आम्ही कोण?
लेखमालिका : उकलता गुंता

एकाकीपणापासून एकान्तापर्यंत

  • गौरी जानवेकर
  • 07.02.25
  • वाचनवेळ 11 मि.
  • Share on Tweeter
  • Share on Whatsapp
  • Share on Facebook
ukalata gunta gauri janavekar lekhmalika

नेमका कसा असतो आणि कसा दिसतो हा एकाकीपणा?
एकाकीपणाला व्याख्येत कसं बसवायचं हा मानसशास्त्रापुढे प्रश्न होताच. त्याची सहज सोपी व्याख्या अशी- इतरांशी असलेलं अपेक्षित नातं आणि प्रत्यक्षात असलेलं नातं यामधलं अंतर म्हणजे एकाकीपणा.

एकाकीपणाचा अनुभव कसा असतो?
बरेचजण असं वर्णन करतात, की ‘मनात एक मोठा खड्डा सतत असतो, तो कशानेच भरून निघत नाही.' हा खड्डा भरून काढण्यासाठी माणसं कधी कधी मन मारून जगतात, इतरांचं मन अजिबात दुखावलं जाऊ नये याची काळजी घेतात, किंवा स्वत:ला कोणत्या ना कोणत्या मोठ्या कामात बुडवून टाकतात. पण एकाकीपण या कशानेच सरत नाही. एकाकीपण असं बिनचेहऱ्याचं पण प्रत्येकाच्या ओळखीचं असतं.

एकाकीपण आणि एकान्त यात खूपच अंतर आहे.
एकान्त नेहमीच्या धावपळीत आवश्यक असणारा विसावा आहे. आपला दिवस, आठवडा, महिना नेमका कसा गेला याचा आढावा घेण्यासाठी, नातेसंबंधाबद्दल विचार करण्यासाठी, आपले विचार-भावना-वर्तन याबद्दल चिंतन करण्यासाठी एकान्त आवश्यक असतो. एकान्तात अनेक नवीन आणि सर्जनशील गोष्टींची निर्मिती होते. याउलट, एकाकीपणात आपल्या आणि इतरांच्या कृतीला दोष दिला जातो. एकाकीपणामुळे मन विचलित होतं. त्यामुळे नवीन गोष्टी करणं सोडाच, रोजची कामं करणंही अवघड जातं.

सर्वसाधारणपणे एकाकीपण तीन रूपांत येतं-

१. भावनिक एकाकीपण
कधी जवळचं नातं निर्माण करण्यात अडचणी येतात, कधी जवळच्या माणसांचे मृत्यू होतात, तर कधी ते लांब राहायला जातात. या कारणाने आलेलं एकाकीपण सहज दिसू शकतं. आपल्या माणसाचा मृत्यू आणि त्या व्यक्तीपासून वेगळं राहायला लागणं याचे मेंदूवर होणारे परिणाम सारखेच असतात. माणसाच्या मनावर दीर्घकाळ या दोन्हींचा खूप खोलवर असा परिणाम राहतो.

याच्या पलीकडेही एकाकीपण असतं, ज्यात माणसं एकत्र राहतात, तरीही एकटी असतात. आपलं माणूस आपल्याला समजून घेऊच शकत नाही असं सतत वाटत राहतं. कितीही आटापिटा केला तरी आपल्याला जे म्हणायचं आहे ते त्या व्यक्तीपर्यंत पोहोचत नाहीये किंवा त्या व्यक्तीला ते समजलं तरी मान्य करायचं नाहीये, असं वाटत राहतं. उदा : घर म्हणून माणसांची जी काही संकल्पना असते तीच जुळत नाही. एका व्यक्तीला सुट्टीच्या दिवशी घरात थांबून स्वच्छता करावीशी वाटते, तर दुसरीला सुट्टी आहे तर बाहेर फिरू या असं वाटतं. एकाला सतत पैसे साठवावेसे वाटतात, तर दुसऱ्याला खरेदी करावी वाटते. हे असं प्रत्येक बाबतीत होत राहतं. माणसं वर्षानुवर्षं एकत्र राहतात, तरीही भावनिकदृष्ट्या एकाकी राहतात.

याचाच दुसरा प्रकार म्हणजे आपल्याला स्वीकारण्यासाठी खूप अटी घातल्या जातात असं दिसतं तेव्हा माणसाला एकाकीपण येतं. रंगरूपावरून सतत वाईट टिप्पण्या केल्या जातात, किंवा एखादं काम कसं जमत नाही हे सतत सांगितलं जातं; आपण काय केलं पाहिजे हे सतत शिकवलं जातं. अशा वेळी त्या व्यक्तीला वाटायला लागतं, की समोरच्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे स्वतःत बदल घडवल्याशिवाय हे नातं टिकणार नाही. स्वीकारासाठी माणूस जितका बदलतो तितका एकटा पडत जातो.

हल्ली ‘गॅस लायटिंग' हा शब्द अनेकदा वापरला जातो. ‘गॅस लायटिंग' म्हणजे आपले अनुभव, आपल्या भावना, अशा प्रत्येक गोष्टीवर जवळची व्यक्ती शंका घ्यायला लागते, तर कधी आयुष्यात घडलेल्या प्रत्येक वाईट गोष्टीला आपल्याला कारणीभूत धरलं जातं. कधी समोरची व्यक्ती एखादा प्रसंग घडलाच नाही किंवा तो पूर्ण विसरला गेला आहे अशी भूमिका घेते. आपल्याला मात्र सतत नाकारल्याची, फसवल्याची भावना घेरून राहते. म्हणजे ज्या नात्यात भावनिक एकवाक्यता नसते किंवा एका व्यक्तीला नात्याची भावनिक जबाबदारी नको वाटते, अशा नात्यात दुसऱ्या व्यक्तीला एकटं वाटू लागतं. जवळच्या व्यक्तीला आपल्या भावनिक गरजा अजिबातच न समजणं, त्या व्यक्तीने स्वत:च्या विश्वात रममाण राहणं, दोन व्यक्तींची जीवनमूल्यं आणि सवयी यांच्यामध्ये कमालीची तफावत असणं, एकाने कोणतीच भावनिक जबाबदारी न घेणं, तसंच भावनिकदृष्ट्या कायम गोंधळात टाकणं, अनेक अनुभव नाकारत राहणं, ही भावनिक एकाकीपणाची प्रमुख कारणं आहेत.

२. सामाजिक एकाकीपण
आपण सगळ्यांनी कोविडच्या काळात हा अनुभव घेतला आहे. आपण आपलं समाजातलं स्थान इतरांच्या उपस्थितीत निश्चित करत असतो. इतरांपासून तुटणं म्हणजे माणसाला मोठी शिक्षा वाटते. म्हणून समाजापेक्षा वेगळे निर्णय घ्यायला माणसं घाबरतात. ज्यांना वेगळं पाडलं जातं त्यांना जगणं खूप कठीण होऊन जातं. माणसं या ना त्या मार्गाने इतरांशी जोडून राहण्याचा प्रयत्न करत राहतात. केवळ समाजापासून वेगळं पडू नये यासाठी बुद्धीला पटणार नाही असे अनेक निर्णय घेतात. कित्येकदा वाद नको, या एका कारणासाठी स्वत:चं मन मारत राहतात. ब्रेने ब्राऊन ही मानसशास्त्रज्ञ म्हणते, की माणूस जितका स्वत:च्या मूल्यांच्या विरोधात जाऊन इतरांशी नातं तयार करतो तितका तो मनातून एकटा पडत जातो. ‘जातीसाठी माती खाणे' अशा प्रकारच्या म्हणी समाजाशी सतत जोडलं जाण्याच्या गरजेतून आल्या आहेत.

३. एकाकीपणातला तिसरा प्रकार म्हणजे एकूण मानवी अस्तित्वातला एकाकीपणा. प्रत्येक माणसाच्या मनात जन्मत:च एकाकीपण असतं. त्यातून मी कोण, माझ्या जगण्याचा उद्देश काय, या एकदाच मिळालेल्या आयुष्याचं मला नेमकं काय करायचं आहे, असे अनेक प्रश्न पडू लागतात. सगळं आयुष्य सुखात चालू असताना माणसाच्या मनात रिकामपण दाटून येतं. मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या सहवासात तात्पुरतं बरं वाटतं. पुन्हा घरी आलं की रिकामपण वर येतं.

याचं मुख्य कारण म्हणजे माणूस सगळ्या गोष्टींतून अर्थ शोधणारा प्राणी आहे. जगण्यात नेमका काय अर्थ आहे हे सापडत नाही तेव्हा आपण नेमके कशासाठी जगतो आहोत हे समजत नाही. जवळच्या माणसांनी कितीही प्रेम, आपुलकी दाखवली तरी एका क्षणी ती सवयीची होऊन जाते. त्यापुढे या जगण्याचं काय करायचं हे समजत नाही.

जगण्याच्या अर्थाबाबत दोन मतप्रवाह दिसतात. पहिला म्हणजे प्रत्येक माणसाच्या जगण्याला जन्मतःच काही तरी अर्थ असतो, तो कोणी तरी लिहून ठेवलेला असतो, तुम्हाला तो फक्त शोधायचा असतो. दुसरा मतप्रवाह असं मानतो, की असा जगण्याचा उद्देश काही ठरलेला नसतो, किंवा कोणी तरी दुसरी व्यक्ती तो देऊ शकत नाही, आपल्या जगण्याला आपणच अर्थ द्यावा लागतो. व्हिक्टर फ्रँकल हा अस्तित्ववादी मानसशास्त्रज्ञ म्हणतो, ‘जगण्याला अर्थ मिळाला तर कसं जगायचं हा मोठा प्रश्न सुटतो.' तर अल्बर्ट कामू म्हणून गेला आहे, ‘तुम्ही सारखा जगण्याचा अर्थ शोधत राहिलात तर जगणं राहून जाईल.' तुम्ही कोणताही विचारप्रवाह मानणारे असा, काही तरी मनापासून स्वीकारल्याशिवाय एकाकीपण, रिकामपण जात नाही हे खरं.

असं सतत एकाकी वाटण्याचं काही वय असतं का?
बहुतेक लोकांना वाटतं, की म्हातारपणी एकाकी वाटत असावं. पण आता एकाकीपणाचं स्वरूप बदलू लागलं आहे. अगदी लहान वयापासून माणसाला एकाकीपणाचा सामना करावा लागू शकतो. रूढ अर्थाने प्रत्येक व्यक्तीचं सामाजिक आयुष्य साधारण सहाव्या वर्षी सुरू होतं, त्यानंतर मोठ्या सामाजिक गटाचा भाग होण्याची हळूहळू सुरुवात होते. यात कधी ठरवून चौथी, पाचवीच्या टप्प्यावर वर्गात एखाद्या मुलाला मुद्दाम वेगळं पाडलं जातं, त्याला एकत्र डबा खाण्यासाठीही घेतलं जात नाही. त्या वेळी एकाकीपणाच्या अनुभवांची सुरुवात होते. त्याआधीही व्यक्तीच्या वाट्याला एकाकीपण येऊ शकतं. पण वयाच्या या टप्प्याच्या आधी त्या अनुभवांचा अर्थ काढता येत नाही. जे मूल एकटं पाडलं जातं त्याच्या मनात समीकरण होऊ लागतं, की इतरांनी आपल्याला स्वीकारायला हवं असेल तर विशेष प्रयत्न करावे लागतील.

किशोरवयातली म्हणजे १२ ते १९ या वयोगटातली जवळजवळ ४० टक्के मुलं-मुली एकाकीपणाची शिकार होतात. या वयात आपण ज्यांना मित्र मानतो ते खरंच आपले मित्र आहेत का, इतर लोकांना आपण खरंच आवडतो का, नेमकं काय केलं तर आपल्याला ग्रुपमधून काढलं जाणार नाही, अशा विचारांच्या रूपात एकाकीपण येतं. मग नाकारलं जाऊ नये म्हणून, केवळ मित्रमैत्रिणी म्हणतात म्हणून कधी काही मुलं नको त्या सवयींच्या आहारीसुद्धा जातात.

वयाच्या टप्प्यानुसार एकाकीपणाच्या अनुभवात फरक पडू शकतो. काहींना चाळिशीच्या उंबरठ्यावर एकाकीपण येतं. समाजाने आखून दिलेल्या भूमिका पार पडल्या की मग या आयुष्याचं नेमकं काय करायचं हे समजत नाही. आपण त्याला ‘मिडलाइफ क्रायसिस' म्हणतो. उतारवयात एकाकीपण अधिक तीव्रतेने अनुभवाला येतं. आपण कोणालाच नको झालो आहोत, आपल्याशी बोलण्यासाठी कोणालाच वेळ नसतो, असे विचार छळू लागतात. (उतारवयातल्या मानसिक समस्यांवर आपण पुढील लेखात अधिक चर्चा करणार आहोत.)

एकाकीपण वाटतं तितकं वरवरचं नसतं. एकाकीपणाच्या पातळ्या आहेत.
प्रासंगिक एकाकीपण म्हणजे अचानक घरांतले लोक बाहेरगावी गेल्याने किंवा नोकरीच्या नव्या ठिकाणी ओळखी नसल्याने काही काळापुरतं वाटतं ते. याचे खूप खोलवर मानसिक परिणाम होत नाहीत, पण एकाकीपण गंभीर किंवा तीव्र असतं तेव्हा मात्र मनावर आणि शरीरावर त्याचे अनेक परिणाम होत असतात. अनेक मानसिक समस्यांचा उगम या एकाकीपणाच्या भावनेतून येतो.

आपण मागच्या दोन लेखांमध्ये जे चिंता आणि उदासीनतेचे प्रकार पाहिले त्यांचा उगमसुद्धा एकाकीपणातून होऊ शकतो. एक उदाहरण- पंचवीस वर्षांची श्रेया लग्न होऊन नव्या घरी आली; पण तिला हळूहळू लक्षात आलं, की नवरा सतत कामात असतो आणि कधीच भावनिकदृष्ट्या उपलब्ध नसतो. श्रेया नियमित वेगवेगळ्या कार्यक्रमांना जाते, माहेरच्या लोकांच्या संपर्कात असते, तरी तिला कमालीचं भावनिक एकाकीपण आलं आहे. ती रोजची कामं नीट करत असली तरीही मनातून ती सतत उदास असते. तिच्या झोपेवर याचा परिणाम झाला आहे.

मानसशास्त्रज्ञ एरिक फ्रॉम याच्या मांडणीनुसार जेव्हा माणसाला कोणाशीच भावनिकदृष्ट्या जोडलं गेल्याचं वाटत नाही, एकूणच जगण्यावर विश्वास कमी होतो, तेव्हा झोपेच्या तक्रारी सुरू होतात. श्रेयाच्या नवऱ्याला जी नात्यातली स्पेस वाटते ती तिला तटस्थता वाटते. तिला सतत प्रश्न पडतो, की नात्यात अवकाश मिळणं आणि तटस्थता येणं यात नेमका फरक कसा करायचा?

आणखी एक उदाहरण पन्नाशीच्या राजीवचं. त्याचे त्याच्या मुलीशी काही तरी वाद झाले. मुलगी घर सोडून गेली ती कायमची. तेव्हापासून राजीवला कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात जावंसं वाटत नाही, लोकांना भेटावंसं वाटत नाही. लोक सतत प्रश्न विचारतात, शंका घेतात, सतत परीक्षा घेत राहतात, कोणी समजून घेत नाही, या विचाराने त्याला अनेकदा एकाकी पडल्यासारखं वाटतं. त्याला नुकतंच मधुमेहाचं निदान झालं आहे. त्याला प्रश्न पडतो, की ज्या प्रसंगात समाजाने पाठीशी उभं राहिलं पाहिजे तिथे लोक एकटे कसे पाडू शकतात? चाळिशीच्या घरात असलेल्या केतकीने कोरोनाच्या काळात जोडीदार गमावला. तोपर्यंत चांगली गृहिणी होणं यातच तिने जगण्याचा अर्थ शोधला होता. आता नेमकं कशासाठी जगायचं हा प्रश्न तिला छळत राहतो.

असं अनेकप्रकारे एकाकीपण माणसाला घेरून टाकतं. वर उल्लेख केल्याप्रमाणे तीव्र चिंता आणि नैराश्याची सुरुवात एकाकीपणातून होऊ शकते; पण त्या पलीकडे एकाकीपण हीच एक मानसिक समस्या होऊन जाते. या मनोवस्थेच्या परिणामांवर अनेक अभ्यास झाले आहेत. अनेक गंभीर शारीरिक आजारांची मुळं एकाकीपणात दिसतात. एकाकीपणामुळे माणसाचं आयुर्मान कमी होतं. म्हणून एकाकीपणाकडे दुर्लक्ष न करता त्यावर शक्य तितक्या लवकर उपचार करणं आवश्यक ठरतं.

एकाकीपणावर अधिक खोलवरचे उपाय आवश्यक असतात. काय असले पाहिजेत हे उपाय?
आतापर्यंत माणसाने अनेक वरवरचे उपाय करून पाहिले आहेत. उदा. जमेल तशी खरेदी करत रहा, सतत लोकांमध्ये राहण्याचा प्रयत्न कर, देवाधर्मात स्वत:ला बुडवून घे, हे पारंपरिक उपाय तर माणूस करत आलेला आहेच.

पण आता एकाकीपणा घालवण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग होईल का हेही पाहणं सुरू आहे. तुमचा काय अनुभव आहे?

इन्स्टाग्राम, फेसबुक यावर लाइक्स मिळाल्यावर तात्पुरतं बरं वाटतं की कायमस्वरूपी प्रश्न सुटतो?

फ्रेन्ड्सलिस्टमधले पाच हजार मित्रमैत्रिणी आपण लोकप्रिय असण्याचा भास निर्माण करतात की त्यांच्यामुळे आधार वाटतो?

फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या पलीकडे कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे आपल्याला कोणी सहचरी निर्माण करता येतोय का (कम्पॅनियन रोबॉट) याचा शोध घेण्याचाही प्रयत्न सुरू आहेच. अशा रोबॉटमध्ये सगळ्या भावना आणि भावनांच्या प्रतिक्रिया आधीच प्रोग्राम करून ठेवलेल्या असतात. पण असा रोबॉट जिवंत व्यक्तीची जागा घेऊ शकेल का?

या संकल्पनेवर बेतलेला एक इंग्रजी सिनेमा आहे- ‘हर'. या सिनेमात आर्टिफिशियल इन्टेलिजन्स सिस्टीम हीच नायकाची गर्लफ्रेंड असते. ती सतत त्याच्या सोबत असते. त्याच्या प्रश्नांना उत्तरं देते. कुठेही चिडचिड, अविवेकी वागणं नाही, तिरकं बोलून ओरखडे काढणं नाही. अगदी समंजस, गोड गर्लफ्रेंड. हे किती स्वप्नवत आहे ना! पण आपणच तिच्या आयुष्यात एकमेव आहोत ही गरज ती भागवत नाही, आपल्यासाठी ती तळमळत नाही, हे समजल्यावर नेमकं काय वाटेल? म्हणजे अजूनही आर्टिफिशियल इन्टेलिजन्स सगळ्या मानवी व्यवहारांना पुरेल इतका सक्षम नाही. यात तंत्रज्ञानाबद्दलचा आकस मुळीच नाही बरं का. मुद्दा इतकाच आहे, की माणूस भावनिकदृष्ट्या जितका उत्क्रांत आहे तितकी विविधता आणि जिवंतपणा ए.आय.मध्ये आहे का? तो मानवी एकाकीपणा घालवण्यासाठी पुरेसा आहे का?

तंत्रज्ञानातले बदल, सुधारणा होतील तेव्हा होतील, पण आपण व्यक्तिगत पातळीवर काय करू शकतो याबद्दल बोलू या.
आपण आपल्या बाजूने शक्य तितक्या प्रामाणिकपणे नाती निभावण्याचा प्रयत्न केला तर भावनिक एकाकीपणा थोडा तरी कमी होऊ शकतो. नात्यांमध्ये छक्केपंजे नसतील तर त्यातून समाधान मिळू शकतं. आपल्या जगण्याला काही तरी उद्देश असेल तर जगणं सुसह्य होऊ शकतं. जितके आपण महत्त्वाचे तितकाच आपल्या आयुष्याचा उद्देश महत्त्वाचा, हे सतत डोक्यात ठेवलं तर उपयोग होऊ शकतो. यापलीकडेही काही प्रमाणात एकाकीपण उरतंच. ते आपण फक्त सहन करू शकतो, संपवू शकत नाही. त्यामुळे ते सहन करण्याची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. भावनिक एकाकीपण घालवण्यासाठी सामाजिक वावर वाढवला तर गडबड होते. माणसं सामाजिक आयुष्यात अधिकाधिक कर्कश्श व्हायला लागतात. हे टाळायला हवं.

असंच सामाजिक एकाकीपण घालवता येऊ शकतं का?
समाज म्हणून आपल्याला एक चौकट लागते हे खरं आहे. पण या चौकटी जितक्या करकचून पक्क्या होतात तितका एकाकीपणा वाढू लागतो. एक तर समाजाच्या आपल्याकडून असणाऱ्या अपेक्षा कधीच १०० टक्के पूर्ण होत नाहीत. हे स्वीकारता आलं नाही तर त्यातून न्यूनगंड तयार होऊ लागतो. आपली दखल घेतली जावी म्हणून अधिक धडपड सुरू होते. त्यातून नैराश्य, एकाकीपण वाढतं. वेगळी लैंगिकता, वैवाहिक स्थिती, मुलं असणारे-नसणारे, असे वेगवेगळ्या बाबतींत अल्पसंख्याक असणारे जास्तीत जास्त एकाकी होत जातात. सामाजिक चौकटीत सगळ्यांना समान दर्जा असणं हे यावरचं उत्तर असू शकतं. त्यासाठी सामाजिक खुलेपणा वाढायला हवा, ज्यासाठी सगळ्यांनी मिळून दीर्घ प्रयत्न करायला हवेत.

वैयक्तिक पातळीवर एकाकीपणाचा नीट विचार करून त्याचं नियोजन करता आलं तर आपल्याला एकान्त अनुभवता येऊ शकतो. असा एकान्त अनुभवता येणं हे अनेक मानसिक समस्यांवरचं उत्तर आहे.

गौरी जानवेकर | gjanvekar@gmail.com

या क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि समुपदेशक आहेत. त्या या विषयावर लेखन करतात, कार्यशाळाही घेतात.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 5

धनंजय अंदनकर 09.02.25
खुप छान लेख गौरी मॅडम, मला प्रचंड एकाकीपणा सतावतो. मला मित्र मैत्रणीची खुप गरज आहे.
अमोल वाघमारे 09.02.25
खूप छान लेख झाला आहे.
सुरेश दीक्षित 08.02.25
खूप सुंदर लेख आहे.....बर्‍याच नवीन गोष्टी...प्रश्न...त्यावरील उपाय अशी छान साधक बाधक चर्चा ह्यात केलेली आहे....
डॉ. हेमंत देवस्थळी 07.02.25
या विषयावर आपल्याला लेखन करावसं वाटलं याचा मला खूप आनंद झाला. जोडीदार गेल्यानंतर जे एकटेपण येतं ते सह्य करण्यासाठी आनंदयात्रा एकल स्वमदत गट मी एक २००८ मध्ये स्थापन केला. अजूनही तो जोमाने चालू आहे. आपल्याला केव्हातरी भेटायला आवडेल. एखाद्या आमच्या कार्यक्रमातही आपण येऊ शकता. धन्यवाद. डॉ हेमंत देवस्थळी (9552127127)
YASH07.02.25
EKAKIPANACHI SAMASYA AJUN WADHNAR AHE KA?
See More
navi-pidhi-navya-vata.webp

Select search criteria first for better results