मानवी मनाचा अभ्यासक म्हणून वावरणं, जगणं आणि विचार करणं हे चांगलं की वाईट हे मला अजून ठरवायचं आहे. म्हणजे अगदी ढोबळपणे विचार केला तर ते काम चांगलंच आहे. माझा हा व्यवसाय असल्याने पोटापाण्याचीही त्यात सोय आहे. शेकडो नव्हे, हजारो माणसं त्यांना स्वतःविषयी पडलेले वा न पडलेले प्रश्न घेऊन माझ्याकडे येतात. ते ऐकून, समजून घेऊन त्यांना समाधानकारक उत्तरं देऊन बरं करणं, हा माझा रोजचा आणि रोजीरोटीचा उद्योग गेली वीस-पंचवीस वर्षं मी करत आलोय, पुढेही करत राहणार आहे. त्यामुळे मनाचा अभ्यास करण्याचे खूप व्यवहारी फायदे मला लाभलेले आहेत. केवळ व्यावहारिक पातळीवरून नव्हे, तर त्या कामाने मला खूप समाधान मिळालं आहे. रुग्णाच्या शंकाग्रस्त चेहऱ्यावरची सुरकुती पुसून तिथे स्मितरेषा उमटवण्यात प्रचंड आनंद मिळतो. औदासीन्यग्रस्त गृहिणीच्या मंदावलेल्या हालचाली, ओढलेला चेहरा आणि खोल गेलेला स्वर काही आठवड्यांत पुन्हा टवटवीत होतो, स्वरात ठणकावलेपणा येतो आणि हालचाली फिरून एकदा चपळ होतात.
रुग्णांच्या वर्तनामधील हे परिवर्तन पाहणं आणि त्या बदलाला गती देणं हा अत्यंत समाधानकारक अनुभव असतो. माझ्या नशिबाने ते मानसिक समाधान आणि जॉब सॅटिसफॅक्शन मला भरपूर मिळालंय. त्याबद्दल माझी यत्किंचितही तक्रार नाही. मी त्या बाबतीत भरून पावलोय.
तरीही असा किंचित उदासवाणा आणि गोंधळवून टाकणारा प्रश्न मीच माझ्यासमोर का मांडावा? ही कैफियत तर नव्हेच. एक प्रकारची जाहीर वाच्यता आहे. मी अतिशय धीराने हा प्रश्न माझ्यासमोर मांडला आहे. माझ्या अनुभवातून तो सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. असे त्रासदायक आणि नकारात्मक भासणारे प्रश्न मला नेहमी भेडसावतात. माझ्या असंज्ञ मनात त्यावर मी उलट-सुलट चिंतन करतो. मनाचा अभ्यास करणं समाजोपयोगी निश्चित आहे. मानसशास्त्र आणि मानसोपचारशास्त्र या वैद्यक आणि समाजविज्ञानाच्या मान्यवर शाखा आहेत. त्यांच्या वैधतेविषयी आणि उपयुक्ततेविषयी चर्चा करण्याची गरज नाही. पण मानसोपचारकाच्या, मानसशास्त्रज्ञाच्या स्वतःच्या मानसिक जीवनावर त्या अभ्यासाचा, मनाचा ठाव घेणाऱ्या भावनांचा विश्लेषणाचा नेमका काय परिणाम होतो? त्याच्या भावजीवनाला त्या अभ्यासाने सबलता प्राप्त होते की सभोवतालच्या भावनांच्या वादळात त्याच्या ‘नॉर्मलपणा'ची नौका डगमगू लागते? आपल्या मनाचा वेध घेण्याची अखंड प्रक्रिया त्याच्या मनाला उभारी देते की नाही? दुसऱ्यांच्या दुःखावर फुंकर घालता घालता त्याच्या छातीचा भाता स्वतःकरता धपापण्याची शक्ती शिल्लक ठेवतो का?- असे अनेक प्रश्न मनात उपस्थित होतात. वैद्यकीय मनोविज्ञानावर संशोधनपर लेख प्रसिद्ध करणाऱ्या जगातील सर्व मान्यवर जर्नलमधून ‘मेंटल हेल्थ, प्रोफेशनल्स मेंटल हेल्थ' या विषयावर दर महिन्याला काही ना काही तरी प्रसिद्ध होत असतं, पण त्यांची भाषा बरीचशी विज्ञाननिष्ठ असते. त्यामध्ये संख्याशास्त्रीय माहितीचा वरचष्मा असतो. अर्थातच काही लेखांमधून अत्यंत मर्मग्राहक विचार मांडलेला असतो. त्यांचा अपवाद सोडला तर मनोविज्ञानापलीकडे जाणाऱ्या केवळ स्वानुभूतीपूर्ण आत्मिक अभ्यासाचं फारसं विवेचन नसतं.
मानसिक क्षेत्रात काम करणाऱ्या समजदार आणि संवेदनशील व्यक्तीला लवकरच त्या विषयाचा त्रोटकपणा आणि मर्यादा लक्षात येतात. विशेषतः स्वतःविषयी अधिक अर्थपूर्ण ज्ञान होण्यासाठी मानसिक अभ्यासापलीकडे जाऊन आत्मिक अनुभूतीची गरज भासू लागते. ही गरज त्याच्या कळत-नकळतपणे जाणवू लागते. त्यावर तो मानसिक चिंतन करू लागला, तर ते अपुरं पडतं असं त्याला वाटतं. मग माझ्या मानसिक समस्या सोडवू शकणारा आणखी कोण, असा प्रश्न पडल्यावर मात्र एखाद्या अभेद्य भिंतीसमोर उभं असल्याची भावना त्याला त्रास देऊ लागते.
वस्तुतः हे विधान केवळ पळवाट म्हणून बहुवचनी स्वरूपात मांडलं. हे माझे स्वतःचे प्रश्न होते आणि अजूनही आहेत. हे प्रश्न वाचायला सोपे वाटले, किंचित रंजक आणि बुचकळ्यात टाकणारे वाटले तरी प्रत्यक्षात ते दाहक असतात. छळतात. माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर तो छळवाद मला जितका हादरवून टाकणारा होता तितकाच आकर्षकही होता.
आता या सगळ्याची सुरुवात कशी झाली हे सांगण्यापेक्षा सुरुवातीपासून सांगतो. मला शक्य तितकी कमीत कमी सैद्धांतिक मांडणी करायची आहे. कारण सैद्धांतिक मांडणी बरीचशी बुवाबाजीला जवळची वाटते. त्यात बुवाबाजी शिरू नये, ते केवळ स्वानुभव राहावेत, आत्मिक अनुभवाचं कथन राहावं अशी इच्छा आहे. माझ्या अनुभवांना सैद्धांतिकतेची जोड देणारा मी आहे, पण माझे अनुभव सच्चे आहेत आणि ते मोजायला मानसशास्त्रीय सिद्धांत अपुरे पडतात, असा माझा दावा आहे.
मानसोपचारांचा भाग म्हणून मी कित्येकांना शरीरातील स्नायूंच्या शिथिलीकरणाची (प्रोग्रेसिव्ह मस्क्युलर रिलॅक्सेशन) प्रक्रिया शिकवतो. दुसऱ्याला रिलॅक्स करण्यासाठी मानसोपचारकाचा स्वर एकसुरी तरी कंटाळवाणा नाही, आश्वासक पण स्वावलंबित्वाच्या जाणिवा प्रखर करणारा, ठाम पण हुकमी नाही असा असावा लागतो. तो स्वर मी कमावला आहे. मी रुग्णांना रिलॅक्स करता करता स्वतःही रिलॅक्स होऊ लागलो. त्यांच्या जोडीने मीदेखील छानपैकी शांत होत असे. त्यासाठी मी माझ्या आवाजातली कॅसेट त्यांना देतो किंवा त्यांना रिलॅक्सेशनची सेशन रेकॉर्ड करून देतो. काही वर्षांपूर्वी एक कॅन्सरग्रस्त रुग्ण माझ्याकडे आला. त्याच्यावर मानसोपचार करता करता त्याने मला खूप छेडलं, माझ्या शांत-प्रसन्नतेची परीक्षा पाहिली. तीन-चार वेळा ते गृहस्थ माझ्याकडे आले. त्यांनी शेवटच्या सेशनमध्ये मला मेडिटेशन नावाची कॅसेट दिली. (म्युझिक टुडेतर्फे प्रसिद्ध ः संगीतकार वनराज भाटिया) माझ्याकडे काही काळ ती कॅसेट पडून होती. एक दिवस ती हाती आली. मी म्युझिक सिस्टीम सेट केली आणि डोळे मिटून स्वस्थ पडून श्वासावर लक्ष केंद्रित करून पडून राहिलो. कॅसेटमधलं संगीत संज्ञ मनाचे पोलादी पडदे भेदून आरपार गेलं आणि...
... संध्याकाळची वेळ असावी. अवतीभवती वृक्षवेलींच्या काळ्या रेखाकृती दिसत आहेत. वाट उभ्या चढाची. सर्वत्र विलक्षण शांतता एका ढकलगाडीवर ठेवलेला मृतदेह. त्या अंधाऱ्या वेळी त्या देहावरील शुभ्र वस्त्र उठून दिसतं आहे. ढकलगाडीवरील त्या प्रेताला ढकललं जातं आहे. तिथे कुणी शोकग्रस्त माणसं दिसत नाहीत. अत्यंत निःशब्द हालचाली होत आहेत. आजूबाजूच्या घनदाट जंगलाने त्या प्रेतयात्रेची दखलही घेतलेली नाही. हळूहळू त्या श्वेत वस्त्रामध्ये गुंडाळलेल्या व्यक्तीचा चेहरा दृश्यमान होऊ लागतो. थिजलेले डोळे, निर्विकार, थंड चेहरा दिसू लागतो. कोण ही व्यक्ती? अरे, हा तर मीच! माझंच प्रेत आहे ते!
हेही वाचा - बुद्ध समजून घेताना
मी खडबडून जागा झालो. मी घाबरलो नव्हतो, विलक्षण स्तंभित झालो होतो. उठून कॅसेट बंद केली आणि तसाच पडून राहिलो... मनातला मनोविकारतज्ज्ञ जागा झाला. कॅसेट देणाऱ्या व्यक्तीविषयी भेडसावणाऱ्या भावनांचं मी स्वतःवर आरोपण केलं, म्हणून त्याच्या जागी मी स्वतःला पाहिलं, अशी माझी मानसशास्त्रीय समजूत काढली आणि कोणाला न सांगता ती कॅसेट ‘पुन्हा वापरायची नाही' असं ठरवून विसरण्याचा प्रयत्न केला. मध्ये किती काळ गेला आठवत नाही.
एकदा अचानक कोणाची तरी ओळख काढून एक व्यक्ती माझ्याशी बोलायला आली. गृहस्थ वयस्क होते. समजदार आणि अनुभवी होते. त्यांनी आपले समाधिवस्थेकडे जाणारे अनुभव सांगायला सुरुवात केली. ते काय होते, आठवत नाही, पण मी त्यांना म्हटलं, ‘वाजे पाऊल आपले, म्हणे मागे कोण आले!' असं तुकाराम महाराजांनी सांगितलंय, तसं होतं. ते गृहस्थ निघून गेले आणि मी घरी येऊन ती कॅसेट शोधून पुन्हा लावली.
तेच सूर, तीच निर्विकार तटस्थता आणि पुन्हा तेच... तीच डोंगरकड्याची उभी वाट आणि तेच गुंडाळलेलं प्रेत, त्याच निःशब्द हालचाली आणि तीच अखेरची वाटचाल...
पण मी ठाम राहिलो. मी त्या अनुभवातून स्वतःला व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून किंवा मनोविकारतज्ज्ञ म्हणून वेगळं केलं नाही.
मी त्या अनुभवांबरोबर वाहत राहिलो. शवयात्रा तशीच पुढं जाते आहे. आता प्रेताला चितेवर ठेवत आहेत आणि अग्नी दिला जातोय. त्या उफाळत्या ज्वालांच्या प्रकाशात आजूबाजूचे अंधारमय जंगल उजळू लागतं आणि त्या प्रकाशात माझ्याच प्रेताभोवती उभा असलेला कोवळा तरुण दिसतोय. हा चेहरा तर परिचित. माझाच मुलगा... त्याचा चेहराही निर्विकार. त्या ओझरत्या प्रकाशात मी त्याला ओळखलं. चेहऱ्याचा रंग आणि डोळे ओळखीचे, बाकी नाही... कोणी तरी असावा. एखादा कर्मचारी वगैरे... पण ही दृश्यं केवळ क्षणकालापुरती आणि मग पुन्हा अंधार. विलक्षण अंधार. इतका, की जाणिवा फक्त विरविरत्या.
हळूहळू त्या जाणिवा धारण करणारं अस्तित्व झाडाझुडपांच्या वर एखाद्या ढगासारखं तरळत जातं आणि अचानक जाणवू लागते विलक्षण पोकळी आणि त्यात हेलकावणारं अस्तित्व. एखाद्या दरीत धुक्याचा पुंजका हलक्या झुळकीबरोबर दिसता दिसता नाहीसा होतो तसा अनुभव... किती काळ कोण जाणे!
तोच अचानक, पुन्हा वेगाने त्याच जंगलाकडे येऊन आदळणं आणि अगदी जमिनीलगत होणारी हालचाल. आजूबाजूला किर्र झाडी आणि घुसमटून टाकणाऱ्या कुंद हवेचा स्पर्श जाणवतो. त्या हालचाली आता अधिक वेगाने आणि झपाट्याने. वाटतं, की पाण्याचा शोध घ्यावा. तोच एक विस्तीर्ण जलाशय भोवती जाणवतो. काही काळाचा विसावा. पुन्हा धडपड सुरू... प्रकाशाचा शोध. पण ‘त्या' पाण्याबाहेर पडल्याखेरीज तो प्रकाश कसा दिसणार? मग ती घुसमट सोसत होणारी सुटका... आणि दूरवरून जाणवणारा सूर्यप्रकाश. हा प्रकाश शरीराला स्पर्श करतो. शरीरातील पेशीला त्या सूर्यकिरणांची जाणीव होते.
म्हणता म्हणता ते ढगाळ अस्तित्व प्रकाशाच्या कोशात गुंडाळलं जातं आणि एक दीर्घ श्वास...
मी जागा झालो. खूपसा बधीर आणि स्तब्ध. डोळे उघडून पाहतो, तर माझं शरीर मला दिसतं. तेच हात, तेच पाय, गात्र अन् गात्र...! मी शांतपणे प्राणायाम करू लागतो. छातीत शिरणारी हवा माझ्या मनात धुगधुगी निर्माण करते. बराच काळ प्रयत्न केल्यावर हळूहळू भान येतं. हालचाली सहज होतात. अवतीभवती दिसणाऱ्या गोष्टींचा परिचय होतो. मी माझ्या कामाला लागतो.
दिवसभर काम करताना त्या अनुभवांची भीती तर सोडा, आठवणही येत नाही. दिवसभर विलक्षण शांत वाटतं. बोलणं, वागणं सहज पण तटस्थ!
हे अनुभव मी थोड्याफार फरकाने दरवेळी ‘मेडिटेशन' करता करता घेऊ लागलो. कॅसेट लावून. पण बहुधा कॅसेटशिवाय!
त्यानंतर अनेक महिने गेले. मी विपश्यना शिबिरात दाखल झालो. आनपान मेडिटेशनच्या पुढच्या पायऱ्यांवरून प्रगती करत होतो. मी अनुभवांची, जाणिवांची अनित्यता भोगत होतो. आणि मला वाटतं, सहाव्या किंवा सातव्या दिवशी पहाटे साडेतीनलाच उठून बसलो.
हेही वाचा - रॉक बॅलन्सिंग वर्कशॉप
आजूबाजूला अर्थातच नीरव शांतता. मी मांडी घालून स्थिर. तोच पिस्तुलाचा आवाज आणि पोटात उठणारी विलक्षण कळ. मी पोट पकडून दिवाणावर कोसळतो. त्या असह्य वेदनांनी कळवळत लोळतो. त्या वेदना झेलताना मी माझं मला पाहतो आहे. अंगावर लष्करी फटिग आहेत. घनदाट जंगल आहे. समोरच्या जीपमधून मंदावत जाणारे दिवे हळूहळू दूर जातात आणि माझी धडपड थांबते. मला पुन्हा दिसतो वेदनांनी आक्रसलेला माझा चेहरा आणि निश्चेष्ट देह. मी न्याहाळून पाहतो अंगावरची लष्करी वस्त्रं, जंगलातला एकाकी रस्ता. कोणी तरी समोरून दगाबाजीने झाडलेल्या गोळ्या. कुठल्याशा अपरिचित रानातला एकाकी मृत्यू...
तोच चार वाजल्याची घंटा वाजू लागली आणि पाहतो तर मीच तिथे पडलो होतो. अंगावर नेहमीचे कपडे. चेहरा स्वच्छ...
त्यापुढे मेडिटेशन करता करता तेच विव्हळणं आणि वेदना जाणवू लागतात.
विपश्यना संपली. मी घरच्या घरी पुन्हा मेडिटेशन करू लागलो.
इथे ‘मेडिटेशन' विषयावर थोडा स्वतंत्र विचार करू.
दुर्दैवाने, ‘मेडिटेशन', ‘समाधी अवस्था' या विषयाभोवती अजूनही धार्मिक कार्मिकतेचं वलय आहे. साधारणपणे उजव्या बाजूला झुकणारी मंडळी, देवभोळी, स्पर्धात्मकतेला त्याज्य मानणारी माणसं मेडिटेशनच्या वाटेने जातात. समाजवादी विचारांवर समताधिष्ठित, परिवर्तनशील समाजावर निष्ठा ठेवून, पीडित, शोषित आणि दलित जनतेची बाजू घेणारी मंडळी ‘मेडिटेशन'च्या वाटेने जात नाहीत. नसावीत. मेडिटेशन बराचसा आत्मकेंद्री विचार करायला लावणारा मार्ग असल्याने त्या वाटेने प्रवास करताना समाजाभिमुखता लोप पावते असाही समज आहे.
मेडिटेशनच्या मार्गाचा विचार करणारेदेखील अनेक गट आहेत. रजनीश किंवा नवविचारवादी इंग्रजीत अस्खलित बोलणारे आर्ट ऑफ लिव्हिंग टाइप कोर्स करणारे मॉडर्न लोक. तर काही मंडळी समाधी हे साध्य न मानता साधन मानणारे, विज्ञाननिष्ठ भूमिका जगणारे, इंजिनियर, प्रोफेशनल, आयआयटी टाइप लोक. तर काही समाधी-ध्यानधारणा इत्यादी शब्दांनी भारावून जाणारे, परंपरेचा अभिमान बाळगणारे भाबडे लोक आणि काही अगदीच फॅशनप्रमाणे बाबा, गुरू किंवा समाधीच्या विविध प्रकारांना सहज बदलणारे थिल्लर ‘पेज थ्री' टाइप लोक.
मी यात कुठेच बसत नाही. त्यातल्या त्यात विज्ञाननिष्ठ मंडळींची साथसंगत जवळची वाटणारा.
समाधीवर खूप अधिकारवाणीने बोलणाऱ्या विज्ञाननिष्ठ गुरूंच्या सत्संगाला उपस्थित असताना त्यांनी एक विधान केलं. समाधी हे साधन किंवा प्रवास आहे. आपण रेल्वेने प्रवास करताना आजूबाजूच्या खिडकीतून दिसणारी दृश्यं पाहतो. त्यामुळे प्रवास रंजक होतो. पण गाडीच्या खिडकीतून दिसणारी दृश्यं म्हणजे प्रवासाचं अंतिम ठिकाण नव्हे. आपली नजर प्रवासातील त्या रंजक दृश्यावर असली तरी आपल्या लक्ष्यापासून ढळता कामा नये, असं त्यांनी ठासून सांगितलं.
मग मला ‘मेडिटेशन' करताना येणाऱ्या अनुभवांचा नेमका अर्थ काय? ते अनुभव स्वप्नवत आहेत, अद्भुत आहेत. माझ्याच मनातून उद्भवले आणि तिथेच पुन्हा जिरले. ते अनुभव सच्चेे आहेत, नशापाणी अफू- गांजा न पिता घेतलेले आहेत...
समाधीमधील अनुभवांची चटक लागता कामा नये म्हणून मी ठराविक वेळा आणि अत्यंत नियमितपणे ती साधना करत नाही.
पण अनुभव थांबलेले नाहीत... डोळे मिटावे, श्वास नियमित व मंद व्हावा आणि मनाला मुक्त सोडावं.
काळ अतिप्राचीन... पुन्हा जंगलातील वाट बिकट, प्रवास त्रासदायक... जिभेला शोष पडलेला. माझं अंग मळलेलं. अंगावरचं पीतवस्त्र तसंच मलीन. डाव्या खांद्यावरून जाणारा कापडी स्पर्श. विलक्षण थकवा वाटतोय... अंगावरचं वस्त्र काट्यात अडकतं आहे. मागे वळून ते काढत काढत पुढं जायचं. अनवाणी चालताना पायाला घट्टे पडलेत... वय पस्तीस-चाळिशीचं. केस कापलेले. अंगभर पसरलेली विरक्ती. आसक्ती फक्त- मनात एकदा तरी बुद्धाचं दर्शन व्हावं. जंगलातल्या वाटचालीत आजूबाजूने चाललेला बौद्ध भिक्षूंचा तांडा. रानातल्या आवाजावर उठणारा सूक्ष्म ‘चॅन्टिंग'चा आवाज... त्या बौद्ध भिक्षुणीचा शोध चाललाय, बुद्धांचं सदेह दर्शन मिळण्यासाठी..! जंगलातील वाट संपून मोकळी जागा... इथे चॅन्टिंगचा आवाज वाढतो आणि खूप बौद्ध भिक्षूंची चहलपहल जाणवते. बौद्ध भिक्षुणी तिथेही. एका कोपऱ्यात खंगलेले डोळे अचानक दिपतात, कारण प्रकाशमय अस्तित्व जाणवतं आणि इतक्या वेळा रोखून धरलेला हुंदका फुटतो, रडू कोसळतं. हातपायांची वेगाने हालचाल, अश्रूंनी चेहरा भिजून जातोय. रडू काही आवरत नाही. अत्यंत निकराने केलेला प्रयत्न भिजलेल्या डोळ्यांना काही दिसत नाही. त्या प्रकाशमय अस्तित्वाच्या पायाचा अंगठा तेवढा दिसतो आणि अचानक सारी धडपड ओसरते. श्वास कोंडतो आणि एका बौद्ध भिक्षुणीचं प्रवचन ऐकता ऐकता मृत्यू होतो.
जंगलातच थोडी जागा करून ठेवलेला मृतदेह दिसतो आहे. जवळपास चारदोन भिक्षू आणि एक पणती त्या देहाच्या डोक्यापाशी. आणि पुन्हा तिथे देदीप्यमान प्रकाशाचं अस्तित्व जाणवतं. साक्षात बुद्ध येतात. चेहरा आणि शरीर दिसत नाही. दृश्य खोल खोल दरीत बुडत जातं... पुन्हा उंच झाडावरून तो मृतदेह एखाद्या ठिपक्यासारखा दिसत नाहीसा होतो.
आजूबाजूला जाणवते ती पोकळी. काळीभोर. शहारा आणणारा गारवा..
...मी जागृत होतो. अश्रूंनी उशी भिजलेली असते... तसाच पडून राहतो. स्वतःच्या शरीराशी ओळख पटवावी लागते...
बौद्ध भिक्षुणीच्या आयुष्याची सांगता होताना अर्धवट राहिलेल्या इच्छा आणि या आयुष्यात बुद्धचरित्राची वाटणारी विलक्षण ओढ.
अजिंठ्याच्या लेण्यातील परिनिर्वाणात पहुडलेल्या बुद्धांकडे पाहून कोसळलेला अनावर उमाळा. बुद्धांच्या चरणांवर खिळलेली नजर डोळे वर करून त्या दिव्य स्मिताकडे पाहण्याची हिंमत न होणं...
विपश्यना करताना डोळे मिटल्यावर अंत:चक्षूंसमोर दिसणारा प्रकाश सुरुवातीला भगव्या रंगाचा असतो आणि तोच पुढे फिका होत सोनेरी होतो. त्या प्रकाशाने मिटलेले डोळेही दिसतात.
ओढ तशीच, निष्ठाही तीच. संदर्भ बदललेले आणि रूप निराळं. इतकाच काय तो फरक..
हेही वाचा - विपश्यना एक आत्मानुभूती
बौद्ध भिक्षुणीच्या प्रवासाचे अनुभव वारंवार येतात. कधी पानांची सळसळ जाणवते, कधी जंगलातल्या अधल्यामधल्या जागेतला प्रकाशाचा भपकारा आणि अंगावरून जाणारी झुळूक. कधी आपल्याच छातीवरच्या सुकलेल्या स्तनांना आणि सुरकुतलेल्या स्तनाग्रांना आजूबाजूच्या पानाफुलांच्या स्पर्शाने येणारा सूक्ष्म शहारा जाणवतो. पुन्हा तीच मोकळी जागा.. उत्कंठापूर्ण वाट पाहणं...बुद्धांच्या आगमनापूर्वी होणारी लगबग... सभोवतालच्या बौद्ध भिक्षूंच्या श्वासाचा तालबद्ध, लयबद्ध आरोह-अवरोह. त्या यातना, तीच तगमग, तीच अतृप्ती.. न संपणारी आस.
मेडिटेशनमध्ये जाणवणाऱ्या अनुभवांचं एक वैशिष्ट्य असं, की मनातून उन्मळून येणाऱ्या जाणिवांना विरोध केला नाही तर त्या अधिक प्रखर आणि प्रत्ययकारी होतात. त्या जाणिवांमधील सूक्ष्म तपशील स्पष्ट होतात. संपूर्ण शरीराने घेतलेली ती अनुभूती असते. नंतर या जाणिवा संदिग्ध-असंदिग्धपणे आठवतात, पण त्या आठवणींनी मन हेलावत नाही. खूप तटस्थपणे या जाणिवांकडे बघता येतं.
... अंगाभोवती पडणारा सशक्त बाहूंचा विळखा आणि त्याच्या छातीवर नाक असल्याने घुसमटणारा श्वास... त्याच्या उष्ण श्वासाचा कानांना होणारा स्पर्श. शरीरभर पसरणारा आसक्तीचा आवेग आणि अंगात घुसणारं ताठ शिस्न... आणि काळोख... पूर्ण काळोख.. उत्कटतेचे विलक्षण झपाटणारे क्षण... घशापाशी दाटणारा आवंढा आणि मग पाण्यात बुडण्याची जाणीव.. श्वासाची धडपड... नाकातोंडात घुसणारं पाणी आणि पाण्याने भरणारी छाती. कोवळं वय... रसरशीत देह आणि अचानक पुन्हा मुक्त प्रकाश... वाहत्या पाण्याचा ओघ... तो काळासावळा, कृष्णमेघासारखा भिरभिर वाऱ्याप्रमाणे वावरणारा. त्याची दृष्टी म्लान आणि विद्ध नजर...
तृप्तीच्या भोवऱ्यात गरगरताना झालेल्या मरणयातना... गळ्यातल्या भयंकर चोकिंगने जाग येते. स्वतःच्या पुरुषी देहाची ओळख पटवून द्यावी लागते...
मेडिटेशनमधले अनुभव असे कधी आसक्त तर कधी जीवघेणे... अर्थात, माझ्या मनोविश्वात हे सारं घडताना व्यावहारिक पातळीवरचं जीवन अखंडित होतं आणि आहे. रोजचं काम म्हणजे रुग्ण तपासणं, त्यांच्याशी बोलणं आणि मानसोपचार करणं या नित्यक्रमाच्या गोष्टी पार पडण्यामध्ये माझ्यात काही फरक पडला का? रुग्णांबरोबरील संवादाचा आत्मा असणारी सहअनुभूतीची माझी क्षमता अधिक सकस झाली का?
मला वाटतं, नक्कीच झाली. हे अनुभव व्यक्तिगत पातळीवर घेताना माझ्या क्लाएंटशी तादात्म्य पावण्याकरता लागणारी संवेदनशीलता जास्त धारदार झाली.
पास्ट लाइफ रिग्रेशन थेरपीच्या माझ्या एका क्लायंटचे अनुभव दाहक आणि व्याकुळ होते. घटस्फोटानंतर पुनर्विवाह, त्यानंतर आईच्या, जिवलग मैत्रिणीच्या आणि नवजात बाळाच्या मृत्यूला सामोऱ्या जाणाऱ्या तरुण स्त्रीवर पास्ट लाइफ उपचारांची प्रक्रिया सुरू होती. ती आपल्या अनुभवात शोधत होती आपलीच आई आणि आपलंच बाळ आणि मैत्रीण! विरह, वियोग, मिलनांच्या विविध प्रसंगांचा वेध घेत ती बोलत असे.
तिला बोलतं करणं, बोलतं ठेवणं आणि विव्हल स्मृतींनी मनात उमटणाऱ्या वेदनांचे कढ सांभाळून पुन्हा स्थिर व शांत करणं हे माझ्यापुढील आव्हान होतं. मी ते आव्हान स्वीकारू शकलो. प्रत्येक सेशननंतर आपण अनेक योजनं चालून आल्याच्या जाणिवेने ती थकून जात असे. तिच्या थकण्याचा वेध घेत, तिला पुन्हा एनर्जाइज करून नॉर्मल जागृत अवस्थेत आणणं आणि रोजच्या धकाधकीच्या वातावरणाशी व्यवस्थित ॲडजस्ट करून देण्याचं काम पेलू शकण्यासाठी माझं मन स्थिर व शांत ठेवणं ही माझी स्वत:चीच फार मोठी गरज होती.
तिच्या एका अनुभवात ती पायऱ्या चढता चढता पाय घसरून पडते आणि मृत्यू पावते असा प्रसंग होता. त्या प्रसंगात तिला होणाऱ्या वेदना आणि मृत्यूच्या अटळतेची धक्कादायक जाणीव डीप रिग्रेशनच्या अवस्थेत शब्दबद्ध करण्याकरता मला स्वत:ला अतीव एकाग्रतेने काम करावं लागलं होतं.
या सगळ्या गोष्टी पार करताना आमच्या डोळ्यांसमोर एक उद्दिष्ट स्पष्ट होतं. तिला आपल्या जीवनाचं सूत्र (थीम) शोधायचं होतं. जीवनात आलेल्या धक्कादायक अनुभवांनी ती बधीर झाली होती. तिच्या जगण्याला दिशाहीनता आली होती. तिला जीवनाच्या सूत्रातील अखंडता शोधून स्थिरत्वाने जगायचं होतं. हरवलेल्या सख्या-सोबत्यांना शोधायचं होतं आणि विरहवेदनांनी व्याकुळ झालं तरी पुनर्भेटीची आशा मनात जिवंत ठेवून जीवनावरची पकड घट्ट करायची होती. ह्या प्रक्रियेतील मी तिचा वाटाड्या होतो आणि पुन्हा पुन्हा एनर्जाइज करणारा मार्गदर्शक होतो. तिला तिची ‘थीम' सापडली आणि एकीकडे मला माझी थीम गवसत होती.
माझ्याही जीवनात अतिशय कठीण आणि आव्हानात्मक प्रसंग आला. मनोविकारतज्ज्ञ होण्याचा निर्णय घेण्यापूर्वी मी ‘इंटर्नल मेडिसिन'मध्ये एम.डी.ची दीड-दोन वर्षं पूर्ण केली होती. त्या विषयाबद्दल आदर वाटत होता, पण मनोविकारशास्त्र खुणावत होतं. रोजच्या रोज माझं मन तडफडत असे. हे माझं कार्यक्षेत्र नव्हे. मी चुकीच्या ठिकाणी आलोय. पण इंटर्नल मेडिसिन हा विषय अधिक लोकप्रिय आणि जनसामान्यांत आदरपात्र होता. प्रवाहाविरुद्ध पोहण्याचा मला धाडसी निर्णय घ्यायचा होता. अशा वेळी मला आतून आवाज आला- ‘तुला प्रवाहाविरुद्ध पोहायचं नसून तुझा प्रवाह तुला शोधायचा आहे. तुझ्या आयुष्याच्या थीमपासून तू दूर गेलास म्हणून तडफडतो आहेस.'
मी मनाचा ठाम निर्णय घेतला. व्यावसायिक पातळीवर म्हणायचं, तर हा मनोविकारशास्त्राकडे वळण्याचा निर्णय केवळ अव्यावहारिक नव्हता, तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पातळीवरून प्रस्थापित नियमांना मोडून या शास्त्रशाखेत प्रवेश मिळवायचा होता. (२५-२६ वर्षांपूर्वी मनोविकारशास्त्राला मुंबईत आजच्याइतकी सर्वमान्यता नव्हती. विषय बदलायला बंदी होती. मिळवलेली ‘सीट' सोडण्याबद्दल ब्लॅकलिस्ट होण्याची टांगती तलवार होती.) पण मला माझा सूर व्यावहारिक आणि व्यावसायिक पातळीवर सापडला होता. पुढे मेडिटेशनमधील अनुभवांनी त्या सुरांचं ‘थीम साँग' झालं. बरोबरच्या माणसांशी मानसिक पातळीवर संबंध जोडण्यात जीवनाचं खरं दर्शन होतं, अशाच स्वरूपाचे अनुभव मनातून उमलून आले.
डोळे मिटून श्वासावर लक्ष केंद्रित करावं आणि...
एका यज्ञभूमीजवळ बसलेली व्यक्ती यज्ञामध्ये आहुती देण्याचं काम करते आहे... त्या अग्नीच्या प्रकाशात क्षणकाल तो चेहरा चमकून जातो... माझाच परिचित चेहरा... भोवती बसलेल्या व्यक्तीची नजर खिळलेली.... मंत्रोच्चारांचा गंभीर आवाज आणि लोकांकडे पाहत दिलेला उपदेश... झर्रकन अनुभव मनात सळसळतो.... आणि विरतो....
भावनिक वादळ नाही, मरणयातना नाहीत थेट, उद्दिष्टपूर्ण कार्य चालू आहे.
जागं व्हावं आणि आरशात पाहावं तर डोळ्यांचा परिचय होतो... मृत्यूच्या अनुभवांमागून अधूनमधून डोकावणाऱ्या अशा अनुभवांची मनातल्या मनात गुंफण होते आणि जीवनसूत्र उलगडत जातं.... हे अनुभव मानसिक आणि शारीरिक दोन्ही पातळींवरचे अत्यंत प्रत्ययकारी आणि सच्चे. इथे मांडण्याकरता त्यांच्यात सलगता आणली इतकंच. पण या साऱ्या अनुभवांना एकत्र ओवणारं सूत्र अदृश्य होतं.
मेडिटेशनमधून त्या सूत्राचा शोध घेत गेलो.
एखाद्या रजतपात्रामध्ये अनेक मोती असावेत. रंगीबेरंगी, लहान-मोठे, काही मलिन तर काही चकचकीत. वरून पाहावं तर सारं अलग अलग. परस्परांशी कसलाही संबंध नसलेलं. पारखून घेण्यासाठी उचलावं तर ते नुसते एकत्र ठेवलेले मोती नसून सूक्ष्म चिवट धाग्याने ते एका माळेत ओवल्याचं कळतं. तसे हे अनुभव. त्यांना एकत्र गुंफणारा आत्म्याचा धागा अतिसूक्ष्म, तरल, अदृश्य पण चिवट!
मी सुरुवातीला मांडलेल्या प्रश्नाची फोड करत इथे येऊन पोहोचलो. माझ्या मानसिक अनुभवांना समजून घेण्यासाठी मानसशास्त्र आणि प्रमाणित विज्ञान आज तरी अपुरं पडतंय. पण माझ्याच अनुभवांना मी कसं नाकारू? त्यांच्या शास्त्रीय परीक्षणावर ‘निव्वळ फँटसी', ‘केवळ स्वप्नावस्था', ‘फक्त कल्पनेच्या भराऱ्या' असे शिक्के मारता येतील. नव्हे, मीच इतकी वर्षं त्यांची अशी वासलात लावली होती.
पण जाणिवा नुसत्या जाणिवा असतात. त्या उत्कट किंवा निसटत्या असतात, पण असतात. मला या सगळ्या अनुभवांनी समृद्ध केलं, स्थिर केलं आणि जीवनसूत्र दिलं. पण हा प्रवास सोपा नव्हे, सरळसोट नव्हे.... ते धाडस आहे....
वादळी मानसिक अनुभव असताना शांत आणि तटस्थ राहणं आणि त्यातून काही गोष्टींची नवी समज, जीवनाविषयी अनोखी जाण निर्माण करणं हे काम अवघड आहे. ही तारेवरची कसरत करताना स्वत:ला ‘नॉर्मल' ठेवणं हे आव्हानात्मक आहे.
अनेकदा स्किझोफ्रेनियासारख्या रोगाने पछाडलेले रुग्ण अत्यंत विचित्र, चमत्कारिक श्रवणभास, संशय, अनाठायी ठाम समजुतींच्या चक्रव्यूहात अडकतात. आपल्याला होणारे भास हा केवळ मानसिक अनुभव असतो, वास्तवात असं काही घडत नसतं याचंही त्यांना भान राहत नाही. ते असत्याला आणि अतिरंजित कल्पनांना वास्तव मानून एका अजब भयावह दुनियेत वावरतात. स्किझोफ्रेनिया या तीव्र स्वरूपाच्या मनोविकारांची ही लक्षणं आहेत. वास्तवाचा संपर्क तुटल्यामुळे स्वत:विषयीचं भान सुटतं. सत्य जगाची मनाने जोडलेली नाळ तुटते आणि मनाची निरर्थक दमछाक करणारी फरफट सुरू राहते. आपले अनुभव तावून सुलाखून घेण्याचं, सत्य आणि वास्तवाच्या ‘टचस्टोन'वर निकषांवर घासून घेण्याचं भान त्यांना उरलेलं नसतं हे मला ठाऊक आहे.
या वैद्यक मानसशास्त्रीय भूमिकेशी प्रामाणिक राहून मी माझे अनुभव तपासून घेतले आहेत.
ते अनुभव समजण्याकरता सद्य:स्थितीत उपलब्ध असणारे मानसिक सिद्धांत अपुरे पडतात. पण म्हणून त्या अनुभवांची ‘कल्पनेचा भरकटलेला पतंग' अशी संभावनाही करता येत नाही.
म्हणून हे अनुभव इथे मांडतो आहे. त्यामागचं उद्दिष्ट असं, की सर्वसामान्यांपर्यंत ते अनुभव पोहोचावेत. त्यामधून कोणाला काही शिकता येण्यासारखं असेल ते तर शिकावं...
मी त्या अनुभवांना कसलंच नाव दिलेलं नाही. कारण....
सिर्फ एहसास है ये, रुह से महसूस करो...!
(अनुभव, दिवाळी २००५ च्या अंकातून साभार.)
