आम्ही कोण?
वीकेंड स्पेशल 

गाव बुडालं तेव्हा…

  • दीपक चैतन्य, संजय संगवई
  • 09.08.26
  • वाचनवेळ 29 मि.
harsud

न हो कमीज तो पावों से पेट ढक लेगें।
ये लोक कितने मुनासिब है इस सफर के लिए॥
कहां तो तय था चराग हर घर के लिये
कहां मयस्सर नहीं चराग अब शहर के लिये ॥

नर्मदा प्रकल्पामुळे विस्थापनाची दाट छाया पसरलेल्या गावांमधून आम्ही फिरत होतो. तेव्हा दुष्यंतकुमारांच्या या अस्वस्थ करणाऱ्या ओळी पुन्हा पुन्हा मनात डोकावत होत्या. या ओळी जणू काही विस्थापितांचीच वस्तुस्थिती वेशीवर येऊन सांगत होत्या.

हे असंच एक गाव होतं. लवकरच धरणाच्या पाण्याखाली जाणार असलेलं. अजूनही तिथे जीवन व्यवहार चालू होते. आम्ही पोहोचलो तेव्हा तिथं जत्रा भरलेली होती. गावातील उंच असलेल्या टेकडीवरील एका उंच खडकावरून आम्ही पाहत होतो. इथून गावातील जत्रा छान दिसते म्हणून खाली कोणी तरी सांगितलं होतं. त्यांचं म्हणणं सार्थ ठरावं इतकं रमणीय दृश्य इथून खरोखरच दिसत होतं. जवळच्या डोंगरातून येऊन परत डोंगराच्या मागे लपणाऱ्या लहानग्या नदीने गावाला इंग्रजीच्या आठच्या आकड्याप्रमाणं विभक्त केलं होतं. म्हणजे एका लहानश्या टापूत या गावाचा एक भाग आणि त्याचाच दुसरा भाग दुसऱ्या टापूवर. मध्ये दोघांना जोडणारी गावातून कधी तुटकपणे, तर कधी हसत खेळत वाहणारी नदी. एरवी इकडून तिकडे आणि तिकडून इकडे येण्यासाठी नदीतील पायवाटेचाच उपयोग केला जातो पण आता जत्रा असल्यामुळे गंमत म्हणून नावांची सोयही इकडून तिकडे जाण्याकरता करण्यात आली होती. आम्ही ज्या उंचीवर होतो तिथून त्या इकडून तिकडे करणाऱ्या नावा छोट्या खेळण्याप्रमाणे मजेदार वाटत होत्या. तसं तर जत्रा गावाच्या दोन्ही भागात भरते, पण एका भागात तात्पुरते सरकारी ऑफिस, बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी बांधलेल्या राहुट्या, बाहेरील लोक कलाकारांचे रंगमंच अशा गोष्टी होत्या. तर दुसऱ्या भागात जत्रेकरता म्हणून मुद्दाम दूरदूरून आलेली वेगवेगळ्या प्रकारची दुकानं उभारण्याची सोय केली होती. त्यामुळे दोन्हीही टापूंवरील माणसांची गर्दी लक्ष वेधून घेत होती. ह्या वर्षी जत्रेसाठी खूपच भाविक आले आहेत असं खाली जाणकार मंडळी सांगत होती. वरतून बघितलं तर ते अगदी खरं वाटत होतं. एक नदीचा पाट सोडला, तर सगळीकडे माणसंच माणसं दिसत होती. आम्ही उंचीवर असल्यामुळं त्यांच्या हालचाली काहीशा मंद वाटत होत्या. अखंडित मुंग्यांची रांग संथपणे पुढे पुढे सरकते आहे असा भास होत होता. विशेष म्हणजे या रांगेला कुठेही खंड नव्हता. माझ्यासमोरच असलेल्या दुसऱ्या पर्वताच्या मागे ती रांग दिसेनाशी होत होती. ज्या संताच्या नावानं ही यात्रा दरवर्षी भरवली जाते त्या संताचं ते समाधिस्थळ होतं आणि त्या समाधी स्थानाच्या दर्शनालाच ही रांग अविरत सरकत चालली होती. सांगणारे सांगत होते, हा ओघ दिवसभर असाच राहतो. त्यात या वर्षी गर्दी जास्त असल्याने रात्रीदेखील दर्शनाची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे हे काम यावेळेस दिवस-रात्र अव्याहत चालू राहील.

समोरील पर्वताच्या दरीत खाली बाबाचं समाधिस्थान आहे. माणसं प्रथम हा पर्वत इकडून चढतात आणि मग मागच्या बाजूने खाली समाधी स्थानाकडे उतरतात. या जत्रेच्या काळात बऱ्याच विलक्षण गोष्टी घडतात असं लोक सांगतात. वर्षभर असणारे कावळे आणि तत्सम पक्षी या जत्रेच्या दिवसात या गावात येत नाहीत. बाबाचा प्रसाद म्हणून सगळे गोड पदार्थ वाटले जातात. परंतु मुंगळा किंवा मुंगीसारखा एकही कीटक या दिवसात या परिसरात दिसत नाही. इतर संताप्रमाणं बाबांचं हे समाधिस्थानही खूपच जागृत असून, लांबून भक्त आपल्या मागण्या पूर्ण करण्याकरता इथे येत असतात. महाराष्ट्रात असलेली वारकरी परंपराही इथं दिसून येते. बाबांची भजनं म्हणत आणि खांद्यावर पताका घेत भक्तांचे जथेच्या जथे पायीपायी या जागी येत असतात आणि आज नाही तर वर्षानुवर्ष जत्रेची ही परंपरा चालू आहे. जवळपास पाच शतकांपूर्वी बाबांचा जन्म या गावी झाला बाबांच्या संतत्वाचा साक्षात्कार तत्कालीन समाजाने घेतला. आणि बाबांनी समाधी घेऊन आपलं अवतार कार्य संपवल्यानंतर जत्रेची परंपरा या गावात सुरू झाली. दरम्यानच्या काळात समाजाने कितीतरी स्थित्यंतरे बघितली. पण बाबांच्या प्रगटदिनी होणारी जत्रेची परंपरा आहे तशीच राहिली. आवश्यकतेप्रमाणे थोडे फार बदल होतही गेले पण जत्रेचा मूळ आशय आणि समाधिस्थान काही बदललं नाही. पाच शतकापासून जोपासलेल्या आस्था आजही तशाच कायम ठेवण्यात माणसांना यश आलं. परंपरांगत हस्तांतरित होत असलेली आस्था आणि श्रद्धा होती तशीच राहिली.

या गावात आल्यापासूनच या साऱ्या परिसरावर पसरलेली दुःखाची आणि वेदनेची दाट छाया आम्हाला सतत जाणवत होती. म्हणजे सगळे व्यवहार सुरळितपणे चालले होते. पण माणसाच्या चेहऱ्यावरील हरवेलपण स्वच्छ दिसून येत होतं. ह्यावर्षी या गावात बाबांच्या नावानं भरणारी ही शेवटचीच जत्रा होती. ह्यानंतर इतर गावांप्रमाणे हे गावदेखील नर्मदासागर धरणाच्या परियोजनेत जलमग्न होणार होतं. पुढच्या काही महिन्यांतच या परिसराला जलसमाधी मिळणार होती. शासनाची तशी तयारीही झाली होती. शासन व्यवस्था या कामासाठी अगदी सिद्ध आणि चोख ठेवण्यात आली होती.

पाच शतकापासून अव्याहतपणे भरणाऱ्या या जत्रेत आता खंड पडणार होता. कदाचित दुसरीकडे कुठे किंवा शासन म्हणेल तिथे ही जत्रा भरेलही, पण जागेचं महत्त्व संपणार होतं. समाधिस्थानाचं महात्म्य संपणार होतं आणि या परिसरातील आपलेपण तिथे मिळणार नाही हे भाविकांना जाणवत होतं म्हणूनच दुखाःचं सावट जत्रेवर पडलं होतं. गेल्या कित्येक वर्षांपासून ते इथे येत होते, परंपरागत पद्धतीनं येत होते.

harsud

पिढ्यानपिढ्या ही परंपरा चालू होती, पण ह्या वर्षीपासून ते सगळं संपणार आहे गेल्या कित्येक वर्षापासून आपण बघत असलेली ही आता शेवटची जत्रा असणार आहे. आता ही जागा दिसणार नाही, हा परिसर दिसणार नाही. बाबांच्या समाधिस्थळापर्यंत घेऊन जाणारी पायवाट दिसणार नाही. पुढच्या काही महिन्यांतच नर्मदा सागरचा जलाशय हे सर्व गिळून टाकेल आणि ह्या जागेबरोबरच आपल्या श्रद्धांना आणि आस्थांना जलसमाधी मिळेल ही वास्तविकता त्यांना जास्तच विषण्ण करत होती

त्याहून जास्त विषण्ण माझं मन झालं होतं. जणू काही उद्ध्वस्त पर्व बघण्याचा वसा घेऊनच आम्ही हा प्रवास करायला निघालो होतो. अतिशय अलवार असलेलं माझं मन कुठल्या आंतरिक ताकदीने हे सर्व बघत होत तेच कळत नव्हतं. प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर कुठली न कुठली वाताहतच झाल्याचं दिसून येत होत आणि ती दैना बघतच आम्ही पुढे वाटचाल करत होतो. त्याच वाटचालीला हाही एक टप्पा होता विस्थापितांच्या व्यथेची जाणीव जरा जास्त प्रकर्षाने करून देणारा. पाचशे वर्षांची परंपरा खंडित करणारा शेवटचा सोहळा बघण्याचं भाग्य आम्हांला मिळावं याला आमचं सुदैव की दुर्दैव काय म्हणावं काहीच कळत नव्हतं. मात्र एवढी प्रदीर्घ परंपरा काय असते आणि ती खंडित होते म्हणजे नेमकं काय होतं याचा आम्ही साक्षीदार म्हणून अनुभव घेत होतो. खरं तर एक दिवसाकरताच या गावात यावं असं आम्ही ठरवलं होतं. पण इथली परिस्थिती बघता मुक्काम वाढवण्याचा निर्णय घेतला होता. कालच काही सरकारी अधिकाऱ्यांशी बोलण्याची संधी मिळाली होती. त्यांचे ह्या बाबतीतील विचार म्हणजे मानसिक कोडगेपणाचा एक उत्तम नमुना होते. अर्थात ते सरकारी अधिकारी होते. वेगवेगळ्या ऑफिसच्या माध्यमातून त्यांना तिथे पाठविण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांची या परिसराशी भावनिक गुंतवणूक जरी नसली, तरी त्यांच्या अलिप्तपणाबद्दल खरोखरच आश्चर्य वाटत होतं. अर्थात जे काही घडत होतं त्याचा त्यांच्याशी काही संबंध नव्हता किंवा त्यांच्या हातातही काही नव्हतं. पण आपुलकीचे, आत्मीयतेचे दोन शब्द तरी त्यांचे स्वतःचे होते. पण ते वापरण्याचं न संवेदनशील मन त्यांच्यापाशी नव्हतं. जेवढ्या कळकळीनं आम्ही विचारत होतो तितक्या तुटकपणे ते उत्तर देत होते.

'हां, बाबा के नाम पर भरने वाला इस जगह का यह आखरी मेला है'

'याने सच है ये'

'सच है याने हंडरेड परसेंट. इसलिये तो भीड भी काफी आई है. यहाँ मेनेज करना बडा मुश्कील हो रहा है. देख तो रहे हैं आप' 'मतलब अगले साल से यह मेला..' 

और किसी जगह लगेगा. जहाँ गवरमेंट चाहेगी'

'अर्थात ये गाव डूबमे आना तय है'

'तय हे याने पक्का ? लोग बाग तो अच्छा खासा पैसा बना के निकल भी गये यहाँ से. जो कुछ है वे भी मुआवजे के लिये रहे है. बाकी सब गाव खाली हो चुका है. अगले साल अगर आप यहाँ आये तो केवल पानी ही भरा मिलेगा. यहाँ गवरमेंटने तो कब से अल्टिमेटम दिया है, उन्हे यह जगह छोड देने का अब ये अगर नही छोडते है तो मरेंगे. गवरमेंट मानेगी थोडी. देखा नही आपने और जगह क्या हालत हुई है इनकी'

हेही वाचा - गडचिरोली : विकासाच्या गदारोळात स्थानिकांचा आवाजच हरवतोय

आता अशा उत्तरासमोर काय बोलावं कळत नव्हतं. म्हणजे ते काही खोटं बोलत होते असं नाही. पण सांगण्याची जी सभ्य पद्धत असते तिची झाकही कुठे दिसत नव्हती. त्यांच्याकडून जास्त माहितीची अपेक्षा आम्हीही केली नव्हती. मात्र गावातील दोन्ही टापूंत काही घरं अजूनही शिल्लक दिसत होती. म्हणजे गाव पूर्ण खाली झालं नव्हतं हे खरं. 'बुडत्याला काडीचा आधार' म्हणतात तसं बुडणाऱ्या गावाला अजूनही घरांचा आधार होता. पण जलसमाधीपासून त्यांना कोणीही थोपवू शकणार नाही हेही तितकंच खरं होतं.

समाधिस्थळाच्या सभोवती गावकऱ्यांनी श्रमदान करून छोटी- छोटी पर्वत शिखरंच उभी केली होती. हेतू हा की, गाव जरी पाण्यात बुडालं तरी निदान समाधिस्थळ तरी शाबूत राहील. उंचवट्यामुळ पाणी तिथंपर्यंत येणार नाही. अर्थात, हे शक्य नाही गावाबरोबरच समाधिस्थानालाही जलसमाधी मिळणार आहे हे त्यांना ठाऊक नव्हतं असं नाही. पण श्रद्धावानांची श्रद्धास्थानं अशाचं कुठल्या चमत्कारावर तग धरून राहतात आणि त्यांना बालिशपणाही म्हणता येत नाही. आम्ही बसलो होतो जवळ जवळ तितक्याच उंचीची ती मानवनिर्मित शिखरं बघून त्यांच्या मानसिक घट्टपणाला दाद द्यावीशी वाटत होती. स्वतःला ओरबाडून घेणं, रक्तबंबाळ करून घेणं म्हणजे काय ते कळून येत होतं. विस्थापित होण्याचा हा एक नवा साक्षात्कार होता.

जत्रेचे आम्ही आलो तेव्हा शेवटचे दोन दिवस राहिले होते. त्यानंतर ही जत्रा संपणार होती. पुढच्या वर्षी ही कुठे भरणार, त्याचं स्वरूप काय असणार काही नक्की नव्हतं. मात्र अविरत परंपरेचं हे शेवटचं पर्व होतं हे नक्की. जत्रा संपेल आणि काही दिवसांत तात्पुरत्या उभ्या करण्यात आलेल्या राहुट्या, तंबू, सरकारी कार्यालये, मनोरंजनाचे रंगमंच, रंगीबेरंगी दुकाने, दोन्ही टापूंतून फिरणाऱ्या वेगवेगळ्या आकाराच्या नावा सगळं संपणार होतं आणि राहणार होतं फक्त जलमग्न होण्याच्या भीतीने आक्रसलेलं आणि अवकळा पसरलेलं, या परिसरातील अनेक गावांपैकी चेहरामोहरा गमावून बसलेलं दुर्दैवी गाव आणि अजूनही त्या गावात चमत्कार होण्याची वाट बघत तग धरून बसलेले दुर्दैवी जीव.

झालंही तसंच आणि बघता बघता गावातल्या आनंदपर्वाला ओहोटी लागली. गाव रिकामं होऊ लागलं. राहुट्या तंबू हळूहळू दिसेनासे होऊ लागले. मनोरंजनाचे रंगमंच रिकामे झाले. 

दुकानांच्या फळ्या उठवल्या गेल्या. माणसांचे लोंढे परतीच्या वाटेला लागले. सरकारी कार्यालये बंद करून कर्मचाऱ्यांनीही आपला गाशा गुंडाळला. गाव पुन्हा आपल्या भकास आणि उदास अवस्थेत आलं आणि लक्षात आलं की, गावातील एक टापू तर पूर्णच रिकामा झाला आहे. तिथल्या चंद्रमौळी घरांची वाताहात लावायलाही कोणी राहिलं नाही. दुसऱ्या टापूवर मात्र अजूनही चार-सहा घरं आणि त्या घरात उद्ध्वस्त चेहऱ्याची हालचाल दिसत होती. चार दिवसांपूर्वीच आम्ही इथं आनंदाची पर्वणी बघितली होती, हे सांगितलं तर कुणाला खरंही वाटणार नाही इतका बदल ह्या चार दिवसांत झाला होता. ज्या पर्वत शिखरावरून -आम्ही जत्रा बघितली होती. तिथे आता कावळ्यांचा वावर आणि गिधाडाची गस्त सुरू झाली होती. आपणच काढलेली रांगोळी आपणच विस्कटून टाकावी तसं स्वतःच्या हातांनी स्वतःची घरं विस्कटून माणसं निघून गेली होती. गाव सुन्न होऊन सगळं बघत होतं.

कधी कधी विचार मनात येतो आपलीच रांगोळी आपल्याच हातून पुसून टाकण्याची ही ताकद ह्या माणसांना कोणी दिली असेल. कदाचित ह्या मागे ही भावना तर नसावी की, इतरांनी आपली रांगोळी पुसण्याअगोदर आपणच पुसून टाकलेली बरी. मला वाटतं स्वतःला असं रक्तबंबाळ करत उद्ध्वस्त करून घेण्याचं तत्त्वज्ञानही निसर्गानेच यांना शिकवलं असावं. कारण शेवटी भूमीपुत्र हे भूमीपेक्षाही सहनशील आणि त्यागी असलेच पाहिजेत. निसर्गच ह्यांच्या दुःखावर खपली ठेवतो अलगदपणे आणि दुःखावरची खपली काढतोही अलगदपणेच.

पण वस्तीविना गाव बघणं म्हणजे पाण्याबाहेरची मासोळी बघण्यासारखंच होतं. काही क्षणांची चैतन्यशील तडफड आणि त्यानंतरची चिरंतन शांतता नि त्या शांततेला छेद देत पिसाटासारखा घराघरांतून घोंघावणारा वारा. गावाच्या या वेशीपासून त्या वेशीपर्यंत. बेधूंद आणि बेबंद. त्याला थोपवून बंदिस्त करण्यासाठी आता गावातील घरांना दारंही नाहीत आणि खिडक्याही नाहीत. मात्र त्याही अवस्थेत दुसऱ्या टापूवरील काही घरांत जीवन अजूनही शिल्लक होतं. आता कुठल्या चमत्काराची वाट बघत हे अभागी जीव तग धरून बसले असतील? काहीच कळत नव्हतं. खरं तर बुडण्याचे सगळे सोपस्कार गावाने शासनाकडून करून घेतले होते. वाचणं आता कुठल्याही परिस्थितीत शक्यच नव्हतं. मग का थांबली असतील ही माणसं इथं कोणत्या आशेने? कसल्या उत्कटतेने? घराघरांतून घोंघावणारा वारा त्यांच्या कानात मातीचं कोणते स्वप्न सांगत असेल? प्रकाशाची कोणती धूसर रेखा यांना थोपवून ठेवू शकली असेल? या प्रश्नांची उत्तरं त्यांनीच दिली आणि आम्ही चक्रावलोच. स्वतःलाच चिमटा काढला. ते जे काही सांगताहेत ते ऐकण्यासाठी तरी आपण भानावर आहोत का? फार वर्षांपूर्वी एक अमेरिकी कथा वाचली होती. तिचंच भारतीय रूपांतर इथं ऐकायला मिळत होतं. त्यांच्यापैकीच एक सांगत होता, गाव रिकामा करण्याचे आदेश आले, तशी पटापट माणसं घर सोडून आहे ते घेऊन, जिथे मिळेल तिथे जाऊ लागली. नर्मदा सागरमध्ये जी गावं पाण्याखाली बुडणार आहेत, त्यात आपलंही गाव आहे, हे आम्ही ऐकून होतो. पण हे सगळं इतक्या तत्परतेनं इतक्या लवकर होईल असं वाटलं नव्हतं. त्यात सगळेच निराश्रित सगळेच बुडालेले, आधार देणार तरी कोण आणि कोणाला. आमच्यापैकी जे त्यातल्या त्यात बरे होते ते आपलं भलं कुठं आहे ते बघून लवकर निघून गेले. जे आमच्यासारखे फक्त वाऱ्यावरच जगत होते ते पाचोळ्याप्रमाणेच भिरभिरत राहिले. शेवटी तोही दिवस आला. जत्रेनंतर या गावातील एकही माणूस इथं राहता कामा नये म्हणून सरकारी दवंडी फिरवली गेली. सरकारला गाव रिकामा हवा होता. लोकांनी जत्रेचीही वाट बघितली नाही त्यापूर्वीच गाव रिकामा केला. आम्हीही त्यात होतो, चांगलं गावाबाहेर पाच कोस दूर गेलो. हा माझा लंगडा बापही आमच्या बरोबरीनं सामान घेऊन चालत होता. सोबतीचे सगळे पुढे गेले. झपझप चालत होते. दिसेनासे झाले. बापाबरोबर चालण्याच्या नादात आम्ही मागे पडत गेलो. शेवटी थांबलो. चालणं थांबवलं. बघितलं. जे आकाश आम्ही डोक्यावर घेऊन चालत होतो ते तसंच आहे. मी बापाकडे बघितलं बाप आकाशाकडं बघत होता लक्षात आलं. कुठेही गेलो, कितीही धावलो तरी आम्ही आहोत तसेच राहणार आहोत त्याचबरोबर हे आकाशदेखील. मग इथून जाण्यात, गाव सोडण्यात, घर सोडण्यात काय अर्थ? जे काही बरंवाईट व्हायचं आहे ते इथेच होऊ दे. आणि परत आलो. गावाची माती पायाला लागली आणि लंगडा बाप एका पायावरच धावत घरात आला, ठरवलं आता इथून जायचं नाही. जायचं ते नर्मदा माईच्या पाण्यातच. ती घेऊन जाईल तेव्हा. तिचीच लेकरं आम्ही तिचीच वाट बघत थांबलो आहोत. सुन्न होऊन ऐकत होतो. जीवन जगण्याचं आणि जगत जगत आत्मसमर्पण करण्याचं हे वेगळंच तत्त्वज्ञान होतं. अर्थात ते जे जगत होते त्याला जगणं म्हणायचं का हा प्रश्न वेगळा, पण शासनाला तर त्यांचं तेही जगणं नकोसं झालं होतं ही वास्तविकता. खांबाला कसं तरी अडकलेलं छत होतं म्हणून ते घर होतं आणि ते घर होतं म्हणूनच त्यांच्या मनातलं घरपण त्यांच्या घरात उतरलं होतं. पोक पुढे आलेल्या भिंतीच्या आश्रयानं त्याचे विकलांग आई बाप बसले होते. तोंडावर पदर घेतलेली त्याची घरधनीण संकोचानं जवळ बसली होती. शेजारच्या घरातील काही माणसं आणि बायाही शेजारी येऊन उभ्या होत्या. जवळजवळ हाच निश्चय प्रत्येक डोळ्यांत दिसत होता. ह्यांना कसं समजवावं कळत नव्हतं. शासन बुडणाऱ्या गावातील माणसांच्या पुनर्वसनाचा तमाशा करत होतं आणि ही माणसं शासनाला वाकुल्या दाखवत मरणाचा खेळ मांडून बसली होती. काहीच न बोलता मूकपणे आम्ही परतलो होतो कारण जिथे काही करण्याची गरज आहे तिथे शब्दांची रांगोळी घालून काहीच उपयोग नव्हता.

हेही वाचा - पुरंदर विमानतळाला शेतकऱ्यांचा विरोध तीव्र; काय आहेत कारणं?

परतत असताना एक प्रश्न कायम मनामध्ये होता. ज्या शासनकर्त्यांना सरकारी बंगला सोडताना जिथे स्वर्ग आठवतो तिथे या निरपराध माणसांची घरं आणि गावं तोडण्याचं अमानुष कृत्य करताना काहीच कसं वाटत नाही? ज्या धरण विकासाच्या गोष्टी हे करतात त्या धरण विकासाच्या पायातच जर इतके निरपराध जीवन नष्ट होत असेल तर तो विकास आम्ही मान्य का करायचा आणि कोणत्या तत्त्वावर? सुखासीन असलेल्या मुठभर माणसांच्या विकासाचं नाटक हजारो गोरगरीब निरपराध जिवांचा बळी घेऊन, कशासाठी तर ह्यांच्याच जिवावर उत्पन्न झालेल्या पेजीवर फुकटचं तूप माखून खाता यावं म्हणून. अगदी नवीन अनुभव घेऊन आम्ही तिथून निघत होतो, वाटत होतं विकास नेमका कुणाचा आणि कुणाला बळी देऊन, हा प्रश्न या निष्पाप जिवांनी जाणता अजाणता आम्हाला विचारला आहे. यांचं अस्तित्त्व, हक्क यासाठीच व्यवस्थेच्या विरोधात हा लढा उभा करावा लागणार आहे. अनपेक्षितपणे विचारांना एक दिशा मिळाली. जगण्याचा हेतू गवसला आणि आपल्या हक्कासाठी असलेला जनसमुदाय मला दिसू लागला. 

पाय जरी पुढे पुढे जात होते, पण विचारचक्र त्या गावांच्या भोवतीच घुटमळू लागलं. गाव बुडत म्हणजे नेमकं काय होतं ह्याचा कधी गाव बुडवणाऱ्यांनी विचारही केला आहे का? गाव बुडतं म्हणजे फक्त गावातील शेणामातीच्या झोपड्या आणि चुना-सिमेंटची घरंच पाण्याखाली जातात का? इथून तिथून नटलेला सभोवतालचा हिरवागार परिसरच नष्ट होतो का? तिथली कसदार जमीन काही कारण नसताना जलमग्न होते का? कुठलीही सबब नसताना तिथल्या लहान-मोठ्या पोटा पाण्यांच्या व्यवसायाला जलसमाधी लाभते का? आणि वाटलं, हे तर होतंच पण ह्यापेक्षाही काही जास्त घडून गेलेलं असतं. ज्याची भरपाई कशानेही करता येत नाही. ज्यामुळे त्या गावाचा, त्या परिसराचा अबाधितपणा कायम राहिलेला असतो. जी ओळख कायम राहिलेली असते, ज्या परंपरा, संस्कृती आणि संस्कार त्या गावानं पिढ्यान् पिढया जोपासून ठेवलेले असतात, ज्या परिसराचं एक सांस्कृतिक व्यक्तिमत्त्व वर्षानुवर्षाच्या परंपरेतून आणि कल्पकतेतून उभं राहीलेलं असतं, पुढच्या पिढीला देण्यासाठी म्हणून जो वारसा त्या गावानं जपून ठेवलेला असतो, ज्या वास्तूमुळे आणि इतिहासामुळे त्या गावाची जगाला ओळख झालेली असते, त्या गावातील माणसं जगाच्या पाठीवर कुठंही गेली तरी त्यांचं बालपण तसंच जोपासून जे गाव त्यांच्या बालपणाला सदैव साद देत असतं, ज्या गावात माणसं पिढ्यान् पिढ्या एक संपूर्ण जीवन जगलेली असतात, ज्या गावात भावबंधनाचा एक रेशीम गोफ माणसांच्या मनाभोवती गुंफलेला असतो, ज्यामुळे गावाचं गावपण त्यांच्या मनात चिरंतर रुजलेलं असतं, ज्या गावामुळे माणसं सामूहिक जीवन जगलेले असतात आणि त्यामुळे त्यांच्या बांधिलकीची वीण जास्त घट्ट झालेली असते, हे आणि ह्याच्यासारखं बरंच काही जेव्हा गाव जलमग्न होतं तेव्हा त्या गावाबरोबर जलमग्न झालेलं असतं. नष्ट झालेलं असतं आणि विकासाच्या नावाखाली हंबरडा फोडत कोणी कितीही दावे केले की, त्या मोबदल्यात आम्ही हे देऊ, आम्ही असं करू तरी ते कालत्रयी शक्य नसतं. कारण ह्याकरता गावानं जे काही गमावलेलं असतं त्याच्या एक शतांशही परतफेड करणं शक्य नसतं. कुठलाही तोडगा या समस्येवर शेवटचा पर्याय होऊ शकत नाही, अश्वत्थाम्याप्रमाणे भळभळणारी जखम घेऊनच आपल्या घरादारातून बेदखल झालेल्या त्या गावातील माणसांना पुढचा प्रवास करावा लागतो.

हेच दारूण सत्य बघत बघत आम्ही आमची वाटचाल करत होतो. प्रवास पुढे पुढे होत होता. पण मन मात्र एखादा वसा घेतल्यासारखं त्या गावांच्या भोवतीच फिरत होतं. इतिहासाच्या अभ्यासकांकरता फक्त अवशेष म्हणून राहून गेलेली कित्येक गावं डोळ्यांसमोर येत होती. कधीतरी रसरशीत असलेलं पण आता कलाहीन झालेलं ते जीवन मनासमोर पुनः पुन्हा येऊन ठेपत होतं. पेढी सुटावी आणि काटक्या मोकळ्या होऊन सैरभैर पसराव्या, तसं जीवन इतस्ततः पसरलेलं दिसत होतं. गावातील जी एकजीवता असते, जिव्हाळा असतो, बांधलेपणा असतो तोच दिसेनासा झाला होता. जिथे कधी जीवन बहरलं होतं तिथे रिकामे आणि भकास झालेले घराचे वासे, पोपडे निघालेल्या, अर्ध्यावर येऊन उभ्या राहिलेल्या भिंती, डागडुजीविना उघड्याच होऊन दुर्दैवाचा दशावतार बघणाऱ्या जुन्या इमारती आणि गावाच्या आश्रयावर उभ्या राहिलेल्या गोरगरिबांच्या झोपड्याही दिसेनाशा झाल्या होत्या. गावातील माणूसपणा संपला होता. गावपण संपुष्टात आलं होतं. त्यामुळे गावातील घरांच्या या अवस्थेकडे कोणी लक्ष देईल तरी कशाला आणि कशासाठी? एखाद्या भल्या मोठ्या ढगाची सावली अंगावर यावी तशी प्रवासाच्या दरम्यान या गावाची वाताहात अंगावर येत होती. ती घेत घेतच आम्ही चाललो होतो. पाच-पाच शतके जोपासून ठेवलेल्या आपल्या परंपरा तीर्थक्षेत्र, जत्रेचे मार्ग वारकऱ्यांच्या टाळ-मृदंगाची धुंदी, जत्रेने सांभाळलेली भक्ती याची देही बघण्याचं दुर्दैव खंडहर झालेल्या गावात मिळालं होतं. गावातील हाडामासाची माणसं वाट फुटेल तिकडे निघून गेली होती. गावं सुन्न होऊन हे यातनाचक्र बघत होती. हवीहवीशी वाटणारी आणि सदैव आपल्याभोवती भिरभिरणारी माणसं आपल्याला असं एकटं सोडून का निघून गेली तेच त्यांना कळत नव्हतं. माणसं उठली तरी गावातल्या वेशी उठल्या नव्हत्या. जमिनीवर ओरखडे उमटल्यासारख्या त्या तशाच जागोजागी दिसत होत्या. 

आणि जे हातचं होतं ते सर्वच गमावून आता शासन पुनर्वसनाच्या गोष्टी करत होतं. आदिवासी, गोरगरिबांच्या आणि अशिक्षित माणसांना देशोधडीला लावून त्याच्या वसाहतीची चिंता करत होतं. जे इथे आहे ते आम्ही तिथेही देऊ म्हणून त्यांना आश्वासन देत होतं. जे त्यांच्या हक्काचं आणि मालकीचं होतं, ते त्यांच्याकडून ओरबाडून त्यांच्यासाठी नवीन वसाहत निर्माण करत होतं. म्हणजे मनातल्या गावाची होळी करून स्वप्नांच्या गावात रमण्याचा आग्रह करत होतं. 'हातचं सोडून पळत्याच्या मागे' लागण्यांचा हा प्रकार होता. त्यातही आश्वासनांच्या खिरापतीचं खोबरं किती कुजकट आणि उग्र आहे हे सांगण्याची वेगळी गरज नाही.

गावंच्या गावं उद्ध्वस्त करून दुसऱ्या जागी या माणसांना नेऊन सोडणाऱ्या शासनानं त्यांचा माणूस या नात्याने कधी विचारच केला नव्हता. साधं एक रोपदेखील इकडून तिकडे लावताना आपण किती विचार करतो. तिथली जमीन, हवामान, वातावरण, रोपाची नैसर्गिक जडणघडण, वाढ इत्यादी गोष्टी विचारात घेतो आणि हे सर्व तिथेही असेल ही खात्री करूनच ते रोप हलवलं जातं. हे सर्व तिथे देण्याचा आपण प्रयत्न करतो. तितकाही प्रयत्न या दुर्दैवी जिवांकरता केला गेला नाही. खरं तर अतिशय संवेदनशीलतेनं तरलतेनं, कल्पकतेनं एखाद्या जखमेवर फुंकर घालावी तसं तितक्या हळुवारपणं, समंजसपणं हे सर्व व्हायला हवं होतं. कारण एका जमिनीत वाढलेलं निरागस रोप दुसऱ्या जमिनीत रोवण्यासारखंच हे काम होतं. पण ज्या पद्धतीनं या निष्पाप जिवांच्या पुनर्वसनाची समस्या हाताळण्यात आली ते ऐकून जीव थरकाप व्हायचा. मेंढपाळांनी मेंढरं हाकारावी तसं माणसांना हाकारण्यात आलं आणि कोंडवाड्यात नेऊन सोडावी तसं वेगवेगळ्या गावात सोडून देण्यात आलं. कोणी काही आवाज करण्याचा प्रयत्न केलाच तर पोलिसव्यवस्था सज्ज होतीच दिमतीला. एकदा का गाव रिकामं झालं माणसं निघून गेली की, शासनही निर्विघ्न आणि अधिकारीही कामातून मुक्त, आता ते कुठे जातील कसे राहतील, तिथली व्यवस्था काय ? एवढा विचार करतं कोण? ते जाणे त्यांचं नशीब जाणे. असेल त्यांच्या नशिबात तर रुजतील त्या मातीत, नाही तर समर्थ सांगूनच गेले आहेत. 'मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तो ही पुढे जात आहे.' नाही तर मातीत कुजून खताच्या कामास येतील. आता हे असं म्हणून कोणी काही विकासाची स्वप्नंच बघू नये का?

harsud

खरं तर, एका गावातून माणसांना हुसकावून दुसऱ्या गावात नेऊन बसवणं म्हणजेच पुनर्वसन होतं का? बस इतकाच याचा अर्थ असतो, एवढं केलं की, इतिकर्तव्यता होते व जबाबदारीतून मोकळं होता येतं? जमिनीचा जो काही सरकारी भाव नक्की झाला असेल तो देऊन हात झटकता येतात? अगदी प्राथमिक स्तरावर जरी विचार केला, तरी ह्या पेक्षाही कितीतरी पुढे जाऊन विचार करावा लागतो. कारण एकीकडे परंपरा संपलेली असते. मातीने आपली नाळ तोडलेली असते, तर दुसरीकडे संस्कार मातीत रुजवायचे असतात. विशेष म्हणजे त्या मातीचा आपला गंध असतो, ओलावा असतो. श्वासोच्छ्वास असतात. तिथे या निष्पाप होरपळलेल्या जिवांना स्वतःला रुजवून घ्यायचं असतं. एकरूप व्हायचं असतं. आपली स्वतःची ओळख विसर्जित करून नवीन ओळख कायम करायची असते. सर्वस्व गमावूनही आपलं स्वत्व सांभाळायचं असतं. विशेष म्हणजे तिथं पूर्वीपासून राहात आलेल्या भूमिपुत्रांशी जमवून घ्यायचं असतं. पण हे सर्व इतकं सोपं असतं? एखादा चमत्कार घडावा तसं रात्रीच्या रात्रीत घडणं शक्य असतं?

शासनाच्या दृष्टीनं कदाचित तसं होतंही असेल, पण वास्तविकता काही औरच असते. म्हणूनच घराला चिकटून, गावाला घट्ट धरून माणसं पाण्यात तिथेच बुडण्यास तयार असतात. पण आपलं घर, आपलं गाव, त्यांना सोडणं मान्य नसतं. अशी कितीतरी उदाहरणं आम्हांला गावांनी दिलेली होती. माणसांनी आपल्या यातना तिथेच भोगण्याचं कबूल केलं होतं आणि शेवटाची वाट बघत थांबले होते. सगळं काही गमवायला तयार होते. पण गाव सोडण्यास तयार नव्हते, कारण त्यांना ठाऊक होतं की, कितीही प्रयत्न केला तरी, नवीन जागी त्यांचं मन लागणार नाही. ती जागा त्यांना कधी आपली वाटणार नाही. आपण इथे उपरे आहोत ही जाणीव कायम बोचत राहील आणि त्यावेळी मनातील गाव कायम तळाशी गेला असेल. कसदार जमिनीचा मिळालेला किरकोळ मोबदला सदैव त्या जमिनीची आणि तिच्या सुपीकपणाची आठवण करत राहील व अवशेष झालेल्या स्वप्नांवरच आयुष्य सरत जाईल. त्यातही कपाळावर कोरलेला दुय्यमपणाचा शिक्का कायम राहील तो तसाच. हे सगळं बघणं, सहन करणं आणि त्यातून मार्ग काढणं असह्य होईल ते वेगळंच.

खरं तर ही आदिवासी माणसं, अशिक्षित माणसं, ज्यांना विस्थापित म्हणून आपल्या जागांवरून हाकलून देण्यात आलं ती काय काय उत्पन्न करत नव्हती? आपल्याला ऐकून खरं वाटणार नाही. एक मीठ सोडलं तर अशी कोणतीही गोष्ट नव्हती, जी ही माणसं उत्पन्न करत नव्हती. राष्ट्रीय उत्पादनात त्यांचाही वाटा होता. त्यांच्यात न्यूनता होती ती फक्त एकच की ते अशिक्षित होते, गोरगरीब होते. गावांच्या वेशी ही न ओलांडलेले आदिवासी होते. नर्मदेच्या खोऱ्यात दोन्हीकडे मैलोगिनती विखुरलेले होते. पण दुर्दैवानं ते संघटित नव्हते. एकसंध नव्हते म्हणूनच आपलं हित कशात आहे, हे ते जाणू शकत नव्हते. शिवाय त्यांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन वेळीअवेळी पोलिसांचा दांडुका त्यांच्यावर चालत होता तो वेगळाच. म्हणूनच मूक असहाय होऊन हे सगळं सहन करत राहणं आणि पावलोपावली मरणांला सिद्ध होत राहणं एवढंच त्यांना शक्य होतं. त्यांच्या या अवस्थेचा फायदा घेऊनच त्यांना त्यांच्या घरातून, गावातून, परिसरातून बेदखल करताना शासन देखील एखाद्या गुन्हेगाराशी व्यवहार करावा तसा व्यवहार करत होतं.

हेही वाचा - कोकणाच्या विनाशकारी विकासाला आव्हान देणारी राखणदार यात्रा

आम्ही हे सर्व बघत चाललो. माणसांना देशोधडीला लावून गावांची विल्हेवाट लावणाऱ्या आणि सुरम्य परिसर बेचिराख करणाऱ्या शासनाच्या बुद्धीची कीव करावीशी वाटत होती. त्याचबरोबर आठवत होती कुठेतरी वाचलेली युरोपातील गावांचे वाढदिवस साजरा करण्याची पद्धत. गावाचा वाढदिवस हा तेथील गावकऱ्यांची गावाबद्दल असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. लोकनृत्य, लोकनाट्य, लोकसंस्कार, ज्यामुळे ही गावांची परंपरा आणि ओळख चिरंजीव राहिली आहे त्याचं सामुहिक प्रगटीकरण या दिवशी केलं जातं. गावांचा इतिहास त्या दिवशी परत एकदा जागवला जातो आणि आपल्या गावाचे इतिहासाचे पोवाडे गात मंडळी पुढच्या गावाला जात असतात. त्या पार्श्वभूमीवर विचार केला तर आमचं शासन कृतज्ञता दिवसाऐवजी गावच्या गावं नामशेष करत कृतघ्नता दिवसाचा जागर पुढे पुढे नेताना दिसत होतं. अर्थात हा संस्कृती संस्कृतीमधला फरक होता. आम्हांला त्यांच्याकडून काय घ्यायला हवं आणि आम्ही काय घेतलं हे स्पष्ट दिसत होतं.

नर्मदेच्या खोऱ्यातील महेश्वर मंडलेश्वर परिसरातून आमचा गुजराथकडील परतीचा प्रवास चालला होता. तेथील नरहर पटेल सांगत होते. हा जो १३ किलोमीटरचा भाग आहे तेवढाच फक्त वाचला आहे नाही तर अगदी अमरकंटक पासून ते सरदार सरोवरपर्यंत नर्मदेचा सगळा किनारा आणि कसदार जमीन बरगी, नर्मदा सागर, ओंकारेश्वर महेश्वर आणि सरदार सरोवर धरणामुळे पूर्ण जलमय होणार आहे. त्यात किती गावं बुडतील, किती जनजीवन नष्ट होईल, किती परिवार देशोधडीला लागतील, किती कसदार आणि काळीशार जमीन पाण्याखाली जाईल, किती वनंसुद्धा संपुष्टात येतील. हे त्या ईश्वरालाच माहीत. शासन करेलच नियमाप्रमाणे, त्याला जे करायचं आहे. पण सध्या तरी डोळे उघडे ठेवून आणि मनावर दगड ठेवून आपला विनाश आपल्या डोळ्यांनी बघत राहणं एवढच ह्या माणसांच्या हातात आहे. कारण तुम्हीच सांगा,

'कोणाच्या अंगणात रिचवायचे आता
आसवांचे रांजण
करुणा भरून ठेवायची
कोणत्या पोत्यात
सगळ्याच वाटा
ऊर फुटून उताण्या झालेल्या
पाखरांच्या चोचीही टिपून बसलेल्या
भवताली.
सरणाच्या रांगोळ्या काढून
हुंदके आकाशभर झालेले
गणगोताचे सारे निकाल
पायाजवळ कोसळून पडलेले
धरणीची वाचा कर्कश्श झालेली
आभाळाची माय
गावा गावांत मेलेली (केशव देशमुख)'

आम्ही सुन्न होऊन ऐकत होतो. काय बोलावं सुचत नव्हतं. फक्त एक लक्षात येत होतं की, इतिहासाकडून आम्ही हेच शिकलोय की, आम्ही इतिहासाकडून काही शिकत नाही. डोळ्यांच्या कडा अभावितपणे पाणावल्या होत्या.

- दीपक चैतन्य

***

मणिबेली ते हरसूद...

मध्य प्रदेशातील नर्मदा खोऱ्यातील हरसूद शहर पावसाळ्यात बुडितात येणार म्हणून लोक शहरातील आपली घरं पाडून गाव सोडत असल्याची काळजाला पीळ पाडणारी दृश्ये सध्या दूरचित्रवाणी वृत्त वाहिन्यांवर येत आहेत. नर्मदा खोऱ्यातल्या गावांमध्ये तर गेली अनेक वर्षे लोक बुडिताशी व विस्थापनाशी झगडत आहेत. गुजरात-महाराष्ट्र सीमेवरील सातपुड्यातल्या मणिबेली-चिमलखेडीपासून ते खांडव्याशेजारच्या नर्मदा सागरच्या हरसूदपर्यंत शेकडो गावांतील हजारो कुटुंबांची ही कथा आहे. विंध्य-सातपुड्यातील आदिवासी कुटुंबे वर्षानुवर्षे आपले वाहून गेलेले संसार, शेती व पाडलेली घरं पाहताहेत, घरं सोडताना रडत आहेत. निमाडमधील समृद्ध गावं, तिथली सुपीक संपन्न शेती, बाजार, जत्रा, मेळे, नदीकाठचं जीवन सर्व पाहता पाहता उद्ध्वस्त होत आहे. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री उमा भारती तर सरकारची काही जबाबदारी आहे, हेच नाकारतात. सर्व दोष मागील काँग्रेस सरकारवर टाकतात. ज्या दिग्विजयसिंहांनी मुख्यमंत्री असताना कायदा, विस्थापन व पुनर्वसनाची पर्वा न करता नर्मदेवरील सर्व धरणांचं काम पुढे चालवलं, तेच आता सरकारवर तोंडसुख घेत आहेत.

हा सगळाच प्रकार अमानुष आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावरील मानवीय, सामाजिक संकटाचं मामुलीकरण करणारे, त्याला आपल्या नेहमीच्या राजकारणाचा भाग मानणारे राजकारणी व त्याला रंजनाच्या पातळीवर आणणारी माध्यमे यामुळे यातील तथ्य व दर्दच हरवत आहे. सतत १९ वर्षे नर्मदा खोऱ्यात लोकांनी अन्याय्य विस्थापनाला आव्हान दिलं तरी इथल्या सत्ताकारणामुळे आपल्या डोळ्यांदेखत त्यांचा बळी जात आहे. हरसूद शहर इतर २५३ गावांबरोबर नर्मदा खोऱ्यातील नर्मदा (इंदिरा) सागर या खांडव्यानजिकच्या महाकाय धरणाच्या बुडितात येतं. हे धरण सरदार सरोवराच्या वरच्या प्रवाहावर मध्य प्रदेशात खांडवा जिल्ह्यातल्या मैदानी निमाड भागात आहे.

harsud

नर्मदा खोरे विकास (!) योजनेत ३० मोठ्या, १३५ मध्यम व तीन हजार लहान धरणांची योजना आहे. त्यापैकी लहान वा मध्यमांचा पत्ता नाही. मात्र तवा, सुकता, बारना, कोलार, बरगी ही मोठी धरणं १९७०- १९९० दरम्यान तयार झाली. सर्वामध्ये मिळून दोन लाखांवर कुटुंबं विस्थापित झाली व पुनर्वसनाच्या नावाने शून्य प्रगती व लाभाच्या नावाने किरकोळ जमा! असा प्रकार असतानाच सरदार सरोवर व नर्मदा सागर या दोन महाकाय धरणांचं (मेगा डॅम) काम व त्यानंतर १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात मान, जोबट, वेदा, महेश्वर व ओंकारेश्वर यांच्यावर काम सुरू आहे. या सर्वांमध्ये विस्थापन व पुनर्वसनासकट अनेक मुद्द्यांबाबत प्रश्न उभे राहिले. मात्र या कशाचीच उत्तरं न देता, गावकऱ्यांना न जुमानता अटक, मारहाण व अत्याचार करून न्यायालयांच्या आदेशांनाही धाब्यावर बसवून धरणांचं काम सुरू केलं. १९९०च्या दशकातील भाजपच्या सुंदरलाल पटवा सरकारने व नंतर काँग्रेसच्या दिग्विजय सिंह सरकारने हेच धोरण राबवलं.

सरदार सरोवर धरणात गुजरातची १९, मध्य प्रदेशची १९३ व महाराष्ट्राची ३३ गावं विस्थापित होणार असून, सरकारच्याच निवेदनाप्रमाणे ४३ हजारहून अधिक कुटुंबं (म्हणजे २.५ लाख लोक) विस्थापित होतील. शिवाय कालवाग्रस्त (१ लाख १७ हजार खातेदार), कॉलनीग्रस्त (९ गावे), अन्य योजना (८ गावे), पर्यायी अभयारण्यग्रस्त (१०८ गावे) व पाणलोट क्षेत्र विकास वा पर्यायी वनीकरण यासाठी विस्थापित होणाऱ्या हजारो कुटुंबांची दखलच नाही. धरणात ३७ हजार हेक्टरहून अधिक जंगल व १३ हजार हेक्टरहून अधिक शेतजमीन बुडते. नर्मदा सागर धरणात मध्य प्रदेशातील २५४ गावं व त्यातील किमान दोन लाख लोक विस्थापित होतील. किमान ४४ हजार हेक्टर सुपीक जमीन व ५० हजार हेक्टर घनदाट व दुर्मीळ जंगल बुडत आहे. म्हणजे ९१ हजार हेक्टर जमीन बुडवून १ लाख २५ हजार हेक्टर जमिनीला सिंचन देण्याची योजना आहे. नर्मदा धरणांचे अभ्यासक रमेश बिल्लोरे सांगतात की, नर्मदा सागर धरणाचं कागदावर देखील समर्थन करता येत नाही. मात्र सरदार सरोवर व त्यानंतर महेश्वर धरणाविरूद्ध जोरदार जन आंदोलन उभं राहिलं तसं नर्मदा सागरमध्ये अनेक कारणांमुळे होऊ शकलं नाही. मात्र वेदा, मान धरणांच्या क्षेत्रांमध्ये आदिवासींच्या योग्य पुनर्वसनासाठीचं आंदोलन दडपून टाकले गेलं व पुनर्वसनाशिवायच है दोन्ही भाग बुडविण्यात येत आहेत. महेश्वर या भारतातील पहिल्या खासगी जलविद्युत प्रकल्पामुळे ५०० हेक्टर अत्यंत सुपीक जमीन व ६२ गावं बुडतात. त्यात हजारो मच्छिमार, नावाडी, दलित कुटुंबं विस्थापित होत आहेत. गेली पाच वर्षे तिथल्या शेतकऱ्यांनी आंदोलन करून एस. कुमार कंपनी व सरकारला बांधकाम थांबवण्यास भाग पाडलं.

सरदार सरोवर प्रकल्पांतील लाभांच्या दाव्यांची अवास्तवता व खोटेपणा नर्मदा बचाओ आंदोलन, मोर्स रिपोर्ट, अनेक तज्ज्ञ अहवाल व पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले होते. सरदार सरावरचं पाणी कच्छ व सौराष्ट्रला मिळणार नाही, हे आता स्पष्ट होत आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पाईपलाईनने कच्छला पाणी पुरवल्याचं नाटक थोड्याच दिवसांत बंद करावं लागलं. एक पाईपलाईनने पाणी पुरवायचं असल्यास त्यासाठी आज आहे त्यापेक्षा कमी उंची पुरते. आज गुजरात सरकारकडे ११० मीटर व त्याच्यापुढे धरण पूर्ण करण्यास (कालवे, वीजघर, पुनर्वसन इ.) पैसेच नाहीत. शिवाय १९९४मध्ये १७ टक्के व्याजावर २० वर्षाचे डीप डिस्काऊंट बॉण्डस् मुदतीपूर्वीच परत करण्याचे नर्मदा निगमने ठरवलं आहे. कारण सहा हजार १०० कोटी रूपये परत करण्याची राज्य सरकारची ऐपत नाही! धरणावर १४ हजार ३६१ कोटी रूपये खर्च केले; आणखी किमान २६ हजार २५५ कोटी रूपये हवेत.

हेही वाचा - शक्तीपीठ महामार्ग - नाव देवाचं, लाभ उद्योगपतींना, नुकसान मात्र शेतकऱ्यांचं : संपत देसाई

अशा सरदार सरोवरासाठी महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्यातल्या ३३ गावांतील आदिवासींचं जीवन पणाला लावायचं कारण नव्हतं. या प्रकल्पातून महाराष्ट्रालाही तुटपुंज्या व बेभरवशाच्या विजेपेक्षा अधिक काही मिळणार नाही. तरीही महाराष्ट्रातील राजकीय नेते व नोकरशहा या धरणासाठी आपल्याच आदिवासींना देशोधडीला लावण्यास उत्सुक होते. धरणाच्या ८० मीटरखालील आपल्या आदिवासी गावकऱ्यांचं पुनर्वसन झालं नाही, त्यांची संख्या निश्चित नाही किंवा पुनर्वसनाची जमीन उपलब्ध नाही, हे सर्व वारंवार पुराव्यासहित मांडलं. अधिकारी, मंत्री, मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून व जमीन आधारित न्याय्य पुनर्वसनाशिवाय धरणाची उंची वाढवू देणार नाही, हे १९९० मध्ये शरद पवारांपासून सुशीलकुमार शिंदे यांच्यापर्यंत प्रत्येकाने लिखित अभिवचन दिलं असताना गुजरात सरकारच्या दबावासमोर महाराष्ट्र सरकार झुकत राहिलं. धरणाची उंची वाढत राहिली. आर. आर. पाटलांसारखा एखादा मंत्री सोडला, तर कुणी तिथे पाहण्यासाठीही आले नाहीत.

दरवर्षी पावसाळ्यात चिमणखेडी, बामण, डनल, भरड, सिक्का, डोकखेडी व आता निमगव्हाणसारखी गावं बुडितात येत आहेत. त्यांना कोणत्याही पुनर्वसनाशिवाय हुसकावलं जात आहे. चिमलखेडीत लोकांनी राहू नये म्हणून त्यांची घरं २००२ मध्ये महाराष्ट्र पोलिसांनी जमीनदोस्त करून टाकली. पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावरील बुडित आले असताना त्यांना विस्थापित म्हणून जाणूनबुजून घोषित केलं नाही. पुनर्वसनासाठी खाजगी जमिनी आता मिळत असूनही त्या खरेदी करून पुनर्वसन होऊ दिलं जात नाही. राज्य सरकारच्याच टास्क फोर्सच्या शिफारशींची व मंत्रिमंडळाच्या २२ जानेवारी २००४ च्या निर्णयाची अंमलबजावणीच टाळली जात आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच युद्धपातळीवर पुनर्वसन करायची गरज आहे. बुडितात येणाऱ्या आदिवासींविषयी करुणेने वागायचं सोडून जिल्हा प्रशासनातील अधिकारी जणू शत्रुत्त्वाने वागत आहेत. बहुजन समाजातील अधिकाऱ्यांचेही विचार प्रस्थापितांप्रमाणे झालं आहेत. त्यामुळं या वर्षीही किमान एक हजार आदिवासी कुटुंबांवर बुडिताचा सामना करणं नशिबी आलं. धरणाची उंची ११० मीटर झाल्याने सरदार सरोवरातील ४३ हजार विस्थापित कुटुंबापैकी १० हजार कुटुंबे बुडितात येणार आहेत. मध्य प्रदेशातील सत्ताधारी भाजप व त्यापूर्वीच्या काँग्रेसने त्यांना जाणूनबुजून तोंडी दिलं आहे. आदर्श पुनर्वसनाचा दावा करूनदेखील गुजरातेतल्या विस्थापितांची स्थिती अत्यंत हलाखीची आहे.

कायदा, न्याय, हजारो माणसांचं जीवन, तर्कशुद्ध, वैज्ञानिक पुराव्यासहित धरण व विस्थापनाविरुद्धचे सर्व सवाल पायदळी तुडवणारा हा सरकारी दहशतवाद होय. गेली १९ वर्षे न्यासाठी व आपल्या हक्कांसाठी शांततामय मार्गाने लढणाऱ्या शेतकरी-आदिवासींना सत्ताधारी, नोकरशहा-तंत्रशहा काय सांगू पाहताहेत? यापुढे अन्य विस्थापितांनी वा अन्यायग्रस्तांनी आवाज उठवू नये, आपण म्हणू तोच विकास व त्यासाठी जमीन, जीवन व अधिकारांवरून बेदखल करू शकतो, हीच आतंकवादी परंपरा पुन्हा स्थापण्याचा हा प्रयत्न आहे.

मात्र, नर्मदा खोऱ्यातील आदिवासी-शेतकरी आपला लढा चालूच ठेवतील. कारण त्यांना आता आपलं व यापुढील प्रकल्पग्रस्तांचं जीवन उद्ध्वस्त होऊ द्यायचं नाही. देशभरात मोठ्या धरणांमुळे किमान ५० लाख लोक विस्थापित झाले आहेत. २५ टक्के विस्थापितांचेदेखील पुनर्वसन झालेलं नाही. त्यांच्या जीवावर विकासाचे दावे करणाऱ्या प्रकल्पांचं व त्यामागील विकास धोरणाचं फोलपण दिवसेंदिवस ध्यानात येत आहे.

प्रत्येक टप्प्यावर, निराश करणाऱ्या परिस्थितीतही आपल्या संघर्षाला अधिक व्यापक व सृजनशील रूप नर्मदेतील आंदोलनाने दिलं आहे. आपल्याबरोबरच देशातील आदिवासी-दलित-शेतकरी विस्थापित व अन्यायग्रस्तांच्या लढ्यातून अधिक सुयोग्य विकास, धरणांसाठी संघर्ष व निर्माणाचं हे आवाहन आहे.

- संजय संगवई

(अनुभव,ऑगस्ट २००४ च्या अंकातून साभार.)

दीपक चैतन्य, संजय संगवई







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results