
आयुष्यात आपल्याला अपेक्षित ते मिळत नाही तेव्हा..
संजीव लहानपणापासून खूप हुशार म्हणूनच ओळखला जात होता; पण पुढे काहीतरी बिनसत गेलं. तो कॉलेजमध्ये काही विषयांत नापास होत गेला, मग शिक्षणाची वर्षं लांबली. त्याचा उत्साह कमी होत गेला. अगदी कमी पगाराची नोकरी स्वीकारावी लागली. मग पुढची अनेक वर्षं त्याला हीच खंत राहिली, की आपण फार काही करू शकलो नाही, उमेदीची वर्षं आपण वाया घालवली...
संजीवसारखी अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला दिसतात. आपण सहज निष्कर्ष काढतो, की संजीव शिकण्याच्या, वाढ होण्याच्या काळात मजा करत राहिला म्हणून असं झालं. पण माणसाच्या अपयशाची कारणं इतकी वरवरची नसतात. माणूस मुळात सर्जनशील प्राणी आहे. मिळालेल्या वेळात त्याला काही तरी अर्थपूर्ण करण्याची इच्छा असते. तरीही काही माणसं या प्रवासात मध्येच अडखळतात. याचा त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम होत जातो. मग त्यांना त्यांच्या क्षमतेच्या मानाने हलकं काम करावं लागतं. काहींना केलेल्या कामाचा अगदी कमी मोबदला मिळतो. आणि मग ‘आपल्याला आयुष्यात अपेक्षित होतं ते मिळालंच नाही', ‘आपल्याला तशी संधीच मिळाली नाही', ‘आपलं नशीबच वाईट' असं म्हणत ते स्वतःला दूषणं देत राहतात.
आपल्याला हवं तसं आयुष्य न मिळण्यामागे काही वेळा संधी न मिळणं हे कारण असतंही; पण बऱ्याचदा आपण स्वत:बद्दल कसा विचार करतो यात या सगळ्याची मुळं असतात.
चिंता आणि उदासी
आपल्या प्रत्येकाच्या मनात दोन भावना प्रबळ आहेत. एक म्हणजे चिंता आणि दुसरी उदासी. मागच्या लेखात आपण पाहिलं, की प्रत्येक माणसात सहा प्राथमिक भावना असतात. या भावनांचं वैशिष्ट्य् असं, की त्या कधी एकट्या येत नाहीत. चिंता आणि उदासी या अशाच भावना आहेत.
चिंतेचे तीन प्रकार
माणसाला तीन प्रकारच्या चिंता भेडसावतात- पूर्णत्वाची चिंता, भविष्य नियंत्रणाबाहेर जाण्याची चिंता आणि कोणत्याही बदलाची चिंता. पण इथे एका चिंतेबद्दल जास्त बोलू या- ही आहे पूर्णत्वाबद्दलची चिंता. प्रत्येक माणसाच्या मनात कधी ना कधी हा प्रश्न येतोच, की मी करतोय ते पुरेसं आहे का, इतरांना मी योग्य वाटतोय का? हा विचार किती प्रबळ आहे, यावर चिंतेची पातळी ठरते. एका टप्प्यावर आपलंच मन आपल्याला अपुरेपणाचे संकेत देतं आणि मनात उदासी दाटायला सुरुवात होते.
उदासीच्या तीन बाजू
जसे चिंतेचे तीन प्रकार तशाच उदासीच्या तीन बाजू आहेत- आपण कमी पडतो आहोत अशी भावना (वर्थलेसनेस), आपण एका परिस्थितीत अडकलो आहोत आणि यातून मार्ग निघणं शक्य नाही याची जाणीव (हेल्पलेसनेस) आणि आयुष्यात जे काही वाईट घडायचं आहे ते घडून गेलं आहे, आता कितीही चांगलं घडलं तरी काही उपयोग नाही असं वाटत राहणं (होपलेसनेस). यापैकी कोणत्याही विचाराने मनात घर केलं तर उदासी पक्की होत जाते.
यांतल्या ‘हेल्पलेसनेस' आणि ‘होपलेसनेस' यांबद्दल पुढच्या लेखात चर्चा करू. या लेखात ‘वर्थलेसनेस'वर भर देऊ या.
लाज आणि शरम
न्यूनगंडाची सुरुवात कुठून होते? पूर्णत्वाची चिंता जितकी अधिक तितकी अपूर्ण असण्याची भावना प्रबळ. मग त्याच विचारातून लाज आणि शरम या दोन भावनांचा उगम होतो. दोन्हींमध्ये फरक काय? आपण आपल्याच मूल्यांच्या विरोधात वागलो, किंवा आपण माणूस म्हणून कमी आहोत या भावनेने वाटते ती लाज आणि आपण चुकीचं वागलो आहोत हे इतरांना समजलं तर वाटते ती शरम.
लाजेची भावना प्रत्येकाच्या मनात असते. आणि ही भावना बाळगणारा मी एकटाच, असंही प्रत्येकाला वाटत असतं. या भावनेकडे नीट लक्ष दिलं, त्याबद्दल जवळच्या एखाद्या व्यक्तीशी चर्चा केली तर ही भावना कमी होते.
प्रत्येक माणसात असं न्यूनत्व का असतं?
१. आपण पहिल्या लेखात पाहिलं त्याप्रमाणे न्यूनत्वाची मुळंही उत्क्रांतीच्या प्रवासात दडलेली आहेत. आपण परिपूर्ण नसू तर जिवंत राहणं अवघड आहे, अशी समजूत उत्क्रांतीदरम्यान पक्की होत गेली. आपले पूर्वज जंगलात राहत असताना त्यांना कोणतीही चूक परवडणारी नव्हती. म्हणजे त्या वेळी पूर्णत्वाची गरज ही जैविक होती. पण आता तसं राहिलेलं नाही. आता आपल्याकडून एखादी चूक झाली, आपण कशात कमी पडलो, तरी तेव्हासारखा आपला जीव जाणार नाही हे नक्की. त्यामुळे आता पूर्णत्वाची गरज मनोसामाजिक आहे. यातला फरक समजून घेण्याची आपल्या मेंदूला सवय लावणं गरजेचं असतं.
२. दुसरं कारण म्हणजे पालक खूप कडक शिस्तीचे असतील किंवा लहानसहान गोष्टींवरून अबोला धरणारे असतील तर मुलांच्या मनात स्वत:विषयी लाजेची भावना तयार होते. आपण माणूस म्हणूनच कमी आहोत असं पुढे त्यांना वाटायला लागतं.
३. तिसरं कारण म्हणजे सामाजिक उतरंड. त्यापायी मनात तुलना सुरू होते. त्यामागे स्वतःचं समाजातलं स्थान निश्चित करण्याची इच्छा असते. इतरांच्या तुलनेत आपण कुठे आहोत हे सतत शोधलं जातं. अशा तुलनेतून न्यूनत्व येत राहतं. आपण सोडलो तर जगातल्या सगळ्या लोकांचं चांगलं चालू आहे असं वाटत राहतं. ‘आपली तुलना आणि स्पर्धा ही केवळ आपल्याशी असावी,' हे सुविचार वगैरे म्हणून वाचायला छान वाटतं; पण ते आचरणात आणणं सगळ्यांना जमतंच असं नाही. कारण तुलना करण्याचं मेंदूचं काम आपल्याला वाटतं त्यापेक्षा बरंच आदिम आहे.
हुशार आणि ढ
इतरांच्या तुलनेत आपण कुठे आहोत हे शोधायचं तर क्षमतेचा मुद्दा येतो. इतरांना आपल्यापेक्षा चांगलं काम करता येतं, या विचाराने माणसाला कमीपणा वाटतो. शारीरिक क्षमता या एका निकषावर स्त्रियांच्या किती संधी हिरावल्या गेल्या याची मोजदाद नाही. याचाच एक नवा पैलू मागील काही दशकांत पुढे आला, तो म्हणजे बौद्धिक क्षमता. आपण ढ आहोत, इतरांच्या तुलनेत आपल्याला उशिरा समजतं, आपले मार्क कमी आहेत म्हणून आपल्यात काही अर्थ नाही, अशा विचारांनी माणसाचं संपूर्ण आयुष्य व्यापून जातं.
समीक्षा ही अतिशय कष्टाळू मुलगी, पण शाळेत तिला कमी मार्क मिळायचे. त्यावरून शाळेत तिची चेष्टा व्हायची. घरात इतर भावंडांशी तुलना व्हायची. त्यातूनच तिची पक्की समजूत झाली, की तुम्ही हुशार असाल तरच जग तुमची किंमत करतं. पुढे तिच्या आयुष्यातल्या प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयावर या समजुतीचं सावट राहिलं.
शारीरिक सौंदर्य
शारीरिक सौंदर्याच्या तुलनेमुळे येणाऱ्या न्यूनत्वावर तर भांडवलशाही बाजाराचा मोठा भाग उभा आहे. ‘आपण छान दिसत नाही' या एका विचाराचा माणसाच्या अनेक निर्णयांवर परिणाम होतो. तो अनेक तडजोडी करायला पवृत्त होतो. सौंदर्याची व्याख्या खरं तर अगदी व्यक्तिसापेक्ष आहे. पण अनेकदा इतरांच्या मताला सत्य मानलं जातं. गोरी त्वचा, सरळ नाक, म्हणजेच सुंदर हे कोणी ठरवलं, असा विचार होत नाही. उलट, आपण काळे आहोत आणि यात कधीच बदल होणार नाही, त्यामुळे स्वतःकडे कमीपणा घेतल्याशिवाय बाकीचे आपल्याला स्वीकारणार नाहीत, हा विचार घर करू लागतो. आजूबाजूच्या लोकांचे टोमणे यात भर घालत राहतात. मुलींच्या बाबतीत गोरा रंग हा निकष जितका चुकीचा, तितकाच मुलांच्या बाबतीत उंचीचा मुद्दा.
शिरीष सर्वसामान्य भारतीय पुरुषांपेक्षा जरा उंचीने कमीच. शाळेच्या वयापासून मित्रांनी त्याला त्यावरून चिडवायला सुरुवात केली. पुरुषांच्या जगात उंची आणि इतर शरीराच्या ठेवणीवरून जे काही बोचरं ऐकायला लागू शकतं ते त्याने पचवलं. लग्नाचं वय झालं तेव्हा जोडीदार निवडीच्या स्पर्धेत आपल्याला स्थानच नाही, त्यामुळे आपण विचार न केलेला बरा, असा ग्रह त्याने करून घेतला. आणि पुढे तो कायम जगापेक्षा वेगळा, स्वत:चं स्वतंत्र बेट करूनच राहिला. त्यामुळे येणारं एकटेपण आणि निराशा यांनी मात्र त्याची पाठ सोडली नाही.
रंग, रूप, लिंग, जात, धर्म, सामाजिक-भौगोलिक स्थिती
ग्रामीण भागातला माणूस पुणे-मुंबईसारख्या ठिकाणी येतो तेव्हा इथल्या जगण्याला तो प्रमाण मानायला लागतो. शहरांतली जगण्याची पद्धत, भाषा त्याच्यासाठी नवीन असते; पण त्यावरून तो स्वत:ची किंमत ठरवतो. आहे त्या स्थितीत स्वत:ला जुळवून घेण्याचा प्रयत्न करताना तो स्वत:ची ओळखच विसरून जातो. कोणत्याही निकषाने माणूस अल्पसंख्याक असेल तर त्याला बहुसंख्याक लोकांशी बांधिलकी सतत सिद्ध करावी लागते.
स्त्रियांना त्यांच्या शारीरिक क्षमतेपायी कमी लेखण्याचा इतिहास फार जुना आहे. त्यामुळे आजही एखादं वेगळं काम करायची वेळ आली तर आपल्याला ते जमेल का, हाच विचार आधी अनेकींच्या मनात येतो. प्रापंचिक भेदभाव ते अनेक अधिकारांपासून स्त्रीला वंचित ठेवलं जाणं, अशा अनेक कारणांमुळे स्त्रियांच्या मनात न्यूनत्व निर्माण होतं. एकूणच, जगभरात पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये नैराश्याचं प्रमाण अधिक आहे.
माणसं मनातलं न्यूनत्व कसं हाताळतात?
हे करण्याच्या साधारण तीन पद्धती असतात- ‘प्लीज', ‘परफॉर्म' आणि ‘परफेक्शन'. त्यांना ‘थ्री पी' असं म्हणू या.
१. पहिला ‘पी' म्हणजे इतरांना खूष ठेवण्याचा सतत प्रयत्न करणं (प्लीज). स्वत:बद्दल कमीपणाची भावना असते तेव्हा इतरांना कोणत्याच बाबतीत ‘नाही' म्हणता येत नाही. उदा : शेखर त्याच्या घरातला पहिलाच उच्चशिक्षित मुलगा. बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीला असल्याने चांगला पगार. पण त्याच्या रंग-रूपामुळे त्याच्यात कमीपणाची भावना आहे. त्याच्याकडचा पैसा पाहून नातेवाईक उधार-उसनवारी करतात आणि याला नकार देता येत नाही. अनेकांनी त्याचे पैसे बुडवले आहेत; पण तोंड उघडून स्वत:चे पैसे मागणं त्याला अवघड वाटतं. कंपनीतही तो कमीपणाच्या भावनेपायी इतरांची कामंही करून देत असतो. त्यामुळे त्याला स्वत:च्या छंदांसाठी, व्यायामासाठी वेळच मिळत नाही, घरच्यांसाठी वेळ देता येत नाही. मग सतत वाद सुरू राहतात. मानसिकदृष्ट्या निरोगी व्यक्ती स्वत:च्या सीमारेषा नीट आखू शकते. असं केल्याने नातेसंबंध चांगले राहतात. पण शेखरच्या बाबतीत ते शक्य होत नाही.
२. सतत कामात गुंतून राहणं (परफॉर्म) हा आहे दुसरा ‘पी'. स्वत:साठी निवांत वेळ देणं, स्वत:ची काळजी घेणं ही आपली योग्यता नाही, अशी दृढ धारणा न्यूनगंडात तयार होते. एकीकडे अशा माणसांना काहीच करायची इच्छा होत नाही, इतरांना ती व्यक्ती आळशी वाटायला लागते, तर दुसरीकडे त्या व्यक्तीला शांत बसता येत नाही. थोडा आराम केला तरी अपराधी वाटतं. अशा लोकांना स्वत:चं अस्तित्व सिद्ध करण्याचा ताण सतत जाणवतो. कधी तरी बाकीचे लोक आपल्याला छान म्हणतील, स्वीकारतील ही आशा राहते. उदा. श्वेता ही कायमच वर्गात पहिली येणारी मुलगी. तीच तिची ओळख. बहुतेकदा अशी सगळीकडे पहिली येणारी माणसं मानसिकदृष्ट्य्ा सुदृढ असतील असा समज असतो. काहीजण तसे असतातही. पण त्यातून अनेकदा अति महत्वाकांक्षा तयार होतात. श्वेताच्या मनात सतत भीती असते, की पहिला नंबर गेला तर काय... त्यामुळे ना ती मजा करू शकत, ना आराम. कॉलेजला गेल्यावर अभ्यासक्रम वाढला तेव्हा तिला त्याचं दडपण आलं. आता आपण पहिलं येऊ शकत नाही याने धास्ती वाढली. आता आपली ओळख काय, या विचाराने ताण वाढू लागला. शेवटी तिने एक वर्ष गॅप घेण्याचं ठरवलं.
३. तिसरा ‘पी' म्हणजे कायम बिनचूक असण्याचा ताण (परफेक्शन). आपण कोणत्याच बाबतीत चुकता कामा नये, चुकलो तर आपण कमी पडतोय हे सिद्ध होईल, असा ताण न्यूनगंडामुळे निर्माण होतो. सारा ही तरुणी काम करण्यापेक्षा कामाच्या नियोजनात जास्त वेळ घालवते. कितीही छान काम केलं तरी ते नीट झालंय असं तिला वाटत नाही. आपल्याला सगळ्यातलं सगळंच माहीत हवं असं तिला वाटत राहतं. त्यामुळे कोणतंही काम वेळेत पूर्ण होत नाही. नोकरीच्या ठिकाणी काही रिपोर्ट द्यायचा असेल, घरी पाहुणे येणार असतील, तर अशा प्रसंगी बाकीचे आपलं मूल्यमापन करतील या चिंतेने ती हैराण होते. तिची सहनशक्ती कमी होते आणि आजूबाजूच्या सगळ्या लोकांवर तिची चिडचिड व्हायला लागते.
न्यूनगंड अशाप्रकारे दैनंदिन आयुष्यातल्याही सगळ्या पैलूंवर परिणाम करतो. माणूस म्हणूनच आपण कुचकामी आहोत असं वाटायला लागतं. असं स्वत:ला कुचकामी समजू लागणं ही नैराश्याची एक बाजू आहे. (म्हणून नैराश्यासाठी केवळ मेंदूतील रासायनिक बदलांना कारणीभूत धरू नये. कारण त्यामुळे त्यातून बाहेर निघण्याचे प्रयत्न खूप तोकडे पडतात.) त्यातून बाहेर पडण्यासाठी कुचकामीपणाचे विचार आणि भावना टिपून त्यांत बदल करावा लागतो. यासाठी आवश्यक असणारी मदत समुपदेशनात होते. मुळात स्वत:ला कमी समजण्याची कारणं शोधून त्यावर काम केलं जातं. ही कमीपणाची भावना किती खोलवर गेली आहे त्यावर ती व्यक्ती त्यातून बाहेर पडायला किती वेळ घेईल हे ठरतं.
बऱ्याचदा स्वत:ला कमी समजण्याचा प्रवास नैराश्यापर्यंत जात नाही, पण स्वत:बद्दलचं सततचं असमाधान एकूणच आयुष्याचा दर्जा आणि खोली दोन्हीवर परिणाम करतं. ब्रेने ब्राऊन या अमेरिकन मानसशास्त्रज्ञ स्त्रीने लाज आणि शरम या विषयावर संशोधन केलं. हल्ली ‘स्वत:वर प्रेम करा' या सदराखाली बरेच लोक लिहीत असतात. त्यात ‘बकेट लिस्ट' पूर्ण करा, चॉकलेट फेशियल करा, इथपासून ‘सोलो ट्रिप' करा असे अनेक उपाय सांगतात. महिलादिनासारख्या निमित्ताने या सगळ्याला आणखीनच ऊत येतो. पण इतके वरवरचे उपाय करून स्वत:चा विनाअट स्वीकार करता येत नाही.
न्यूनगंड किंवा स्वत:बद्दलची लाज यातून बाहेर येण्यासाठीचे तीन ‘सी' आहेत- ‘करेज',‘कनेक्शन',‘कम्पॅशन'.
१. ‘करेज' म्हणजे धैर्य. (धैर्याचा संबंध शौर्याशी कधी जोडला गेला हे माहीत नाही.) धैर्य म्हणजे आपण जसे आहोत त्याबद्दल समाधानी असणं, त्याबद्दल इतरांशी बोलता येणं, किमान एक अशी व्यक्ती असणं जिला आपल्या अगदी आतल्या, जपून ठेवलेल्या भीतीबद्दल सांगता येईल. जितकी लाज अधिक, तितकी गुप्तता अधिक आणि तितकाच त्याचा ताण अधिक. त्याबद्दल कुणाशीच मनमोकळेपणाने बोलता आलं नाही तर हा ताण हळूहळू शरीरावर दिसायला लागतो. आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीकडे हे समजून घेण्याची क्षमता असेलच असं नाही. पण एखाद्याकडे अशी क्षमता असल्याचं दिसलं तर त्याच्याशी आपलं मन मोकळं करता येणं म्हणजे धैर्य. समजा, अशी एकही व्यक्ती नसेल तर समुपदेशनाचा पर्याय असतोच. मुळात आपल्या न्यूनगंडाबद्दल कुणाशी तरी बोलता आलं पाहिजे. कारण आपण स्वत:ला ज्या गोष्टींसाठी धिक्कारतो त्याबद्दल बोलून आपण त्यातून मुक्त होऊ शकतो.
२. सुदृढ नाती प्रस्थापित करता येणं (कनेक्शन) हेदेखील गरजेचं असतं. आपलं म्हणणं कोणी तरी लक्ष देऊन ऐकत आहे, आपण त्यांच्यासाठी एक महत्त्वाची व्यक्ती आहोत, असं वाटतं तेव्हाच माणसाच्या मनात इतरांशी जोडलं गेल्याची भावना निर्माण होते. पण न्यूनगंड असणाऱ्या व्यक्तीला मोठ्या समूहात असूनही एकटं वाटू शकतं. कारण त्या समूहाशी जोडून घेताना मुळात त्याचं स्वत:बरोबरचं नातं तुटत गेलेलं असतं. इतरांनी आपल्याला स्वीकारावं यासाठी आपण जसे नाही तसं दाखवण्याची धडपड केली जाते. आपण कायम ‘कूल' असायला हवं याचा ताण घेतला जातो. पण समूहाशी जोडून घेतानाही परस्परनात्यांत योग्य आणि नेमक्या सीमारेषा असणं महत्वाचं असतं. ज्या गोष्टी करायला जमणार नाहीत, त्यांना शांतपणे नकार देता यायला हवा. आपल्याला सतत गृहीत धरलं जात आहे असं लक्षात आलं तर त्याबद्दल स्पष्टपणे बोलता यायला हवं. ते करताना कधी कधी छोटे वाद झालेले चांगले असतात.
३. स्वतःबद्दल आणि इतरांबद्दलही करुणा असणं (कम्पॅशन) कळीचं असतं. म्हणजे काय? आपल्या प्रत्येकाच्या मनात काही प्रकारचे विकार असतात. ते स्वतःचे स्वतःला नीट स्वीकारता आले तरच मग आपण इतरांना नीट स्वीकारू शकतो. हे करताना त्रास होतो, भीती वाटते. आपण काही गोष्टींवर नियंत्रण नाही मिळवलं तर ती व्यक्ती आणि परिस्थिती आपल्या हातातून निसटून जाईल असं वाटतं. पण त्यामुळे काय होतं, की आपण ना धड स्वत:च्या भीतीकडे लक्ष देऊ शकत, ना त्या व्यक्तीला स्वीकारू शकत. आणखी एक म्हणजे कधी कधी लोकांचे प्रश्न सोडवणं गरजेच नसतं, तर त्यांना फक्त सोबत हवी असते. अशी सोबत करण्याची तयारी असणं म्हणजे करुणा असणं.
हे तीन ‘सी' मुळात स्वतःचा विनाअट स्वीकार करण्याचं महत्त्वच अधोरेखित करतात. कोणताही न्यूनगंड न बाळगता जगाला सांगता आलं पाहिजे, की ‘माझं आहे हे असं आहे, याच्यासकट मी मला स्वीकारलं आहे, तुम्हीही स्वीकारलंत तर त्यात आपल्या सगळ्यांचाच फायदा आहे.' चिंता आणि नैराश्यावरचा हा सर्वांत महत्त्वाचा उपाय आहे!
गौरी जानवेकर | gjanvekar@gmail.com
या क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि समुपदेशक आहेत. त्या या विषयावर लेखन करतात, कार्यशाळाही घेतात.