आम्ही कोण?
आडवा छेद 

पर्यायी राजकारणाचं स्वप्न का भंगलं?

  • सुहास कुलकर्णी
  • 08.02.25
  • वाचनवेळ 5 मि.
  • Share on Tweeter
  • Share on Whatsapp
  • Share on Facebook
delhi election result

दिल्लीत ज्या रीतीचे वारे वाहत होते त्यावरून निवडणुकीत आम आदमी पक्ष तग धरेल असं वाटत नव्हतं. झालंही तसंच. विधानसभेच्या जागांमध्ये संपूर्ण उलटफेर झाला आणि आपचा तडाखून पराभव झाला. ‌एकाच निवडणुकीत ‘आप‌’चा प्रवास ६२ वरून २२ वर झाला. ७० जागांच्या विधानसभेत आधीपेक्षा दोन तृतीयांश जागा कमी घेणं म्हणजे दारुण पराभवच म्हणायचा.

मुख्यमंत्री आतिशी, गोपाळ राय, अमानतुल्ला खान आणि सोमदत्त असे मोजके नेते वगळता ‌‘आप‌’चे सर्व महत्त्वाचे नेते यंदा पराभूत झालेले आहेत. खुद्द अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, सोमनाथ भारती, सत्येंद्र जैन, सौरभ भारद्वाज, दुर्गेश पाठक आणि राखी बिडलानसारखे मोठे चेहरे या निवडणुकीत धुळीत मिळाले. अवध ओझांसारखे स्पर्धा परीक्षा क्षेत्रातले तज्ज्ञ सेलिब्रिटीही आपली लोकप्रियता निवडणुकीत दाखवू शकले नाहीत. जेव्हा मोठे चेहरे पडतात तेव्हा मतदारांचा त्यांच्यावर आणि त्यांच्या पक्षावर राग असतो, हे नक्की. गेली पाच वर्षं हा राग दिसत नसला तरी तो निवडणुकीत व्यक्त झालाय.

पक्षाचा राष्ट्रीय प्रमुख, पक्षाचा संस्थापक आणि त्याचे पहिल्या फळीतील बहुतेक नेते निवडणुकीत मार खातात, तेव्हा पक्षाचं नक्कीच काहीतरी चुकलेलं असतं. 'आपण ढगातून पडलेलो आहोत आणि इतर पक्ष आणि नेते हे क:पदार्थ आहेत', हा केजरीवालांचा तोरा या निवडणुकीमुळे उतरला तर चांगलंच होईल म्हणायचं. याशिवायही अनेक धडे ‌‘आप‌’ला यंदा मिळाले असतील. त्याची चर्चा पक्षांतर्गत पातळीवर किती मोकळेपणाने होते यावर ‌‘आप‌’चं भवितव्य ठरणार आहे. पण या पक्षात हवं तेवढं मोकळं वातावरण नाही आणि इकडेही ‌‘सबकुछ केजरीवाल‌’ अशीच परिस्थिती आहे, असं सांगितलं जातं. योगेंद्र यादव, प्रशांत भूषण, कुमार विश्वास यांसारख्या पक्षाच्या संस्थापकांना पक्षातून बाहेर पडावं लागलं, यावरून हा फक्त केजरीवालांचा पक्ष असल्याची प्रतिमा तयार झाली होती. गेल्या सर्व निवडणुका पक्षाने केजरीवालकेंद्रितच बनवल्या होत्या. पण यावेळी खुद्द केजरीवालच विजयी होऊ शकले नाहीत, त्यामुळे या पुढे तरी पक्षाचं धोरण बदलतं का, हे बघावं लागेल.

विधानसभेतील जागांमध्ये झालेली घसरण चिंताजनक असली, तरी पराभव होऊनही ‌‘आप‌’ची मतं बऱ्यापैकी टिकून आहेत, ही त्यांच्यासाठी दिलाशाची गोष्ट असेल. या पक्षाची मतं गेल्या विधानसभेतल्या ५४ टक्क्यांवरून यंदा ४३ टक्क्यांवर आली आहेत. पण एवढा मोठा पराभव होत असताना ४३ टक्के मतं मिळणं, हीदेखील छोटी गोष्ट नाही. दोन निवडणुकांमध्ये १० टक्के मतांची घट होणं ही पक्षाच्या दृष्टीने अंतर्मुख होण्याची गोष्ट निश्चितच असेल, पण ही निवडणूक जिंकणाऱ्या भाजपला यंदा ४५ टक्के मतं मिळालेली आहेत. या अर्थाने या दोन पक्षांमध्ये फक्त २-३ टक्क्यांचाच फरक आहे. मतांच्या टक्केवारीकडे पाहिलं तर ‌‘आप‌’चा पराभव फार मोठा दिसत नाही. पण तो जागांच्या बाबतीत मोठा होण्याचं कारण काँग्रेसने मिळवलेली ६ टक्के मतं. मागील लेखात म्हटल्याप्रमाणे काँग्रेसला मिळणारी मतं ‌‘आप‌’च्या मतांमध्ये घट करणारी ठरली आहेत. केजरीवाल यांनी समजूतदारपणा दाखवून काँग्रेससोबत युती केली असती, तर कदाचित आज त्यांच्यावर कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली नसती. पण केजरीवाल यांच्यासारख्यांच्या स्वप्रतिमेच्या कल्पना इतक्या अफाट असतात की त्यामुळे अशी माणसं वस्तुस्थितीपासून दुरावत जातात नि मग खाईत पडतात.

२०११च्या भ्रष्टाचारविरोधी अण्णा आंदोलनाच्या मेगा शोमधून केजरीवाल यांचा राजकीय उदय झाला. त्यांच्या पक्षाला जन्मत:च यश लाभलं आणि ते स्वत:ला राष्ट्रीय हिरो समजू लागले. लोकसभा निवडणुकीत तर ते पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, असंही सांगितलं गेलं. त्यांनी धोरणीपणे देशातील छोट्या राज्यांमध्ये आपले पाय पसरण्याचा प्रयत्न केला, पण पंजाब वगळता इतर कुठेही त्यांना यश मिळालं नाही. पंजाबातही त्यांची लढाई भाजपसोबत नव्हती. जिथे त्यांचा सामना भाजपसोबत होता, तिथे ते सपशेल अपयशी तर ठरलेच, शिवाय भाजपविरोधी मतांचे ‌‘वोट कटवा‌’ ठरले. आपल्यामुळे भाजपविरोधी राजकारणाची पीछेहाट होते आहे, याची त्यांनी आजवर कधी तमा बाळगलेली नाही. आपण सर्वांपेक्षा वेगळे आहोत, अशीच स्वप्रतिमा बाळगून ते वागत राहिले. यंदा दिल्लीतील जनतेने त्यांचे पाय जमिनीवर टेकवले आहेत. अर्थात, केजरीवाल तसं मानतील असं नाही!

‌‘आप‌’ हा काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांपेक्षा वेगळा, कार्यक्रम आणि कार्यकर्ते यांना महत्त्व देणारा, राजकीय प्रक्रियेत जनसहभागाला प्रवृत्त करणारा, गरीब आणि कष्टकऱ्यांचं दु:ख आणि प्रश्न समजून घेणारा, भ्रष्टाचाराला आळा घालून जनतेचा पैसा काटकसरीने वापरणारा, पर्यायी राजकारण करू पाहणारा पक्ष आहे, अशा अनेक प्रतिमा या पक्षाशी जोडलेल्या होत्या. वेगवेगळ्या कारणांमुळे एकेककरून या प्रतिमा गळत गेल्या आणि एक स्वप्न दहा वर्षांतच भंगलं.

निकाल लागत असतानाच पराभव स्वीकारल्याची वक्तव्यं केजरीवाल यांच्यासह अनेक नेत्यांनी केली आहेत. पण याचा अर्थ आपली राजकीय समज अपुरी पडली आहे, काँग्रेसबाबतचं आपलं धोरण चुकलं आहे, दलित आणि मुस्लिम या घटकांचा आपल्यावरील विश्वास हलला आहे वगैरे बाबी त्यांनी मान्य केल्या आहेत असा होत नाही. ती समज आणि बुद्धी केजरीवाल यांना आली, तरच या पक्षाला पुढे काही भवितव्य असेल. अन्यथा पंजाबमधलं त्यांचं राजकारणही धोक्यात येऊ शकतं.

एकेकाळी माध्यमांनी केजरीवालांना मोठं केलं म्हणून ते ममता बॅनर्जी, स्टॅलिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, चंद्राबाबू नायडू, सिद्धरामय्या नि रेवंथ रेड्डी या प्रादेशिक नेत्यांपेक्षा मोठे नेते ठरत नाहीत. याची जाणीव संजय सिंह यांच्यासारख्या ‌‘आप‌’ नेत्यांना आहे, पण ‌‘केजरीवाल की दुनिया‌’ वेगळीच आहे.

या निकालामुळे केजरीवाल या आत्मप्रौढीच्या दुनियेतून बाहेर पडतात का, एवढंच आता बघायचं!

सुहास कुलकर्णी | uniquefeatures.portal@gmail.com

सुहास कुलकर्णी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. गेली तीन दशकं ते राजकीय प्रक्रियांचं विश्लेषण करत आले आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 1

Kumar Bobade08.02.25
अचूक विश्लेषण
See More

Select search criteria first for better results