‘‘अरे, मुलगी आहेस का रडायला?’’
घरात आई-वडीलच काय, इतर माणसेही रडून मोकळे होणाऱ्या शाळकरी मुलग्यांना बजावत असतात. सतत ते ऐकून, ‘मुलग्यांनी रडायचे नसते’, हे त्यांच्या अंतर्मनात कुठेतरी घर करून बसते. पुढे हीच मुले मोठी झाली, की रडून मन मोकळे करणे किंवा आपल्या समस्या मोकळेपणाने घरात, इतरांसमोर मांडणे टाळताना दिसतात.
‘पुरुषांनी कसं बळकट आणि मजबूत असावं,’ ‘पुरुषासारखा पुरुष तू अन् मुलींसारखा का रडतोस,’ किंवा ‘मर्द को दर्द नही होता’, अशा रूढ झालेल्या पुरुषत्त्वाच्या कल्पनांमुळे आजचा पुरुष मानसिक आरोग्याच्या मोठ्या धोक्याच्या वळणावर येऊन थांबला आहे.
एका अभ्यासानुसार (A Comprehensive Review on Men's Mental Health and Social Reason Behind It), जगात पुरुषांच्या आत्महत्येचा दर महिलांपेक्षा चारपट जास्त आहे. भारतातही आत्महत्या करणाऱ्या पुरुषांचे प्रमाण महिलांच्या तुलनेत अडीचपट अधिक आहे. विशेष म्हणजे गेल्या ७ वर्षांपासून ही आकडेवारी सतत वाढत चालली आहे. जागतिक पुरुष दिनाच्या निमित्ताने समाजातील हा महत्त्वाचा मुद्दा पुढे आला आहे.
जागतिक पुरुष दिन का साजरा केला जातो?
दरवर्षी १९ नोव्हेंबर रोजी भारतासह जगभरात सुमारे ८० देशांमध्ये जागतिक पुरुष दिन साजरा केला जातो. कुटुंबात आणि समाजात पुरुषांनी दिलेल्या योगदानाचा आदर करणे, त्यांच्या मानसिक आरोग्याबद्दल खुलेपणाने बोलणे, त्यांच्यासमोरील आव्हाने अधोरेखित करणे आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याबद्दल जागृती करणे, या उद्देशातून हा दिवस साजरा केला जातो.
१९२३ साली हा दिन साजरा करण्याची मागणी केली होती, असे संदर्भ आहेत. जागतिक पुरुष दिनाची कल्पना १९९० च्या दशकात अमेरिकन पुरुष हक्क कार्यकर्ते थॉमस ओस्टर यांनी केली होती. १९९९ साली वेस्ट इंडीज विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक डॉ. जेरोम टेलक्सिंग यांनी पहिल्यांदा आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ जागतिक पुरुष दिन साजरा केला. त्यांनी पुरुषांच्या समस्या मांडण्यासाठी लोकांना एकत्र केले. भारतात हा दिवस पहिल्यांदा १९ नोव्हेंबर २००७ रोजी साजरा करण्यात आला. दरवर्षी या दिवसाची एक थीम ठरते. यंदाच्या जागतिक पुरुष दिनाची थीम 'Celebrating Men and Boys' अशी आहे. या दिवसाचा मुख्य उद्देश पुरुषांच्या कल्याणासाठी आणि आरोग्यासाठी जागरूकता निर्माण करणे, त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आणि लिंगभेदावर आधारित भावनिक आरोग्याबाबतची असमानता दूर करणे हा आहे.
मनावरचे ओझे आणि एकटेपणाः
दुसऱ्या एका अभ्यासानुसार (Mask of Masculinity: Effect of Finance on Coping and Anger on Man) शहरी जीवनातील धावपळ, कामाचा ताण आणि 'सगळं काही व्यवस्थित आहे' हे दाखवण्याचा सततचा दबाव... या कारणांमुळे शहरांमधील पुरुष गर्दीमध्ये वावरत असतानाही एकटेपणा अनुभवत आहेत. यातून त्यांचा चिडचिडेपणा आणि राग वाढत आहे. यामागे आर्थिक ताण हे सर्वात मोठे कारण असल्याचे समोर आले आहे. त्याव्यतिरिक्त जबाबदाऱ्या, आत्ममूल्य आणि पुरुष म्हणून कुठेतरी कमी पडत असल्याची भावना यामुळेही हा राग आलेला असतो.
संवादाचा अभावः
मनातील ताणाचा निचरा व्हायला हवा. कोणत्याही नात्यातील समाधानासाठी भावनिक बुद्धिमत्ता खूप महत्त्वाची आहे. याचा अर्थ, स्वतःच्या आणि जोडीदाराच्या भावना समजून घेऊन त्यांना योग्य प्रतिसाद देणे. अनेक पुरुष भावना व्यक्त करणे हा कमकुवतपणा मानतात, कारण ते त्याच रूढ विचारांच्या संस्कारातून मोठे झालेले असतात.
भावना व्यक्त न केल्यामुळे संवाद तुटतो आणि भावनिक अंतर वाढते. बोलणेच टाळले जाते. मनातील भावनांना सतत दाबून ठेवल्यामुळे पुरुषांचा आक्रमकपणा बाहेर पडतो. रूढ झालेले विचार आणि 'सेल्फ स्टिग्मा'मुळे (स्वतःबद्दलचा नकारात्मक दृष्टिकोन) पुरुष भावनिक अडचणीत असतानाही मदत घेण्यास तयार नसतात. 'आपल्याला कोणीतरी मदत करत आहे, याचा अर्थ आपण कुठेतरी कमी पडतोय’, अशी त्यांची धारणा होते. या धारणेपोटी पुरुष आपले ओझे शांतपणे एकट्यानेच वाहण्यात धन्यता मानतात. यामुळे नात्यात असूनही पुरुष पुन्हा एकटा पडतो, परिणामी, त्याचे मानसिक आरोग्य बिघडायला लागते. एकूणच, पुरुषांचे होत असलेले मानसिक खच्चीकरण आणि त्यांचा आत्महत्येच्या दिशेने होत असलेला प्रवास हा विषय पुरुषांनीही आणि समाजाने गांभीर्याने घेण्याची आता गरज निर्माण झाली आहे.
पुरुषांच्या निरोगी भविष्यासाठी पंचसूत्रीः
डॉक्टरांच्या मते, पुरुषांना भावनिकरीत्या निरोगी आयुष्य जगता यावे यासाठी सांस्कृतिक आणि संस्थात्मक बदल करणे दोन्ही आवश्यक आहेत. खरी ताकद शांत राहून भावना दाबून ठेवण्यात नाही, तर प्रामाणिकपणे व्यक्त करण्यात आहे. त्यासाठी त्यांनी पुरुषांच्या निरोगी भविष्यासाठी महत्त्वाचे उपाय पंचसूत्रीच्या स्वरूपात सांगितले आहेत:
1) पुरुषांसाठी खास समवयस्क मदत गट (Peer Support Group), मार्गदर्शन कार्यक्रम आणि मानसिक आरोग्य कार्यशाळा सुरू कराव्यात, जिथे ते मनमोकळेपणाने बोलू शकतील.
2) वडील, शिक्षक आणि समाजातील प्रभावी पुरुषांनी भावनांबद्दल बोलणे, सुसंवाद साधणे, सगळ्यांनीच एकमेकांची मदत घेणे यात काही गैर नाही, हे कृतीतून दाखवून द्यावे लागेल.
3) लहानपणापासूनच 'मुलांनी रडायचं नसतं' या विचारांना आव्हान देऊन शाळा, कुटुंब आणि समाजाने भावनिक बुद्धिमत्ता आणि सहानुभूतीला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.
4) पुरुषांच्या विशिष्ट समस्या (उदा. कामाचा ताण, आर्थिक दबाव) ओळखून त्यांच्याशी गोपनीय, टीका-निंदा विरहित संवाद साधावा. सल्ला देण्याची घाई न करता त्यांचे ऐकून घेण्याचा प्रयत्न करावा.
5) पुरुषांप्रती सहानुभूती व्यक्त करण्यासाठी कामाच्या ठिकाणी पुरुषांसाठी गोपनीय समुपदेशन (Counselling) सुरू करावे.
डॉक्टर, मानसोपचारतज्ज्ञ काय सांगतात?
छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाच्या मनोविकृती चिकित्साशास्त्राचे विभागप्रमुख डॉ. पवन खोत सांगतात, "सध्या २० ते ४० वयोगटातील पुरुष लग्न, कर्ज, कौटुंबिक जबाबदारी आणि नोकरी या चौकटीत अडकलेले दिसतात. 'आपल्याबरोबरचे मित्र स्थिर झाले, पण आपण अजूनही संघर्षच करतोय,' हा न्यूनगंड अनेक पुरुषांमध्ये निर्माण झालेला दिसतो. या भावना ते उघडपणे व्यक्त करत नाहीत. परिणामी, प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मानसिक दबावाखाली जगत राहतात. या मनःस्थितीतून बाहेर पडायचे असेल तर पुरुषांनी त्यांच्या व्यग्र दिनचर्येतून स्वतःसाठी एक दिवस काढणे गरजेचे आहे. (महिन्यातून, पंधरवड्यातून की आठवड्यातून हे त्यांना विचारावे लागेल.) व्याख्याने ऐकणे, योगा-व्यायाम करणे, समुहाने फिरायला जाणे, मनमोकळेपणाने संवाद साधणे, सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेणे आणि छंद जोपासणे या गोष्टी त्यांनी करायला हव्यात."
ध्यास व्यसनमुक्ती व मानसिक आरोग्य संवर्धन केंद्राचे चिकित्सक मानसशास्त्रज्ञ संजय कुंभार सांगतात की, "सध्या पुरुषांच्या जीवनात मित्रांची जागा सोशल मीडियाने घेतली आहे. पूर्वीसारखा मनमोकळेपणाने होणारा संवाद आता व्हॉट्सॲप फॉरवर्ड्सने घेतला आहे. यातून पुरुष भावनिकरीत्या एकटेपणा अनुभवत आहेत. इतर कोणाजवळ भावना व्यक्त करायला सुरुवातीला संकोच वाटत असेल तर पुरुषांनी मानसोपचारतज्ज्ञांकडून निःसंकोच सल्ला घेणे आवश्यक आहे. स्वतःला होणाऱ्या त्रासाबद्दल कुटुंबातील आई, वडील, पत्नी, मुलांशी कोणताही कमीपणा न बाळगता संवाद साधणे महत्त्वाचे आहे."
पुरुषांनी स्वतः आणि समाजाने त्यांच्या आरोग्यासाठी गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.
