‘श्रीनिवास विनायक कुलकर्णी' अशा संपूर्ण नावाने लिहिणारा हा लेखक. नुसतं ‘श्रीनिवास कुलकर्णी' का लिहित नाहीत, हा प्रश्न तेव्हा पडला होता. पण नंतर ओळख झाल्यावर कळलं, की ते औदुंबरच्या घराशी मनाने, प्रत्यक्ष किती निगडित आहेत ते. आमच्या घरी आले, सुनंदाची चौकशी, आई अलीकडे इथे असते, तर तिची चौकशी, मुलींची दखल... असं करत ते माझ्याकडे येणार. ‘मी लेखक' असा भाव कधीही नसतो. ते आहेत अगदी घरेलू माणूस. घरेलू म्हणजे घरात नुसता राहणारा नव्हे, तर रमणारा.
खूप वर्षांपूर्वी, ऐंशीच्या दशकात कराडला पुरस्कार घेण्यासाठी मी, सुनंदा, मुली गेलो होतो. तिथे रस्त्यात ते भेटले. म्हणाले, ‘चलता का घरी, साबुदाणा भिजवलेला आहे.' आम्हीही पुढे कुठे जात होतो ते विसरून त्यांच्या, त्यावेळच्या गावातल्या घरी गेलो. ललिताताईंनी छान खिचडी केली. किती वर्षं झाली पण मुलींना ती खिचडी लक्षात आहे.
त्यांच्या लिखाणात हा घरेलूपणा तर आहेच. पण साध्या वाटणाऱ्या अनेक गोष्टींत रमणंही आहे. ते गप्प असतात. पण गप्प म्हणजे शून्यात नव्हे. ते काहीतरी पाहत असतात. आपल्याला क्षुल्लक वाटतील, पण त्यांना त्या किती महत्त्वाच्या बाबी वाटत असतात. त्यांचे काही लेख, तर कविताच वाटाव्यात, असं तरल.
नंतरच्या काळात ते गावाबाहेर ‘कोयना वसाहती'त राहायला गेले. मागे टेकडी, बाजूला झाडं. मी कोल्हापूरला जाताना वेळ असला की, कराडला थांबतोच. त्यांच्याकडे आधी चहा, गप्पा, मग जेवण. आणि नंतर पुढच्या प्रवासाला निघायचं. ललिताबाईंच्या हातचं सुग्रास जेवण. एकदा त्यांनी केलेली सोलकढी इतकी आवडली की, मी पीतच सुटलो. मग कृती विचारली. मी डायरीत लिहू लागताच श्रीनिवास म्हणाले, “थांबा. मीच लिहून देतो.” माझ्या डायरीत त्यांनी रेसिपी लिहून काढली. त्यांचं अक्षर इतकं सुंदर आणि सुवाच्च, की बस्स. बाकी डायरीत माझ्या कशाही, वर रेघा नसलेल्या अक्षरांतल्या नोंदी, पत्रं. आणि मध्येच ओॲसिस दिसावं, तशी त्यांच्या अक्षरातली सोलकढीची कृती.
मग जेवण झाल्यावर निघताना पोहोचवायला सगळे बाहेर येणार. मीही कॅमेरा काढून त्या त्या वेळच्या पोराबाळांसहित, वेगवेगळी समीकरणं करत फोटो काढतो. नंतर त्याच्या प्रतीही पाठवतो. हा सगळा आनंदाचा भाग. आता आर्किटेक्ट होऊन व्यवसाय करणाऱ्या उदयन आणि आलोक या मुलांना मुलं झालीत. बहुतेक सगळी माझ्या कॅमेऱ्या‘खालून' गेली आहेत.
हेही वाचा - डार्विन आजोबांची शिकवणी
त्यांची पुढची खोली पुस्तकांनी भरलेली. अंकांचे गठ्ठे रांगेत. कशावर धूळ नाही. कसले कागद, कपटे इतस्ततः पसरलेले नाहीत. असा शांत माणूस एकेकाळी ‘ओगले ग्लास वर्क्स'सारख्या तप्त कारखान्यात कामाला होता. पुढे ते काम सोडलं. पण मला ते काम पाहायची इच्छा होती, म्हणून त्यांनी मुद्दाम नेऊन तो कारखाना दाखवला होता. तो काचेचा तप्त रस, त्यात धातूची लांब नळी बुचकळून घेऊन फुंकणारे कामगार. त्यातून होणारे काचेच्या पोकळ गोळ्यांचे, भांड्यांचे विविध आकार...
श्रीनिवासांच्या या भेटीगाठी नंतरच्या. सुरुवातीला माझ्यात त्यांच्यात किंचित अंतरच होतं. दुरावा म्हणावा, तर संबंधच आला नव्हता. पण सुरुवातीच्या काळात मी लिहीत होतो, त्याला ‘ललित गद्य' म्हणावं की नाही, असा समीक्षकांमध्ये वाद चाललेला. तो पेपरातून, मासिकातून व्यक्तही होत असे. मला त्याच्याशी काही देणंघेणं नव्हतं. पण ‘हे ललित साहित्य नाही' असं म्हणणारे समीक्षक, ‘खरे ललित साहित्य कोणते, तर श्रीनिवास विनायक कुलकर्णींचे', असा हमखास उल्लेख करत. त्यामुळे मला उगाचच वाटे, की त्यांच्या साहित्यात जे आहे, ते माझ्यात नाही. आता कळतंय, की या तुलनेत काही अर्थ नाही. इतकं ते वेगळं आहे.
आणखी एक दुराव्याचा क्षण. हो, आता मात्र त्याला दुरावाच म्हणूयात. मी दरवर्षी ‘मौज' दिवाळी अंकात लिहित आलेलो. संपादन राम पटवर्धनांकडे. जूनच्या सुमारास ‘काय लिहिताय?' या अर्थाचं पत्र यायचं. किंवा मी जाऊन भेटायचो. ते निवृत्त झाले. त्या वर्षीपासून श्रीनिवासांच्याकडे ते संपादन आलं. मी जूनमध्ये फोन केला, तर ते म्हणाले, “यावेळेस आम्ही अंकाची वेगळीच रचना केली आहे.”
“मग त्यासाठी माझे लिखाण नको आहे का?”
“नको.” या एका शब्दाने डोंब उसळला. ‘मौजे'त माझा लेख नाही? मग इतकी वर्षं निष्ठेने लिहीत राहिलो त्याचं काय, वगैरे वगैरे. मी श्री. पुं.ना माझ्या भावना व्यक्त करणारं पत्र लिहिलं. त्यात खूप कांगावा केला असावा. नंतर श्रीनिवासांचा शांत सुरात फोन आला, ‘तुमचं लिखाण हवं आहे. काय लिहिताय?' त्यानंतर सगळं बदललंच. ही जबाबदारी स्वीकारताना काही दगडांना मान द्यावा लागतो, हे त्यांना माहीत नसावं. नंतर ते जूनमध्ये घरी येऊ लागले. काय काय लिहिलंय विचारून लेख मागायचे. तोवर लिहिलेले तिन्ही-चारही लेख काळजीपूर्वक वाचून एक उचलून म्हणायचे, ‘हा आम्हाला द्या.' ते मितभाषी. त्याबाबतीत ते श्री.पु. भागवतांचे शिष्यच जसे. श्री.पुं.कडे
त्यांच्या सायनच्या घरात श्रीनिवास बसलेले भेटले आहेत. पण तिथे ते आणखीच गप्प, आणि नम्र. पूर्वी शाळेत गुरुजी म्हणायचे ना, ‘हाताची घडी, तोंडावर बोट.' श्रीनिवासांची हाताची घडीही होती, आणि तोंडावर तिरपं बोटही असे. श्री. पुं. कडून लिखाणाला पावती दुर्लभ, तसंच श्रीनिवासांचंही. ‘हा लेख आम्हाला द्या', एवढ्या वाक्यात ती पसंती, ते आवडणं, ते कौतुक... सगळं काही मिळायचं.
एकदा असेच सकाळी आले, तेव्हा मी फोडणीचा भात करत होतो. त्यांनाही आग्रह केला. त्यांना तो खूप आवडला. म्हणाले, “तुम्ही या साध्या पदार्थाला किती प्रतिष्ठा दिलीत. आम्ही फोडणीवर भात टाकतो आणि ढवळतो. तो फोडणीचा भात. तुम्ही कांदा चिरून घातलात. शिवाय त्यात दाणे घातलेत, कोथिंबीर घातलीत, लिंबू पिळलेत. वर खोबरं किसून घातलेत. किती लाड केलेत या साध्या पदार्थाचे.” मध्ये मी सकाळी त्यांना कराडला फोन केला, तर म्हणाले, “अगदी तुमच्या पद्धतीने फोडणीचा भात करतोय. तुमच्याकडे तो खाल्ला तेव्हापासून आमच्या घरीही फोडणीचा भात, फोडणीची पोळी या पदार्थांना तशीच प्रतिष्ठा आली आहे.”
पूर्वी ते मुंबईला ‘मौजे'ची कामं करण्यासाठी पंधरा दिवस थांबत, उरलेले पंधरा दिवस कराडला घरी. त्यामुळे वाटेत पुण्याला थांबायचे. माझ्याकडे आणि इतर लेखक वा अन्य मित्रांकडे जाणं-येणं असायचं. घरी स्क्रिप्टचे गठ्ठे घेऊन जात. तपासायला, वाचायला.
मी कराडला जायचो, तेव्हा ते मला प्रकाश नारायण संतांकडे घेऊन जायचे. संत मला त्यांनी जमवलेले, सर्वत्र मांडलेले छोटे-मोठे दगड दाखवायचे. ते भूशास्त्रज्ञ तर मी भूशास्त्राचा हौशी विद्यार्थी. संतांना लिहायचा आग्रह करण्यात श्रीनिवासांचा मोठाच वाटा असणार. त्यांनी काही लिहिलं की ते आधी ‘मौज' दिवाळी अंकात, आणि नंतर ‘मौज प्रकाशना'तर्फे पुस्तक रूपात नंतर प्रसिद्ध होत गेलं. म्हणून हा एक अंदाज. संत गेल्यावर त्यांच्या पत्नींनी त्या दोघांच्या सहजीवनाविषयी लिहिलं. ते लिखाण श्रीनिवासांनी लक्षपूर्वक वाचून संपादित केलं. जवळपास वर्षभर त्या लिखाणावर काम करताना मी त्यांना पाहत होतो. (श्रीनिवास यांचा यशवंतराव चव्हाणांशीही दाट स्नेह होता. त्यांच्या आठवणी मधूनमधून वर येत.) त्यांच्या या लेखक वर्तुळात त्यांनी मलाही सामावलं. ढग दाटून आलेत. लाईट गेलेत. त्यांच्या घरात फळ्यांवरील, पुस्तकांच्या रांगांमध्ये, मासिकांच्या चळतीमध्ये या काहींबरोबर छान जिवाभावाचं बोललो, ते क्षण आजही आठवतात.
आता त्यांना प्रवास जास्त झेपत नाही. म्हणून जाणं-येणं कमीच झालंय. वयाने पंचाहत्तरी ओलांडलीय. सांधेदुखीही त्रास देत असतेच. पण ‘मौजे'च्या काही पुस्तकांच्या संपादनाचं काम ते घरी राहून करतात. त्यात माझ्या अलीकडच्या काही पुस्तकांचं काम त्यांनी केलंय. कधी कधी त्यात उशीर होतो. कारण आधीचं पुस्तक संपल्याशिवाय दुसऱ्या पुस्तकाला हात लावायचा नाही, अशी त्यांची पद्धत. पण एकदा हातात घेतलं की एकदम काटेकोर काम. त्यांच्यामुळे मला कळलं, मी काही शब्द चुकीचे लिहीत होतो ते. इतरांच्या पुस्तकांमध्ये काटछाट, संपादनाचं काम असतं, ते माझ्याबाबतीत नसतं. माझं पुस्तक म्हणजे, आधी प्रसिद्ध झालेल्या लेखांचं संकलन असतं. त्यावेळेला संपादन झालेलंच असतं. पण तरी शब्द न् शब्द पारखून घेतात. कुठे अडलं तर शंका लिहून ठेवणार. चार-सहा शंका साठल्या, की फोनवर किंवा प्रत्यक्ष भेटीत (त्यांच्या एका मुलाने, आलोकने पुण्यातच घर केलं आहे.) त्या शंका विचारणार. एखाद्या गावाकडच्या शब्दाविषयी त्यांना खूप आश्चर्य वाटतं. ‘याला असं म्हणतात तुमच्याकडे? किती छान.' एखादा शब्द बदलावा वाटला तर बदला, मला विचारूच नका, असं सांगूनही तसा बदलावा वाटलं, तर आर्जवाने विचारणार, ‘या ऐवजी हा शब्द वापरला तर? तो जास्त योग्य वाटतो. तुम्हाला काय वाटतं?
हेही वाचा - माझा शिवबादादा
‘जगण्यातील काही', ‘दिसले ते' ही पुस्तकं त्यांनीच संपादित केली. त्यानंतरचं ‘शिकविले ज्यांनी' हे पुस्तकही त्यांनी जीव ओतून संपादिलं आहे. मी त्यात घातलेला ‘माझा शिवबादादा' हा लेख त्यात बसत नाही, हे त्यांनी असंच आवर्जून सांगितलं.
मी म्हणालो, ‘पण त्याने मला तर खूप शिकवलंय. मग या पुस्तकात तो का नको?'
‘इतर लेखांची शैली आणि या लेखाची शैली फार वेगळी आहे, म्हणून म्हणतो.'
मला त्यांचं म्हणणं पटलं. इतर लेख वस्तुस्थिती, अनुभव साध्या शब्दांत सांगणारे, तर हा जरा लडिवाळ शैलीतला लेख. मी त्याला मान्यता दिली.
या पुस्तकाच्या वेळी फोनवर म्हणाले, ‘हे पुस्तक फार चांगलं झालंय.'
मी ‘फार' या शब्दाने शहारलोच. जसं झाड वाऱ्याने हलावं, आणि फुलं अंगावर पडावीत.
मध्ये पुण्याच्या ‘साहित्य परिषदे'ने त्यांचा ‘जीवन गौरव' पुरस्कार देऊन सन्मान केला. मला इतका आनंद झाला, की बस्स. जसा माझाच तो गौरव. हा कधीच व्हायला हवा होता. आणखी मोठ्या प्रमाणावर व्हायला हवा. सातत्याने, हळूवार, मनातलं लिहिणाऱ्या एका लेखकाचा हा सन्मान. हा त्यांच्या ऋजुतेचा सन्मान, हा काटेकोर संपादनाचा सन्मान. दर्जाच्या आग्रहाचा
सन्मान. कशाकशाचा करणार, सगळंच तिथे मोठं आणि चांगलं आहे. त्यांच्या लिखाणाने साहित्याला एक वेगळा मूड दिला, काय काय सांगावं?
त्या सभेतही किती थोडं बोलले ते. खरं तर तो दिवस त्यांचा होता. मितभाषी म्हणजे किती मितभाषी?
औदुंबरच्या कौलारू, जरा अंधाऱ्या म्हणावं अशा त्यांच्या घरातली संध्याकाळ आठवते. पलीकडे तुडुंब भरलेलं कृष्णेचं पात्र. या जुन्या घरात त्यांच्या कुटुंबातली माणसं जमलेली. साधी, एकमेकांशी जोडलेली. खूप गप्पा, गाणी झाली. सगळ्यांना श्रीनिवासांविषयी वाटणारं अगत्य शब्दांतून, कधी निःशब्दातून जाणवलंच तेव्हा. हाच असेल का श्रीनिवासांच्या घरेलू, सज्जन आत्मीयतेचा स्रोत? याच साध्यासुध्या माणसांमधून पाझरले असतील का, श्रीनिवासांच्या ललित लेखनाचे झरे? आपलं कर्तृत्व कधीही न सांगण्याचा नम्र अभिजातपणा? मनात किल्मिष न ठेवता सहजपणे माझ्याकडे लेख मागायला येण्यातला निगर्वीपणा?
काय काय शिकावं या माणसाकडून?
कुणी म्हणेल यांच्या साहित्यात अमुक नाही, तमुक नाही, सामाजिक दृष्टिकोन नाही की बदलाचा ध्यास नाही. कुणी ‘खास मध्यमवर्गीय' असा शिक्काही उठवतील. मी सामाजिकतेकडे झुकलेला असूनही वाटतं, हे आरोप त्यांना लागू होत नाहीत. त्यांच्यात आहे सच्चेपणा. मग त्या सच्चेपणाचा परीघ लहान असला तर काय झालं? तो इतका सच्चा आहे, की तो वैश्विकही होतोच. त्यांच्या जीवनाशी ते प्रामाणिक राहिले. त्यांनी त्या जलाशयातले तरंग अनुभवले. सृष्टीचा कानोसा घेतला. त्यांना जे मिळायचं ते आपोआप मिळालं. आणि ते आपसूकपणे त्यांच्या लेखनात उतरलं.
त्यांचा एक गुण घ्यावा वाटला तर काय घ्यावा? त्यांचं साहित्यातलं आणि घरचं, खासगी व्यक्तित्व यात काही फरक नाही. ते साधं आहे आणि सुंदर आहे. म्हणून तर मी त्यांच्या (त्यात साहित्य आलंच) प्रेमात पडलोय.
(समकालीन प्रकाशनच्या 'जवळचे' या पुस्तकातून साभार.)
