आम्ही कोण?
आडवा छेद 

मानसिक आजारांमुळे वाढतंय देशातील आत्महत्यांचं प्रमाण

  • योगेश जगताप
  • 04.08.26
  • वाचनवेळ 4 मि.
suicide cases

देशात दरवर्षी जेवढ्या आत्महत्या घडतात त्यातील सुमारे निम्म्या मानसिक आजारांमुळे उद्भवतात असं नुकतंच निष्पन्न झालं आहे. आपल्याकडे आत्महत्या ही मोठी सार्वजनिक आरोग्य समस्या बनली आहे. 

आत्महत्या करणाऱ्यांमध्ये विद्यार्थी, तरुण, गृहिणी, शेतकरी यांचं प्रमाण अधिक आहे. १५ ते ३९ वर्षं वयोगटातील तरुणांचं आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढतं आहे. त्यातही मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांशी झुंजत असलेल्या व्यक्तींचं आत्महत्या करण्याचं प्रमाण जास्त असल्याचं दिसून आलं आहे. नैराश्य, स्किझोफ्रेनिया, बायपोलर डिसऑर्डर, चिंतेचे विकार आणि अमली पदार्थांचं व्यसन यांसारख्या आजारांमुळे आत्महत्येचा दर वाढल्याचं आढळलं आहे. 

"स्टेट ऑफ इंडियन इन्व्हायर्नमेंट' ही संस्था पर्यावरण, शेती आणि मानवी विकास या मुद्द्यांवर आधारित राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील मूल्यमापनाचं काम करते. या संस्थेचा ताजा अहवाल अलीकडेच प्रकाशित झाला आहे. या अहवालात नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोच्या २०२६मध्ये प्रकाशित झालेल्या ‘भारतातील अपघाती मृत्यू आणि आत्महत्या' (२०२४) या अहवालाचा आधार घेण्यात आलेला आहे. 

या आकडेवारीनुसार भारतात आजारपणामुळे आत्महत्या केलेल्या ३०,६१७ पैकी १४,३०५ प्रकरणं मानसिक आजाराशी संबंधित असल्याचं समोर आलेलं आहे. हे प्रमाण ४७ टक्के आहे. २०२३च्या आकडेवारीनुसार आजारपणामुळे आत्महत्या केलेल्या लोकांची संख्या ३२,५०३ होती. यापैकी १३,९७८ जण मानसिक रुग्ण होते. भारतातील तब्बल २४ राज्यांमध्ये मानसिक आजार हेच आत्महत्येचं प्रमुख कारण असल्याचं ताज्या अहवालात दिसून आलेलं आहे. 

हेही वाचा - आता तरी विद्यार्थ्यांच्या आत्महत्या थांबतील?

मानसिक विकार असलेल्या व्यक्तींच्या मेंदूतील सेरोटोनिन, डोपामाइन आणि नॉरपेनेफ्रिन या "न्यूरोट्रान्समीटर्स'च्या असंतुलनामुळे मेंदूच्या कार्यात बिघाड होतो. याचा थेट परिणाम व्यक्तीची विचार करण्याची क्षमता, भावना आणि वागणुकीवर होतो. हे न्यूरोट्रान्समीटर्स नैराश्य, चिडचिडयुक्त प्रतिक्रियात्मक वर्तन आणि आत्महत्येच्या प्रवृत्तीशी संबंधित असतात. दीर्घकालीन तणावामुळे शरीरात ‘कॉर्टिसॉल'सारख्या स्ट्रेस हार्मोन्सची पातळी वाढते. ही पातळी वाढल्यानंतर भावनांवर नियंत्रण ठेवणं कठीण होतं. परिणामी, निराशा आणि हताशपणाची भावना वाढीस लागते. यामुळे आत्महत्या करण्याची श³यता आणखी बळावते. व्यसन हे मानसिक असंतुलनाचं आणखी एक कारण. अमली पदार्थांच्या सेवनामुळे सेरोटोनिन, डोपामाइन आणि ‘गाबा' या न्यूरोट्रान्समीटर यंत्रणेत बदल होतात. मद्य किंवा अमली पदार्थांच्या दीर्घकालीन सेवनामुळे विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता मंदावते. समस्या सोडवण्याची ताकद कमी होते आणि निराशेची भावना वाढते. नशेत असणारी व्यक्ती परिणामांचा विचार करत नाही. भावनिक आवेगात अचानक टोकाचं पाऊल उचलून बसते. 

विविध शारीरिक आजारांशी दीर्घकाळ सामना करणाऱ्यांचं अनेकदा मानसिक खच्चीकरणही झालेलं असतं. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा एकत्रित परिणामही आत्महत्येचा धोका वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतो. कर्करोग, मधुमेह, हृदयविकार, मज्जासंस्थेचे आजार आणि अपंगत्व यांसारखे दीर्घकालीन आजार सततचा मानसिक तणाव निर्माण करतात. यामुळे दैनंदिन कामात उत्साह वाटणं कमी होतं; वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात वेगवेगळ्या अडचणी तयार होतात. यामुळे जगण्याचा दर्जाही खालावतो.

हेही वाचा - मानसोपचार? ते काय असतं?

झोप न येणं, थकवा, हार्मोन्समधील असंतुलन आणि शारीरिक मर्यादेमुळे व्यक्तीचं मानसिक स्वास्थ्य आणखी बिघडू शकतं. दीर्घकालीन आजाराशी सामना करण्याचा ताण, इतरांवर अवलंबून राहण्याची भावना, हतबलता, स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचं स्वातंत्र्य गमावल्यामुळे मानसिक त्रास वाढतो आणि मनात आत्महत्येचे विचार येतात.

आत्महत्येचे विचार मनात येणाऱ्या व्यक्तींमध्ये अनेकदा निराशा, असहायता, निरुपयोगी असल्याची भावना, अपराधीपणा आणि आत्मसन्मानाची कमतरता दिसून येते. जगण्याचा खालावलेला दर्जा, जगण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रेरणेचा अभाव आणि भविष्याबद्दलची अनिश्चितता यामुळे व्यक्तीच्या मनातील नकारात्मक विचार कायम राहतात. दैनंदिन अडचणींना तोंड देण्यास असमर्थ ठरल्यामुळे अशा व्यक्तींमधील निराशा वाढीस लागते आणि आत्महत्या हा या त्रासातून सुटण्याचा एकमेव मार्ग वाटू लागतो.

व्यक्तीचं मानसिक स्वास्थ्य घडवण्यात कुटुंबाचा वाटा मोलाचा असतो. मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना काम न करू शकल्यामुळे किंवा आर्थिक हातभार लावू न शकल्यामुळे बऱ्याचदा कुटुंबात दुय्यम वागणूक मिळते. अनेकदा त्यांना कुटुंबात दुर्लक्ष, छळ किंवा भेदभाव सहन करावा लागतो. वैवाहिक वाद, नातेसंबंधांतील समस्या आणि सामाजिक झिडकारलेपण यामुळे त्यांचा एकटेपणा वाढतो. त्यातून भावनिक वेदना आणखी तीव्र होतात.

मानसिक आजाराशी जोडलेला सामाजिक कलंक, भेदभाव आणि सामाजिक एकाकीपणा हे आत्महत्येला कारणीभूत असलेले प्रमुख घटक आहेत. लोक काय म्हणतील या भीतीने व्यक्ती शांत राहतात, व्यक्त होणं टाळतात. मानसिक आरोग्याच्या उपचारांविषयी मोकळेपणाने चर्चा न होणं, गरजेच्या वेळी योग्य ती मानसिक-भावनिक मदत न मिळणं आणि कमकुवत आर्थिक परिस्थिती या कारणांमुळे मानसिक आजार आणखी बळावतो.

हेही वाचा - कार्यालयीन मानसिक आरोग्य: इकडे आपलं लक्ष आहे?

मानसिक आरोग्य सेवांची मर्यादित उपलब्धता आणि त्या मिळण्यात येणाऱ्या अडचणी हे आत्महत्येचा धोका वाढण्यामागील महत्त्वाचे घटक आहेत. आजाराचं उशिरा होणारं निदान, अपुरे उपचार आणि मानसिक आजारांच्या उपचारांमधील मोठी दरी यामुळे रुग्ण मानसिक आजाराशी एकटेच झगडत राहतात.

एकुणातच आत्महत्या ही ³वचितच एखाद्या घटनेचा किंवा आजाराचा परिणाम असते. बहुतांश वेळा ती मानसिक आजार, शारीरिक आजार, सामाजिक दबाव आणि आर्थिक असुरक्षितता या सर्व घटकांच्या एकत्रित ओझ्याचा परिणाम असते, असा या अहवालाचा निष्कर्ष आहे. 

टीप : ‘मेंटल हेल्थकेअर ॲक्ट २०१७'नुसार भारतात तीव्र मानसिक आजारी असलेल्या व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तर तो गुन्हा ठरत नाही. यामुळे पीडित व्यक्तीला शिक्षा करण्याऐवजी सहानुभूती आणि योग्य ते वैद्यकीय उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

योगेश जगताप | 9561190500 | yogeshjagtap8819@gmail.com

योगेश जगताप हे युनिक फीचर्समध्ये संपादकीय विभागात कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नांवर माहितीपर रिपोर्ताज करण्यासोबतच कष्टकरी आणि तरुणांसाठी काम करणाऱ्या धडपड्या व्यक्तींबद्दल लिहिण्यात त्यांना रस आहे.







प्रतिक्रिया लिहा...

Select search criteria first for better results