मदुरो यांची राजवट मान्य नव्हती. अमेरिकेने हस्तक्षेप करून मदुरो यांचं सरकार बरखास्त करावं, असं लोक जाहीरपणे म्हणत होते. त्यामुळेच जनतेने अमेरिकेच्या कारवाईचं स्वागत केलं आहे.
महासत्ता झाल्यापासून अमेरिकेने (युएसए) दक्षिण अमेरिकेतील देशांना आपल्या ताटाखाली ठेवण्याचा प्रयत्न सतत केला आहे. दक्षिण अमेरिकेतलं तेल आणि इतर साधन संपत्ती अमेरिकेला हवी होती. दक्षिण अमेरिकेतली सरकारं आपल्या मर्जीनुसार चालतील, असा प्रयत्न अमेरिका करत असे. तिथली अनेक सरकारं आजवर अमेरिकेने नाना प्रकारे पाडली आहेत, अनेक वेळा मर्जीतली बाहुली तिथं बसवली आहेत.
अमेरिकेचं हे वर्तन देशप्रेमापोटी, देशाच्या हितासाठी होतं काय? काही लोकांना तसं वाटतं. अमेरिकेचा हा उद्योग भांडवलशाही-बाजारकेंद्री आहे असं डाव्यांचं, समाजवाद्यांचं म्हणणं आहे. इतिहासाचा अभ्यास केला तर एक गोष्ट मान्य करावी लागते की अमेरिका हे पूर्वीच्या ब्रिटन-फ्रान्स-पोर्तुगीझ-स्पेन इत्यादी वसाहतवादी साम्राज्यांसारखंच आहे. चीन, जपान, फिलीपीन्स हे देशही अमेरिकेने स्वतःच्या ताटाखाली ठेवले होते. अमेरिकेवर शिक्का कुठलाही मारा, अमेरिकेला द.अमेरिका-व्हेनेझुएलात इंटरेस्ट आहे हा भाग महत्वाचा.
मदुरो हुकूमशहा होते की नाही? होते. मदुरो भ्रष्ट होते की नाही? होते. मदुरो समाजवादी होते की नाही? होते. या सर्वांची बेरीज होऊन मदुरो व्हेनेझुएलाचे अध्यक्ष होते. व्हेनेझुएलाचा त्रास अमेरिकेला होत होता की नाही? होत होता. त्यामुळे अमेरिकेला व्हेनेझुएलाचं काही तरी करणं भाग होतं. पण शेवटी व्हेनेझुएला एक स्वतंत्र देश आहे. तिथे कशा का होईना निवडणुका होतात. तिथली जनता आणि तिथलं राजकारण हा त्यांचा प्रांत. अशा प्रांतात इतर देशांनी अशा प्रकारे हस्तक्षेप करणं कितपत योग्य?
इराणमधली जनता इराणी सरकारच्या कामगिरीवर नाराज आहे. तिथे जनता आंदोलन करत आहे. ट्रंप म्हणाले की अमेरिका कुठल्याही क्षणी इराणमधे हस्तक्षेप करणार आहे. जगभर अनेक देशांतील जनतेत असंतोष आहे. अनेक कारणांसाठी जनतेचा तिथल्या सरकारांवर रोष आहे. बऱ्याच ठिकाणी सरकारं भ्रष्ट मार्गाने निवडून आलीत असा आरोप होतोय. जगभरच्या जनतेत मतमतांतरं आहेत. अमेरिका प्रत्येक देशात जाऊन तिथली सरकारं बरखास्त करणार आहे काय?
खुद्द अमेरिकेतच ट्रंप यांच्यावर भ्रष्टाचार आणि हुकूमशाहीचे आरोप आहेत. चीन किंवा कुठल्याही शक्तिवान सत्तेने अमेरिकेत घुसून ट्रंपना अटक करून अमेरिकन सरकार ताब्यात घ्यावं काय?
हिटलरने उच्छाद माजवला, साऱ्या जगाला त्याचा त्रास झाला. हिटलरविरोधात लढाई करावी लागली. जगाने एकत्र येऊन काही एक विचार करून जर्मनीविरोधात लढाई केली. लढाई करणाऱ्या देशांचे स्वार्थ त्यात होते की नाही? नक्कीच होते. पण त्या स्वार्थापलिकडच्या गोष्टी हिटलरविरुद्धच्या युद्धात गुंतलेल्या होत्या.
कुठल्याही देशात हस्तक्षेप करत असताना खूप विचार व्हायला हवा. एखाद्या देशाचा त्रास होत असेल तर स्वतःचा बचाव करणं हाही मार्ग असतो. त्या देशात घुसून तो ताब्यात घेणं योग्य नाही. अमेरिकेने अफगाणिस्तानातली सत्ता बदलली, तिथे राज्य केलं. अफगाणिस्तानचं काय झालं? अमेरिकेने इराकवर आक्रमण केलं, इराकची सत्ता चालवली. इराकचं काय झालं? अमेरिका व्हिएतनाममध्ये घुसली, व्हिएतनामची वाट लावली. आता व्हेनेझुएलाची वाट लावणार.
व्हेनेझुएलाचा सत्ताधारी नालायक असेल. पण शेवटी व्हेनेझुएलाच्या जनतेनेच त्यातून वाट काढायला हवी.
ट्रंप नावाच्या एका भ्रष्ट हुकूमशहाने मदुरो नावाच्या हुकूमशहाला हाकलून लावणं, या घटनेला विनोद म्हणता येईल काय?
निळू दामले | 9820971567 | damlenilkanth@gmail.com
निळू दामले हे जगभरातील विविध विषयांवर अभ्यासपूर्ण आणि सहज शैलीत लिखाण करणारे ज्येष्ठ पत्रकार आहेत.
