
कॉर्पोरेट नोकर्या, तिथले बक्कळ पगार, कर्मचार्यांची वाढलेली क्रयशक्ती आणि त्यांचे कामाचे तास या गोष्टींची बरेचदा चर्चा केली जाते. त्यासाठी भरपूर आकडेवारीही दिली जाते. भांडवली अर्थव्यवस्थेचं ते एक मानक मानण्याचीही पद्धत आहे. पण कॉर्पोरेट नोकर्यांमधल्या कामांचं आव्हानात्मक स्वरूप आणि त्यामुळे उद्भवणारे कर्मचार्यांचे मानसिक प्रश्न, या बाबींकडे त्यामानाने कमीच लक्ष पुरवलं जातं.
कंपनी कर्मचार्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी काम करणार्या 1to1help या संस्थेने नुकताच प्रसिद्ध केलेला ‘स्टेट ऑफ इमोशनल वेल बीइंग रिपोर्ट-२०२४’ हा देशपातळीवरचा अहवाल यादृष्टीने लक्षात घेण्याजोगा आहे. या अहवालानुसार, कमावती भारतीय माणसं अधिकाधिक प्रमाणात डिजिटल स्क्रीनच्या आहारी जात आहेत. आधीच वाढत चाललेल्या त्यांच्या मानसिक समस्यांमध्ये यामुळे झपाट्याने भर पडत चालल्याचा इशारा या अहवालाने दिला आहे.
काम आणि समुपदेशन
कामाच्या ठिकाणी लोकांना अनेक ताणतणावांना तोंड द्यावं लागतं. यात प्रत्यक्ष कामासंबंधीच्या गोष्टी असतात, त्याचबरोबर बॉसशी किंवा सहकर्मचार्यांशी सूर न जुळणं, संघभावना न जाणवणं, इतरांशी होणारी तुलना, कर्तव्यपूर्तीचा आनंद न मिळणं अशी इतरही कारणं असू शकतात. त्यामुळे आज अनेक कॉर्पोरेट कंपन्या आपापल्या कर्मचार्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी काही ना काही प्रयत्न करताना दिसतात. मानसोपचार क्षेत्रात काम करणार्या संस्थांद्वारे कर्मचार्यांसाठी समुपदेशन कार्यक्रम आखले जातात. त्यात वैविध्यपूर्ण आणि मोठ्या प्रमाणावर डेटा जमा होतो. त्यातूनच कर्मचार्यांच्या मानसिक स्वास्थ्याबद्दलचं सामूहिक चित्र समोर येऊ शकतं.
1to1help ही संस्था या प्रकारचं कंपनीपातळीवरचं समुपदेशन करते. असा अहवाल सादर करण्याचं त्यांचं हे दुसरं वर्ष आहे. या अहवालासाठी गेल्या वर्षीच्या जानेवारी ते नोव्हेंबर या काळातल्या ८३ हजारांहून अधिक समुपदेशन सत्रांचा आधार घेतला गेला. १२ हजार लोकांच्या मानसिक प्रश्नांसंबंधीच्या लक्षणांची छाननीही त्यासाठी लक्षात घेतली गेली. तसंच, ४२ हजार जणांच्या मानसिक मूल्यमापनांचा विचार केला गेला.
कार्यालयीन समुपदेशनासाठीची कारणं
या अहवालानुसार, चिंता, काळजी, नैराश्य, कामाच्या ठिकाणी असणारा ताण ही समुपदेशनासाठीची मुख्य कारणं होती. त्यातही समुपदेशन घेणार्या २३ टक्के लोकांच्या बाबतीत कामाच्या ठिकाणी सुसंवादाचा अभाव, ऑफिसमधल्या सहकार्यांशी नीटसं नातं न जुळणं ही कारणं होती. यामागे डिजिटल स्क्रीनचा अतिरेकी वापर प्रामुख्याने कारणीभूत असल्याचं अहवालात अधोरेखित केलं गेलं आहे. भारतीयांमध्ये दिवसातला बहुमूल्य वेळ स्क्रीनसमोर घालवण्याचं प्रमाण नको इतकं वाढलं आहे. अवघी तीन टक्के कमावती माणसं फोन किंवा टीव्ही स्क्रीनचा वापर एका मर्यादेत ठेवण्यात यशस्वी होऊ शकली आहेत. तब्बल ५० टक्के लोकांची या बाबतीत वाईट परिस्थिती आहे. तर १० टक्के लोकांना हा तोल साधणं जेमतेम जमतंय, असं दिसून आलं आहे.
असं म्हटलं जातं, की मानसोपचारांसाठी पुढे येण्याचं प्रमाण पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त असतं. पुरुषांनी मानसोपचार किंवा समुपदेशन घेणं आजही दुबळेपणाचं लक्षण मानलं जातं. मात्र या अहवालानुसार मानसोपचार घेणार्या पुरुषांच्या संख्येत सात टक्क्यांची वाढ झाली असल्याचं दिसतं, ही एक चांगली बाब म्हणायची.
अर्थात त्यातही पुरुष आर्थिक बाबींसंदर्भातील समुपदेशनाला प्राधान्य देतात, तर स्त्रियांसाठी नातेसंबंधांतल्या समुपदेशनाला अधिक महत्त्व दिलं जातं, असंही दिसून आलं.
मानसिक आजार तरुणांमध्ये अधिक
प्रौढांपेक्षा तरुण वयोगटांमध्ये मानसिक समस्यांचं प्रमाण अधिक असल्याचं या अहवालात दिसून आलं आहे. तिशीच्या आतल्या तरुणांमध्ये नोकरीतले बदल किंवा घरगुती नातेसंबंधांपायी येणारी चिंता, काळजी, नैराश्य यांचं प्रमाण जास्त आहे. पंचविशीतल्या आतल्या तब्बल ९२ टक्के लोकांमध्ये चिंता, काळजीची लक्षणं आढळून आली. तर साधारण तितक्याच लोकांमध्ये नैराश्याचीही लक्षणं दिसली.
आत्महत्येचे विचार वाढीला
या अहवालातला आणखी एक चिंतेचा मुद्दा म्हणजे मानसिक प्रश्नांपायी आत्महत्या करण्याची शक्यता असणार्यांचं प्रमाण २०२३ च्या तुलनेत २२ टक्क्यांनी वाढलेलं दिसलं. तर निराशेच्या गर्तेत लोटले गेलेल्यांची संख्या १७ टक्क्यांनी वाढलेली दिसून आली. सर्वांसाठी वेळच्यावेळी योग्य मानसोपचार उपलब्ध असणं किती गरजेचं आहे, हे यावरून समजतं. (या आकडेवारीमागे मूल्यमापनांची वाढलेली संख्या हे देखील एक कारण सांगितलं गेलं आहे.) कंपनीतल्या मॅनेजर्सनी, टीम लीडर्सनी यासाठी पुढाकार घेतल्यास त्याचे चांगले परिणाम दिसतील, असंही अहवालात सूचित केलं गेलं आहे.
या अहवालातली एक चांगली बाब, म्हणजे २०२३ च्या तुलनेत गेल्या वर्षी मानसोपचारांची मदत घेण्याचं प्रमाण २२ टक्क्यांनी वाढलं. तसंच, समुपदेशन घेणार्या बहुतांश कर्मचार्यांमध्ये साधारण तीन सत्रांत चांगलीच सुधारणा दिसून आली. कार्यालयीन मानसिक स्वास्थ्य आणि स्क्रीनचं व्यसन या दोन्ही बाबतीत आपण वेळीच जागे झालो तरच योग्य दिशेने पावलं टाकली जाऊ शकतात. त्यादृष्टीने ही सुधारणा आशादायी आहे.
प्रीति छत्रे | preeti.chhatre22@gmail.com
प्रीति छत्रे 'युनिक फीचर्स पोर्टल'च्या सहसंपादक आहेत. अनुभवपर ललितलेखन आणि अनुवाद यात त्यांना विशेष रस आहे.